मोह वृक्ष (सौजन्य : विकिपीडिया) |
या वृक्षाचे नावच आहे 'मोह' मग या वृक्षाचा मोह कसा पडणार नाही? इतके सुंदर नाव असण्याला कारणेही तशीच आहेत. या वृक्षाची फुले अतिशय मादक असतात. यांच्या फुलात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या शर्करेमूळे या फुलांच्या सेवनाने झिंग चढू शकते. म्हणून या फुलांपासून दारू बनवली जाते.
शास्त्रीय नाव आहे Madhuca longifolia (मधुका लाँगीफोलिया). हा वृक्ष खूप मोठा होतो, खूप फांद्या आणि पानांच्या विपुल पसाऱ्यामुळे तो उत्तम छाया देऊ शकतो. डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात मोहवृक्षाचा उल्लेख नाही. त्याऐवजी 'मोहडा' या वृक्षाचा उल्लेख आहे. त्याचे शास्त्रीय नाव देखील Madhuca indica Gml. / Bassia latifolia Roxb. असे दिले आहे. पण Madhuka longifolia या मोहाच्या झाडाशी त्याचे बरेचसे गुणधर्म जुळतात. दोघांचे संस्कृत नाव 'मधुक' असेच आहे. मग हे दोन्ही वृक्ष एकच आहेत का असा प्रश्न पडला. यावर उत्तर श्री. द. महाजन यांच्या 'आपले वृक्ष' या पुस्तकात मिळाले. त्यांनी लिहिल्याप्रमाणे, या वृक्षाचे दोन प्रकार आहेत. 'उत्तरमोह'(Madhuca longifolia) जो उत्तर भारतात आढळतो. आणि दक्षिण मोह (Madhuca longifolia proper) जो केरळ , म्हैसूर, कोल्हापूरच्या रानात आढळतो. या दोघातील महत्वाचा फरक म्हणजे उत्तरमोह पानझडी वृक्ष आहे तर दक्षिणमोह सदाहरित आहे.
हा वृक्ष Sapotaceae या कुळातील असून बकुळ वृक्षाशी त्याचे जवळचे नाते आहे. इंग्रजीत याला Ellopa Tree, Butter tree असे म्हणतात. हिंदीत 'महुवा' आणि गुजरातीत 'महुडो' असे म्हणतात.
वसंत ऋतूत या झाडाला फुले येतात. ही फुले रात्रीच्या वेळी फुलतात.
मोहाची फुलं (सौजन्य : विकिपीडिया) |
पौराणिक काळात मोहाच्या फुलांच्या माळेचा वापर उपवर वधूचा अलंकार म्हणून केला असल्याची नोंद साहित्यात सापडते. स्वयंवरमाळा देखील मोहाच्या फुलांपासून बनवली जात असे. कुमार-संभवकाव्यात पार्वतीच्या आभूषणात या मोहफुलांच्या 'मधुकमालेचा' उल्लेख आहे.
पर्याक्षिपत् काचिदुदार बंधं दूर्वावता पांडूमधुकदाम्ना ।।७. १४।।
एका दासीने दूर्वा आणि पांढुरक्या मधुकपुष्पांनी बनलेली माळा पार्वतीच्या डोक्याला बांधली असा या वरील ओळीचा अर्थ होतो.
कालिदासाच्या रघुवंश महाकाव्यात देखील मधुकपुष्पांचा उल्लेख आहे.
एवं तथोत्त्के तमवेक्ष्य किंचित् विस्त्रंसि दूर्वांक-मधुकमाला ।रघु. ६.२५।।
वरील ओळीचा अर्थ असा होतो की इंदुमतीने जेव्हा 'अज' या राजपुत्रास वरले, तेव्हा इतरांना नकार दर्शवण्यासाठी तिने हातातील दुर्वा आणि मोहाच्या फुलांनी बनलेली माळा खाली सोडली.
उत्तर भारतात, विशेषतः मध्यप्रदेशातील विंध्य-सातपुड्याच्या जंगलातील कोरकू, गोंड, माडिया आदिवासींचा हा कल्पवृक्ष आहे. फुलांचा वापर डाळीत मिसळून शिजवून खाद्य म्हणून केला जातो. तसेच फुलांपासून बनवलेली दारू आदिवासी लोक सणांच्या प्रसंगी प्राशन करतात. या मद्याचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. मोहाच्या फळांचा उपयोग खाद्य म्हणून होतो तसेच या फळांपासून तेल निघते. या तेलापासून साबण बनवला जातो. पानांचा उपयोग गायीगुरांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून केला जातो, तसेच या पानांपासून पत्रावळी देखील करतात. आदिवासी लोकांसाठी मोहाचे झाड हे उपासनेचे झाड आहे. लग्नप्रसंगी, सणावाराला या झाडाची पूजा केली जाते.
या आदिवासी लोकांच्या साहित्यात मोहाच्या झाडाला स्थान नक्कीच मिळाले असणार. मला त्या लोककथांमध्ये रस आहे ज्यात हत्ती, हरणं, माकड, अस्वल हे मोहाच्या या फुलांनी झिंगतात आणि मग अनेक विनोदी प्रसंग घडतात. अशा लोककथा मला अजून तरी मिळाल्या नाहीत. दुर्गा भागवत यांनी सातपुड्याच्या दुर्गम भागात फिरताना अशा लोककथा नक्कीच गोळा केल्या असणार, या अजून शोधायच्या बाकी आहेत.
हे मोहाचे झाड लावण्याची संधी मला मिळो हीच आशा करते. निसर्गातून, साहित्यातून, अशाप्रकारे मोहाचे झाड सदा मोहवत राहो.
No comments:
Post a Comment