Thursday 21 July 2016

खजुराहो अनुभव: चौसष्ट योगिनी : भाग २

'योगिनी' या शब्दाचे अर्थ तर बघितले पण चौसष्ट योगिनींच्या मंदिरातील 'योगिनी' म्हणजे कोण? तर ही 'योगिनी' म्हणजे योगेश्वरी. एका अश्या संप्रदायातील 'साधकांची, योग्यांची ईश्वरी/देवता. 'योगिनी' ही खरंतर एक संकल्पना आहे. (पतंजलीच्या योगाशी या संकल्पनेचा थेट संबंध नाही). 'योगिनी' या संकल्पनेचा प्रवास प्राचीन काळापासून सुरू झाला. आणि ही संकल्पना उत्तरोत्तर बदलत गेली, तिचे स्वरूप विस्तृत झाले. तिच्यात बदल झाले. तर काय आहे ही संकल्पना?

याला एक सरळ उत्तर नाही. योगिनी ही शक्तीचे रूप आहे. योगिनी ही देवता आहे की सर्वोच्च सामर्थ्य असलेली अमानुषी शक्तींनी युक्त मानुषी स्त्रीचे रूप आहे हे नक्की सांगता येणार नाही. मध्ययुगीन भारतात, सातव्या-आठव्या शतकापासून शैव आणि शाक्त पंथ वाढीस लागले होते, त्यांचा प्रसार होत होता आणि त्याचबरोबर त्यांच्या उपासकांची संख्याही वाढत होती. शैव म्हणजे शिव-पुरुष तत्व. शाक्त म्हणजे शक्ती/पार्वती/माया/सृष्टी -स्त्री तत्व. या शैव आणि शाक्त उपासनेचे एक मुख्य अंग आहे तंत्र उपासना किंवा तांत्रिक उपासना. चौथ्या-पाचव्या शतकात तांत्रिक उपासनाचा उगम होऊन त्या वाढीस लागल्या. 
'योगिनी' या संकल्पनेचे मूळ 'स्त्री तत्वाचा  तांत्रिक उपासनेत सहभाग' यात होते.  पण या संकल्पनेचे मूळ धार्मिक, ग्रामीण, आदिम शक्ती, आदिम कल्पनांतही आहे.

'योगिनी' या संकल्पनेमागचा स्त्री-शक्तीचा, स्त्री तत्वाचा विचार आणि त्याचा उगम त्याआधीच्या प्राचीन काळापासून होत होता. प्राचीन काळापासून स्त्री तत्वाची वेगवेगळ्या पद्धतीने उपासना होत आहे. सर्वात प्राचीन आहे ती 'मातृदेवता'. संततीप्राप्तीसाठी ह्या संकल्पनेची पूजा होत असे. ही संकल्पना इतकी प्राचीन आहे की ती चार-पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधूसंस्कृती आणि जगातील अन्य ठिकाणीही सापडते. त्यानंतरच्या काळात मातृदेवतेची रूपे बदलली. ती फक्त मातृदेवता राहिली नाही तर रक्षण करणारी, क्रोधित होऊन रोगराई पसरवणारी आणि प्रसन्न होऊन रोगराईचे निवारण करणारी, अनेक शक्तींनी युक्त आणि त्या शक्ती उपासकांना बहाल करणारी अशी तिची अनेक रूपे तयार झाली. ही रूपे तयार होण्यामागे मानवी मनात खोल दडलेल्या भीती कारणीभूत आहेत. तसेच त्या भयापासून मुक्ती, इच्छा, आकांक्षापूर्ती, संरक्षण हि देखील महत्वाची कारणे आहेत. आर्य लोक वेदिक संस्कृतीमध्ये जसे त्यांना भय वाटणाऱ्या abstract शक्तींना देव मानत, जसे वरुण, आकाश, अग्नी, अरण्य.  तसेच स्थानिक लोकसंस्कृतीने आपल्या भयापासून मुक्त होण्यासाठी , सुरक्षित वाटण्यासाठी त्या भयाचे रूपांतर देवतांत केले, जेणेकरून त्यांच्या उपासनातून त्यांची कृपादृष्टी राहावी आणि कोणतीही इजा त्यांनी करू नये. याची किती उदाहरणे अजूनही सापडतात. 'मरीआई', 'देवी' या small pox आजाराशी संबंधित देवता. विंचू दंशापासून वाचवण्यासाठी  झालेली कोलारम्मा, small pox ची आणखी एक देवी:शीतलादेवी. तश्याचप्रकारे काही मातृदेवतांची रूपे बदलून त्यांचीही उपासना आपल्या मुलांच्या स्वास्थ्यासाठी, त्यांच्या उदंड आयुष्यासाठी होऊ लागल्या.

याचबरोबर धन देणाऱ्या, गुप्त शक्ती , सिद्धी, प्राप्त करून  देणाऱ्या, रक्षण करणाऱ्या वृक्षदेवता, यक्ष-यक्षिणी, डाकिनी, शाकिनी अश्या संकल्पनासुद्धा निर्मित होत होत्या. त्यांचे रूप, स्वरूप प्रांतवार, भाषावार बदलते होते.
या  बदलत्या देवतात मग शक्ती संपादन करणाऱ्या, सामर्थ्य आणि इच्छा-आकांशा बहाल करणाऱ्या देवतांची देखील निर्मिती झाली. प्रत्येक प्रांत, तेथील आचार-विचार, सांस्कृतिक जडणघडण, समजुती, प्रथा यावरून त्या त्या प्रांतातील लोकसंस्कृतीने आपापल्या परीने देवता अस्तिस्त्वात आणल्या. अजूनही सगळीकडे पाहिले तर, शिव, विष्णू, राम, कृष्ण या पुरुष तत्वाच्या देवतांपेक्षा स्त्री-तत्वाच्या देवता अधिक आढळतील आणि गावोगावी ही ग्रामदैवतं महत्वाच्या देवतांपेक्षा अधिक पुजली जातात. कोरजाई, केळबाई, जरीमरी, कमळजा, भराडी, शितळादेवी अशी किती नावं घ्यावीत. 'योगिनी' या देवतांच्या रूपाच्या उत्पत्तीमागे अश्याच देवता आहेत का ज्या एका विशिष्ठ गोष्टीसाठी पुजल्या जात होत्या आणि नंतर त्यांचे परिवर्तन या 'योगिनी' मध्ये झाले? जसे निराकार,निरपेक्ष भक्ती करणारे मन होते आणि त्याच्याकडून पुजल्या जाणाऱ्या देवता होत्या तसेच वश करणारे,अपेक्षापूर्ती करून घेणारेही मनच होते ज्याकडून पुजल्या जाणाऱ्या देवता क्रूर, अमानुषी सिद्धी असलेल्या, संहारी, भयकारी होत्या. सकारात्मक आणि नकारात्मक अश्या दोन्ही टोकापर्यंत 'योगिनी' संकल्पनेचा प्रवास झाला आहे.

आपल्या भयाचे, सामर्थ्य, सत्ता, धन आणि अनेक भौतिक सुखांचे, इच्छा, आकांक्षांचे रूप घेऊन 'योगिनी' अस्तित्वात आल्या. त्यांच्या निर्मितीमागच्या स्रोतापर्यंत, उगमापर्यंत अनेक जणांनी जाण्याचा प्रयत्न केला.

अनेक चाणाक्ष, विद्वान पंडितांनी ग्रंथच्या ग्रंथ उपसून काढले आहेत शोध घेण्यासाठी की 'योगिनी' संकल्पनेचे मूळ कशात आहे. त्यांना जावे लागले ते प्राचीन ग्रंथ, पुराणं, तांत्रिक ग्रंथांच्या प्रती या सर्वातून. त्याचबरोबर प्राचीन साहित्य (कथा, नाटकं, गोष्टी, काव्य ) यातूनही सखोल शोध घ्यावा लागला. आणि त्यांच्या हाती आलेले अनेक संदर्भ चक्रावून टाकणारे होते, कारण सुसंगती होतीही आणि नव्हतीही. उदाहरणादाखल एक अतिशय रंजक अश्या गोष्टींचा ग्रंथ आहे 'कथासरित्सागर'. हा ग्रंथ सोमदेव नावाच्या शैव पंथाच्या माणसाने ११ व्या शतकात लिहिला.('बृहत्कथा' नावाच्या अतिशय मोठ्या ग्रंथापासूनच हा बनला आहे) यात अनेक गोष्टी आहेत ज्यात 'योगिनी' सदृश स्त्रिया आहेत, त्यांचा उल्लेख चेटकिणी, यक्षिणी, अत्यंत सामर्थ्यशाली सिद्धी प्राप्त असलेल्या स्त्रिया, वृक्षदेवता असा आहे. यांचा उल्लेखही यात काही वेळेला 'योगिनी' म्हणून होतो. अश्या मानवी witches बरोबर काही देवतांचा उल्लेखही 'योगिनी' असा केला आहे. या प्रकारच्या देवता, शक्ती, स्त्रिया जैन आणि बुद्धिस्ट ग्रंथातही आढळतात. नंतरच्या काळात तर तांत्रिक बुद्धिझम ही जी बुद्धिझमची शाखा निर्माण झाली त्यातही 'योगिनी' संकल्पनेवर आधारित 'डाकिनी' नावाच्या देवता अस्तित्वात आल्या. 'जातककथा' या बौद्ध साहित्यातही योगिनी सदृश 'यक्षिणी'/'डाकिनी' आहेत. जैन संप्रदायातही त्यांच्या वाङ्मयात यक्षिणी आढळतात. या साहित्यात सापडणाऱ्या योगिनी सदृश देवता मंदिरातील तांत्रिक उपासनेच्या 'योगिनी' संकप्लनेशी कितपत संलग्न आहेत हे सांगणे तितके सोपे नाही. असेही असू शकते की त्या काळातील होणाऱ्या तांत्रिक उपासनांचे संदर्भ पकडून, त्यांचे रूपांतर काल्पनिक गोष्टीत केले असावे.

मनाचे जसे सात्विक रूप, तसेच राजसी, तामसी रूपही आहे. कुठे दयाभाव आहे तर कुठे संहारही आहे. मनाच्या कल्पकतेने निर्माण केलेल्या विश्वात अंतिम ज्ञान, मोक्ष,जीवनमुक्ती, eternal bliss किंवा जे काही ज्याचा सुप्त ध्यास मानवी मनाला असतो त्यावरूनच ते साधण्याचे अनेक मार्गही माणसाच्या मनाने कल्पिले. काही मार्ग सात्त्विकतेचे काही तामसी. त्यातूनच पारंपरिक (orthodox ) जे जे काही आहे त्याविरुद्ध जाऊन आपली वेगेळी वाट तांत्रिक उपासनेने तयार केली. त्याबद्धल अधिक बोलणे उचित नाही कारण माझे त्यातले ज्ञान अत्यल्प आहे. पण योगिनी हि संकल्पना मूळ अनेक स्रोतापासून, छोट्या झऱ्यांपासून ते झरे एकत्र होऊन , वाहणारी एक मोठी नदी झाली. तिचा उगम शोधणे तसे फारच खडतर आहे. आणि नक्की एक असा उगम तिचा नाही.

मूळ मातृदेवता या संकल्पनेपासून ते अनेक छोट्या सामर्थ्याच्या देवता, ग्रामदेवता, आदिशक्तीदेवता, शक्तीदायिनी, इच्छापूर्ती करणाऱ्या, संहार करणाऱ्या अश्या अनेक रूपांनी प्रवास करत 'शक्ती' रूपातील 'योगिनी' हि संकल्पना मंदिरातील 'योगिनी' च्या मूर्ती पर्यंत आली. योगिनी संकल्पनेचे मूळ खूप खोलवर गेले आहे आणि वाढणारा योगिनी वृक्ष अनेक शाखांतून, अनेक बीजातून अनेक पंथांतून आकार घेऊ लागला, पुढे पुढे बौद्ध तांत्रिक साधनेतही त्याचा सहभाग झाला. एवढेच काय वेदिक हिंदू धर्मातही त्याला स्थान मिळाले. अग्नीपुराण, कालिकापुराण आणि स्कंदपुराणात या योगिनींच्या उपासनेवर संदर्भ आहेत. ललितासहस्रनाम या देवीमाहात्म्यातही 'योगिनीं' चा समावेश आहे.

पण खजुराहो आणि इतर 'योगिनी' च्या मंदिरांबाबत बोलायचे झाल्यास त्यातल्या 'योगिनी' मुख्यत्वे तांत्रिक उपासनेच्याच भाग होत्या. आणि ग्रामीण देवतांपासून, ग्रामीण कल्ट पासून तांत्रिक उपासने पर्यंत त्यांची वाटचाल झाली होती. तांत्रिक उपासकांच्या पंथात कौला (कुल/कुळ) म्हणून जो उपपंथ आहे त्यासंबंधीच्या कल्ट्स मध्ये 'योगिनी उपासना' येते.  आणि ही मंदिरं  बांधण्यासाठी अनुदान देणारे राजे-राजसत्ता तांत्रिक उपासक होते. तांत्रिक उपासना ही वैदिक उपासनेपेक्षा अतिशय वेगळी आहे. पारंपरिक पद्धत असे  सांगते की अध्यात्मिक उन्नती संन्यासी, विरक्त भाव ठेवून होते. सर्व मोह, पाश यांचा अव्हेर करूनच माणूस परमपदाला पोहोचतो. तांत्रिक 'योगिनी' उपासना  याच्या अगदी उलट आहे. तंत्र आणि तांत्रिझम याबद्धल मी बोलायला असमर्थच आहे कारण तो खूप  मोठा विषय आहे आणि  त्याविषयी मला काहीही ज्ञान नाही. 'योगिनी' मंदिराच्या अनुषंगाने त्याचा संदर्भ टाळता येत  नाही कारण या 'योगिनी' मंदिराच्या मूळाशी तांत्रिक उपासनाच मुख्यत्वे आहे, त्यामुळे त्या विषयाच्या काठाकाठाने जावे लागेल. तांत्रिक उपासनेत जे काही पारंपरिक उपासनेत गुणग्राह्य, आणि महत्वाचे मानले जाते ते निषिद्ध मानून अंत्यंत वेगळ्या पद्धतीने शिव-शक्ती या दोन वैश्विक ताकदींची उपासना केली जाते. पारंपरिक उपासना जे निषिद्ध मानते त्यापैकी अनेक गोष्टींचा अवलंब तांत्रिक साधनेत होतो. उपासनेतल्या विधीत मत्स्य, मांस, मद्य, मुद्रा आणि मैथुन यांचा अवलंब होतो. उपासना ज्या शक्तींची होते त्या शक्तींचे स्वरूप रौद्र, संहारी असते. उपासना स्थळेही पारंपारिकरित्या निषिद्ध मानली गेलेली असतात. अनेक अद्भुत शक्ती, सिद्धी संपादन करून जीवनमुक्त होणे, transcendence , मोक्ष प्राप्त होणे हा या उपासनेचा मुख्य हेतू. कालांतराने यातील मोक्ष, मुक्ती हा भाग मागे पडून फक्त सिद्धी प्राप्त करणे हाही काही तंत्र उपासकांचा उद्देश बनला. 'योगिनी' ची उपासना हि देखील मुख्यत्वे अनेक शक्ती, सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठीच होत असे. परंतु तेवढेच त्यांचे महत्व नव्हते, त्यांचे मूळ उपसानेचे महत्व transcendence, जीवनमुक्तता हे होते. वैश्विक शक्तींशी एकरूप होण्याच्या त्या साधनं होत्या. त्यांच्या साधनेतून वैश्विकतेत  विलीन होणे हाच मूळ हेतू असावा. 

तांत्रिक उपासनेच्या पद्धती, विधी या गुह्य, गुप्त स्वरूपाच्या होत्या. तांत्रिक ग्रंथांमधील त्याचे संदर्भ, विधींचे स्पष्टीकरण, विवेचन हे गुप्त भाषेत आहे. या भाषेला 'संध्याभाषा' असे म्हणतात. उद्देश हाच की जो याचा साधक नाही त्याला या साधनांचा अर्थ कळू नये. 'योगिनीं'ची मंदिरं देखील निर्जन, गावकुसाबाहेरच्या ठिकाणी, मुख्यत्वे टेकडीवर बांधली गेली. खजुराहो मधील मंदिर मात्र बऱ्यापैकी मंदिरांच्या आसपास होते. (आता ते निर्जन, एका बाजूला वाटते, पण तसे ते त्या काळात नसावे कारण खजुराहो मध्ये ८५ मंदिरं होती. त्यामूळे येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर या समूहातच होते. ) याला कारण असे की खजुराहोची मंदिरं बांधणारे 'चंदेल' राजे हे स्वतः शैव -शाक्त तांत्रिक पंथाचे उपासक होते. भेडाघाट येथील मंदिर देखील अतिशय महत्वाच्या ठिकाणी, नर्मदेच्या घाटावरच आहे, हेही मंदिर 'कालचुरी' राजांनी बांधले होते. त्यामुळे असे म्हणता येऊ शकते की जिथे राजसत्ता तांत्रिक उपासक होती तिथले शहर तांत्रिक उपासना आणि उपासकांना आश्रय देणारे होते आणि त्या ठिकाणी ही मंदिरे उघडपणे धार्मिक कार्याचा भाग बनली होती.
 
नवव्या दहाव्या शतकात 'योगिनी' उपासना फक्त वैयक्तिक स्वरूपाचीच राहिली नाही आणि त्याला संप्रदायाचे स्वरूप आले. त्यात धार्मिक आणि राजकीय रंगही मिसळले गेले. राजे राजसत्ता मिळवण्यासाठी, सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी या उपासनांचे भोक्ते झाले. ज्या प्रकारची सिद्धी हवी, जे सामर्थ्य हवे, जी इच्छा पुरी व्हावी त्याला अनुसरून या देवता त्या त्या मंदिरात स्थापित झाल्या. मुळात या सिद्धी अश्या योग्याला विश्वशक्तीच्या जवळ नेण्यासाठी, एकरूप होण्यासाठी होत्या, परंतु या सिद्धी आपल्या सत्ता-सामर्थ्य वाढवण्यासाठी, आणि ऐहिक सुखांसाठी राजकीय पार्शवभूमीवर या उपासना exploit केल्या गेल्या असाव्यात.

अनेक तांत्रिक ग्रंथांमध्ये या योगिनींच्या साधनेबद्धल आणि त्याच्या वर्तुळाबद्धल माहिती आहे. त्यांच्या संख्येबद्धलही. शाक्त उपासना संप्रदायातील 'कौला'(कौला म्हणजे कुळ(clan) या उपसंप्रदायाचे ग्रंथ 'कौलार्णव' आणि 'कौलाज्ञाननिर्णय' योगिनींच्या उपासनेविषयी माहीत सांगतात. परंतु अश्या उपासना अतिशय गुह्य संध्याभाषेत असून फक्त गुरुद्वारेच त्याचे ज्ञान प्राप्त होतु शकते.

योगिनींचे वर्तुळ आणि त्याची उपासना हेही या मध्ययुगीन काळातील तांत्रिक उपासनेचे प्रमुख अंग बनले. हेही अत्यंत विशेषपूर्ण आहे की ठिकठिकाणच्या 'योगिनी' मंदिरातील योगिनी सारख्या रूपाच्या नाहीत. त्यांची संख्या सारखी नाही, त्यांची नावेही सारखी नाहीत. फक्त त्याचे एका ग्रुप मध्ये असणे महत्वाचे आहे. एक गट करून, एकजूट करून त्या राहतात. मग त्यांचे अस्तित्व सुटेसुटे आकळावे की एका गटामध्ये? त्या 'योगिनी' ना एकएकटे व्यक्तिमत्व आहे का? की त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे सार त्याच्या एकत्रित  असण्यात आहे? त्यांच्या शिल्पातून त्याच्याविषयी जाणावे तेवढे थोडेच आहे कुठेकुठे त्या सौम्य स्वरूपात दिसतात, कुठे रौद्र, कुठे भयानक तर कुठे बीभत्स स्वरूपातही दिसतात. ज्या गोष्टी पारंपरिक समाजाने repulsive, socially subversive ठरवल्या, त्यांचा पाठपुरावा या करतात. हि शिल्पंही अशीच. खजुराहोच्या इतर मंदिरात दिसणारी शिल्पे शांत, सात्विक, शृंगार रसातील आहेत. पण 'योगिनीं'च्या मंदिरातली  शिल्पे रौद्र , भयानक , बीभत्स रूपाचं दर्शन घडवतात. 

माझ्या मनात विचार येतो की आज जर खजुराहोच्या 'चौसष्ट योगिनीं'च्या मंदिरातील योगिनींची शिल्पे अस्तित्वात असती तर ती कशी असली असती? कुठे उडून गेल्या आहेत या योगिनी? का भव्य आभाळात संचार करण्यासाठी निघून गेल्या आहेत? कुणीही नसताना त्या परत आपल्या रिकाम्या खोरणात परतत असतील का?

क्रमश:

No comments:

Post a Comment