Friday 3 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ३: बहावा

बहाव्यावरचे पोस्टाचे १९८१ मधले तिकीट
खरंतर याला पिवळा सोबती म्हटलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांचाही सोबती! या वृक्षाचे पिवळे फुल केरळमध्ये 'कानीकोन्ना' नावाने ओळखले जाते. या फुलाच्या उमलण्यावरून पावसाळा केव्हा येईल याचा अंदाज केरळ मधील शेतकरी करतात.

पुण्याच्या डहाणूकर  कॉलनीच्या पहिल्या सर्कलला लागून बहाव्याचे एक सुंदर झाड आहे. आता त्याला सुदंर म्हणावे कि नाही हा एक प्रश्नच आहे. एरव्ही या बाजूला फिरकलात तर तसे ते चटकन ओळखताही यायचे नाही. तसा हिरवागार पुष्परहित बहावाही देखणा दिसतो पण इतर झाडांच्या गर्दीत तो मिसळून जातो. पण वसंत ऋतूमध्ये  मार्च-एप्रिलच्या दरम्यान त्याची पानं झडायला लागतात. तो  फुलायला लागतो आणि झगझगत्या पिवळ्या फुलांच्या घोसांनी ओसंडून वाहायला लागतो तेव्हा हा बहावा कुठूनही ओळखता येतो.  एरव्ही दडी मारून बसलेल्या बहाव्याला या काळात ऊत येतो , त्याच्या फुलांची घोसाघोसांनी बनलेली सोनेरी झळाळी डोळ्यात सामावत नाही. बहाव्याला संस्कृतमध्ये 'आरग्वध,कर्णिकार' अशी नावं आहेत. शास्त्रीय नाव Cassia fistula (कॅशिया फिश्चुला). फिश्चुला म्हणजे 'लांब नळी'. बहाव्याची फळं लांबलचक लांब नळीसारखी असतात. हिंदीमध्ये त्याला अमलतास म्हणतात, इंग्रजीत 'गोल्डन शॉवर', 'इंडियन लॅबर्नम' असेही म्हणतात. 

बहावा उन्हाळ्यात सोनेरी वृक्षराज बनून जातो. त्याच्या जर्द पिवळ्या गोल पाकळ्यांच्या फुलांच्या घोसांची भुरळ न पडणे अशक्य. पुरातन काळातील साहित्यात या वृक्षासमान फुले असणाऱ्या, कर्णफुलांसारखा वापर करता येणाऱ्या फुलांच्या वृक्षाचे अनेक उल्लेख आहेत. तो उल्लेखिलेला वृक्ष बहावाच असावा असे काहींचे म्हणणे आहे.

डॉ. म. वि. आपटे यांनी त्यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात म्हटले आहे कि कालिदासाच्या कुमारसंभवात कर्णिकाराचे जे उल्लेख येतात ते बहाव्यासंबंधी आहेत. पण या ओळीतील वृक्ष बहावा नसावा असे श्री. द. महाजन यांनी आपल्या 'आपले वृक्ष' पुस्तकात म्हटले आहे. 
आकृष्टहेमद्द्युतिकर्णिकारं वसंतपुष्पाभरणं वहन्ती । अ. ३. ५३. 

कर्णिकारलताः फुल्लकुसुमाकुलषट्पदाः।
सकज्जलशिखा रेजुर्दीपमाला इवोज्ज्वलाः॥ (विक्रमोर्वशीयम्)

बहाव्याची फुले कानात घालायच्या आभूषणांसारखी असतात. म्हणून तर त्याला कर्णिकार म्हणत नसावेत ना? 

या खालील अमरकोशातील ओळी बहाव्यासाठीच असतील का?
आरग्वधो राजवृक्षशम्पाकचतुरंगुलाः ।
आरेवतव्याधिघातकृतमालसुवर्णकाः ।। अमरकोश, ६९६

बहाव्याचे भारतात सात प्रकार असून, एक बहावा पांढऱ्या फुलांचाही असतो. एक बहावा गुलाबी देखील आहे. त्याचे नाव Burmese Pink Cassia आहे. हा ही अतिशय देखणा वृक्ष आहे. 
बहावा हा गुलमोहर, कांचन यांच्या कुळातील आहे. यांचे कुळ एकच (Caesalpinaceae, सिसालपिनेसी ) आहे. हा वृक्ष तीनचार वर्षांत फुलू लागतो. याला जर चांगली गाळाची जागा मिळाली तर हे झाड अतिशय डेरेदार होते. पण अतिवृष्टी याला सहन होत नाही. एकदा लावला की भरभर वाढतो, याची पाने गाईगुरे खात नसल्याने तो कुठेही लावण्यासाठी अतिशय योग्य आहे. 

याची फुलं आदिवासी लोक खाद्य म्हणून वापरतात, फळाचा गर आंबट असला तरी खाण्यासारखा असतो, माकडे, कोल्हे इ. जनावरे आवडीने तो खातात. (त्याच्या या आम्ल गरावरून त्याला अमलतास नाव पडले असावे. ) तर बिया पोट साफ करण्यासाठी गावातील लोक वापरतात. पण याच्या बिया फळ सुकून फुटून रुजत नाहीत. त्याविषयीदेखील एक कहाणीच आहे बहाव्याची. तो काय करतो की आपल्या नळीसारख्या या शेंगाफळांना न उकलता तसेच खाली टाकतो. हि फळे भेकरं, कोल्हे, माकडं असे प्राणी खातात, त्याच्या विष्ठेवाटे त्या फळांच्या बिया स्थलांतरित होतात. त्यामुळे बहाव्याशेजारी अनेक बहाव्यांचे रान माजले आहे असे कधी होत नाही. या बिया रुजायलाही कठीण असतात, त्यांना रुजायला खूप काळ लागतो. परंतु काहीही असले  तरी नर्सरीतून एखादे रोप आणून बहावा दारी लावलाच पाहिजे.

फोटो सौजन्य: आंतरजाल

No comments:

Post a Comment