Monday, 20 March 2017

मनाला पडलेलं नाईटमेर (दुःस्वप्न)

सर्व फुलं पानं
पक्षी वृक्ष
एका क्षणात
बनतात भूतं
मनातल्या स्मशानात
सुंदर पाकळी
तिथे जीभ नागाची लसलसती काळी
सुंदर पाखरं सगळी
मनाच्या भुयारातली वटवाघळी
फेर धरून नाचतात
कानांच्या पडद्यावर ढोल पिटतात
बॉ बॉ बॉ करून बोंबटतात
चर्रकन चटका बसून हात मागे होतो
अंधारात गुडूप होऊन त्याचा सर्रकन विळखा होतो

मी एक पान

मी एक पान
शुष्क
भरकटणे
अविरत
ओढ वाऱ्याची
आणि भ्रांत
तरंगणे
पसंत
तुटलेला मी
देही क्लांत 
कधी होईन शांत
झालो विलग
तरी उरून थोडा रंगीत 
अंती अंतरी
आहे प्रतिक्षेत

१०-मार्च-२०१७

Sunday, 19 March 2017

पॅरानॉइड १

पाहता सृष्टी 
मन मात्र कष्टी
जे सूक्ष्म ते विशाल 
उमजेना

पसारा अनंत
पसरे दिगंत
कशी व्हावी उकल
उरी विकल

घालू पाहता मेळ 
सापडेना नाळ                      
दाटे सांजवेळ 
उपरेपण केवळ

कशी करू मैत्री
होऊ एकसूत्री                                  
तुझ्या अवाक्यापुढे 
मी गलितगात्री

कवेत घेता
मिठी जाई सुटून
तुटलेल्या काळोखात शोधून 
दिवा आणू कुठून

६-मार्च-२०१७ 

Tuesday, 14 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १२ : वारस वृक्ष

तुंगारेश्वर येथील वारस वृक्ष
तुंगारेश्वरच्या जंगलात मार्चच्या दरम्यान वारस वृक्षाची फुले फुललेली दिसतात. हा एक मोठा वृक्ष आहे. मराठीत याला 'पातंग', 'फुलंग' असे म्हणतात. 
शास्त्रीय नाव Heterofragma quadrilocularis. हा वृक्ष Bignoniaceae या कुळातील आहे. 'हेटेरोफ्रॅग्मा' असे जातीनाम यासाठी आहे की या वृक्षाच्या फळातील चार कप्पे अनियमित आकाराचे असतात.  फळ चार कप्प्यांचे म्हणून 'क्वाड्रिलाकुलॅरीस'. 

पाने, कळ्या आणि फुले


फेब्रुवारीच्या अखेरीपासून ते एप्रिल पर्यंत वारस फुलण्याचा काळ असतो. एरव्ही हा वृक्ष नुसताच अवाढव्य वाढलेला दिसतो. पण वसंत ऋतूमध्ये  पांढरट-गुलाबी अश्या फुलांनी बहरून जातो तेव्हा तो वेगळाच दिसतो. पक्षी, कीटक या वृक्षाच्या मोठ्या फुलांवर मध खाण्यासाठी हजेरी लावतात. त्यामुळे पक्षीनिरीक्षण करण्यासाठी आणि पक्ष्यांचे लक्ष आकर्षून घेण्यासाठी वारस हा एक उत्तम वृक्ष आहे. याला मार्च-एप्रिलच्या दरम्यान शेंगा धरतात. त्या लांबसडक असतात. या वृक्षाची पानेही विशेषपूर्ण आहेत. ती संयुक्तपर्णी असून विषम संख्येत असतात. हिवाळ्यात हा वृक्ष पर्णहीन होऊन जातो. 

वारस वृक्षाची फळे
फुले खूप मोठी  (पाच ते दहा सेमी आकाराची) असतात. फांद्यांच्या टोकाला फुलांचे केसाळ  तुरे येतात.  फुले पेल्यासारखी दिसणारी आणि सुवासिक असतात. कळ्याही मखमली, मुलायम असतात.
'वारस' वृक्षाची एक दुसरी पिवळ्या फुलांची 'पिवळा वारस' नावाची जात अंदमान-निकोबार आणि म्यानमार भागात आढळते.

Monday, 13 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ११ : कुसुंब


रंग कुसुंब्याचा !
तुंगारेश्वरच्या जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यात गेलं तर अनेक ठिकाणी लालसर, कुसुंबी रंगाची उधळण झालेली दिसेल. खालच्या दरीत असलेल्या वृक्षराजींमध्ये मधेच लाल रंग पसरलेला दिसेल. आपण विचार करू अरे हि कुठल्या वृक्षाची एवढी भरभरून आलेली फुलं असतील.  विदेशी स्प्रिंग ब्लॉसम इथे कुठे? बरं ते नाही तर विदेशी फॉलकलर्स इथे कुठे? 

हा विदेशी स्प्रिंग ब्लॉसम नाही का विदेशी फॉल कलर नाही. हि लाल कुसुंबी रंगाची फुलं नाहीत तर पानं आहेत आणि लाल-कुसुंब्या रंगाची उधळण करणारा वृक्षही पक्का देशी आहे. त्याचे नावच आहे 'कुसुंब' ! 

कुसुंब वृक्षाची पाने

मराठीत या वृक्षाला कुसुंब किंवा कोशिंब म्हणतात. हिंदीत 'कुसुम' म्हणतात. वसंत ऋतूमध्ये कुसुंबी (लालकिरमिजी + जांभळी + पोपटी यांचे मिश्रण) रंगच्या नव्या कोवळ्या पालवीने ओसंडून वाहतो म्हणून या वृक्षाचे नाव कुसुंब पडले आहे. शास्त्रीय नाव Schleichera oleosa आहे. हा  Sapindaceae कुळातील वृक्ष आहे.    

 पानांच्या मध्येच फुलांची लहान लहान आंब्याच्या मोहोरासारखी केसरं येतात. अतिशय बारकाईने बघितलं तर ही लहान फुलंही सौन्दर्यपूर्ण असतात. या वृक्षाची फळं खाण्याजोगी असतात. पक्षी, खारुताई ही फळे खायला या वृक्षावर हजेरी लावतात. 

मोहोर आणि फुलं

फळाचा फोटो विकिपीडियाच्या सौजन्याने
श्री. द.  महाजन यांनी आपल्या 'देशी वृक्ष' पुस्तकात हा  वृक्ष 'कल्पवृक्ष' म्हणून गौरवला आहे. आयुर्वेदातही या वृक्षाचे महत्व सांगितले आहे. 'कुसुंब' वृक्षाच्या झाडावर लाखेचे किडे चांगले पोसले जातात. म्हणून या वृक्षापासून उत्तम लाख मिळते.
अतिशय सौन्दर्यपूर्ण असा हा वृक्ष कुठेही लावला तरी  चांगला वाढू शकतो, आपल्या छायेने आणि कुसुंबी पालवीने मन प्रफुल्लित  करतो. याचा पाला गुरे खातात म्हणून याला लहान असताना जपावे लागते, पण एकदा वाढला कि हा वृक्ष अतिशय जोमाने वाढतो.


वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १०: कौशी वृक्ष



कौशी वृक्ष
या वृक्षाला मराठीत 'कौशी', 'काशी', 'खवस'; हिंदीमध्ये  'बोदला', 'सामारी',  गुजराती मध्ये 'कोदारो; इंग्रजी मध्ये Scarlet Sterculia (स्कार्लेट स्टर्क्युलिया) असे म्हणतात. 

या वृक्षाचे शास्त्रीय नाव Firmiana colorata / ' स्टर्क्युलिया कोलोरॅटा' आहे. हा वृक्ष 'स्टर्क्युलिएसी' या कुळातील आहे. 'स्टर्क्युलिया' हे नाव स्टर्क्युलिअस या लॅटिन देवाच्या नावावरून ठेवले गेले आहे. रोमन मायथॉलॉजीमध्ये Sterculius ("manure" or "feces") म्हणजे god of feces. लॅटिन मध्ये स्टर्कस म्हणजे गोबर/शेणखत. या वृक्षाच्या फुलाला शेणखत/गोबर सारखा उग्र वास येतो. म्हणून या वृक्षाचे नाव त्यावरून देण्यात आले आहे. पण हि फुलं अतिशय देखणी आणि आकर्षक केशरी रंगची असतात. या वृक्षाला इंग्रजीमध्ये बॉनफायर ट्री असेही नाव आहे. 

कौशीच्या कळ्या
मार्च/एप्रिल मध्ये हा वृक्ष पूर्णपणे निष्पर्ण होतो आणि त्यानंतर प्रत्येक पानाच्या देठाकडून नारिंगी रंगाची दांडी निघते,  या दांडीला लहान नारिंगी कळ्या येतात. या कळ्या फुलल्यानंतर वृक्ष केशरी/नारिंगी रंगाने बहरून जाते तेव्हा तो अतिशय लक्षवेधी दिसतो. फुलांचे सौन्दर्य वाखाणण्यासारखे असते. जेव्हा पुळे फुललेली नसतात तेव्हा कळ्या नारिंगी रंगाच्या फुगवलेल्या फुग्यांसारख्या दिसतात. एका दांडीला तीस चाळीस फुले असतात. त्यापैकी काहीच फुलांचे फळात रूपांतर होते. फळे लहान, चपटी , मांसल आणि नारिंगी रंगाची असतात. 



हा वृक्ष दक्खन आणि पश्चिम घाटात वन्य आहे. या वृक्षाच्या सालीत, पानात औषधी गुणधर्म आहेत. एक वेगळ्या सौन्दर्यपूर्ण फुलांचा वृक्ष म्हणून हा वृक्ष दारी लावला पाहिजे.
  



Friday, 10 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ९:गेळा

श्री. द. महाजन यांच्या 'आपले वृक्ष' या पुस्तकात एका वृक्षाने माझे लक्ष वेधून घेतले. तो काही भव्य, अतिसुंदर फुलांचा वृक्ष नाही. त्याचे नाव तर अगदी सामान्य 'गेळा'. पण पुस्तकात श्री. दंनी लिहिले आहे की फादर सांतापाऊ या थोर वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञाने या वृक्षाचा उल्लेख उद्यानवानस म्हणून जरूर लावावा असा देशी वृक्ष म्हणून केलं आहे. हे खरं आहे की अनेक विदेशी, भराभर वाढणाऱ्या वृक्ष्यांच्या गर्दीत भारतीय वृक्ष दुर्मिळ झाले आहेत. ते कुठेतरी जंगलात वाढत असतात. त्यांना अधिकाधिक लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे.
सह्याद्रीमध्ये हा वृक्ष विपुल प्रमाणात आढळतो असे श्री. द. महाजन यांनी लिहिले आहे. तसा हा काही मोठा वृक्ष नव्हे. एक छोटेसे काटेरी झुडपासारखे झाड. पण हे अतिशय गुणी झाड आहे. सुंदर पांढरी सुगंधी फुलं आणि खाण्यायोग्य फळे या झाडाला येतात. याचे फळ आयुर्वेदात वाखाणलं गेलं आहे. या फळाला 'गेळफळ' किंवा 'रानपेरू' असे म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव Catunaregum spinosa आहे. याला 'रँडिया ड्युमेटोरम' असेही म्हणतात. हिंदीत 'मैनफळ', कन्नडमध्ये 'कारेकायी गिडा, केरिगिड, मांगरीकाई' , गुजरातीत 'मिंधोला', तमिळमध्ये माडकराई, मल्याळम मध्ये कराच्चूल्ली, तेलगूमध्ये मर्रगा, ओरिया मध्ये पाटोवा, संस्कृतमध्ये 'मदन' म्हणतात. इंग्रजीमध्ये 'माऊंटन पॉमोग्रेनेट',''स्पायनी रॅंडीया','फॉल्स ग्वावा', 'थॉर्नी बोन ऍपल', 'एमिटिक नट', 'बुशी गार्डेनिया' असे म्हणतात. या झाडाचे कुळ 'रूबिएसी'(Rubiaceae) असे आहे.

गेळाचे फुल (फोटो सौजन्य : फ्लॉवर्स ऑफ इंडिया संकेतस्थळ )
गेळाचे फळ

याला मे महिन्यामध्ये फुले येतात. याच्या फळात  मत्स्य-विष आहे. परंतु आयुर्वेदात या फळाचे तसेच सालीचे औषधी गुणधर्म सांगितले गेले आहेत. लहान मुलांना तापावर, दात येण्याबद्धलच्या तक्रारीवर या फळाचे भरड चूर्ण देण्यात येते. सालीचेही हाडांच्या तक्रारींवर औषधी उपयोग आहेत. हे फळ पिकले की भाजून खाल्ले जाते. फुले सुंगधी आणि पांढरी, पिवळी मोहक अशी असतात.

अशाप्रकरचे हे बहुगुणी छोटे झाड एकतरी लावायला हवे.

Thursday, 9 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ८:बकुळ

'शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी'  हे मंगेश पाडगावकरांच्या  कवितेतील शब्द आपल्याला पुस्तकात ठेवलेल्या सपाट झालेल्या, आणि तरीही मंद सुवास देणाऱ्या बकुळीच्या नाजूक फुलाची आठवण करून देतात.  बकुळीची फुले असतातच तशी, वर्षानुवर्षे जपून ठेवावी अशी. कारण बकुळीचे झाड तसे दुर्मिळच. बकुळीला कोकणात 'ओवळं' म्हणतात. लहानपणी ओवळांची फुलं आणि त्यांचे वळेसर बाजारात विकायला आलेले मी खूपदा पाहिले आहेत. पण त्या काळात याची झाडं कुठे आहेत याचे काही स्वारस्य नव्हते. नंतर शोभेचे वृक्ष म्हणून कुठेकुठे शहरात लावलेले वृक्ष मी पहिले आहेत. पण दाट रानात मंद सुवासाची फुले माळून उभ्या असलेल्या गूढ अशा बकुळीच्या वृक्षाची त्याला सर नाही. तसाच दुसरा वृक्ष सुरंगीचा. हा तर त्याहूनही गूढ आणि मादक गंध असलेली फुले असलेला वृक्ष. वृक्षांमध्ये लिंग असते-नसते माहित नाही, तरीही बकुळी आणि सुरंगी ही स्त्रीझाडे असावीत असेच वाटते.

बकुळीचे शास्त्रीय नाव Mimuspos elengi. हिंदीत 'मौलसरी', इंग्रजीत स्पॅनिश चेरी, मेडलर, बुलेट वूड असे म्हणतात. या वृक्षाची फुले अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. पानांच्या बगलेत फुले येतात. हे फुल हातात घेऊन नीट निरखून बघावे असे असते. रंगही हिरवट-पिवळसर पांढरा. ही फुले केसरयुक्त असतात(त्यांच्या पटलांवर सूक्ष्म केस असतात.) त्यामुळे त्यांना 'केसरवृक्ष' असेही म्हणतात. फुले वसंत ऋतूमध्ये येतात.

बकुळीची फुले (फोटो सौजन्य : विकिपीडिया)
बकुळीचा वळेसर(फोटो सौजन्य : विकिपीडिया)

या फुलांचे वळेसर कोकणातील स्त्रिया केसांत माळतात. याचा वळेसर नुसता गुंतून केला जातो आणि छानही दिसतो पण खरा वळेसर बघावा तो सुरुंगीच्या फुलांचा.
बकुळीच्या फुलांपासून अत्तर तयार केले जाते, तसेच बकुळीच्या बियांत औषधी गुणधर्म असलेले तेल असते.

बकुळ वृक्ष संस्कृत साहित्यात अतिशय नावाजला गेला आहे. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' पुस्तकात कालिदासाच्या काव्यपंक्ती बकुळ वृक्षाचे वर्णन करतात.

सुवदनावदनासवसंभृतस्तदुनुवादिगुणः कुसूमोद्गम: ।
मधुकरैरकरोन् मधुलोलुपै: बकुलमाकुलमायतपंक्तिभि: ।। ९.३०।।

सुंदर स्त्रियांच्या अश्रुंवर पोसलेल्या बकुळ वृक्षाच्या फुलांचा बहर त्याच्या सद्गुणांचे अनुकरण करीत होता. या फुलांभोवती घोळका करणाऱ्या भुंग्यांनी त्याला भांबावून सोडले. मध लुटण्याकरिता या प्राण्यांनी एकच झुंबड केली.

'ऋतूसंहार' या कालिदासाच्या काव्यातही बकुळ वृक्षाचा उल्लेख पावसाळ्याच्या वर्णनात आढळतो.

शिरसि बकुलमालां मालतीभि: समेतां विकसित नवपुष्पैर्यूथिकाकुड्मलैश्र्व  ।। २.२४ ।।
बकुळीच्यामाळा स्त्रियांनी माळल्या आहेत. पावसाळ्यातही बकुळीला फुले येतात, उन्हाळ्यापेक्षा ती कमी असतात तरीही.

बकुळ वृक्षासारखाच एक वृक्ष आहे, ज्याचे नाव आहे 'रायण' (शास्त्रीय नाव: Mimusops hexandra) याचं आणि बकुळ वृक्षाचं कुळ एकच म्हणजे 'Sapotaceae' आहे. हा वृक्ष गुजरात आणि कोकण भागात वन्य आहे. दुसरा एक वृक्ष आहे जो बकुळीच्या  कुळातील नाही पण तरीही त्याची फुले बकुळीच्या वृक्षाची आठवण करून देतात. हा आहे 'खिरणी' (Manilkara hexandra).

बकुळ वृक्ष कोणत्याही जमिनीत वाढू शकतो आणि अगदी दोनशेहुन अधिक वर्षे जगतो. बकुळ, खिरणी आणि रायण हे वृक्ष एकत्र लावण्याजोगे आहेत.

Wednesday, 8 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ७:मुचकुंद


या वृक्षाचे शास्त्रीय नाव Pterospermum suberifolium आहे. याचा बंधू आहे कनीयार वृक्ष (Pterospermum acerifolium). दोघे Sterculiaceae (स्टर्कुलिएसी)  या एकाच कुळातील आहेत. या दोन्ही वृक्षात नेहमी नावाची गफलत होते. कधीकधी दोन्ही वृक्ष 'मुचकुंद' या नावानेच संबोधले जातात.('देशी वृक्ष' या श्री. द. महाजन यांच्या पुस्तकात Pterospermum acerifolium म्हणजे मुचकुंद वृक्ष म्हटले आहे. तर म.वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' मध्ये Pterospermum suberifolium ला मुचकुंद म्हटले आहे) मग खरा 'मुचकुंद' कोणता? 
इंग्रजीमध्ये या वृक्षाला बयूर, मॅपल लीव्ह्ड बयूर, मॅपल ट्वीस्ट, डिनर प्लेट ट्री असे म्हणतात.

सर्वप्रथम मी 'मुचकुंद' हे नाव ऐकले जी.एंच्या पत्रात. त्यांनी वि.ल. बर्वे यांच्या 'मुचकुंददरी'या कादंबरीचा उल्लेख केला आहे. वि.ल. बर्वे हे कोकणात चिपळूणमध्ये राहणारे. त्यांच्या या कादंबरीत 'मुचकुंददरी' नावाचा भाग आणि त्याठिकाणच्या लोकांवर आधारित कथा आहे. अशी 'मुचकुंद दरी' त्यांना चिपळूणमध्ये कुठे दिसली होती का? आणि त्या ठिकाणी मुचकुंदाचे वृक्ष असल्यानेच या जागेला 'मुचकुंददरी' नाव पडले असेल का ? असा विचार माझ्या मनात तरळून गेला. तसं पाहायला गेलं तर 'मुचकुंदी' नावाची एक नदी रत्नागिरीतून वाहते. या सगळ्याचा 'मुचकुंद' वृक्षाचा काहीतरी संबध असला पाहिजे. कारण कोकणात मुचकुंदाचे वृक्ष आढळत असल्याचे अनेक वनस्पती अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे.  
Pterospermum acerifolium
Pterospermum suberifolium (फोटो सौजन्य : फ़ूल ऑफ इंडिया संकेतस्थळ)

मुचकुंद वृक्षाला पावसाळा संपताना फुले येतात आणि तो  मार्च-एप्रिल पर्यंत बहरात असतो. फुल पांढरे आणि सुवासिक असते. कळ्या लांबलचक असून त्यांना पाच धारा असतात. भोवताली तीन छेदे असून ती फुलापासून थोडी खाली उगवलेली असतात. फुल चार ते पाच सेमीचे असते तसेच फळही  तीन ते पाच सेमीचे असते. पानेही मोठी आणि सुंदर असतात.

मुचकुंदाची फळं (फोटो सौजन्य विकिपीडिया)

याच्या मोठ्या डेरेदार आकारामुळे याला 'छत्रवृक्ष' असेही म्हटले जाते. याच्या बुंध्याला जमिनीलगत नवीन धुमारे येतात आणि त्यातूनही मुचकुंद वृक्षाची वाढ होते, त्यामुळे हा वृक्ष खूप जुना असेल तर त्याचे एक बेटच तयार झालेले दिसेल. याचे प्रजातीय नाव 'टेरोस्पर्मम' यामागे देखील एक गमतीदार गोष्ट आहे. 'टेरोस्पर्मम' म्हणजे 'बियांना पंख असलेला'. या वृक्षाच्या बियांवर रुंद असा पंख असतो.  

'मुचकुंद' किंवा 'कनीयार' या वृक्षाचे उल्लेख रामायणात केले गेले आहेत, असे म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात त्यांनी म्हटले आहे.

मुचकुंद वृक्षाची रोपं त्याच्या बियांपासून तयार करता येऊ शकतात. एकदा लावला आणि उष्ण-दमट हवामान, पुरेसे पाणी असेल तर हा वृक्ष तीन-चार वर्षात फुलायलाही लागू शकतो.

Tuesday, 7 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ६:काटेसावर


काटेसावर किंवा शाल्मली
कांदिवली स्टेशनच्या जवळ एक दुर्लक्षित काटेसावर आहे. रेल्वेट्रॅक्स आणि अलीकडील बसच्या येण्याजाण्याच्या रस्त्याच्या मध्येच हा वृक्ष उभा आहे. पण फेब्रुवारी अखेरीस, मार्च च्या सुरवातीला तो असा काही भरभरून फुलतो की त्याचे रूप डोळ्यात सामावत नाही. एकही पान नाही, नुसती गुबगुबीत गुलाबी तांबूस फुलंच फुलं. कळ्याही फारच मोहक. आणि पक्ष्यांची सतत ये-जा. मागच्याच आठवड्यात मी आठ-दहा रोझी स्टारलिंग्स त्यावर बागडताना पहिल्या. रणरणत्या उन्हात हे पक्षी त्या पूर्ण गुलाबी लाल झालेल्या वृक्षावर फारच सुंदर दिसत होते. 
हा वृक्ष जेव्हा फुलतो तेव्हा या वृक्षावर पक्ष्यांची झुंबड उडते. फारच क्वचित दुसरा कुठला वृक्ष असेल जो पक्ष्यांना एवढा प्रिय आहे. या फुलांचा मध खायला मैना, रोझी स्टारलिंग्स, सूर्यपक्षी, फुलचूखी, बुलबुल असे कितीतरी पक्षी हजेरी लावतात. पक्ष्यांना घरच्या आसपास आमंत्रण द्यायचे असेल तर हा वृक्ष घरच्या आसपास असायलाच हवा.

याचे शास्त्रीय नाव Bombax ceiba. भारतात याला असंख्य नावे आहेत, काटेसावर, लालसावर, शेवरी, शाल्मली, सेमल, रगतसेमल. 

कळी आणि फुल
फुल पाच पाकळ्यांचे चार ते पाच इंच लांबीचे असते, त्याचा देठ अतिशय जड असतो आणि पाकळ्याही गुबगुबीत असतात. लहानपणी मला हे फुल आठवते ते फक्त वात्रट मुले एकमेकाला मारायला हे फुल शाळेत घेऊन येत ते. खरंच एक फुल अंगावर जोरात मारले तर लागू शकते. वात्रट मुलांना काय तेवढेच हवे! पण खरं तर एवढ्या सुंदर फुलांचा काय हा विक्षिप्त वापर ती करत असत! खरंतर या फुलात एवढा मध असतो की या मधाची मेजवानी झाडायला कीटक, मधमाश्या आणि अनेक पक्षी या वृक्षावर येतात. पक्षी आवडणाऱ्या कुठल्याही माणसाला हा वृक्ष दारी असावा असेच वाटेल. काही ठिकाणी काटेसावरीच्या फुलांची, कळ्यांची भाजी देखील केली जाते. 

फळापासून सावरीचा कापूस निघतो. या कापसाच्या गाद्या-उश्या करतात. सावरीच्या चिवट सालीमुळे तिच्या दोऱ्या वळता येतात. सावरीच्या सालीला छिद्रं पडली की त्यातून एकप्रकारचा रस वाहतो, याला मोचरस असे म्हणतात. याचा उपयोग अतिसारावरचे औषध म्हणून केला जातो.

कालिदासाच्या ऋतूसंहार काव्यात काटेसावर वृक्षाचे वर्णन डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात दिले आहे. 

बहुतर इव जात: शाल्मलीनां वनेषु स्फुटति कनकगौर: कोटरेषु द्रुमाणाम् ।
परिणतदलशाखानुत्पतन् प्रांशुवृक्षान् भ्रमति पवनधूत: सर्वतोSग्निर्वनान्ते ।। १. २६ ।।

वाऱ्याने सोनेरी अग्नी सर्वत्र भडकून सावरीच्या वनात डोंब उठला आहे. ढोल्या तडकत आहेत. मोठया वृक्षांची पाने आणि फांद्या यांवर तो उड्या मारीत आहे.

दुर्गा भागवत यांनी 'मुंबईतील वसंतागम'(भावसंचित) या लेखात काटेसावरीबद्धल लिहिले आहे. 'आणि इकडे एखाददुसरे सावरीचे झाड आहे. तेही लाल, पसरट, पेल्याच्या आकाराच्या फुलांनी भरून गेले आहे. फुलांचा रंग नामी, पण वास असा की पुसू नये. जवळ कोण जाईल? पण हे काय? हे पहा त्यावर 'पीलक'(Golden Oriole)पक्ष्याच्या सुंदर जोडप्याने घरटे बांधले आहे.'

सावरीचा आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे पांढरी सावर (श्वेतशाल्मली) Eriodendron anfratuosum. हा वृक्ष तांबड्या काटेसावरीच्या मानाने दुर्मिळ आहे. या वृक्षाला हिवाळ्यात फुले येतात.

एक नावाने बंधू असलेला अतिशय सुंदर फुलाचा वृक्ष म्हणजे सोनसावर. Cochlospermum religiosum (मराठी नावाचे साम्य सोडले तर बाकी या वृक्षाचे काटेसावरीशी तसे काही नाते नाही). या वृक्षाचे कुळ आहे Chchlospermaceae, तर काटेसावरीचे कुळ आहे Bombacaceae. पण जेव्हा 'आपले वृक्ष' या श्री. द. महाजन यांच्या पुस्तकात या वृक्षाला पाहिले तेव्हा वाटले, काटेसावर आणि सोनसावर दोन्हीही जवळजवळ लावायला हवेत. एकमेकांकडे बघून आपल्या वेगळ्या रंगाच्या फुलांना बघून ते किती खुश होतील.

'आपले वृक्ष' या पुस्तकात श्री. द. महाजन यांनी तर याला 'सर्वत्र आढळणारा, भारतीय एकात्मतेचं प्रतीक असलेला बहुगुणी वृक्षोत्तम म्हटलं आहे. त्यांच्या मते वनशेती, वनीकरण यासाठी काटेसावर हा वृक्ष  एक उत्तम पर्याय आहे. 

कांदिवली स्टेशन जवळचा फुललेला काटेसावर वृक्ष

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ५: सातवीण

सातवीण (सप्तपर्णी)
विस्तीर्ण, सदा हिरवीगार सावली हवी असेल तर हा वृक्ष लावला पाहिजे. याचे शास्त्रीय नाव  Alstonia scholaris. Arthur Hugh Garfit Alston नावाच्या शास्त्रज्ञाच्या गौरवार्थ या वृक्षाला अलस्टोनिया असे नाव दिले गेले आहे. 
या वृक्षाला सप्तपर्ण, सप्तछद असेही म्हणतात. हा वृक्ष Apocynaceae(अपोसायनेसी) या कुळातील आहे. 
इंग्रजीत या वृक्षाला Devil's Tree , dita bark tree असे म्हणतात.
जुन्या काळात या वृक्षाच्या लाकडापासून धूळपाटी बनावत असत म्हणून याचे जातीनाम scholaris असे शिक्षणाचा संबंध दर्शविणारे दिले गेले आहे. डॉ. हेमा साने यांच्या 'दुर्मिळ वृक्ष' पुस्तकात दिले आहे की शांतिनिकेतन येथे पदवीदान समारंभाच्या प्रसंगी या वृक्षाची फांदी प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येते. याचा बुंधाही अतिशय सुंदर दिसतो. एका पेरापासून सात पाने येत असल्याने(क्वचित पाच, सहा ,आठसुद्धा असू शकतात ) त्याला सप्तपर्णी म्हणतात. फुले गुच्छाने येतात आणि ती पांढरट-हिरवी असून उग्र वासाची असतात.
सातवीणीची फुलं (फोटो सौजन्य : विकीपीडिया)

या वृक्षाची साल अतिशय औषधी आहे. खेड्यात सातवीणीच्या पानांचा तसेच खोडाचा घरगुती औषध-उपायांत भरपूर वापर केला जातो. या वृक्षाची पाने तोडली अथवा बुंध्याला छेद केला तर त्यातून चीक येतो, तसेच उग्र गंधही येतो. या उग्र गंधावरून एक  उल्लेख  संस्कृत काव्यात केला गेला आहे. डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी'त खालील ओळी दिल्या गेल्या आहेत.

सप्तच्छदक्षीरकटुप्रवाहं असह्यमाघ्राय मदं तदीयं  ।
....... सेनागजेंद्रा विमुखा बभूवु: ।।रघु. ५. ४८ ।।

वन्य गजाच्या मदाचा दर्प इतका तीव्र होता की त्यामुळे सेनेतले गज परत फिरले.  हा दर्प सप्तछदाच्या चिकासारखा होता. कालिदासाच्या ऋतूसंहार काव्यातही सातवीणीवर संदर्भ सापडतात. सप्तछदाला पावसाळ्यात पांढरी फुले येतात असा उल्लेख त्यात आहे. (डॉ. हेमा साने ठिकाणी फुले ऑक्टोबर मध्ये येतात )

सातवीणीची फळे लांबलचक शेंगांसारखी असतात, पण या खऱ्या अर्थाने शेंगा नव्हेत. एका फुलापासून अशा दोन लांबच लांब शेंगेसारख्या फळांमुळे हा वृक्ष फळांच्या मोसमात एकदम वेगळा दिसतो. त्याच्या या विचित्र दिसण्यामुळेच त्याला 'डेव्हील्स ट्री' नाव पडले असावे. पण डेव्हिल सदृश या वृक्षात काहीच नाही, उलट सदाहरित, बहुगुणी असा हा वृक्ष कुठल्याही प्रकारच्या (पाणथळ सोडून) जमिनीत वाढू शकतो.

Sunday, 5 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ४:कांचन

कांचन (फोटो सौजन्य आंतरजाल)

कांचनचे शास्त्रीय नाव Bauhinia variegata आहे. याला इंग्रजीमध्ये orchid tree, camel's foot tree, kachnar and mountain-ebony असे म्हणतात.
मराठीमध्ये याला कोविदार असे म्हटले जाते. हा वृक्ष खूप  मोठा होतो. कांचन वृक्षाचे अनेक प्रकार आहेत.कांचन, रक्तकांचन, पिवळा कांचन, सेमला कांचन.  कांचन सिसालपिनेसी कुळात मोडतो. 
कांचनचे पान दोन पानाचे जोडपान असते. बॉहिन नावाच्या(कॅस्पर बॉहिन आणि जॉन बॉहिन) दोन फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ  बंधूंच्या स्मरणार्थ याचे वनस्पतिशास्त्रीय नाव 'बॉहिनिया' असे ठेवले गेले आहे. कांचनची पानं आपट्याच्या झाडासारखी असतात. दसऱ्याला लोकं आपट्याच्या पानांऐवजी कांचनची पानं ओरबाडून सोनं लुटतात. काहीही असो पण सणाच्या नावाखाली कांचन किंवा आपटा या झाडांच्या पानांची नासदुस करणे आपण थांबवले पाहिजे. आपट्याची फुलं दिसायला नगण्य असतात तर कांचनची फुलं अतिशय सुंदर असतात. कांचनाची पानंही आपट्याच्या पानांपेक्षा मोठी असतात. कांचनाच्या विविध प्रकारात फुलंही राणी रंगाची, जांभळी, पिवळी, पांढरी असतात.

या  वृक्षाला कांचन असे नाव का पडले?  
कांचनाच्या शेंगातील बिया मुले खेळताना नाणी म्हणून वापरत असत असा उल्लेख म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात केला आहे. कांचनचा एक प्रकार 'पिवळा कांचन' या वृक्षांविषयी एक पुराणकथाही या ग्रंथात त्यांनी दिली आहे. ती अशी 'रघुराजाने यज्ञ करून आपली सर्व संपदा देऊन टाकल्यावर कौत्स नावाचा ब्राह्मण  गुरुदक्षिणा देण्याकरता चौदा कोटी नाण्यांची याचना करू लागला. राजाने त्यासाठी कुबेरावर स्वारी करण्याचे ठरवले. पण स्वारी होण्यापूर्वीच इंद्राने पाऊस पाडला. कांचनाच्या फुलावर पडलेल्या प्रत्येक थेंबाचे नाणे बनले. या कथेतील कांचन हा 'पिवळा कांचन' (Bauhinia tomentosa) असून त्याच्या पिवळ्या फुलाच्या एका पाकळीवर एक तांबडा ठिपका असतो.

पिवळा कांचन (फोटो सौजन्य विकिपीडिया)

जानेवारीच्या अखेरीस हा वृक्ष फुलांनी ओसंडून वाहू लागतो. कांचनाच्या फुलाला अतिशय तरल असा सुवास असतो.
बॉहिनियाची एक अतिशय वेगळी जात डॉ. हेमा साने यांनी आपल्या 'आपले हिरवे मित्र' पुस्तकात दिली आहे. तिला कोकणात 'मावळी' असे नाव आहे. या जातीचे वैशिष्टय असे की हा वृक्ष नसून एक वेल आहे. पण वेलीचा आकार एवढा मोठा की सहज दोन तीन माणसे त्यावर लोंबकळू शकतात. त्यांनी दिल्याप्रमाणे अलिबागजवळच्या कनकेश्वराच्या जंगलात ह्या वेली सापडतात. या वेलींची पाने इतकी मोठी असतात की त्यांची पत्रावळ होऊ शकते. 
संस्कृत साहित्यात कांचन वृक्षावर संदर्भ सापडतात. 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात दिल्याप्रमाणे कालिदासाने 'ऋतुसंहार' या ग्रंथात विंध्य पर्वताच्या वनश्रीचे आणि कांचन वृक्षाचे केलेले वर्णन पुढील ओळीत आढळते.

मंदानिलाकुलितचारू-विशालशाखः | पुष्पोद्गमप्रचुरकोमलपल्लवाग्रः ||
मत्तव्दिरेफपरिपीतमधुप्रसेकः | चित्तं विदारयति कस्य न कोविदारः || ऋ. ३. ६

मोठ्या फांद्या असलेला, कोवळी पालवी आणि फुलं एकदमच फुलवणारा, मधुसेवनासाठी भुंगे ज्याच्या फुलांवर रुंजी घालतात असा हा कांचन वृक्ष कुणाचे चित्त वेधून घेणार नाही?       

आणखी एक जात Bauhinia blakeana म्हणजे हाँगकाँग ऑर्किड ट्री, अतिशय सुंदर फुलांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात ही फुलं फुलायला सुरवात होते आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पूर्ण बहर असतो.

श्वेतकांचन (bauhinia hookeri ) ही परदेशी कांचन वृक्षाची जात आहे. या वृक्षाची फुले सुवासिक, पांढरी असतात. फुलाच्या मधोमध तांबडे केसर असते. पण हा वृक्ष  दुर्मिळ आहे.

एकांचन म्हणजेच Bauhunia monandra  हा आणखी एक वृक्ष परदेशातून इथे स्थायिक झाला आहे. त्याला गुलाबी बहुनिया असे म्हणतात.  या फुलाचे एकच केसर प्रौढ होते म्हणून याला एक-केसर कांचन  किंवा एकांचन असे म्हणतात.

एकांचन (फोटो सौजन्य: विकिपीडिया)

कांचनची साल, पाने  आणि मुळे यांना औषधी गुण आहेत. कांचन वृक्षाचा आणखी एक प्रकार श्री. द. महाजन यांच्या 'आपले वृक्ष' पुस्तकात नोंदला गेला आहे. त्याचे नाव आहे सेमला कांचन(Bauhunia Semla/Retusa ). याची पाने अग्रभागी उथळ खड्डा असलेली असतात, म्हणून शास्त्रीय नावात 'रेटयूसा' शब्द आहे. हा वृक्ष पूर्ण भारतीय असूनही दुर्मिळ आहे. हा वृक्ष मध्यभारत, पंजाब, उत्तर भारतात, हिमालय पायथ्याशी, शिवालिक पर्वताच्या जंगलात तुरळकपणे आढळतो. याची फुले  त्याच्या  कांचनबंधू वृक्षांपेक्षा खूप वेगळी आणि देखणी असतात. पावसाळ्याच्या शेवटी जुलै ते सप्टेंबर या काळात पांढऱ्या छोट्या फुलांनी गच्च भरून जातो. फांद्यांच्या टोकाला फुलांचे तुरे येतात आणि एकेका गुच्छात चार ते सात फुलं येतात. मार्च ते एप्रिल या काळात त्याच्या गडद लाल शेंगातून फुटून बिया खाली पडतात. 

सेमला कांचन (फोटो सौजन्य : फ्लॉवर्स ऑफ इंडिया संकेतस्थळ)
कांचनच्या वृक्षावर एक पोस्टाचे तिकीट १९८१ साली काढले गेले आहे. असा हा सुंदर फुलांचा कांचन वृक्ष दारी लावावा असाच आहे. 

Friday, 3 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती ३: बहावा

बहाव्यावरचे पोस्टाचे १९८१ मधले तिकीट
खरंतर याला पिवळा सोबती म्हटलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांचाही सोबती! या वृक्षाचे पिवळे फुल केरळमध्ये 'कानीकोन्ना' नावाने ओळखले जाते. या फुलाच्या उमलण्यावरून पावसाळा केव्हा येईल याचा अंदाज केरळ मधील शेतकरी करतात.

पुण्याच्या डहाणूकर  कॉलनीच्या पहिल्या सर्कलला लागून बहाव्याचे एक सुंदर झाड आहे. आता त्याला सुदंर म्हणावे कि नाही हा एक प्रश्नच आहे. एरव्ही या बाजूला फिरकलात तर तसे ते चटकन ओळखताही यायचे नाही. तसा हिरवागार पुष्परहित बहावाही देखणा दिसतो पण इतर झाडांच्या गर्दीत तो मिसळून जातो. पण वसंत ऋतूमध्ये  मार्च-एप्रिलच्या दरम्यान त्याची पानं झडायला लागतात. तो  फुलायला लागतो आणि झगझगत्या पिवळ्या फुलांच्या घोसांनी ओसंडून वाहायला लागतो तेव्हा हा बहावा कुठूनही ओळखता येतो.  एरव्ही दडी मारून बसलेल्या बहाव्याला या काळात ऊत येतो , त्याच्या फुलांची घोसाघोसांनी बनलेली सोनेरी झळाळी डोळ्यात सामावत नाही. बहाव्याला संस्कृतमध्ये 'आरग्वध,कर्णिकार' अशी नावं आहेत. शास्त्रीय नाव Cassia fistula (कॅशिया फिश्चुला). फिश्चुला म्हणजे 'लांब नळी'. बहाव्याची फळं लांबलचक लांब नळीसारखी असतात. हिंदीमध्ये त्याला अमलतास म्हणतात, इंग्रजीत 'गोल्डन शॉवर', 'इंडियन लॅबर्नम' असेही म्हणतात. 

बहावा उन्हाळ्यात सोनेरी वृक्षराज बनून जातो. त्याच्या जर्द पिवळ्या गोल पाकळ्यांच्या फुलांच्या घोसांची भुरळ न पडणे अशक्य. पुरातन काळातील साहित्यात या वृक्षासमान फुले असणाऱ्या, कर्णफुलांसारखा वापर करता येणाऱ्या फुलांच्या वृक्षाचे अनेक उल्लेख आहेत. तो उल्लेखिलेला वृक्ष बहावाच असावा असे काहींचे म्हणणे आहे.

डॉ. म. वि. आपटे यांनी त्यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात म्हटले आहे कि कालिदासाच्या कुमारसंभवात कर्णिकाराचे जे उल्लेख येतात ते बहाव्यासंबंधी आहेत. पण या ओळीतील वृक्ष बहावा नसावा असे श्री. द. महाजन यांनी आपल्या 'आपले वृक्ष' पुस्तकात म्हटले आहे. 
आकृष्टहेमद्द्युतिकर्णिकारं वसंतपुष्पाभरणं वहन्ती । अ. ३. ५३. 

कर्णिकारलताः फुल्लकुसुमाकुलषट्पदाः।
सकज्जलशिखा रेजुर्दीपमाला इवोज्ज्वलाः॥ (विक्रमोर्वशीयम्)

बहाव्याची फुले कानात घालायच्या आभूषणांसारखी असतात. म्हणून तर त्याला कर्णिकार म्हणत नसावेत ना? 

या खालील अमरकोशातील ओळी बहाव्यासाठीच असतील का?
आरग्वधो राजवृक्षशम्पाकचतुरंगुलाः ।
आरेवतव्याधिघातकृतमालसुवर्णकाः ।। अमरकोश, ६९६

बहाव्याचे भारतात सात प्रकार असून, एक बहावा पांढऱ्या फुलांचाही असतो. एक बहावा गुलाबी देखील आहे. त्याचे नाव Burmese Pink Cassia आहे. हा ही अतिशय देखणा वृक्ष आहे. 
बहावा हा गुलमोहर, कांचन यांच्या कुळातील आहे. यांचे कुळ एकच (Caesalpinaceae, सिसालपिनेसी ) आहे. हा वृक्ष तीनचार वर्षांत फुलू लागतो. याला जर चांगली गाळाची जागा मिळाली तर हे झाड अतिशय डेरेदार होते. पण अतिवृष्टी याला सहन होत नाही. एकदा लावला की भरभर वाढतो, याची पाने गाईगुरे खात नसल्याने तो कुठेही लावण्यासाठी अतिशय योग्य आहे. 

याची फुलं आदिवासी लोक खाद्य म्हणून वापरतात, फळाचा गर आंबट असला तरी खाण्यासारखा असतो, माकडे, कोल्हे इ. जनावरे आवडीने तो खातात. (त्याच्या या आम्ल गरावरून त्याला अमलतास नाव पडले असावे. ) तर बिया पोट साफ करण्यासाठी गावातील लोक वापरतात. पण याच्या बिया फळ सुकून फुटून रुजत नाहीत. त्याविषयीदेखील एक कहाणीच आहे बहाव्याची. तो काय करतो की आपल्या नळीसारख्या या शेंगाफळांना न उकलता तसेच खाली टाकतो. हि फळे भेकरं, कोल्हे, माकडं असे प्राणी खातात, त्याच्या विष्ठेवाटे त्या फळांच्या बिया स्थलांतरित होतात. त्यामुळे बहाव्याशेजारी अनेक बहाव्यांचे रान माजले आहे असे कधी होत नाही. या बिया रुजायलाही कठीण असतात, त्यांना रुजायला खूप काळ लागतो. परंतु काहीही असले  तरी नर्सरीतून एखादे रोप आणून बहावा दारी लावलाच पाहिजे.

फोटो सौजन्य: आंतरजाल

हार्ट इज अ लोनली हंटर


'हार्ट इज अ लोनली हंटर' हे पुस्तक  'जी. एं. ची पर्सनल लायब्ररी' या उपक्रमाखाली मी वाचायला घेतलं. यापूर्वी कार्सन  मॅक्यूलर्स या लेखिकेचं काहीच वाचलं नव्हतं. पण जी. एं. मुळे तिची ओळख झाली. जी. एं. च्या (सुनीताबाईंना लिहिलेल्या ) पत्रात लेखिकेबद्धल खालील उल्लेख आहे:

जी. एं. ची निवडक पत्रे खंड १ पान २४
'तुम्ही Carson Macullers या लेखिकेच्या काही कथा, कादंबऱ्या खात्रीने वाचल्या असतील. Clock without hands, Reflections in a Golden Eye, The wedding guest, The heart is a lonely hunter. या तिच्या कादंबऱ्या,  The Ballard of the sad cafe ही दीर्घ कथा. ती तशी लहानच minor लेखिका. पण अत्यंत रेखीव, जीवंत सहानुभूतीने रंगवलेली तिची काही व्यक्तिचित्रे haunting आहेत. तिचे खासगी आयुष्य मात्र जळणारे, जाळणारे होते. एकदा तिच्या नवऱ्याने बागेतील एका Pear Tree ला गळफास लावून घेऊन आत्महत्त्येचा प्रयत्न केला; पण फांदी मोडली व प्रयत्न अयशस्वी झाला. तेव्हा Carson ने अत्यंत थंड स्वरांत म्हटले, 'पुढच्या खेपेला दुसऱ्या कुठल्यातरी झाडाची निवड कर. आता पाहिलंस? फांदी मोडून माझं आवडतं झाड बेढब करून ठेवलंस!'

अशा या वेगळ्या लेखिकेचं 'हार्ट इज अ लोनली हंटर' हे एकमेव पुस्तक लायब्ररीत होतं ते आणून वाचलं. हे पुस्तक माझ्या कायम लक्षात राहील. कधीकधी काही पुस्तकं जाणून-बुजून तुमच्या वाट्याला येतात. ती खूप ग्रेट असतात म्हणून नाही तर ती त्या एका विशिष्ट मनःस्थितीत तुमच्या बाजूला बसलेली असतात. पुस्तकाचेही एक व्यक्तिमत्व असते. ते नुसते कव्हर बघून नाही कळणार. तुम्ही त्याला वाचा मग ते आपले व्यक्तिमत्व तुम्हाला उलगडून दाखवेल. त्यालाही काही सांगायचे असते ते सांगेल. 

काळ्या कभिन्न आरश्यात पाहत राहिले आणि आपलाच न कळलेला चेहरा बघण्याचा आटोकाट प्रयत्न केला तर काय होईल? तेच. तेच माझ्या डोक्यात भणभणत होते. तेव्हाच हे त्रस्त पुस्तक स्वतःची भूणभूण घेऊन माझी साथ करायला आले. 
केवळ जी.एं. च्या शब्दांवर मी ते पुस्तक घरी आणले होते. आज मी ते पुस्तक आठवते तेव्हा मला सर्वप्रथम आठवते ती माझी मनःस्थिती आणि त्या मनःस्थितीला समजून घेणारी पुस्तकातील काही पानं. या पानांतूनच या पुस्तकातील माणसंही भेटली.

या पुस्तकातील एक पात्र मूकबधिर जॉन सिंगर आपल्या अँटोनापोलस नावाच्या मूकबधिर सुहृदाला पत्र लिहितो. अशी अनेक पत्रं तो त्याला लिहीत असतो पण ती पाठवत नाही. कारण त्याचा एकेकाळचा जिवाभावाचा मित्र अँटोनापोलस  आता वेड्याच्या इस्पितळात असतो.  हे पत्र असं आहे:

माझ्या एकमेव मित्रा
मासिकात बघून मला कळलं की यावेळीचं (मूकबधिरांचं)संमेलन मॅकॉन इथे होणार आहे. आपण ही संमेलनं बघायला जायला हवं होतं असं मला आता वाटतं. मी कल्पना करतो की आपण हे संमेलन बघायला गेलो आहोत. पण खरंतर मी तुझ्याशिवाय एकट्याने कधी जाऊच शकलो नसतो तिथे. लोक इथे वेगवेगळ्या राज्यातून येणार आहेत. बोलण्यासारखे खूप काही आणि मनातील खोल स्वप्नं घेऊन ते येतील. चर्चने योजलेल्या विशेष योजना आणि बक्षिसंही असतील. हे सगळं मी कल्पनेने ठरवतो आहे. पण मला वाटतं तिथे येणारी सगळी माणसं तुझ्यासारखी असावीत.
मी आपल्या घराच्या समोर कालपरवा उभा राहिलो होतो. तिथे आता इतर माणसं राहतात. तुला समोरचं ओकचं झाड आठवतं? टेलीफोन वायरना व्यत्यय येऊ नये म्हणून त्याच्या फांद्या कापल्या गेल्या आणि ते मरून गेलं. आता सुकलेले अवशेष आणि पोखरलेला बुंधा उरला आहे. स्टोरमधल्या मांजराने काहीतरी विषारी खाल्लं आणि तेही मारून गेलं. खूप वाईट झालं.
मी तुला त्या चार माणसांबद्धल सांगितलं होतं आठवतं? मी त्यांची चित्रं तुला काढून दाखवली. काळा माणूस, छोटी मुलगी, मिशीवाला माणूस आणि कॅफेचा मालक. मला त्यांच्याबद्धल तुला काही सांगायचे आहे पण ते मी शब्दात कसं मांडू तेच मला कळत नाही.
ते सगळे अत्यंत व्यस्त लोक आहेत. खरं तर ते एवढे व्यस्त आहेत की त्यांचं निरीक्षण करणं , त्यांचं चित्र मनात तयार करणं खूप कठीण आहे. याचा अर्थ असा नाही की ते आपल्या व्यवसायात रात्रंदिवस व्यस्त असतात, पण त्यांच्या डोक्यात सतत फार मोठं कामकाज चालू असतं जे त्यांना स्वस्थ बसण्यापासून परावृत्त करतं. ते माझ्या खोलीवर येतात आणि इतकं बोलतात की मला कळतंच नाही की माणूस इतक्या वेळेला तोंडाची उघडझाप न थकता कशी काय करू शकतो? (फक्त न्यूयॉर्ककॅफेचा मालक थोडा वेगळा आहे तो निरीक्षण करत असतो. बाकीचे सगळे कशाचा ना कशाचा तरी द्वेष करतात. आणि ते सगळेच कशा ना कशावर तरी विलक्षण प्रेम करतात, खाणं -पिणं, मद्य किंवा कुणाचीतरी सोबत यापेक्षाही त्यांचे या गोष्टींवर जास्त प्रेम  आहे, त्यामुळेच ते नेहमीच अतिशय व्यस्त आणि अस्वथ असतात.)

मिशीवाला जो आहे तो वेडा आहे. कधी तो माझ्या जुन्या शिक्षकासारखं सुस्पष्ट बोलतो तर कधी तो अशा भाषेत बोलतो की मला ते आकळत नाही. कधी तो स्वच्छ सूट मध्ये येतो तर कधी इतके मळके-काळे कपडे घालून येतो, दारूच्या नशेत तो जे बोलतो ते तुला सांगण्यासारखे नाही. त्याला वाटते माझे आणि त्याचे काहीतरी गुपित आहे, पण मला माहित नाही काय ते. आणि तुझा विश्वास बसणार नाही पण तो व्हिस्कीच्या  तीन बाटल्या घेऊनदेखील पायावर उभा राहू शकतो, आणि बोलूही शकतो. हे खरं आहे.
मी लहान मुलीच्या आईकडून १६ डॉलर्स भाड्याने ही जागा घेतली आहे. ही मुलगी पूर्वी मुलांसारखे कपडे घालायची, आता मात्र निळा स्कर्ट आणि ब्लाउज घालते. मला तिचे येणे आवडते. माझ्याकडे रेडिओ असल्याने ती वारंवार येते. तिला संगीत आवडते. ती काय ऐकते हे मला कळले असते तर बरे झाले असते. तिला माहित आहे की मी ऐकू शकत नाही, पण तरीही मला संगीत कळते असे तिला वाटते.
ब्लॅक डॉक्टर आजारी आहे पण तो कृष्णवर्णीय असल्याने हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. तो स्वतः डॉक्टर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त काम करणारा माणूस मी आजवर बघितला नाही. कृष्णवर्णीयांसारखं तो अजिबात बोलत नाही. बाकीच्या कृष्णवर्णीयांना तो काय बोलतो ते कळत नाही. या डॉक्टरची मला कधीकधी भीती वाटते. त्याचे डोळे तापलेले आणि झगझगीत आहेत. त्याच्याकडे खूप पुस्तकं आहेत पण गूढकथा नाहीत. तो मांस-मद्य घेत नाही, चित्रपट बघत नाही.
'स्वातंत्र्य आणि चाचे ! मालमत्ता आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते!' असं मिशीवाला ओरडतो. पुढे म्हणतो 'स्वातंत्र्य हे सगळ्यात आदर्श आहे.' 'मला फक्त माझ्यातलं हे जे संगीत आहे त्याला लिहिण्याचा मौका मिळाला पाहिजे! संगीतकार होण्याचा !' छोटी मुलगी सांगते. 'आम्हाला देशाची सेवा करण्याचा हक्क नाही! माझ्या लोकांची ती गरज आहे !' ब्लॅक डॉक्टर म्हणतो.  'अहा !' कॅफेचा मालक म्हणतो. तो सुज्ञ आहे.
असे बोलतात हे लोक माझ्या खोलीवर आले की. त्याच्या हृद्यातील खदखद  त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे ते खूप व्यस्त असतात. तू यांना त्या मॅकॉनच्या संमेलनातील माणसं समजू शकतोस. पण तसंही म्हणता येणार नाही खरंतर. कारण आज ते चौघेजण एकाच वेळी माझ्या खोलीत आले, पण ते असे बसले जसे ते वेगवेगळ्या शहरातून आले आहेत, आणि त्यांचे एकमेकांशी वागणे अलिप्तपणाचे, उद्धटपणाचे होते. मला दुसऱ्यांच्या भावनांप्रती उद्धटपणा दाखवणे कधीच पटले नाही. मला खूप विचित्र वाटले जे मी तुलाच सांगू शकतो कारण तुला ते समजेल. आता त्यांच्याविषयी बोलणे थांबवतो कारण तुलाही त्याचा कंटाळा आला असेल. 

आता पाच महिने आणि एकवीस दिवस झाले आहेत. इतका वेळ मी तुझ्याशिवाय राहत आहे. मी फक्त एकच कल्पना करू शकतो की  परत तुझ्यासोबत कधी राहू शकेन.

या पत्रातून आपल्याला जॉन सिंगरच्या आजूबाजूची चार माणसं भेटतात. दहा वर्ष जॉन सिंगर आणि  अँटोनापोलस एकत्र राहत असतात. पण एकेदिवशी अँटोनापोलस आजारी पडतो आणि त्यानंतर त्याचे वागणेच बदलते, तो चोरी करू लागतो, विक्षिप्त हावभाव करू लागतो, त्यामुळे त्याचा चुलत भाऊ त्याला वेड्याच्या इस्पितळात दाखल करतो, वेड लागलेल्या मित्राबरोबर राहायची तयारी असलेल्या जॉन सिंगरला अँटोनापोलसबरोबर राहता येत नाही. जॉन मग केलीज कुटुंबाच्या बोर्डिंगहाऊस मध्ये एकटाच राहू लागतो. कधीकधी खूप भेटवस्तू घेऊन तो अँटोनापोलसला भेटायला जात असतो. अँटोनापोलसशिवाय राहूनही जॉन सिंगर साठी फक्त त्याचा हा मित्रच त्याचा खरा सुहृद असतो.
जॉन सिंगरला इतर कुणीही नसतं. पण त्याच्याभोवती ही चार आयुष्यं घुटमळत राहतात. त्याच्या केवळ असण्याने या चार जणांना त्याच्या जगण्याच्या शोधात एक श्रोता, एक साक्षीदार, एक सुहृद सापडलेला असतो. हे चारही जण त्याच्याकडे येत असतात. बोलत असतात. आपले सर्व काही सांगत असतात. निघून जात असतात. जॉन सिंगर मात्र निर्विकारपणे त्यांना साथ देत असतो. हे चार जण असतात 'लोनली हंटर' असणारे 'हार्ट' हातावर घेऊन फिरणारे मिक, डॉक्टर, बिफ ब्रॅनॉन आणि जॅक ब्लाऊण्ट. आणि त्यांच्यामध्ये असणारा कुणाशी काहीच न बोलणारा जॉन सिंगर. तोही 'लोनली हंटर' असेलेले हार्ट घेऊन फिरत असतो. पण कुणाला त्याबद्धल फारशी माहिती नसते. 


हि चौघे जणं :
मिक केली : एक बारा वर्षांची ,गरीब कुटुंबातील, संगीताची विलक्षण आवड असलेली आणि दूर देशी प्रवास करून यशस्वी संगीतकार होण्याची स्वप्नं बाळगणारी मुलगी
जेक ब्लाऊण्ट : खदखदणारा, फुटकी पै आणि डोक्यावर घर नसलेला, एक कॉम्युनिस्ट कार्यकर्ता
बिफ ब्रॅनॉन: आयुष्यभर पूर्णवेळ (दिवसाचे चौवीस तास) स्वतःचं रेस्टॉरंट उघडं ठेवणारा एक रेस्टॉरंटचा एकाकी मालक 
डॉक्टर कोपलँड : आयुष्यभर निग्रो लोकांना 'असमानता' आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी 'शिक्षण' याचा पुरस्कार करणारा, त्यासाठी आयुष्य खर्ची घालणारा पण स्वतःच्या घरातील त्याच्या  स्वतःच्या मुलांना त्याच्या principles मधील एकही गोष्ट शिकवण्यास असमर्थ ठरलेला एक म्हातारा ब्लॅक डॉक्टर

अशी हि चार माणसं 'जॉन सिंगर' शी सतत बोलत असतात. त्याला भेटत असतात आणि आपल्याला काय वाटते ते त्याला सांगत असतात. त्या चारही पात्रांना असा विश्वास वाटतो  की केवळ 'जॉन सिंगर' त्यांना समजून घेऊ शकतो, त्यांचे बोलणे केवळ तोच समजू शकतो. जीवनाबद्धलची अशी कुठलीतरी प्रगल्भ समज जॉन सिंगरकडे असते की केवळ त्याच्या अस्तित्वाने काहीही न बोलतातच तो या चार माणसांना त्याच्याबद्धल एक निस्सीम comfort of being their self चा अनुभव येतो. ते  चौघेजण काय बोलतात हेही जॉन सिंगरला कधीकधी कळत नाही. पण हा विश्वास त्या चौघाजणांना त्याच्याबद्धल का वाटतो? याप्रमाणेच मला वाटते आपल्याला आयुष्यात अनेक माणसं भेटतात, त्यापैकी काही माणसं अशी इतकी विस्तृत आवाक्याची, boundary-less प्रगल्भतेची  आणि 'ज्यांच्यामध्ये एकप्रकारचा acceptance असतो' अशी  असतात की त्यांच्याशी संवाद साधल्याने आपल्यला असे वाटून जाते की या माणसाला आपण काय आहोत किंवा काय बोलत आहोत ते पूर्णपणे समजते.

माणसाच्या जगण्यात मूलतः कायमस्वरूपी स्थिर असलेला 'एकाकीपणा' हाच या कादंबरीचा विषय आहे. या पुस्तकातली सगळी पात्र धडपडत असतात ते व्यक्त होण्यासाठी, अशा माणसापाशी जो त्यांना समजू शकतो. फक्त जॉन सिंगरच त्यांना तसा दिसतो. का? का त्यांना तो आपला सुहृद वाटतो? तो स्वतः बोलत नाही म्हणून? स्वतः आपली गाऱ्हाणी सांगत नाही म्हणून? 
माणसाच्या आयुष्यातली सर्वात कठीण गोष्ट कुठली असेल तर 'देणे' आणि 'घेणे'. कारण आपण जेव्हा देतो तेव्हा ते घेणारा नक्की आपल्याला हवा तोच तसाच असतो का? तसेच ज्याच्याकडून आपण घेतो तोही आपल्याला हवा तोच देणारा असतो का? ज्यांच्याकडून काही हवे आहे, प्रेम, मैत्री त्यांच्याकडून ते मिळत नाही. आणि ज्याला द्यायची इच्छा आहे त्याला आपण देऊ शकत नाही, तेव्हा मनाची अवस्था 'isolated' होऊन जाते. जे human element आपल्याला तृप्त करेल ते आपल्याला भेटणाऱ्या माणसात मिळेलच असे नाही. असाच त्या human element चा शोध करणारी , अतृप्त, spiritually isolated माणसं जॉन सिंगरला भेटतात. त्यांना जॉन सिंगर मध्ये तो spiritual fulfillment करणारा सुहृद सापडतो. आणि जॉन सिंगरला कोण सापडतो? कुणीच नाही. 
पुस्तकातील काही प्रसंग अत्यंत दाहक आणि त्रस्त करणारे आहेत. 
सर्वात तरल आणि खोल पात्र आहे 'मिक केली' ही मुलगी. तीचे आयुष्य वेगवेगळ्या कोनांतून वारंवार उलघडत जाते. एकदा ती आपल्या घराशेजारी राहणाऱ्या हॅरी या मित्राबरोबर पोहायला जाते. तेव्हा तिथे काही गोष्टी घडतात. हॅरी तिला घर सोडून दूर जात असल्याचे सांगतो. फांदीवर बसलेल्या पक्ष्याच्या आवाजाने दोघे विलक्षण काही अनुभवतात. 

A bird sang a sad, clear song she had never heard before. One high note like oboe and then it sank down five tones and called again. The song was sad as a question without words. 'I love that bird' harry said. 'I think its Vireo.'

मिकचा भाऊ बब्बर यांच्याकडून एकदा चुकून हातातल्या खऱ्या पिस्तुलाने एका लहान बाळ असेल्या मुलीच्या डोक्याला गोळी लागते. त्यानंतर बब्बर खात्रीने जिथे लपून बसला आहे त्या मिकला माहित असलेल्या जागेपाशी येऊन मिक बब्बरला घाबरवते. त्याला ती सांगते तुला पोलिस पकडून घेऊन जातील. कठोर शिक्षा करतील. पण आपण बब्बरला असे का घाबरवले हे तिला कळत नाही. पश्चातापाने ती पुन्हा त्या जागी येते तर बब्बर तिथून निघून गेलेला असतो. तो त्यांच्या स्वयंपाकीणीच्या घरचे पैसे चोरून पळून जातो. मिक आणि कुटुंब त्याला शोधायला बाहेर पडते. मिकला माहित असते तो कुठल्या प्रदेशाच्या दिशेने गेला असेल, त्याप्रमाणे रस्त्यात जेव्हा बब्बर भेटतो. बब्बर लिफ्ट देणारी गाडी म्हणून आशेने धावत त्यांच्या गाडीकडे येतो, तेव्हा त्याचे वडील बकोटीला धरून त्याला आत  बसवतात. एखादे वाघाचे पिल्लू ज्याप्रमाणे मानगुटीला धरल्यावर सुटण्यासाठी झटापट करेल तसे बब्बर करतो. जेव्हा बब्बरला घरी आणले जाते, सगळे बदलते. बब्बरला सगळे बब्बर न म्हणता त्याच्या मूळ नावाने हाक मारू लागतात. आणि बब्बर कुणाशीही बोलत नाही.

असे अनेक प्रसंग, खोल काहीतरी सांगून जातात.

आयुष्य खूप छोटं आहे पण ते जेव्हा संपावं असं वाटतं तेव्हा पुढे एवढं अखंड पसरलेलं दिसतं की त्याचा आवाका बघून घेरी येते. जेव्हा आपण त्या दूरच्या निश्चित स्थळी पोहोचल्यासारखे असू तेव्हा आयुष्य टिंब बनून जातं. त्या टिंबापुढे काहीच नसतं, तेव्हा वाटतं आयुष्य अजून खूप हवं आहे, पण तेव्हा आयुष्य आपला पडदा आवरून बसलेलं असतं. हीच ती पडदा पडून एक्सिट घेण्याची वेळ. जॉन सिंगरही या वेळेला सामोरा जातो. पण त्या वेळी जॉन सिंगर जे म्हणाला असेल ते कुणीच ऐकू शकले नसेल. पण त्याचे आक्रन्दन त्या व्हिरिओ पक्ष्याने समजून घेतले असेल. तो म्हणाला असेल 'हे आयुष्या! तू कोण आहेस? मला तू वाचा दिली नाहीस पण तू माझ्याशी का बोलत नाहीस? वेळोवेळी  सर्व प्रकारे तू मला इतकं काही दाखवलंस आणि आता मोक्याच्या या क्षणी तू कुठे दडून बसला आहेस? दोनच गोष्टी तू एवढ्या का फिट बसवून ठेवल्या आहेस माणसांत?  एक म्हणजे मोह-इच्छा, आणि दुसरं म्हणजे एकटेपण. मोह-इच्छा म्हणजे जगणं आणि एकटेपण म्हणजे आत्महत्या. मला कसलाच पर्याय तू  ठेवला नाहीस ना जगण्याचा, ना मरण्याचा? मी कोण आहे? काय अनुभवत आहे हे जाणून घेण्याचाही पर्याय तू मला दिला नाहीस. हे सर्व काय चाललं आहे? यात मी सर्वस्वी एकटा आहे. माझं इथे काय आहे? काहीच नाही? मग मी जगू तरी कशाला?'

'फ्लॉवरिंग ड्रीम- नोट्स ऑन रायटिंग' या तिच्या निबंधामध्ये कार्सन मॅक्युलर्स म्हणते. 
Spiritual isolation is the basis of most of my themes. My first book was concerned with this, almost entirely, and all of my books since, in one way or another. Love, and especially love of a person who is incapable of returning or receiving it, is at the heart of my selection of grotesque figures to write about — people whose physical incapacity is a symbol of their spiritual incapacity to love or receive love — their spiritual isolation.

For a whole year I worked on The Heart Is a Lonely Hunter without understanding it at all. Each character was talking to a central character, but why, I didn't know. I'd almost decided that the book was no novel, that I should chop it up into short stories. But I could feel the mutilation in my body when I had that idea, and I was in despair. I had been working for five hours and I went outside. Suddenly) as I walked across a road, it occurred to me that Harry Minowitz, the character all the other characters were talking to, was a different man, a deaf mute, and immediately the name was changed to John Singer. The whole focus of the novel was fixed and I was for the first time committed with my whole soul to The Heart is a Lonely Hunter.

A writer can only say he writes from the seed which flowers later in the subconscious. Nature is not abnormal, only lifelessness is abnormal. Anything that pulses and moves and walks around the room, no matter what thing it is doing, is natural and human to a writer. The fact that John Singer, in The Heart Is a Lonely Hunter, is a deaf-and-dumb man is a symbol, and the fact that Captain Penderton, in Reflections in a Golden Eye, is homosexual, is also a symbol, of handicap and impotence. The deaf mute, Singer, is a symbol of infirmity, and he loves a person who is incapable of receiving his love.

तिने जेव्हा हार्ट इज लोनली हंटरचे मॅन्युस्क्रिप्ट प्रकाशकाकडे पाठवले तेव्हा त्यासोबत पाठवलेल्या मजकुरात ती म्हणते "five isolated, lonely people in their search for expression and spiritual integration with something greater than themselves."

Wednesday, 1 March 2017

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती २: मोह वृक्ष

मोह वृक्ष (सौजन्य : विकिपीडिया)
या वृक्षाचे नावच आहे 'मोह' मग या वृक्षाचा मोह कसा पडणार नाही? इतके सुंदर नाव असण्याला कारणेही तशीच आहेत. या वृक्षाची फुले अतिशय मादक असतात. यांच्या फुलात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या शर्करेमूळे या फुलांच्या सेवनाने झिंग चढू शकते. म्हणून या फुलांपासून दारू बनवली जाते. 

शास्त्रीय नाव आहे Madhuca longifolia (मधुका लाँगीफोलिया). हा वृक्ष खूप मोठा होतो, खूप फांद्या आणि पानांच्या विपुल पसाऱ्यामुळे तो उत्तम छाया देऊ शकतो. डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात मोहवृक्षाचा उल्लेख नाही. त्याऐवजी 'मोहडा' या वृक्षाचा उल्लेख आहे. त्याचे शास्त्रीय नाव देखील Madhuca indica Gml. / Bassia latifolia Roxb. असे दिले आहे. पण Madhuka longifolia या मोहाच्या झाडाशी त्याचे बरेचसे गुणधर्म जुळतात. दोघांचे  संस्कृत नाव 'मधुक' असेच आहे. मग हे दोन्ही वृक्ष एकच आहेत का असा प्रश्न पडला. यावर उत्तर श्री. द. महाजन यांच्या 'आपले वृक्ष' या पुस्तकात मिळाले. त्यांनी लिहिल्याप्रमाणे, या वृक्षाचे दोन प्रकार आहेत. 'उत्तरमोह'(Madhuca longifolia) जो उत्तर भारतात आढळतो. आणि दक्षिण मोह (Madhuca longifolia proper) जो केरळ , म्हैसूर, कोल्हापूरच्या रानात आढळतो. या दोघातील महत्वाचा फरक म्हणजे उत्तरमोह पानझडी वृक्ष आहे तर दक्षिणमोह सदाहरित आहे. 

हा वृक्ष Sapotaceae या कुळातील असून बकुळ वृक्षाशी त्याचे जवळचे नाते आहे. इंग्रजीत याला Ellopa Tree, Butter tree असे म्हणतात. हिंदीत 'महुवा' आणि गुजरातीत 'महुडो' असे म्हणतात. 

वसंत ऋतूत या झाडाला फुले येतात. ही फुले रात्रीच्या वेळी फुलतात.
मोहाची फुलं (सौजन्य : विकिपीडिया)
पौराणिक काळात मोहाच्या फुलांच्या माळेचा वापर उपवर वधूचा अलंकार म्हणून केला असल्याची नोंद साहित्यात सापडते. स्वयंवरमाळा देखील मोहाच्या फुलांपासून बनवली जात असे. कुमार-संभवकाव्यात पार्वतीच्या आभूषणात या मोहफुलांच्या 'मधुकमालेचा' उल्लेख आहे. 
पर्याक्षिपत् काचिदुदार बंधं दूर्वावता पांडूमधुकदाम्ना ।।७. १४।।
एका दासीने दूर्वा आणि पांढुरक्या मधुकपुष्पांनी बनलेली माळा पार्वतीच्या डोक्याला बांधली असा या वरील ओळीचा अर्थ होतो. 
कालिदासाच्या रघुवंश महाकाव्यात देखील मधुकपुष्पांचा उल्लेख आहे. 
एवं तथोत्त्के तमवेक्ष्य किंचित् विस्त्रंसि दूर्वांक-मधुकमाला  ।रघु. ६.२५।।
वरील ओळीचा अर्थ असा होतो की इंदुमतीने जेव्हा 'अज' या राजपुत्रास वरले, तेव्हा इतरांना नकार दर्शवण्यासाठी तिने हातातील दुर्वा आणि मोहाच्या फुलांनी बनलेली माळा खाली सोडली. 

उत्तर भारतात, विशेषतः मध्यप्रदेशातील विंध्य-सातपुड्याच्या जंगलातील कोरकू, गोंड, माडिया आदिवासींचा हा कल्पवृक्ष आहे. फुलांचा वापर डाळीत मिसळून शिजवून खाद्य म्हणून केला जातो. तसेच फुलांपासून बनवलेली दारू आदिवासी लोक सणांच्या प्रसंगी प्राशन करतात. या मद्याचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. मोहाच्या फळांचा उपयोग खाद्य म्हणून होतो तसेच या फळांपासून तेल निघते. या तेलापासून साबण बनवला जातो. पानांचा उपयोग गायीगुरांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून केला जातो, तसेच या पानांपासून पत्रावळी देखील करतात. आदिवासी लोकांसाठी मोहाचे झाड हे उपासनेचे झाड आहे. लग्नप्रसंगी, सणावाराला या झाडाची पूजा केली जाते.
या आदिवासी लोकांच्या साहित्यात मोहाच्या झाडाला स्थान नक्कीच मिळाले असणार. मला त्या लोककथांमध्ये रस आहे ज्यात हत्ती, हरणं, माकड, अस्वल हे मोहाच्या या फुलांनी झिंगतात आणि मग अनेक विनोदी प्रसंग घडतात. अशा लोककथा मला अजून तरी मिळाल्या नाहीत. दुर्गा भागवत यांनी सातपुड्याच्या दुर्गम भागात फिरताना अशा लोककथा नक्कीच गोळा केल्या असणार, या अजून शोधायच्या बाकी आहेत. 
हे मोहाचे झाड लावण्याची संधी मला मिळो हीच आशा करते. निसर्गातून, साहित्यातून, अशाप्रकारे मोहाचे झाड सदा मोहवत राहो.