Tuesday 9 August 2016

काली


 'काली' ही जी. ए. कुलकर्णी यांची कथा आहे. 'सांजशकुन' या त्यांच्या कथासंग्रहातली. फक्त तीन पानांची आहे. पण त्यांच्या अनेक कथांतील अतिशय परिपूर्ण अश्या काही कथा आहेत त्यापैकी ती एक वाटते. 

एक माणूस एका गावातील कालीच्या देवळात येतो. खुप लांबचा प्रवास करून. गाडीने. पण एका ठिकाणापाशी दारातच उभ्या असलेल्या त्याला कुणीतरी गाडीतून ढकलून देते. तो धडपडतच तोल सावरत चालत्या गाडीतूनच उतरवला जातो. तो गाडीतून कुठे चालला होता? गाडी कुठे चालली होती? कोण जाणे. 

पण उतरवून दिल्यावर मात्र तो म्हणतो, 'मी काही पुढे जाणारच नव्हतो. मला येथेच उतरायचे होते. मग गाडी नीटपणे थांबवायला काय झाले होते?' अर्थात हा राग तो स्वतःलाच सांगतो.

कोण आहे हा माणूस? जो ढकलून दिल्यावर तोल सावरत उतरतो एकदाचा, म्हणतो की मला इथेच उतरायचे होते.  पण मग तो तसे गाडीवानाला सांगतो का? की गाडी थांबेलच असा त्याचा अंदाज असतो? बहुतेक गाडी इथे येईपर्यंत त्याच्या मनाची खात्रीच नसावी कि आपण इथे उतरावे की नाही. तो निर्णय घ्यावा की नाही? निर्णय. चॉईस. तो घेण्याचे स्वातंत्र्य त्याला फक्त तोपर्यंतच होते जोपर्यंत तो गाडीच्या दारापाशी उभा होता. गाडी थांबेपर्यंत नक्की करणार नव्हता तो हा निर्णय. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते का त्याला पण? नव्हते. त्याच्या निर्णय घेण्याआधी तिसऱ्याच कुणीतरी त्याला गाडीबाहेर ढकलून दिले. कुणी? तर अश्या कुणीतरी ज्याच्यावर या माणसाचा कंट्रोल नव्हता. निर्णय कुणी घेतला मग? कुणीही नाही. 
जे काही अभावितपणे  घडलं त्यावरची या माणसाची प्रतिक्रिया म्हणजे 'मला इथेच उतरायचं होतं'. त्याला त्याची नियती कळली होती आणि बहुदा हेही कळलं होतं की आपण फक्त मनात ठरवायचं. प्रत्यक्षात निर्णय घेणं आपल्या हातात नाही. याच जीवनाची सवय लागली होती त्याला. 

जे घडेल त्यावर आपला कंट्रोल नाही हे मान्य आहे त्याला. पण कुरकुर करणे सोडेल का तो? कुरकुर करणे आणि निषेध व्यक्त करणेच त्याच्या हातात असल्याने त्याने तो व्यक्त केला.त्याच्या मनातील अफाट पसरल्या केवळ आणि केवळ त्याच्या विश्वातला(आणि त्या विश्वाचा) तो नायक. त्याला वाटते आपलेच विश्व  खरे. मग आपल्याला उतरताना थोडे अदबीने, मृदूभावाने उतरवले पाहिजे गाडीतून. पण हे त्याचे वाटणे. त्याच्यापुरतेच. त्याच्याबाहेरील विश्वात तो एक कस्पट. म्हणून ढकलून दिले गाडीतून. निषेध गाडीतून ढकलल्याचा नाही. निषेध आपल्या मनातील विश्व खोटे ठरल्याच्या आलेल्या प्रत्ययाचा. 

तो चालत गावात येतो. गाव ओसाड  पडलेले. कड्याच्या पायथ्याशी वसलेले. एका कड्याने आपला काळा फणा गावावर धरलेला. 'काळा फणा' की 'काळ फणा'?.  तो इथल्या स्मृती आठवत, कालीच्या देवळात येतो. गावातील घरे त्याच्या ओळखीची. पण आता तिथे कुणी नाही. हे गाव खरं की परत मनातलं? जुन्या आठवणीतलं? 

हा माणूस आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहे कि जिथून आठवणीत जिवंत असलेली पण आता ओसाड पडलेली घरं त्याला दिसत आहेत? ऊन तर कथा सुरु होते तेव्हापासून साथीला आहेच त्याच्या. कथेला सुरवात होते तेव्हा ऊन प्रखर असते. त्याच्या झळा जाणवत राहतात. ते ऊन आठवणींच्या ओसाड घरांच्या भिंती-छपरावरून निर्विकारपणे ओघळत असते. 

शेवटी जेव्हा तो पायऱ्या चढत कालीच्या मंदिरात पोहोचला तेव्हा ऊन 'थोडे मऊ' झाले होते. 

कालीची मूर्ती भव्य. दोन पुरुष उंच. सहा हातांची. चकचकीत काळ्या पाषाणाची. त्या माणसाने हि मूर्ती पूर्वी अनेकदा पहिली होती. पण तिच्या भेदक नजरेने त्याचा भीतीने थरकाप उडत असे. मूर्तीच्या उजव्या हातात खड्ग होते. काली म्हणजे संहारी. मृत्यूची देवता. या देवळात तो माणूस कश्यासाठी आला होता? त्याने ही मूर्ती पूर्वी अनेकदा बघितली होती, या गावात राहत असताना बघितलेली खरीखुरी, या गावच्या आठवणींमध्ये असेलली, आणि मनातही पाहिलेली. काली त्याने खुद्द बघितलेली आणि काली त्याच्या मनात व्यापून राहिलेली. 

तो देवळाच्या गाभाऱ्याचे वर्णन करतो. गाभारा म्हणजे गर्भगृह. त्यात असलेली कालीची मूर्ती. गर्भातला रक्तरंजित लाल प्रकाश तिच्या सर्वांगावर निथळत होता. गर्भगृहाची विशाल चौकट, पूर्णपणे मोकळी दिसत होती. म्हणजे गर्भगृहात येण्याला मज्जाव नाही. जाण्याला आहे बहुतेक. पण या माणसाला माहित होते कि मोकळ्या दिसणाऱ्या या गर्भगृहाच्या चौकटीत एक अत्यंत पारदर्शक अशी स्फटिकाची भिंत होती. अभेद्य, अदृश्य. त्याला तिचे अस्तिव उमगले होते. या स्फटिकातून आरपार जाण्याचा प्रयत्नही त्याने आधी केला होता, तो जवळजवळ पार झाला असताना ऐनवेळेला त्याला आपली बायको-मुलं आठवली, आणि स्फटिक पुन्हा अभेद्य शिलाखंडाप्रमाणे झाला होता. कोणीतरी ओढून फेकून दिल्याप्रमाणे तो फरशीवर येऊन आधळला होता. 

म्हणजे मागाचचे गाडीतून ढकलणारे इतर कुणीही नव्हते आणि त्यावेळी स्फटिकातून ओढून फेकून देणारेही इतर कोणीही नव्हते. 

जुने आठवून तो थोडा उदास झाला मग पुन्हा स्फटिकापाशी आला आणि कालीला उद्देशून म्हणाला 'देवी, या खेपेला मला स्वीकार. मोहात अपयश आल्याने होणारी यातनाही नको मला आणि यशस्वी झाल्यास क्षणिक तृप्ती देऊन नंतर अनंत असमाधान करणारे सुखही नको मला. मृत्यू अटळ आहे आणि तोच अढळ, निश्चल विश्वास ठेवण्याजोगा. पण एखाद्या मारेकऱ्याप्रमाणे येऊन मृत्यूने माझ्यापुढे प्रहार करावा ही घटना मला कमीपणाची वाटते. मीच मृत्यूपुढे येऊन उभा ठाकलो आणि सन्मानाने त्याच्या अधीन झालो असे एवढे तरी मानचिन्ह माझ्यापाशी राहू दे.'

आपल्या मनातल्या मनात उभारलेल्या विश्वातील त्या विश्वनायकाला मृत्यूचा चोरासारखा येऊन घातलेला घाला अपमानास्पद वाटणारच. कारण त्याच्या विश्वाचा तो हिरो आहे. नायक आहे. माझ्या मनातल्या विश्वातलेच घडावे हीच त्याची इच्छा. त्याविरुद्ध घडणे म्हणजे कमीपणाचे होणारच त्याच्यासाठी. त्यासाठी कालीला प्रार्थना करून तो स्फटिकात शिरतो. 

स्फटिकातून आरपार घेण्यावर त्याच्यात आणि कालीमध्ये अंतर उरतच नाही. जसा तो पुढे जाऊ लागतो तशी कालीची मूर्ती मागे मागे जात लहान होत जाताना तो बघतो. ती शेवटी एवढी लहान होते की तिच्या हातातले खड्ग त्याला शूद्र तुकड्यासारखे दिसायला लागते. आता त्या माणसात भयाचा अंश राहत नाही. समोरच्या भिंतीवर एक पूर्ण भिंत व्यापलेला आरसा असतो. त्या आरश्यात फक्त कालीचा रिकामा चबुतरा त्याला दिसतो. तो जोरजोरात हसतो म्हणतो 'या असल्या मृत्यूने माझ्या जीवाचा थरकाप झाला होता.  या मूर्तीची नजर मला भिववत होती. पण ते स्फटिकाबाहेर. तिथे त्या स्फटिकामुळे मूर्तीचे स्वरूप एवढे भव्य दिव्य झाले होते ज्याला मी घाबरत होतो. पण ही मूर्तीच एवढी टीचभर तर त्या मूर्तीच्या आधाराने जगणारा मृत्यू याहीपेक्षा शूद्र नव्हे तर काय ?' 

पण जेव्हा असे म्हणत, तो हातवारे करत जोरजोरात हसू लागला, खोलीतला प्रकाश त्याच्यावर पडत होता आणि त्याच्या बाजूच्या भिंतीवर देवीच्या दोन पुरुष एवढ्या आकाराची सावली  दिसत होती, तेच हातवारे करत. जेव्हा तो आरश्यापाशी आला तेव्हा पुन्हा त्याच्या मनात भय दाटले. कारण त्या आरश्यात त्याचे प्रतिबिंबच नव्हते. तरीही उसने अवसान आणून तो म्हणाला 'मृत्यू, मी तुज्यावर विजयच मिळवला आहे, मीच आपणहुन तुझ्याकडे आलो, तू माझे शरिर घेऊन गेलास. जे मला नकोच होते. आता हा जो मी उरलो आहे त्याच्यवर शस्त्राचा काही परिणाम होणार नाही. मी आता इथे उभा आहे आणि नंतर त्या रिकाम्या चबुतऱ्यावर उभा राहणार आहे'

सावली कोणाची? प्रतिबिंब कसले? आणि सावली असून प्रतिबिंब नसलेला माणूस तरी कसला? शरीरहीन माणसाला मन असते का? ही सावली कुणाची? मनाची? जी त्याचे हावभाव तसेच्या तसे दाखवत आहे. आणि प्रतिबिंब का बरे नष्ट झाले? की हे सर्व त्याच्या मनाचेच मनाने मनाशीच केलेले खेळ आहेत? आणि प्रतिबिंब न दाखवणारा आरसा तरी कसला?

जेव्हा त्याने मृत्यूला उद्देशून केलेले आपले बोलणे संपवले आणि समाधानाने डोळे मिटले त्याक्षणी त्याचे चाळे  पाहत आतापर्यंत उभ्या असलेल्या कालीच्या मूर्तीने हातातले  खड्ग उगारून त्याचा शिरस्छेद केला. धड फरफटत कोपऱ्यात नेले, आधीचे धड बाजूला करून ताजे धड त्या जागी ठेवले. आणि पुन्हा चबुतऱ्यावर आली. हातात खड्ग घेऊन निर्विकारपणे पाहत उभी राहिली. 

हेच आहे. 
माणूस. मनातला आणि खराखुरा. 
जगणे. मनातले आणि खरेखुरे. 
काली. मनातली आणि खरीखुरी. 
मृत्यू. मनातला आणि खराखुरा. 

आपल्याला  जगण्याचा खराखुरा अनुभव कधी येत नाही आणि आपल्याला खऱ्याखुऱ्या मृत्यूचा अनुभव कधी येत नाही. आपण जे जगतो ते मनात. खरंखुरं नाही. आपण जे मरतो ते मनात. खरा मृत्यू आपल्याला कधी दिसतच नाही. आपण आपल्या मनात. काली आपल्या मनात. सगळं जग आपल्या मनात. आपण कल्पिलेला मृत्यूही आपल्या मनात. 

मनात, 
आपण असे, आपण तसे,
काली तशी, 
जगणे असे,
आणि मृत्यू तसा,
फक्त 'अशी' आणि 'तशी' नसते 
ती वास्तविकता.

1 comment:

  1. ही कथा अतीशय absurd आहे.फार पूर्वी वाचली होती तेव्हां अजिबातच कळली नव्हती,आताचं तुझं भाष्य वाचून जराशी उलगडली असं वाटलं खरं पण तरी अजूनही संदिग्धच वाटते.

    ReplyDelete