हिल वुमेन १९३५ |
अमृता शेर गिल बद्धल अनेक वर्षांनंतर कलेशी पुन्हा हातमिळवणी केल्यानंतर नव्याने ओळख झाली. तिच्याबद्धलची उपलब्ध सर्व माहिती वाचली, लायब्ररीतील तिची काही चरित्रंही वाचली. तिची नव्याने होणारी ओळख पूर्णपणे झपाटून टाकणारी होती. त्याहूनही झपाटून टाकणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिची चित्रं.
अमृता शेर गिलचा जन्म १९१३ साली हंगेरीतल्या बुडापेस्टमध्ये झाला. तिची आई हंगेरियन आणि वडील भारतीय (शीखसंप्रदायाचे) होते. तिचे वडील अत्यंत विद्वान होते. ते कवी तर होतेच पण त्याबरोबरच संस्कृतचे आणि पर्शियन भाषेचे गाढे अभ्यासक होते. आई पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा अभ्यास असलेली अतिशय चांगली पियानो वादक आणि गायिका होती. अमृताला कलेचा वारसा दोन्हीकडून मिळाला. त्यातल्यात्यात आईकडून जास्त, कारण तिला कलेची ओळख, ओढ लावण्यामागे आईचा प्रथमपासून सहभाग होता. अमृताने उत्कृष्ट पियानोवादक व्हावे अशी तिची इच्छा होती. त्यामुळेच अमृताने लहानपणी संगीताचे आणि पियानोचे धडे घेतले. त्यात ती अतिशय निपुणही झाली. ती लहानपणी चित्रेही काढत असे. पण जेव्हा चित्र आणि संगीत या दोघांमधे निवड करण्याची वेळ आली तेव्हा मात्र तिने चित्र निवडले. ती स्वतःच म्हणते की 'मला दोन्हींबद्धल प्रेम आहे, पण जेव्हा मला समजले की मी दोन्ही डगरींवर पाय देऊन पुढे जाऊ शकत नाही, कुठल्यातरी एकातच मला माझं सगळं ओतून पुढे जावं लागेल तेव्हा मी चित्रकला निवडली'. असे असले तरीही अमृताने पियानोची साथ आयुष्यभर सोडली नाही. जेव्हा ती अतिशय उदास होई तेव्हा तासंतास एकटीच पियानोचे सूर छेडत बसून राही.
अमृता आणि तिची लहान बहीण इंदिरा या दोघांनाही त्यांच्या आईने संगीताचे शिक्षण दिले, पण आई विशेषतः अमृताबाबतीत जास्त महत्वाकांक्षी होती. अमृताच्या कलाविषयक गुणांची जाणीव आणि कदरही तिला पुरेपूर होती. जन्मापासून ११ वर्षांनंतर (पहिल्या महायुद्धाच्या काळात) अमृता आईवडिलांसमवेत भारतात आली, आणि शिमला येथील उच्चभ्रू हिल हाऊस मध्ये राहू लागली. तिथेच राहणाऱ्या इटालियन शिल्पकाराशी अमृताच्या आईचे संबंध जुळले. तिने त्याच्याकडून अमृताला कलेचे प्राथमिक धडे देण्याचाही प्रयत्न केला. काही काळानंतर जेव्हा तो शिल्पकार पॅरिस येथे निघून गेला तेव्हा अमृताच्या आईने मुलींना घेऊन पॅरिस गाठले, कारण असे की अमृता आणि इंदिराचे रीतसर केलेचे शिक्षण व्हावे.(प्रत्यक्षात मात्र ती शिल्पकाराच्या ओढीने आली होती) काही का असेना पण अमृताला इथे कलाविषयक शिक्षण घेता आले. तिच्या आईचे शिल्पकारावरचे प्रेम काही यशस्वी झाले नाही परंतु अथक परिश्रम करून अमृताने चित्रकलेत नैपुण्य संपन्न केले. तो काळ Post-Impressionism, Cubism चा होता. पोस्ट इंप्रेशनिझम मागे पडून 'आंन्रि मातीस', 'पिकासो', 'ब्राख' यांचा 'मॉडर्न आर्ट' चा काळ येऊ घातला होता. हे चित्रकार आपल्या चित्रकलेच्या नानविध प्रयोगांनी पुढे येत होते. अमृताची या काळातील म्हणजे १९३० ते १९३३ या काळातील चित्र ही पाश्चात्य शैलीतील आहेत.
हि चित्रं अभ्यासचित्रं असली तरी यातूनच तिच्या विशेष शैलीची, आणि तिच्या व्यक्तिमत्वाची छटा दिसते. तिचे व्यक्तिमत्व म्हणजे एकाचवेळी फुलपाखरासारखे बागडणारे बहिर्मुख आणि अतिशय गहन,विचारमग्न अंतर्मुख असे दोन्हीही.
जोरकस रेषा , रंगांची घनता, विशेषतः योग्य तिथे उजळ रंगाचा वापर, पण चेहऱ्यावरचे भाव मात्र खोल काहीतरी शोध घेणारे, आत्ममग्न, उदासी, हे विशेष तिच्या या काळातील अभ्यासचित्रातही दिसतात. यामूळे तिची चित्र फक्त तिची वाटतात. ती या तिच्या सुरवातीच्या चित्रांमध्ये लाल रंगाचा अतिशय निर्भीड वापर करताना दिसते. व्यक्तिचित्रणात व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव जणूकाही तिच्या भावांचे प्रतिबिंब घेऊनच येतात. तिच्या व्यक्ती Melancholic आहेत. खोलवर पाहणाऱ्या, विचारात मग्न किंवा आत्ममग्न होऊन स्वतःतच बुडालेल्या. ती या चित्रांतून स्वतःलाच शोधात असल्यासारखी वाटते. काहीशी गोंधळली, काहीशी बेधडक, काहीशी आत्ममग्न, काहीशी अस्वस्थ. अमृता एकतर अतिशय बहिर्मुख होऊन जाई किंवा अतिशय अंतर्मुख. तिच्या या दोन टोकातील ताण बहुतेक तिलाच पेलवत नसे. त्यामुळेच तिची आंतरिक जडणघडण या असह्य ओढाताणीत Melancholy(उदासी) कडे झुकली असावी.
अमृता आपल्या आयुष्यात अत्यंत स्वछंद जगली. कशाचीही भीडभाड न ठेवता तिने आयुष्यात मुक्तसंचार केला, तिचे कामजीवनदेखील बरेचसे बंधन विरहित होते. तरीही त्याला स्वैराचार म्हणता येणार नाही याचे कारण तिची स्वतःची मानसिक जडणघडण, तिचे व्यक्तिमत्व होते. ती स्वछंदी होती पण स्वैर नव्हती, तिच्या जगण्याच्या शैलीतून, तिच्या लेखनातून, पत्रांतून याचा वारंवार प्रत्यय येतो. तरीही तिच्या या स्वछंदी जगण्याची किंमतही तिला मोजावी लागली.
तिचं एक चित्र आहे 'यंग गर्ल्स'. हे चित्र अतिशय भव्य पुरुषभर उंचीचे आहे. अतिशय Vibrant रंग आणि सुंदर रचना या चित्रात आहे. या चित्रामुळे अमृताला पॅरिसच्या प्रतिष्ठीत सॅलोन मध्ये स्वीकारलं गेलं होतं.
यंग गर्ल्स |
या चित्रात दोन तरुणी नव्वद अंशाच्या कोनात एकमेकांसमोर बसल्या आहेत. त्यांच्यात जवळीकही आहे आणि दुरावाही आहे. त्या संवाद करत आहेत का? त्याच्यात कुठला बंध असेल याचाच विचार बघणारा करीत राहील. काळ्या केसांची तरुणी विचारमग्न होऊन दुसऱ्या तरुणीकडे पाहत आहे आणि पाहतानाही ती स्वतःच्या विचारात गढलेली वाटते. ह्या दोन्ही तरुणींमध्ये कसले विचित्र आकर्षण भरून राहिले आहे कोण जाणे? पाहणाऱ्याला मात्र ते जाणवत राहते. सोनेरी केसांची स्त्री कमरेपर्यंत नग्न आहे, पण तिचे नग्न शरीर तिच्या विपुल सोनेरी केसांनी झाकले आहे. या चित्रातले रंग विशेष सुंदर आहेत. जसं काळ्या केसांच्या तरुणीने लाल, हिरव्या रंगाचे चकाकते रेशमी वस्त्र परिधान केले आहे. तर सोनेरी केसांच्या तरुणीने निळे पांढरे उंची तलम वस्त्र परिधान केले आहे. ही रंगाची भिन्नता या चित्राला वेगळा उठाव देते. या काळातले दुसरे चित्र म्हणजे 'बॉय विथ ऍपल'. या चित्रात अमृताने सर्व अकॅडेमिक शैलीचे पाश तोडून अतिशय साध्या पद्धतीने हे चित्र चितारले आहे. आकार अतिशय सुलभ, सोपे करून फक्त चित्रातील भावभावनेला महत्व दिले आहे. ही तिची निर्मिती स्वतंत्र वाटते आणि अशी काही चित्रं तिने पुढे काढली. हे चित्र तिच्या पुढच्या स्वतःच्या शैलीचा प्रारंभ करणारे चित्र असावं का? इथपासून तिची चित्रणपद्धती बदलत गेली.
तिच्या पॅरिसच्या मुक्त जीवनातील आणि एकंदरीत तिच्या युरोपच्या रहिवासाच्या काळातील चित्रे कौशल्य आणि चित्रकलाविषयक जाणिवांनी संपन्न होती. पण तिची स्वतःची अशी शैली, ज्याच्या ती शोधात होती, ती काही तिला अजून सापडली नव्हती. तिचा स्वतःचा शोध तिला स्वस्थ बसू देत नव्हता. तिने या काळात अनेक सेल्फ-पोर्ट्रेट्स देखील केली. आत्मचित्रणातून ती काय जणू इच्छित होती? स्वतःच्या परस्पर विसंगत स्वभावांची दोन टोकं ती आकळू पाहत होती. ही तिची चित्रं अतिशय प्रखर होऊन तिच्या अंतरंगावर प्रकाश टाकतात. तिने केलेल्या अनेक सेल्फ-पोर्ट्रेट्समध्ये तिचे एक चित्र प्रत्यक्षात सेल्फ-पोर्ट्रेट नसले तरी मला ते तिचा अंतरंग ढवळून तिने काढले असावे असे वाटते, ते म्हणजे 'टू गर्ल्स'. (हे चित्रं जरी तिने फार नंतर निर्माण केलं असलं तरी हे एक प्रकारचं आत्मचित्रच वाटतं) ह्या चित्रात ती स्वतःचा खूप खोल शोध घेत आहे असं जाणवत राहतं. अमृताचं आयुष्य म्हणजे एक कोडं, एक लिजंड होतं. तिचं व्यक्तिमत्वही जडजंजाळ. तिचा गूगल करून कुठचाही फोटो पहा, तुम्ही एक क्षण खिळून राहाल असं गूढ सौन्दर्य तिच्या चेहऱ्यात आहे. तिच्या सौन्दर्याने स्थिमित न झालेला माणूस विरळा. इतके अनुपम लावण्य लाभलेली स्त्री प्रत्यक्षात मात्र तिच्या आयुष्याच्या हिरव्या दिवसांत स्वतःला अतिशय गलिच्छ, आतून किडून-सडून गेलेली समजत असे. तिच्या डोळ्यात लहानपणी तिरळेपणा होता ज्यामुळे ती स्वतःला कुरूप समजत असे. तिला कुठल्या सौन्दर्याचा ध्यास होता? सौन्दर्य म्हणजे नक्की काय याचा ती अखंड शोध घेत होती. हा शोध पुरा झाला नाही हे दुर्दैव. तिची काही सेल्फ-पोर्ट्रेट्स अर्धनग्न आहेत. वेगवेगळ्या बाजूनी काढलेली, खेळकर, गंभीर, शून्यात बसलेली अशी बरीच , या सगळ्या चित्रातून स्वतःच्या कुठल्या अंतरंगाचा पाठपुरावा ती करत असावी? 'टू गर्ल्स' या चित्रातील काळी मुलगी आणि गोरी मुलगी ही अमृताच्या मनाचीच दोन रूपं आहेत असं मला वाटतं. एवढं प्रखर भावनेचं चित्रं तिचं दुसरं कुठलंच नसावं.
१९३४ मध्ये ती भारतात आली. तिच्या वडिलांचा तिच्या भारतात येण्यावर विरोध होता. कारण तिच्या स्वछंद स्वभावामूळे तिला इथल्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण होईल असे त्यांना वाटत होते. (त्याचबरोबर तिच्या मुक्त वावरामुळे इतरत्र उडणाऱ्या वावड्या, घरातील लोकांची तिच्या मुक्त वागण्यामुळे कुचंबणा/नाचक्की होईल की काय असेही त्यांना वाटत होते. आणि यामुळे अमृता आपल्याच वडिलांच्या या विचारांनी खूप दुखावली गेली होती.) तरीही तिने हट्टाने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या भारतात येण्याविषयी म्हणले आहे की 'भारतात येण्याविषयीची तीव्र ओढ वारंवार मला झपाटून टाकू लागली होती. काहीतरी विचित्रपणे मला सारखे जाणवत राहू लागले की चित्रकार म्हणून भारताची जमीन हीच माझं नशीब/नियती आहे'. या तीव्र इच्छेने ती भारतात परतली. पाश्चात्य पोशाख सोडून अतिशय पारंपरिक पद्धतीने भारतीय साडी परिधान करू लागली. तिला भारतीय भूमीतील आपले अस्तित्व शोधायची ओढ लागली होती, त्यासाठी ती भारतभर फिरली. अजिंठा-एलोरा, दक्षिण भारतातील शिल्पं, मंदिरं, त्याच्या चित्र-शिल्प शैली याने ती अतिशय प्रभावित झाली. विशेषतः अजिंठ्याच्या चित्रातील रेषांनी तिला इतकं वेड लावलं की आपल्या चित्रांत तिने त्यापासून प्रेरणा घेऊन त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. भारतीय मिनीएचर शैलीचाही तिने अभ्यास केला. तिची या भारतातील आरंभीच्या काळातील चित्रं अजिंठ्याच्या शैलीचा, मिनिएचर शैलीचा विशेष प्रभाव दाखवतात. १९३५ ते ३७ या काळातीळ अनेक चित्रांपैकी काही आहेत, 'ब्रह्मचारीज' , 'हल्दी ग्राइन्डर्स' जी मला अतिशय वेगळी वाटतात कारण मला या चित्रात अमृताचं प्रतिबिंब दिसतं.
'ब्रह्मचारीज' या चित्रात प्रेक्षकांकडे पाठ करून बसलेला सर्वात छोटा मुलगा. तो मला अमृताचं प्रतिबिंब वाटतो. का बसला आहे तो पाठमोरा? बाकी सगळे बातचीत करत असताना त्याला कुणाशीही बोलायचं नाही. त्याला स्वतःतच मग्न होऊन राहायचं आहे. आता हे चित्र 'हल्दी ग्राइन्डर्स'चं.
या चित्रातही ती छोटी मुलगी बघा. तिच्यात काहीतरी साठवलेले आहे. जे घट्ट पकडून ती हिरव्या झाडाला टेकून गपचूप बसली आहे, हळद पिसणाऱ्या बायकांशी ती बोलत नाही, स्वतःतच गढून ती गेली आहे. आणि मागची झाडाच्या खोबणीतील बाई, क्लांत, विचारमग्न, तिलाही कुणाशी काहीच संवाद करायचा नाही. हे चित्र म्हणजे एक दृश्य कविताच आहे.
पण मला सर्वात जवळचं वाटणारं तिचं एक अतिशय तरल असं चित्रं म्हणजे 'द ब्राइड'
भारतीय ब्रम्हचारी १९३७ |
हल्दी ग्राइंडर्स १९३७ |
पण मला सर्वात जवळचं वाटणारं तिचं एक अतिशय तरल असं चित्रं म्हणजे 'द ब्राइड'
द ब्राईड |
या चित्राबद्धल स्वतःच अमृता लिहिते की तिने जेव्हा एक भारतीय लग्न बघितलं तेव्हा तिला सगळ्यात परिणामकारक वाटलं ते म्हणजे ब्राइडचं अस्तित्व. सगळीकडे गोंधळ-गडबड, वाद्यांचे आवाज, गर्दी, लग्न बहुतेक कुणा रईसाचे (हा रईस बहुदा थोराड दिसणारा) आणि एका बाजूला गप्प बसलेली अतिशय लहान अशी मुलगी, सुंदर, गोजिरवाणी, सजवलेली, तिच्या चेहऱ्यावर मात्र काळवंडलेले भाव, तिच्या मौनात मात्र खोल आर्तता, काहीच न बोलता डोळे खूप काही सांगून जाणारे. त्या 'ब्राईड'ने अमृताच्या मनावर एवढा परिणाम केला की तिने तिच्या चित्रांद्वारे या ब्राईडला अजरामर केले.
पाश्चात्य चित्रकारांमध्ये काही चित्रकारांचा तिच्यावर विशेष प्रभाव होता. चांगलं चित्रं म्हणजे काय हे जाणण्याची सिद्धी तिला प्राप्त होती. पॅरिसहून परत येताना तिथल्या एका चित्रसंग्रहालयातील एका चित्रापुढे ती अर्धा तास खिळून राहिली, ते चित्र होते व्हिन्सेंट व्हॅन गॉग चे 'चेअर' (खुर्ची)चे छोटेसे चित्र. पाऊल गोगँ या फ्रेंच चित्रकाराच्या विलक्षण जिवंत रंगांची तिच्यावर मोहिनी होती, कारण तिच्या चित्रांत त्याच्या Vibrant आणि त्याचबरोबर गडद अश्या रंगाच्या एकत्रित आविष्काराचे रूप दिसते. अश्या रंगाच्या रंगसंगतीने चित्राला उदासीची एक वेगळीच पातळी प्राप्त झाल्यासारखी वाटते. गडद burnt sienna, ऑकर, सेपिया, Indian Red यांचा वापर तिच्या चित्रात दिसतो.
तरीही एक प्रश्न मनात येतो की तिच्या चित्रात ती जे काही साध्य करण्याच्या प्रयत्नात होती ते तिला सापडले होते का? तिच्या बऱ्याचश्या चित्रातल्या व्यक्तींमध्ये काहीच संवाद (संवाद म्हणजे बडबड/तोंड उघडून बोलणे नव्हे) जाणवत नाही. परस्पर अदृश्य देवाणघेवाण वाटत नाही, त्या एकमेकांपासून तुटलेल्याच भासतात. अधांतरी वाटतात आणि फक्त चित्रातल्या मांडणीसाठी त्या एकत्रित केल्या आहेत असे का वाटत राहते? अमृताने भारतीय आणि पाश्चात्य शैलीत समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे पण भारतात मुरलेली अशी तिची चित्रं वाटत नाहीत. तिच्या आंतरिक ताणाचीच ती प्रतीकं आहेत का? एक अगम्य अधांतरीपणा त्यांच्यात जाणवत राहतो.
मला व्यक्तिगतपणे 'दुभंगलेल्या' गोष्टींचे विचित्र आणि विलक्षण आकर्षण वाटत आले आहे. त्यांच्या असण्याबद्धल, त्यांच्या स्वतःच्या दुभंगलेपणात जगण्याच्या धडपडीचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे, आणि त्याचबरोबर त्याच्या दुभंगलेल्या अस्तित्वाबद्धल विलक्षण सहानुभूती, विदारकताही जाणवत आली आहे. म्हणूनच मला अमृता शेर गिल खूप जवळची वाटते. तिचं व्यक्तिमत्व दुभंगलेलं होतं, तिच्यातलं सर्जनशील स्वत्व आणि बाह्य गोष्टी यात तीव्र दरी होती. त्या दरीचे मोजमाप अमृताकडे नव्हते. चित्रकार म्हणून आणि विशेषतः एक स्त्री चित्रकार म्हणून ती अनेक गोष्टींशी झगडत होती आणि तिच्या सवेंदनशील वृत्ती मारही खात होत्या. स्त्री आणि चित्रकार या दोन अस्तिवात कुठचे तिचे खरे अशीही तिची अवस्था होत असे. स्वतःचाच शोध तिला अपुरा वाटत होता, त्यात तिला कोणाची भागीदारी नको होती, त्यामुळेच तिच्या घरच्यांचा रोष पत्करून तिने तिच्या बालपणीच्या मित्राशी म्हणजेच आपल्या मावसभावाशी लग्न केले, कारण तिच्यामते तोच फक्त तिला समजून घेऊ शकला असता. एकीकडे ती फार बहिर्मुख होती, पॅरिस मध्ये आणि भारतातही ती लोकांच्या गराड्यात अनेक मैत्री,शारीरिक संबध यांच्या जंजाळात फसत राहिली. पण दुसरीकडे त्या स्वतःशी, ना सापडलेल्या अस्तित्वाचा वेध घेत राहिली. तिच्या व्यक्तिमत्वातील दुभंगलेपणा मला आकर्षित करतो आणि त्रस्तही करतो. अमृता धडपडत होती आपल्या अस्तित्वाची मूळं शोधायला. तिला तिची क्षमता कमी पडत आहे असं वारंवार जाणवत होतं का? जाणवत असावं कारण बाहेरून खूप उत्साही वाटणारी ती अनेकदा उदासीने घिरून राही, मग पियानोचे सूर छेडत ती एकटीच बसून राही. अत्यंत स्वछंद जीवन आणि भौतिक जग यामधल्या दरीच्या बाजूच्या दोन डगरी. त्यावर पाय फाकवून दोन टोकांवर ती उभी होती. तिची आधीची चित्रं ज्या जोमाने तिने निर्माण केली होती त्याला आता उतरती कळा लागली होती.
आयुष्याच्या शेवटच्या काळात म्हणजे १९३८ ते १९४१ मध्ये ती आपल्या पतीबरोबर भारतात परतून आली आणि लाहोरमध्ये राहू लागली. पण शेवटी शेवटी तिची शक्ती, तिची ऊर्जा मालवत जाऊ लागली तेव्हा ती अतिशय अस्वस्थ होऊ लागली. हा भव्य पट पुरता न आकळला जाताच उधळला जाणार याची जाणीव तिला झाली होती. आयुष्याच्या शेवटी तिला आपल्या अंताची चाहूल लागली होती? कारण इथल्या रहिवासात तिने भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला, त्यातही 'मी वेळ वाया घालवू शकत नाही' असेही तिचे सारखे म्हणणे होते. की आपल्या सर्जनशील शक्तीच्या होणाऱ्या अंताची जाणीव झाली होती?.. तिच्या शेवटच्या दिवसातील तिने लिहिलेल्या पत्रांतून तिच्या मानसिक अवस्थेची कल्पना येते. ती आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रात लिहिते 'तू गेल्यापासून मी काहीच(काम) केले नाही. उदासीनता आणि सुस्ती, प्रयत्न करण्याचेही वाटणारे भय, असं वाटतं हे सगळं काहीच उपयोगाचं नाही.' दुसऱ्या एका पत्रात तिचा हाच निर्वाणीचा सूर लागला आहे. हे पत्र आयुष्याच्या अगदी शेवटी (जुलै/ऑगस्ट १९४१ मध्ये ) तिने आपल्या एका मैत्रिणीला लिहिले होते, त्यात ती म्हणते 'मी गेल्या चार महिन्यांपासून ना ब्रशला स्पर्श केला आहे ना कॅनवासच्याजवळ गेले आहे. मलाच माहीत नाही का ते. जेव्हा मी परत कामाची सुरवात करायला जाते तेव्हा कसलीतरी भीती माझा कब्जा घेते. मी कितीही समजण्याचा प्रयत्न केला तरी मला ते समजत नाही आहे. मला असं वाटतं की चित्रं काढण्याच्या सवयीपासून स्वतःची सुटका करून घेतली जाऊ शकते. चित्रं न काढताही राहता येऊ शकते.'
“I have passed through a nervous crisis and am still far from being over it. Feeling impotent, dissatisfied, irritable and unlike you, not even able to weep…”
“I have passed through a nervous crisis and am still far from being over it. Feeling impotent, dissatisfied, irritable and unlike you, not even able to weep…”
शेवटच्या काळात तिला असेही वाटू लागले होते की तिची चित्रकला मृत होत आहे. त्याबद्धल, तिच्या अश्या वाटण्याबद्धल ती काहीही करू शकत नव्हती, त्यामुळे तिचा अस्वथपणा वाढत चालला होता.
बहुतेक तिच्या चित्रांच्या सर्जनाचा झालेला अंत तिच्याने बघवला नसावा. ३ डिसेंबर १९४१ ला अत्यंत अल्प अश्या डिसेंट्रीने आजारी पडली. त्यानंतर तिची प्रकृती झपाट्याने खालावत जाऊन ५ डिसेंबर , रोजी तिचे अवघे २८ वर्षांचे आयुष्य संपून गेले. तिच्या शरीरात पसरलेल्या आधीच्या ऍबडॉमिनल इन्फेक्शन मूळेही असे झाले असावे. अत्यंत गूढपणे आणि अकल्पितपणे तिचा मृत्यू झाला. अचानक. पण कदाचित असेही असेल का , ज्यामुळे ती जिवंत होती ती कलाच तिच्यातून मृत झाल्याचे तिला जाणवले असावे. तिचे असणे म्हणजे तिच्या कलेचे असणे होते. कला संपली, आणि त्याचबरोबर तीही. जेव्हा तिचा अंतिम समयी तिला फक्त रंगच दिसले असावेत, ज्या रंगांसाठी तिला आयुष्यभर अतृप्त ओढ होती तेच तिच्या डोळ्यासमोर तरळले असावेत. हे तिचे शेवटचे अपूर्ण चित्रं.मला तरी ते पूर्ण वाटतं.
अमृता शेर गिलने तिच्या चित्रांद्वारे माझ्या डोळ्यांच्या कडांवर एक कायमची काजळरेघ रेखली आहे. आणि त्या चरचरीत काळ्याकुट्ट काजळरेघेला डोळ्यात सलवत मी तिच्या चित्रांना अनुभवते तेव्हा दिसतं डोळ्यात तरळत जाणारं तिचंच धूसर प्रतिमा-प्रतिबिंब.
अतिशय उच्च दर्जाचं लिखाण आहे हे शिवाली.अमृता शेरगिलकडे आणि तिच्या चित्रांकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभली यातून.
ReplyDelete