[या पुस्तकावरचे सुंदर चित्र हे राथवा आदिवासी जमात, गुजरात यांच्या लोककलेतील भित्तिचित्र आहे. निर्मितीसंबधी च्या 'मिथ'वर ते आधारलेले आहे. ] |
बुद्धावर लिहिलेल्या जातककथा जितक्या बोधपर तितक्याच मनोरंजकही आहेत. 'अरेबियन नाईट्स'(हा मुळ ग्रंथ वाचायचा राहून गेलाय) पण त्यातल्या कथाही खूपच मनोरंजक आहेत ज्यांचे रुपांतर टि.व्ही वर केले गेले.
किती लेखकांनी आणि स्कॉलर्सनी या कथांचा पाठपुरावा केलाय. मानववंशशास्त्रज्ञ तर या कथांचा बारकाईने अभ्यास करतात कारण त्यातून लोकांची जीवनशैली कळते, बोलीभाषेतील बारकावे, अपभ्रंश, नवीन तयार झालेले शब्द कळतात. रितीरिवाजही कळतात. आजपर्यंत किती लोकांनी या गोष्टींचा मेहनतपूर्ण अभ्यास आणि शोध केला आहे, परभाषीय कथा मुद्दाम भाषांतरित करून अभ्यासल्या आहेत. दुर्गा भागवत, रिचर्ड बर्टन, ए. के. रामानुजन अश्या अनेक विद्वान लोकांनी यांवर काम केले आहे. रिचर्ड बर्टनने अरेबियन नाईट्सचे मूळ अरेबिक मधून इंग्रजीत भाषांतर केले, दुर्गा भागवत यांनी जातक कथांचे सात खंड मूळ पाली भाषेतून मराठीत आणले. ए. के. रामानुजन यांनी ठिकठीकाणहून लोककथा गोळा करून त्यांचे संकलन केले.
हल्लीच त्यांचे 'Folktales From India' हे पुस्तक वाचनात आले.
यात २२ भाषांमधल्या शंभराहून अधिक गोष्टी संकलित केलेल्या आहेत. ए. के. रामानुजन यांनी प्रस्थावनेत म्हटलं आहे 'It (The Book) is called Folktales FROM India, not OF India, for no selection can truly 'represent' the multiple and changing lives of Indian tales. Instead it 'presents' the multiple and changing lives of Indian tales.
त्यांनी या गोष्टींबद्धल माहितीही दिली आहे. वेगवेगळ्या धर्मांत, प्रांतांत सांस्कृतिक देवाणघेवाण हि कायम होतच असते. आणि ह्या द्वारे म्हणी, सुविचार, जोक्स, गोष्टी, घरगुती उपचार, कोडी, पाककृती हे सर्व Autotelic (They travel by themselves without (often) any movement of the population) रीतीने स्थलांतरित होत असतात. भारतातील भाषांमधे बरेच लोककथांचे विषय, वस्तू सारख्या आहेत. आणि तरीही यांचा उपयोग आणि त्यांचा कथेतील अर्थ भिन्न असू शकतो. स्थळकाळाप्रमाणे या गोष्टी बदलत जातात. याबाबत एक छान उदाहरण रामानुजन यांनी दिले आहे. एकदा ऍरीस्टॉटल ने एका गावातल्या सुताराला त्याची सुबक सुरी बघून विचारलं कि किती वर्षांपासून हि सुरी तुझ्याकडे आहे, त्यावर तो उत्तरला कि पिढ्यांपिढ्या ती आमच्याजवळ आहे फक्त आम्ही फक्त तिचं पातं आणि मुठ अनेकवेळा बदलंय. तश्याच या गोष्टी आहेत, पिढ्यांपिढ्या बदलत जाणाऱ्या, गोष्ट जरी तीच तरी तिचे रूप बदलून जातच असते आणि त्यातले विषय, वस्तू त्या त्या काळाच्या रीतीरिवाजानुसार वेगवेगळी रुपं धारण करतात. या गोष्टी पसरतात कशा? तर बहुतेक घरच्या घरी सांगितल्या जातात, काही लोककला सादर करणाऱ्या कलाकारांकडून सादर होतात.
रामानुजन आपल्या स्वतःच्या घरचा अनुभव सांगतात. त्यांच्या घरी एकत्र कुटुंब होतं आणि 'बेडटाईम स्टोरी' ऐवजी 'मीलटाईम स्टोरी' असायची. घरातल्या सर्व मुलांना एकत्र बसवून एका मोठ्या ताटात जेवण कालवून घास-घास एकेका मुलाला भरवला जाई. हे काम आजी किवा काकी करत असत. भरवताना गोष्ट सांगण्यामागे हाच उद्देश असे कि मुलांना (गोष्ट ऐकण्यात दंग झाल्याने) जेवणाविषयी कुरकुर करता येऊ नये आणि त्यांच्या कडून भरपूर अन्न खाल्ले जावे. घरात काम करणारे गडी सुद्धा ज्या गोष्टी सांगत त्यातून त्यांच्या जमातींच्या गोष्टी कळत. जो गोष्ट सांगणारा असतो त्याच्यावर सुद्धा गोष्ट सांगणं अवलंबून असतं. जसं आजी, काकी हे स्वयंपाकघराच्या आजूबाजूच्या किवा घर, घरतील माणसे यांवर आधारलेल्या गोष्टी सांगतात. तर आजोबा, काका हे घराबाहेरच्या गोष्टी सांगतात.
या पुस्तकात संकलित केलेल्या गोष्टी 'पंचतंत्र', 'कथासरितासागर' मधल्या नाहीत. काही बंगाली गोष्टी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेल्या आहेत. त्या रामानुजन यांनी मुद्दाम उल्लेख करून इथे दिल्या आहेत. रामकृष्ण परमहंस स्वतः लिहू-वाचू शकत नसत पण त्यांच्याकडे अश्या लोककथारूप गोष्टींचे भांडार होते.
या गोष्टी किती जुन्या आहेत? तर याचे उदाहरण देताना रामानुजन सांगतात 'माकड आणि मगर' (माकडाचं हृदय मगराची बायको मागते ती गोष्ट) हि गोष्ट जेव्हा त्यांनी त्यांच्या archeologist मित्राला सांगितली तेव्हा त्याने सांगितले कि हि गोष्ट मंटाई, श्रीलंका येथल्या उत्खननात सापडलेल्या भांड्याच्या तुकड्यावर चित्ररूपाने चितारलेली होती. या गोष्टीचे दुसरे रूप बौद्ध संप्रदायामध्येही आढळते. पाचव्या शतकातील पंचतंत्रातहि हि गोष्ट सापडते. ११ व्या शतकातील कथासारितासागरात अरेबियन नाईट्सच्या आणी शेक्सपियरच्याहि काही गोष्टी आढळतात. (All's well that ends well, Cymbeline). अश्याप्रकारे गोष्ट किती जुनी आहे आणि तिचा उगम कसा आणि कुठे झाला हे सांगणे म्हणजे पुरातत्वशास्त्रासारखाच अभ्यास करावा लागेल.
या गोष्टींचे स्वरूप काय असते? तर काही महत्वाचे थीम्स या गोष्टींमध्ये आढळतात.
१) स्त्री-प्रधान गोष्ट : यात स्त्री मुख्य पात्रं असते. तीच्यावर अन्याय करणारी कुणीतरी पात्रं असतात (बहुदा सासू, नवरा , चोर असे) त्यातून ती कसा मार्ग काढते, चातुर्यवान, धैर्यशाली कशी असते अश्या स्वरूपाची गोष्ट असते. स्त्री च्या गोष्टीतील समस्या घरगुती जाच, पतीकडून अस्वीकार, कुटुंबाला वाचवणे अश्या असतात.
२) पुरुष-प्रधान गोष्ट: यात अनेक विषय, नीती, नियम, त्यांचे पालन, राजा आणि त्याचे सहायक, लढाई, राजकारण
३) घराबद्धलच्या/कुटुंबाबद्धलच्या गोष्टी: कौटुंबिक समस्या
नियती, मृत्यू, देव, राक्षस, भुतंखेतं, विदुषक( तेनाली रामा), चतुर माणसं(बिरबल, गोपाल भर) यांच्या गोष्टी: यात खूप विविधता असते.
४) प्राण्यांच्या गोष्टी
५) गोष्टींबद्धलच्या गोष्टी
या गोष्टींचे प्रयोजन काय? तर मनोरंजन,बोध आहेच पण या कथांतून रिती,परंपराही जपल्या जातात. पिढ्या, जाती, पंथ, धर्म, प्रांत यांची बंधने तोडून चांगले आहे ते घेऊन संवादहि साधला जातो. लोककथा त्या त्या भागाची मानसिकताही समजण्यास मदत करतात.
यातली सर्वात मनोरंजक आहे ती गोष्टींबद्धलची गोष्ट. या गोष्टींमध्ये गोष्टीबद्धल निवेदकाला काय वाटते तेही कळते. अशी एक गोष्ट आहे
Tell It to the Walls (भिंतींना सांगा) ह्या तामिळ गोष्टीत एका म्हतारीला आपली गोष्ट कुणालातरी सांगायची असते. म्हातारी घरच्या सुनां-मुलांच्या त्रासाबद्धल कुणाकडे बोलू शकत नाही, सगळ्या गोष्टी आपल्या आताच ठेवल्याने ती जाड व्हायला लागते. मुले-सुना मग आणखी चेष्टा करू लागतात. तेव्हा एक दिवस घरात कुणी नसताना ती घराबाहेर पडते. एका पडक्या घरात जाते. त्यांच्या प्रत्येक भिंतींना आपली कर्मकहाणी सांगते. तेव्हा एक एक भिंत कोसळून पडते आणि म्हातारीही बारीक बारीक होत जाते.
'न्हाव्याचे गुपित' या कथेतही राजाच्या गाढवासारख्या कानांची गोष्ट तो कुणाला सांगू शकत नाही , शेवटी ती तो एका झाडाला सांगतो. काही गोष्टींना स्वतःचे अस्तित्वदेखील आहे आणि त्यांना इच्छादेखील आहेत कि आपल्याला कुणाकडून सांगितले जावे. अशी एक गोष्ट आहे 'न सांगितलेल्या गोष्टी' जिच्यात गोष्टी एका 'गोंड' माणसाच्या पोटात असतात आणि आपल्याला सांगितले जावे म्हणून विनवणी करतात, तो नकार देतो तेव्हा त्या बंदिस्त झाल्यामुळे रागावतात आणि पुढचे कथानक घडते. यातून काय सांगायचे आहे? तर हेच कि जर तुम्हाला एखादी गोष्ट माहित आहे तर ती स्वतःकडे बंधिस्त न ठेवता सांगितली पाहिजे.
'प्रेक्षकांच्या शोधतली गोष्ट' या कथेत निवेदक गोष्ट सांगण्यासाठी सगळीकडे फिरते, पण कुणाला गोष्ट ऐकायला वेळ नसतो. शेवटी ती गोष्ट पोटातील एक गर्भ ऐकतो.
'जेव्हा तुम्ही खरंच ऐकता तेव्हा काय होते' या कथेत 'रामायणाच्या गोष्टी' ऐकल्याने एका असंस्कृत माणसात काय फरक पडला हे दाखवून दिले आहे.
रामानुजन यांनी ३ हजार गोष्टींमधुन शंभरएक गोष्टी निवडून या पुस्तकात संकलित केल्या आहेत.हे पुस्तक ज्यांना गोष्टी वाचायला आवडतात त्यांना खूपच आनंद देऊन जाईल.
मला यातल्या काही गोष्टी खुप आवडल्या. उदाहरणार्थ
The Jasmine Prince (जास्मिन राजपुत्र) :हि तामिळ गोष्ट आहे. यात एक राजपुत्र असतो जो जेव्हा हसत असे
तेव्हा त्याच्या हास्याला मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध येत असे. याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी एकदा दुसऱ्या एका राजाने त्याला आपल्या दरबारात बोलावले आणि हसण्यास सांगितले. पण तो मुद्दाम कसं हसणार? त्याने सांगितले मी असं खोटं खोटं हसू शकत नाही, जेव्हा मला खरच हसू येईल तेव्हाच माझे हास्य मोगऱ्याच्या वासाने सुगंधित होईल. राजाला वाटले कि हा खोटेच सांगतो आहे याच्या हास्याला काही सुगंध-बिगंध नाही. राजाने रागावून राजपुत्राला कोठडीत डांबले. त्या राजाच्या राणीचे एका पांगळ्याशी सूत जुळलेले असते, रात्रीच्या वेळी ती त्याला भेटायला जाई. आणि ती जिथे त्याला भेटायला जाई ते ठिकाण जास्मिन राजपुत्राच्या कोठडीजवळ होते. एकदा जेव्हा तिला उशीर झाला तेव्हा पांगळ्याने रागावून तिला भरपूर मार दिला. तरी ती त्याला आणलेली पक्वान्ने खाऊ घालू लागली, त्यामुळे पश्चात्ताप होवून त्या पांगळ्याने तिला विचारले कि तूला मी एवढं मारलं तरी तुला राग का आला नाही. त्यावर ती म्हणाली कि मला तर तुम्ही मला मारलत ते अतिशय आवडलं. मला १४ लोक (तिन्ही लोक ) बघितल्याचं समाधान मिळालं. त्यांचं संभाषण बाजूच्या व्हरांड्यातला एक धोबी ऐकत होता. त्याचं एक गाढव हरवलं होतं. ते राणीचे उद्गार ऐकून तो मोठ्याने म्हणाला 'हिला १४ लोक(तिन्ही लोक) दिसले आहेत तर हिला माझं गाढव नक्कीच दिसलं असणार. हे ऐकून जास्मिन राजपुत्र हसायला लागला आणि मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे पसरला. राजालाही जेव्हा हे कळले तेव्हा त्याने जास्मिन राजपुत्राला कोठडीतून मुक्त केले आणि आता त्याच्या हास्याबद्धल विचारले, राजपुत्राने जेव्हा खरी हकीगत सांगितली तेव्हा त्याने जास्मिन राजपुत्राला मुक्त करून भेटींसहित त्याच्या प्रांताकडे रवाना केले आणि राणीला शिक्षा केली.
तेनाली रामा (विकटकवी)विदुषक कसा झाला?
तेनाली रामा हा विजयनगर च्या कृष्णदेवराय या राजाच्या दरबारात विकटकवी(विदुषक) म्हणून होता. त्याआधी तो विकटकवी बनला कसा ते ह्या गोष्टीत सांगितले आहे.
एकदा तेनाली राम लहान असताना काली मंदिरात जातो आणि देवीला सांगतो कि तू मला दर्शन दे. देवी समोर येते, तिचे अनेक तोंडांचे रूप पाहून तो घाबरण्याऐवजी हसायला लागतो. ती हसण्याचे कारण विचारते तेव्हा तो निर्भयपने उत्तर देतो. देवी रागावते पण नंतर त्यांचे धैर्य बघून प्रसन्न होते आणि म्हणते कि तू विकटकवी होशील. (विकटकवी हा palindrome आहे. वि-क-ट-क-वि ) पण प्रसन्न झाल्याने असेही म्हणते कि तू राजदरबारातला विकटकवी होशील.
आणखी अश्याच खूप गोष्टी या पुस्तकात आहेत, त्यासाठी पुस्तक मूळातून वाचायला पाहिजे.
No comments:
Post a Comment