Monday 6 June 2016

झिनझिनाट


पांदनीत भेटलस, आंगाक खेटलस, काळोख किनाट
हातात हात घेतलस , अकस्मात झालो,  झिनझिनाट ….

पतेरो साळसाळ पायाबुडी,फुरसा मारीत होता मनात उडी
चलता चलता कुजबुजलस, हिच माझ्या घराच्या जवळची वाट

काय बोलत हुतव नि खय चलत हुतव, कोनाक म्हायती !
सगळ्या वाटेर निस्तो पिकल्या आंब्या-फनसांचो घमघमाट 

लांबसून बॅटरी येवक लागली जवळ, तू माका खास्कन वडलंस 
माझा काळीज धाडधाड… धाडधाड, तुझा मातर धाडस भनाट

तुझ्यामागसून कितीजना भेटली, आंगाक खेटली, पन नाय पटली
माज्या कानात  आजून, तुज्याच काकनांचो तो पैलोवैलो किनकिनाट

 - कवी महेश केळुसकर


महेश केळुसकर या कवींची हि कविता आणि त्यांचा 'झिनझिनाट' हा अतिशय अप्रतिम कवितांचा कवितासंग्रह. हि 'झिनझिनाट' कविता मी आर्टस्कूल मधल्या एका सहाध्यायीकडून प्रथम ऐकली. आणि ती माझ्या कानात कायमची 'झिनझिनाट' करत राहिली. 
एखाद्या कोकणातल्या माणसाने कोकणातून परत चाललेल्या पावण्याला दिलेल्या भेटीच्या पिशवीत काय काय असेल? एखादा घमघमीत गोड पिका फणस नाहीतर रसाळ आंबे, शीरशीरीत, खारवलेला, खवट,उग्र वासाचा गोलमा (सुकी कोलंबी, सुकी मासळी) , आंबट-ढाण आमसोलं, फक्कड ओले काजू, घश्याला खसखसणारे पिके बोंडू(काजूचे फळ), मती वेडावणारे आबोली, सुरंगी, ओवळा(बकुळी)चे वळेसर. पिशवीचे बंध  करकचून बांधून पिशवी नुसती  बाजूला ठेवली तरी तिच्यातून अविरत घमघमाट येतच राहील .
तसाच हा कवितासंग्रह आहे. नुसती पिशवी आहे, सगळा आंबट, खारट, गोड ऐवज भरलेली, धुंद करणाऱ्या घमघमणाऱ्या वासाची. पण पिशवी अस्सल कोकणी माणसाचे प्रतिनिधित्व करणारी, जुनी डाग पडलेली, तिला ठिगळही आहेत. 
हा कवितासंग्रह मूळ 'मॅजेस्टिक' ने छापलेला, आता out of print  झालाय. पण खटपट करून आणून वाचण्यासारखा. संपूर्णपणे मालवणी भाषेतील हा पहिलाच कविता संग्रह असावा. याला महेश केळुसकरांची प्रस्तावनाही मालवणी भाषेतून आहे.  

आता 'झिनझिनाट' कवितेविषयी. हि कविता नाही. हि आहे जादू.  भारलेल्या वातावरणातील दोन प्रेमी जीवांचा अनुभव कायमचा मनात बंधिस्त करणारी. तिच्यातला जिवंतपणा, ताजेपणा कालातीत आहे. 
कोकणातल्या आडजागा, तिथे चोरून भेटणारी प्रेमी युगुलं, त्यांचा तरल, एकांतात, आजूबाजूच्या अगम्य शक्तींनी भारलेल्या वातावरणात, निसर्गाच्या साक्षीने रंगलेला हळुवार तरीही ठसकेबाज प्रणय यांचा अस्सल प्रत्यय देणारी कविता आहे  'झिनझिनाट'. 

'मनात उडी मारणारा फुरसा' , 'लांबसून जवळ येवक लागलली बॅटरी' , 'पतेऱ्याची साळसाळ आणि कानातली कुजबुज' , 'पिकले आंबे-फनस' आणि धडधडणारा काळीज', किनाट काळोख'
यातल्या प्रतिमा आणि यातले संकेत केवळ अजोड. हे वातावरण मनावर अजब गारुड करतं.
हि कविता वाचताना स्वतःच तुम्ही ती काळ्याकुट्ट अंधारातली  पांदनी (पाणंद - झाडांनी, झाळीनी दोन्ही बाजूनी वेढलेली छोटीशी वाट म्हणजे पाणंद, त्याला मालवणीत पांदनीत किंवा पान्नी म्हणतात) अनुभवू लागता. शब्द न शब्द तिथल्या वातावरणाची अनुभूती देतो. पायाखालच्या सुकलेल्या पानांची(पतेरो) सळसळ, त्या सळसळीचे कारण एखादे फुरसे(एक छोटा पण विषारी साप) तर नसेल ना? त्या मंतरलेल्या काळोखाची भीती, आणि फुरसे मनात डोकावून अधिकच बळावणारी भीतीयुक्त उत्कंठा आणि तीच भीती जेव्हा नकळत त्याच्या मदतीला धावून येते (ज्यामुळेच तो प्रेयसीचे जवळ येणे, हात हातात घेणे, कुजबुजणे, अंगाला खेटणे अनुभवतो) मनातल्या त्या मिश्र भावनांचा सुंदर पट या कवितेत असा उमटला आहे कि त्याचे वर्णन करणे शब्दात केवळ अशक्य. हि कविता फक्त अनुभवायला हवी. जेव्हा कवितेबद्धल काय वाटतं ते शब्दात मांडता येत नाही फक्त जाणवत राहतं तेव्हा ती कुठेतरी खोल जावून भिडलेली असते. तेच खरे श्रेष्ठ काव्य. 

महाराष्ट्र टाईम्स मधल्या लेखात महेश केळुसकर यांनी या कवितेच्या निर्मितीबद्धल लिहिले आहे ''झिनझिनाट' चा डायरीतला लेखन दिनांक आहे ३ मे १९८८. कणकवली तालुक्यातील 'सात्रल' या गावच्या कच्च्या रस्त्यावर त्या रात्री आमची आकाशवाणीची जीप (आमचे महाजन नावाचे इंजिनीयर सासूरवाडीवरून भेट देऊन कधी परत येतात त्याची वाट बघत) उभी असताना हि कविता मला सुचली. वाघधरे ड्रायव्हर, रस्त्याबाजूच्या रानातून वाघ झेप घेईल म्हणून सावधगिरीने जीपमधेच बसला होता. मी जीपबाहेर रस्त्यावर उतरलो होतो. जीपचे हेडलाईट्स मी त्याला बंद करायला लावले. त्यानं काचा वर सरकवल्या. वाघधरे जीपमध्ये आणि मी बाहेर वाघाची वाट बघत. घनघोर काळोख. आसमंतात चिटपाखरू नाही…. फक्त झणाणता वारा… आणि हळूहळू त्या सगळ्याची भूतबाधा मला चढू लागली.… नक्की काय होत होतं ते सांगता येणार नाही… पण असं काहीतरी विलक्षण, पाऱ्यासारखं शुभ्र चपळ कि हात लावायला जातोय आणि ते सूळ्ळकन निसटून चाललय. लाटेमागून लाट फुटत राहिली आणि झोतामागून झोत पडत राहिले आदिम अंधाराचे. कविता कवीच्या रंध्रा-रंध्रातून पाझरत राहिली. '
  
या कवितासंग्रहातल्या 'बायो माझा ऱ्हवला खय' , 'शीटी', 'बाळगो आणि मालग्या' , 'आबोलेचो वळेसार'  'सोबता आमची जोडी', मिर्गादिसा', 'देवबाग पानयात बुडला', 'व्हनीबाय जुन्यार दि गे' अश्या वेगवेगळ्या रसातल्या बऱ्याच कविता उत्तम आहेत, पण 'झिनझिनाट' चा 'झिनझिनाट' त्यांना नाही. 

'झिनझिनाट' ला परातत्व स्पर्श आहे. 

हि कविता वाचल्यावर मला या कवितेवर एकदम लिहावेसेच वाटले. पण तिने मला एवढं मंत्रमुग्ध केलय कि लिहायला शब्दच सापडत नाही आहेत. त्यामुळे तूर्तास एवढेच.

No comments:

Post a Comment