Tuesday 7 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ६:काटेसावर


काटेसावर किंवा शाल्मली
कांदिवली स्टेशनच्या जवळ एक दुर्लक्षित काटेसावर आहे. रेल्वेट्रॅक्स आणि अलीकडील बसच्या येण्याजाण्याच्या रस्त्याच्या मध्येच हा वृक्ष उभा आहे. पण फेब्रुवारी अखेरीस, मार्च च्या सुरवातीला तो असा काही भरभरून फुलतो की त्याचे रूप डोळ्यात सामावत नाही. एकही पान नाही, नुसती गुबगुबीत गुलाबी तांबूस फुलंच फुलं. कळ्याही फारच मोहक. आणि पक्ष्यांची सतत ये-जा. मागच्याच आठवड्यात मी आठ-दहा रोझी स्टारलिंग्स त्यावर बागडताना पहिल्या. रणरणत्या उन्हात हे पक्षी त्या पूर्ण गुलाबी लाल झालेल्या वृक्षावर फारच सुंदर दिसत होते. 
हा वृक्ष जेव्हा फुलतो तेव्हा या वृक्षावर पक्ष्यांची झुंबड उडते. फारच क्वचित दुसरा कुठला वृक्ष असेल जो पक्ष्यांना एवढा प्रिय आहे. या फुलांचा मध खायला मैना, रोझी स्टारलिंग्स, सूर्यपक्षी, फुलचूखी, बुलबुल असे कितीतरी पक्षी हजेरी लावतात. पक्ष्यांना घरच्या आसपास आमंत्रण द्यायचे असेल तर हा वृक्ष घरच्या आसपास असायलाच हवा.

याचे शास्त्रीय नाव Bombax ceiba. भारतात याला असंख्य नावे आहेत, काटेसावर, लालसावर, शेवरी, शाल्मली, सेमल, रगतसेमल. 

कळी आणि फुल
फुल पाच पाकळ्यांचे चार ते पाच इंच लांबीचे असते, त्याचा देठ अतिशय जड असतो आणि पाकळ्याही गुबगुबीत असतात. लहानपणी मला हे फुल आठवते ते फक्त वात्रट मुले एकमेकाला मारायला हे फुल शाळेत घेऊन येत ते. खरंच एक फुल अंगावर जोरात मारले तर लागू शकते. वात्रट मुलांना काय तेवढेच हवे! पण खरं तर एवढ्या सुंदर फुलांचा काय हा विक्षिप्त वापर ती करत असत! खरंतर या फुलात एवढा मध असतो की या मधाची मेजवानी झाडायला कीटक, मधमाश्या आणि अनेक पक्षी या वृक्षावर येतात. पक्षी आवडणाऱ्या कुठल्याही माणसाला हा वृक्ष दारी असावा असेच वाटेल. काही ठिकाणी काटेसावरीच्या फुलांची, कळ्यांची भाजी देखील केली जाते. 

फळापासून सावरीचा कापूस निघतो. या कापसाच्या गाद्या-उश्या करतात. सावरीच्या चिवट सालीमुळे तिच्या दोऱ्या वळता येतात. सावरीच्या सालीला छिद्रं पडली की त्यातून एकप्रकारचा रस वाहतो, याला मोचरस असे म्हणतात. याचा उपयोग अतिसारावरचे औषध म्हणून केला जातो.

कालिदासाच्या ऋतूसंहार काव्यात काटेसावर वृक्षाचे वर्णन डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात दिले आहे. 

बहुतर इव जात: शाल्मलीनां वनेषु स्फुटति कनकगौर: कोटरेषु द्रुमाणाम् ।
परिणतदलशाखानुत्पतन् प्रांशुवृक्षान् भ्रमति पवनधूत: सर्वतोSग्निर्वनान्ते ।। १. २६ ।।

वाऱ्याने सोनेरी अग्नी सर्वत्र भडकून सावरीच्या वनात डोंब उठला आहे. ढोल्या तडकत आहेत. मोठया वृक्षांची पाने आणि फांद्या यांवर तो उड्या मारीत आहे.

दुर्गा भागवत यांनी 'मुंबईतील वसंतागम'(भावसंचित) या लेखात काटेसावरीबद्धल लिहिले आहे. 'आणि इकडे एखाददुसरे सावरीचे झाड आहे. तेही लाल, पसरट, पेल्याच्या आकाराच्या फुलांनी भरून गेले आहे. फुलांचा रंग नामी, पण वास असा की पुसू नये. जवळ कोण जाईल? पण हे काय? हे पहा त्यावर 'पीलक'(Golden Oriole)पक्ष्याच्या सुंदर जोडप्याने घरटे बांधले आहे.'

सावरीचा आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे पांढरी सावर (श्वेतशाल्मली) Eriodendron anfratuosum. हा वृक्ष तांबड्या काटेसावरीच्या मानाने दुर्मिळ आहे. या वृक्षाला हिवाळ्यात फुले येतात.

एक नावाने बंधू असलेला अतिशय सुंदर फुलाचा वृक्ष म्हणजे सोनसावर. Cochlospermum religiosum (मराठी नावाचे साम्य सोडले तर बाकी या वृक्षाचे काटेसावरीशी तसे काही नाते नाही). या वृक्षाचे कुळ आहे Chchlospermaceae, तर काटेसावरीचे कुळ आहे Bombacaceae. पण जेव्हा 'आपले वृक्ष' या श्री. द. महाजन यांच्या पुस्तकात या वृक्षाला पाहिले तेव्हा वाटले, काटेसावर आणि सोनसावर दोन्हीही जवळजवळ लावायला हवेत. एकमेकांकडे बघून आपल्या वेगळ्या रंगाच्या फुलांना बघून ते किती खुश होतील.

'आपले वृक्ष' या पुस्तकात श्री. द. महाजन यांनी तर याला 'सर्वत्र आढळणारा, भारतीय एकात्मतेचं प्रतीक असलेला बहुगुणी वृक्षोत्तम म्हटलं आहे. त्यांच्या मते वनशेती, वनीकरण यासाठी काटेसावर हा वृक्ष  एक उत्तम पर्याय आहे. 

कांदिवली स्टेशन जवळचा फुललेला काटेसावर वृक्ष

No comments:

Post a Comment