रे काफ्का!, तुझं 'द ट्रायल' वाचलं काही महिन्यांपूर्वी. वाळवंटात फिरत आहे असं वाटलं. पाण्याचा टिपूस नाही. कडाक्याचं ऊन. दूरवर फक्त एक पुसट रेषा. जमीन आणि आकाश यांना वेगळं करणारी. बाकी काही नाही.
नुसता कंटाळा आला तुझं ते पुस्तक वाचून. काय शुष्क लिहितोस रे. आर्द्रतेचा मागमूस नाही. नुसता कोरडा ठणठणीत कसा तू असा? कसलाच ओलावा तुझ्या ठायी नाही. त्या तुज्या पानोपानी पसरलेल्या वाळवंटातून कंटाळून मी बाहेरच पडत होते, पडत होते काय, पळच काढत होते म्हण. तेव्हा शेवटी तडाखा दिसालासच ना? शेवटच्या पानात काय लिहून ठेवलं आहेस ते. त्याने पूर्ण वाळवंट परत एकदा तुडवावं असं वाटू लागलं, जीव गेला तरी बेहत्तर, तो जाणारच आहे वाळवंट तुडवताना हे माहीत असूनही मला वाळवंटात परतायचंय.
शेवटच्या पानांनी मला ना दिसलेली 'ओयासिस' तू दाखवलीस. कुठे कुठे निवडुंग लावून ठेवलेस, निवडुंगाची लाल फ़ुलं सुद्धा फुलली असावीत कुठे कुठे. उन्हाने काळवंडलेल्या, झापडं येणाऱ्या माझ्या म्लान डोळ्यांना कशी दिसायची ती? काय रे बाबा असं करतोस? आणि कशासाठी असं लिहितोस. तुझा प्रॉब्लेम तरी काय? पण तुला असं विचारणं अयोग्यच म्हणा. कारण तुला तर तुझं हे लेखन जाळून टाकायचं होतं. तशी सक्त ताकीद तू दिली होतीस तुझ्या मित्राला, मॅक्स ब्रॉडला. पण त्याने तुझं ऐकलं नाही. तू गेल्यानंतर, सरळ तुझी अर्धी-मुर्धी हस्तलिखितं त्याने प्रकाशित केली. तुझी ही 'ट्रायल' गोष्ट अपूर्णच. मला अपूर्ण गोष्टी अतिशय आवडतात. का कुणास ठाऊक त्या आपल्या वाटतात. पण तुझी गोष्ट अपूर्ण वाटत नाही खरंतर. ती 'मिसिंग' पानं न लिहून तू छानच जीव घेतला आहेस माझा. आता आयुष्यभर ती 'मिसिंग' पानं मी लिहू म्हणतोस ना? तेच म्हणणार तू रे! मला माहीत आहे. आयुष्यभर तुझी ही गोष्ट आता काही पिच्छा सोडत नाही माझा. ती 'मिसिंग' पानं माझ्याच आयुष्याशी तर निगडित आहेत.
हा जो 'के' आहे ना तुझ्या गोष्टीतला, 'जोसेफ के' , त्याला कळतंच नाही काय चाललंय ते आजूबाजूला. एका दिवशी अचानक तो सकाळी बिछान्यातून झोपेतून जागा होतो काय आणि त्याच्या घरी गार्ड्स येऊन त्याला अटक होते काय. कश्यासाठी हे त्याला सांगितलेच जात नाही. ते ज्यांना माहीत ते कोण हेही त्याला माहीत नाही. तुझ्या वाळवंटात मृगजळ भरपूर. मिराज रे! मिराज भरपूर!
'के' च्या हाती काही नाही. तो म्हणतो ठीक आहे. झालीय अटक तर जातो आता त्या प्रोसेस मधून. म्हणजे त्याने असे काही (गुन्हा, पाप) केले आहे का ज्यामुळे त्याचे मन त्याला सांगते 'तू गुन्हेगार आहेस', काहीही गुन्हा न करता ही अपराधी भावना येते कुठून? मग इतर निर्लज्ज लोक जसे उजळमाथ्याने फिरण्यासाठी धडपडत असतात तसं धडपडायचं. अपराधी, निरपराधी कोण ठरवतं? इतर की आपण स्वतःच.
वावटळी आण मग. अगदी स्मोकी धुळीची वादळं आण, आणि सगळी धूळ डोळ्यात घाल, म्हणजे काय्येक दिसता कामा नये. अरे काय ते एक एक प्रसंग, त्या वृद्ध मरणपंथीय वकिलाच्या घरचा, तो वकील, तो रुडी ब्लॉक , ती लेनी. कॅथेड्रल मधील तो प्रिस्ट आणि तो पेंटर टिटोरेली, त्याची ती गचाळ पेंटिंग्ज. भरपूर धूळ घाल डोळ्यात, काय्येक दिसू दे नको मला. नुसतं वाळवंटात हेलपाटवत ठेव. तुझे ते प्रिस्टचे संवाद, पेंटरचे संवाद मी शंभरवेळा वाचले तरी मला कळणार नाहीयेत आणि म्हणूनच ते मी परत परत वाचणार आहे.
कधीकधी न कळलेलंच चांगलं. सुखी राहतो माणूस. कारण मला माहीत आहे मी जर ते पुस्तकात वाचले नाहीत तर मला ते खऱ्या आयुष्यात उमगतील. आणि उमगलेले पेलायला नको का? ते आपल्याच्याने जमणार नाही. त्यामुळेच मी वाचतच राहणार आहे, म्हणजे मग मला ते कधीच उमगणार नाही.
तुला एकच सांगते, तू मागे तो तुझा कीटक घेऊन आला होतास ना, तेव्हा सांगितले होतेस ना? की विहिरीतली शेवाळं बाजूला करा मग लागलं हाताला तर एखादं कासवही गावेल, अरे तुला सांगते. तुझे शब्द खरे होता होता राहिले.
आमच्या घरी एक विहीर आहे. एकदम कडक उन्हाळ्याने ती सुकलीच जवळपास, तळाशी ५-६ बादल्या पाणी असावं. म्हणून तिचा गाळ उसपायला, माणसं बोलावली, आमच्यासकट ती माठच. सरळ उतरली खाली आणि गाळ उसपु लागली बादली बादलीने. विहिरीबाहेर हा गाळ झाला. तू तिथे होतास का? तुझ्याने बघवला नसता तो माठपणा. असा माठपणा जिवंत माणसांनीच करायचा. तू जे सांगत होतास ते नव्हे हे. गाळ विहिरीच्या बाहेर. चिखलात बिचारे मासे तडफडताहेत. त्यांना वाचवलं कुणी? तर ज्यांची मनं अजून हिरवट शेवाळांनी हिरवीगार आहेत त्यांनी. तरीही एक मासा मात्र बंडखोर होता. त्याने वाचवणाऱ्याच्या हातातून उडी मारली आणि पडला चिखलात, बहुदा त्याला जायचे होते खोल समुद्रात, तशी स्वप्नं बाळगूनच उडी घेतली त्याने पण पडला चिखलात. विहिरीतून वर दिसणारे अमर्याद आभाळच त्याला निळ्या समुद्रसाखे वाटले असेल, त्याला ही 'जलभूल' झाली असेल तर तो तरी काय करणार बिचारा. मेला आपल्या कर्माने, मेला अथांगाच्या ओढीने. इतर मात्र ढवळलेल्या गढूळलेल्या पाण्यात फसाफस श्वास घेत निश्वास टाकत जगले होते. त्यांनी आकाशाकडे बघण्याचेही टाळले असावे आणि त्या आकाशाला समुद्र मानून त्यात सूर मारण्याचा मूर्ख अट्टहासही दूर सारला असावा. विहिरीतील न संपणारे वर्तुळ त्यांनी मान्य केले होते. त्यांना मुभा दिली तरी बाहेर जायचे नव्हते, ना जाणो चिखलात पडून जीव गेला तर, त्यापेक्षा हे परवडले.
आणि हो! एक कासवही चिखलात रुतून बसलेले होते. त्यानेही विहिरीबाहेर येण्याचे योजले होते. म्हणून दडून बसले होते चिखलात. नंतर सगळे गेल्यावर हळूच पळून जायचे होते त्याला. दूर अथांग समुद्रात. त्या मेलेल्या माशाशी संधान होते त्याचे, तो गडी कामास आला पण याने आपला पाय काढता घेतला नव्हता, खोल चिखलात छुप्या गनिमी काव्याने कासव बसून होते. पण आम्हा माठ माणसांनी त्याला उचलेले चिखलातून, काढले शोधून, यालाच म्हणतात अनुभव बरं का, अज्ञानाच्या प्रदेशात. आणि सरळ टाकून दिले परत विहिरीत.
जेव्हा कासव परत पाण्यात गेलं तेव्हा मात्र मला कासव एकटं वाटलं. ते पुन्हा डोळे मिटून तळाशी जाऊन बसलंय. आता त्याची वर येण्याची इच्छा नाही.
अरे काफ्का, इतका वेळ मीच बोलतेय, तू काहीच का बोलला नाहीस?
तेव्हा एकदम काफ्का चिडून म्हणाला 'मूढ आहेस. आणि माठही. तो 'जोसेफ के' म्हणजेच मेलेला मासा. आणि कासव म्हणजे ....... , जाऊ दे ! माश्या-कासवाची भेट कधी व्हायची नाही. तुम्ही सश्या-कासवाच्याच गोष्टी करा. लिहा , वाचा. माश्या-कासवाच्या गोष्टी तुमच्याने झेपायच्या नाहीत.
चिडून लालेलाल होऊन काफ्का तरातरा निघून गेला.
No comments:
Post a Comment