Thursday 9 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ८:बकुळ

'शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी'  हे मंगेश पाडगावकरांच्या  कवितेतील शब्द आपल्याला पुस्तकात ठेवलेल्या सपाट झालेल्या, आणि तरीही मंद सुवास देणाऱ्या बकुळीच्या नाजूक फुलाची आठवण करून देतात.  बकुळीची फुले असतातच तशी, वर्षानुवर्षे जपून ठेवावी अशी. कारण बकुळीचे झाड तसे दुर्मिळच. बकुळीला कोकणात 'ओवळं' म्हणतात. लहानपणी ओवळांची फुलं आणि त्यांचे वळेसर बाजारात विकायला आलेले मी खूपदा पाहिले आहेत. पण त्या काळात याची झाडं कुठे आहेत याचे काही स्वारस्य नव्हते. नंतर शोभेचे वृक्ष म्हणून कुठेकुठे शहरात लावलेले वृक्ष मी पहिले आहेत. पण दाट रानात मंद सुवासाची फुले माळून उभ्या असलेल्या गूढ अशा बकुळीच्या वृक्षाची त्याला सर नाही. तसाच दुसरा वृक्ष सुरंगीचा. हा तर त्याहूनही गूढ आणि मादक गंध असलेली फुले असलेला वृक्ष. वृक्षांमध्ये लिंग असते-नसते माहित नाही, तरीही बकुळी आणि सुरंगी ही स्त्रीझाडे असावीत असेच वाटते.

बकुळीचे शास्त्रीय नाव Mimuspos elengi. हिंदीत 'मौलसरी', इंग्रजीत स्पॅनिश चेरी, मेडलर, बुलेट वूड असे म्हणतात. या वृक्षाची फुले अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. पानांच्या बगलेत फुले येतात. हे फुल हातात घेऊन नीट निरखून बघावे असे असते. रंगही हिरवट-पिवळसर पांढरा. ही फुले केसरयुक्त असतात(त्यांच्या पटलांवर सूक्ष्म केस असतात.) त्यामुळे त्यांना 'केसरवृक्ष' असेही म्हणतात. फुले वसंत ऋतूमध्ये येतात.

बकुळीची फुले (फोटो सौजन्य : विकिपीडिया)
बकुळीचा वळेसर(फोटो सौजन्य : विकिपीडिया)

या फुलांचे वळेसर कोकणातील स्त्रिया केसांत माळतात. याचा वळेसर नुसता गुंतून केला जातो आणि छानही दिसतो पण खरा वळेसर बघावा तो सुरुंगीच्या फुलांचा.
बकुळीच्या फुलांपासून अत्तर तयार केले जाते, तसेच बकुळीच्या बियांत औषधी गुणधर्म असलेले तेल असते.

बकुळ वृक्ष संस्कृत साहित्यात अतिशय नावाजला गेला आहे. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' पुस्तकात कालिदासाच्या काव्यपंक्ती बकुळ वृक्षाचे वर्णन करतात.

सुवदनावदनासवसंभृतस्तदुनुवादिगुणः कुसूमोद्गम: ।
मधुकरैरकरोन् मधुलोलुपै: बकुलमाकुलमायतपंक्तिभि: ।। ९.३०।।

सुंदर स्त्रियांच्या अश्रुंवर पोसलेल्या बकुळ वृक्षाच्या फुलांचा बहर त्याच्या सद्गुणांचे अनुकरण करीत होता. या फुलांभोवती घोळका करणाऱ्या भुंग्यांनी त्याला भांबावून सोडले. मध लुटण्याकरिता या प्राण्यांनी एकच झुंबड केली.

'ऋतूसंहार' या कालिदासाच्या काव्यातही बकुळ वृक्षाचा उल्लेख पावसाळ्याच्या वर्णनात आढळतो.

शिरसि बकुलमालां मालतीभि: समेतां विकसित नवपुष्पैर्यूथिकाकुड्मलैश्र्व  ।। २.२४ ।।
बकुळीच्यामाळा स्त्रियांनी माळल्या आहेत. पावसाळ्यातही बकुळीला फुले येतात, उन्हाळ्यापेक्षा ती कमी असतात तरीही.

बकुळ वृक्षासारखाच एक वृक्ष आहे, ज्याचे नाव आहे 'रायण' (शास्त्रीय नाव: Mimusops hexandra) याचं आणि बकुळ वृक्षाचं कुळ एकच म्हणजे 'Sapotaceae' आहे. हा वृक्ष गुजरात आणि कोकण भागात वन्य आहे. दुसरा एक वृक्ष आहे जो बकुळीच्या  कुळातील नाही पण तरीही त्याची फुले बकुळीच्या वृक्षाची आठवण करून देतात. हा आहे 'खिरणी' (Manilkara hexandra).

बकुळ वृक्ष कोणत्याही जमिनीत वाढू शकतो आणि अगदी दोनशेहुन अधिक वर्षे जगतो. बकुळ, खिरणी आणि रायण हे वृक्ष एकत्र लावण्याजोगे आहेत.

No comments:

Post a Comment