Tuesday 19 July 2016

मांजर अनुभव



१. 'आमचं नसलेलं' मांजर

मी पाचवी-सहावीत असताना आमच्याकडे एक मांजर होतं. त्याला नाव असं काहीच नव्हतं. 'मांजर' हेच नाव. महत्वाचं म्हणजे ते आमचं नव्हतं. आमच्या जवळ राहणाऱ्या एका शेजाऱ्यांचं ते मांजर होतं. अनेकदा त्याच्या मागे लागून मी त्याला आमच्या घरी आणण्याचा प्रयत्न केला, पण ते कधीही आलं नाही. पांढरं-शुभ्र, आणि अतिशय रागीट असं ते मांजर होतं. त्याच्याशी जास्त जवळीक केली तर ते डावली मारायलाही मागेपुढे बघायचं नाही. त्याच्याशी सलगी करणाऱ्या प्रत्यकाकडे तुच्छतेने बघत ते स्वतःच्या मनानेच इकडेतिकडे संचार करी, पण आमच्या घरात किंवा घराच्या आवारातही कधी चुकूनही त्याने पाऊल ठेवलं नव्हतं. पण एके दिवशी ते सकाळी आमच्या घरी आलं. त्याच्या आधल्या दिवशी माझ्या आजोबांची पुण्यतिथी होती. त्यांना जाऊन एक वर्ष झालं होतं. त्याबद्धल आईवडील गावी गेले होते. आम्ही त्या शेजाऱ्यांकडेच थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते सकाळी घरी आलं तेव्हा दार उघडताच कुठूनसे ते मांजरही आमच्याबरोबर घरात आलं. आम्हाला त्याच्या येण्याचे आश्चर्यच वाटलं, पण आलं असेल आमच्या मागून असं वाटून आम्ही त्याला घरात घेतलं, दूध घातलं, त्यानंतर ते आमच्या घरीच राहिलं, परत कधीही चुकूनसुद्धा त्या शेजाऱ्यांच्या घरी त्याने पाऊल ठेवलं नाही. यात मला काहीही गूढ सुचवायचं नाहीये, पण त्याचं  असं येऊन आमच्याचकडे राहणे अतिशय विचित्र होतं एवढे मात्र खरं. 

त्याच्या काही सवयी अतिशय कोड्यात टाकणाऱ्या होत्या. जसं त्याला जास्त जवळीक आवडत नसे, त्याला अंजारलं-गोंजारलं तर ते नख्या काढे आणि फाटकन डावली मारी. एक उंदीर, एक पाल त्याने घरात शिल्लक ठेवला नव्हता, आणि हे सगळं घरात बक्कळ खायला मिळत असताना. मी त्याच्याशी दोस्ती करण्याचा, त्याच्यामागून मागून  राहण्याचा खूप प्रयत्न करी पण ते बिलकुल दाद देत नसे, एखाद्या मालकासारखे ते शांतपणे बसून असे, आणि त्याची शांतता भंग करण्याचा, त्याच्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला तर हात फांजळलाच म्हणून समजा. त्याला एकच विलक्षण खोड होती, ते रोज सकाळी माझे वडील जिथे झोपत त्या कॉटवर उडी मारे, आणि झोपलेल्या वडिलांच्या पोटावर जाऊन बसे. त्यांच्या झोपेलेल्याच अवस्थेतच ते तसे पोटावर बसत असे, एरव्ही कधीही बाबांच्याच काय पण कुणाच्या अंगावर, मांडीवर कधीही ते बसलं नाही. बाबांनी झोपेत कुशीवर वळण्याचा प्रयत्न केला तरीही ते नखांनी कपड्याला धरून तसेच आपली जागा ना सोडता तिथेच राही. शेवटी बाबा  उठल्यावरच ते बाजूला होई, तोपर्यंत एखाद्या अढळ स्थानावर बसल्यासारखे ते तिथेच ठाण मांडून बसे. आणि रोज, न चुकता. यात जराही अतिशयोक्ती नाही, हे या मांजराचे मुलखावेगळे वागणे पूर्ण सत्य आहे. खाण्याबाबतीत अतिशय मिस्कील होते. दूध आणि मासे. तेही मोजकेच. जेवणासाठी 'म्याव म्याव' करून गोंधळ घालणे कधीही नाही. कुठल्याही गोष्टीत तोंड घालणेच काय पण समोर ठेवले तरी फक्त स्वतःसाठी  घातले असेल तरच खाईल. बहुदा आपल्याला खायला देणारच आहेत, त्यासाठी मागण्याची गरज नाही असा त्याचा पवित्र होता, त्याबाबतीत त्याचा राजेशाही ऐटच होता. गरीब मांजरसासारखे दुसरे खाताना मागेपुढे घोटाळणे नाही, विनवण्या नाहीत की अधाशी झडप घालणारा चोरटेपणा नाही. एक मात्र होते, त्याला बारीक शेव खूप आवडे. शेवाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीचा आवाज झाला की ते कान टवकारून बघे. पण पिशवी समोर ठेवली तरी स्वतःहून  फोडून त्यातला शेव त्याने कधीही खाल्ला नाही. घरात ते कधीही मारलेला सरडा, उंदीर आणत नसे, आणि कधीही घरात त्याच्याबद्धल स्वच्छतेला घेऊन कसलाच त्रास नव्हता. 

शेवटी त्याला कसलासा आजार झाला, त्याला व्हेटर्नरी डॉक्टरकडेही दाखवून आणले, त्या वेळी मी लहान असल्याने मला फारसे काही समजले नाही की नक्की काय झालं होतं, पण त्याला डॉक्टरकडे घेऊन मी आणि आई गेल्याचे मला आठवते. त्याला इंजेक्शनसुद्धा दिले होते. त्यानंतर अनेक दिवस ते आजारी होतं. आमच्या शाळा संपून सुट्या लागल्या होत्या. माझ्या मैत्रिणींबरोबर 'महाबली हनुमान' सिनेमा बघायला मी दुपारी जाणार होते. जवळच होते थेटर, तीन तासांचा सिनेमा. त्या दिवशी मांजर पडूनच होतं. मी जाऊन जाऊन त्याला बघितलं. अनेक दिवसांपासून ते अश्याच अवस्थेत होतं, फार काही खात नव्हतं. फक्त बाहेर जाऊन आपला कार्यभाग आटोपून येई. आईने त्याला बसण्यासाठी एक जुनं सूप( बांबूच्या पट्टयांनीं वळलेलं) दिलं होतं. त्या दिवशी दुपारी आई आणि मी बसून होतो, त्याला काही खायला घातलं तर ते खाईना. त्याने महत्प्रयासाने उठण्याचा प्रयत्न केला, पण ते उठू शकत नव्हतं. माझ्या तेव्हाच्या बालबुद्धीला तो प्रसंग तितका समजला नसेल पण आई आणि ते मांजर यांच्यात एक प्रगल्भ, अतिशय समंजस संवाद ना बोलताच चालला होता. मला माहीत नाही आईला त्याच्याकडून कसं समजलं पण तिला कळलं की त्याला आपला कार्यभाग आटोपण्यासाठी बाहेर जायचं होतं. जणू काही ते माणूसच आहे आणि मानवी बोल त्याला कळतील अश्या प्रकारे एखाद्या आपल्याच आजारी आप्त माणसाशी बोलावे त्याप्रमाणे आई त्याला म्हणाली 'काय नाय, हयसरच कर तू काय ता, काय्येक हरकत नाय.'  तेव्हा न जाऊन मांजराने थरथरतच तिथेच सुपात बसूनच लघवी केली. अगदी माणसासारखं त्या मांजराला असहाय अवस्थेत बाहेर जाऊन आपला कार्यभाग आटोपता आला नसेल म्हणून ते शरमलं असेल का? आईला मात्र तसे का वाटले, तिलाच माहीत. पण तिला इतके ठाऊक होते की मांजरालाही स्वतःची बुद्धी असते, स्वतःच्या शुद्धीत ते स्वतःहून कधीही घरात आपला कार्यभाग करणार नाही. तेव्हा आई आणि ते मांजर समजेच्या वेगळ्याच अदृश्य पातळीवर होती. 'आसांदे हा, काय्येक वाटान घेव नको तू.' असं काहीतरी त्यालाच सांगत आईने बाजूला फडका फिरवला. मग मला म्हणाली, तू जा सिनेमाला. मी तिला म्हटलं की मी जात नाही आता, त्याची तब्येत जास्तच बिघडलेली वाटतेय. तेव्हा आईने तरीही मला थोडेसे स्पष्टपणेच जायला सांगितले. मग मी सिनेमाला निघून गेले, संध्याकाळी घरी आले तेव्हा मांजर घरी नव्हते. त्याची टेबलाखालची सुपातील नेहमीची जागा रिकामी होती. मी निघून गेल्यावर काही क्षणातच त्याचे आयुष्य संपले. आईने त्याला त्या सुपातूनच नेऊन बाजूच्या माळरानात पुरले होते.

ते आमच्याकडे राहायला आले आणि ते आजारी पडून गेले हा फक्त एक वर्षांचाच काळ होता. जीवन कुठे संपवायचे याचा 'सिक्स सेन्स' मांजरांना असतो का?  कोण जाणे.


२. पिरट्याचे मांजर , १८ वर्षांचे

ही गोष्ट एका १८ वर्षाच्या मांजराची आई ने सांगितलेली. माझ्या मावशीच्या घरी हे मांजर होतं. हल्लीच त्याच्याबाबतीत एक अशी हकीगत मला आईने सांगितली. हे मांजर अतिशय म्हातारं होतं. जवळपास त्याचे शेवटचे दिवस जवळच आले होते. त्याच्या अंगावरची फर निघून गेली होती आणि ते अतिशय अशक्तही झालं होतं. घरात इथेतिथेच आपला कार्यभाग करून ठेवत होतं. त्यामुळे त्याचा रोजचा त्रास होत चालला होता. त्याच्या लहानपणीच त्याचा एक पाय अधू झाला होता त्यामुळे ते लंगडत लंगडत चाले. पण चांगलं धडधाकट होतं बाकी. मावशीकडे असलेल्या पिरट्या नावाच्या मुलाने त्याला सांभाळलं होतं म्हणून त्याला 'पिरट्याचा मांजार' असे म्हणत. आता म्हाताऱ्या अवस्थतेत घरातच जिथे तिथे कार्यभाग करण्यामुळे ते सतत ओरडा खात होतं. पण काहीही असलं तरी त्याची जगण्याची इच्छा राहिली असावी, याचा प्रत्यय घरातल्याना एकेदिवशी आला. घरात मासळी आणली होती आणि सर्वजण जेवायला बसणार तेव्हा ते कुठेसं माळ्यावर खोक्यात चढून बसलं होतं. तिथे ते कसं जाऊन बसलं हे मोठं कोडंच होतं पण त्याची उतरण्याची कमालच होती. त्याला खरं तर उतरता येईना, मग शेवटी अंदाज घेऊन त्याने वरून सरळ खाली उडी मारली, एकदम  भिरभिरलं,  घरातल्या सगळ्यांना वाटलं आता काही हे उठत नाही, पण तरीही त्याच्या अंगात शक्ती होती, सावरलं आणि जेवायच्या जागी आलं. मासे खाऊन तृप्त झालं आणि मगच तिथून बाजूला झालं. त्यानंतर एकादशीच्या दिवशी त्याने स्वयंपाक घरातच आपला कार्यभाग करून ठेवला, त्यामुळे वैतागून मावशी त्याला खूप ओरडली, म्हणाली 'आता परत असे केलेस तर शिल्लक ठेवणार नाही बघ तुला' तेव्हा ते जे रागाने गेलं ते मावशीचा मुलगा 'लवू' याचा गाडीच्या पुढच्या भागात जाऊन बसलं, (कारच्या पुढचा जो भाग असतो त्याच्या आतमध्ये थोडी मोकळी जागा असते तिथे, बऱ्याचदा मांजराची पिल्लं भीतीने तिथे लपून बसतात) तो जेव्हा गाडी घेऊन निघाला तेव्हाही त्याला समजलं नाही. त्याने गाडी आपल्या एक नातेवाईकाकडे नेली आणि तिथे बराच वेळ तो थांबला, तरी तिथेही मांजर बाहेर आलं नाही. नंतर तो जवळच्या बाजाराच्या गावी गेला. बाजारात गाडी जाताच काही लोकांना गाडीच्या खाली शेपटी दिसत होती म्हणून ते मागून हाक मारू लागले, पण त्याला काही ऐकू गेलं  नसावं, मासळी घ्यायची होती म्हणून त्याने गाडी मासळीबाजाराकडे नेली आणि तिथे उभी केली तर ते मांजर आपोआप बाहेर पडलं आणि मासळी बाजाराच्या दिशेने चालू लागलं. गृहत्याग त्याने स्वतःच केला का? मांजराची ओढ,घट्ट नातं जागेशी असतं, माणसांशी नाही. पण असा स्वतःहून गृहत्याग, क्षेत्रत्याग करून संन्यासासारखं मांजर मुक्कामी पोचलं. 

पक्षी जेव्हा अंतिम समय जवळ येतो तेव्हा एकटेच दूर निघून जातात. त्यांना स्वतःच्या अंताची चाहूल लागते आणि त्यासाठी एकटेच ते दूर रानात जातात. पण पक्षांप्रमाणे या मांजराने गृहत्याग करून अंतिम स्थान स्वतःच निवडलं असेल का?

३. मिस्टर फ्लफी

मिस्टर फ्लफी हा माझ्या भावाच्या सोसायटीतला भटका बोका. कुठेही असतो. काही हौशी पालक आपल्या लहान मुलांच्या आग्रहाने त्याला घरात घेतात. काही हौशी मार्जारप्रेमींमुळे त्याला 'कॅट फूड' आणि गुबगुबीत गादी पण मिळाली आहे, पण मिस्टर फ्लफीला आपले स्वातंत्र्य प्रिय आहे. तो बाहेर फिरणे, उंडगणे पसंत करतो. त्याचे मन मानेल तेव्हा सरळ लिफ्ट मधून प्रवास करतो. नाही ही अतिशयोक्ती नाही. त्याला काही लिफ्टचे बटण नाही दाबता येत. म्हणून तो लिफ्टकडे थांबतो. जे कुणी येईल त्याच्या पायात घोटाळतो. आणि त्यांनी बटण दाबून लिफ्टचे दार उघडले की आत जातो. मग जिथे लिफ्टचे दार उघडेल तिथे उतरतो. आणि तिथल्या दारावर 'म्याव म्याव' करतो. जर त्या घरात मार्जारप्रेमी असतील तर ते नक्कीच दार उघडतील या आशेने. बहुतेकदा त्याची ट्रिक लागू पडते. मग त्या घराचा पाहुणचार करून सोयी-सवडीने बाहेर पडतो. मग दुसरे घर, कंटाळा आला तर परत लिफ्टने बाहेर उंडगणे आहेच. सोसायटीत त्याचे इतरही काही प्रतिस्पर्धी आहेत, पण मिस्टर फ्लफीचे स्थान अढळ आहे. भटका असला, चार घरचं पाणी प्यायलेला असला तरी मिस्टर फ्लफीचा चेहरा एकदम निरागस आहे. आपल्या 'क्युटनेस फ्याक्टर' ने तो अनेकांना भुरळ घालतो. आणि त्यांनी हिरवा कंदील दिला की डुगूडुगू त्याच्या मागे धावत जातो. बसण्याच्या जागा पण ठरलेल्या. घरात आला तर सोफ्यावर, नरम गादीवर, उबदार रजईवर, असंच जे काही असेल तिथेच जाऊन बसणार. बाहेर पार्किंगमध्ये स्कुटर/बाईकच्या मऊ सीटवरच बसणार. पण त्याचे लिफ्टचे वेड मात्र सर्व सोसायटीश्रुत आहे. 

मिस्टर फ्लफी जर माणूस असता तर त्याला लिफ्टमनचा जॉब नक्कीच मिळाला असता. आणि जर तो जपान मध्ये असता तर एक मांजर म्हणूनच याच जन्मी त्याला लिफ्टमनचा जॉब मिळाला असता. इतके जपानी लोकं नावीन्यप्रेमी ('इन्नोव्हेटिव्ह') आहेत. जपानमध्ये एक 'टामा' नावाचे  मांजर 'स्टेशनमास्टर' आहे. हे भटकं मांजर होतं, त्या स्टेशनवर फिरायचं. जपानमधली लोकं जबरदस्त मार्जारप्रेमी. त्यामुळे त्यांनी या मांजरालाच स्टेशनमास्टर बनवून टाकलं. त्याबद्धल इथे छान माहिती आहे :  https://en.wikipedia.org/wiki/Tama_(cat)

अशाप्रकारच्या अजब गोष्टी जपानमधील अत्यंत 'झेनी'श आणि 'सामुराई'श आणि अतिशय वेगळी अस्थेटिकल जाण असलेले जगावेगळे जपानी लोकच करू जाणोत. 



४. टूथलेस

जेव्हा माझे वडील रिटायर झाले तेव्हा गावी, घर बांधण्यासाठी ते आणि आई तिथे एक वर्ष राहिले होते. त्या काळात घरात एक मांजर होतं. संपूर्ण काळं. हिरवे डोळे. चकाकती फर. अतिशय गुणी. अतिशय गरीब. दृश्य गुण समोरच दिसत पण गुणी, गरीब हे त्याचे गुण माझ्या वडिलांनी मला सांगितले. त्यांनी त्याचे खूपच निरीक्षण केले होते. हेही खरंतर शेजारच्या घरातलं मांजर. पण आईबाबा तिथे राहिल्यापासून ते त्याच्याकडेच राहू लागलं. माझे आई आणि बाबा दोघेही मांजरप्रेमी नाहीत. कधीही मांजराला हात लावला आहे त्याला पाळलं आहे असे नाही. पण त्यांना त्याची घृणाही नाही. मांजर या प्राण्यांबाबतीत ते अतिशय तठस्थ. त्यामुळेच बहुदा मांजराने त्यांना निवडले असावे. असे म्हणतात की मांजर स्वतःच 'तुम्हाला' निवडते. तुम्ही मांजर निवडू शकत नाही. त्याप्रमाणे हे काळे मांजर आमच्या त्या गावच्या घरी त्यांच्यासोबत राहू लागले. 

खरंतर संपूर्ण काळं मांजर अनेक लोकांना भीतीदायक वाटतं. पण मला ते अतिशय आवडतं, अतिशय सौन्दर्यपूर्ण वाटतं. कारण ते अतिशय agile असतं. काळ्या विजेसमान त्याचा संचार असतो. याला मीच 'टूथलेस' असं नाव ठेवलं कारण मध्यंतरी आलेल्या एका ऍनिमेशन चित्रपटात एका संपूर्ण काळ्या दात नसलेल्या ड्रॅगनचं नाव 'टूथलेस' होतं. या मांजराचा चेहरा थेट त्या ड्रॅगन सारखा दिसायचा म्हणून 'टूथलेस'. तसे त्याचे दात चांगलेच शाबूत होते. 

त्याची सर्वात महत्वाची खासियत जी माझ्या बाबानी मला सांगितली ती अशी की ते अतिशय प्रेमळ होतं. हा गुण मांजरांत फारसा आढळत नाही. त्याचं एक पिल्लू होतं जे आता बरंच मोठं झालं होतं तरीही काहीही खायला घातलं की 'टूथलेस' बाजूला राहून बघत राही. जोपर्यंत आणि जितकं त्या दुसऱ्या मांजराला(त्याच्याच  पिल्लाला) खायचं असे तोपर्यंत  ते स्वतः अन्नाला तोंड लावत नसे. त्याचं खाऊन झालं की मगच आपण ते जे उरलं ते खात असे.

वर्षभर माझे आईवडील तिथे राहत होते, तेव्हा ते त्यांच्याबरोबरच असायचं. माझे वडील वर्षभरानंतर तिथून परत आले आणि परत कधीही जाऊ शकले नाहीत. त्यांना बांधायचं होते ते घर मात्र पुरं झालं. नंतर जेव्हा जेव्हा आम्ही त्या नवीन घरात गेलो तेव्हा 'टूथलेस' काही क्षणातच तिथे हजार होई. आणि मग तिथून आम्ही जाईपर्यंत हालत नसे. जणू काही ते त्याचे स्वतःचे घर असल्यासारखे, ते येत असे. आम्ही आलो हे त्याला कसे कळत असे कोण जाणे कारण नवीन घर त्या शेजारच्या घरापासून दूर आहे. 

एक दोन वर्षांपूर्वी 'टूथलेस' म्हातारं होऊन मरून गेलं. आता त्याचं ते मोठं झालेलं पिल्लू मात्र त्याच्याप्रमाणेच आम्ही गेलो रे गेलो की घरात हजार होतं. 'टूथलेस' असताना देखील ते येई पण फक्त शुक्रवारीच. म्हणून त्याला एक विशेष नाव पडलं होतं.



५. शुक्रवार मांजर

हेच ते 'टूथलेस' चं मोठं झालेलं पिल्लू. त्याचं नाव 'शुक्रवार मांजर' , कारण ते 'टूथलेस' असताना फक्त शुक्रवारीच येई. हे मी स्वतः बघितलं आहे. एकदा मी गणपतीच्या दिवसात गावी (जेव्हा आईबाबा तिथे राहत होते त्याच वर्षी ) गेले होते. गणपतीचे दिवस होते, त्यामुळे मासे आणण्याचे काही चिन्ह नव्हते, तरीही बरोब्बर ११-१२च्या दरम्यान ते पांढरं-करडे मांजर हजर झालं आणि चुलीपाशी ठाण मांडून बसलं. तेव्हा मला कळलं की ते तसं दर शुक्रवारीच फक्त यायचं. कारण शुक्रवार हा गावच्या बाजाराचा दिवस, त्यादिवशी बाजारात भरपूर मासे यायचे आणि आमच्या घरीदेखील मासे असायचे. त्यामुळे दर शुक्रवारी येणारच. बरोबर शुक्रवार त्याला बरा कळायचा. वाट पाहायचं आणि मासे नसतील तर वाट बघून बघून निघून जायचं पण दर शुक्रवारी फेरी मात्र ठरलेली. 'टूथलेस' गेल्यानंतर मात्र आमच्या नवीन घरी जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा हे 'शुक्रवार मांजर' नवीन घरात हजर होतं. आणि मग कुठे फ्रीझवर, नाहीतर बाकड्यावर, बसून झोपून राहतं. हे ही मांजर आता जवळपास ७ -८ वर्षांचं असेल. आता दर शुक्रवारी त्याला येत येत नसेल पण ते आम्ही गेलो की कायमस्वरूप घरी स्वतःचं घर असल्यासारखं ठाण मांडून बसतं. जेव्हा आम्ही तिथून परत येतो तेव्हा त्याला अक्षरश: घरातून उचलून बाहेर ठेवावं लागतं.

No comments:

Post a Comment