Monday, 18 April 2016

माईची अखेर

उन्हाने तकतकलेल्या त्या एस. टी. मधून तीन डोकी बाहेर पडली. माई, वहिनी आणि यमी. यमी हि माई आणि वहिनीला सोबत म्हणून आलेली, आता पुरती कंटाळलेली. तिघंही उन्हाच्या तलखीने हैराण झाले होते. हातातल्या पिशव्या सांभाळत दोघीजणी झपझप चालू लागल्या, माई त्यांच्यामागे  तुरुतुरु चालत येत होती.  समोरच्या खोपटवजा हॉटेल मध्ये तिघीजणी शिरल्या आणि पिशव्या ठेवून बाकड्यावर ऐसपैस बसल्या. हॉटेलात शुकशुकाटच होता. दुपारच्या तीन वाजता गावातले कोण येतेय मरायला. हॉटेलमालकही कुठे दिसत नव्हता. थोडावेळ तिघी तश्याच बसून राहिल्या. बाहेरून कुणीतरी आवाज दिल्यासारखं केलं तसा एक इसम मागच्या बाजूने खोपटात आला.
"काय आहे गरम? भजी, वडा…"
"आसा".
"३ प्लेट  आणा".
तो लगेचच वळला आणि काळ्य़ाकुट्ट कढईबाजूच्या  उंच टेबलावर ठेवलेल्या परातीततले वडे प्लेट मध्ये काढू लागला, वहिनी पुन्हा त्याला म्हणाली
'आणि पिऊक पाणी देवा, कोल्ड्रिंक आसा?'
हॉटेलवाल्याने चटकन बाजूच्या खोक्यातून एक बाटली काढली व ती दाखवत म्हणाला
'ह्या असा'
'माझा वैगेरे नाही का त्याच्याकडे?' यमी ने वहिनीला विचारले. तेच ऐकून तो म्हणाला:
'नाय बाकीची संपलीहत. ह्याच गोपुरी मँगो म्हणान हा ताच रवलाहा, देव?'
'देवा, आणि थंड देवा'.
त्याने लेगच  आणून दिलेल्या प्लेटमधून वड्याचे तुकडे तोडून माई भरभर खाऊ लागली. मधेच म्हणाली, 'वडो गरम नाय'. तिच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. तिघेही गपचूप खात होते. पोटातले कावळे ओरडून केव्हाचे गपगार झाले होते. एस. टी. तून  येताना रस्त्यात, बरोबर जेवणाच्या वेळी एस. टी. वाल्याने रणरणीत उन्हात, एकही झाड आजूबाजूला नसलेल्या अत्यंत भंगार खानावळीसमोर  गाडी उभी केली होती. तिथले गलिच्छ वातावरण, उघड्यावरच असलेल्या बाकड्यावर बसून जेवणारे ड्राइव्हर बघून यमीने खाली उतरण्यास उत्सुकता दाखवली नव्हती. पण शेवटी भूक अनावर होवून खाली उतरून तिघांनी दोन मिसळपाव मागवून उभ्याउभ्याच खाल्ले, बाकड्यावर एवढी गर्दी होती कि जेमतेम माईला बसवता आले. मिसळपाव कसला, नुसते लाल तिखटमिठाचे फरसाण मारलेले पाणी होते ते. कसेबसे त्यांनी चार घास पोटात ढकलले. माई मात्र ते तिखट पाणी त्यात भिजलेल्या शेवासकट भुरके मारून खात होती.
आत्ताही भज्यांचे तुकडे माई एकामागोमाग एक खात होती. अजून एक बशी मागवावी का असा विचार यमी च्या मनात आला पण वहिनीकडे बघून ती गप्प बसली.

थंडगार गोपुरी मँगोने जीव थोडा शांत झाला होता. पैसे देऊन तिघं बाहेर पडली, हॉटेलसमोरच्या रस्त्यावर  एकही वाहन नव्हते. बराच वेळ थांबल्यावर हॉटेलवाला परत डोकावला.
'खय जावचा आसा तुमका?'
'भरडवाडीक'.
'रिक्षा भेटाची नाय तुमका या उनाच्या वेळेक'.
'हय तर आसतत मा ओ रिक्षा, मी गेल्लय हैसरसून कितीवेळा'
'आसतत, पण कालच बाजाराचो दिवस झालो आणि ह्यो उन्हाळो बघलास, कोणयेक येवचा नाय इतक्याचा '
'व्हया तर एक रिक्षावालो रवता मागच्या अवाटात, पण तो सांगीत ता भाडा देउचा लागताला'
वहिनी आणि यमी त्याच्या तोंडाकडे बघत राहिल्या. 
'रवांदे, आम्ही बघतव. मिळात हयसर.'
हॉटेलवाला काय समजायचं ते समजला आणि आत निघून गेला. थोडावेळ तिघं बाहेरच्या झाडाखालच्या बाकड्यावर बसले. एव्हाना चार वाजून गेले होते, उन्हं तिरपी होत होती.

रिक्षेसारखा आवाज आला म्हणून झटकन उठून यमी उभी राहिली, रिक्षा जवळ आली तसा तिने हात दाखवला.
'भरडवाडी?' मुंबईच्या सराईत रिक्षा प्रवाश्याप्रमाणे तिने विचारले.
रिक्षावाल्याने होकार भरला तशी माई टुण्णकन आत जाऊन बसली. यमीने सामानाच्या पिशव्या आणल्या. माई एका कडेला बसलेली पाहून ती माईला म्हणाली
'आजी तू मध्ये बस. मी कडेला बसते, सामानासकट तुला जमणार नाही तिथे.
'मदी कित्या, हयसर बसतय मी ?

'ओ! मदी बसा बघया, थय बसान काय पडाचा हा?, त्या बाजून गाडीये येतत. आमी काय मुद्दाम संगतव, म्हाताऱ्या माणसान जीव सांभाळूक होयो त कळणा नाय'.  वहिनीने रिक्षावाल्याकडे बघत निर्वाणीचा सूर लावला.

'काय्येक  पडाक होवचा नाय माका' माईने सुद्धा नापसंती दर्शवली, पण तरीही ती खाली उतरली. यमी आत सामान घेऊन बसली तशी थोड्या नाराजीनेच माई आत गेली.
रिक्षावाला  स्वतःशीच हसला. रिक्षा चालू केली आणि मागे उद्देशून म्हणाला
'आजी, घट बस हा, काय आसा म्हाताऱ्या माणसाक म्हातारा म्हटला कि राग येता'
'तर ओ काय, आमी  चांगल्यासाठी सांगतव ता दिसणाच नाय' वहिनीने दुजोरा दिला.'
'खैसून, मुंबैसून इलास?'
'नाय, पुण्यासून'.
'तरी म्हटला, मुंबैचे गाडीये आता खैचे?, 'पाठल्यादारकार बामनाथय काय ?'
'नाय आम्ही त्यांचे वारशी, हि माई, भाईं होते म्हायत आसत ?. आणि हि माझी मुलगी मुंबैक असता'
'मग पुण्याक कोण असता? बऱ्याच वर्षान इलास?'
'झाली दोन वर्षा येऊन, हि माई हैसरच रवा, हल्ली एकटेक ठेवचा बंद केला तिका. पुण्याक माझो मुलगो रवता.'

रिक्षा भरडवाडीच्या दिशेने धावू लागली. अर्ध्या तासाचे अंतर, पण वाहन नसल्याने एवढा उशीर झाला होता. सहाच्या दरम्यान जुनाट घरांचा झाडांमागे लपलेला समूह दृष्टीपथात येऊ लागला तसा रिक्षाचा वेग मंदावला. पाणंदितून बाहेर पडून शेताचा कोपरा लागला तशी कोपऱ्याच्या लगतच नव्या केलेल्या तांबड्या धुळीच्या रस्त्यावर रिक्षा थांबली. वहिनी पैसे द्यायला उतरली, यमीने दुसऱ्या बाजूने उतरून समान काढले. रिक्षा वळली आणि समान उचलून वहिनी आणि यमी चालू लागल्या तर माई कोपऱ्याच्या मेरेवरून तुरुतुरु चालत घराकडे पोचली सुद्धा होती आणि एव्हाना घराला वळसा घालून ती पलीकडे दिसेनाशी झाली होती. ती प्रेमाआतेच्या घराकडे गेली हे त्यांना सांगण्याची गरज नव्हती. 

पलीकडे आतेचं घर होतं. माई आता घरात दिवा लावण्याआधी तर परतण्याची चिन्ह दिसत नव्हती. पायऱ्या चढून व्हरांड्यातील दाराचे कुलूप उघडून दोघी मधल्या खोलीत आल्या. आत मधल्या खोलीच्या एका टोकाला असलेली देवखोली काळोखात बुडून गेली होती. भरून राहिलेल्या शांततेत भिंती गपगार उभ्या होत्या. लादी पायांना थंडगार लागत होती. हाताने चाचपून वहिनीने दिव्याचे बटण दाबले.
'लाईट गेलेत बहुतेक, किवा हा बल्ब गेला असेल'
यमीने बॅटरी काढली, बॅटरीच्या झोतात मधल्या खोलीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या जीन्याजवळच्या दाराचे कुलूप काढले, तिथलं बटण लावलं.
'आत्ताच हिला जायला हवं होतं का?'
'अगं, इथे लाईट सर्रास जातेच'
'नाही, लाईट नाही म्हणत आहे मी. हि माई, आता किर्र काळोखात कोण जाणार तिला बोलवायला?'
'असू दे ग , इतक्या दिवसानंतर आली आहे. आते म्हणजे मुलगीसारखीच मानलेली तिची. दुपारी चुलीवर भात शिजवून कुळस्वामीला नैवद्य दाखवला आणि आंब्याच्या झाडाच्या खोबणीत पानावर कावळ्याला भात ठेवला कि उरलेला भात माई आतेकडून आलेल्या  वाटीभर आमटी, कधी एखादा मासा, नाहीतर भाजी- भाकरीवर जेवायची, आतेच्या भाच्याच तर यायच्या एवढ्या मोठ्या घरात रात्रीच्या सोबतीला'
'मी नवीन आल्यासारखं काय सांगतेस, मला माहित आहे सगळं'

बराच वेळ निघून गेला. लाईट आणि माई दोन्हीही अजून आल्या नव्हत्या. खोराणातले जळमटलेले रॉकेलचे दिवे पुसून लावले गेले, सोबत आणलेल्या चार मेणबत्त्याही लावल्या गेल्या. वहिनीने चूल साफ करून भाताचं आधण ठेवलं आणि दुसऱ्या पातेल्यात पीठल्याची तयारी केली. यमीने घडवंची साफ करून आणलेलं समान पत्रांच्या डब्यात टाकलं. आड  केलेल्या दाराची करकर ऐकू आली. माई आणि आते मधल्या खोलीतून आत आल्या.
'ह्या घेवन इलय वहिनी, यमीक आवडतत मा माशे'
दुधाची किटली आणि आमटीचे पातेलं आतेने वहिनीसमोर ठेवलं आणि बाजूलाच उभी राहिली.
'काय गो यमी बरा मां?'
'होय ता इला आमका सोबत म्हनान, गुरवारी लघुरुद्र करतलव, साफसफाई करुक आधी इलव. शनिवारी निघतलव'
'माई रवतली मा'
वहिनीने डोळे बारीक केले आणि काहीच बोलली नाही. माई घडवंचीवरचा कापसाचा डबा घेऊन देवखोलीत पोहोचली तेव्हा तिने सुरुवात केली.
'कशी रवतली सांगा तुम्हीच, मागच्या खेपेक फोन इल्लो, कशीतरीच करता म्हणान, जिभ अर्धी भायर, शुद्ध नाय. अशी करी व्हती म्हणान विनय येवन घेऊन गेलो. डॉक्टर दाखवले तर सगळा नॉर्मल. आता मेंदूचो प्रोब्लेम हा तेका कधीपासून गोळीयो आसत. हि हयसर घेयच नाय. घोटीयेत घालून ठेवी पातळाच्या आणि इसरान जाय. मग असाच होताला मा'
'देखरेख करुक कोणतरी व्हया, तुम्ही गुराधोरा मागसून, खय बघतलास? बरा घेतलय म्हणान सांगुची तयारी, लक्षात काय रवणा नाय'
'होय ता खरा, आता पोरांची लग्ना पण झाली, मी एकटा, नायतरी खंयखंय बघतलय'.

माई दिवा लावून चुलीपाशी मांजराप्रमाणे येउन बसली. आते इकडच्या तिकडच्या गोष्टी करून निघून गेली.

'जुवेकारीण इली गे! वायच चा ठेवतं?'.
'थांबा हा जरा, इली तर बसात, काय घोड्यारसून इलीहा काय?'
माई बाहेर गेली.
हा बस गे बस. हि कोण इलिहा वांगडा? ओळखुक नाय. बस गे तू पण.
हि राण्यांची गे. ता तुमचा दुरमुऱ्याचा श्यात ज्यांका दिल्लास तेतुर्लीच.

जुवेकारीण आत वहिनीला हाक मारायला चुलीपाशी आली. वहिनीने एव्हाना चहा टाकला होता. समोर यमी खोबरे कातत होती.
'अरे, ह्या पण इल्लाहा'
'होय माका मदतीक'
जुवेकरणीसमोर वहिनीने चहा बटर ठेवला, ती तिथेच फतकल मारून बसली.
'काय माशे आणलास?'
'नाय गे , खैसून?'
मग जुवेकरीण यमीकडे बघून म्हणाली 'तुझे बाबा किती माशे आणीत गो हैसर इले काय, आणि मी आस्लाय काय माका जेऊक सांगीत. इतके माशे खाल्लय मी तुझे बाबा होते तेवा, आणि भज्याची एक पुडी आणीत पेशल माका मी कामाक असलय काय'
तिच्या डोळ्यात पटकन पाणी आले. ते चटकन पुसून ती चहात बटर बुडवून खाऊ लागली.
'व्हैते गादिये उन्हाक ठेवशीत गे?, आणि त्यो चादरी पण'
वहिनीने जुवेकरणीला सांगितले आणि तिच्या बरोबर आलेल्या त्या राणेबाईसाठी पण चहा घेऊन जायला सांगितले. कातण्याचे काम संपताच यमी बाहेर आली तेव्हा माईच्या त्या आजच उपटलेल्या गावातल्या अनोळखी बाईशी गप्पा एकदम रंगात आल्या होत्या, माईदेखील वेगळ्याच रंगात आली होती.
'मी… , मी केलाय ह्या सगळा, समाजलात मा, माजे वडील मोठे शिक्षणाचे इनिस्पेटर, त्यानी हेंका मार्गी लावल्यानी, मी हयसर रवलय म्हणान घर रवलहा ह्या, चंदनासारख्या झिजलय मी, गिरणीसारख्या फिरलंय'
'आता किती दिवस आसास?'
असे त्या बाईनी विचारल्यावर मग त्या बाईच्या अगदी हाताला हात लावून जुनी मैत्रीण असल्यासारखी तिला म्हणाली 'आता बघा, मी हयसरच रवतलय. अहो याच माझा घर. मीच सांभाळलय , समाजलात मा, गिरिणीसारख्या राबलय मी या घरासाठी हो. माझे वडील ! त्यांनी माका सांगल्यानी, देवाक सोडून जमाचा नाय, दिवो लागक होयो'
चंदनासारख्या. . . '

यमीने कानाडोळा केला तरी शब्द तिच्या कानावर पडतच होते. आत येऊन ती वहिनीला म्हणाली.
'आजीचं काय इथे येऊन डोकं फिरलंय काय?, तिला किती समजावलं तरी बडबड चालूच आहे'
'जाऊ दे, तू तुझं काम कर'. यमी मुकाट्याने बाजूला झाली. माईची वाक्यं कानावर पडतच होती.
थोड्या वेळाने वहिनीने रिकामे पातेले माईच्या समोर ठेवले.
'जावा जरा दुध घेवन येवा, यमी येतला तुमच्याबरोबर'
'आता?'
'होय, दुध संपाक इला, सकाळपास्ना इतके चा झाले ओ, काय करतले' वहिनी थोडी कातावूनच म्हणाली.
राणेबाईने सहानभूतीने बघितल्यासारखे केले. तिने बुड हलवले.
'बरा येतंय मी, बायोकडे जावचा आसा'.
जुवेकरीण उन्हात चादरी सुकवत बसली होती. तिला माहित होते कि आज आपल्याला इथे जेवण आहे. या घराचा आणि तिचा अलिखित करारच होता तो. जुवेकरीण आली आणि न जेवता गेली असे कधीही झाले नव्हते. तिला काही ना काही काम मिळायचे आणि जेवेपर्यंत तिची वर्णी लागायची.

रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा माईने टकळी सुरु केली.
'गे , मी काय म्हणतय?'
वहिनी आवराआवर करीत होती, यमी तिला मदत करत होती. वहिनीने यमीला तोंडावर बोट ठेऊन खुणावले.
'मी काय म्हणतय, मी करलकरणीक निरोप पाठवलाय उद्या येऊक.' वहिनीने तरीही लक्ष दिले नाही.
'प्रेमा कडसून तिका पाचशे रुपये पाठवलय जुवेकारणीच्या हातातसून'
आता मात्र यमीला राहवले नाही 'कशाला पण? कशाला पैसे दिलेस तू?'
'२ कुडू तांदूळ आणूक व्हये मा, लागतले, आणि माका किलोभर डाळ घेऊन देवा हा, ज्यास्त नको, देवाक आपला दाखवसाठी, आणि… '
'कश्यासाठी हे सगळं?' यमीला माई काय सांगणार हे माहित होतं, तिला फक्त ते माईच्या तोंडून ऐकायचं होतं.
'गो… ' आढेवेढे घेत , अंदाज घेत, आपल्याला काही माहित नाही कि हे लोक काय विचार करताहेत असा अविर्भाव करत माई  म्हणाली 'आता रवाक व्हया हैसर'
'कुणाला ?' यमीचा पारा चढला.
माई देखील वस्ताद होती. आपण त्या गावचेच नाही असे तोंड करून म्हणाली 'माका'
'आजी, बास हा बास ! , आता पुन्हा सुरु करू नको'
पण माईला गप्प राहायचे नव्हते. 'मी रवतालय, माका रवाचा असा'
यमी ताठ चेहऱ्याने आजीकडे आणि वहिनीकडे पाहू लागली. माईचे चालूच होते, डोळे मोठे करून हात वारे करत लहान मुलाला समजावतात तसे ती बोलू लागली.
'तुका नाय कळाचा,  घर बघूचा लागता, दिवो लगाक व्हयो, कुळस्वामी माझ्या  स्वप्नात येता'
'आणि तू लावणार ? तुला काय वाटतं सगळं तुझ्यामुळे चाललय इथे? तुला माहित तरी आहे कशी राहतेस इथे ती ? मागच्यावेळेला डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती.'
'कायतरी बोला नको. माका काय्य्क झाला नाय असा. उगाच तुमी बोलतास. तुमका बघवणा नाय मी हय रवलला. माझा मी आसय समर्थ'
'हो? समर्थ आहेस तू स्वतःची, पाच पैश्याची जबाबदारी नाही, आज वीस वर्ष तुझ्या गोळ्यांचे पैसे बाबा भरायचे. ओटवणेकरचं इतकी वर्ष बिल बाबा भरत. लाईट, घरपट्टी, सारा, दस्त सगळं, आणि तू समर्थ?'
'मी जातंय कसा आतेकडे, माका नाय बोलाचा'
'आजी, थांब , किती वेळा समजवायचं तुला? कुणी कुणी सांगायचं, तू ऐकणार नाहीस?'
'नाय,  माका काय्येक सांगू नका', माई उठली आणि दाराकडे गेली.
'अरे! तू ऐकणार नाहीस तर. बघ हा आजी, आता जर तू गेलीस तर मी बोलणार नाही कधीच तुझ्याशी, यापुढे एक शब्दहि'
'हा नको बोलू' 'माका काय ' काहीतरी पुटपुटत माई दरवाजा उघडून बाहेर गेली. तशीच चप्पल घालून अंधारात बाहेर पडली.
वहिनी म्हणाली 'ओ बॅटरी तरी घेवन जावा, जा ग घेऊन बॅटरी'
'काही नको देउस तिला आणि मी मुळीच जाणार नाही, जाऊ दे धडपडत तिला, मोठी समर्थ समजते स्वतःला '. यमी म्हणायच्या जवळ जवळ माई आतेच्या घरी पोचली सुद्धा होती. वहिनीने डोक्याला हात लावला.
'यमी, कशाला बोललीस तू तिला? ऐकून घ्यायचं काय बोलते ते. बोलेल तिकडे असेल, तिला इथे ठेवणार नाही आता हे तिलाही माहित आहे, उगाच जीव रमवते आपली काहीतरी वादाला कारण काढून '
'नाही आई, तुला कळत कसं नाही? तिला खरंच इथे राहायचं आहे'.
'ता म्हायत आसा, म्हणान काय झाला?'
'मग राहू दे इथे तिला, काय होईल ते होईल. तिला काळजी आहे? तिला आपण काळजी करतो त्याची किंमत आहे? तिला आपलं तेच खरं करायचं आहे'
'इथे तिला काही झालं तर लोक काय म्हणतील?, यांच्यानंतर बघितलं नाही म्हणतील'
'लोकं गेली खड्ड्यात'
'विनय मागच्या वेळी आला होता ना तेव्हा'
'ते माहित आहे मला, परत कशाला सांगतेस?
'नाही त्याआधी आला होता तेव्हा संध्याकाळच्यावेळी, तर माई आत चुलीकडे धडपडत होती. काय करत होती तर म्हणे चहा. तोंडाला सगळं काळं. पातळाला सगळीकडे काळं. विनयने दुसरं पातळ शोधण्यासाठी तिला विचारलं तर मुडीवरच्या टोपलीत ढीगभर पातळं अस्ताव्यस्त पडली होती. त्यातले एक काढले तर त्यातून ३-४ मांजरं झोपलेली ती बाहेर पडली. आता काय म्हणावं याला?'
तेवढ्यात दारावर हाक आली, आतेकडचा गडी आला होता, आजीची कायमचुर्ण आणि तेलाची बाटली न्यायला.

यमीला थोडे वाईट वाटले 'आजीचं काय हे नशीब. आणि एकंदरीत माणसाचंच? त्याला जिथे राहायचं आहे तिथे राहण्याचं देखील स्वातंत्र्य असू नये?'
आपण तिला उगाचच रागावलो याची तिला आता टोचणी लागून राहिली. रात्री बराच वेळ तिला झोप लागली नाही.

सकाळी वहिनीने देवखोलीची साफसफाई सुरु केली. यमी दुध तापवत होती, मनात आजीबद्धल विचार चालू होते. आजी काहीही केले तरी तेच वागणार. तिला मागच्याच महिन्यातली हकीगत आठवली , वहिनीने बाहेर चार फेऱ्या मारायला सांगितल्या म्हणून आजी बिल्डींगच्या खाली गेली, तर गेट बाहेरच्या दुकानात जाऊन
एक किलो शेव आणलन, त्या माणसांनी म्हातारीला बघितलं होतं का काय कुणास ठाऊक तिने काय सांगितलं पण त्यांनी उधारीवर एक किलो शेवाची पुडी दिली तशी घेऊन आली घरी, आणि शेवाचे पैसे द्यायला सांगितले.  वहिनीने विचारलंही तेव्हा म्हणाली, 'आता जावचा झाला नाय घराक, भरारा जातलय'
कोण इथे आणून सोडणार होतं तिला? कुणीच नाही. आपणच आपलं ठरवत बसायचं, मनातल्या मनात.  बिल्डींगमधल्या गोगटेबाईंना काहीबाही सांगितलंन, त्यांना दोन मुली, तर हिने त्यांना सांगितलं गावच्या महा राजांकडे जाण्याबद्धल, मुलगा होण्यासाठी. त्या बाई तावातावाने वहिनीला सांगायला आल्या होत्या. या सगळ्यामागे आजीची इच्छा, 'घराक जातलय भरारा' एवढीच. 'हयच रवतलय' एवढीच. तिचं काय चुकलं जर तिला असं वाटत असेल तर. आयुष्य इथे गेलं. तेव्हा भरल्या घरात आली असेल, मग एक एक करून घर खाली होताना तिने बघितलं असेल. आणि या घरात एकटं राहताना या भिंतीनीच सोबत केली असेल. आजोबा, बाबा, काका, स्वतःची ६ मुलं आणि कुटुंबातली ढीगभर अशे किती माणसं जाताना बघितली तिने पण हा ब्राम्हण आंबा, पारवाला पिंपळ,  तळीवरचा नागोबा, खोरणातला महाराजांचा फोटो हेच तिचे खरे साथी.
तिला राहायचं असेल तर तेवढंही तिला तिच्या शेवटच्या काळात मिळू नये?
ती विचारात असतानाच दार वाजलं, माई आत आली होती. तिचाच विचार करीत असली तरी यमीने आता मात्रं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. कालचा विसंवाद अजून जागाच होता. माईच चुलीपाशी आली. यमीच्या बाजूला बसली. ओंजळ यमीच्या पुढ्यात दाखवून म्हणाली 'फुला आणलय'. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा घाबरट  अपराधीपणा होता.  यमीचा राग विझून गेला,  ती थोडीशी वरमली.
'ठेव त्या घडवंचीवरच्या परडीत मग'
'नाय गो तुका दाखवूक आणलय'
यमीने क्षणभर त्या सुरकुतलेल्या, हडकुळया हातातल्या ताज्या टवटवीत फुलांकडे बघितले.
चहा घेशील यातला अर्धा?  कपबशी माईच्या पुढे सरकवत ती म्हणाली.
'काल माका एक स्वप्न पडला. या देवखोलीत मी उभ्या… '
'आजी नंतर सांग ग, मला आता पुजेचं समान काढायचं आहे सगळं, हा चहा घे आणि आंघोळीला जा बघू'
 असं म्हणून यमीने चुलीकडे चेहरा वळवला, चुलीचा धूर वाढला होता तिच्या डोळ्यातून पाणी येत होते, तिने  फुंकणीने राख बाजूला करून जाळ वाढवला.
वहिनी साफसफाई उरकून आली तशी, चहाची बशी  खाली ठेऊन माई म्हणाली 'गे मी काय म्हणतय, प्रेमा कट्ट्यार जातंला तेका एक किलो रवो आणूक सांगलय'
'कित्या? संध्याकाळी विनय येता तो आणतलो सगळा'
'गे लाडू करुक व्हये मा, हैसर रवतलय, तर कोण इलोगेलो तेका देउक नको?'
'लाडू केलास मा हय येवच्या आधी, ते आणालले आसत. आणखी नवो धंदो घालू नकात तुम्ही आता, हा! काय तरी आपला एकएक सांगीत रवतलास, आयकतव म्हणान.
'गे यमी घेवन जायत, तेच्ये मालक खातीत'
'काय तरी सांगा नकात हा येक येक'
वहिनी कळशी, बादली आणि राजू(दोर) घेऊन विहिरीला निघून गेली.    


संध्याकाळी विनय आला. त्याने आपल्या गाडीतून बरेच समान आणले होते, ते स्थिर-स्थावर करण्यात दिवस संपून गेला. दुसऱ्या दिवशीचा लघुरुद्रही पार पडला. काही मोजकी मंडळी जेवली, माईने त्यानाही आपण इथे कसे राहिलो, घर कसे सांभाळले, कुळस्वामीला कसा दिवा लावलाच लागतो नाहीतर तो स्वप्नात कसा येतो ह्याविषयी गजाली सांगितल्या, तिच्या न संपणाऱ्या गजालीनी पाहुण्यानी सुद्धा कंटाळून काढता पाय घेतला. प्रत्येक गजालीतले निर्वाणीचे वाक्य 'माका हयसर रावाकच व्हया, समजलात मा ' हेच होते. 'देवाक कोण बघतलो, देवाक बघूकच व्हया' हेहि. आता सगळीच शिंग फुटून मोठी झाल्याने तिने बहुतेक आपल्या देवालाच लहान करून टाकले होते.

रात्री निजानीज झाली तरी तिची झोपायची चिन्ह दिसेनात. सगळे दमून जाजमावर अंग टाकत होते तर हिच्या आपल्या एरझाऱ्या सुरु होत्या. शेवटी कंटाळून विनय मधल्या खोलीत आला, 'आजी झोपत  नाहिस, चल आता , लाईट बंद करतो मी ही '
तशी त्याच्या एकदम जवळ जावून त्याला विश्वासात घेतल्यासारखे करत ती म्हणाली
'माका बघ, कसातरी जाता'
'काय होतंय तुला आजी?'
'ताच समजना नाय, धडकी भरल्यासारखी वाटता. माका बघ इतको (चार आंगळं दाखवून) आल्याचो रस देशित?'
'थांब देतो, पण तू एका जाग्यावर बस शांत.'
'नाय मी प्रेमाथय जातंय, ता देयेत, असं म्हणून आजी दरवाज्याकडे गेली दरवाज्याची फारशी कधीही न लावली जाणारी एकदम वरची कडी आज कुणीतरी लावली होती, ती काही माईला काढायला जमणार नाही असं वाटून विनय घडवंचीवरचं आलं शोधायला गेला. ते घेऊन खलबत्ता शोधणार इतक्यात त्याला खुर्चीचा लादीवर खरखरण्याचा आवाज आला.
'आजी, अगं काय चाललय काय तुझं? तो एकदम ओरडला आणि धावतच दाराकडे आला. त्याच्या आवाजाने वहिनी, यमी सुद्धा उठून आले.
माई खुर्ची दाराला लावून कडी काढण्यासाठी वर चढली होती.
विनय ने धावत जावून तिला थांबवले. 'अगं हे काय करतेस तू, पडलीस म्हणजे?' तो अजूनही ओरड्ल्याच्या सुरात बोलत होता.
'नाय रे. प्रेमाकडे जातंय.'
'कशाला प्रेमा काय ऑपरेशन करणार आहे का डॉक्टर आहे, तिच्याकडे काय सोन्याचं आलं वाढून ठेवलय, गप बस इथे, नाटकं नको तुझी '
'नाय रे, तेका विचारतय,  माका कसातरीच जाताहा. महाराजांकडे जाउक व्हया. तेंका विचारतलय काय करू म्हणान'
'कशाचं काय करू?'
'रे, हैसर रवाचा.'
'काय ग हे तुझं'
'रे, काय म्हणजे काय?' आई सुद्धा रागाने थरथरायला लागली. 'माका हैसर रवाचा आसा. देवासाठी. तुका काय त्येचा, दुसऱ्या तिसऱ्यान आयकला असता माझा'
'दुसरा तिसरा असाता ना तर हि खुर्ची तुझ्या टाळक्यात घात्ली असती त्याने कळलं आजी, तुला काय वाटतं आम्हाला मजा वाटते तुला चार खोल्याच्या खुराड्यात डांबून ठेवयला, आम्ही काय वैरी आहोत काय ग तुझे?'
'तुमी देव बीव सोडलास असश्यात, मी सोडूक नाय, देवाक दिवो लागाक होयो, तर तो माका बरा ठेवतालो, सगळ्यांचा  बरा जाउक  व्हया तर देवाक बघुचाच लागतला , मी रवान हैसार रे, देवाची सेवा करूंक, कुळस्वामीन स्वप्नात येवन सांगल्यान समाजला मा'  भिजलेल्या मांजराला पकडले तर ते रागावून आवेशात येते त्याप्रमाणे तिने चेहरा केला.
हिच्याशी बोलून काही फायदा  नाही हे त्याला माहित होते पण त्याचाही पारा चढला होता. पण तो काही बोलणार इतक्यात आतून वहिनी आल्याचा रस घेऊन आली.
'ह्यो घेवा बघया आधी, आणि शांत रवा, काय्येक जाउक नाय हा तुमका, बसा आधी बघूया हैसर' तिने पेला यामिकडे दिला आणि माईला हाताला धरून खाली बसवले. माई केविलवाण्या नजरेने मात्र आलटून पालटून त्यांच्या सगळ्यांकडे बघत होती. यमीने खाली बसून पेला माईच्या हातात दिला.
'माका घेवन चलशीत रे , महाराजांकडे. विचारतलय त्येंका काय करू तां'.
'होय्य्य्य्य्य्य्य , एकदा म्हटलं ना मग घेऊन जाणार ! परत परत विचारायचं नाही ' . एकदम मोठ्याने विनय म्हणाला.
वहिनीने खुर्ची बाजूला ठेवली आणि म्हणाली 'आता काय ता उद्या बघुया, आता निजा सगळ्यांनी बघिया'
'चल विनय, जा जावन झोप'
विनय एक मिनिट थांबून खोल श्वास घेऊन मग आतल्या खोलीत गेला. माईला उठवून यमी अंथरुणावर घेऊन गेली. वहिनीने लाईट काढले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विनय , यमीला एस. टी. स्टँडवर सोडायला गेला. संध्याकाळच्या  मलूल सूर्यप्रकाशात दोन्ही बाजूला असलेल्या गर्द झाडीच्या अरुंद रस्त्यावरून गाडी चालली होती, यमीच्या मनात मात्र विचारांनी केव्हाच अंधारून गेले होते. आपल्याच विचारात मग्न दोघेही गप्पच होते. चढणीच्या रस्त्याच्या कडेला एक म्हातारी काठी टेकीत चढाव चढत होती. कपडे विरलेले. डोक्यावर कांबळ्यासारखे काहीतरी त्यामुळे चेहराही दिसत नव्हता. यमीने तिच्याकडे स्पष्ट पाहण्याचा प्रयत्न केला पण गाडीच्या वेगामुळे चेहरा अधिकाधिक अंधुक होत गेला. पूर्ण रस्ताभर ती फक्त दोनचार दिवसातल्या घडलेल्या प्रसंगातच बुडून गेली होती. रानबांबूळीचा बोर्ड मागे पडला तसं तिला एकदम आठवले कि तिकीट असलेल्या नारिंगी फोल्डर घरीच राहिला. तिच्या डोक्याला एकदम झिणझिण्या आल्यासारख्या झाल्या. तिने बॅग़ ची चाळवाचाळव केली, त्यात कुठे तो फोल्डर दिसेना, मागे झुकून ती मागच्या सीटवर ठेवलेली मोठी बॅग़ घेण्याचा प्रयत्न करू लागली , विनय ने गाडीचा वेग मंदावत विचारले 'अरे काय झालं?' ती म्हणाली   'बहुतेक मी तिकिटाचा फोल्डर घरीच विसरले'. विनयने चटकन गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली, उतरून दोन्ही बॅग़ शोधल्या. तो फोल्डर कुठेच नव्हता, 'असं कशी विसरली असशील? बघ यातच असेल कुठेतरी' ,
'अरे नाही , तीन वेळा बघितलं' तिने बॅग़ मधले कपडे अस्ताव्यस्त फेकले पुन्हा कोंबले.
'थांब, टेन्शन घेऊ नको, वेळ आहे तसा, परत जाऊ. कट टू कट होइल, पण त्याला इलाज नाही'
गप्पपणे दोघे परत गाडीत बसले. गाडी वळवून परत घराच्या रस्त्याला धावू लागली.
यमी अस्वस्थपणे अजूनही बॅग़ शोधत होती, 'सगळा गोंधळ नुसता, एक गोष्ट धड का नाही होत माझ्याबाबतीत ? छे, मी उगाच आले, मी यायलाच नको होतं इथे, हि जागाच बेकार आहे, सगळ्यांना पाय मोडून नुसती गिळून टाकायला बसली आहे आ वासून, काळोखातला घराच्या वरचा तो हिरवा डोंगर, आता आ वासून बसलाय घर गिळायला, आणि आपल्या सगळ्यांनाच  गिळतोय तो एक एक करून , बघ तू, छे, इथे येताच कामा नये होतं, चूक झाली'
विनय गप्पच होता, आणि यमी अस्वस्थपणे पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी बॅग़ मधून काढत होती, परत आत टाकत होती.  गाडी वेगाने धावत होती. आता मगाचच्या चढणीजवळ गाडी आली, पण उलट बाजूने असल्याने आता चढावाऐवजी उतार होता, बारीक चांदण्यात आजूबाजूची झाडं आणि उतराचा रस्ता स्पष्ट दिसत होता.
यमी अजुनही मध्येच  पुढे बघत मध्येच मांडीवरच्या  बॅग़ मध्ये चाचपत शोधतच होती. अचानक बॅग़च्या खोल फाटक्या कप्प्यात काहीतरी हाताला लागले. 'अरे थांब, थांब बहुतेक आहे तो फोल्डर, थांब'. विनय ने गाडीचा वेग मंद केला गाडी उतराला लागण्यापूर्वीच त्याने ती थांबवली.
'हा बघ तो हरामखोर फोल्डर!' यमीने तो अडकलेल्या फाटक्या कप्प्यातून उचकटून काढला. 'चल वळव इथेच'
विनयने गाडी वळवली, वळवताना यमीचं लक्ष उतारात गेलं आणि तिच्या काळजात चर्र झालं. मगाचच्याच म्हातारीसारखं कोणी काठी टेकीत चढाव चढत होतं. 'अरे ती म्हातारी अजून इथेच कशी, ती बघ ?'
गाडी वळवताना विनयलाही  कुणीतरी चढाव चढत असल्याचे पुसटसे दिसले.
'गाडी वळवून एव्हाना पुन्हा रस्त्याला लागली होती. तो म्हणाला 'अगं काही नाही, कुणीतरी दुसरी असेल.  तिथे बाजूला घर असेल तिचं.'
'नाही तिथे एकही घर नाही आहे अरे'
यमीचा चेहरा रडवेला झाला, 'पण तिथेच कशी ती?'
'अगं तिथे म्हणजे तिथेच नाही आहेत घरं अगदी , बाजुचे  सातोशेचं भराड आहे ना तिथे घरं आहेत, त्यातलीच असेल ती , तुला काय ती 'वेगळी'  वाटली काय?',  यमीने चमकून त्याच्याकडे बघितले. विनय हसायला लागला.
'अग्गग्ग, गावातली  माणसं अशीच अंधारात रस्तावरून बिनधास्त चालत असतात इथे हे काय माहित नाही तुला'
'नाही मघाचचीच होती ती. आपल्या माई सारखी फिरतेय बहुतेक घर नसलेली', यमी एकदम घुसमटून रडायलाच लागली.
'हे बघ तू काहीतरी ना , वेड्यासारखं बोलू नकोस , तू कशाला काहीतरी टेन्शन घेतेस? . तू शांतपणे मुंबईला जा. मी समजावलय माईला. बरोब्बर करतो मी काय ते. हे बघ मला पण वाईट वाटतं ग, माईला इथेच राहायचंय त्याबद्धल आपण काही करू शकत नाही,  तिलाही माहित आहे ती इथे राहू शकत नाही ते, कळलं ना, मागे मला म्हणाली होती कि या घरातच संपू दे आपलं सगळं म्हणून, पण काय आहे ना, शेवटी प्राक्तन असतं, तिचंहि आहे आणि तिच्या देवाचं हि आहे. तू उगाच  विचार करून डोक्यात फुकटचा जाळ  घालून काही उपयोग नाही, असंच व्हायचं आहे आणि ते तसंच होणार. मी मी म्हणणारे सगळे गेले, इच्छा खूप असतात पण सगळ्याच पुऱ्या  होत नसतात, हे तुलाही माहित आहे'
'मग काय करणार आहेस तू?'
'तिला महाराजांकडे घेऊन जातो म्हणून आम्ही निघू उद्या, तिचं सगळं समान घेऊन, मग अर्ध्या रस्तात आलेलोच असू तिथून तिला सांगू , 'आता पुण्याला जाऊ, नंतर पुन्हा दोन महिन्याने येऊ', अशी तिची समजूत घालणार दुसरं काय?'
'आणि तिथून परत 'घराक जावया' असा हट्ट धरला तर तिने?'
'नाही धरायची, मी ओळखतो तिला.'
'पण ……… तूच सांग, तिला स्वतः आपलं वाटणाऱ्या जागी तिला राहण्याचं देखील स्वातंत्र्य असू नये?, तुला काहीच वाटत नाही याबद्धल ?'
'हमम ….  स्वातंत्र्य…. इच्छा … '
'किती दिवस राहिलेत तिचे , तिला शेवट जिथे राहायचंय तिथे राहायला मिळालं पाहिजे कि नाही?'
'आपण नाही ठरवू शकत ते, आपल्या हातात नाही ते  , आपलं घर कुठचं  हे आपल्याला कितीही वाटलं ते आपल्याला नाही ठरवता येत ते '

गाडी धावत होती. एस. स्टी. स्टँड जवळ येत होतं. घराचा रस्ता केव्हाच मागे पडला होता.

No comments:

Post a Comment