योगिनी मंदिरं आणि त्यांचे आश्रयदाते
खजुराहो, मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश आणि चंदेल राजे
खजुराहो येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर चंदेल राजांनी बांधले. हे मंदिर नवव्या शतकातील असून आयताकृती आहे. ग्रॅनाईट दगडांपासून बनलेले हे मंदिर आता अत्यंत पडक्या अस्तित्वात आहे. या मंदिरातील फक्त तीन मूर्ती आज अस्तित्वात असून त्या मूर्ती मातृकांच्या आहेत. एक आहे महिषासुरमर्दिनी, दुसरी महेश्वरी आणि तिसरी ब्रह्माणी. चंदेल राजे दहाव्या शतकांपासून ते तेराव्या शतकापर्यंत मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशाचा काही भाग, यांवर राज्य करत होते. अत्यंत प्रभावशाली अश्या या राजांनीच खजुराहोची विलक्षण मंदिरं उभारली. या मंदिरांवरची कामशिल्पं आणि चौसष्ट योगिनींचे मंदिर हे दर्शवते की हे राजे शैव आणि शाक्त तांत्रिक उपासनांचे साधक होते. कीर्तिवर्मन या दहाव्या शतकातील राजच्या दरबारी असलेल्या कृष्णमिस्र याने लहिलेल्या 'प्रबोधचंद्रोदया' या नाटकात कपालिक संप्रदायाच्या साधकाचा जैन व्यक्तीला आपल्या उपासनेचे महत्व पटवून देणारा संवाद आहे. हे नाटक कपालिक या शैव तांत्रिक संप्रदायाच्या पार्श्वभूमीवर बेतले आहे. यावरून चंदेलांच्या काळात इथे शैव(कपालिक)-शाक्त(कौल) तांत्रिक साधना होत होत्या असे सिद्ध होते. आणि या उपसकांचे हे राज्यकर्ते आश्रयदाते होते. दहाव्या शतकापासून मध्य भारतात, अनेक परकीय मुस्लिम राजांच्या(गझनीचा मुहंमद इ.) स्वाऱ्या होते होत्या. आपले राज्य अबाधित राखण्यासाठी, साहजिकच इथल्या राजांनी योगिनी मंदिरांच्या उपसनेद्वारे आपले सैन्यबळ, साम्राज्यबळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले असावेत.
चंदेल राजांनी खजुराहो बरोबरच जवळच्या प्रदेशात जवळपास आणखी आठ मंदिरे बांधली होती. आज त्यापैकी कुठलेच अस्तित्वात नाही. शाहदोल, बदोह, रिखियांन,लोखरी इ. ठिकाणची मंदिरे भग्नावस्थेत आहेत.
भेडाघाट आणि कालचुरी राजे
भेडाघाट, जबलपूर येथे असलेले योगिनींचे मंदिर अजूनही सुस्थितीत असून यातील एक्याऐंशी योगिनींच्या मूर्तीदेखील पडझड झालेल्या असूनही बऱ्यापैकी स्थितीत आहेत. हे मंदिर नवव्या शतकात त्रिपुरीच्या (त्रिपुरी म्हणजे आत्ताचे तेवर,जबलपूर) कलचुरी राजांनी बांधले. हे मंदिर नर्मदेच्या काठावर आहे. कलचुरी राजे शैव संप्रदायाचे उपासक होते. यांनींही या प्रांतातील आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी योगिनी मंदिर स्थापन केले असावे. तांत्रिक ग्रंथात एक्याऐंशी योगिनींची उपासना ही विशेषकरून राज्यसत्तांसाठी, त्यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी दिली गेली आहे.
मितौली, नारेसर आणि कच्छपघट राजे
उत्तरप्रदेशातील मितौली हा ग्वाल्हेरच्या जवळचा भाग आणि नारेसर याठिकाणी चंदेल राजांचे मांडलिक कच्छपघट यांची सत्ता होती. यांनी नंतरच्या काळात चंदेलांचे मांडलिकत्व जुगारून देऊन, स्वतंत्र सत्ता म्हणून या प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यांनीच या भागांत मितौली आणि नारेसर इ. ठिकाणी योगिनींच्या मंदिरांची स्थापना केली. नारेसर येथील मंदिर नवव्या शतकात तर मितौली येथील मंदिर दहाव्या शतकात बांधले गेले. यातले नारेसर येथील मंदिर आज भग्नावस्थेत आहे आणि त्यातल्या योगिनींची शिल्पे संग्रहालयात ठेवलेली आहेत. मितौली येथील मंदिर अजूनही बऱ्याच सुस्थितीत आहे. हे मंदिर कच्छपघट राजा देवपाल याने बांधले, या मंदिरावर असलेल्या अस्पष्ट अश्या शिलालेखावरून कळते की देवपाल आणि त्याची पत्नीने या मंदिराची उभारणी केली असावी. या शिलालेखात पुढे तेराव्या शतकाचाही उल्लेख आहे. ज्यात कछवाह या राजपूत राजाचे नाव आहे. ग्वाल्हेरचा परिसर त्या काळात राजपुतांच्या अधिपत्याखाली होता, त्यानंतरच्या काळात आलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये ग्वालेर आणि आजूबाजूचा परिसर मुस्लिमांच्या सत्तेखाली होता. तेराव्या शतकानंतर वाढत्या मुस्लिम सत्तांमूळे ही मंदिरं ओसाड पडली असावीत.
हिरापूर आणि रानीपूर, ओरिसा
ओरिसा येथील हिरापूर, भुवनेश्वर येथील मंदिर नवव्या शतकात बांधले गेले. ओरिसामध्ये नवव्या-दहाव्या शतकात अनेक छोटेछोटे राजे राज्य करीत असल्याने हे मंदिर नक्की कुणी बांधले ते कळणे अवघड आहे. भूम-कारा, सोमवंशी, भांजा अश्या अनेक सत्ता तिथे होत्या. त्यापैकी भांजा हे शाक्त पूजक होते. हिरापूरचे मंदिर त्यांनी बांधले असण्याची शक्यता आहे. ओरिसाच्या आणि छत्तीसगढच्या सीमेजवळ असलेले, रानीपूर-झारियल येथील मंदिरही जवळपास याच काळात बांधले गेले असून ते बहुदा सोमवंशी या राजांनी बांधले असावे कारण त्या काळात त्यांची सत्ता तिथे होती. हि दोन्ही मंदिरे बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहेत. आणि त्यातले हिरापूर येथील मंदिर सर्वात लहान योगिनी मंदिर आहे. हिरापूर आणि रानीपूर येथील दोन्ही मंदिरांत असलेल्या योगिनींमध्ये मातृका नाहीत. याचे कारण हे असावे की ओरिसात अन्य अनेक ठिकाणी मातृकांची वेगळी मंदिरं आहेत.हिरापूर येथील योगिनींचे मंदिर इतके गुप्त होते की भुवनेश्वरच्या जवळ पंधरा किलोमीटर अंतरावरच्या या मंदिराला प्रथम १९५३ मध्ये, केदारनाथ महापात्रा यांनी प्रकाशात आणले.
गुजरात, राजस्थान
गुजरात आणि राजस्थान येथील राजपूत आणि अन्य राजांनी देखील योगिनी उपासनेसाठी मंदिरे स्थापन केली होती परंतु आज त्यातील एकही मंदिर अस्तित्वात नाही. राजस्थान आणि गुजरात मध्ये कागद आणि कापडावर योगिनी चक्र आणि योगिनींची लोककलाचित्रं मात्र अस्तित्वात आहेत.
दक्षिण भारत
आंध्रप्रदेशात योगिनी उपासना नवखी नसल्याची काही उदाहरणे त्यांच्या धार्मिक ग्रंथातून सापडतात. परंतु आंध्रप्रदेशात कुठलेही मंदिरचे पुरावे मात्र सापडले नाहीत. तामिळनाडू मधील कांचीपुरम येथे मंदिर नसले तरी योगिनींच्या मूर्ती मात्र सापडल्या आहेत. या चोल राजांच्या राजवटीतील आहेत. यावरून स्पष्ट होते की दक्षिण भारतातदेखील योगिनी उपासना आणि मंदिरे अस्तित्वात होती.
आसाम, नेपाळ , काश्मीर, दिल्ली
नेपाळ देशात आजतागायत मुख्यत्वे तांत्रिक उपासना होते, येथील सर्व महत्वाच्या तांत्रिक ग्रंथात योगिनी उपासना दिलेल्या आहेत. तरीही नेपाळ येथे एकही योगिनींचे मंदिर आढळत नाही. आसाम येथील कामख्या (Kamakhya) मंदिरातील दैनिक पूजेमध्ये योगिनींची नावं उद्धृत केली जातात. दिल्ली च्या बाह्यभागात असलेले योगिनीपुरा येथील मंदिर देखील योगिनींशी संबंधित आहे. काश्मीर हे सातव्या ते दहाव्या शतकापर्यंत शैव आणि शाक्त तांत्रिक उपासनेचे अत्यंत महत्वाचे केंद्र होते. येथील अभिनवगुप्त या नवव्या शतकातील पंडित तत्ववेत्याने तांत्रिक साधनेवर अतिशय प्रगल्भ लेखन केले आहे. परंतु काश्मीरमधेही आता एकही योगिनींचे मंदिर अस्तित्वात नाही.
चौसष्ट योगिनींची शिल्पं प्रतिमा (Iconography )
अतिशय वेधक , गूढ , कल्पनारम्य आणि दैवी अशी ही योगिनींची शिल्पं आहेत. त्यांची शिल्पं विशेष आहेत कारण शिल्पकारांनी त्यांच्यापैकी काहींच्या निर्मितीसाठी कलेतील रौद्र, बीभत्स, भयानकरसांचा अवलंब केला आहे.
योगिनींची उपासना असामान्य असल्याने त्यांचे रूपही असामान्य असले पाहिजे. तशीच हि शिल्पं आहेत. योगिनींचे मुख्य गुणविशेष त्यांच्या शिल्पात व्यक्त केले गेले आहेत. योगिनींची नावं, त्यांचे विशेष हे सर्व या त्या ठिकाणच्या परंपरेने, तिथल्या ग्रामीण देवतांच्या प्रतिमांनी प्रभावित झालेले आहे. प्रत्येक योगिनीचे वाहन आहे. काही योगिनी वाहनरहितदेखील आहेत. काही योगिनी रूपे धारण करणाऱ्या आहेत. या शिल्पांमध्ये निरनिराळ्या प्राण्यांची मुखं त्यांनी धारण केली आहेत. योगिनींच्या साधनेत अवलंब होणाऱ्या मत्स्य, मांस, मद्य, मुद्रा(grain) या गोष्टींचा त्यांच्या शिल्पात थेट संदर्भ दिसत नसला तरी अनेक योगिनींच्या हातात कवटीचे भांडे(skull cup), मनुष्य मुंडके दिसते. काही शिल्पांत, त्यांच्या चर्येवरुन त्या मांस भक्षण करत असाव्यात असे वाटते. परंतु मैथुन या शिल्पांत कुठेही दिसत नाही. शवसाधना हा योगिनी उपासनेचा महत्वाचा भाग होता. त्याचे अनेक संदर्भ या शिल्पांत सापडतात. काही योगिनी शवाचा आसनासारखा उपयोग करतात. काही शिल्पांमध्ये योगिनींच्या आसनाजवळ सेवक, साधक शवासहित दिसतात.
योगिनींच्या मूर्ती उभ्या किंवा आसनस्थ किंवा नृत्य करणाऱ्या गतिशील पावित्र्यात आहेत. योगिनींच्या सर्व मूर्ती अलंकारांनी मढलेल्या आहेत. पैंजण, बाजूबंध, गळ्यातील कंठा, माळा, कमरबंध, केसातील आभूषणे, कानांतील डूल अश्या अनेक अलंकारांनी युक्त त्या आहेत. काही ठिकाणी अलंकार म्हणून सर्पाचे बाजूबंध, कामरबंधही त्यांनी परिधान केले आहेत. कानातील आभूषणे देखील सर्प, किंवा मानवी मुंडकी अशी भीषण देखील आहेत. त्यांच्या केशरचनाही अतिशय वैविध्य असलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही योगिनींचे केस (विशेषतः दक्षिण भारतातील)मोकळे सोडलेले, ऊर्ध्वकेशी(उभे असलेले)आहेत. काही योगिनी सुहास्यवदना आहेत, काही रौद्ररूप धारिणी तर काही भयरुपी आहेत. काहींच्या डोक्यामागे (दैवी वैशिष्ट्य दर्शविण्यासाठी) तेजोवलय (halo) आहे. यावरून असे वाटते की काही योगिनी मानुषी होत्या का? काहींना दोन हात आहेत, पण अनेक योगिनींना दोन पेक्षा अधिक हात(चार, आठ, बारा इ.) आहेत. सर्वच योगिनींच्या शिल्पांच्या शरीराचा वरचा भाग अनावृत्त आहे.
या शिल्पप्रतिमांचे (iconography) सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे योगिनींची विविध पशु मुखं आणि त्यांची वाहनं. यातली विविधता वाखाणण्यासारखी आहे. काही योगिनी वृक्षांवर राहणाऱ्या असल्या(ग्रंथातील संदर्भावरून) तरी वृक्षांचे संदर्भ शिल्पांत फारसे दिसत नाहीत.फक्त एकाच ठिकाणी एका गर्धभमुखी योगिनीचे वाहन वृक्ष आहे. आणि एकदोन ठिकाणी तिच्या मागे वृक्ष आहे पण हे फारच क्वचित दिसते. प्राणीपक्षीजगत मात्र शिल्पांत समृद्धतेने वापरले गेले आहे. अस्वल, ससा, सिंह, बिबळ्या वाघ, हत्ती, घोडा, मांजर, गाढव, सर्प, म्हैस(गाय/बैल), मेंढा, पक्षी,कोल्हा यांची मुखं धारण योगिनींनी धारण केली आहेत. या प्राण्यांबरोबरच विंचू, खेकडा, कासव, बेडूक, डुक्कर(रानडुक्कर), मासा, उंदीर, हंस, मोर, पोपट, कोंबडा, घुबड, हरण(चितळ), एडका, इग्वाना (एक प्रकारचा सरडा) असे विविध प्राणी-पक्षी योगिनींचे वाहन झाले आहेत.
हिरापूर येथील योगिनी अत्यंत मोहक आणि अतिशय नेत्रसुखद आहेत. हि सर्व उभी शिल्पं आहेत. शिल्पाची कारागिरी अतिशय नाजूक आणि प्रमाणबद्ध आहे. या योगिनींच्या एक योगिनी स्वतःचे पैंजण नीट करत आहे. एक योगिनी शिकारी आहे हातातील धनुष्यबाण ताणून ती उभी आहे. एक योगिनी उंदरावरील दोन चक्रांवर तोल सांभाळत हातात डमरू घेऊन उभी आहे. या योगिनींच्या शिल्पात सौन्दर्यपूर्ण डौल आहे. येथील काही योगिनी पशुमुखी आहेत. अश्वमुखी, गर्धभमुखी योगिनी येथे आहेत. पशुमुखी असल्या तरी त्यांचे सौन्दर्य कुठेही कमी झालेले नाही. एक योगिनी हातात कवटीचे भांडे घेऊन तोंडाला लावत आहे. हि सुराप्रिया असू शकते किंवा रुधिरपायनी, किंवा कपालिनी( हातातील कवटी म्हणजे शैव-कपालिकांचे भांडे) असू शकते.
चामुंडा सदृश योगिनी आणि शिकार करणारी योगिनी |
पोपट हे वाहन असलेली योगिनी आणि पैंजण ठीक करणारी योगिनी |
चक्रावर तोल सांभाळणारी योगिनी आणि कोंबडा वाहन असलेली योगिनी (सर्व फोटो @ विकिपीडिया) |
एक योगिनी चामुंडेच्या मूर्तीसारखी भयावह आहे. हि जी शिल्प-प्रतिमा आहे ती सर्वसाधारण देवीच्या अत्यंत रौद्र-भीषण रूपासाठी वापरली जाते. 'काली'/चामुंडा/चंडी' इत्यादी देवीची संहारी रूपे सौन्दर्य-विरक्त असतात. अत्यंत कृश, गाल बसलेले, बरगड्या बाहेर, ओघळलेले(sagging) वक्ष, वर आलेले मोठे डोळे असा काहीसा त्यांचा भयावह अविर्भाव असतो. येथील अनेक योगिनी त्यांच्या वाहनासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एक योगिनी तर हातात सूप (winnower) घेऊन आहे. या योगिनी मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाह्यभागावर रक्षक स्त्री मूर्ती आहेत. यांना काही पंडितांनी 'कात्यायनी' असे नाव दिले आहे. प्रवेशद्वारावर पुरुष द्वारपाल आहेत.
रानीपूर झारियल येथील योगिनी (आणि भैरवमूर्तीही ) नृत्य करणाऱ्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डोक्यामागे तेजोवलय नाही. यात वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं आहे मांजराचे मुख असलेल्या योगिनीचे. तिला बिदालीदेवी किंवा मार्जारी असे म्हणतात. आणखी एका योगिनीचे मुख चित्त्याचे आहे. तिच्या हातात शव आहे. अनेक ठिकाणी दर्शविलेल्या या शिल्पातील शवांच्या संदर्भावरून शवसाधना हे या योगिनींच्या उपासनेचे प्रमुख अंग होते असे दिसते. आता अस्तित्वात नसलेली एक योगिनी मूर्ती 'कनिंगहॅम' या पुरातत्ववेत्त्याने नोंदवून ठेवली आहे. जी सूर्याशी संबंधित होती. जिच्या हातात कमळ आणि पायाशी घोडे होते. अनेक मूर्ती कालांतराने मंदिरातून चोरल्या गेल्या. या सर्व मूर्ती वालुकाष्म दगडाच्या असल्याने शिल्पांचा दर्जा कालमानाने बराच ढासळला आहे.
जिथपासून या योगिनींच्या शिल्पांचा, संकल्पनेची ओळख झाली त्या खजुराहो येथील मूर्ती मात्र काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. यातील फक्त तीन मूर्ती खजुराहोच्या संग्रहालयात आढळतात. त्या आहेत मातृकांच्या (सप्तमातृकांपैकी तीन). महिषासुरमर्दिनी, ब्राह्मणी आणि माहेश्वरी.
भेडाघाट येथील योगिनी मात्र बऱ्याच पडझड झालेल्या असल्या तरीही अजून बऱ्याच सुस्थितीत आहेत. या सर्व मूर्ती ओरिसा योगिनी मंदिरांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्या मागे तेजोवलय आहे, पायाशी सेवक, साधक आहेत. या मूर्ती नाजूक नाहीत तर शरीरसौष्ठवाने परिपूर्ण आहेत. या शिल्पांवर त्यांची नावे कोरलेली आहेत. इरुडी, सर्वोतोमुखी, इंद्रजाली , फणेंद्रि, अंतकारी अशी त्यांची नावं आहेत.
याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जी योगिनींची शिल्पं सापडली आहेत, ती रीखियान, शाहदोल, लोखारी, मितौली, दुधाई, हिंगलाजढ , बादोह आणि कांचीपुरम येथील आहेत. यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं आहेत. लोखारी येथील तर सर्व योगिनी या प्राण्यांची मुखे धारण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, सश्याचे मुख धारण केलेली योगिनी सासकनना, सर्पस्या ही योगिनी सर्पाचे मुख धारण केलेली. दुर्दैवाने यातील अनेक शिल्पं आज भग्नावस्थेत अस्तित्वात आहेत. सासकनना हि ससायोगिनी आता अखंडावस्थेत नाही, तिचे दोन भाग झाले आहेत. हि सर्व शिल्पे वेगवेगळ्या शिल्पकारांच्या कार्यशाळेतून निर्माण झाली आहेत. अशी ओरिसा मधील योगिनी शिल्पं ओरिसी शिल्पकलेचे नमुने वाटतात. मध्य आणि उत्तर प्रदेशातील शिल्पं तेथील शिल्पकलांच्या त्या काळातील परंपरेतून घडलेली वाटतात. याउलट दक्षिण भारतातील कांचीपुरम येथील शिल्पं 'चोल'(Chola) शिल्पकलेचे नमुने वाटतात. भारताचे हेच मोठे वैशिष्ट्य की एकाच संप्रदायातील एकाच उपासनेतही त्यांच्या मूर्तींमध्ये,नावांमध्ये प्रांतानुसार कितीतरी विविधता आढळते.
योगिनींच्या शिल्पप्रतिमा देखील कल्पनारम्य, अनेक पैलूंनी युक्त आहेत. त्यांच्या हातांतील वस्तू त्यांच्या विशेषाच्या सूचक आहेत. उदाहरणार्थ सूप घेतलेली एक योगिनी हिरापूर येथे आहे. तशीच सूप आणि झाडू घेतलेली एक योगिनी कांचीपुरम येथे सापडलेल्या योगिनींत आहे. सूप आणि झाडू हे कृषी हंगामाचे (harvest) पीक येण्याचे प्रतीक आहे. मग ही योगिनी त्यासाठी(सुबत्ता, विपुलता, समृद्धी यासाठी) पुजली जात असण्याची शक्यता आहे. कांचीपुरम येथील एका योगिनीच्या हातात दंड(wand) आणि कमंडलू, पाण्याचे भांडे आहे. हि योगिनी रोगनिवारण करणारी आहे. नकारात्मक आणि सकारात्मक या ऊर्जांबरोबरच त्यांच्या शिल्पप्रतिमांतून या योगिनी बरेच काही व्यक्त करू पाहत आहेत.
लोखारी येथील ससाकनना योगिनी आणि कोल्हयाच्या मुखाची योगिनी (विद्या देहिजीया यांच्या पुस्तकातून) |
No comments:
Post a Comment