Sunday 5 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ४:कांचन

कांचन (फोटो सौजन्य आंतरजाल)

कांचनचे शास्त्रीय नाव Bauhinia variegata आहे. याला इंग्रजीमध्ये orchid tree, camel's foot tree, kachnar and mountain-ebony असे म्हणतात.
मराठीमध्ये याला कोविदार असे म्हटले जाते. हा वृक्ष खूप  मोठा होतो. कांचन वृक्षाचे अनेक प्रकार आहेत.कांचन, रक्तकांचन, पिवळा कांचन, सेमला कांचन.  कांचन सिसालपिनेसी कुळात मोडतो. 
कांचनचे पान दोन पानाचे जोडपान असते. बॉहिन नावाच्या(कॅस्पर बॉहिन आणि जॉन बॉहिन) दोन फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ  बंधूंच्या स्मरणार्थ याचे वनस्पतिशास्त्रीय नाव 'बॉहिनिया' असे ठेवले गेले आहे. कांचनची पानं आपट्याच्या झाडासारखी असतात. दसऱ्याला लोकं आपट्याच्या पानांऐवजी कांचनची पानं ओरबाडून सोनं लुटतात. काहीही असो पण सणाच्या नावाखाली कांचन किंवा आपटा या झाडांच्या पानांची नासदुस करणे आपण थांबवले पाहिजे. आपट्याची फुलं दिसायला नगण्य असतात तर कांचनची फुलं अतिशय सुंदर असतात. कांचनाची पानंही आपट्याच्या पानांपेक्षा मोठी असतात. कांचनाच्या विविध प्रकारात फुलंही राणी रंगाची, जांभळी, पिवळी, पांढरी असतात.

या  वृक्षाला कांचन असे नाव का पडले?  
कांचनाच्या शेंगातील बिया मुले खेळताना नाणी म्हणून वापरत असत असा उल्लेख म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात केला आहे. कांचनचा एक प्रकार 'पिवळा कांचन' या वृक्षांविषयी एक पुराणकथाही या ग्रंथात त्यांनी दिली आहे. ती अशी 'रघुराजाने यज्ञ करून आपली सर्व संपदा देऊन टाकल्यावर कौत्स नावाचा ब्राह्मण  गुरुदक्षिणा देण्याकरता चौदा कोटी नाण्यांची याचना करू लागला. राजाने त्यासाठी कुबेरावर स्वारी करण्याचे ठरवले. पण स्वारी होण्यापूर्वीच इंद्राने पाऊस पाडला. कांचनाच्या फुलावर पडलेल्या प्रत्येक थेंबाचे नाणे बनले. या कथेतील कांचन हा 'पिवळा कांचन' (Bauhinia tomentosa) असून त्याच्या पिवळ्या फुलाच्या एका पाकळीवर एक तांबडा ठिपका असतो.

पिवळा कांचन (फोटो सौजन्य विकिपीडिया)

जानेवारीच्या अखेरीस हा वृक्ष फुलांनी ओसंडून वाहू लागतो. कांचनाच्या फुलाला अतिशय तरल असा सुवास असतो.
बॉहिनियाची एक अतिशय वेगळी जात डॉ. हेमा साने यांनी आपल्या 'आपले हिरवे मित्र' पुस्तकात दिली आहे. तिला कोकणात 'मावळी' असे नाव आहे. या जातीचे वैशिष्टय असे की हा वृक्ष नसून एक वेल आहे. पण वेलीचा आकार एवढा मोठा की सहज दोन तीन माणसे त्यावर लोंबकळू शकतात. त्यांनी दिल्याप्रमाणे अलिबागजवळच्या कनकेश्वराच्या जंगलात ह्या वेली सापडतात. या वेलींची पाने इतकी मोठी असतात की त्यांची पत्रावळ होऊ शकते. 
संस्कृत साहित्यात कांचन वृक्षावर संदर्भ सापडतात. 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात दिल्याप्रमाणे कालिदासाने 'ऋतुसंहार' या ग्रंथात विंध्य पर्वताच्या वनश्रीचे आणि कांचन वृक्षाचे केलेले वर्णन पुढील ओळीत आढळते.

मंदानिलाकुलितचारू-विशालशाखः | पुष्पोद्गमप्रचुरकोमलपल्लवाग्रः ||
मत्तव्दिरेफपरिपीतमधुप्रसेकः | चित्तं विदारयति कस्य न कोविदारः || ऋ. ३. ६

मोठ्या फांद्या असलेला, कोवळी पालवी आणि फुलं एकदमच फुलवणारा, मधुसेवनासाठी भुंगे ज्याच्या फुलांवर रुंजी घालतात असा हा कांचन वृक्ष कुणाचे चित्त वेधून घेणार नाही?       

आणखी एक जात Bauhinia blakeana म्हणजे हाँगकाँग ऑर्किड ट्री, अतिशय सुंदर फुलांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात ही फुलं फुलायला सुरवात होते आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पूर्ण बहर असतो.

श्वेतकांचन (bauhinia hookeri ) ही परदेशी कांचन वृक्षाची जात आहे. या वृक्षाची फुले सुवासिक, पांढरी असतात. फुलाच्या मधोमध तांबडे केसर असते. पण हा वृक्ष  दुर्मिळ आहे.

एकांचन म्हणजेच Bauhunia monandra  हा आणखी एक वृक्ष परदेशातून इथे स्थायिक झाला आहे. त्याला गुलाबी बहुनिया असे म्हणतात.  या फुलाचे एकच केसर प्रौढ होते म्हणून याला एक-केसर कांचन  किंवा एकांचन असे म्हणतात.

एकांचन (फोटो सौजन्य: विकिपीडिया)

कांचनची साल, पाने  आणि मुळे यांना औषधी गुण आहेत. कांचन वृक्षाचा आणखी एक प्रकार श्री. द. महाजन यांच्या 'आपले वृक्ष' पुस्तकात नोंदला गेला आहे. त्याचे नाव आहे सेमला कांचन(Bauhunia Semla/Retusa ). याची पाने अग्रभागी उथळ खड्डा असलेली असतात, म्हणून शास्त्रीय नावात 'रेटयूसा' शब्द आहे. हा वृक्ष पूर्ण भारतीय असूनही दुर्मिळ आहे. हा वृक्ष मध्यभारत, पंजाब, उत्तर भारतात, हिमालय पायथ्याशी, शिवालिक पर्वताच्या जंगलात तुरळकपणे आढळतो. याची फुले  त्याच्या  कांचनबंधू वृक्षांपेक्षा खूप वेगळी आणि देखणी असतात. पावसाळ्याच्या शेवटी जुलै ते सप्टेंबर या काळात पांढऱ्या छोट्या फुलांनी गच्च भरून जातो. फांद्यांच्या टोकाला फुलांचे तुरे येतात आणि एकेका गुच्छात चार ते सात फुलं येतात. मार्च ते एप्रिल या काळात त्याच्या गडद लाल शेंगातून फुटून बिया खाली पडतात. 

सेमला कांचन (फोटो सौजन्य : फ्लॉवर्स ऑफ इंडिया संकेतस्थळ)
कांचनच्या वृक्षावर एक पोस्टाचे तिकीट १९८१ साली काढले गेले आहे. असा हा सुंदर फुलांचा कांचन वृक्ष दारी लावावा असाच आहे. 

No comments:

Post a Comment