Sunday 10 July 2016

राहून गेले!

आपल्या जीवनात कित्येकदा असे क्षण येतात ज्याचा आनंद त्या वेळी त्या परिस्थितीत घेणे काही कारणामुळे शक्य होत नाही. मग जुने गेलेले ते क्षण आठवले की उरते मनात फक्त  हळहळ. अरे रे! हे अनुभवायला हवे होते, हे बघायला हवे होते, असे करायला हवे होते. अशा गोष्टी, असे क्षण आपल्या  हातातून  निसटून जातात. राहून जातात. मग कधीतरी त्याची आठवण काढून आपण म्हणतो. अरे! हे करायचे राहून गेले!
माणसाचं मन इतकं सहज बदलणारं, उनाड, सतत उंडारणारं असतं. आता या क्षणी वाटेल ते दुसऱ्याच क्षणी वाटेलच असं नाही. मनाला गतविश्वात रमायलाही आवडतं. आता ते दहा वर्ष मागे जाईल तर आत्ता पाच वर्ष तिथून पुढे येईल. हा बराचसा अनैच्छिक स्मृती (involuntary memory) चा खेळ आहे. आपण स्वस्थ बसलो असता, एकदम कुठल्यातरी संदर्भामूळे आपल्याला गतकाळातील असंबद्ध गोष्ट आठवते. आणि आपण पूर्णपणे विसंगत जगात हरवून जातो. मग अश्याही गोष्टी आठवतात ज्यांचा आपल्याला पूर्ण विसर पडलेला असतो. मनाच्या एका एका अदृश्य कप्प्यांतून त्या प्रकट होत जातात.

असाच अनुभव मला आज आला. मी जे पुस्तक वाचत होते त्यात असा काहीसा संदर्भ होता की एका झाडाच्या काही विशिष्ट फांद्याही biological variations दाखवू शकतात. एखाद्या वनस्पतीला फुटणारे धुमारे पूर्णपणे वेगळे वैशिष्टय घेऊन वाढू शकतात. जेव्हा मी  हे वाचत होते तेव्हा मला involuntary memory चा प्रत्यय आला. ही आठवण माझ्या वडिलांविषयी होती. रिटायर झाल्यानंतर एकदा ते माझ्याकडे दोन दिवस राहायला आले होते. तेव्हा सहजच गॅलरीजवळ गप्पा मारत असताना तिथल्या गुलाबाच्या झाडाविषयी मी त्यांना विचारले. ते स्वतः कृषीपदवीधर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांचे त्या विषयातले स्वानुभवातून गोळा केलेले field knowledge अफाट होते.

माझ्याकडचे गुलाब मी विकत आणले होते. जेव्हा आणले तेव्हा त्याला एकदा गुलाबी फुल फुलले, तेवढेच. त्यानंतर मात्र ते सरसर वेलीप्रमाणे वाढतच गेले. फुले-बिले काहीच नाही. त्याबद्धलच मी बाबांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ते गुलाब कलम केलेले होते. जे खरे कलम होते, ज्यावर फुले फुलतात ती फांदी जगली नाही, आणि जे सरसर वाढत होते ते साधे रानगुलाब होते ज्याला क्वचितच  फुले येतात. मग त्यांनी मला थोडी 'ग्राफ्टिंग' (कलम कसे करायची) ची माहिती सांगितली आणि म्हणाले की मी तुला चांगलं गुलाबाचं कलम करून देतो. याबद्धल मला शंकाच नव्हती कारण लहानपणी त्यांना आंब्याची कलमं करताना मी बघितलं होतं. पावसाळ्यात त्यांच्या ओळखीचे लोक त्यांना आंब्याच्या बाठ्या आणून देत, त्या रुजवून रोपं तयार करून त्यावर हापूस किंवा तत्सम चांगल्या जातीचे कलम ते स्वतःच्या हाताने एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे कल्पकतेने करीत. आईलादेखील त्यांनी ते तंत्र शिकवले होते आणि तीदेखील या कामात त्यांना मदत करे. मग अशी पाच-पन्नास रोपे ते लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये अशीच वाटून टाकीत असत. फुलापानांविषयी, झाडांविषयी त्यांचे ज्ञान शिकाऊ नव्हते तर प्रत्यक्ष अनुभवातून, स्वतःच्या मेहनतीने संपादन केलेले होते. झाडे तर त्यांच्या आवडीची. एखाद्या नारळाच्या झाडाला नारळ का धरत नाहीत याचे अचूक कारण ते नुसतं त्या झाडाला बघून सांगू शकायचे आणि उपायही सुचवायचे, किंवा झाड बघून त्याला असणाऱ्या समस्यांचे निदानही करायचे. कितीतरी लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांना आपल्या शेतात-बागांत घेऊन जायचे. 

त्या दिवशी गॅलरीत जेव्हा ते माझ्याशी गुलाबाच्या कलमाबद्धल तासभर बोलत राहिले तेव्हा मला ते अतिशय वेगळेच वाटले. ते नेहमीचे माझे 'बाबा' नव्हते.  मी कोणीतरी शेतकरी किंवा एखादा त्यांच्या क्षेत्रातीलच शेतीतज्ञ, वनस्पतीतज्ञ असावा तसे ते माझ्याशी बोलत होते.त्याचा चेहरा उजळून गेला होता. गुलाबाचे कलम कसे करतात याची सुंदर कहाणीच ते मला सांगत होते आणि सांगताना त्यांच्या डोळ्यात विशेष चमक होती. त्यांनी सांगितलेल्या माहितीचे स्वरूप थोडक्यात असे होते जे मला आजही आठवत आहे, गुलाबाच्या कलमांसाठी विशिष्ट जातीच्या गुलाबांचे खुंट वापरतात. हे खुंट जितके चांगल्या जातीचे तितके गुलाबाचे कलम चांगले बनते. 'रोझा इंडिका ओडोराटा' असे खुंटासाठी वापरल्या जाणाऱ्या एका गुलाबाचे नावही त्यांनी सांगितले. या खुंटांपासून रोपे बनल्यानंतर, त्यावर कलम केले जाते. तेही एका विलक्षण पद्धतीने. या रोपाला नुकत्याच येऊ घातलेल्या फांदीला हुडकून तिथे खाच केली जाते. त्या खाचेतून खरंतर खुंटाच्या रोपाचे जीवन फांदीरूपाने वाढू शकले असते. पण त्या खाचेत पाहिजे त्या कलमी गुलाबाच्या तश्याच एका फांदीचा कोंभ लावला जातो. आणि त्याला सीलबंद केले जाते, त्या खाचेतून वाढण्यासाठी. आता त्या खाचेतून  यापुढे वाढणारा तो नवीन अनोळखी कोंभ, परकायेतून आलेला, त्यापासून बनणारी फांदी म्हणजेच पुढे जाऊन एक कलमी राजेशाही गुलाब म्हणून ओळखली जाणार असते. याला 'डोळा भरणे' असे म्हणतात. खुंटाच्या रोपावर पाहिजे त्या जातीच्या गुलाबाचा 'डोळा भरून' ते पुढे त्या जातीचे कलम म्हणून जगते. खुंट आपली सर्व शक्ती त्या कलमी गुलाबाच्या डोळ्यालाच देतो. स्वतःचे अस्तित्व विसरून. आणि हा नवीन, परकायी  डोळाच सर्व जग पाहतो. खुंटही त्या डोळ्यातूनच मग दृष्टीला प्राप्त होत असावा. स्वतःचे काटे सावरत तो खुंट नव्या डोळ्याला जगवतो, वाढवतो. स्वतःचे अस्तित्व विसरून, त्याचा त्याग करून दुसऱ्या परक्या जीवनाला स्वतःहून सामावून घेणे आणि त्याचा डोळा आपला मानून त्यातुनच सारे जीवन बघणे असा चमत्कार फक्त त्या वनस्पतींनीच काय तो करावा, माणसाला ते साधणार नाही. खरंच एवढ्याशा गुलाबाच्या झाडामागे केवढी कहाणी आहे. बाबा एवढं सांगूनच थांबले नाहीत तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी स्वतः रोप करून देतो असेही आश्वासन दिले. एवढं  उत्साही मी त्यांना त्या काळात क्वचितच पाहिले होते, कारण रिटायर होण्याच्या आधीचा बराच काळ ते ऑफिसचं बैठंकाम करीत, अनेक वर्षांपूर्वीच्या शहरातील बदलीमुळे शेतकऱ्यांशी त्यांचा व्यक्तिगत संबंध खूपच कमी झाला होता. प्रत्यक्ष भेट घेऊन सल्ला देणे बंदच झाले होते जवळजवळ. त्यांची जी खरी ऊर्जा होती ती मातीवर रुजणाऱ्या खऱ्याखुऱ्या झाडांत, पानाफुलांत होती, ती ऊर्जा, ती मनापासूनची आवड, ते ज्ञान अव्यक्तच राहू लागले होते, आणि बैठ्या कागदोपत्राच्या, द्वेष-चढाओढीच्या नोकरीत ते पार धूसर होऊन गेले होते. ते जेव्हा अश्याप्रकारे मला दिसले तेव्हा मला खूप खंतही वाटली. 

दुसऱ्या दिवशी काही कारणांनी गुलाबाचे कलम त्यांना काही करता आले नाही. ते पुन्हा येऊन कलम करतो, असे सांगून निघूनही गेले. आणि गुलाबाचे कलम काही झाले नाही. त्यांना ते कधीच करता आले नाही, कारण त्यानंतर एक वर्षातच अचानक ते कायमसाठीच निघून गेले.  आज १० जुलै,  त्यांचा वाढदिवस. या दिवशी मला ही गोष्ट  प्रकर्षाने जाणवली, गुलाबाचे कलम राहून गेले! आणि त्याचबरोबर त्यांना असलेले पानाफुलांचे, झाडांचे, त्यांना पोखरणाऱ्या कीटकांचे, अतिशय सखोल आणि स्वतः जमवलेले ज्ञान संचित करायचेही राहून गेले. मीही ते कधी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, माझ्याच कामात, व्यवसायात मी व्यस्त राहिले. त्यांना रिटायर झाल्यानंतर या स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांना व्हावा म्हणून काम करायचे होते, तेही राहून गेले! 

अश्या असंख्य गोष्टी राहून जातात. त्या  आपल्याशी निगडित असतात, किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींशी निगडित असतात. वेळ निघून गेली असेल तर मागवून त्याबद्धल आपल्याला खंत वाटत राहते. म्हणून एखादी गोष्ट आपल्याला करावीशी वाटत असेल, आणि शक्य असेल तर बस्स! ती तेव्हाच करून टाकावी.

No comments:

Post a Comment