Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Friday, 2 December 2016

अनटायटल्ड पोएम पाच

हे करावं ते करावं
सोडावं, धरावं, निर्माण करावं, मिटवावं
व्हॅन गॉग, वडापाव, पुस्तकं घ्यावी अंगावर
समुद्र, मांजर, पक्षी, घरं, दारं चढवावी डोक्यावर
राहिलं असेल तर हे ही घ्यावं अन ते ही उचलावं
आयुष्य, पाणी , आकाश, चपला, टेबलं, खुर्च्या, उद्योग
नाजूक रूप, साजूक तूप, तिकिटं, बिलं, अल्बम्स, टेलीस्कोप 
मस्त चहा, गर्दी, सूर्य , झाडं-बीडं, गाड्यांचे लाईट्स, किंगफिशर
शोकेस मधल्या वस्तू, किशोर कुमार ,लहानपणीचा जुना स्वेटर
शेवटी घोंगडं घेऊन लपून बसावं भीती वाटून
की आपण कुणाच्या नजरेस पडू नये
कानोसा घेत घेत  की कुणी आपल्याला धरू नये
अस्वस्थ, अशांत होऊन वेताळासारख्या
कर्र कर्र चपला वाजवत चालू पडावं
जखमेवर चोळायला तेल शोधत फिरत राहावं
पळत राहावं की कुणाच्या नजरेस आपण पडू नये
कानोसा घेत घेत की कुणी आपल्याला धरू नये
या चिमण्या बिनबोभाट नुसत्या
हल्ला करून सगळी बिस्किटं फस्त करतात
ठेवलेल्या खाण्या,पाण्यावर टणाटण उड्या मारीत येतात,जातात
यांना धरायला कुणी कसं येत नाही. 

-कांदिवली, मुंबई, २० नोव्हेंबर २०१६

Thursday, 1 December 2016

अनटायटल्ड पोएम चार

मी आज हास्यास्पद झालो, असं ऐकलं आणि धावलो
तसा मी अनाकलनीय वाटतो
पण मी तसा नाही, खूप साधासुधा आहे हो मी !
पटत नसेल तर चिमणीला विचारा

तुम्हाला मी आकळत नाही
म्हणून मला किती विशेषणं पडतात
शॉकिंग, अकाली, करूण, चटका लावणारा
विदारक.

पण आज मी हास्यास्पद झालो
म्हणून गपचूप तिथे गेलो
कानोसा घेतला तर
आजूबाजूचे चुकचुकत होते

काही कुजबुजत होते
काही तर मला
आतूनच हसत होते
उगाच नसती थेरं, म्हणत होते

सुखासुखी असलेलं आयुष्य
लोकांना,
घास मिळवण्याची धडपड
आणि याना हे सुचतं

नीट मन लावून जगता येत नाही?
जीवनाचा साधा व्यवहारसुद्धा कळत कसा नाही?

कसलं टेन्शन, कसली भ्रांत
काल हसतखिदळत होती ही व्यक्ती
ना जबाबदारी,
ना कसली खंत

रात्री फोनवरही बोलली तासभर
म्हणाली दूध नासलं
आता दूध नासलं
हे काय कारण झालं?

कानोसा देऊन मी हे ऐकलं आणि संतापलो
धडधडत गेलो आणि मेलेल्या व्यक्तीच्या
बकोटीला धरून सणसणीत कानाखाली लावली
ती खाली पडली, उठून तिने तरीही मला गच्च मिठी मारली

भांबावून गेलो, क्षणभर थांबलो
कारण विचारलं तिला
म्हणाली, जबाबदारी पेलवत नाही
विचारलं कसली ? तर म्हणाली जगत राहण्याची

मी वैतागलो, का असं केलंस?
मला उगाच हास्यास्पद ठरवलंस
म्हणाली, लोकंच ती,
त्यांचं काय मनावर घ्यायचं

कुणी चुकचुकणार, कुणी हळहळणार, कुणी हसणार
त्यांच्या बोलण्यावरून का आपण ठरवणार

चाल जाऊ आता बरोबरच
जेव्हा तेही तुझं बोट धरून येतील 
तेव्हा मलाच काय
ते तुलाही विसरतील

मी म्हणालो, पण तुला काय घाई मला भेटण्याची?
म्हणाली एकटं वाटत होतं मला
वैतागलो, म्हणालो, तुला एकटेपणा वाटत असला तरी 
मला नको कुणाची सोबत

नाही लागत कुणाची साथ, मी एकटाच बरा
चिमणी कशी सुईसायडल जम्प मारते ,पण मला न भेटता, ती भुर्रकन वर जाते
अलगद, तिला ओळख आहे माझी, तिला तरी विचारायचंस
आज तुझ्या मुर्खपणामुळे मी हास्यास्पद ठरलो खरा

-कांदिवली, मुंबई, १-डिसेंबर २०१६  

अनटायटल्ड पोएम तीन

इथून व्ही. टी. स्टेशन
तिथून ट्रेनचा प्लॅटफॉर्म
तिथून ट्रेनची बर्थ,
तू असलेल्या शहरापर्यंत

मग, त्या शहराचे स्टेशन
तिथून पायीच मैलोन् मैल 
मग गाठीन तुझा घाट
बसून राहीन निर्मनुष्य
होण्याची बघीन वाट

चालत राहीन तीरावरून
चांदण्या घेत अंगावर
आळवत राहीन तुला
तुझी शक्ती दे ओंजळभर

खडक असून मन
तडकत कसं नाही
कोण जाणे कोण
त्याच्या भेगा भरतच राही

तू असशील कुणी,
असह्य ओढ मला लावून 
पण इतरही अनेक तीरावर आहेत
डोळयात माती फेकत आहेत

तीरावरची वेली,फुलं खूप चिवट
पायात अडकलीत,ती आधी खणते
तुझ्याच कातळावर
माझा खडक फोडून टाकीन म्हणते

मग उडी थेट
त्यानंतर तुला मी अन मला तू
याच ठिकाणी ठरवली आहे
घ्यायची तुझी भेट

-कांदिवली, मुंबई, १-डिसेंबर-२०१६









अनटायटल्ड पोएम दोन

काळोख किती रोमँटिक असतो
ते खिडकी सांगते, दिवा ऐकतो
आणि तो स्वतः विझून जातो

परतणाऱ्या सूर्यासाठी
मग शेवटी काळोखही विझतो
स्वतःच्या परतीची वाट बघत बसतो

सूर्य बुडतो, पुन्हा काळोख खिडकीपाशी येतो
भेटणे, विझणे, परतणे, बुडणे
सातत्याने चालूच

आज पण सूर्य पुन्हा बुडून गेला
आणि होडी एकटी पडली
नेहमीसारखीच

ती दूरवर दिसणारी
एकच दिवा असलेली
अधांतरी सरकणारी 

काळ्याशार काळोखातील 
माझी सखी
जिवाभावाची

तिची गती
माझी गती
एकसारखी



-कांदिवली, मुंबई , २२ नोव्हेंबर २०१६






Friday, 25 November 2016

मेला बुद्ध


आतंकवाद, दहशदवाद , घुसखोरी, युद्ध
आतील बाहेरील शत्रू
धडधडत्या तोफा बंदुकीच्या फैरी
सरकारी पेटीत बसून घरी जाणारे जवान
आणि बेवारस पुजले जाणारे वैरी

नंतर फक्त
विधानं, शक्यतो अविचारी विधानं
आणि जमल्यास विचार थोडा
संभाषणं भाषणं आरोळ्या आणि चारोळ्या
आरोप प्रत्यारोप आग्रह आंदोलनं
मेणबत्यांचं जळणं आणि विझणं / वितळणं
दगडफेक चिखलफेक जमावबंदी संचारबंदी
पाण्याचे फवारे अश्रुधुराचे ढग आणि अश्रू
लाठ्यांची बरसात, प्रसंगी गोळीबार
अत्याचार स्वैराचार भ्रष्टाचार
आयोग चौकशीचे, अहवाल आरोपपत्रं
आणि झालीच तर कुणाला तरी शिक्षा

या सर्वांचं मूळ
धर्म जात वर्ण प्रांत
देश पैसा प्रसिद्धी सत्ता
इत्यांदींचं खूळ
जरीही सर्वश्रुत
अश्वत्थाम्यासारखं अमर, अबाधित

कुणी प्राणी पक्षी पान फुल रान
कुठे हवा पाणी माती धोंडा
आणि माझं दगड मन
अंतःबाह्य आहे त्रस्त
नको झालाय परशु आणि राम
नको नानक महावीर ना खुदा ना ख्रिस्त

दुःखाचा या शेवट व्हावा म्हणून
वाटतं उजव्या कुशीवर शांतपणे झोपी जावं
विझता वात, विरून जातील धर्म आणि जात
न म्हणतील कोणी (बुद्ध बुद्ध) मेला बुद्ध
अधिक मागणं काही नाही

- विवेकानंद सामंत , पूणे , १३-१०-२०१६


तेरावं

बाबा गेले
तेरावं झालं
दुःखाचं जेवण
पचून गेलं

श्राद्धाला काढायची
आणि प्रसंगी यायची
ती आठवण नंतर
यायची आणि जायची

काळ गेला वेळ गेली
अनेक वर्ष आणि श्राद्ध लोटली
पोरं बाबा झाली
बाबा झाली

दबक्या पावलांनी पुन्हा एकदा
काळ आला, वेळही आली
डोळ्यादेखत पस्तिशीतली
पोर गेली

जिला काऊचा घास भरवला
त्याचा त्याला
परत दिला
शेवटी तो उसनाच !

तेरावा दिवस यायचा तो आला
पुन्हा तेच तीळ, सात दर्भ
आणि तोच
जेवणाचा प्रसंग

या वेळी मात्र दुःख
ताट भरून आलं होतं
तांब्या,भांडं, वाटी पेल्यात
अश्रूंचं तळं झालं होतं

मग कसासाच गिळला घास
दाटल्या गळ्यात अडकला
विद्युतदाहिनीचा जाळ
पुन्हा डोळ्यांपुढे भडकला

जाणवून सत्य वितळलं मन
आधी मरावा बाप
मग पोरं 
हेच बरं.

-विवेकानंद सामंत, पूणे , २०-१०-२०१६.

ऐसाही है मैं


जेवून झाल्यानंतरच मला खरी भूक लागते
मेलेली जीभ जिवंत होऊन नवी चव मागते
जेव्हा ती एका घोटासाठी प्रतिक्षा करेल, अखेर
तेव्हा कोरडी पडेल का ती ?

स्वेटरमधली त्वचा स्वतःच चाचपून पाहते
उबदार, गरम, जिवंतपण जाणवत राहते
जेव्हा ती एकटीच गोठत पडेल
तेव्हा तिथली थंडी सोसेल का तिला ?

पावलांकडे नजर जाते, मला उचलून धरलं आहे त्यांनी
कायमचं, कायमच
जेव्हा याच पावलांवर पहिल्यांदा उभं राहता आलं असेल
तेव्हा काय वाटलं असेल त्यांना

तळपायांतली आग त्यांनी
खूपदा सहन केली आहे
पण तो बेचिराख करणारा अग्नी
सहन होईल का त्यांना

समोरचे दृश्य वारंवार दिसते
झाडे, आकाश, पाणी, चिमण्या, सूर्य
जेव्हा डोळ्यांतील असंख्य अभ्र पुसून पसरेल पोकळी
तेव्हा तेच  आकाश, त्याच चिमण्या , तोच सूर्य दिसेल का त्यांना?

'ऐसाही है मैं' मीच मला म्हणते 'फार विचार करतेस'
एकदिवस, एकवेळी, त्या क्षणी,
विचार, पोटाची भूक, सर्व होतील मूक
पडेल स्वप्न शेवट, विसर पडेल आपसूक

पडेल तेव्हा पडेल
तूर्तास 
कटिंगचहा, गरम गोधडी, पायपीट, झाडं, आकाश, पाणी, चिमण्या आणि खूप काही 
लांबच लांब, मजेत चालला आहे प्रवास

Friday, 18 November 2016

अबोली, मोगरी

अबोली, मोगरी थँक्स तुम्हाला
मार्चच्या उकाड्यात
कुणाला तरी झालेलं असाध्य दुखणं
आणि मी, माझी डोकेदुखी घेऊन

बस! एक शब्द फुटत नाही
एक ओळ सुचत नाही
एक रेघ उमटत नाही
एक रंग खुलत नाही, नुसता अंधार

खूप गच्च आतून
कुठे गोठून गेले सर्व
त्याच विवंचनेत मी
वितळवायला पैलतडीचा सूर्य हवा

आणि इथे गॅलरीत खुशाल
नुसत्या उतू जातायत, रंगाने, गंधाने, आकाराने
हे फुलणं आतून खास
त्यांनी ठरवलंय तसं

कसं जमतं हे त्यांना
बस! जायचं या वाटेवरून
नसेल कुणीही, ना मिळेल काहीही
पण आपण जायचं याच वाटेवरून

कसं जमलं हे त्यांना ?
विचारलं ढीग, त्या सांगताहेत ढीग
पण कशाच कशाला, कुणाचं कुणाला
काहीच कळत नाहीए


-  कांदिवली, मुंबई , ४-फेब्रुवारी-२०१६



Monday, 14 November 2016

लेडीज डब्बा


सुटली आहे ट्रेन
लांबलचक,
तुडुंब,
दाटून आलं अक्षरशः

सुटला आहे त्यातला लेडीज डब्बाही
चपाती मेकर? सुपची रेसिपी
उद्धार, धक्का,
बुक्की

ए!,टिकली ले
इयरिंग्ज, नेलपॉलिश ले
'कळलं ना?'
अरे चलो अंदर?!!!

प्लॅटफ़ॉर्मवरचा कुत्रा सताड, बेफिकीर
आजुबाजुला किरकिर
त्यामागच्या बिळातून
ये-जा करणारे उंदीर

आणि घुसणारे
ए!
एवढंच असेल ना तर
फर्स्ट क्लास मधून जायचं

समोर बसलेली बाई
चिवड्याचं अख्खं पाकिट फस्त केलंन
हिला काय गरज बोकणे मारून खाण्याची
हि चार दिवस जेवली नाही तरी चालेल


सुसाट मग वेग घेतला
दूरच्या झोपडपट्टीतला कोंबडा
झरकन मागे पडला
लाल तुरा

मागे पडली चालणारीही
माणसं प्लॅटफॉर्मवरची
मग करू लुंगी डान्स वगैरे भेंड्या
सात्विक भजन आधी

लहान मुल डोकावणारे

पेंगणारे, शून्यात ढेपाळलेले
सुटकेची प्रतीक्षा करणारे
हॅन्डल्स हात धरलेले

काही वेगळे चेहरे
सुंदर, रंगसंगती असलेले
वाहतेय, धावतेय एकटी
लोंबकळण्याला प्राप्त झालीय गती

नेक्स्ट स्टेशन,अगला स्टेशन,पुढील स्टेशन कांदिवली
क्षणभर विसर कोण तू? आणि उतर
मग स्टेशन वरचा तिखट वडापाव
आणि घर.

-कांदिवली मुंबई , ८-१२-२०१३

Friday, 11 November 2016

अनटायटल्ड पोएम एक

सोसायटीच्या गेटपाशी जाताजाता कानावर पडलं
तिथला सिक्युरिटी कुत्र्याशी छान बोलत होता
मी तिथून जाताच तो  एकदम गप्प झाला
पण बहुतेक कुत्राही छान बसून त्याचे ऐकत होता

खिडकीतून बाहेर बघताना एक छोटा निळा पक्षी
तुफान वेगाने निळी रेष उठवत गेला
त्याचा निळा रंग अल्ट्रामरिन,सेलुरीअन की कोबाल्ट ब्लु?
हा रंग कुठला ?

पक्षी, झाडाचा बुंधा
चालणारे, पिशवी घेऊन बाबा
संध्याकाळचा चहा
डस्टबिनमधल्या कपच्या कपाच्या


चपाती चिवडणारे तोंड
दाढी करणारे तोंड
पाणीपुरी खाणारे तोंड
तरी नाचून नाचून खाणे निवडणे फक्त चिमणीलाच जमते

बुडण्याचा अनुभव
एकटं रमणं,
ज्या पेनला हात लावते ते नुसतं लिहायला कुरकुरणं

या सगळ्याची सांगड कशी घालायची?

~ ११ नोव्हेंबर २०१६

Thursday, 3 November 2016

कंपोझिशन

आज, चौतिसाव्या वर्षी, आठ महिन्यानंतर
आणि सहा दिवसांनी विचार करत आहे
काय आहे माझं कंपोझिशन

रंग, रेषा , आकार, पोत सगळं ठीकठाक?
नाक, कान, डोळे , तोंड आहेत का जिथेच्या तिथे?
की सोडली आहे त्यांनी आपली वाट

मेंदूच्या आकाराला त्रिमित स्वरूप नाही
मणक्यातली स्पेस कमी होऊन
बॅलन्स उरलाय का काही ?

किती जुनी कॅलेंडरं रचून ठेवलीयत ड्रॉवरात
किती कॅल्शियम
उरलंय हातात

काय आठवतंय?
संध्याकाळचं गावच्या घरचं पाठल्यादार
तिथलं, हिरवं गंजलेलं बारीक जाळीचं कपाट

आणखी बरंच काही
मग फास्ट फॉरवर्ड, काहीच दिसत नाही
धावतंय, धावतंय रीळ, वेगाने तुटेल की काय?

जागा, घरं, दारं, खिडक्या कोलमडतायत
एकामागून एक,
भुईसपाट होतायत

हसणं कुणाचं , कुणाचं रडणं, भांडणं-तंडणं
टीव्ही ओनिडाचा, संध्याकाळचा सींधी बटाटावडा
सगळं आज गेलंय कुठे?

काय शिकलेय? कमवायला? नाही
शिकवायला? नाही
शिकायला? नाही

उठून उभं राहायला ? नाही
शांत बसायला? नाही
जगायला? हो की नाही ?

चट्कन डोळ्यांपुढे आंधारी(भोवळ) येते
पण त्यातही मला स्पष्ट दिसते
गॅसवरचं दूध फ्रिजमध्ये ठेवायचंय

कालचे वॉशिंगमशीन मधले कपडे तसेच पडलेत
कपाट लावायचंय, बघायचंय किती कपडे
विरलेत, किती फाटलेत, किती आहेत नवेपणाचा वास घेऊन  

Tuesday, 21 June 2016

सावित्री

कुठे निघालीस सावित्री?
असा तुला खडसावून
सवाल विचारला गेला, पण
तू थांबली नाहीस
आणि काट्याकुट्यात
फुले उमलवत गेलीस पण
आज तुझी गरुड़ भरारी पाहून
तुला म्हणवेसे वाटते, बाई ग
तू आणखी किती पुढे जाणारेस, पण
जेव्हा तुझ्या 'मरणास' आणि 'मारण्यासही'
तुझी तूच कारण होतेस
तेव्हा तुला जाब विचारावासा वाटतो
तू हे काय करते आहेस?
आणि एखाद्या राजाला वश करण्यासाठी
पदराआडून  हळूच प्यादं सरकवतेस
तेव्हा लाजिरवाणं व्हावं लागतं?
पुरुष जिंकण्याच्या हव्यासापायी
तूझं स्वत्व तू गमावू नकोस
दुर्बलतेच्या यमाला फक्त हद्दपार कर

चमेलीची वेल


चमेलीची वेल
सुरक्षित राहावी म्हणून,
काल तिच्याभोवती काट्यांचा फास लावला

जनावरांनी खाऊ नये,
तुडवू नये म्हणून,
जपण्याचा प्रयत्न केला

पण आज बघितले तर
काट्यांच्याच भाराने
चमेली वाकली

हे आजूबाजूचे
काट्यांचे वर्चस्व बघून
चमेलीची बाभूळ होऊ नये

तिची नजाकत,
तिचे बहरणे,
मुळातून जोपासायला हवे

काटेरी झाडांच्या
सानिध्यात तिचे
अस्तित्व नष्ट होऊ नये

म्हणून मी चमेली उचलली
स्वच्छ, काट्यांपासून दूर,
सूर्यकिरणांच्या झोतात नेऊन लावली

जेणे करून तिने
निर्मळ सुगंध द्यावा
हिच मातीच्या गुणधर्माची अपेक्षा

Monday, 30 May 2016

न सुचलेलं

संपलेला ग्लास
                     रिकामी खुर्ची
धुवून पुसून खाली केलेली
                    जुनी ट्रंक माळ्यावरची


सुकलेली विहीर
                    (काटक्या-कुटक्यांचा) निष्पर्ण गुलमोहर
भुंडे शेताचे कोपरे
                    कुलूप लावलेले घर


सुकलेली लाळ
                    उजाड माळ
पेटलेला जाळ
                    तुटलेली नाळ


पडलेला वारा
                    दूर निखळता तारा
मणी ओघळलेल्या माळेचा दोरा
                    पसारा सारा, अंधःकारा                                           


रिकामे घरटे
                   कवच फुटलेली अंडी
गेलेल्या व्यक्तीची चप्पल (झरलेली)
                   मेलेल्या रोपट्याची कुंडी


खड्डा पडलेली उशी
                   प्रकाशहीन बुब्बुळ काळे
सुरकुत्या पडलेला बेड
                   वाट पाहणारे डोळे


तुटलेला कडा
                 पडलेला तडा
अकाळ, अनिर्बंध, अजर, अजगर
                घाली नग्न मना वेढा
                

आणि जाणवे फक्त
                 अदृष्य, अभाव, अभागी अपूर्णांक,
चोहोबाजूनी अवेळीची अशांतता
                व्यापून राही अभेदी, अमर्याद ,अशक्य, अतर्क्य

Thursday, 26 May 2016

कोपरा

माझ्या मनाचा एक कोपरा शोधून काढला आहे
मीच, स्वतःला दुखः देण्यासाठीच फक्त
दुखः स्वतःला द्यावे, स्वतःचे घ्यावे
इतरांना त्याची झळ बसू नये इतके सोपे का ते आहे?

भावना कुजत ठेवल्यात मनात
सडलेल्या प्रतिमा, गोठलेले अनुभव, गाढलेल्या आठवणी
का नाही रुजत त्यात चिमण्यांच्या पंखांचा
अलवार, किरमिजी अतिसुखद स्पर्श?

का नाही दिसत त्यात वाऱ्यावर, अलगद पाण्यावर
सरकणारे मंद मंद वेगातील ते जहाज ?
का नाही ऐकू येत त्यात सुरेल सूर
किलबिलाटांचे, बीथोवेन पक्ष्याचे ?

का नाही त्यात मखमली पाठीच्या गुब्ब डोळ्यांच्या
गब्दुल मांजराचे पायात घोटाळणे ?

कोपरा फक्त अंधाराचा
गडद काळ्या कोठडीचा
नाही तिथे प्रकाश कसलाच
ना कोवळ्या पालवीचा, ना चांदण्याचा

तो कोपरा झाकावा, मिटून जावा
पण तो कोपरा झाकणे म्हणजे झाकणे स्वतःचे अस्तित्व
जिवंतपणाचे काळेभोर कृष्णविवर त्यास गिळून बसले आहे स्थित
तरीही कोपरा अजून राहिला आहे शाबूत  

Friday, 29 April 2016

वाट


फर्लांगभर वाट आहे
जिच्या एका टोकाला तिठा आहे
आणि दुसऱ्या टोकला घर

घराजवळ डोंगर
आंबा, पिंपळ, जांभूळ, थोडे साग, चार माड
करवंदाच्या झाळी आणि एक पेंडराचे झाड
असा संसार आहे

तिठ्यावर घर नाही , तिठा बेघर आहे

त्या फर्लांगभर वाटेवर
एक शाळा आहे, घराजवळ
एस. टी. चा एक अदृश्य थांबा आहे, तिठ्याजवळ
आणि एक देवस्थान आहे, मधोमध

वाटेवर चढाव उतार, अनेक नागमोडी वळणे
नव्या जुन्या पाऊलवाटा, वारा
काही सळसळणारी आणि काही स्तब्ध झाडं,
बैलगाड्यांचा खडखडाट, टिटव्यांच्या टिवटिवेने -
भरून राहिलेला आसमंत
आणि रोखून पाहणारे काळे दगड
यांचा वावर आहे

वाटेवर एक विचित्र वळण आहे
जिथे माणसं घाबरतात, घाबरली आहेत
घाबरलेल्यांना न घाबरलेल्यांनी पहिले आहे
मी न घाबरता, हे ऐकीव सत्य आहे
असे मानून आहे

आजोबा खांद्यावर नारळाची गोणी घेऊन
तिठ्यावरून घरी सुखरूप
याच वाटेवरून अनेकदा आले आहेत
ताठ मानेने आणि तेही न घाबरता

लहानपणी तिठ्यावरून घराकडे
चालत गेल्याच्या अनेक आठवणी आहेत
आणि नंतरच्या काळात फक्त
तिठ्याच्या दिशेने पळत राहिल्याच्या;
का? ते सांगता येत नाही

अश्याच एका कातरवेळी
मी घराकडून तिठ्याच्या दिशेने निघाल्याचे आठवते
पाठीवर बोचकं, ताठ मान, न घाबरता
घाबरलेल्यांचे अनुभव सोबतीला

वाटेवर ज्यांचाज्यांचा वावर आहे
त्या सर्वांनी आपापला प्रयत्न केला
टिवटिव, खडखड, वळवळ, सळसळ
काहींनी काहीच नाही केलं फक्त बघत राहिले
एखाद्या देणेकऱ्याकडे बघावं तसे

शाळा गेली, देवस्थान गेलं
विचित्र वळण मागे पडलं
पाठीवर बोचकं, ताठ मान

भीतीपोटी जर मरून पडलो असतो या वाटेवर
तर न घाबरलेल्यांनी काय केलं असतं?
घराजवळच्या स्मशानात जाळलं असतं की
बेघर तिठ्यावर पुरलं असतं, बेवारश्याचं प्रेत म्हणून?
की मेल्यावरही जगू दिलं असतं या वाटेवर
अजूनही न घाबरलेल्यांना घाबरवण्यासाठी

प्रश्न अनेक, उत्तर नाही, तिठा आला
तिठ्यावर रिक्षा उभी, नाव पुष्पक!
आपली पात्रता नाही या विचाराने हिरमुसलो
दुसरा काहीच मार्ग नाही, काय करावं?
चढून बसलो, पुष्पक निघाले , पुढच्या प्रवासाला

-विवेकानंद सामंत
२९ एप्रिल २०१६, पुणे       

Monday, 18 April 2016

तयारी

रक्तात शिरलाय कर्क
शरीरात नांदतोय नर्क
अश्यावेळी थोडे सेवेत गर्क
बाकीचे तर्क आणि वितर्क

लघवीचे भांडे
संडाससाठी भांडे
पिण्याच्या पाण्याचे भांडे

आसमंत सारा टाळण्या संसर्ग
धुवून पुसून लक्ख
वास्तव्य तेवढे टिकवून राही
घुबड एक जख्ख

गळलेले केस
मुळापासून कापलेले केस, खाजगी केस
फार थोडे उगवते केस

डोळ्यामध्ये रक्त
अंगात दुष्काळ
डोळ्यांभवती काळं
सभोवती काळ

वठलेले वक्ष
मृत्यूचेच भक्ष्य
इंद्रियाची आस
मरो ते इंद्रिय

सर्वांग भरून
राहिला कोण ताप
वेदना मोजण्या
उरले न माप

यंत्र मोजती श्वास
श्वास मोजती श्वास
तिला मात्र ध्यास
वापसीचा

नात्यातलं रक्त
रक्तातलं नातं
सरतेशेवटी
काहीच चालेना

आला तो दिवस
झाला बंद श्वास
उरला दिवस
तयारीचा

-विवेकानंद सामंत
पुणे , १८-४-२०१६


भांडण

भांडण आहे एक नाटक
त्याला दोन नट लागतात
कारण लागत नाही

एकटाच नट असेल तर
एखादा प्रेक्षक तरी लागतो
वेळकाळ लागत नाही

सेटवरच्या  काळ्य़ाकुट्ट भिंतींशी
आणि समोरचा अंधार बघत,
भांडता येत नाही

(नाटक संपल्यावर) उभारलेल्या
खोट्या जमिनीवर, गलितगात्र होवून
पडता येत नाही

सेट नाही, दुसरा नट नाही , प्रेक्षकही नाही
तरीही हे नाटक स्वतःचे स्वतःशीच रंगू शकते

पण त्यात धोका आहे
कधीही ते भंगू शकते

पण या प्रकारच्या नाटकात 
पीएच. डी मात्र अखेर मिळू शकते
मला मिळालीय

कशी ते सांगत नाही  कारण पेन संपलय
यु सी ऑल द पेन इज ओव्हर

Saturday, 16 April 2016

प्रश्न

मला पडले प्रश्न चार
नाहीत तसे कठीण फार

समुद्र मोठा कि मोठा सुर्य?
इवल्या त्या समुद्राचे कोण मोठे धैर्य!
सुर्य जळतो, पृथ्वी पाळतो
मावळतीला इवल्याश्या समुद्रात गळतो

माणूस वाईट कि वाईट गुण?
आईच्या पोटात असतात सगळेच भ्रूण 
कोणी काळा दगड कधी वाळीत पडतो
त्यातलाच कुणी एक कधी वाल्मिकी घडतो

तिसरा प्रश्न मी कोण?
कोणीही नाही

चौथा प्रश्न माझा मला
विचारायचा राहून गेला
कागदी होडीतून वाहून गेला
नावाडीपण बुडून मेला


-विवेकानंद सामंत
पवई, २००४ 


आधारवड

मी एक आधारवड आहे, मेंदूवर बांडगूळ जडले आहे
आणि फुप्फुसात कोळसा
जठरात अन्न कमी
आणि मानेभोवती कसलासा विळखा

यकृत सुजले आहे
पाऊस पिऊन पिऊन
ते म्हणतात दारू , दारू…
बहुतेक तीच असावी

मूत्रपिंडातही बिघाड आहे
हो, असू दे
मृत्युपिंड शिवताना
कावळा घेईल मानून

पारंब्यांवर भार आहे
कणा, खुबा, घोटा, यांचे दुखणे वेगळे काय सांगावे?
प्रत्येकावर ताजा शीळा घाव आहे
एकंदरीतच तोड फार आहे

मी खरंच आधारवड आहे
असे मनापासून मानणारे थोडेच आहेत
बाकीचे मी एक आजारी वड आहे
असेच मानतात

वर असेही म्हणतात
एके दिवशी उन्मळून पडेल
पण
झुकणार नाही रांडेचा

-विवेकानंद सामंत
१५-एप्रिल-२०१६, पुणे