रखालदास बॅनर्जी (रखालदास बंदोपाध्याय) यांच्या बद्धल मी सर्वप्रथम जी.एं. च्या एका पत्रात वाचलं होतं. जी.एं. ना त्यांची 'शशांक' ही कादंबरी आवडली होती. त्यांनी या कादंबरीचा (वि. सी. गुर्जर यांनी केलेला) मराठी अनुवाद वाचला होता. तेव्हापासून या पुस्तकाचा शोध मी करत होते. शेवटी मला ते पुस्तक वाचायला मिळाले.
राखालदास बॅनर्जी हे थोर इतिहासतज्ञ आणि पुराणवस्तूसंशोधक होते. बंगाली आणि इंग्रजी मध्ये लेखन करीत. त्यांचा अतिशय महत्वाचा शोध म्हणजे 'मोहेनजो-दारो'. त्यांनी इतिहासविषयक, पुराणवस्तूविषयक खूप लेखन केले पण त्यापलीकडे जाऊन कल्पना आणि इतिहास यांचा संयोग करून कथारुपात इतिहासाला मांडले. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यातून त्या काळच्या जीवनाला आणि इतिहासात फक्त नावाने उपस्थित असलेल्या व्यक्तींना त्यांनी जिवंत केले. त्यांच्या ४५ वर्षांच्या अल्प आयुष्यातही त्यांनी ३० पुस्तके आणि २५० पेक्षा अधिक लेख लिहिले.
'शशांक' हि त्यांची बंगालीतून लिहिलेली कादंबरी म्हणजे गुप्त साम्राज्याच्या अधोगतीच्या काळातील घटनांचा इतिहास आणि त्या आवरणाखाली कल्पिलेली चित्रं आहे. मूळ कादंबरीचा हिंदी अनुवाद रामचंद्र शुक्ल यांनी केला आहे.
गुप्त साम्राज्य हे भारताच्या इतिहासातील सुवर्ण युग (Golden Age) मानले जाते. सर्व प्रकारच्या शास्त्र, कलांचा या काळात उत्कर्ष झाला. इसवी सनाच्या चौथ्या शतकपासून ते सातव्या शतकापर्यंत हे साम्राज्य प्रस्थापित होते. गुप्त साम्राज्य कामरूप ते गांधार , वाहाक आणि हिमालया पासून माळवा, कलिंग, सौराष्ट्र , दक्षिणकोसल पर्यंत पसरलं होतं. या राजवंशाचा मूळपुरुष 'गुप्त' होता. त्याचा मुलगा 'घटोत्कच' ,त्याचा मुलगा 'चन्द्रगुप्त १' याचा लिच्छवी ची राजकुमारी कुमारदेवीशी विवाह झाला होता, तो ३२१ A.D. मध्ये राजसिंहासनावर बसला. त्यानंतर समुद्रगुप्त, चंद्रगुप्त २ - विक्रमादित्य (४०१ ते ४१३ A.D.) या थोर पराक्रमी राजांनी गुप्त सम्राज उत्तुंग शिखरावर नेलं. कुमारगुप्त १ (४१५ ते ४५५ A.D.) आणि स्कंदगुप्त (455–467 A.D. ) यांनीही गुप्त साम्राज्याच्या उत्कर्षासाठी हातभार लावला. पण स्कंदगुप्तच्या काळात 'हूणांच्या' उत्तर-पश्चिमी आक्रमणांमुळे गुप्त साम्राज्य खिळखीळं झालं. तिथूनच पुढे गुप्त साम्रज्य लयाला गेलं असं म्हटलं जातं. जेव्हा गुप्त साम्राज्याचा अधोगती होत होती त्या वेळेला श्रीकंठ (थानेश्वर/थानेस्वर ) च्या पुष्पभूति वंशाचा प्रभाव वाढत होता. या थानेश्वर/थानेस्वर (आजचे थानेसर) प्रांतापासूनच हर्षवर्धन राजाने आपले राज्य वाढवले होते. जरी गुप्त साम्रज्य लयाला गेलं तरीही कुठकुठे ते अस्तित्वात होतं त्याची प्रमाणं सापडतात. गुप्तांच्या वतीने त्यांचे सामंतस्वरूपातील सरदार अस्तित्वात होते.
आता या सर्वांमध्ये 'शशांक' कोण आणि कुठे येतो?
इतिहासानुसार शशांक हा एक स्वतंत्र राजा होता, त्याने 'गौड' नावाचा नवा प्रांत प्रस्थापित केला. त्याची कारकीर्द (590 AD ते 625 AD) होती आणि तो हर्षवर्धनाचा समकालीन होता. त्याची राजधानी होती 'कर्णसुवर्ण' (आजचे मुर्शिदाबाद जिल्हा, रंगामाटी स्थान). या अतिशय शूर राजाने आपल्या साम्राज्याचा भरपूर विस्तार केला. ह्या राजाबद्धल इतिहासकार असा तर्क लावतात कि हा राजा गुप्त वंशाचाच होता. नष्ट झालेल्या गुप्त साम्राज्याचाच तो प्रतिनिधी होता. याला ऐतिहासिक दस्तावेजात काही पुरावे सापडतात.
गुप्तवंशाच्या पतनानंतर आदित्यासेन नावाचा राजा माळवा , मगध प्रांतात राज्य करीत होता. म्हणजेच जरी मूळ गुप्त वंश नष्ट पावला तरी त्याच्या काही शाखांचे प्रतिनिधी अस्तित्व टिकवून होते. या राजाचा काळ ७ व्या शतकाचा होता. याचे पूर्वज अश्याप्रकारे आहेत : कृष्णगुप्त - हर्षगुप्त - जीवितगुप्त - कुमारगुप्त - दमोदरगुप्त - महासेनगुप्त - माधवगुप्त - आदित्यसेन. हे मूळ गुप्तवंशीय होते असा इतिहासकार अंदाज बांधतात. यासर्व वरच्या वंशावळीत काही नावे 'शशांक' या राजाच्या इतिहासासाठी (आणि कादंबरीतील कथेसाठी )महत्वाची आहेत. आणि हि नावं आहेत: 'माधवगुप्त' आणि त्याचे पिता 'महासेनगुप्त'.
महासेनगुप्त हा ६ व्या शतकाच्या अंती आणि सातव्या शतकाच्या पूर्वार्धात मगध प्रांतात राज्य करणारा एक कमकुवत राजा होता. त्याला तीन मुलगे होते. १. देवगुप्त २. कुमारगुप्त ३. माधवगुप्त.
यांचे पूर्वज माळव्यात राज्य करीत होते की मगधमधे हे सांगणे कठिण आहे. बाणाच्या हर्षचरितात माळव्याचे दोन राजकुमार 'कुमारगुप्त' आणि 'माधवगुप्त' हे थानेश्वरच्या 'राज्यवर्धन' आणि 'हर्षवर्धन' यांचे सहचर असल्याचे नोंदले आहे. हर्षचरितावरुन माधवगुप्ताचे पिता 'महासेनगुप्त' माळव्यात राज्य करत होते. तेव्हा असं असू शकतं कि 'महासेनगुप्त' माळव्यात राज्य करीत होते आणि मगध मध्ये त्यांचा कुठलातरी पुत्र 'सामंतवादी(Feudatory)' म्हणून राज्य करीत असेल. किंवा असंही होऊ शकतं कि बुद्धगुप्त, भानुगुप्त हे मूळ गुप्त राजवंशाचे राजे जेव्हा मगधमध्ये राज्य करीत होते तेव्हा गुप्त वंशाची दुसरी शाखा (माधवगुप्तचे पूर्वज) माळव्यात राज्य करीत असावेत. थानेस्वरच्या राज्यवर्धनची बहिण राजश्री हिचा मौखरी वंशाच्या ग्रहवर्माशी विवाह झाल्यानंतर महासेनगुप्त सत्तेसाठी मगध मध्ये राहिला असेल आणि देवगुप्ताला माळव्यात राज्य करायला दिले असेल. थानेस्वरच्या पुष्पभूति वंशाचे महासेनगुप्तशी जवळचे पारवारिक संबंध होते. 'महासेनगुप्त'ची बहिण 'महासेनगुप्ता' हि थानेस्वरच्या राजाची (प्रभाकरवर्धन) आई होती. परंतु नंतर राजनैतिक डावपेचांत यांचे संबध बिघडत गेले. अस्तंगत होणाऱ्या आपल्या सत्तेमुळे महासेनगुप्ताला प्रभाकरवर्धनादी थानेस्वर सदस्यांकडून अपमानस्पद वागणुकीला सामोरे जावे लागत असे. पुढे महासेनगुप्ताच्या मृत्युनंतर प्रभाकारवर्धनने मगधवर अधिकार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. देवगुप्त हा महासेनगुप्ताचा मोठा मुलगा प्रभाकरवर्धनचा मुलगा राज्यवर्धन आणि जावई मौखरीचा राजा ग्रह्वर्मा यांना मारण्यात सामील होता असे इतिहास सांगतो. आणि त्याचा बदला घेण्यासाठी हर्षवर्धनने मगधवर स्वारी केली होती हेही इतिहासात नोंदले गेले आहे. हर्षवर्धनाच्या एका ताम्रपत्रावरून राज्यवर्धनकडून 'देवगुप्त' ला परास्त करण्याचा उल्लेख आहे.
अनेक अनुमानावरून असे लक्षात येते कि राजश्रीचा पती ग्रहवर्मा याला देवगुप्ताने मारले. आणि त्यात राजा राजा 'शशांक'चा हात होता. देवगुप्त हा महासेनगुप्तचा मोठा पुत्र होता (कुमारगुप्त दुसरा आणि माधवगुप्त तिसरा ). हर्षचरीत मध्ये राज्यवर्धनला कपटाने मारणारा 'गौडादीप' आहे असे नोंदले आहे. 'गौडादीप' म्हणजेच गौड राजा शशांक हे अनुमान 'शंकर' नावाच्या एका पंडिताच्या बाराव्या शतकातील नामावळीतून, आणि हुआन सांगच्या भ्रमणगाथेतून मिळते.
'शशांक' गुप्त वंशांचा होता असे ठरवण्यामागे पुरावा असा आहे कि ब्रुलर यांना मिळालेल्या 'हर्षचरित' च्या प्रतीमध्ये त्याचे नाव नरेंद्रगुप्त होते. मुर्शिदाबाद येथे मिळालेल्या अनेक गुप्तवंशीय शिक्क्यावर नरेन्द्रादित्य हे नाव 'शशांक'चे आहे असे निश्चित झाले आहे.
त्यामुळे शशांक हा गुप्तवंशीय राजा होता असा कयास करावासा वाटतो. अर्थातच हा गुप्तवंशीयांशी असलेला संबंध वादग्रस्त असला तरी काही प्राप्त अनुमानावरून हे पूर्णपणे नाकारताही येत नाही.
या कादंबरीत राखालदास बॅनर्जी यांनी 'शशांक' ला महासेनगुप्ताचा मोठा मुलगा म्हणून दाखवले आहे. (असे त्यांनी का केले हे एक गूढच आहे, देवगुप्तच शशांक होता असे त्यांचे मत होते का? आणि या मताला (अगदी मनापासून त्यांना वाटत असले तरी) पुष्टी देणारा पुरावा त्यांच्यापाशी नसल्याने त्यांनी या कादंबरीद्वारे काल्पनिक रित्या आपल्या मताला न्याय दिला असावा.
या कादंबरीत त्या काळातील जीवनाचे प्रदर उलघडतात.
कथा थोडक्यात अशी आहे. ती महासेनगुप्तापासून सुरु होते. 'महासेनगुप्त' मगधचे सम्राट असले तरी आता वृद्धत्वाकडे झुकलेले असतात. साम्राज्य अनेक आघात परतवून लावताना खिळखीळं झालेलं असतं. राजकोष झपाट्याने खाली होत असतो. त्यांच्या साम्राज्याचा दिवसोंदिवस ऱ्हास होत असतो. या परिस्थितीत 'थानेस्वर' चा प्रभाकरवर्धन (हर्षवर्धनचा पिता) अत्यंत प्रभावी होत आपले साम्राज्य वाढवण्याच्या खटपटीत असतो. जोपर्यंत महासेनगुप्त यांची बहिण('महासेनगुप्ता' जी प्रभाकरवर्धनची आई आहे) जिवंत असते तोपर्यंत प्रभाकरवर्धन गप्प असतो. महासेनगुप्त यांच्या खिळखीळ्या साम्राज्याचे पाठीराखे असतात त्याचे पुत्र 'शशांक' आणि 'माधवगुप्त'. परंतु दोघेही बाल्यावस्थेत असतात. त्या काळापासून शशांकची राजा म्हणून कशी वाटचाल होते. यात त्याला किती खाचखळगे, क्रूर नियतीच्या डावांचा कसा सामना करावा लागतो हीच ही कहाणी.
प्रभाकरवर्धनचा मगध वर डोळा असल्याने तो 'माधवगुप्त' ला मोठ्या धुर्ततेने आपल्या बाजूला कसे करवून घेतो, नियतीच्या अनेक रचनांमध्ये शशांकचे जीवन आणि त्याच्या आजूबाजूच्या इतर सदस्यांचे जीवन भरडत जाते आणि त्या काळात फोफावलेला महायानी बुद्धधर्माबद्धलचा वाढता द्वेष आणि त्याला कारणीभूत असलेले अत्याचारी, कारस्थानी संघप्रमुख, त्यांनी राज्येच्या-राज्ये सत्तेखाली आणण्यासाठी व नष्ट करण्यासाठी रचलेली षडयंत्र हे सर्व या कथेत रचलेले आहे. यात एक अपूर्ण प्रेमकहाणी देखील साम्राज्यशाहीच्या, युद्धाच्या, राजनीती-षडयंत्राच्या पार्श्वभूमीवर अस्फुट स्पंदनं दाखवत शेवटी मिटून जाते.
राखालदास बॅनर्जी यांनी मूळ बंगाली कादंबरीत हर्षवर्धनच्या स्वारीनंतर 'शशांक' चा अंत दाखवून त्याला दुःखांतिकेची छटा दिली असली तरी हिंदी अनुवादक रामचंद्र शुक्ल यांनी राजा 'शशांक' ऐतिहासिक दृष्ट्या हर्षवर्धनच्या स्वारीनंतर अनेक वर्ष जिवंत होता आणि राज्यही करत होता या पुराव्यानुसार 'शशांक' चा अंत न दाखवता तो पुढेही राज्य करतो असे दाखवले आहे.
राखालदास बॅनर्जी यांनी मूळ बंगाली कादंबरीत हर्षवर्धनच्या स्वारीनंतर 'शशांक' चा अंत दाखवून त्याला दुःखांतिकेची छटा दिली असली तरी हिंदी अनुवादक रामचंद्र शुक्ल यांनी राजा 'शशांक' ऐतिहासिक दृष्ट्या हर्षवर्धनच्या स्वारीनंतर अनेक वर्ष जिवंत होता आणि राज्यही करत होता या पुराव्यानुसार 'शशांक' चा अंत न दाखवता तो पुढेही राज्य करतो असे दाखवले आहे.
या कादंबरीत अनेक सूत्रे आहेत. विश्वास आणि विश्वासघात, प्रेम, सत्तेसाठीचा संघर्ष, नियती, या सर्वांमध्ये एक महत्वाचा धागा म्हणजे धर्माचे त्यावेळचे स्थान आणि त्याचे महत्व. बुद्धधर्म आणि त्याचा प्रसार त्या काळात उत्तर भारतात झपाट्याने झाला होता. पण या धर्मांतील काही मोजक्या स्वार्थी लोकांमुळे त्याचे स्वरूप कसे झाले होते यावर या कादंबरीतील घटनांमुळे प्रकाश पडतो. मला नेहमी प्रश्न पडे कि एवढा महान अहिंसेचे प्रतिक असेलेला 'बुद्धधर्म' ज्या देशात जन्मला त्या देशातून हद्दपार का झाला, इथले लोकच करंटे असले पाहिजेत ज्यांनी सहिष्णू, अहिंसक अश्या गुणी बुद्धधर्माला इथे थारा दिला नाही. पण या धर्माच्या भारतातून नामशेष होण्यामागचे काही धागेदोरे या कथेतून समोर येतात. बुद्धधर्माचे स्वरूप बदलुन स्वार्थी, सत्ता,सुखाच्या मागे लागणाऱ्या काही दुष्ट लोकांच्या हातात त्याची सूत्रं गेली. जुलूम, अत्याचार करून लहान मुलांना जबरदस्तीने भिक्खू करणारे, संपत्ती गोळा करून मोठे संघ प्रस्थापित करून हे भिक्खू काहीही काम न करता ऐतखाऊवृत्तीने राहत आणि त्यातल्या बहुतेकांना बुद्धाच्या मूळ मार्गाचा,शिकवणुकीचा लवलेशही नव्हता. अश्या संघाना ढोंगी रूप प्राप्त झाले होते. या आपमतलबी, भोगविलासी धर्माच्या पुढाऱ्यांच्या करतूतींची झळ सर्वसामान्य लोकांनाही बसत होती. त्यामुळे बौद्ध धर्म लोकांच्या नजरेतून उतरू लागला होता आणि हिंदू धर्म पुनर्प्रस्थापित होऊ लागला होता.
या कादंबरीत 'शशांक' चे रेखाटलेले व्यक्तिचित्र अतिशय विदारक आहे. इतिहासाने 'शशांक' राजाला 'कपट-कारस्थानी', 'विश्वासघातकी' मानले आहे. पण राखालदास बॅनर्जी यांचा 'शशांक' अतिशय तरल मनाचा, दयाबुद्धी असेलेला परंतु क्रूर नियतीच्या फेऱ्यात गरगरून त्रस्त झालेला शूर राजा आहे. त्याच्या बालपणापासून ते अंतापर्यंतचे चित्र त्यानी रेखाटले आहे. कधीही सुख न लाभणारा, ज्याचे जवळचेच त्याचा घात करण्यास टपले असतील आणि केवळ दूरच्या परदेशातील अनोळखी लोकांकडूनच त्याला सहाय्य होईल अशी त्याची नियती असते. आप्त-प्रियजनाकडून प्रतारणा आणि दुःख, घोर निराशा आणि गैरसमजातून झालेल्या आत्मक्लेशाच्या भोवऱ्यात तो फिरत राहतो. सर्व दुःखाचे मुळ आपण आहोत असे त्याचे मानणे असते. मृत्युच्या शोधतच शेवटी तो भटकत राहतो, जीवावर उदार होऊन तो राज्यवर्धनशी लढतो (त्याला लढायचे नसते तरी आणि फक्त राज्यवर्धनची लढण्याची इच्छा असते म्हणून) आणि त्यात एका विलक्षण रीतीने राज्यवर्धनचाच मृत्यू होतो. हाही नियतीचाच एक खेळ. (राज्यवर्धनला कपटाने मारल्याचा इतिहासातील उल्लेखाशी कथेतील हि घटना विसंगत आहे)
असा हा 'शशांक' आपल्याला त्याच्या अपूर्णतेच्या दुःखात ओढून घेऊन जातो. हिंदी अनुवादात जरी शेवटी त्याची शोकांतिका होत नसली तरी ती शोकांतिकाच आहे इतके त्याचे जीवन haunting आहे.
खरा शशांक कसा होता कुणास ठाऊक? पण इतिहासातील वस्तुस्थितीच्या पुढे जाऊन, इतिहासाशी फारकत घेऊन स्वतःला जाणवणाऱ्या अश्या 'खऱ्या शशांक'ची बाजू त्यांनी या कादंबरीत मांडली आहे.
No comments:
Post a Comment