Sunday 27 February 2022

निसर्ग आणि काकांनी सांगितलेली अमृतानुभवतील ओवी

दृश्यांचिया सृष्टी । आणि दुष्टीवरी दृष्टी । उपजताचि तळवटीं । चिन्मात्रचि ॥१२४॥ दर्शनसमृद्धी बहुत । निर्मिता चैतन्य रमत । न देखे शिळ्या आरशात । विषयरत्नाच्या ॥१२५॥ क्षणोक्षणी नित्य नवी । दृश्याची वस्त्रे बरवी । वेढवी दिठीकरवी । उदार जो ॥१२६॥ मागल्या क्षणीचि अंगे । पारोशी म्हणोनि वेगें । सोडूनि दृष्टि रिघे । नव्या रूपीं ॥१२७॥ तैशीच प्रतिक्षणींजाणिवेची लेणी


मन स्वच्छ असलं पाहिजे, कसलाही पूर्वग्रह असता कामा नये.

विपुलाच सृष्टी

This sea that  bears her bosom to the moon ,
the wind that will be howling at all hours
and are up-gathered now like sleeping flowers ,
for this, for everything we are out of tune
It moves us not
- Wordsworth


September 22 , 2018
अतिशय सुंदर फुलं पहायला मिळालीं तुझ्यामुळें.छायाचित्रणाचा
आधार घेऊन या दृश्याचं सौंदर्य तुला चित्रबद्ध करतां आलं.या
स्मृती त्यामुळे आपण जतन करूं शकतों.विश्वात पुरेपूर भरून
राहिलेल्या चैतन्याच्या प्रभावामुळे आपण कोणतेंहि दृश्य पाहूं
शकतों.आपल्या या पंचेन्द्रियांद्वारांदेखील आपण असेच विश्वाचं
दर्शन घेऊं शकतों-----याला कारण वर सांगितलेल्या वैश्विक
चैतन्याचा (Universal Consciousness)आपणहि एक
अंश आहोंत.तेव्हा हा जिवंत अनुभव घेताना आपल्या विविध
वृत्तींनीं त्या दृश्यावर केलेले आरोप --------चांगला/वाईट,सुंदर/कुरूप इ.
सर्वच अप्रस्तुत ठरतात.एक तत्त्वदर्शनातील वचन आहे :
        दृश्याः धीवृत्तयः साक्षी दृगेव न तु दृश्यते ॥
"आपण जीं दृश्यें पाहतों तीं सर्व आपल्या बुद्धीचेच वेगवेगळे
आविष्कार असतात.अविकृत दृक्शक्ति मात्र केवळ साक्षिरूपानें
सर्व कांहीं पाहत असते.ही शक्ति म्हणजे वर सांगितलेलं
वैश्विक चैतन्य.आपल्यामधील विकृतीमुळें आपल्याला मात्र तें
दिसत नाही."
वरील वचनाचा हा भावार्थ आहे.वैश्विक चैतन्याचा एकदा का
" साक्षात्कार "झाला कीं सगळे भेद गळून पडतात आणि
राहतो तो विशुद्ध " आनंद ".
तुझ्या अनुभव घेण्याच्या दृष्टीला हें सामर्थ्य प्राप्त होवो अशी
इच्छा आहे;मग तूं आणि सभोवतालचें विश्व यांच्यांत कोणताहि
प्रत्यवाय राहणार नाही.
आपण तत्त्वज्ञानाच्या गहन अरण्यात शिरतों आहोत असं तुला
वाटतं आहे का? एक लक्षात ठेवायला हवं कीं या अरण्यांतली
विलक्षण सृष्टी कितीहि पहिलं तरीही संपणार नाही.
       सगळ्या भेदाभेदांपलिकडे पोचलेल्या या वृत्तीलाच म्हणतातः
                           ब्र  ह्मा  नं  द 🙏🏽


या फुलाविषयी,आकलन, दृष्टी आणि सृष्टीविषयीही इतके छान विचार लिहून मला पाठवल्याबद्दल धन्यवाद काका!🙂

तत्त्वदर्शनातील : दृश्याः धीवृत्तयः साक्षी दृगेव न तु दृश्यते ॥ 
हे वचन कुठच्या ग्रंथात आहे?
मानवी आकलनाचे, मानवी स्थितीचे अचूक ज्ञान त्याकाळच्या तत्ववेत्त्यांना होते हेच यावरून दिसून येते. 

हो, खरं आहे, माणूस शेवटी मनुष्य'प्राणी'च आहे, त्यामुळे खऱ्या अरण्यातून जरी तो बाहेर पडला असला ज्ञानाच्या, तत्वज्ञानाच्या, विचारांच्या अरण्यांतून तो भटकतच असतो. 
जे महान विचारी, बुद्धिवंत या अरण्यांतून मुक्त विहार करून आले त्यांनी व्यक्त केलेले विचार म्हणूनच जाणून घ्यावेसे वाटतात. ही अरण्यं गहन आहेतच आणि अनंतही. पण त्यांच्या काठांवरुन तरी फिरण्याची इच्छा आहे.


इंद्रियांनीं आपण ज्ञानग्रहण करतों,त्यामागे हा विवेक असेल
तर खऱ्या अर्थाने तें ज्ञानग्रहण.भोक्ता हा भोग्यच आणि द्रष्टा
हा दृश्य होऊन बसतो.तिथं भेदाभेदांना वाव कुठला?
वरील वचन -----दृश्याः धीवृत्तयः------हें विद्यारण्य स्वामींचे
शिष्य गुरु भारती तीर्थ यांनी रचलेल्या एका लहानशा ग्रंथातील
आहे.ग्रंथाचें नांव ---------" दृग्दृश्यविवेक " (सुमारे १४व्या शतकाच्या
मध्यावर)
कुरूप गोष्टीतही सौंदर्य दृष्टीस दिसलं पाहिजे.


10/18/17, 12:09 दिवाळीच्या निमित्ताने ज्ञानदेवांची एक सुंदर , अर्थगर्भ ओवी आठवली
आजच्या 'लोकसत्ता' च्या अग्रलेखाचं  शीर्षक बघ.
                   सूर्यें  अधिष्ठिली प्राची ।जगा राणीव दे प्रकाशाची
                    तैसी वाचा श्रोतयां ज्ञानाची।दिवाळी करी ।।
पूर्वेला सूर्य उगवल्यावर सगळं जग प्रकाशानें उजळून निघतं;त्याप्रमाणे खऱ्या सद्गुरूंची
वाणी कानीं  पडतांच श्रोत्यांच्या मनांत ज्ञानरूपी दिवाळी उगवते
ज्ञानदेवांना अभिप्रेत  असलेला खरा सद्गुरु कोण हें तुला  सांगायला  नको !!
     दीपावलीच्या सप्रेम शुभेच्छा  !!!🌺🌺
 
 
10/29/17, 21:52 - Samantha Kaka: खरोखरच 'देवाक काळजी' अशी दृढ श्रद्धा असलेल्या माणसाला अश्या
गाढ झोपेचा अनुभव येऊं शकतो.ना गतायुष्याचं सुखदुःख ना उद्यांची
चिंता.झोपेत आपले रक्षण कोण करणार याची फिकिर नाही !!तुला हें
दृश्य आशादायी आहेअसं वाटलं तें कोणत्या अर्थाने हें मला नीटसं कळलं
नाही.हर्ष-शोक यांत बुडून गेलेल्याला सगळ्याच गोष्टींचं भय असतं
या प्रसंगी मला केशवसुतांची ही कविता आठवते
                            हर्षखेद ते मावळले
                                      हास्य निमालें
                                       अश्रु पळाले;
                             कंटकशल्यें बोथटलीं
                             मखमालीची लव वठली;
                              कांही न दिसे दृष्टीला,
                                          प्रकाश गेला,
                                          तिमिर हरपला;
                               काय म्हणावें या स्थितिला?
                                            झपूर्झा! गडे झपूर्झा !----------------
      गाढ निद्रेत अश्या कांहीं चेतना निर्माण होत असतील का?
        चेतन अवस्थेत अशी ' झपूर्झा ' स्थिति अनुभवणारे
       खरोखर महात्मे म्हटले पाहिजेत 
      तुझं चित्र पाहून  विचारांचे कसे कल्लोळ उठतात बघ !
               असो .सविस्तर कधीतरी बोलूं -------------
 
10/30/17, 09:55 - shiwalee: अतिशय सुंदर कविता आहे. अशी 'झपू्र्झा' स्थिती ज्यांना जागेपणी प्राप्त होते ते भाग्यवंतच! मला हे दृश्य आशादायी वाटलें तें अशा अर्थाने की हा माणूस खरोखरच या देवांच्या सानिध्यात अगदी शांतपणे, समाधानाने विश्रांती घेत असल्याचा प्रत्यय माझ्या मनाला आला. मुंबईसारख्या सतत धावत्या आणि कोलाहलाच्या शहरात टोकाच्या विषमता दाखवणारे प्रसंग रोज दिसतात. एकीकडे उत्तुंग इमारती, आलिशान घरे आणि दुसरीकडे माणसे रस्त्याच्या दुभाजकावर  झोपलेली हे तर कायमच पाहायला मिळते. जी तीन दृश्ये पाहून गौतम बुद्धाचे अंतःकरण जीवनातील अपार दुःखाने व्यापून गेले, तशी दृश्ये जागोजाग दिसतात. पण ही दृश्ये बघून दृष्टी बोथट झाली आहे, मन कोडगे झाले आहे त्यामुळे नक्की काय वाटते ते सांगणे अवघड आहे. बहुदा क्षणभर उदास वाटते, क्षणभर असहाय्य वाटते, पण क्षणभरच..अशा दृश्यांपासून दूर गेले की मनही हे सर्व विचार झटकून दुसऱ्या प्रदेशात भटकायला मोकळे होते. आपणाला एखादया ठिकाणी बसवून ठेऊन आपल्या डोळयांसमोर सतत चलतचित्र दाखवले जात आहे, जे दिसते ते बघायचे आहे, ते कसेही असो, कारण ते चलतचित्र थांबवण्याचे 'बटण' तुमच्या हातात दिलेले नाही. तुमच्यासमोर जीवनाचे अतिशय सुंदर रूप दाखवले जाईल आणि अत्यंत विदारक आणि भयंकर रूपही, पण ते थांबवण्याचा 'विकल्प' तुम्हाला दिलेला नाही. मग जे आहे त्याला 'सुंदर' ,'कुरूप' , 'सुखद', 'दुःखद' अशी विशेषणे लावत बघणे एवढेच आपले काम.. असे प्रत्येक दृश्य मनात काही ना काही भाव निर्माण करूनच येते, सुंदर, बीभत्स, सुखद, दुःखद..
पण कालच्या दृश्याने मनात कुठलाही असा भाव निर्माण केला नाही, निदान काही क्षणापूरता तरी. मला ते दृश्य ना विदारक वाटले ना सुखद वाटले, त्याला कुठलेही विशेषण मनाला लावता आले नाही. एक क्षणभर का होईना मन निर्विकार झाले. मला असेही वाटले की हा झोपलेला माणूस खरोखरच समाधानी असेल, नाही कशावरून? त्याची बाह्य परिस्थिती बिकट असेलही पण मन शांत असेल त्याचे. कारण मला त्या शांततेचा थोडा प्रत्यय आला. असे काहीतरी वाटले म्हणून मला हे दृश्य आशादायी वाटले.🙂
याबद्दल मी सविस्तर बोलेन तुमच्याशी नंतर कधीतरी.
10/30/17, 12:03 - Samantha Kaka: शिवाली,
   तूं मोकळेपणाने केलेलं शब्दरूप  " प्रकट चिंतन " वाचून खूपच समाधान वाटलं.
   मनांतील कोलाहल नेमकेपणाने व्यक्त केला आहेस!!
         याविषयी सविस्तर नक्की बोलूं ------------ 



3/12/18, 12:48 - shiwalee: काका, 
मला आलेल्या अनभवांबद्दल तुमच्याशी बोलून मलाही बरेच ज्ञान प्राप्त होते,(ज्ञान हा तसा खूपच मोठा शब्द इथे वापरण्याचे धाडस उगाचच म
ी करत आहे) ,  तुम्ही मला जे लिहिता, सांगता ते अतिशय चिंतनीय असते, त्यावर विचार करण्याचा माझा प्रयत्न चालू असतो, पण ते समजण्याची, 
आचरणात आणण्याची माझी तेवढी पात्रता नाही हे मी जाणून आहे. 

काही अनुभव इतके सूक्ष्म, तरल असतात की त्यांना जाणून घेण्यासाठी आपण अपुरे पडतो की काय असेच वाटते, निसर्गाबद्दल माझा अनुभव
काहीसा असाच आहे. इतके परिपूर्ण काही पाहिले की मनात कसली खंत/रितेपणाची भावना येते तेही कळत नाही. पण निस्सीम आनंद हा निसर्ग
देतो हेही खरे.

निसर्गानुभव आणि त्याद्वारे प्राप्त होऊ शकेल अशी शांतता, विरक्ती आणि अतिशय सूक्ष्म असे आपल्यात कुठेतरी जाणवणारे निसर्गाचेच स्पंदन 
यांचा आवाका एवढा मोठा आहे, incomprehensible आहे की एवढे सर्व पाहून त्यांच्यापर्यंत पोहोचणे दुर्लभ वाटते.
असे न मळलेले, अम्लान आणि शुद्ध असे जे काही डोळ्याला दिसते ते पाहण्यासाठी डोळे,मन कमी पडतात असेही वाटते कधीकधी.
3/12/18, 12:50 - shiwalee: हे मी काहीतरीच लिहीत आहे, पण मला असे वाटते मात्र खरे अनेकदा🙂
3/12/18, 13:28 - Samantha Kaka: तूं 'कांहीतरीच' लिहीत आहेस असं तुला वाटण्याचं कारण काय ?
खरंतर मला वाटतं तुला ' कांहीतरी ' मौलिक सांगायचं आहे-----
शब्दांच्याहि पलिकडील--तुला उमजलेलं.आपल्याला वाटतं तें
नेहमीच शब्दांतून व्यक्त करीत राहावं;त्यांतूनच आपण " अमूर्ता "ला
स्पर्श करूं शकतों.ज्ञानेश्वरांनी शब्दाच्या मर्यादा ओळखून सुद्धा
एके ठिकाणी "शब्द अमूर्ताचा विशदु आरिसा " असं म्हटलं आहे.
यांत सर्व काही आलं !!!!
3/12/18, 17:45 - shiwalee: 'शब्द अमूर्तचा विशदु आरिसा' ही ओळ फार आवडली.
 
 
4/15/18, 11:45 - Samantha Kaka: लिंकनबद्दलचा किस्सा अप्रतिम !अन्यांच्या रागलोभात न गुंततां
निष्ठेने व प्रेमाने आपलं काम करीत राहणं हें खरं जीवनाचं
' श्रेय '.एकदा ' प्रेया ' च्या चक्रव्यूहात माणूस अडकला कीं
त्याची सुटका नाही.
   जॉन ओपाय या चित्रकाराच्या उत्कृष्ट रंगछटांनीं लुब्ध झालेल्या
एका प्रेक्षकाने त्याला विचारलं,"Sir,what do you mix your
paints with ? "
         त्यावर चित्रकाराने उत्तर दिलं ,
    "  I mix them with my brains,sir "
 
 
5/14/18, 13:22 - Samantha Kaka: एकापेक्षां एक सुंदर असे Passiflora foetida चे हे विभिन्न प्रकार
खूप चित्ताकर्षक वाटले.फुलाचा प्रत्येक अवयव कांही विशिष्ट
हेतूने निसर्गाने निर्माण केला असणार.काही असलं तरी सौंदर्यासक्त
मानवी वृत्ति व अश्या निसर्गरम्य गोष्टी आपले एकांतीचे क्षण
आनंदाने भारून टाकतात हें खरें !! Daffodils चा सुंदर ताटवा
बघून Wordsworth घरी येऊन एकाकी बसला असतां हा फुलांचा
सौंदर्यपट त्याच्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात उलगडतो---------
They flash upon my inward eye
Which is the bliss of solitude
           अशी त्याची मनःस्थिति होते.
टागोरांनी एका ठिकाणी म्हटले आहे.Truth and beauty are realized
through man and they are one with the Universal Being,
and they must essentially be  ' human '.
छायाचित्रे पाठविलींस त्याबद्दल पुन्हा एकदा आभार !!
5/14/18, 14:17 - shiwalee: They flash upon my inward eye 
Which is the bliss of solitude 

किती सुंदर ओळी! Wordsworth तर एक महान कवी! मी त्याच्यासमोर कोणीच नाही, तरीही मी म्हणेन की मला जे वाटते ते त्याने मोजक्या शब्दांत मांडले. 
मला असेच वाटते. मी कुठेतरी निसर्गात भ्रमंती करून आले की त्यानंतर तिथे डोळ्यांनी पाहिलेला निसर्ग निराळ्या रूपाने पुन्हा डोळ्यासमोर येतो. छायाप्रकाश, 
उन्हात उभी असलेली झाडे, त्यांच्या पानांची सळसळ, त्याने भारून गेलेला सगळा आसमंत डोळ्यासमोर उभा राहतो, स्थलकालाचे बंधन नसलेले मन त्या 
निसर्गाच्या रूपाने व्यापून जाते, पुन्हा भ्रमंती करू लागते. हा अनुभव कसा व्यक्त करावा? कोण जाणे!
झाडे , वेली पाहताना मला नेहमी असे वाटते की आपल्याला दहा हजार डोळे हवे होते,तरीही ते निसर्गाचा अनुभव घेण्यास अपुरेच पडले असते.
पण Wordsworth ला लाभलेला inward eye मलाही मिळावा असे आता मला वाटते.
 
6/9/18, 18:47 - Samantha Kaka: तूं पाठविलेला माहितीपट(documentary) खूप आवडला.वानससृष्टीचीं 
एकेक आश्चर्यें आयुष्यभर चिंतन/मनन करून या गृहस्थांनी अभ्यासलीं.देवरायांवरचं
तर त्यांचं केवळ अजोड म्हणतां येईल असं आहे.
 
6/17/18, 09:58 - Samantha Kaka: सुंदर,लुसलुशीत ,रंगबेरंगी पानांचे गुच्छ! वा!
कुठेतरी रमणीय दृश्य पाहिलं,सुंदर चित्र पाहिलं,
स्वर्गीय संगीताचे स्वर कानीं पडले,तर क्षणात
आपला पहिला प्रतिसाद आनंदोल्लासाचा असतो,
पण दुसऱ्याच क्षणीं या आनंदलहरींवर तरंगत
असताना,सर्वांशानीं सुखी असलेला आपला जीव,
एक प्रकारची अनामिक हुरहुर त्याला लागते.इथें
शाकुंतलातला एक श्लोक आठवतो :
          रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्।
               ----------------------
या श्लोकाबद्दल आपण भेटींत बोलूंच--------------
                                 मनापासून आभार !!🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 

No comments:

Post a Comment