योगिनींचे वर्तुळ
योगिनींच्या मंदिरांची रचना बहुतांशी वर्तुळाकार असते. क्वचित चौकोनीही असते. वरून बघितले तर वर्तुळाकार योगिनींचे चक्र आणि मध्यभागी असलेली भैरवाची मूर्ती ही रचना शिवलिंगासारखी भासेल. परंतु याहीपेक्षा वर्तुळाकार रचनेची अनेक कारणे आहेत. वर्तुळ हे अत्यंत साधे पण प्रभावी चिन्ह आहे. ते पूर्णतेचे, प्रबोधतेचे (consciousness) प्रतीक आहे. वर्तुळ म्हणजे सर्व काही आणि वर्तुळ म्हणजे काहीच नाही. शून्यता. अनंतकाळ दर्शवणारे. वर्तुळाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कुठल्याही बिंदूवरून तुम्ही केंद्रापासून तेवढेच दूर असता. केंद्राकडे पोचण्याचा मार्ग वर्तुळाच्या कडेवरून सारखाच. वर्तुळ फिरते असले तर त्याचे बनते चक्र आणि त्यावरील गतिमान बिंदू पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतो. हे 'पुनरपि' असणे हेच वर्तुळाचे सामर्थ्य. 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं' असे चालू असलेले चक्र लहान लहान होत जात शेवटी केंद्रापर्यंत पोचले तर शून्यतेशी, वैश्विक स्पंदनाशी एकरूप होते. शिव(भैरव) 'योगिनीं'ची मुख्य देवता. तीच सर्व विश्वचे मूळ त्यामुळे ती केंद्रस्थानी असते.तिच्यापर्यंत पोचता येते 'योगिनीं' द्वारे.
योगिनींच्या वर्तुळाकार रचनेशी वर्तुळाच्या गुणधर्माचा असा संबंध आहे. हे योगिनींचे वर्तुळ एखाद्या पूर्ण फुललेल्या कमळपाकळ्यांसारखे वर्तुळाकार रचलेले आहे. केंद्राकडून फुटलेल्या पाकळ्या, आठ, सोळा, चोवीस, बत्तीस आणि शेवटी चौसष्ट होत गेल्या आहेत. प्रत्येक पाकळीवर योगिनी विराजमान आहे. त्या पाकळ्यावरून प्रवास करणारा साधक योगिनींकडून एकएक सिद्धी प्राप्त करत शेवटी केंद्रापर्यंत पोचतो. या 'सिद्धता' (attainment) मिळवण्याच्या उपासनेत वर्तुळापेक्षा शुद्ध आणि योग्य चिन्ह दुसरे कुठले असू शकते?
त्यामुळे योगिनींच्या मंदिरांचा आकार वर्तुळाकार आहे. याव्यतिरिक्त वर्तुळाकार मंदिरं फारशी सापडत नाहीत. प्राचीन स्थापत्यशास्त्राच्या ग्रंथात मंदिरांची वर्तुळाकार रचना नोंदली आहे. प्रत्यक्षात मात्र 'योगिनी' मंदिरं सोडली तर अश्या मंदिरांची रचना फारशी दिसत नाही.
तांत्रिक उपासनेत वर्तुळाला फार महत्व आहे. आणि उपासनेतील महत्वाच्या विधींसाठी वर्तुळाकार रचना महत्वाची ठरते. अशाप्रकारची उपासनेची अनेक योगिनी चक्रं तांत्रिक ग्रंथात दिली आहेत. प्रथम कागद, जमीन यांचा वापर करून अशी चक्र निर्माण केली जात आणि त्यांची Symbolic पद्धतीने उपासना केली जाई. नंतरच्या काळातच या चक्राकार रचनेवरून मंदिरं स्थापन करण्यात आली. 'योगिनी' मंदिरातील सर्व रचना, योगिनीच्या मूर्तींची विशेष जागा, मध्यभागाची मूर्ती हे सर्व तांत्रिक उपासनेच्या ग्रंथातून दर्शविलेल्या, नोंदलेल्या विविध योगिनी चक्रांचेच आराखडे आहेत. अशी अनेक प्रकारची 'योगिनी' चक्रं या ग्रंथांतून अस्तित्वात आहेत. ज्या पद्धतीची उपासना, ज्या पद्धतीची सिद्धी प्राप्त करून घ्यायची त्या प्रकारच्या 'योगिनी चक्राचा' उपासनेसाठी अवलंब केला जाई.
तांत्रिक ग्रंथांमध्ये 'योगिनी' साधना प्रतीकरूपाने करण्याबद्धलही नोंद आहे. काही अतिशय प्रगल्भ ध्यानाच्या प्रकारात योगिनींची साधना शरीरातील स्थानांवरून होते. यातील आठ महत्वाच्या योगिनी देवतांचे स्थान शरीरातील महत्वाच्या चक्रांवर(मूलाधार,स्वाधिष्ठान,मणीपुर,अनाहत,विशुद्धि,आज्ञा,सहस्त्रार) असते. (कुंडलिनी इ. योगिक प्रकारांशी साम्य असले तरीही ही योगिनी साधना वेगळ्या प्रकारची असते. तरीही दोहोंमध्ये साम्य आहे)
तांत्रिक साधनेत चक्र, मंडळ आणि यंत्र याना महत्वाचे स्थान आहे. मंडळ म्हणजे देखील चक्रच. पण हे मंडळ चौकोनी देखील असू शकते. योगिनी आणि सप्त/अष्ट मातृका या वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरीही एकीपासून दुसरी बनली असावी किंवा दोन्हींत देवाणघेवाण असावी, त्यामुळे काही ठिकाणी 'योगिनीं' मध्ये मातृकांचा समावेश केला जातो. मातृकांचे मंडळ चौकोनी असते, बहुदा याच कारणासाठी खजुराहो आणि इतर काही ठिकाणची योगिनींची मंदिरे चौकोनी असावीत का? कारण खजुराहो येथील 'योगिनींच्या' मंदिरात एकही मूर्ती अस्तित्वात नसली तरी या मंदिरातल्याच असलेल्या (असे मान्य झालेल्या) तीन मूर्ती खजुराहोच्या संग्रहालयात आहेत आणि त्या मूर्ती मातृकांच्या आहेत. 'मंडळ' म्हणजेही एक प्रकारचे चक्रच. वास्तुशास्त्रात या 'मंडळा' ला फार महत्व आहे. वास्तूपुरुषमंडळ अजूनही वास्तूत निर्माण करून पुजले जाते. या मंडळाचे महत्व वास्तूचा (शरीर) आणि विश्वा(cosmos)शी संबध जोडण्यात आहे असे मानले जाते. 'यंत्र' हे देखील चक्र, मंडळं यांच्या आकृतीरूपाने तांत्रिक पद्धतीमध्ये महत्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा योगिनींच्या मंदिरांशी , त्यांच्या उपासनेशी थेट संबंध आहे.
चौसष्ट ? एक्याऐंशी? बेचाळीस?
प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये संख्या आणि अंकशास्त्राला अतिशय महत्व आहे. आणि काही विशेष अंक शुभ मानले गेले आहेत. जसा आकडा चार आणि त्याचे गुणक आठ, बारा, चौवीस, चौसष्ठ, चौऱ्याऐंशी. आठ हा देखील शुभ. तर त्याचा वर्ग चौसष्ट तर अतिशुभ म्हणून चौसष्ट या आकड्याला धार्मिक संकल्पनांत महत्वाचे स्थान आहे. चौसष्ट कला/विद्या मानल्या जातातच. तांत्रिक उपासनांतही चौसष्ट आकड्याला महत्व आहे. त्यांच्या पंथात चौसष्ट मुख्य तंत्र आहेत. 'कौलार्नव'(Kularnava) या ग्रंथात दहाव्या प्रकरणात योगिनींची संख्या चौसष्ट दिली आहे. आठ कुलं आणि चौसष्ट योगिनी. 'कौलाज्ञाननिर्णय' या ग्रंथातही चौसष्ट योगिनींचा संदर्भ आहे. 'मतोत्तर' तंत्रात २ चौसष्ट योगिनींचे चक्रे दिले आहेत आणि एक एक्याऐंशी योगिनींचे चक्र दिले आहे.
'अष्टाष्टक'(८ ग्रुप चे ८) हि देखील महत्वाची संख्या मानली जाते.नऊ हा आकडाही तसाच शुभ मानला जातो. नऊ मातृका आहेत. नवग्रह, नवदुर्गा यामुळे नऊ अंकालाही स्थान आहे. त्याचा वर्ग एक्याऐंशी हीदेखील काही ठिकाणच्या मंदिरातील योगिनींची संख्या आहे. बेचाळीस हा देखील तांत्रिक जगात महत्वाचा अंक आहे. 'भूतालीपी' हे योगिनींचे चक्र बेचाळीस योगिनींचे आहे. संस्कृतमधील बेचाळीस अक्षरांना तंत्रात महत्वाचे स्थान आहे. भूता(जिवंत), लिपी(अक्षरं). संस्कृतमधील अक्षरांना मातृका मानून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे कदाचित तांत्रिक उपासनेत त्यातल्या बेचाळीस अक्षरांना उपासनेत मातृकांच्या , योगिनींच्या रूपाने पुजले जात असावे.चौसष्ठ, एक्यांऐंशी , बेचाळीस या संख्या तांत्रिक ग्रंथातील तपशीलावरूनच आल्या आहेत.
योगिनींचे अंतरंग
कौला पंथाच्या अनेक ग्रंथांमध्ये योगिनी आणि यक्षिणी यांच्यामधील संबंध दर्शविला आहे. 'यक्षिणी' ही संकल्पना 'योगिनी' पेक्षाही जुनी आहे.वृक्षांवर राहणाऱ्या, रक्षक, सुपीकता, सुबत्ता यांचे रूप म्हणजे यक्षिणी. बारहूत, सांची येथे 'यक्षिणीं'ची (वृक्षाला धरून, फांद्यांना धरून उभी असलेली) शिल्पे आहेत, ज्यांना शालभंजिका म्हणतात. कौलार्नव तंत्रातही योगिनी वृक्षावर स्थित असतात असे नोंदले आहे. हे वृक्ष कुलवृक्ष आहेत. यांना तोडणे, त्यांच्या खाली राहणे, त्यांची पाने तोडणे निषेधार्ह आहे. हा संबंध अप्रत्यक्ष असला तरी जैन ग्रंथात मात्र प्रत्यक्ष संदर्भ आढळतात. यक्षिणी सुद्धा योगिनींप्रमाणे 'सिद्धी' दायिनी आहेत. आणि त्यांचा योगिनींशी असलेला संदर्भ हे दर्शवतो कि योगिनी या संकल्पनेचे मूळ प्राचीन आहे.
तांत्रिक ग्रंथांत, योगिनींची निर्मिती आठ महत्वाच्या देवतांपासून झाली आहे, असे नोंदले आहे. या आठ देवता आठ भैरवांच्या पत्नी आहेत. डाकिनी, राकीनी, लाकीनी, काकीनी, साकिनी, हाकिनी, याकिनी आणि कुसुमा अश्या या आठ देवता. याच देवता शरीराच्या चक्रांवर स्थित आहेत असेही अनेक ग्रंथातून दर्शविले आहे. चौसष्ट योगिनींची अनेक नावं उपलब्ध आहेत. परंतु कुठच्याही मंदिरात ही नावं सारखी नाहीत. अनेक ग्रंथातून दर्शवलेली नावंही सारखी नाहीत.
योगिनींच्या साधनेमागे मूळ ध्येय मोक्ष, जीवनमुक्ती असले तरी त्यांची साधना ही अनेक प्रकारच्या शाररिक, भौतिक सिद्धी मिळवण्यासाठी होत होती. तांत्रिक ग्रंथांतून या सिद्धिंची चर्चा होते. खुद्ध शिवाने या सिद्धी बहाल केल्या आहेत असे या ग्रंथांतून सांगितले गेले आहे. या आठ सिद्धी पतंजलीच्या योगिक सूत्रात आणि राजा भोज याच्या स्थापत्यग्रंथातही दिल्या आहेत. या सिद्धी आहेत , 'अनिमा' म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म होता येणे, असे होऊन अतिसूक्ष्म अणूच्या अंतरंगात प्रवेश करून सर्व गोष्टींचे मूळरूप जाणणे शक्य होते. त्याचे आणि सर्वाठायीं असलेल्या ऊर्जास्रोताचे ज्ञान होते. 'महिमा' म्हणजे प्रचंड होणे , ज्यामुळे अनंतव्याप्तीचे आकलन होते. 'लघिमा' म्हणजे वजनरहित होणे. या सिद्धीने शरीरापासून मुक्त होऊन संचारी स्वरूप प्राप्त करता येते. 'गरिमा' म्हणजे अतिस्थूलता प्राप्त होणे. 'प्रकाम्या' म्हणजे अशी इच्छाशक्ती प्राप्त होणे ज्याच्या बळावर कुठलेही मन, कुणीही काबूत येऊ शकते. 'ईशित्व' म्हणजे शरीर आणि मन यावरचा ताबा, स्वतःच्या आणि इतरांच्याही (सर्व जीवसृष्टीच्या) , 'वशित्व' म्हणजे भौतिक गोष्टींवरचे प्रभुत्व, जसे पाऊस, अग्नी , पर्वत इ.
'कामवसायिता' म्हणजे ज्याची कामना करावी ते प्राप्त करता येणे. या व्यतिरिक्त तांत्रिक ग्रंथात योगिनींच्या इतर अमानुषी सिद्धींबद्धलही बरेच विवेचन आहे. हे सर्व एखाद्या जादुई जगातील जादुई गोष्टींपेक्षा कमी नाही. नकारात्मक गोष्टींबरोबर सकारात्मक गोष्टींच्या सिद्धीही प्राप्त होतात. जसे 'कवित्व मनोहरम' हि सिद्धी श्रेष्ठ काव्यनिर्मिती करण्याची आहे.
पारंपरिक हिंदू पुराणांतही योगिनींच्या अद्भुत शक्तींची नोंद घेतली गेली आहे. स्कंदपुराणांत योगिनींबद्धल असलेल्या तपशिलात त्यांच्या अनेक सिद्धींबद्धल माहिती दिली आहे. काही तांत्रिक ग्रंथात कोणत्याही सिद्धींची चर्चा केलेली नाही परंतु सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती, रोगनिवारणशक्ती अशी या योगिनीच्या उपासनेची फळं दर्शविली आहेत. काही योगिनीचक्रांच्या उपासनेतून सामर्थ्य(विशेषतः राजकीय, शस्त्र, सैन्य सामर्थ्य ) प्राप्त होते असेही उल्लेख आहेत, हि योगिनी चक्र त्या काळच्या अनेक राजा, राज्यसत्तांकडून उपासिली जात असावीत. जश्या या योगिनी सिद्धी प्राप्त करून देतात तश्या त्या क्रोधीत होऊन शापतात असेही उल्लेख अनेक ठिकाणी आहेत. त्यांच्या या गूढतेमूळेच, त्यांच्यासभोवताली असलेल्या गुप्ततेमूळे, अमानुषी तत्वांमुळेच पारंपरिक धार्मिक संस्कृतीपासून त्या दूर राहिल्या असाव्यात. त्यांच्याशी जोडलेल्या गुप्त उपासना, त्यांची निर्जन मंदिरे, काही योगिनींचे भयकारी स्वरूप यामुळेच गावातील इतर जनांच्या मनात त्यांच्याविषयी भीती , आकर्षक गूढता निर्माण झाली असेल.
योगिनींची साधनादेखील गुप्त, गूढतापूर्ण आणि जहाल स्वरूपाची असते. मद्य, मांस, रक्त यांनी परिपूर्ण अशी ही साधना असते, जीला अनुसरणे साध्यासुध्याचे काम नाही. त्याचा अवलंब करणारे या घोर उपासनेचे गुरुच आणि कठोर साधना करणारे साधकच या प्रकारची साधना करत असत. यामध्ये शवसाधना हाही एक भाग होता. अणि मैथुन हे देखील या साधनेचे महत्वाचे अंग होते. या साधना अतिघोरी, रक्तरंजित आणि भय उत्पन्न करणाऱ्या, असामान्य वाटल्या तरी एक मात्र आहे कि अश्या साधना, उपासना या आदिम जीवनाचे एक अंग आहे. हे नाकारून चालणार नाही कि समाज आता सुसंकृत झाला असला तरी धार्मिक कार्यात बळी (sacrifice) हे आजही अत्यंत महत्वाचे अंग आहे. त्याचे स्वरूप सौम्य झाले असेल परंतु आजही symbolic स्वरूपात sacrifice होत आहेत. योगिनींच्या साधनेत त्या मंदिरांत खरोखर कुठच्या प्रकारांचा अवलंब केला जात होता हे समजणे कठीण आहे. पण त्याचे स्वरूप कठोर, जहाल होते एवढे मात्र खरे. काही योगिनींची नावेच इतकी भयावह आहेत जशी मांसप्रिया, रुधिरापायीनी. योगिनींची काही रूपेही शव घेतलेली, मुंडक्यांच्या माळा घातलेली(मुंडधारीणी) आहेत.
या सर्व गोष्टींवरून हे ध्यानात येते की अतिसौन्दर्यपूर्ण, गूढ आणि दैवी मूर्ती असलेल्या योगिनींशी एकप्रकारची नकारात्मक शक्तीही जोडलेली आहे.
No comments:
Post a Comment