घर. म्हणजे नक्की काय? आजवरच्या आयुष्यात आपण कुठे कुठे राहिलो? मी विचार केला, समजत असल्यापासून आजवर जवळपास चौदा वेगवेगळ्या ठिकाणच्या घरात मी राहिले. राहिले म्हणजे दोन चार दिवस नव्हे, तर खरंखुरं वास्तव्य करून, अनेक महिने, अनेक वर्षं. इतक्या घरांना भेटून सुद्धा 'घर' म्हणजे नक्की काय ते मला सांगता येत नाही.
पण एक अनुभव मात्र आला. घर ही मोठी विलक्षण चीज आहे. आमच्या गावचं घर, किमान दोनशे वर्षं तरी जुनं होतं. लहानपणी खूप राहिले होते तिथे. त्यावेळी अनेक लोकं राहायची तिथे. पण हळूहळू लोकं पांगली. काहींनी आपली स्वतंत्र घरे आजूबाजूला बांधली. माणसेही कमी कमी होत गेली. शेवटी घरात राहणाऱ्या माणसांची संख्या झाली 'एक'. ती होती माझी आजी. शेवटी तीही गेली. आणि घरानेही संन्यास घेतला. ते ढासळू लागलं. वासे कोरम झाले. भिंतींना चिरा गेल्या. पूर्वी घर होतं ऐसपैस, अनेक खोल्यांचं. देवखोली आणि तिला लागून असलेली प्रशस्त आयताकृती जागा, जिला 'मधला लोटा' म्हणत. प्रत्येक खोलीला एक वैशिष्ट्यपूर्ण नाव , 'पुढला लोटा', 'मधला लोटा', 'वाणशी' अशी विचित्र नावं.
या मधल्या लोट्याला लागून जीना, जीन्याच्या बाहेरील भिंतीवरील खालच्या कोपऱ्यात नागोबाचे चित्र. हा चित्रातला पिवळा नागोबा घराएवढ्याच वर्षांचा झाला असावा. पण घर रिकामं झालं आणि नागोबाच्या सोबतीला उरले फक्त कवडसे. फुटक्या नळ्यातून पाझरणारे. आणि उंदरांनी पोखरलेल्या भुसभुशीत जमिनीतून उगवलेल्या वेली.
माझा भाऊ या कोसळणाऱ्या घराला पाहायला गेला असताना त्याने काढलेला हा वरचा फोटो, पण हा फोटो नाही, आहे एक चित्र, एका जिवंत घराचे. या रिकाम्या पोकळीत आहेत शांत, स्तब्ध उभ्या असलेल्या भिंती, आतल्या एका खोलीचं बंद दार, न दिसणारा जिना, कोपऱ्यातला धूसर झालेला नागोबा. ही पोकळी, हा चार भिंतीत गोठलेला अवकाश आता कधीच डोळ्यासमोर परत दिसणार नाही असेच हा फोटो पहिला तेव्हा वाटले होते.
जुने घर शेवटी पडले. J.C.B आला. त्याचे पार्थिव बाजूला करून त्या जागी आता एक छोटेसे घर उभे आहे. या नवीन घरात आहे एक देवखोली आणि त्याला लागून असलेला हाच, एवढ्याच आकाराचा मधला लोटा. एवढेच सोपे सुटसुटीत घर. पूर्वी होते माणसांचे घर आता झाले आहे देवांचे घर. त्या घराच्या वर्धापनदिनी आम्ही सर्वजण गेलो होतो. बाजूला आमचे स्वतंत्र घर आहे, तिथे मी रात्री झोपले पण झोप आली नाही. दुसऱ्या रात्री या नवीन घरात झोपले. आणि काय कोणास ठाऊक पण जेव्हा डोळे मिटले तेव्हा असा भास झाला की आपण जुन्या घरातच झोपलोय. त्याच भिंती,तीच जमीन जिच्यावर वर्षानुवर्षे डोकं टेकलं. चार भिंतीतली तीच पोकळी. तीच स्पेस जी पूर्वी होती. काहीच बदलले नाहीये. हे तर तेच घर आहे. दृश्य भिंतीनी की अदृश्य भिंतीनी बनलेले घर. त्या जागेतला कण अन कण तोच. भिंती कोसळू शकतात पण त्यातलं जिवंतपण कोसळू शकत नाही. आणि बिनघोर झोप लागली.
या अनुभवावरून घर म्हणजे काय ते समजले नाही पण एवढे मात्र समजले ते म्हणजे घर ही एक मोठी विलक्षण चीज आहे.
No comments:
Post a Comment