Tuesday 28 June 2016

पुराणवृक्ष बाओबाब

'बाओबाब'. हे नाव ऐकल्यानंतर मला नेहमीच एक भव्य, अवाढव्य पण विश्वासार्ह असे काहीतरी जाणवते. बाओबाब, म्हणजे कुणीतरी ज्ञानी, पोक्त असा पण स्वतःच्या ज्ञानाचा एखाद्या प्रकांडपंडितासारखा बाऊ न करणारा, दिखावा न करणारा, सर्वसामान्यातलाच एक वाटतो. तसाच हा बाओबाब वृक्ष. 
बाओबाब हे नाव खरं तर त्याला साजेसं आहे. त्याच्या विचित्र, विलक्षण रुपावरुनच हे नाव त्याला दिलं गेलं असावं. 'बाओबाब' या शब्दाचा उगम अरबी किंवा नेटिव्ह-आफ्रिकेतील भाषेतून झाला असावा. कारण हा वृक्षाची उत्पत्ती मूळची  तिथलीच. अरबीमध्ये अबू-हिबाब  म्हणजे 'अनेक बीजांचा जन्मदाता'.
'कॅमेरून'मधे एखाद्याला त्याच्या उत्तुंग कामगिरीसाठी 'बाओबाब' असे संबोधले जाते, तर साऊथ आफ्रिकेत टक्कल पडलेल्या, वृद्ध, कंगाल माणसाला बाओबाब म्हणतात. कुठून कसं कोण जाणे पण या बाओबाबने अनेक वर्षांपासून माझे लक्ष वेधून घेतले होते.

अलीकडेच मी मध्यप्रदेश मधील 'मांडू' येथे गेले होते. तिथे तेराव्या-पंधराव्या शतकांतील 'खिलजी' रियासतीच्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. तिथली काहीशी माहिती शोधत असताना वाचनात आलं की मांडूमध्ये 'बाओबाब' वृक्ष खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, तेव्हा मला बाकीच्या ऐतिहासिक वास्तूंपेक्षा बाओबाबचं झाड बघण्याचीच जास्त उत्सुकता वाटली. पूर्वी अनेक ठिकाणी या झाडाबद्धल वाचलं होतं पण प्रत्यक्षात ते कधी पाहता आलं नव्हतं. मुंबईत राणीच्या बागेत, पुण्यात युनिव्हर्सिटी आणि आयुका मध्ये इ. ठिकाणी हे झाड आहे असंही वाचलं होतं, पण ही सर्व नाविण्य म्हणून मुद्दाम लावलेली झाडं.  मला सपशेल निसर्गातलं झाड बघायचं होतं. हा वृक्ष मूळ आफ्रिकेतला. भारतात काही मोजक्याच ठिकाणी आढळतो. त्यामुळे मांडू येथील बाओबाब, मिळतील तेवढे बघायचे असं मी ठरवलं. मांडू या गावात शिरल्याबरोबरच आपल्याला हे प्रचंड बाओबाब वृक्ष दिसायला लागतात. मला एका पडक्या दगडी पुराणवस्तूच्याच शेजारी उभे असलेले दोन बाओबाब दिसले. तिथे गाडी थांबवून उतरून बघतो तर आणखी अनेक वृक्ष त्या बाजूला आसपास पसरले होते. मोडक्या ऐतिहासिक वस्तूच्या बाजूला एखाद्या पुरातन स्मारकाप्रमाणे ते उभे होते. 

हो, खरंच बाओबाबचं झाड म्हणजे निसर्गाने उभारलेलं भव्य स्मारकच. सगळ्यात आधी आकर्षित करतो त्याचा आकार, झाडाचं प्रचंड घेराचं खोड वरती निमुळतं होत गेलेलं आणि त्यावर फांद्या, या फांद्यांना पोपटी रंगाची पानं. झाडाच्या मानाने पानांचा आकार बराच छोटा आणि पानं एकत्रित गुच्छासारखी.  भारतात आढळणारा हा 'बाओबाब' इथे रुजून इथल्या मातीत वाढलेला, परदेशी माणूस इथे अनेक वर्षे राहून, रुळून इथलाच झाल्यानंतर कसा वाटेल, त्याप्रमाणे वाटतो. त्याच्या मूळ आफ्रिकन भावाला बघितले तर याची लगेच प्रचीती येते. याचा आफ्रिकन भाऊ बराच उंच असून त्याच्या फक्त शेंड्याला थोड्या फांद्या आणि पाने असतात. याउलट इथला बाओबाब भारतात मुरलेला, (आफ्रिकन भावाच्या मानाने) थोडासा बुटका आणि भरपूर फांद्या डोक्यावर घेऊन उभा असतो. आफ्रिकेत पाण्याच्या असलेल्या दुर्भिक्षामुळे या झाडाच्या खोडात हजारो लिटर्स पाणी साठवण्याची क्षमता असते.  इथे भारतात त्याला पाण्याचे तेवढे दुर्भिक्ष्य नसल्याने आणि इथल्या वातावरणाशी जुळवून घेतल्याने त्याचे बदलेले रूप इथे पाहायला मिळते. तरीही आपले स्वत्व जपून हे झाड आपले वेगळेपण दाखवत इतर  झाडांत उठून दिसते, चटकन ओळखता येते. तसे हे झाड इतर झाडांशी फारसे मनमिळाऊ नाही, त्याच्या आसपास सहसा कुठलेही मोठे वृक्ष दिसणार नाहीत. असलीच तर छोटी झुडपं पायाशी. त्याच्या अवाढव्य बुंध्यामुळे त्याच्या आजूबाजूला मोठी झाडं वस्तीस नसतात. बरं फांद्या आणि पानेही घनदाट नाहीत, त्यामुळे पक्षी यांवर घरटी करतात की नाही शंकाच आहे. याच्याकडे पाखरांशी हितगुज करणारा लडिवाळपणा नाही, वाऱ्याच्या कलाने घेऊन सळसळणे नाही, कि त्याच्या तालावर डोलणे नाही. हा आपला शांत, एकटा, धीर गंभीर उभा असतो.

आफ्रिकन बाओबाब आणि त्याचा इंडियन भाऊ 'भाऊबाब'

मांडू येथील हा बाओबाब 

बाओबाब म्हणजे खरा वाळवंटातला कणखर योध्दाच, तो नेस्तनाबूत होणे किंवा त्याला सहजासहजी मारणे अशक्य. त्याचा बुंधा तासून जर त्याला  पाडण्याचा प्रयत्न केला तर नवीन बुंधा निर्माण करून पुन्हा वाढण्याची क्षमता त्याच्यात आहे. याला जाळलं तरी मूळांच्यावरून कोंभ उगवून तो तिथून वाढत जातो. याची मूळे इतकी खोल गेलेली असावीत की त्याचा पाठपुरावा करणं माणसाच्या आवाक्याबाहेरचं काम आहे. ह्या वृक्षाचा मृत्यू फक्त तेव्हाच होतो जेव्हा त्याची जगण्याची क्षमता संपून त्याचा बुंधा आतून सडत जातो आणि एके दिवशी तो बुंध्यातून तुटून खाली कोसळतो. स्थानिक लोक असेही मानतात की जेव्हा या वृक्षाची जगण्याची इच्छा संपते तेव्हाच  तो स्वतःच आतून पोखरत पोखरत शेवटी कोसळून पडतो. खरोखरच त्याचे जीवन म्हणजे तत्वज्ञानाचा एक वस्तूपाठच.  हजारो वर्षे जगणारा हा वृक्ष एक पुराणवृक्षच म्हटला पाहिजे. एखाद्या तपस्व्यासारखा वर्षानुवर्षे एका ठिकाणी उभा राहून चिंतन करणारा गतकाळाचा एक साक्षीदार. वनस्पतीशास्त्रज्ञ एम्. ऍडॅन्सन (आडांसाँ) यांनी एका बाओबाबचे वय ५००० वर्षांचे असल्याची नोंद केली आहे. मांडू येथेही असलेले वृक्ष ३००-४०० वर्षे जुने असण्याची शक्यता वाटते. काही काहींचा व्यास तर १०   ते १५  फुटांचा आहे. मांडू मधल्या ऐतिहासिक घडामोडी, युद्ध, उत्कर्ष आणि संहार हे त्याने उघड्या डोळ्यांनी निमूटपणे पाहिलं असेल. मेजवान्या घडल्या, नाच-गाणी,आनंद चहुबाजुंनी ओसंडला, प्रीती फुलल्या, अंगार कोसळले, तोफा झडल्या, राजे-महाराजे धारातीर्थी पडले, राजेशाही महाल नेस्तनाबूत झाले, हे सारं काही या वृक्षाने स्तितप्रज्ञासारखे बघितले असेल.हा वृक्ष जर बोलायला लागला तर इतिहास, उत्क्रांती, जीवशास्त्र, पुरातत्वशास्त्र, भौगोलिक रचना यांचे त्याचे संग्रहण एकामागून एक रहस्ये उलघडत जाईल. 

या वृक्षाला नावंही अनेक आहेत. मराठीत याला गोरखचिंच म्हणतात. उत्तरेकडे 'पारिजात' असे म्हणतात(महाराष्ट्रातल्या पारिजातकाच्या झाडाशी त्याचा काहीही संबंध नाही), शास्त्रीय नाव देखील 'ऍडॅन्सोनिया डिजिटॅटा' असे फारच विशेषपूर्ण आहे जे एका प्रख्यात फ्रेंच वनस्पतीशास्त्रचे नाव 'एम्. ऍडॅन्सन' (आडांसाँ) आणि हातांच्या पाच बोटांसारखा पानांचा आकार ( शरीरशात्रानुसार त्याला 'डिजीट/डिजिटेट' म्हणतात) यावरून पडले आहे. आणखी बऱ्याच नावांनी म्हणजेच  पारापुलिया, पुरिमारम(तामिळ), गोरख-इमली(हिंदी), गोरख आमली,रुखडो (गुजराती) अश्या नावांनी हा वृक्ष परिचित आहे. मांडू परिसरात याला 'मांडू की इमली' असं स्थानिक नाव आहे. परदेशातही त्याला अनेक नावं आहेत, त्यापैकी माकडांना त्याची फळं खायला आवडतात म्हणून 'मंकी ब्रेड ट्री' , आणि विचित्र आकारावरून ' अपसाईड-डाऊन  ट्री' ही काही विशेष नावं आहेत.

या प्रचंड वृक्षाने पुरातन काळापासून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळेच या वृक्षाबद्धल अनेक आख्यायिका आहेत. ऐतिहासिक पुराव्यानुसार अरब व्यापाऱ्यांनी हा वृक्ष १५०० वर्षांपूर्वी  भारतात आणला असावा. हा वृक्ष कुठेही पडलाय आणि वाढतोय असा नाही, तालेवारपणे तो एकटाच  उभा असतो, जवळपास त्याच्यासारखा दुसरा वृक्ष नसल्याने स्थानिक लोकांना त्याच्याबद्धल आकर्षण वाटत आलं असावं, त्याच्या विचित्र आकारामुळेच लोकांनी त्याच्याभोवती लोककथा आणि आख्यायिका रचल्या आहेत. झुसी, अलाहाबाद येथे असलेल्या बाओबाब बद्धल अशी आख्यायिका आहे की मुस्लिम संत मकदूम दहिब याने एका छोट्या हिरव्या काटकीने आपले दात घासले आणि ती जमिनीत रोवली, तेव्हा तिच्यापासून हा विलक्षण अवाढव्य वृक्ष तयार झाला.
'गोरख इमली' या नावावरून एक अशी गोष्ट सांगितली जाते की गोरखनाथ यांनी झुसी या प्रयागमधील पवित्र स्थानाला नष्ट होण्यापासून, हरबंग नावाच्या काल्पनिक राजापासून वाचवलं होतं. असंही सांगितलं जातं की गोरखनाथ या वृक्षाच्या छायेत बसून आपल्या शिष्यांना शिकवीत असत.

हरिवंश पुराणात 'पारिजात' या नावाचा कल्पवृक्ष आहे. किन्तुर, बाराबंकी येथे जो बाओबाब आहे त्याला स्थानिक  लोक 'पारिजात' म्हणतात. उत्तर भारतात बाओबाबला पारिजात असे संबोधण्यामागे त्याचा संबंध कल्पवृक्षाशी जोडणे हे कारण असावे. याला पौराणिक असे काहीही पुरावे नाहीत.  हा वृक्ष दुर्मिळ असल्याने लोकांना त्याबद्धल आश्चर्य वाटते, कधीही गावाबाहेर पाऊल न ठेवलेल्या लोकांना तर असेही वाटते की असा हा एकमेव वृक्ष जगात आहे, आणि  त्यामुळेच त्यांनी त्याच्याबद्धल अशा आख्यायिका निर्माण केल्या असाव्यात. अश्याच एका लोककथेत म्हटलं आहे की अर्जुनाने हा वृक्ष स्वर्गातून आणला, आणि कुंतीने त्याच्या फुलांचा वापर करून शंकराचा  मुकुट सजवला. आणखी एक आख्ययिकेत कृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष आणला असं सांगितलं आहे. या वृक्षाच्या छायेत येऊन मागितलेली इच्छा पूर्ण होते अशीही लोकांची श्रद्धा आहे.  अजमेर येथे दोन पुरातन बाओबाब आहेत, त्यांच्याबद्धलही लोकांची बरीच श्रद्धा आहे, त्याला श्रावणातल्या अमावास्येच्या दिवशी गंडादोरा बांधून त्याच्याकडे मागणं मागितलं जातं. राजस्थानमध्ये झालावाड जिल्यातल्या सोंधवार येथे बाओबाबला मानसपुरम(इच्छापूर्ती करणारा) म्हटलं जातं. मागणं मागण्यासाठी, धाग्याला एक छोटा दगड बांधून, झाडाला टांगला जातो, मागणं पूर्ण झाल्यावर तो धागा उतरवला जातो. गुजरातच्या कच्छ भागात, बाओबाबची फुलं शंकराला वाहिली जातात. मुलांच्या आजारनिवारणासाठी , आरोग्यासाठीही अनेक पालक या वृक्षाकडे मागणे मागतात. जुनागढच्या गिरनार भागात, पायांना दुखापत झाल्यावर तो लवकर  बरा  व्हावा म्हणून या वृक्षाला लाकडी पाय वाहिला जातो. तामिळनाडूमध्ये रामेश्वरम येथे आठ बाओबाब आहेत. या झाडांच्या सभोवती नागशिल्प असलेले दगड रचलेले आहेत. या झाडांची फळं बाजूच्या  मंदिरात वाहिली जातात. बाओबाब जरी परदेशी पाहुणा असला तरी भारतीय लोकसंस्कृतीने त्याला आपलं मानून आपल्या भाविक-धार्मिक वर्तुळात त्याला स्थान दिले आहे. 


अश्याप्रकारचे 'कल्ट'/श्रद्धा फक्त भारतातच नव्हे तर इतर देशातही आहेत आणि भारतातल्या आख्यायिकांपेक्षा त्या  जास्त गूढतेकडे झुकणाऱ्याही आहेत. आफ्रिकेत, बाओबाब झाडाला सुपीकतेचं, सृजनाचं प्रतीक मानतात. त्याचा सृजन-निर्माण, मातृत्व, जन्म, अपत्य आणि मृत्यूशीही घनिष्ट संबंध मानला जातो. या झाडाच्या आकारामुळे त्याच्याभोवती अनेक गूढं निर्माण झाली आहेत. अनेक ठिकाणी हे झाड मंतरलेले, झपाटलेले मानले जाते. ते जादूमय पद्धतीनेच पृथ्वीवर आले असावे, आणि आपल्या पूर्वजांचे वसतिस्थान असावे असेही स्थानिक मानतात. हे झाड रात्रीचे चालते आणि दिवसाचे स्थिर असते असाही विचित्र समज लोकांमध्ये आहे. मादागास्कर येथील मलागेसी बाओबाब हे प्रेतात्म्यांचे वसतिस्थान मानले जातात. तिथले लोक या प्रेतात्म्यांसाठी झाडाखाली गवत  वाहतात.

बाओबाबच्या परदेशातील रुपाला 'अपसाईड-डाउन ट्री' म्हणत असावेत कारण तिथे त्याच्या फांद्या बहुदा नसतातच, उंच खोडाला वरती फक्त शेंड्याला थोड्या फांद्या आणि पाने जवळजवळ नाहीत, त्यामुळे हे झाड उलटे (फांद्या जमिनीत आणि मूळे वर असे तर नाही ना, असा तर्क तिथल्या सुपीक डोक्यानी काढला असावा, आणि त्यावरूनच मग सुपीक डोक्यातून आख्यायिकांनी जन्म घेतला असावा. एका अरब मिथकात  त्याच्या  'अपसाईड-डाउन ट्री' (खाली डोके वर पाय) या नावामागची गोष्ट सांगितली आहे ती अशी की एकदा सैतानाने हे झाड उपटले आणि उलटे जमिनीत लावले. तेव्हापासून त्याचा हा असा विचित्र आकार तयार झाला. इतरही देशात आफ्रिकेतल्या 'बुर्किना फासो' देशातले मिथक सांगते की देवाने जेव्हा हे झाड निर्माण केले तेव्हा ते सतत चालत राही, त्यामुळे कंटाळून शेवटी देवाने त्याला स्थिर करण्यासाठी उलटे लावले. नायजेरियन मिथकात ओडेडे नावाच्या एका शिकाऱ्याने क्रोधावस्थेत ते झाड उपटून उलटे लावले असे सांगितले आहे. काँगो मधल्या मिथकाप्रमाणे वृक्षदेवाने प्रथम हे झाड काँगोनदीच्या तीरावर लावले, तर झाड तिथल्या ओलसरपणाला सारखे दोष देऊ लागले, त्यामुळे वृक्षदेवाने ते उपटून चंद्राच्या पर्वतावर लावले, तिथेही त्याची भुणभुण थांबली नाही म्हणून रागावून त्याने ते उपटून दूर फेकून दिले ते जाऊन आफ्रिकेच्या वाळवंटात, शुष्क भागात पडले. किलिमांजारो लोककथेत बाओबाबचा वृक्ष आपलं पाण्यातलं सुरकुत्या पडलेलं कुरूप आणि लठ्ठ बेढब प्रतिबिंब बघून वारंवार देवाला दोष देत असे, आजूबाजूच्या  सुंदर वृक्षांचा त्याला हेवा वाटत असे, त्याच्या या कटकटीला कंटाळून देवाने एक दिवशी क्रोधीत होऊन त्याला उपटून उलटे लावले. टांझानियातील लोककथेत बाओबाब रोज नुसते चालत राहत, शेवटी त्यांच्या या सततच्या उंडगेगिरीला कंटाळून देवाने त्यांना उलटे लावून दिले ज्यामुळे ते स्थिर झाले.  लोकंही काय अजब डोक्याची असतात नाही? बाओबाबच्या विचित्र आकारामूळे ते झाड पूर्वी चालत असावे असा तर्क करणारी डोकी अजबच म्हटली पाहिजेत.

झाम्बिया, सेनेगल या ठिकाणी तर असे मानले जाते की बाओबाब ही मुळात एक वेल होती आणि इतर झाडांना आपल्या विळख्यात गुरफटवून मारून त्यांचे रूपांतर ती बाओबाबमध्ये करते. आफ्रिकेतल्या आदिवासींमध्येही  बाओबाबवर अनेक लोककथा आहेत. बंटू जमातीत अशी लोककथा आहे की एकदा देव अतिशय तहानलेल्या अवस्थेत बाओबाब झाडाकडे आला आणि त्याने त्याच्याकडे पाणी मागितले, बाओबाबकडून ते न मिळाल्याने रागाने त्याने बाओबाबला उचलून उलटे लावले. आणखी एका कथेत एकदा हत्तीने बाओबाबच्या आईला घाबरवल्याने तिच्यापासून अश्या अवाढव्य, विक्षिप्त झाडाचा जन्म झाला. हत्तीच्या भयानेच हे झाड उलटे रुजले आहे असाही समाज आफ्रिकेत आहे.

कलहारीच्या कुंग बुशमेनमध्ये अतिशय रंजक लोककथा आहे. ती अशी की देवादीदेव 'गौक्झा' याने जेव्हा ओअँग-ओअँग या पहिल्या मानवाला आणि इतर प्राण्यांना वृक्ष दान केले तेव्हा फक्त 'हाईना' (कारण तो दुष्ट प्रवृत्तीचा मानला जातो म्हणून) ला काहीच दिले नाही. हाईनाने त्याबाबतीत देवाला दोष द्यायला सुरवात केली, तेव्हा देवाने त्याला बाओबाबचे झाड दिले, ते हाईनाने मुद्दाम उलटे लावले. या कथेच्या एक वेगळ्या आवृत्तीमध्ये 'हाईना' त्याच्या मुर्खपणामुळे चुकून ते झाड उलटे लावतो असे आहे, आणि नंतर आपली चूक लक्षात आल्यावर तेव्हापासून तो हसत सुटला आहे अशी गोष्ट आहे. हाईनाच्या हसण्याचा संबंध बाओबाबशी लावून निसर्गातल्या विक्षिप्त गोष्टींना या लोकांनी एकत्र आणले आहे. यांच्या कप्ल्पनाशक्तीची दाद दिली पाहिजे, कलहारीच्या सन जमातीमध्ये प्रचलित लोककथेत 'हाईना'ला  उशिरा पोचल्याने देवाने शेवटी उरलेला बाओबाब दिला. तो शेवटचा आणि कुणालाही नको असलेला वृक्ष होता, त्यामुळे हाईना रागावला आणि त्याने बाओबाबला उलटे लावले. आफ्रिकन बुशमेन बाओबाबला देवाने स्वर्गातून फेकून दिलेले झाड मानतात. त्यांना असेही वाटते की हे झाड इथे कधीच लहानाचे मोठे होत नाही, ते पूर्णपणे वाढलेले झाड म्हणूनच थेट स्वर्गातून पृथ्वीवर येते. ग्रेटच आहेत ही सर्व लोकं. पण आपल्याला हेही दिसते की भारतातील असो व परदेशातील, बाओबाब विषयी कहाण्या गुंफवून त्याला श्रद्धेच्या आसनावर बसवण्यात आणि भीतीचा/श्रद्धेचा बागुलबुवा करून त्याला दूर ठेवण्यात सगळे एका माळेचे मणी म्हटले पाहिजेत.

अश्याप्रकारे बाओबाबला आपल्या परसात कुणी येऊ दिले नसले तरी त्याचा कामापुरता पुरेपूर उपयोग करून घेणे जाणले नाही तर तो माणूस कसला?  भारतात त्याचा मोजकाच वापर होत असला तरी आफ्रिकेतील बाओबाब तिथल्या जमातींसाठी खराखुरा कल्पवृक्ष म्हटला पाहिजे, त्याच्या प्रत्येक भागाचा ते वापर करतात. पाने, फुले , फळे जेवणात, बियांपासून तेल , तर खोड दोर वळण्यासाठी, जळणासाठी  इंधनच नव्हे तर काही ठिकाणी बाओबाबच्या बुंध्याचा शवपेटीसारखाही  उपयोग केला जातो. बाओबाबच्या फुलण्याच्या काळावरून पावसाचे आगमन ठरवण्याची स्थानिक लोकांची पद्धतही फार जुनी आहे. हा वृक्ष पावसाच्या आधीच बहरतो. भारतात हा वृक्ष इतर वृक्षांइतका उपयोगी नसला तरी त्याच्या फळांना आयुर्वेदात स्थान मिळाले आहे. बाओबाबचे फळ म्हणजे पाऊण फुटाचा लांबुडका दुधीभोपळाच. अतिशय टणक. फोडायला  काहीतरी साधन हवेच. आतला गीर चिंचेप्रमाणेच आंबट असतो.

'मांडू की इमली' विकणाऱ्या बायका  

मला मांडूच्या परिसरात जवळपास तीस-चाळीस वृक्ष दिसले असतील. त्यातले काही बऱ्याच मोठ्या घेराचे (१२ ते १५ फूट) होते, तर काही २-३ फूट घेराचेही होते. छोटे रोपटे मात्र एकही दिसले नाही. हा वृक्ष वेगाने वाढतो. मांडू मधली गरीब लोकं उदरनिर्वाहासाठी त्याची फळं काढून 'मांडू की इमली' म्हणून माझ्यासारख्या या झाडाशी अपरिचित नवख्या-गवश्याना विकतात. मीही एक साधारण ६ इंचाचे फळ चाळीस रुपयांना विकत घेतले. एक फूट आणि त्याहून जास्त लांब फळांची किंमत साठ-ऐंशी रुपये होती. त्याचबरोबर फळाच्या गीराची मेणबत्तीवर सील केलेली छोटी प्लास्टिकची पाकीटं देखील विकायला होती, त्यातलेही एक घेतले. फळ अजून फोडले नाही, फ़ोडावेसे वाटलेच नाही. तूर्तास पाकिटातील गीर खाल्ल्यानंतर त्यातले बीज मात्र मी जपून ठेवले आहे. माझ्या घराच्या अरुंद, छोट्या बाल्कनीत काही हा बाओबाब मावणार नाही. तो  कुणाच्या परसातला ओळख-पाळख ठेवून असणारा वृक्ष नाही. त्याचे विक्षिप्त रूप बघून त्याच्याशी कुणी हितगुज केले नसावे, त्यामुळेच तो धीर-गंबीर, विरक्त योग्यासारखा एकटाच वाढत राहिला असेल का? फक्त मिथकं, धार्मिक कार्य, आख्यायिका यामध्येच स्थान देऊन माणसाने त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो त्याच्या विचित्र आकारामूळे ,त्याच्या असणाऱ्या वेगळेपणामुळे. अपरिचिताचे, असाधारणाचे, असंभाव्याचे माणसाला नेहमीच भय वाटते, मग त्यात सौंदर्य का असेना? जे नेहमीचे नाही त्याला लोक थोडं लांबच ठेवतात तसाच बाओबाब मांडूमध्ये मला लांबच वाटला, कुठेतरी दूर शेतात, रस्त्याला लागून, एखाद्या टेकडीवर असा एकटाच उभा, त्याला तसं बघून थोडं खिन्नही वाटलं. पण मांडू सोडताना मात्र एक ठिकाणी मला जो बाओबाब दिसला त्यामुळे या खिन्नतेला एक दिलासा मिळाला. महेश्वरला जाणाऱ्या दिशेने असलेल्या मांडूच्या त्या भागात मला एक बाओबाब एका मातीच्या घराच्या अगदी जवळ दिसला, इतका जवळ की त्या लोकांनी घरच त्याच्या आजूबाजूने बांधले होते. त्या बाओबाबने ते घरच आपल्या कडेवर घेतले होते. आणि घरातल्या लोकांनीही प्रेमाने त्याला आपलंसं केलं होतं. त्याच्या छायेत ते घरही होतं, एक गाय रवंथ करत होती, कुत्रा आरामात पहुडला होता आणि मुलेही आजूबाजूला बागडत होती. ते बघून मला खूप मजा वाटली. वाटलं बाओबाब काही अगदीच एकलकोंडा नाही, त्यालाही संवाद हवाच आहे. त्यासाठीच बहुतेक तो कुठून कुठे आला आफ्रिकेची वाळवंट तुडवत आणि इथे येऊन इथल्या मुलांमाणसांत एक झाला.
बाओबाब! माझी ओळख तुला एकदाच झाली असेल पण मी तुला कायम भेटतच राहणार आहे.

दोन बाओबाब

4 comments:

  1. नाथपंथी गुरु गोरक्षनाथांनी त्यांच्या शिष्यांना या झाडाखाली उपदेश केला होता म्हणून याचं नाव गोरखचिंच पडलं अशी एक समजूत.तर काहींच्या म्हणण्या प्रमाणे "गोरख" धंदा करणारे(चोर-लुटारु) या झाडाच्या बुंध्यात लपून बसत म्हणून हे नाव.काही ठिकाणी याची नावं पंचपर्णिका,गोपाली,गोरक्षिका अशीही आहेत.आंध्र प्रदेशातील गोवळकोंडा किल्ल्याच्या आवारात ५ मीटर व्यासाचा बुंधा असलेला बाओबाब सर्वात मोठा समजला जातो.साधारण ७०० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बांधकामावरील मजूरांनी अफ्रिकेतून आणलेल्या बियांमधून त्याची लागवड झाली असं म्हणतात.याचा बुंधा इतका प्रचंड असतो की काही ठिकाणी त्याच्या ढोलीत hotels,दारुचा गुत्ता,कैद्यांना ठेवण्यासाठी कोठडी बनवली आहे.फुगीर खोड पोकळ करुन त्याचा उपयोग rain water harvesting साठीही करण्यात येतो.थोडक्यात सांगायचं तर The Baobab has been called the Oldest Organic Monument of Our Planet.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. गंमत म्हणजे अर्थाअर्थी काही संबंध नसला तरी गोरखचिंचेचं हे " upside-down tree" हे रुप आणि नाव पाहून मला भगवदगीतेतला पंधराव्या अध्यायातला तो प्रसिद्ध श्लोक "ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्" (विनोबा गीताईत म्हणतात "खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला")उगीचच आठवत राहतो :-)

    ReplyDelete
  4. हि खूपच छान माहिती सांगितलीत तुम्ही. त्याबद्धल धन्यवाद. आणि मला माहित नव्हतं की या झाडाशी जुळणाऱ्या अशा अर्थाचा श्लोक भगवद्गीतेत आहे. खूपच छान अर्थ आहे त्याचा :)

    ReplyDelete