Monday, 29 August 2016

चित्रकला आणि कलरब्लाइंड रवींद्रनाथ टागोर

'People often ask me about meaning of my pictures, I remian silent, as my pictures are
It is for them to express and not to explain.'

'I have nothing to say about my pictures, I do not know what I have done or wanted to say.'
- Rabindranath Tagore 



रवींद्रनाथ टागोर (ठाकुर) यांना कवी, कादंबरीकार आणि विचारवंत म्हणून ओळखले जाते. पण ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे चित्रकारही होते. मी त्यांच्या चित्रांचे एक पुस्तक लायब्ररीत बघतले आणि त्यातली त्यांची चित्रे मला अतिशय आवडली मग त्यांच्या चित्रकलेबद्धल जाणून घ्यावेसे वाटले. २०१३ मध्ये मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट मध्ये टागोरांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरले होते. त्याच्या चित्रांचे वैशिष्ट्य असे कि ती खूप काळ लक्षात राहतात. माझ्या मनात ती अधून मधून रेंगाळतात आणि त्यांच्यामागे काय आहे हे जाणून घ्यावेसे वाटते. म्हणून हा खटाटोप करत आहे. त्या चित्रातली गूढ माणसं, विचित्र आकार आणि विलक्षण रंग आणि रेषा यांचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपद्व्याप.

एखाद्या कोकिळ पक्ष्याचे चे आर्त ओरडणे रंगवायचे झाले तर ते कसे रंगवायचे? जेव्हा पोटात भीतीचा गोळा येतो आणि नक्की भीती कश्याची वाटते तेही कळत नाही तेव्हा चित्रात ते कसे दिसेल? जेव्हा एखाद्या माणसाचा फोटो काढला जातो तेव्हा तो चांगले कपडे घालून, केस विंचरून (कदाचित थोडी पावडर फासूनही) फोटोला बसतो. जसाच्या तसा येतो फोटो. पण त्या माणसाच्या आतल्या पिचलेल्या, खचलेल्या, खस्ता खाल्लेल्या, अपमान गिळून, ओढग्रस्त, नकारात्मक अनुभवाने भरलेल्या, कंटाळलेल्या, घाबरलेल्या, कधीकधी रागावणारऱ्या, तर कधी हसणाऱ्या, तर कधी नशीबाला दोष देणाऱ्या 'त्या आतल्या' माणसाचे काय? तो कुठे आहे? फोटोत तर तो कुठेच नसतो. अश्या माणसाचा खराखुरा फोटो, अगदी आत आरपार पाहून काढलेला, मिळेल कधी, असे त्याचे काढलेले खरेखुरे चित्र मिळेल?  कुठून आणायचे रंग आणि आकार मग हे व्यक्त करण्यासाठी? हे रंग मनाच्या तळगाभाऱ्यातले हवेत. पोटात पडलेल्या खोल खळग्यातले हवेत.
त्यासाठी दृष्टी बदलावी लागेल. डोळ्यांचीही आणि मनाचीही. रवींद्रनाथ टागोर यांची चित्र थेट अशी आहेत. माणूस साधासुधा नाही. महामानव.

त्यांनी १५७३ रंगचित्र आणि रेखाचित्र काढली.
त्यांच्या चित्रांकडे बघून अनेकदा असं वाटतं कि या माणसाला जे दिसतं त्यापलीकडे जाऊन, सापडलेलं असं काहीतरी सांगायचं आहे. त्यांच्या चित्रातले रंग तर एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती देतात. आपल्याला  सहजासहजी असे रंग आपल्याला पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या संवेदना काहीतरी खोल जाणीव करतात. का वापरत ते असे रंग? त्यांच्या चित्रांच्या रंगामागे, आकारांमागे कोणते सौंदर्यशास्त्र दडलेले आहे?

त्यांच्या चित्रातील या विचित्र रंगांचे कारण हे आहे रवींद्रनाथांना उतारवयात आलेला रंगांधळेपणा (protanopic-Red-green color blindness, in which the wavelengths of light that we see as the colour red are lost to the eye, and there is confusion between red and green in perception. It is not an illness, just a genetically inherited condition. There is no ‘cure’ for it.). त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी चित्रे काढायला सुरुवात केली. सुरवातीला लिहिताना सहज पेनाने केलेला चाळा म्हणून ते डूडल चित्रे काढीत. हळूहळू त्यात रंग भरणे चालू झाले तसे त्यांनी पेपर, रंग घेऊन त्यावर आपल्या अभिव्यक्तीला मुक्त वाट करून दिली. मुळात कवी, आणि खरं तर असे म्हटले जाते कि 'सगळ्या प्रकारची कला काव्याकडे वळते'. त्याउलट या कवीचे काव्यच चित्र निर्माण करत गेले. काव्य आणि चित्र यात फरकच उरला नाही. त्यांची चित्रकला अतिशय उच्च दर्जाची असली तरी ते स्वतः त्याबाबतीत असंतुष्टच होते. कारण ते स्वतःच्या या अविष्काराला मोजक्या तंत्रशुद्ध, चित्रकलेत मान्यता पावलेल्या अश्या नियमांच्या भिंगातून बघत होते. काही काळानंतर त्यांना स्वतःची चित्रकला इतर चित्रकलेच्या दृष्टीने कमी दर्जाची वाटू लागली. आपल्याला तांत्रिकदृष्ट्या चित्र या वयात शिकणे शक्य नाही आणि चित्रकलेची ती(बहुदा त्यांना अपेक्षित असलेली ) पायरी गाठणे शक्य नाही असे त्यांनी मनाकडे घेतले आणि चित्रकला सोडूनही दिली. पण खरंतर  त्यांची न शिकता काढलेली चित्र खूपच श्रेष्ठ आहेत. खुद्द व्ही. एस. गायतोंडेना विचारले गेले होते कि या काळात भारतात श्रेष्ठ चित्रकार कोण आहे? त्यावर व्ही. एस. गायतोंडेनी रवींद्रनाथ टागोरांचे नाव घेतले होते.  


सगळ्यात वेगळी आहेत त्यांची व्यक्तिचित्र (portraits) आणि  निसर्गचित्रं (landscapes). सगळ्या श्रेष्ठ कलाकृती सारख्याच पातळीवर असतात आणि एकातून दुसऱ्याची आठवण करून देणाऱ्या असतात. टागोरांचे एखादे व्यक्तीचित्र किंवा गडद निसर्गचित्र कधीतरी मनात खोल रुतून बसलेली एखादी संगीताची धून समोर आणते, तर कधी एखाद्या कवितेची ओळ, किंवा ग्रेसची संध्याकाळ.





स्वतःच्या चित्रकलेबद्धल ते म्हणतात, 'Words are too conscious; lines are not. Ideas have their form and color, which wait for their incarnation in pictorial art. Just now painting has become a mania with me. My morning began with songs and poems; now, in the evening of my life, my mind is filled with forms and colors.'

त्यांच्या चित्रकलेवर Ernst Ludwig Kirchner याच्या वूडकट प्रिंटींगचा तसेच 'मलागान कार्विंग', 'हैदा' ( sculptural tradition among the Haida Indigenous Nation from the northwest coast of the North America) , आणि स्क्रीमशौ (scrimshaw is scrollwork, engravings, and carvings done in bone or ivory)  या  कलाप्रकारांचा प्रभाव होता.   
त्यांच्या चित्रकलेबद्धल केतकी डायसन या लेखिकेने 'रोंगेर रबिन्द्रनाथ'(Ronger Rabindranath/ Rabindranather Sahitye o Chitrakalay Ronger Byabahar) या पुस्तकात अभ्यासपूर्ण  लेखन केले आहे. हे पुस्तक मला कुठेही  मिळाले नाही. खूप शोधले. जर मला ते मिळाले तर ते वाचण्यासाठी बंगाली शिकण्याचीही  माझी तयारी आहे. 

There's ultimate mystery at the heart of great art!
'Beauty that can all too easily vanish if we seek to understand it too easily and too quickly'. 

घर थकलेले संन्यासी

घर. म्हणजे नक्की काय? आजवरच्या आयुष्यात आपण कुठे कुठे राहिलो? मी विचार केला, समजत असल्यापासून आजवर जवळपास चौदा वेगवेगळ्या ठिकाणच्या घरात मी राहिले. राहिले म्हणजे दोन चार दिवस नव्हे, तर खरंखुरं वास्तव्य करून, अनेक महिने, अनेक वर्षं. इतक्या घरांना भेटून सुद्धा 'घर' म्हणजे नक्की काय ते मला सांगता येत नाही. 

पण एक अनुभव मात्र आला. घर ही मोठी विलक्षण चीज आहे. आमच्या गावचं घर, किमान दोनशे वर्षं तरी जुनं होतं. लहानपणी खूप राहिले होते तिथे. त्यावेळी अनेक लोकं राहायची तिथे. पण हळूहळू लोकं पांगली. काहींनी आपली स्वतंत्र घरे आजूबाजूला बांधली. माणसेही कमी कमी होत गेली. शेवटी घरात राहणाऱ्या माणसांची संख्या झाली 'एक'. ती होती माझी आजी. शेवटी तीही गेली. आणि घरानेही संन्यास घेतला.  ते ढासळू लागलं. वासे कोरम झाले. भिंतींना चिरा गेल्या. पूर्वी घर होतं  ऐसपैस, अनेक खोल्यांचं. देवखोली आणि तिला लागून असलेली प्रशस्त आयताकृती जागा, जिला 'मधला लोटा' म्हणत. प्रत्येक खोलीला एक वैशिष्ट्यपूर्ण नाव , 'पुढला लोटा', 'मधला लोटा', 'वाणशी' अशी विचित्र नावं. 

या मधल्या लोट्याला लागून जीना, जीन्याच्या बाहेरील भिंतीवरील खालच्या कोपऱ्यात नागोबाचे चित्र. हा चित्रातला पिवळा नागोबा घराएवढ्याच वर्षांचा झाला असावा. पण घर रिकामं झालं आणि नागोबाच्या सोबतीला उरले फक्त कवडसे. फुटक्या नळ्यातून पाझरणारे. आणि उंदरांनी पोखरलेल्या भुसभुशीत जमिनीतून उगवलेल्या वेली. 


माझा भाऊ या कोसळणाऱ्या घराला पाहायला गेला असताना त्याने काढलेला हा वरचा फोटो, पण हा फोटो नाही, आहे एक चित्र, एका जिवंत घराचे. या रिकाम्या पोकळीत आहेत शांत, स्तब्ध उभ्या असलेल्या भिंती, आतल्या एका खोलीचं बंद दार, न दिसणारा जिना, कोपऱ्यातला धूसर झालेला नागोबा. ही पोकळी, हा चार भिंतीत गोठलेला अवकाश आता कधीच डोळ्यासमोर परत दिसणार नाही असेच हा फोटो पहिला तेव्हा वाटले होते. 

जुने घर शेवटी पडले. J.C.B आला. त्याचे पार्थिव बाजूला करून त्या जागी आता एक छोटेसे घर उभे आहे. या नवीन घरात आहे एक देवखोली आणि त्याला लागून असलेला हाच, एवढ्याच आकाराचा मधला लोटा. एवढेच सोपे सुटसुटीत घर. पूर्वी होते माणसांचे घर आता झाले आहे देवांचे घर. त्या घराच्या वर्धापनदिनी आम्ही सर्वजण गेलो होतो. बाजूला आमचे स्वतंत्र घर आहे, तिथे मी रात्री झोपले पण झोप आली नाही.  दुसऱ्या रात्री या नवीन घरात झोपले. आणि काय कोणास ठाऊक पण जेव्हा डोळे मिटले तेव्हा असा भास झाला की आपण जुन्या घरातच झोपलोय. त्याच भिंती,तीच जमीन जिच्यावर वर्षानुवर्षे डोकं टेकलं. चार भिंतीतली तीच पोकळी. तीच स्पेस जी पूर्वी होती. काहीच बदलले नाहीये. हे तर तेच घर आहे. दृश्य भिंतीनी की अदृश्य भिंतीनी बनलेले घर. त्या जागेतला कण अन कण तोच. भिंती कोसळू शकतात पण त्यातलं जिवंतपण कोसळू शकत नाही. आणि बिनघोर झोप लागली.  

या अनुभवावरून घर म्हणजे काय ते समजले नाही पण एवढे मात्र समजले ते म्हणजे घर ही एक मोठी विलक्षण चीज आहे.

Tuesday, 9 August 2016

काली


 'काली' ही जी. ए. कुलकर्णी यांची कथा आहे. 'सांजशकुन' या त्यांच्या कथासंग्रहातली. फक्त तीन पानांची आहे. पण त्यांच्या अनेक कथांतील अतिशय परिपूर्ण अश्या काही कथा आहेत त्यापैकी ती एक वाटते. 

एक माणूस एका गावातील कालीच्या देवळात येतो. खुप लांबचा प्रवास करून. गाडीने. पण एका ठिकाणापाशी दारातच उभ्या असलेल्या त्याला कुणीतरी गाडीतून ढकलून देते. तो धडपडतच तोल सावरत चालत्या गाडीतूनच उतरवला जातो. तो गाडीतून कुठे चालला होता? गाडी कुठे चालली होती? कोण जाणे. 

पण उतरवून दिल्यावर मात्र तो म्हणतो, 'मी काही पुढे जाणारच नव्हतो. मला येथेच उतरायचे होते. मग गाडी नीटपणे थांबवायला काय झाले होते?' अर्थात हा राग तो स्वतःलाच सांगतो.

कोण आहे हा माणूस? जो ढकलून दिल्यावर तोल सावरत उतरतो एकदाचा, म्हणतो की मला इथेच उतरायचे होते.  पण मग तो तसे गाडीवानाला सांगतो का? की गाडी थांबेलच असा त्याचा अंदाज असतो? बहुतेक गाडी इथे येईपर्यंत त्याच्या मनाची खात्रीच नसावी कि आपण इथे उतरावे की नाही. तो निर्णय घ्यावा की नाही? निर्णय. चॉईस. तो घेण्याचे स्वातंत्र्य त्याला फक्त तोपर्यंतच होते जोपर्यंत तो गाडीच्या दारापाशी उभा होता. गाडी थांबेपर्यंत नक्की करणार नव्हता तो हा निर्णय. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते का त्याला पण? नव्हते. त्याच्या निर्णय घेण्याआधी तिसऱ्याच कुणीतरी त्याला गाडीबाहेर ढकलून दिले. कुणी? तर अश्या कुणीतरी ज्याच्यावर या माणसाचा कंट्रोल नव्हता. निर्णय कुणी घेतला मग? कुणीही नाही. 
जे काही अभावितपणे  घडलं त्यावरची या माणसाची प्रतिक्रिया म्हणजे 'मला इथेच उतरायचं होतं'. त्याला त्याची नियती कळली होती आणि बहुदा हेही कळलं होतं की आपण फक्त मनात ठरवायचं. प्रत्यक्षात निर्णय घेणं आपल्या हातात नाही. याच जीवनाची सवय लागली होती त्याला. 

जे घडेल त्यावर आपला कंट्रोल नाही हे मान्य आहे त्याला. पण कुरकुर करणे सोडेल का तो? कुरकुर करणे आणि निषेध व्यक्त करणेच त्याच्या हातात असल्याने त्याने तो व्यक्त केला.त्याच्या मनातील अफाट पसरल्या केवळ आणि केवळ त्याच्या विश्वातला(आणि त्या विश्वाचा) तो नायक. त्याला वाटते आपलेच विश्व  खरे. मग आपल्याला उतरताना थोडे अदबीने, मृदूभावाने उतरवले पाहिजे गाडीतून. पण हे त्याचे वाटणे. त्याच्यापुरतेच. त्याच्याबाहेरील विश्वात तो एक कस्पट. म्हणून ढकलून दिले गाडीतून. निषेध गाडीतून ढकलल्याचा नाही. निषेध आपल्या मनातील विश्व खोटे ठरल्याच्या आलेल्या प्रत्ययाचा. 

तो चालत गावात येतो. गाव ओसाड  पडलेले. कड्याच्या पायथ्याशी वसलेले. एका कड्याने आपला काळा फणा गावावर धरलेला. 'काळा फणा' की 'काळ फणा'?.  तो इथल्या स्मृती आठवत, कालीच्या देवळात येतो. गावातील घरे त्याच्या ओळखीची. पण आता तिथे कुणी नाही. हे गाव खरं की परत मनातलं? जुन्या आठवणीतलं? 

हा माणूस आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहे कि जिथून आठवणीत जिवंत असलेली पण आता ओसाड पडलेली घरं त्याला दिसत आहेत? ऊन तर कथा सुरु होते तेव्हापासून साथीला आहेच त्याच्या. कथेला सुरवात होते तेव्हा ऊन प्रखर असते. त्याच्या झळा जाणवत राहतात. ते ऊन आठवणींच्या ओसाड घरांच्या भिंती-छपरावरून निर्विकारपणे ओघळत असते. 

शेवटी जेव्हा तो पायऱ्या चढत कालीच्या मंदिरात पोहोचला तेव्हा ऊन 'थोडे मऊ' झाले होते. 

कालीची मूर्ती भव्य. दोन पुरुष उंच. सहा हातांची. चकचकीत काळ्या पाषाणाची. त्या माणसाने हि मूर्ती पूर्वी अनेकदा पहिली होती. पण तिच्या भेदक नजरेने त्याचा भीतीने थरकाप उडत असे. मूर्तीच्या उजव्या हातात खड्ग होते. काली म्हणजे संहारी. मृत्यूची देवता. या देवळात तो माणूस कश्यासाठी आला होता? त्याने ही मूर्ती पूर्वी अनेकदा बघितली होती, या गावात राहत असताना बघितलेली खरीखुरी, या गावच्या आठवणींमध्ये असेलली, आणि मनातही पाहिलेली. काली त्याने खुद्द बघितलेली आणि काली त्याच्या मनात व्यापून राहिलेली. 

तो देवळाच्या गाभाऱ्याचे वर्णन करतो. गाभारा म्हणजे गर्भगृह. त्यात असलेली कालीची मूर्ती. गर्भातला रक्तरंजित लाल प्रकाश तिच्या सर्वांगावर निथळत होता. गर्भगृहाची विशाल चौकट, पूर्णपणे मोकळी दिसत होती. म्हणजे गर्भगृहात येण्याला मज्जाव नाही. जाण्याला आहे बहुतेक. पण या माणसाला माहित होते कि मोकळ्या दिसणाऱ्या या गर्भगृहाच्या चौकटीत एक अत्यंत पारदर्शक अशी स्फटिकाची भिंत होती. अभेद्य, अदृश्य. त्याला तिचे अस्तिव उमगले होते. या स्फटिकातून आरपार जाण्याचा प्रयत्नही त्याने आधी केला होता, तो जवळजवळ पार झाला असताना ऐनवेळेला त्याला आपली बायको-मुलं आठवली, आणि स्फटिक पुन्हा अभेद्य शिलाखंडाप्रमाणे झाला होता. कोणीतरी ओढून फेकून दिल्याप्रमाणे तो फरशीवर येऊन आधळला होता. 

म्हणजे मागाचचे गाडीतून ढकलणारे इतर कुणीही नव्हते आणि त्यावेळी स्फटिकातून ओढून फेकून देणारेही इतर कोणीही नव्हते. 

जुने आठवून तो थोडा उदास झाला मग पुन्हा स्फटिकापाशी आला आणि कालीला उद्देशून म्हणाला 'देवी, या खेपेला मला स्वीकार. मोहात अपयश आल्याने होणारी यातनाही नको मला आणि यशस्वी झाल्यास क्षणिक तृप्ती देऊन नंतर अनंत असमाधान करणारे सुखही नको मला. मृत्यू अटळ आहे आणि तोच अढळ, निश्चल विश्वास ठेवण्याजोगा. पण एखाद्या मारेकऱ्याप्रमाणे येऊन मृत्यूने माझ्यापुढे प्रहार करावा ही घटना मला कमीपणाची वाटते. मीच मृत्यूपुढे येऊन उभा ठाकलो आणि सन्मानाने त्याच्या अधीन झालो असे एवढे तरी मानचिन्ह माझ्यापाशी राहू दे.'

आपल्या मनातल्या मनात उभारलेल्या विश्वातील त्या विश्वनायकाला मृत्यूचा चोरासारखा येऊन घातलेला घाला अपमानास्पद वाटणारच. कारण त्याच्या विश्वाचा तो हिरो आहे. नायक आहे. माझ्या मनातल्या विश्वातलेच घडावे हीच त्याची इच्छा. त्याविरुद्ध घडणे म्हणजे कमीपणाचे होणारच त्याच्यासाठी. त्यासाठी कालीला प्रार्थना करून तो स्फटिकात शिरतो. 

स्फटिकातून आरपार घेण्यावर त्याच्यात आणि कालीमध्ये अंतर उरतच नाही. जसा तो पुढे जाऊ लागतो तशी कालीची मूर्ती मागे मागे जात लहान होत जाताना तो बघतो. ती शेवटी एवढी लहान होते की तिच्या हातातले खड्ग त्याला शूद्र तुकड्यासारखे दिसायला लागते. आता त्या माणसात भयाचा अंश राहत नाही. समोरच्या भिंतीवर एक पूर्ण भिंत व्यापलेला आरसा असतो. त्या आरश्यात फक्त कालीचा रिकामा चबुतरा त्याला दिसतो. तो जोरजोरात हसतो म्हणतो 'या असल्या मृत्यूने माझ्या जीवाचा थरकाप झाला होता.  या मूर्तीची नजर मला भिववत होती. पण ते स्फटिकाबाहेर. तिथे त्या स्फटिकामुळे मूर्तीचे स्वरूप एवढे भव्य दिव्य झाले होते ज्याला मी घाबरत होतो. पण ही मूर्तीच एवढी टीचभर तर त्या मूर्तीच्या आधाराने जगणारा मृत्यू याहीपेक्षा शूद्र नव्हे तर काय ?' 

पण जेव्हा असे म्हणत, तो हातवारे करत जोरजोरात हसू लागला, खोलीतला प्रकाश त्याच्यावर पडत होता आणि त्याच्या बाजूच्या भिंतीवर देवीच्या दोन पुरुष एवढ्या आकाराची सावली  दिसत होती, तेच हातवारे करत. जेव्हा तो आरश्यापाशी आला तेव्हा पुन्हा त्याच्या मनात भय दाटले. कारण त्या आरश्यात त्याचे प्रतिबिंबच नव्हते. तरीही उसने अवसान आणून तो म्हणाला 'मृत्यू, मी तुज्यावर विजयच मिळवला आहे, मीच आपणहुन तुझ्याकडे आलो, तू माझे शरिर घेऊन गेलास. जे मला नकोच होते. आता हा जो मी उरलो आहे त्याच्यवर शस्त्राचा काही परिणाम होणार नाही. मी आता इथे उभा आहे आणि नंतर त्या रिकाम्या चबुतऱ्यावर उभा राहणार आहे'

सावली कोणाची? प्रतिबिंब कसले? आणि सावली असून प्रतिबिंब नसलेला माणूस तरी कसला? शरीरहीन माणसाला मन असते का? ही सावली कुणाची? मनाची? जी त्याचे हावभाव तसेच्या तसे दाखवत आहे. आणि प्रतिबिंब का बरे नष्ट झाले? की हे सर्व त्याच्या मनाचेच मनाने मनाशीच केलेले खेळ आहेत? आणि प्रतिबिंब न दाखवणारा आरसा तरी कसला?

जेव्हा त्याने मृत्यूला उद्देशून केलेले आपले बोलणे संपवले आणि समाधानाने डोळे मिटले त्याक्षणी त्याचे चाळे  पाहत आतापर्यंत उभ्या असलेल्या कालीच्या मूर्तीने हातातले  खड्ग उगारून त्याचा शिरस्छेद केला. धड फरफटत कोपऱ्यात नेले, आधीचे धड बाजूला करून ताजे धड त्या जागी ठेवले. आणि पुन्हा चबुतऱ्यावर आली. हातात खड्ग घेऊन निर्विकारपणे पाहत उभी राहिली. 

हेच आहे. 
माणूस. मनातला आणि खराखुरा. 
जगणे. मनातले आणि खरेखुरे. 
काली. मनातली आणि खरीखुरी. 
मृत्यू. मनातला आणि खराखुरा. 

आपल्याला  जगण्याचा खराखुरा अनुभव कधी येत नाही आणि आपल्याला खऱ्याखुऱ्या मृत्यूचा अनुभव कधी येत नाही. आपण जे जगतो ते मनात. खरंखुरं नाही. आपण जे मरतो ते मनात. खरा मृत्यू आपल्याला कधी दिसतच नाही. आपण आपल्या मनात. काली आपल्या मनात. सगळं जग आपल्या मनात. आपण कल्पिलेला मृत्यूही आपल्या मनात. 

मनात, 
आपण असे, आपण तसे,
काली तशी, 
जगणे असे,
आणि मृत्यू तसा,
फक्त 'अशी' आणि 'तशी' नसते 
ती वास्तविकता.

Sunday, 7 August 2016

भुलेश्वर मंदिर


एका ऊंच टेकडीवर अनेक पडके किल्ल्याचे अवशेष बरोबर घेऊन भुलेश्वर मंदिर उभे आहे. टेकडीवरून दूरवर पसरलेले सपाट प्रदेश दिसतात. ही सह्याद्रीचीच छोटीशी रांग, याला 'सिंहगढ-भुलेश्वर रांग' असेही म्हणतात. या टेकडीवर हे मंदिर तेराव्या शतकात(first half मध्ये) देवगिरीच्या यादव राजवटीने बांधले.पुण्यापासून साधारण पंचेचाळीस कि.मी.  अंतरावर असलेल्या 'यावत' येथे ही टेकडी आहे.

मंदिराचे नाव भुलेश्वर पण या मंदिराला यवतेश्वर असे स्थानिक नावही आहे. भुलेश्वर हे शंकराचे मंदिर आहे, भुलेश्वर म्हणजे भोलेश्वर असावे का? या भुलेश्वर नावावरून एक लोककथा देखील आहे, पण ती तितकीशी रंजक नाही, भुलेश्वर या नावावरून ती रचलेली वाटते. ती अशी आहे की देवी पार्वतीचा शिवाशी वाद होतो  त्यामुळे क्रोधीत होऊन शिवशंकर इथे या टेकडीवर येऊन ध्यानस्थ बसतो. पार्वती ग्रामीण पोशाख करून तिथे येते आणि शिवासमोर नृत्य करते. त्या नृत्याने मोहित होऊन शिवशंकर आपला क्रोध विसरतो. आणि पार्वतीसमवेत परत कैलास पर्वतावर परततो. त्याच्या या मोहित होण्यामुळे ('भुल'ण्यामूळे) या जागेचे नाव म्हणे भुलेश्वर पडले. शिवपार्वतीची अशी कुठली पुराणिक कथा खरोखरच अस्तित्वात आहे का ते बघायला हवे.

मंदिर बाहेरून एखादा किल्ला असावा तसे वाटते. १३ व्या शतकात बांधलेल्या या मंदिराच्या परिसरावर त्या काळात यादवांचा अंमल होता, त्यानंतर मुस्लिम राजवट आणि त्यानंतर मराठ्यांच्या अंमलाखाली हा प्रदेश होता, त्यामुळे इथे किल्ल्याचे बुरुज, कमानी  आणि इतर भग्न अवशेष दिसतात. 'दौलत मंगल' या नावाने हा किल्ला ओळखला जातो. यातील काही अवशेषांवर मुस्लिम स्थापत्यशैलीची छाप दिसते, तर काही ठिकाणी सोळाव्या-सतराव्या शतकांतील मराठेशाहीच्या बांधकामाची छाप दिसते. या किल्ल्याला प्रवेशद्वार आहे जिथून मंदिरापर्यंत पोचता येते, तसेच हे मंदिर नंतरच्या काळात किल्ल्याच्या इतर इमारतीतच समाविष्ट केले गेले असावे, कारण मंदिरालाच जोडून, दगडी रचना, नगारखाना इ. वास्तू बांधलेल्या आहेत. या मंदिराचे प्रमुख विशेष म्हणजे त्याची अतिशय वेगळ्या प्रकारची रचना. याला 'प्राकारा' (prakara) असे म्हणतात. 'प्राकार' (किंवा प्राकारा) ही एक भिंत असते जी संपूर्ण मंदिराला वेढून बांधलेली असते, एखाद्या कंपाऊंडसारखी. तिच्या बाह्यभागावर फारशी शिल्पकला, सुशोभीकरण केलेले नसते. फक्त वरती गोपुरं(towered gates) असू शकतात. 'प्राकारा' हे द्रविड मंदिरशैलीचे वैशिष्ट्य आहे. तसेच जैन मंदिरातही ती वापरली जाते. 'प्राकारा ' या भिंतीच्या आत खरे मंदिर असते. या 'प्राकारा 'ची रचना मुख्य मंदिराचे संरक्षण करण्यासाठी केलेली असते. अशाप्रकारची शैली १३ व्या शतकात प्रचलित होती. बहुदा या काळात वाढलेल्या परकीय आक्रमणामूळेच अश्या पद्धतीचा अवलंब मंदिरशैलीत केला गेला असावा. १३ वे शतक हा मध्ययुगीन यादवकाळ. या काळात देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रातील अनेक प्रदेशांवर राज्य होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात यादवकालीन मंदिरे सापडतात. यातील काही महत्वाची मंदिरे आहेत सिन्नर (नाशिक) येथील गोंदेश्वर, औंढा नागनाग येथील नागनाथेश्वर मंदिर, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, लोणारचे दैत्य सुदान मंदिर, तसेच यवत येथील हे भुलेश्वर मंदिर.

हे शिवमंदिर असल्याने येथील शिल्पांवर शैव प्रतिमा(iconography) आढळतात. मंदिराला वेढलेल्या 'प्राकारा' ह्या  भिंतीला आतल्या बाजूने अनेक देवकुलिका (देवतांसाठी असलेली खोरणे(cells) आहेत. ही रचना चौसष्ट  योगिनींच्या मंदिरासारखी वाटते. सोमनाथपूर(बेलूर) येथील चन्नकेशव नावाचे होयसळ मंदिरही अश्या प्रकारच्या रचनेचे आहे. त्या मंदिरच्या सभोवतालच्या 'प्राकारा' भिंतीच्या आतल्या बाजूने चौसष्ट cells आहेत. नंतरच्या काळात (१२ व्या - १३ व्या शतकात) या अशाप्रकारच्या प्राकारा भिंतीचा अवलंब आतले मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असावा. चन्नकेशव मंदिर तर वैष्णव मंदिर आहे, तिथे अश्या भिंतीमधल्या चौसष्ट cells चा(चौसष्ट योगिनींच्या  रचनेसारखा) वापर का केला असावा हे एक कोडेच आहे. यावरून समजते की 'प्राकार' ही यादव आणि इतर दक्खनी मंदिराची नेहमीची रचना नसून, तिचा अवलंब बाहेरील रचनाशैलीवरून केला आहे.

भुलेश्वर मंदिर पूर्वाभिमुख आहे, मंदिराची रचना सर्वप्रथम नंदीमंडप, त्यानंतर मंडप(सभामंडप), अंतराळ आणि शेवटी गर्भगृह अशी आहे. नंदीमंडपात नंदीची गर्भगृहाकडे तोंड करून असलेली अवाढव्य मूर्ती आहे. अंतराळ हा एक छोटासा भाग (passage)असतो जो मंडप(सभामंडप) आणि गर्भगृहाला जोडतो. या मंदिरातील अंतराळ आणि गर्भगृहामध्ये दरवाजा नाही, अंतराळालाच दरवाजा आहे आणि त्यावर अतिशय सुंदर शिल्पं, सुशोभीकरण केलेलं आहे. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांबांवर कीर्तिमुख आहेत. आणि त्यावरची हंसाची सुंदर रचना केलेली शिल्पपट्टी आहे. गर्भगृहात शंकरची पिंडी आहे.

नंदीमंडपातील नंदी

मंदिराच्या 'प्राकारा' भिंतीला आतल्याबाजूने असलेले खांब(pillar), मंदिराच्या मंडपाच्या खांबांसारखेच आहेत, फक्त मंडपांच्या खांबांवर  नागशीर्षक(फणाधारी नाग) आहेत, आणि प्राकाराच्या खांबांवर कीचकशिल्पं आहेत. 'कीचक' नावाचा शिल्प नमूना (motif) मंदिरांच्या खांबांवर वापरला जातो. खांब जिथे छपराला जोडला जातो, त्या ठिकाणी हात वर टेकवून आधार देत असल्यासारखी, 'भारवाहक' या अर्थाने,त्याची प्रतिमा बहुदा वापरली जाते.
भारवाहक किचक
मंदिरातील देवीदेवतांची बहुतेक शिल्पं 'त्रिभंगा' या अवस्थेत(posture मध्ये) आहेत. ही उभं राहण्याच्या निरनिराळ्या अवस्थातील एक अवस्था आहे. ज्यामध्ये शरीर तीन ठिकाणी वेगवेगळ्या कोनांतून वाकलेलं असतं त्याला 'त्रिभंगा' अवस्था म्हणतात. ह्या अवस्था नृत्यकलेतील, नृत्याच्या पावित्र्याशी निगडित आहेत. मंदिर शिवाचे असल्याने देव देवता शिवाशी निगडित अश्या आहेत. त्यातील काही महत्वाची शिल्पं आहेत मातृकांची (mother deities).

मातृका : गणेशी, माहेश्वरी , ब्राह्मणि
या मातृकांची उपासना प्राचीन काळापासून चालत आली आहे, त्यातील अनेक मातृकांची शिल्पं तीन-तीन च्या गटाने मंदिराच्या भिंतींच्या वरच्या भागांवर कोरलेली आहेत. या मातृका आहेत, माहेश्वरी, ब्रह्माणी, कौमारी, वैष्णवी, चामुंडा, इंद्राणी(ऐंद्री(aindri), शची), वराही. यांना सप्तमातृका म्हणतात, या  मातृकांमध्ये नरसिंही, महिषासुरमर्दिनी यांचाही कधीकधी समावेश होतो. तसेच या मातृकांबरोबर गणपती किंवा कार्तिकेय (स्कंद) यांचीही मूर्ती असते. भुलेश्वर येथील मातृकांच्या मूर्तींमध्ये गणेशी(विनायकी) ही एक अत्यंत वेगळी मूर्ती आहे. ही गणेशासारखी दिसणारी परंतु स्त्रीमूर्ती आहे. खरेतर सप्त किंवा अष्टमातृकांमध्ये गणेशीचा उल्लेख होत नाही. वैनायकी/गजाननी नावाची एक देवता (गज मुख आणि गणपतीसारखीच दिसणारी) चौसष्ट योगिनींपैकी एक आहे. तिची मूर्ती या मंदिरात का आहे ते मात्र कळत नाही. ह्या मंदिराचा तांत्रिक संप्रदायाशी तसा संबंध होता की नाही ते इतर इतर काही पुरावे नसल्याने सांगता येणार नाही. शैव पंथाशी निगडित काही इतर शिल्पं मात्र सापडतात, जश्या भैरव आणि चामुंडा यांच्या मूर्ती.

मंदिरातील अलंकरण केलेल्या शिल्पांबरोबरच रामायण आणि महाभारतातील प्रसंग देखील शिल्पात कोरलेले आढळतात. 
रामायण, महाभारतातील प्रसंग
मंदिराची शिखरं नंतरच्या काळात (१३व्या शतकानंतर)बांधलेली वाटतात. शिखरांवर असलेल्या शिल्पांत सिंह, मकर यांची अतिशय वेगळ्या शैलीतील  शिल्पं आहेत. तसेच प्राकाराच्या बाहेरील भिंतीच्या टोकावरची (गोपुरांवरची) शिल्पे अतिशय वेगळ्याच शैलीची (आणि आधुनिकही) वाटतात. 








मंदिरात सामावलेली सृष्टी आणि काही जिवंत शिल्पं
कीर्तिमुख
'कीर्तीमुख' हे बहुतेक शिव मंदिरांवर सापडणारे शिल्पं अतिशय वेगळे आहे. कीर्तीमुख म्हणजे 'face of fame'. कीर्तीमुखाची गोष्टही फारच रंजक आहे. एकदा एक अतिशय बलाढ्य दैत्य राक्षस इतकी अंदाधुंदी माजवतो की देवही घाबरतात. शेवटी त्या राक्षसापासून सुटकारा मिळावा यासाठी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ते शंकराकडे जातात. शंकर त्या राक्षसाचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी एक दैत्य राक्षस निर्माण करतो. हा राक्षस जे दिसेल त्याला खाऊ शकणारा असतो. आणि सतत फक्त खाणे(गिळंकृत करणे) हेच त्याचे काम असते. त्या अंदाधुंदी माजवणाऱ्या राक्षसापुढे शंकर हा नवीन राक्षस सोडतो. तेव्हा अंदाधुंदी माजवणारा राक्षस शंकराला शरण येतो आणि या सतत खाणाऱ्या राक्षसापासून वाचवण्याची विनंती शंकराला करतो. शंकर प्रसन्न होऊन त्याला जीवनदान देतो. आता नवीन निर्माण झालेला सतत काहीतरी खाऊ पाहणारा राक्षस मात्र आता मी कुणाला खाऊ असे शंकराला विचारतो. तेव्हा शंकर त्याला सांगतो की तू स्वतःलाच खा. त्यावर आज्ञेचं पालन करून तो शेपटीपासून स्वतःलाच खाऊ लागतो आणि शेवटी फक्त त्याचे मुख शिल्लक राहते. तेव्हा शंकर त्याच्या आज्ञाधारकतेवर प्रसन्न होतो आणि त्याला वर देतो. शंकर त्याला सांगतो की आजपासून तुझे नाव 'कीर्तिमुख' असेल आणि माझ्या प्रत्येक रहिवासाच्या ठिकाणी, मंदिरांवर तुझे वास्तव्य असेल. या कीर्तीमुखाची अशी कहाणी आहे. या कहाणीमागे 'स्वतःचा स्वतःच नाश करणे म्हणजेच स्वतःचा अहंकार (ego) / अहं याचा स्वतःच नाश करणे असा मतितार्थही असू शकतो. 'Medieval Temples of Dakhan' या Henry Cousen यांच्या पुस्तकात दिलेली कीर्तीमुखाची गोष्ट थोड़ी वेगळी आहे. ती अशी की जालंधर नावाचा राक्षस पार्वतीवर लुब्ध होऊन तिला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करू लागला. तेव्हा शिवाने आपल्या त्रितियनेत्रातून एक असा भयंकर राक्षस निर्माण केला ज्याने शिवाकडे  काहीतरी गिळंकृत करण्यासाठी देण्याची मागणी केली, त्यावर शिवाने त्याला स्वतःलाच गिळंकृत करण्याची आज्ञा केली, जिचे पालन करून त्याने स्वतःला मुखापर्यंत खाऊन टाकले. या आज्ञापालनावर प्रसन्न होऊन शिवाने त्याला 'कीर्तीमुख' ही पदवी दिली. या कीर्तीमुखाचे शिल्पं शंकराच्या मंदिराच्या मुख्य द्वारावर, शिखरांवर असतात. तसेच सुशोभीकरणाच्या शिल्पपट्ट्यातही असतात. 

या शिल्पाशिवाय हंस, मकर, हत्ती, उंट , सिंह अश्या प्राण्यांची शिल्पंही मंदिरात आहेत. आतल्या भिंतींवर जी उंटांची शिल्पं आहेत, तशी शिल्पं महाराष्ट्रातील इतर मंदिरात क्वचितच सापडतात. या शिल्पांचे सौन्दर्य अतुलनीय आहेच पण काही जिवंत शिल्पंही मंदिराचा भाग झाली आहेत. ही शिल्पं आहेत आजूबाजूच्या झाडांची, प्राण्या-पक्षांची जे या मंदिराचे रहिवासी आहेत. त्यातले एक आहे 'चार झाडांचे एक झाड'. हे आहे पिंपळाचे झाड, झाडाभोवती पार बांधलेला आहे, या झाडाचे वैशिष्टय आहे हे की या झाडाच्या बरोबरच कडुनिंबाचे ('निम') झाड, वेलीसारखे दिसणारे  दुसरे आणि तिसरे आणखी छोटे झाड अशी चार झाडे एकत्रितपणे एकमेकांत दाटपणे मिसळून गेली आहेत. तशीच आहेत मंदिराच्या बाजूची गुलमोहर, चिंच, कडुनिंब अशी अनेक झाडं. मंदिरांवरची आणखी जिवंत शिल्पं म्हणजे तिथे राहणारे पोपट, रखवालदाराचा रुबाबदार कुत्रा आणि मंदिरात डोळे मिटून ध्यान करीत बसलेले मांजर.

निसर्गाच्या कुशीत राहून, निसर्गालाच कडेवर घेऊन झाडे, पाने , फुले, पशु, पक्षी यांच्या सानिध्यात उभे असलेले हे मंदिर परत परत भेट द्यावे असे आहे. 


मंदिराजवळची जिवंत शिल्पं
(सर्व फोटोग्राफी सौजन्य : मधुमिता कुळकर्णी)

Tuesday, 26 July 2016

खजुराहो अनुभव: चौसष्ट योगिनी : भाग ४

योगिनी मंदिरं आणि त्यांचे आश्रयदाते 

खजुराहो, मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश आणि चंदेल राजे
खजुराहो येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर चंदेल राजांनी बांधले. हे मंदिर नवव्या शतकातील असून आयताकृती आहे. ग्रॅनाईट दगडांपासून बनलेले हे मंदिर आता अत्यंत पडक्या अस्तित्वात आहे. या मंदिरातील फक्त तीन मूर्ती आज अस्तित्वात असून त्या मूर्ती मातृकांच्या आहेत. एक आहे महिषासुरमर्दिनी, दुसरी महेश्वरी आणि तिसरी ब्रह्माणी. चंदेल राजे दहाव्या शतकांपासून ते तेराव्या शतकापर्यंत मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशाचा काही भाग, यांवर राज्य करत होते. अत्यंत प्रभावशाली अश्या या राजांनीच खजुराहोची विलक्षण मंदिरं उभारली. या मंदिरांवरची कामशिल्पं आणि चौसष्ट योगिनींचे मंदिर हे दर्शवते की हे राजे शैव आणि शाक्त तांत्रिक उपासनांचे साधक होते. कीर्तिवर्मन या दहाव्या शतकातील राजच्या दरबारी असलेल्या कृष्णमिस्र याने लहिलेल्या 'प्रबोधचंद्रोदया' या नाटकात कपालिक संप्रदायाच्या साधकाचा जैन व्यक्तीला आपल्या उपासनेचे महत्व पटवून देणारा संवाद आहे. हे नाटक कपालिक या शैव तांत्रिक संप्रदायाच्या पार्श्वभूमीवर बेतले आहे. यावरून चंदेलांच्या काळात इथे शैव(कपालिक)-शाक्त(कौल) तांत्रिक साधना होत होत्या असे सिद्ध होते. आणि या उपसकांचे हे राज्यकर्ते आश्रयदाते होते. दहाव्या शतकापासून मध्य भारतात, अनेक परकीय मुस्लिम राजांच्या(गझनीचा मुहंमद इ.) स्वाऱ्या होते होत्या. आपले राज्य अबाधित राखण्यासाठी, साहजिकच इथल्या राजांनी योगिनी मंदिरांच्या उपसनेद्वारे आपले सैन्यबळ, साम्राज्यबळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले असावेत. 
चंदेल राजांनी खजुराहो बरोबरच जवळच्या प्रदेशात जवळपास आणखी आठ मंदिरे बांधली होती. आज त्यापैकी कुठलेच अस्तित्वात नाही. शाहदोल, बदोह, रिखियांन,लोखरी इ. ठिकाणची मंदिरे भग्नावस्थेत आहेत.  

भेडाघाट आणि कालचुरी राजे 
भेडाघाट, जबलपूर येथे असलेले योगिनींचे मंदिर अजूनही सुस्थितीत असून यातील एक्याऐंशी योगिनींच्या मूर्तीदेखील पडझड झालेल्या असूनही बऱ्यापैकी स्थितीत आहेत. हे मंदिर नवव्या शतकात त्रिपुरीच्या (त्रिपुरी म्हणजे आत्ताचे तेवर,जबलपूर) कलचुरी राजांनी बांधले. हे मंदिर नर्मदेच्या काठावर आहे. कलचुरी राजे शैव संप्रदायाचे उपासक होते. यांनींही या प्रांतातील आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी योगिनी मंदिर स्थापन केले असावे. तांत्रिक ग्रंथात एक्याऐंशी योगिनींची उपासना ही विशेषकरून राज्यसत्तांसाठी, त्यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी दिली गेली आहे.

मितौली, नारेसर आणि कच्छपघट राजे 
उत्तरप्रदेशातील मितौली हा ग्वाल्हेरच्या जवळचा भाग आणि नारेसर याठिकाणी चंदेल राजांचे मांडलिक कच्छपघट यांची सत्ता होती. यांनी नंतरच्या काळात चंदेलांचे मांडलिकत्व जुगारून देऊन, स्वतंत्र सत्ता म्हणून या प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यांनीच या भागांत मितौली आणि नारेसर इ.  ठिकाणी योगिनींच्या मंदिरांची स्थापना केली. नारेसर येथील मंदिर नवव्या शतकात तर मितौली येथील मंदिर दहाव्या शतकात बांधले गेले. यातले नारेसर येथील मंदिर आज भग्नावस्थेत आहे आणि त्यातल्या योगिनींची शिल्पे संग्रहालयात ठेवलेली आहेत. मितौली येथील मंदिर अजूनही बऱ्याच सुस्थितीत आहे. हे मंदिर कच्छपघट राजा देवपाल याने बांधले, या मंदिरावर असलेल्या अस्पष्ट अश्या शिलालेखावरून कळते की देवपाल आणि त्याची पत्नीने या मंदिराची उभारणी केली असावी. या शिलालेखात पुढे तेराव्या शतकाचाही उल्लेख आहे. ज्यात कछवाह या राजपूत राजाचे नाव आहे. ग्वाल्हेरचा परिसर त्या काळात राजपुतांच्या अधिपत्याखाली होता, त्यानंतरच्या काळात आलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये ग्वालेर आणि आजूबाजूचा परिसर मुस्लिमांच्या सत्तेखाली होता. तेराव्या शतकानंतर वाढत्या मुस्लिम सत्तांमूळे ही मंदिरं ओसाड पडली असावीत. 

हिरापूर आणि रानीपूर, ओरिसा 
ओरिसा येथील हिरापूर, भुवनेश्वर येथील मंदिर  नवव्या शतकात बांधले गेले. ओरिसामध्ये नवव्या-दहाव्या शतकात अनेक छोटेछोटे राजे राज्य करीत असल्याने हे मंदिर नक्की कुणी बांधले ते कळणे अवघड आहे. भूम-कारा, सोमवंशी, भांजा अश्या अनेक सत्ता तिथे होत्या. त्यापैकी भांजा हे शाक्त पूजक होते. हिरापूरचे मंदिर त्यांनी बांधले असण्याची शक्यता आहे. ओरिसाच्या आणि छत्तीसगढच्या सीमेजवळ असलेले, रानीपूर-झारियल येथील मंदिरही जवळपास याच काळात बांधले गेले असून  ते बहुदा सोमवंशी या राजांनी बांधले असावे कारण त्या काळात त्यांची सत्ता तिथे होती. हि दोन्ही मंदिरे बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहेत. आणि त्यातले हिरापूर येथील मंदिर सर्वात लहान योगिनी मंदिर आहे. हिरापूर आणि रानीपूर येथील दोन्ही मंदिरांत असलेल्या योगिनींमध्ये मातृका नाहीत. याचे कारण हे असावे की ओरिसात अन्य अनेक ठिकाणी मातृकांची वेगळी मंदिरं आहेत.हिरापूर येथील योगिनींचे मंदिर इतके गुप्त होते की भुवनेश्वरच्या जवळ पंधरा किलोमीटर अंतरावरच्या या मंदिराला प्रथम १९५३ मध्ये, केदारनाथ महापात्रा यांनी प्रकाशात आणले.

गुजरात, राजस्थान 
गुजरात आणि राजस्थान येथील राजपूत आणि अन्य राजांनी देखील योगिनी उपासनेसाठी मंदिरे स्थापन केली होती परंतु आज त्यातील एकही मंदिर अस्तित्वात नाही. राजस्थान आणि गुजरात मध्ये कागद आणि कापडावर योगिनी चक्र आणि योगिनींची लोककलाचित्रं मात्र अस्तित्वात आहेत. 

दक्षिण भारत 
आंध्रप्रदेशात योगिनी उपासना नवखी नसल्याची काही उदाहरणे त्यांच्या धार्मिक ग्रंथातून सापडतात. परंतु आंध्रप्रदेशात कुठलेही मंदिरचे पुरावे मात्र सापडले नाहीत. तामिळनाडू मधील कांचीपुरम येथे मंदिर नसले तरी योगिनींच्या मूर्ती मात्र सापडल्या आहेत. या चोल राजांच्या राजवटीतील आहेत. यावरून स्पष्ट होते की दक्षिण भारतातदेखील योगिनी उपासना आणि मंदिरे अस्तित्वात होती. 

आसाम, नेपाळ , काश्मीर, दिल्ली 
नेपाळ देशात आजतागायत मुख्यत्वे तांत्रिक उपासना होते, येथील सर्व महत्वाच्या तांत्रिक ग्रंथात योगिनी उपासना दिलेल्या आहेत. तरीही नेपाळ येथे एकही योगिनींचे मंदिर आढळत नाही. आसाम येथील कामख्या (Kamakhya) मंदिरातील दैनिक पूजेमध्ये योगिनींची नावं उद्धृत केली जातात. दिल्ली च्या बाह्यभागात असलेले योगिनीपुरा येथील मंदिर देखील योगिनींशी संबंधित आहे. काश्मीर हे सातव्या ते दहाव्या शतकापर्यंत शैव आणि शाक्त तांत्रिक उपासनेचे अत्यंत महत्वाचे केंद्र होते. येथील अभिनवगुप्त या नवव्या शतकातील पंडित तत्ववेत्याने  तांत्रिक साधनेवर अतिशय प्रगल्भ लेखन केले आहे. परंतु काश्मीरमधेही आता एकही योगिनींचे मंदिर अस्तित्वात नाही.
 

चौसष्ट योगिनींची शिल्पं प्रतिमा (Iconography )
 

अतिशय वेधक , गूढ , कल्पनारम्य आणि दैवी अशी ही योगिनींची शिल्पं आहेत. त्यांची शिल्पं विशेष आहेत कारण शिल्पकारांनी त्यांच्यापैकी काहींच्या निर्मितीसाठी  कलेतील रौद्र, बीभत्स, भयानकरसांचा अवलंब केला आहे.

योगिनींची उपासना असामान्य असल्याने त्यांचे रूपही असामान्य असले पाहिजे. तशीच हि शिल्पं आहेत. योगिनींचे मुख्य गुणविशेष त्यांच्या शिल्पात व्यक्त केले गेले आहेत.  योगिनींची नावं, त्यांचे विशेष हे सर्व या त्या ठिकाणच्या परंपरेने, तिथल्या ग्रामीण देवतांच्या प्रतिमांनी प्रभावित झालेले आहे. प्रत्येक योगिनीचे वाहन आहे. काही योगिनी वाहनरहितदेखील आहेत. काही योगिनी रूपे धारण करणाऱ्या आहेत. या शिल्पांमध्ये निरनिराळ्या प्राण्यांची मुखं त्यांनी धारण केली आहेत. योगिनींच्या साधनेत अवलंब होणाऱ्या मत्स्य, मांस, मद्य, मुद्रा(grain) या गोष्टींचा त्यांच्या शिल्पात थेट संदर्भ दिसत नसला तरी अनेक योगिनींच्या हातात कवटीचे भांडे(skull cup), मनुष्य मुंडके दिसते. काही शिल्पांत, त्यांच्या चर्येवरुन त्या मांस भक्षण करत असाव्यात असे वाटते. परंतु मैथुन या शिल्पांत कुठेही दिसत नाही. शवसाधना हा योगिनी उपासनेचा महत्वाचा भाग होता. त्याचे अनेक संदर्भ या शिल्पांत सापडतात. काही योगिनी शवाचा आसनासारखा उपयोग करतात. काही शिल्पांमध्ये योगिनींच्या आसनाजवळ सेवक, साधक शवासहित दिसतात.
योगिनींच्या मूर्ती उभ्या किंवा आसनस्थ किंवा नृत्य करणाऱ्या गतिशील पावित्र्यात आहेत. योगिनींच्या सर्व मूर्ती अलंकारांनी मढलेल्या आहेत. पैंजण, बाजूबंध, गळ्यातील कंठा, माळा, कमरबंध, केसातील आभूषणे, कानांतील डूल अश्या अनेक अलंकारांनी युक्त त्या आहेत. काही ठिकाणी अलंकार म्हणून सर्पाचे बाजूबंध, कामरबंधही त्यांनी परिधान केले आहेत. कानातील आभूषणे देखील सर्प, किंवा मानवी मुंडकी अशी भीषण देखील आहेत. त्यांच्या केशरचनाही अतिशय वैविध्य असलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही योगिनींचे केस (विशेषतः दक्षिण भारतातील)मोकळे सोडलेले, ऊर्ध्वकेशी(उभे असलेले)आहेत. काही योगिनी सुहास्यवदना आहेत, काही रौद्ररूप धारिणी तर काही भयरुपी आहेत. काहींच्या डोक्यामागे (दैवी वैशिष्ट्य दर्शविण्यासाठी) तेजोवलय (halo) आहे. यावरून असे वाटते की काही योगिनी मानुषी होत्या का?  काहींना दोन हात आहेत, पण अनेक योगिनींना दोन पेक्षा अधिक हात(चार, आठ, बारा इ.) आहेत. सर्वच योगिनींच्या शिल्पांच्या शरीराचा वरचा भाग अनावृत्त आहे.
या शिल्पप्रतिमांचे (iconography) सर्वात मोठे वैशिष्ट्य  म्हणजे योगिनींची विविध पशु मुखं आणि त्यांची वाहनं. यातली विविधता वाखाणण्यासारखी आहे. काही योगिनी वृक्षांवर राहणाऱ्या असल्या(ग्रंथातील संदर्भावरून) तरी वृक्षांचे संदर्भ शिल्पांत फारसे दिसत नाहीत.फक्त एकाच ठिकाणी एका गर्धभमुखी योगिनीचे वाहन वृक्ष आहे. आणि एकदोन ठिकाणी तिच्या मागे वृक्ष आहे पण हे फारच क्वचित दिसते. प्राणीपक्षीजगत मात्र शिल्पांत समृद्धतेने वापरले गेले आहे. अस्वल, ससा, सिंह, बिबळ्या वाघ, हत्ती, घोडा, मांजर, गाढव, सर्प, म्हैस(गाय/बैल), मेंढा, पक्षी,कोल्हा यांची मुखं धारण योगिनींनी धारण केली आहेत. या प्राण्यांबरोबरच विंचू, खेकडा, कासव, बेडूक, डुक्कर(रानडुक्कर), मासा, उंदीर, हंस, मोर, पोपट, कोंबडा, घुबड,  हरण(चितळ), एडका, इग्वाना (एक प्रकारचा सरडा) असे विविध प्राणी-पक्षी योगिनींचे वाहन झाले आहेत.
हिरापूर येथील योगिनी अत्यंत मोहक आणि अतिशय नेत्रसुखद आहेत. हि सर्व उभी शिल्पं आहेत. शिल्पाची कारागिरी अतिशय नाजूक आणि प्रमाणबद्ध आहे. या योगिनींच्या एक योगिनी स्वतःचे पैंजण नीट करत आहे. एक योगिनी शिकारी आहे हातातील धनुष्यबाण ताणून ती उभी आहे. एक योगिनी उंदरावरील दोन चक्रांवर तोल सांभाळत हातात डमरू घेऊन उभी आहे. या योगिनींच्या शिल्पात सौन्दर्यपूर्ण डौल आहे. येथील काही योगिनी पशुमुखी आहेत. अश्वमुखी, गर्धभमुखी योगिनी येथे आहेत. पशुमुखी असल्या तरी त्यांचे सौन्दर्य कुठेही कमी झालेले नाही.  एक योगिनी हातात कवटीचे भांडे घेऊन तोंडाला लावत आहे. हि सुराप्रिया असू शकते किंवा रुधिरपायनी, किंवा कपालिनी( हातातील कवटी म्हणजे शैव-कपालिकांचे भांडे) असू शकते. 

चामुंडा सदृश योगिनी आणि शिकार करणारी योगिनी
पोपट हे वाहन असलेली योगिनी आणि पैंजण ठीक करणारी योगिनी

चक्रावर तोल सांभाळणारी योगिनी आणि कोंबडा वाहन असलेली योगिनी (सर्व फोटो @ विकिपीडिया)
एक योगिनी चामुंडेच्या मूर्तीसारखी भयावह आहे. हि जी शिल्प-प्रतिमा आहे ती सर्वसाधारण देवीच्या अत्यंत रौद्र-भीषण रूपासाठी वापरली जाते. 'काली'/चामुंडा/चंडी' इत्यादी देवीची संहारी रूपे सौन्दर्य-विरक्त असतात. अत्यंत कृश, गाल बसलेले, बरगड्या बाहेर, ओघळलेले(sagging) वक्ष, वर आलेले मोठे डोळे असा काहीसा त्यांचा भयावह अविर्भाव असतो. येथील अनेक योगिनी त्यांच्या वाहनासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एक योगिनी तर हातात सूप (winnower) घेऊन आहे. या योगिनी मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाह्यभागावर रक्षक स्त्री मूर्ती आहेत. यांना काही पंडितांनी 'कात्यायनी' असे नाव दिले आहे. प्रवेशद्वारावर पुरुष द्वारपाल आहेत. 

रानीपूर झारियल येथील योगिनी (आणि भैरवमूर्तीही ) नृत्य करणाऱ्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डोक्यामागे तेजोवलय नाही. यात वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं आहे मांजराचे मुख असलेल्या योगिनीचे. तिला बिदालीदेवी किंवा मार्जारी असे म्हणतात. आणखी एका योगिनीचे मुख चित्त्याचे आहे. तिच्या हातात शव आहे. अनेक ठिकाणी दर्शविलेल्या या शिल्पातील शवांच्या संदर्भावरून शवसाधना हे या योगिनींच्या उपासनेचे प्रमुख अंग होते असे दिसते. आता अस्तित्वात नसलेली एक योगिनी मूर्ती 'कनिंगहॅम' या पुरातत्ववेत्त्याने नोंदवून ठेवली आहे. जी सूर्याशी संबंधित होती. जिच्या हातात कमळ आणि पायाशी घोडे होते. अनेक मूर्ती कालांतराने मंदिरातून चोरल्या गेल्या. या सर्व मूर्ती वालुकाष्म दगडाच्या असल्याने शिल्पांचा दर्जा कालमानाने बराच ढासळला आहे. 

जिथपासून या योगिनींच्या शिल्पांचा, संकल्पनेची ओळख झाली त्या खजुराहो येथील मूर्ती मात्र काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. यातील फक्त तीन मूर्ती खजुराहोच्या संग्रहालयात आढळतात. त्या आहेत मातृकांच्या (सप्तमातृकांपैकी तीन). महिषासुरमर्दिनी, ब्राह्मणी आणि माहेश्वरी.

भेडाघाट येथील योगिनी मात्र बऱ्याच पडझड झालेल्या असल्या तरीही अजून बऱ्याच सुस्थितीत आहेत. या सर्व मूर्ती ओरिसा योगिनी मंदिरांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्या मागे तेजोवलय आहे, पायाशी सेवक, साधक आहेत. या मूर्ती नाजूक नाहीत तर शरीरसौष्ठवाने परिपूर्ण आहेत. या शिल्पांवर त्यांची नावे कोरलेली आहेत. इरुडी, सर्वोतोमुखी, इंद्रजाली , फणेंद्रि, अंतकारी अशी त्यांची नावं आहेत.

याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जी योगिनींची शिल्पं सापडली आहेत, ती रीखियान, शाहदोल, लोखारी, मितौली, दुधाई, हिंगलाजढ , बादोह आणि कांचीपुरम येथील आहेत. यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं आहेत. लोखारी येथील तर सर्व योगिनी या प्राण्यांची मुखे धारण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, सश्याचे मुख धारण केलेली योगिनी सासकनना, सर्पस्या ही योगिनी सर्पाचे मुख धारण केलेली. दुर्दैवाने यातील अनेक शिल्पं आज भग्नावस्थेत अस्तित्वात आहेत. सासकनना हि ससायोगिनी आता अखंडावस्थेत नाही, तिचे दोन भाग झाले आहेत. हि सर्व शिल्पे वेगवेगळ्या शिल्पकारांच्या कार्यशाळेतून निर्माण झाली आहेत. अशी ओरिसा मधील योगिनी शिल्पं ओरिसी शिल्पकलेचे नमुने वाटतात. मध्य आणि उत्तर प्रदेशातील शिल्पं तेथील शिल्पकलांच्या त्या काळातील परंपरेतून घडलेली वाटतात. याउलट दक्षिण भारतातील कांचीपुरम येथील शिल्पं 'चोल'(Chola) शिल्पकलेचे नमुने वाटतात. भारताचे हेच मोठे वैशिष्ट्य की एकाच संप्रदायातील एकाच उपासनेतही त्यांच्या मूर्तींमध्ये,नावांमध्ये  प्रांतानुसार कितीतरी विविधता आढळते.

योगिनींच्या शिल्पप्रतिमा देखील कल्पनारम्य, अनेक पैलूंनी युक्त आहेत. त्यांच्या हातांतील वस्तू त्यांच्या विशेषाच्या सूचक आहेत. उदाहरणार्थ सूप घेतलेली एक योगिनी हिरापूर येथे आहे. तशीच सूप आणि झाडू घेतलेली एक योगिनी कांचीपुरम येथे सापडलेल्या योगिनींत आहे. सूप आणि झाडू हे कृषी हंगामाचे (harvest) पीक येण्याचे प्रतीक आहे. मग ही योगिनी त्यासाठी(सुबत्ता, विपुलता, समृद्धी यासाठी) पुजली जात असण्याची शक्यता आहे. कांचीपुरम येथील एका योगिनीच्या हातात दंड(wand) आणि कमंडलू, पाण्याचे भांडे आहे. हि योगिनी रोगनिवारण करणारी आहे. नकारात्मक आणि सकारात्मक या ऊर्जांबरोबरच त्यांच्या शिल्पप्रतिमांतून या योगिनी बरेच काही व्यक्त करू पाहत आहेत.

लोखारी येथील ससाकनना योगिनी आणि कोल्हयाच्या मुखाची योगिनी (विद्या देहिजीया यांच्या पुस्तकातून)

Saturday, 23 July 2016

खजुराहो अनुभव: चौसष्ट योगिनी : भाग ३

योगिनींचे वर्तुळ

योगिनींच्या मंदिरांची रचना बहुतांशी वर्तुळाकार असते. क्वचित चौकोनीही असते. वरून बघितले तर वर्तुळाकार योगिनींचे चक्र आणि मध्यभागी असलेली भैरवाची मूर्ती ही रचना शिवलिंगासारखी  भासेल. परंतु याहीपेक्षा वर्तुळाकार रचनेची अनेक कारणे आहेत. वर्तुळ हे अत्यंत साधे पण प्रभावी चिन्ह आहे. ते पूर्णतेचे, प्रबोधतेचे (consciousness) प्रतीक आहे. वर्तुळ म्हणजे सर्व काही आणि वर्तुळ म्हणजे काहीच नाही. शून्यता. अनंतकाळ दर्शवणारे. वर्तुळाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कुठल्याही बिंदूवरून तुम्ही केंद्रापासून तेवढेच दूर असता. केंद्राकडे पोचण्याचा मार्ग वर्तुळाच्या कडेवरून सारखाच. वर्तुळ फिरते असले तर त्याचे बनते चक्र आणि त्यावरील गतिमान बिंदू पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतो. हे 'पुनरपि' असणे हेच वर्तुळाचे सामर्थ्य. 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं' असे चालू असलेले चक्र लहान लहान होत जात शेवटी केंद्रापर्यंत पोचले तर शून्यतेशी, वैश्विक स्पंदनाशी एकरूप होते.  शिव(भैरव) 'योगिनीं'ची मुख्य देवता. तीच सर्व विश्वचे मूळ त्यामुळे ती केंद्रस्थानी असते.तिच्यापर्यंत पोचता येते 'योगिनीं' द्वारे. 

योगिनींच्या वर्तुळाकार रचनेशी वर्तुळाच्या गुणधर्माचा असा संबंध आहे. हे योगिनींचे वर्तुळ एखाद्या पूर्ण फुललेल्या कमळपाकळ्यांसारखे वर्तुळाकार रचलेले आहे. केंद्राकडून फुटलेल्या पाकळ्या, आठ, सोळा, चोवीस, बत्तीस आणि शेवटी चौसष्ट होत गेल्या आहेत. प्रत्येक पाकळीवर योगिनी विराजमान आहे. त्या पाकळ्यावरून प्रवास करणारा साधक योगिनींकडून एकएक सिद्धी प्राप्त करत शेवटी केंद्रापर्यंत पोचतो. या 'सिद्धता' (attainment) मिळवण्याच्या उपासनेत वर्तुळापेक्षा शुद्ध आणि योग्य चिन्ह दुसरे कुठले असू शकते?

त्यामुळे योगिनींच्या मंदिरांचा आकार वर्तुळाकार आहे. याव्यतिरिक्त वर्तुळाकार मंदिरं फारशी सापडत नाहीत. प्राचीन स्थापत्यशास्त्राच्या ग्रंथात मंदिरांची वर्तुळाकार रचना नोंदली आहे. प्रत्यक्षात मात्र 'योगिनी' मंदिरं सोडली तर अश्या मंदिरांची रचना फारशी दिसत नाही.

तांत्रिक उपासनेत वर्तुळाला फार महत्व आहे. आणि उपासनेतील महत्वाच्या विधींसाठी वर्तुळाकार रचना महत्वाची ठरते. अशाप्रकारची उपासनेची अनेक योगिनी चक्रं तांत्रिक ग्रंथात दिली आहेत. प्रथम कागद, जमीन यांचा वापर करून अशी चक्र निर्माण केली जात आणि त्यांची Symbolic पद्धतीने उपासना केली जाई. नंतरच्या काळातच या चक्राकार रचनेवरून मंदिरं स्थापन करण्यात आली. 'योगिनी' मंदिरातील सर्व रचना, योगिनीच्या मूर्तींची विशेष जागा, मध्यभागाची मूर्ती हे सर्व तांत्रिक उपासनेच्या ग्रंथातून दर्शविलेल्या, नोंदलेल्या  विविध योगिनी चक्रांचेच आराखडे आहेत. अशी अनेक प्रकारची 'योगिनी' चक्रं या ग्रंथांतून अस्तित्वात आहेत. ज्या पद्धतीची उपासना, ज्या पद्धतीची सिद्धी प्राप्त करून घ्यायची त्या प्रकारच्या 'योगिनी चक्राचा' उपासनेसाठी अवलंब केला जाई.

तांत्रिक ग्रंथांमध्ये 'योगिनी' साधना प्रतीकरूपाने करण्याबद्धलही नोंद आहे. काही अतिशय प्रगल्भ ध्यानाच्या प्रकारात योगिनींची साधना शरीरातील स्थानांवरून होते. यातील आठ महत्वाच्या योगिनी देवतांचे स्थान शरीरातील महत्वाच्या चक्रांवर(मूलाधार,स्वाधिष्ठान,मणीपुर,अनाहत,विशुद्धि,आज्ञा,सहस्त्रार) असते. (कुंडलिनी इ. योगिक प्रकारांशी साम्य असले तरीही ही योगिनी साधना वेगळ्या प्रकारची असते. तरीही दोहोंमध्ये साम्य आहे)
तांत्रिक साधनेत चक्र, मंडळ आणि यंत्र याना महत्वाचे स्थान आहे. मंडळ म्हणजे देखील चक्रच. पण हे मंडळ चौकोनी देखील असू शकते. योगिनी आणि सप्त/अष्ट मातृका या वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरीही एकीपासून दुसरी बनली असावी किंवा दोन्हींत देवाणघेवाण असावी, त्यामुळे काही ठिकाणी 'योगिनीं' मध्ये मातृकांचा समावेश केला जातो. मातृकांचे मंडळ चौकोनी असते, बहुदा याच कारणासाठी खजुराहो आणि इतर काही ठिकाणची योगिनींची मंदिरे चौकोनी असावीत का? कारण खजुराहो येथील 'योगिनींच्या' मंदिरात एकही मूर्ती अस्तित्वात नसली तरी या मंदिरातल्याच असलेल्या (असे मान्य झालेल्या) तीन मूर्ती खजुराहोच्या संग्रहालयात आहेत आणि त्या मूर्ती मातृकांच्या आहेत. 'मंडळ' म्हणजेही एक प्रकारचे चक्रच. वास्तुशास्त्रात या 'मंडळा' ला फार महत्व आहे. वास्तूपुरुषमंडळ अजूनही वास्तूत निर्माण करून पुजले जाते. या मंडळाचे महत्व वास्तूचा (शरीर) आणि विश्वा(cosmos)शी संबध जोडण्यात आहे असे मानले जाते. 'यंत्र' हे देखील चक्र, मंडळं यांच्या आकृतीरूपाने तांत्रिक पद्धतीमध्ये महत्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा योगिनींच्या मंदिरांशी , त्यांच्या उपासनेशी थेट संबंध आहे. 

चौसष्ट ? एक्याऐंशी? बेचाळीस?

प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये संख्या आणि अंकशास्त्राला अतिशय महत्व आहे. आणि काही विशेष अंक शुभ मानले गेले आहेत. जसा आकडा चार आणि त्याचे गुणक आठ, बारा, चौवीस, चौसष्ठ, चौऱ्याऐंशी. आठ हा देखील शुभ. तर त्याचा वर्ग चौसष्ट तर अतिशुभ म्हणून चौसष्ट या आकड्याला धार्मिक संकल्पनांत महत्वाचे स्थान आहे. चौसष्ट कला/विद्या मानल्या जातातच. तांत्रिक उपासनांतही चौसष्ट आकड्याला महत्व आहे. त्यांच्या पंथात चौसष्ट मुख्य तंत्र आहेत. 'कौलार्नव'(Kularnava) या ग्रंथात दहाव्या प्रकरणात योगिनींची संख्या चौसष्ट दिली आहे. आठ कुलं आणि चौसष्ट योगिनी. 'कौलाज्ञाननिर्णय' या ग्रंथातही चौसष्ट योगिनींचा संदर्भ आहे. 'मतोत्तर' तंत्रात २ चौसष्ट योगिनींचे चक्रे दिले आहेत आणि एक एक्याऐंशी योगिनींचे चक्र दिले आहे.

 'अष्टाष्टक'(८ ग्रुप चे ८) हि देखील महत्वाची संख्या मानली जाते.नऊ हा आकडाही तसाच शुभ मानला जातो. नऊ मातृका आहेत. नवग्रह, नवदुर्गा यामुळे नऊ अंकालाही स्थान आहे. त्याचा वर्ग एक्याऐंशी हीदेखील काही ठिकाणच्या मंदिरातील योगिनींची संख्या आहे. बेचाळीस हा देखील तांत्रिक जगात महत्वाचा अंक आहे. 'भूतालीपी' हे योगिनींचे चक्र बेचाळीस योगिनींचे आहे. संस्कृतमधील बेचाळीस अक्षरांना तंत्रात महत्वाचे स्थान आहे. भूता(जिवंत), लिपी(अक्षरं). संस्कृतमधील अक्षरांना मातृका मानून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे कदाचित तांत्रिक उपासनेत त्यातल्या बेचाळीस अक्षरांना उपासनेत मातृकांच्या , योगिनींच्या रूपाने पुजले जात असावे.चौसष्ठ, एक्यांऐंशी , बेचाळीस या संख्या तांत्रिक ग्रंथातील तपशीलावरूनच आल्या आहेत. 

योगिनींचे अंतरंग

कौला पंथाच्या अनेक ग्रंथांमध्ये योगिनी आणि यक्षिणी यांच्यामधील संबंध दर्शविला आहे. 'यक्षिणी' ही संकल्पना 'योगिनी' पेक्षाही जुनी आहे.वृक्षांवर राहणाऱ्या, रक्षक, सुपीकता, सुबत्ता यांचे रूप म्हणजे यक्षिणी. बारहूत, सांची येथे 'यक्षिणीं'ची (वृक्षाला धरून, फांद्यांना धरून उभी असलेली) शिल्पे आहेत, ज्यांना शालभंजिका म्हणतात. कौलार्नव तंत्रातही योगिनी वृक्षावर स्थित असतात असे नोंदले आहे. हे वृक्ष कुलवृक्ष आहेत. यांना तोडणे, त्यांच्या खाली राहणे, त्यांची पाने तोडणे निषेधार्ह आहे. हा संबंध अप्रत्यक्ष असला तरी जैन ग्रंथात मात्र प्रत्यक्ष संदर्भ आढळतात. यक्षिणी सुद्धा योगिनींप्रमाणे 'सिद्धी' दायिनी आहेत. आणि त्यांचा योगिनींशी असलेला संदर्भ हे दर्शवतो कि योगिनी या संकल्पनेचे मूळ प्राचीन आहे. 

तांत्रिक ग्रंथांत, योगिनींची निर्मिती आठ महत्वाच्या देवतांपासून झाली आहे, असे नोंदले आहे. या आठ देवता आठ भैरवांच्या पत्नी आहेत. डाकिनी, राकीनी, लाकीनी, काकीनी, साकिनी, हाकिनी, याकिनी आणि कुसुमा अश्या या आठ देवता. याच देवता शरीराच्या चक्रांवर स्थित आहेत असेही अनेक ग्रंथातून दर्शविले आहे. चौसष्ट योगिनींची अनेक नावं उपलब्ध आहेत. परंतु कुठच्याही मंदिरात ही नावं सारखी नाहीत. अनेक ग्रंथातून दर्शवलेली नावंही सारखी नाहीत. 

योगिनींच्या साधनेमागे मूळ ध्येय मोक्ष, जीवनमुक्ती असले तरी त्यांची साधना ही अनेक प्रकारच्या शाररिक, भौतिक सिद्धी मिळवण्यासाठी होत होती. तांत्रिक ग्रंथांतून या सिद्धिंची चर्चा होते. खुद्ध शिवाने या सिद्धी बहाल केल्या आहेत असे या ग्रंथांतून सांगितले गेले आहे. या आठ सिद्धी पतंजलीच्या योगिक सूत्रात आणि राजा भोज याच्या स्थापत्यग्रंथातही दिल्या आहेत. या सिद्धी आहेत , 'अनिमा' म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म होता येणे, असे होऊन अतिसूक्ष्म अणूच्या अंतरंगात प्रवेश करून सर्व गोष्टींचे मूळरूप जाणणे शक्य होते. त्याचे आणि सर्वाठायीं असलेल्या ऊर्जास्रोताचे ज्ञान होते. 'महिमा' म्हणजे प्रचंड होणे , ज्यामुळे अनंतव्याप्तीचे आकलन होते. 'लघिमा' म्हणजे वजनरहित होणे. या सिद्धीने शरीरापासून मुक्त होऊन संचारी स्वरूप प्राप्त करता येते. 'गरिमा' म्हणजे अतिस्थूलता प्राप्त होणे. 'प्रकाम्या' म्हणजे अशी इच्छाशक्ती प्राप्त होणे ज्याच्या बळावर कुठलेही मन, कुणीही काबूत येऊ शकते. 'ईशित्व' म्हणजे शरीर आणि मन यावरचा ताबा, स्वतःच्या आणि इतरांच्याही (सर्व जीवसृष्टीच्या) , 'वशित्व' म्हणजे भौतिक गोष्टींवरचे प्रभुत्व, जसे पाऊस, अग्नी , पर्वत इ.  
'कामवसायिता' म्हणजे ज्याची कामना करावी ते प्राप्त करता येणे. या व्यतिरिक्त तांत्रिक ग्रंथात योगिनींच्या इतर अमानुषी सिद्धींबद्धलही बरेच विवेचन आहे. हे सर्व एखाद्या जादुई जगातील जादुई गोष्टींपेक्षा कमी नाही. नकारात्मक गोष्टींबरोबर सकारात्मक गोष्टींच्या सिद्धीही प्राप्त होतात. जसे 'कवित्व मनोहरम' हि सिद्धी श्रेष्ठ काव्यनिर्मिती करण्याची आहे.  

पारंपरिक हिंदू पुराणांतही योगिनींच्या अद्भुत शक्तींची नोंद घेतली गेली आहे. स्कंदपुराणांत योगिनींबद्धल असलेल्या तपशिलात  त्यांच्या अनेक सिद्धींबद्धल माहिती दिली आहे. काही तांत्रिक ग्रंथात कोणत्याही सिद्धींची चर्चा केलेली नाही परंतु सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती, रोगनिवारणशक्ती अशी या योगिनीच्या उपासनेची फळं दर्शविली आहेत. काही योगिनीचक्रांच्या उपासनेतून सामर्थ्य(विशेषतः राजकीय, शस्त्र, सैन्य सामर्थ्य ) प्राप्त होते असेही उल्लेख आहेत, हि योगिनी चक्र त्या काळच्या अनेक राजा, राज्यसत्तांकडून उपासिली जात असावीत. जश्या या योगिनी सिद्धी प्राप्त करून देतात तश्या त्या क्रोधीत होऊन शापतात असेही उल्लेख अनेक ठिकाणी आहेत. त्यांच्या या गूढतेमूळेच, त्यांच्यासभोवताली असलेल्या गुप्ततेमूळे, अमानुषी तत्वांमुळेच पारंपरिक धार्मिक संस्कृतीपासून त्या दूर राहिल्या असाव्यात. त्यांच्याशी जोडलेल्या गुप्त उपासना, त्यांची निर्जन मंदिरे, काही योगिनींचे भयकारी स्वरूप यामुळेच गावातील इतर जनांच्या मनात त्यांच्याविषयी भीती , आकर्षक गूढता निर्माण झाली असेल. 

योगिनींची साधनादेखील गुप्त, गूढतापूर्ण आणि जहाल स्वरूपाची असते. मद्य, मांस, रक्त यांनी परिपूर्ण अशी ही साधना असते, जीला अनुसरणे साध्यासुध्याचे काम नाही. त्याचा अवलंब करणारे या घोर उपासनेचे गुरुच आणि कठोर साधना करणारे साधकच या प्रकारची साधना करत असत. यामध्ये शवसाधना हाही एक भाग होता. अणि मैथुन हे देखील या साधनेचे महत्वाचे अंग होते. या साधना अतिघोरी, रक्तरंजित आणि भय उत्पन्न करणाऱ्या, असामान्य वाटल्या तरी एक मात्र आहे कि अश्या साधना, उपासना या आदिम जीवनाचे एक अंग आहे. हे नाकारून चालणार नाही कि समाज आता सुसंकृत झाला असला तरी धार्मिक कार्यात बळी (sacrifice) हे आजही अत्यंत महत्वाचे अंग आहे. त्याचे स्वरूप सौम्य झाले असेल परंतु आजही symbolic स्वरूपात sacrifice होत आहेत. योगिनींच्या साधनेत त्या मंदिरांत खरोखर कुठच्या प्रकारांचा अवलंब केला जात होता हे समजणे कठीण आहे. पण त्याचे स्वरूप कठोर, जहाल होते एवढे मात्र खरे. काही योगिनींची नावेच इतकी भयावह आहेत जशी मांसप्रिया, रुधिरापायीनी. योगिनींची काही रूपेही शव घेतलेली, मुंडक्यांच्या माळा घातलेली(मुंडधारीणी) आहेत. 

या सर्व गोष्टींवरून हे ध्यानात येते की अतिसौन्दर्यपूर्ण, गूढ आणि दैवी मूर्ती असलेल्या योगिनींशी एकप्रकारची नकारात्मक शक्तीही जोडलेली आहे. 

क्रमश:

Thursday, 21 July 2016

खजुराहो अनुभव: चौसष्ट योगिनी : भाग २

'योगिनी' या शब्दाचे अर्थ तर बघितले पण चौसष्ट योगिनींच्या मंदिरातील 'योगिनी' म्हणजे कोण? तर ही 'योगिनी' म्हणजे योगेश्वरी. एका अश्या संप्रदायातील 'साधकांची, योग्यांची ईश्वरी/देवता. 'योगिनी' ही खरंतर एक संकल्पना आहे. (पतंजलीच्या योगाशी या संकल्पनेचा थेट संबंध नाही). 'योगिनी' या संकल्पनेचा प्रवास प्राचीन काळापासून सुरू झाला. आणि ही संकल्पना उत्तरोत्तर बदलत गेली, तिचे स्वरूप विस्तृत झाले. तिच्यात बदल झाले. तर काय आहे ही संकल्पना?

याला एक सरळ उत्तर नाही. योगिनी ही शक्तीचे रूप आहे. योगिनी ही देवता आहे की सर्वोच्च सामर्थ्य असलेली अमानुषी शक्तींनी युक्त मानुषी स्त्रीचे रूप आहे हे नक्की सांगता येणार नाही. मध्ययुगीन भारतात, सातव्या-आठव्या शतकापासून शैव आणि शाक्त पंथ वाढीस लागले होते, त्यांचा प्रसार होत होता आणि त्याचबरोबर त्यांच्या उपासकांची संख्याही वाढत होती. शैव म्हणजे शिव-पुरुष तत्व. शाक्त म्हणजे शक्ती/पार्वती/माया/सृष्टी -स्त्री तत्व. या शैव आणि शाक्त उपासनेचे एक मुख्य अंग आहे तंत्र उपासना किंवा तांत्रिक उपासना. चौथ्या-पाचव्या शतकात तांत्रिक उपासनाचा उगम होऊन त्या वाढीस लागल्या. 
'योगिनी' या संकल्पनेचे मूळ 'स्त्री तत्वाचा  तांत्रिक उपासनेत सहभाग' यात होते.  पण या संकल्पनेचे मूळ धार्मिक, ग्रामीण, आदिम शक्ती, आदिम कल्पनांतही आहे.

'योगिनी' या संकल्पनेमागचा स्त्री-शक्तीचा, स्त्री तत्वाचा विचार आणि त्याचा उगम त्याआधीच्या प्राचीन काळापासून होत होता. प्राचीन काळापासून स्त्री तत्वाची वेगवेगळ्या पद्धतीने उपासना होत आहे. सर्वात प्राचीन आहे ती 'मातृदेवता'. संततीप्राप्तीसाठी ह्या संकल्पनेची पूजा होत असे. ही संकल्पना इतकी प्राचीन आहे की ती चार-पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधूसंस्कृती आणि जगातील अन्य ठिकाणीही सापडते. त्यानंतरच्या काळात मातृदेवतेची रूपे बदलली. ती फक्त मातृदेवता राहिली नाही तर रक्षण करणारी, क्रोधित होऊन रोगराई पसरवणारी आणि प्रसन्न होऊन रोगराईचे निवारण करणारी, अनेक शक्तींनी युक्त आणि त्या शक्ती उपासकांना बहाल करणारी अशी तिची अनेक रूपे तयार झाली. ही रूपे तयार होण्यामागे मानवी मनात खोल दडलेल्या भीती कारणीभूत आहेत. तसेच त्या भयापासून मुक्ती, इच्छा, आकांक्षापूर्ती, संरक्षण हि देखील महत्वाची कारणे आहेत. आर्य लोक वेदिक संस्कृतीमध्ये जसे त्यांना भय वाटणाऱ्या abstract शक्तींना देव मानत, जसे वरुण, आकाश, अग्नी, अरण्य.  तसेच स्थानिक लोकसंस्कृतीने आपल्या भयापासून मुक्त होण्यासाठी , सुरक्षित वाटण्यासाठी त्या भयाचे रूपांतर देवतांत केले, जेणेकरून त्यांच्या उपासनातून त्यांची कृपादृष्टी राहावी आणि कोणतीही इजा त्यांनी करू नये. याची किती उदाहरणे अजूनही सापडतात. 'मरीआई', 'देवी' या small pox आजाराशी संबंधित देवता. विंचू दंशापासून वाचवण्यासाठी  झालेली कोलारम्मा, small pox ची आणखी एक देवी:शीतलादेवी. तश्याचप्रकारे काही मातृदेवतांची रूपे बदलून त्यांचीही उपासना आपल्या मुलांच्या स्वास्थ्यासाठी, त्यांच्या उदंड आयुष्यासाठी होऊ लागल्या.

याचबरोबर धन देणाऱ्या, गुप्त शक्ती , सिद्धी, प्राप्त करून  देणाऱ्या, रक्षण करणाऱ्या वृक्षदेवता, यक्ष-यक्षिणी, डाकिनी, शाकिनी अश्या संकल्पनासुद्धा निर्मित होत होत्या. त्यांचे रूप, स्वरूप प्रांतवार, भाषावार बदलते होते.
या  बदलत्या देवतात मग शक्ती संपादन करणाऱ्या, सामर्थ्य आणि इच्छा-आकांशा बहाल करणाऱ्या देवतांची देखील निर्मिती झाली. प्रत्येक प्रांत, तेथील आचार-विचार, सांस्कृतिक जडणघडण, समजुती, प्रथा यावरून त्या त्या प्रांतातील लोकसंस्कृतीने आपापल्या परीने देवता अस्तिस्त्वात आणल्या. अजूनही सगळीकडे पाहिले तर, शिव, विष्णू, राम, कृष्ण या पुरुष तत्वाच्या देवतांपेक्षा स्त्री-तत्वाच्या देवता अधिक आढळतील आणि गावोगावी ही ग्रामदैवतं महत्वाच्या देवतांपेक्षा अधिक पुजली जातात. कोरजाई, केळबाई, जरीमरी, कमळजा, भराडी, शितळादेवी अशी किती नावं घ्यावीत. 'योगिनी' या देवतांच्या रूपाच्या उत्पत्तीमागे अश्याच देवता आहेत का ज्या एका विशिष्ठ गोष्टीसाठी पुजल्या जात होत्या आणि नंतर त्यांचे परिवर्तन या 'योगिनी' मध्ये झाले? जसे निराकार,निरपेक्ष भक्ती करणारे मन होते आणि त्याच्याकडून पुजल्या जाणाऱ्या देवता होत्या तसेच वश करणारे,अपेक्षापूर्ती करून घेणारेही मनच होते ज्याकडून पुजल्या जाणाऱ्या देवता क्रूर, अमानुषी सिद्धी असलेल्या, संहारी, भयकारी होत्या. सकारात्मक आणि नकारात्मक अश्या दोन्ही टोकापर्यंत 'योगिनी' संकल्पनेचा प्रवास झाला आहे.

आपल्या भयाचे, सामर्थ्य, सत्ता, धन आणि अनेक भौतिक सुखांचे, इच्छा, आकांक्षांचे रूप घेऊन 'योगिनी' अस्तित्वात आल्या. त्यांच्या निर्मितीमागच्या स्रोतापर्यंत, उगमापर्यंत अनेक जणांनी जाण्याचा प्रयत्न केला.

अनेक चाणाक्ष, विद्वान पंडितांनी ग्रंथच्या ग्रंथ उपसून काढले आहेत शोध घेण्यासाठी की 'योगिनी' संकल्पनेचे मूळ कशात आहे. त्यांना जावे लागले ते प्राचीन ग्रंथ, पुराणं, तांत्रिक ग्रंथांच्या प्रती या सर्वातून. त्याचबरोबर प्राचीन साहित्य (कथा, नाटकं, गोष्टी, काव्य ) यातूनही सखोल शोध घ्यावा लागला. आणि त्यांच्या हाती आलेले अनेक संदर्भ चक्रावून टाकणारे होते, कारण सुसंगती होतीही आणि नव्हतीही. उदाहरणादाखल एक अतिशय रंजक अश्या गोष्टींचा ग्रंथ आहे 'कथासरित्सागर'. हा ग्रंथ सोमदेव नावाच्या शैव पंथाच्या माणसाने ११ व्या शतकात लिहिला.('बृहत्कथा' नावाच्या अतिशय मोठ्या ग्रंथापासूनच हा बनला आहे) यात अनेक गोष्टी आहेत ज्यात 'योगिनी' सदृश स्त्रिया आहेत, त्यांचा उल्लेख चेटकिणी, यक्षिणी, अत्यंत सामर्थ्यशाली सिद्धी प्राप्त असलेल्या स्त्रिया, वृक्षदेवता असा आहे. यांचा उल्लेखही यात काही वेळेला 'योगिनी' म्हणून होतो. अश्या मानवी witches बरोबर काही देवतांचा उल्लेखही 'योगिनी' असा केला आहे. या प्रकारच्या देवता, शक्ती, स्त्रिया जैन आणि बुद्धिस्ट ग्रंथातही आढळतात. नंतरच्या काळात तर तांत्रिक बुद्धिझम ही जी बुद्धिझमची शाखा निर्माण झाली त्यातही 'योगिनी' संकल्पनेवर आधारित 'डाकिनी' नावाच्या देवता अस्तित्वात आल्या. 'जातककथा' या बौद्ध साहित्यातही योगिनी सदृश 'यक्षिणी'/'डाकिनी' आहेत. जैन संप्रदायातही त्यांच्या वाङ्मयात यक्षिणी आढळतात. या साहित्यात सापडणाऱ्या योगिनी सदृश देवता मंदिरातील तांत्रिक उपासनेच्या 'योगिनी' संकप्लनेशी कितपत संलग्न आहेत हे सांगणे तितके सोपे नाही. असेही असू शकते की त्या काळातील होणाऱ्या तांत्रिक उपासनांचे संदर्भ पकडून, त्यांचे रूपांतर काल्पनिक गोष्टीत केले असावे.

मनाचे जसे सात्विक रूप, तसेच राजसी, तामसी रूपही आहे. कुठे दयाभाव आहे तर कुठे संहारही आहे. मनाच्या कल्पकतेने निर्माण केलेल्या विश्वात अंतिम ज्ञान, मोक्ष,जीवनमुक्ती, eternal bliss किंवा जे काही ज्याचा सुप्त ध्यास मानवी मनाला असतो त्यावरूनच ते साधण्याचे अनेक मार्गही माणसाच्या मनाने कल्पिले. काही मार्ग सात्त्विकतेचे काही तामसी. त्यातूनच पारंपरिक (orthodox ) जे जे काही आहे त्याविरुद्ध जाऊन आपली वेगेळी वाट तांत्रिक उपासनेने तयार केली. त्याबद्धल अधिक बोलणे उचित नाही कारण माझे त्यातले ज्ञान अत्यल्प आहे. पण योगिनी हि संकल्पना मूळ अनेक स्रोतापासून, छोट्या झऱ्यांपासून ते झरे एकत्र होऊन , वाहणारी एक मोठी नदी झाली. तिचा उगम शोधणे तसे फारच खडतर आहे. आणि नक्की एक असा उगम तिचा नाही.

मूळ मातृदेवता या संकल्पनेपासून ते अनेक छोट्या सामर्थ्याच्या देवता, ग्रामदेवता, आदिशक्तीदेवता, शक्तीदायिनी, इच्छापूर्ती करणाऱ्या, संहार करणाऱ्या अश्या अनेक रूपांनी प्रवास करत 'शक्ती' रूपातील 'योगिनी' हि संकल्पना मंदिरातील 'योगिनी' च्या मूर्ती पर्यंत आली. योगिनी संकल्पनेचे मूळ खूप खोलवर गेले आहे आणि वाढणारा योगिनी वृक्ष अनेक शाखांतून, अनेक बीजातून अनेक पंथांतून आकार घेऊ लागला, पुढे पुढे बौद्ध तांत्रिक साधनेतही त्याचा सहभाग झाला. एवढेच काय वेदिक हिंदू धर्मातही त्याला स्थान मिळाले. अग्नीपुराण, कालिकापुराण आणि स्कंदपुराणात या योगिनींच्या उपासनेवर संदर्भ आहेत. ललितासहस्रनाम या देवीमाहात्म्यातही 'योगिनीं' चा समावेश आहे.

पण खजुराहो आणि इतर 'योगिनी' च्या मंदिरांबाबत बोलायचे झाल्यास त्यातल्या 'योगिनी' मुख्यत्वे तांत्रिक उपासनेच्याच भाग होत्या. आणि ग्रामीण देवतांपासून, ग्रामीण कल्ट पासून तांत्रिक उपासने पर्यंत त्यांची वाटचाल झाली होती. तांत्रिक उपासकांच्या पंथात कौला (कुल/कुळ) म्हणून जो उपपंथ आहे त्यासंबंधीच्या कल्ट्स मध्ये 'योगिनी उपासना' येते.  आणि ही मंदिरं  बांधण्यासाठी अनुदान देणारे राजे-राजसत्ता तांत्रिक उपासक होते. तांत्रिक उपासना ही वैदिक उपासनेपेक्षा अतिशय वेगळी आहे. पारंपरिक पद्धत असे  सांगते की अध्यात्मिक उन्नती संन्यासी, विरक्त भाव ठेवून होते. सर्व मोह, पाश यांचा अव्हेर करूनच माणूस परमपदाला पोहोचतो. तांत्रिक 'योगिनी' उपासना  याच्या अगदी उलट आहे. तंत्र आणि तांत्रिझम याबद्धल मी बोलायला असमर्थच आहे कारण तो खूप  मोठा विषय आहे आणि  त्याविषयी मला काहीही ज्ञान नाही. 'योगिनी' मंदिराच्या अनुषंगाने त्याचा संदर्भ टाळता येत  नाही कारण या 'योगिनी' मंदिराच्या मूळाशी तांत्रिक उपासनाच मुख्यत्वे आहे, त्यामुळे त्या विषयाच्या काठाकाठाने जावे लागेल. तांत्रिक उपासनेत जे काही पारंपरिक उपासनेत गुणग्राह्य, आणि महत्वाचे मानले जाते ते निषिद्ध मानून अंत्यंत वेगळ्या पद्धतीने शिव-शक्ती या दोन वैश्विक ताकदींची उपासना केली जाते. पारंपरिक उपासना जे निषिद्ध मानते त्यापैकी अनेक गोष्टींचा अवलंब तांत्रिक साधनेत होतो. उपासनेतल्या विधीत मत्स्य, मांस, मद्य, मुद्रा आणि मैथुन यांचा अवलंब होतो. उपासना ज्या शक्तींची होते त्या शक्तींचे स्वरूप रौद्र, संहारी असते. उपासना स्थळेही पारंपारिकरित्या निषिद्ध मानली गेलेली असतात. अनेक अद्भुत शक्ती, सिद्धी संपादन करून जीवनमुक्त होणे, transcendence , मोक्ष प्राप्त होणे हा या उपासनेचा मुख्य हेतू. कालांतराने यातील मोक्ष, मुक्ती हा भाग मागे पडून फक्त सिद्धी प्राप्त करणे हाही काही तंत्र उपासकांचा उद्देश बनला. 'योगिनी' ची उपासना हि देखील मुख्यत्वे अनेक शक्ती, सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठीच होत असे. परंतु तेवढेच त्यांचे महत्व नव्हते, त्यांचे मूळ उपसानेचे महत्व transcendence, जीवनमुक्तता हे होते. वैश्विक शक्तींशी एकरूप होण्याच्या त्या साधनं होत्या. त्यांच्या साधनेतून वैश्विकतेत  विलीन होणे हाच मूळ हेतू असावा. 

तांत्रिक उपासनेच्या पद्धती, विधी या गुह्य, गुप्त स्वरूपाच्या होत्या. तांत्रिक ग्रंथांमधील त्याचे संदर्भ, विधींचे स्पष्टीकरण, विवेचन हे गुप्त भाषेत आहे. या भाषेला 'संध्याभाषा' असे म्हणतात. उद्देश हाच की जो याचा साधक नाही त्याला या साधनांचा अर्थ कळू नये. 'योगिनीं'ची मंदिरं देखील निर्जन, गावकुसाबाहेरच्या ठिकाणी, मुख्यत्वे टेकडीवर बांधली गेली. खजुराहो मधील मंदिर मात्र बऱ्यापैकी मंदिरांच्या आसपास होते. (आता ते निर्जन, एका बाजूला वाटते, पण तसे ते त्या काळात नसावे कारण खजुराहो मध्ये ८५ मंदिरं होती. त्यामूळे येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर या समूहातच होते. ) याला कारण असे की खजुराहोची मंदिरं बांधणारे 'चंदेल' राजे हे स्वतः शैव -शाक्त तांत्रिक पंथाचे उपासक होते. भेडाघाट येथील मंदिर देखील अतिशय महत्वाच्या ठिकाणी, नर्मदेच्या घाटावरच आहे, हेही मंदिर 'कालचुरी' राजांनी बांधले होते. त्यामुळे असे म्हणता येऊ शकते की जिथे राजसत्ता तांत्रिक उपासक होती तिथले शहर तांत्रिक उपासना आणि उपासकांना आश्रय देणारे होते आणि त्या ठिकाणी ही मंदिरे उघडपणे धार्मिक कार्याचा भाग बनली होती.
 
नवव्या दहाव्या शतकात 'योगिनी' उपासना फक्त वैयक्तिक स्वरूपाचीच राहिली नाही आणि त्याला संप्रदायाचे स्वरूप आले. त्यात धार्मिक आणि राजकीय रंगही मिसळले गेले. राजे राजसत्ता मिळवण्यासाठी, सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी या उपासनांचे भोक्ते झाले. ज्या प्रकारची सिद्धी हवी, जे सामर्थ्य हवे, जी इच्छा पुरी व्हावी त्याला अनुसरून या देवता त्या त्या मंदिरात स्थापित झाल्या. मुळात या सिद्धी अश्या योग्याला विश्वशक्तीच्या जवळ नेण्यासाठी, एकरूप होण्यासाठी होत्या, परंतु या सिद्धी आपल्या सत्ता-सामर्थ्य वाढवण्यासाठी, आणि ऐहिक सुखांसाठी राजकीय पार्शवभूमीवर या उपासना exploit केल्या गेल्या असाव्यात.

अनेक तांत्रिक ग्रंथांमध्ये या योगिनींच्या साधनेबद्धल आणि त्याच्या वर्तुळाबद्धल माहिती आहे. त्यांच्या संख्येबद्धलही. शाक्त उपासना संप्रदायातील 'कौला'(कौला म्हणजे कुळ(clan) या उपसंप्रदायाचे ग्रंथ 'कौलार्णव' आणि 'कौलाज्ञाननिर्णय' योगिनींच्या उपासनेविषयी माहीत सांगतात. परंतु अश्या उपासना अतिशय गुह्य संध्याभाषेत असून फक्त गुरुद्वारेच त्याचे ज्ञान प्राप्त होतु शकते.

योगिनींचे वर्तुळ आणि त्याची उपासना हेही या मध्ययुगीन काळातील तांत्रिक उपासनेचे प्रमुख अंग बनले. हेही अत्यंत विशेषपूर्ण आहे की ठिकठिकाणच्या 'योगिनी' मंदिरातील योगिनी सारख्या रूपाच्या नाहीत. त्यांची संख्या सारखी नाही, त्यांची नावेही सारखी नाहीत. फक्त त्याचे एका ग्रुप मध्ये असणे महत्वाचे आहे. एक गट करून, एकजूट करून त्या राहतात. मग त्यांचे अस्तित्व सुटेसुटे आकळावे की एका गटामध्ये? त्या 'योगिनी' ना एकएकटे व्यक्तिमत्व आहे का? की त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे सार त्याच्या एकत्रित  असण्यात आहे? त्यांच्या शिल्पातून त्याच्याविषयी जाणावे तेवढे थोडेच आहे कुठेकुठे त्या सौम्य स्वरूपात दिसतात, कुठे रौद्र, कुठे भयानक तर कुठे बीभत्स स्वरूपातही दिसतात. ज्या गोष्टी पारंपरिक समाजाने repulsive, socially subversive ठरवल्या, त्यांचा पाठपुरावा या करतात. हि शिल्पंही अशीच. खजुराहोच्या इतर मंदिरात दिसणारी शिल्पे शांत, सात्विक, शृंगार रसातील आहेत. पण 'योगिनीं'च्या मंदिरातली  शिल्पे रौद्र , भयानक , बीभत्स रूपाचं दर्शन घडवतात. 

माझ्या मनात विचार येतो की आज जर खजुराहोच्या 'चौसष्ट योगिनीं'च्या मंदिरातील योगिनींची शिल्पे अस्तित्वात असती तर ती कशी असली असती? कुठे उडून गेल्या आहेत या योगिनी? का भव्य आभाळात संचार करण्यासाठी निघून गेल्या आहेत? कुणीही नसताना त्या परत आपल्या रिकाम्या खोरणात परतत असतील का?

क्रमश: