Friday 29 April 2016

वाट


फर्लांगभर वाट आहे
जिच्या एका टोकाला तिठा आहे
आणि दुसऱ्या टोकला घर

घराजवळ डोंगर
आंबा, पिंपळ, जांभूळ, थोडे साग, चार माड
करवंदाच्या झाळी आणि एक पेंडराचे झाड
असा संसार आहे

तिठ्यावर घर नाही , तिठा बेघर आहे

त्या फर्लांगभर वाटेवर
एक शाळा आहे, घराजवळ
एस. टी. चा एक अदृश्य थांबा आहे, तिठ्याजवळ
आणि एक देवस्थान आहे, मधोमध

वाटेवर चढाव उतार, अनेक नागमोडी वळणे
नव्या जुन्या पाऊलवाटा, वारा
काही सळसळणारी आणि काही स्तब्ध झाडं,
बैलगाड्यांचा खडखडाट, टिटव्यांच्या टिवटिवेने -
भरून राहिलेला आसमंत
आणि रोखून पाहणारे काळे दगड
यांचा वावर आहे

वाटेवर एक विचित्र वळण आहे
जिथे माणसं घाबरतात, घाबरली आहेत
घाबरलेल्यांना न घाबरलेल्यांनी पहिले आहे
मी न घाबरता, हे ऐकीव सत्य आहे
असे मानून आहे

आजोबा खांद्यावर नारळाची गोणी घेऊन
तिठ्यावरून घरी सुखरूप
याच वाटेवरून अनेकदा आले आहेत
ताठ मानेने आणि तेही न घाबरता

लहानपणी तिठ्यावरून घराकडे
चालत गेल्याच्या अनेक आठवणी आहेत
आणि नंतरच्या काळात फक्त
तिठ्याच्या दिशेने पळत राहिल्याच्या;
का? ते सांगता येत नाही

अश्याच एका कातरवेळी
मी घराकडून तिठ्याच्या दिशेने निघाल्याचे आठवते
पाठीवर बोचकं, ताठ मान, न घाबरता
घाबरलेल्यांचे अनुभव सोबतीला

वाटेवर ज्यांचाज्यांचा वावर आहे
त्या सर्वांनी आपापला प्रयत्न केला
टिवटिव, खडखड, वळवळ, सळसळ
काहींनी काहीच नाही केलं फक्त बघत राहिले
एखाद्या देणेकऱ्याकडे बघावं तसे

शाळा गेली, देवस्थान गेलं
विचित्र वळण मागे पडलं
पाठीवर बोचकं, ताठ मान

भीतीपोटी जर मरून पडलो असतो या वाटेवर
तर न घाबरलेल्यांनी काय केलं असतं?
घराजवळच्या स्मशानात जाळलं असतं की
बेघर तिठ्यावर पुरलं असतं, बेवारश्याचं प्रेत म्हणून?
की मेल्यावरही जगू दिलं असतं या वाटेवर
अजूनही न घाबरलेल्यांना घाबरवण्यासाठी

प्रश्न अनेक, उत्तर नाही, तिठा आला
तिठ्यावर रिक्षा उभी, नाव पुष्पक!
आपली पात्रता नाही या विचाराने हिरमुसलो
दुसरा काहीच मार्ग नाही, काय करावं?
चढून बसलो, पुष्पक निघाले , पुढच्या प्रवासाला

-विवेकानंद सामंत
२९ एप्रिल २०१६, पुणे       

Thursday 28 April 2016

गोष्टीची गोष्ट

[या पुस्तकावरचे सुंदर चित्र हे  राथवा आदिवासी जमात, गुजरात यांच्या लोककलेतील भित्तिचित्र आहे. निर्मितीसंबधी च्या 'मिथ'वर ते आधारलेले आहे.  ]
आपल्या लहानपणी 'गोष्ट सांग' असे आपण कितीतरी वेळा ऐकले, विनवले असेल. गोष्टी न आवडणारा माणूस विरळा. आमच्या लहानपणी टि.व्ही वर कार्टून्स येत नसत. घराच्या जवळ असलेल्या कोपऱ्यावर एक 'रामेश्वर' नावाचे दुकान होते. काही बिनसले, किंवा परीक्षा संपून सुट्टी पडली, किंवा वाढदिवस असे काही कारण मी काढले कि माझे आजोबा/बाबा/आई यापैकी कुणीतरी मला रामेश्वर मध्ये घेऊन येत. गोष्टीची पुस्तकं दाखवा असे सांगितले कि दुकानातला ओळखीचा माणूस गोष्टीच्या पुस्तकांचा गठ्ठा काढून माझ्यासमोर ठेवी. सगळी २५-५० पैश्याची पुस्तके. ३०-३५ पानांची. पण ती बघून त्यातले हवे ते निवडायला काय मजा येत असे. 'जादूची पेटी', 'राजपुत्र आणि नीळा कोल्हा', 'दिपू आणि जलपरी, टिल्लू टॉम' अश्या नावांची.  २-३ पुस्तके घेऊन समाधाने घरी परतत असू. मग तहान भूक विसरून पुस्तकांचे वाचन. वय जसे वाढत गेले तसे थोड्या मोठ्या गोष्टींची पुस्तके वाचनात येऊ लागली, 'कपटी कंदार', 'भूतळी जहाज', 'फास्टर फेणे', 'वेताळ पंचविशी'. वेताळ आणि मेंड्रेक ची कॉमिक्स तर ऑल टाइम फेवरेट. अश्या या गोष्टींनी पाठ कधी सोडलीच नाही. नंतरच्या काळात टि .व्ही. वरच्या 'पंचतंत्र', 'अलिफ लैला','अमरावती कि कथांये' 'चंद्रकांता' अश्या मालिकांत गोष्टी भेटतच राहिल्या. या गोष्टी मनाला गुंगवतात आणि गुंतवतात. त्यामुळेच गोष्टींची मानवी मनाला कायमची भुरळ पडली आहे. जगभर गोष्टी रचल्या गेल्यात आणि सांगितल्या गेल्यात. माणसाकडे कल्पनेची कमी नाही आणि मनोरंजन तर मनाला हवेच त्यामुळेच प्राचीन काळापासून गोष्टी रचणे सांगणे चालत आले आहे. बऱ्याच ठिकाणी या गोष्टी बोलण्याबोलण्यातून तयार होतात आणि तोंडी सांगत सांगत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात पसरत जातात. तिथे पोचल्या कि तिथली राहणी, तिथली भाषा लेऊन त्यांना नवीन रुपडं मिळतं. या कथांचा उद्देशही निरनिराळा. कधी मनोरंजन, कधी बोध, शिकवणूक, कधी कुठल्या संताचे सांगणे पटवून देण्यासाठी, इ. इ.
बुद्धावर लिहिलेल्या जातककथा जितक्या बोधपर तितक्याच मनोरंजकही आहेत. 'अरेबियन नाईट्स'(हा मुळ ग्रंथ वाचायचा राहून गेलाय) पण त्यातल्या कथाही खूपच मनोरंजक आहेत ज्यांचे रुपांतर टि.व्ही वर केले गेले. 
किती लेखकांनी आणि स्कॉलर्सनी या कथांचा पाठपुरावा केलाय. मानववंशशास्त्रज्ञ तर या कथांचा बारकाईने अभ्यास करतात कारण त्यातून लोकांची जीवनशैली कळते, बोलीभाषेतील बारकावे, अपभ्रंश, नवीन तयार झालेले शब्द कळतात. रितीरिवाजही कळतात. आजपर्यंत किती लोकांनी या गोष्टींचा मेहनतपूर्ण अभ्यास आणि शोध केला आहे, परभाषीय कथा मुद्दाम भाषांतरित करून अभ्यासल्या आहेत. दुर्गा  भागवत, रिचर्ड बर्टन, ए. के. रामानुजन अश्या अनेक विद्वान लोकांनी यांवर काम केले आहे. रिचर्ड बर्टनने अरेबियन नाईट्सचे मूळ अरेबिक मधून इंग्रजीत भाषांतर केले, दुर्गा  भागवत यांनी जातक कथांचे सात खंड मूळ पाली भाषेतून मराठीत आणले. ए. के. रामानुजन यांनी ठिकठीकाणहून लोककथा गोळा करून त्यांचे संकलन केले.
हल्लीच त्यांचे 'Folktales From India'  हे पुस्तक वाचनात आले.
यात २२ भाषांमधल्या शंभराहून अधिक गोष्टी संकलित केलेल्या आहेत. ए. के. रामानुजन यांनी प्रस्थावनेत म्हटलं आहे 'It (The Book) is called Folktales FROM India, not OF India, for no selection can truly 'represent' the multiple and changing lives of Indian tales. Instead it 'presents' the multiple and changing lives of Indian tales.

त्यांनी या गोष्टींबद्धल माहितीही दिली आहे. वेगवेगळ्या धर्मांत, प्रांतांत सांस्कृतिक देवाणघेवाण हि कायम होतच असते. आणि ह्या द्वारे म्हणी, सुविचार, जोक्स, गोष्टी, घरगुती उपचार, कोडी, पाककृती हे सर्व Autotelic (They travel by themselves without (often) any movement of the population) रीतीने स्थलांतरित होत असतात. भारतातील भाषांमधे बरेच लोककथांचे विषय, वस्तू सारख्या आहेत. आणि तरीही यांचा उपयोग आणि त्यांचा कथेतील अर्थ भिन्न असू शकतो. स्थळकाळाप्रमाणे या गोष्टी बदलत जातात. याबाबत एक छान उदाहरण रामानुजन यांनी दिले आहे. एकदा ऍरीस्टॉटल ने एका गावातल्या सुताराला त्याची सुबक सुरी बघून विचारलं कि किती वर्षांपासून हि सुरी तुझ्याकडे आहे, त्यावर तो उत्तरला कि पिढ्यांपिढ्या ती आमच्याजवळ आहे फक्त आम्ही फक्त तिचं पातं आणि मुठ अनेकवेळा बदलंय. तश्याच या गोष्टी आहेत, पिढ्यांपिढ्या बदलत जाणाऱ्या, गोष्ट जरी तीच तरी तिचे रूप बदलून जातच असते आणि त्यातले विषय, वस्तू त्या त्या काळाच्या रीतीरिवाजानुसार  वेगवेगळी रुपं धारण करतात. या गोष्टी पसरतात कशा? तर बहुतेक घरच्या घरी सांगितल्या जातात, काही लोककला सादर करणाऱ्या कलाकारांकडून सादर होतात.
रामानुजन आपल्या स्वतःच्या घरचा अनुभव सांगतात. त्यांच्या घरी एकत्र कुटुंब होतं आणि 'बेडटाईम स्टोरी' ऐवजी 'मीलटाईम स्टोरी' असायची. घरातल्या सर्व मुलांना एकत्र बसवून एका मोठ्या ताटात जेवण कालवून घास-घास एकेका मुलाला भरवला जाई. हे काम आजी किवा काकी करत असत. भरवताना गोष्ट सांगण्यामागे हाच उद्देश असे कि मुलांना (गोष्ट ऐकण्यात दंग झाल्याने) जेवणाविषयी कुरकुर करता येऊ नये आणि त्यांच्या कडून भरपूर अन्न खाल्ले जावे. घरात काम करणारे गडी सुद्धा ज्या गोष्टी सांगत त्यातून त्यांच्या जमातींच्या गोष्टी कळत. जो गोष्ट सांगणारा असतो त्याच्यावर सुद्धा गोष्ट सांगणं अवलंबून असतं. जसं आजी, काकी हे स्वयंपाकघराच्या आजूबाजूच्या किवा घर, घरतील माणसे यांवर आधारलेल्या गोष्टी सांगतात. तर आजोबा, काका हे घराबाहेरच्या गोष्टी सांगतात.

या पुस्तकात संकलित केलेल्या गोष्टी 'पंचतंत्र', 'कथासरितासागर' मधल्या नाहीत. काही बंगाली गोष्टी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेल्या आहेत. त्या रामानुजन यांनी मुद्दाम उल्लेख करून इथे दिल्या आहेत. रामकृष्ण परमहंस स्वतः लिहू-वाचू शकत नसत पण त्यांच्याकडे अश्या लोककथारूप  गोष्टींचे भांडार होते.

या गोष्टी किती जुन्या आहेत? तर याचे उदाहरण देताना रामानुजन सांगतात 'माकड आणि मगर' (माकडाचं हृदय मगराची बायको मागते ती गोष्ट) हि गोष्ट जेव्हा त्यांनी त्यांच्या archeologist मित्राला सांगितली तेव्हा त्याने सांगितले कि हि गोष्ट मंटाई, श्रीलंका येथल्या उत्खननात सापडलेल्या भांड्याच्या तुकड्यावर चित्ररूपाने चितारलेली होती. या गोष्टीचे दुसरे रूप बौद्ध संप्रदायामध्येही आढळते. पाचव्या शतकातील पंचतंत्रातहि हि गोष्ट सापडते. ११ व्या शतकातील कथासारितासागरात अरेबियन नाईट्सच्या आणी शेक्सपियरच्याहि काही गोष्टी आढळतात. (All's well that ends well, Cymbeline). अश्याप्रकारे गोष्ट किती जुनी आहे आणि तिचा उगम कसा आणि कुठे झाला हे सांगणे म्हणजे पुरातत्वशास्त्रासारखाच अभ्यास करावा लागेल.


या गोष्टींचे स्वरूप काय असते? तर काही महत्वाचे थीम्स या गोष्टींमध्ये आढळतात.
१) स्त्री-प्रधान गोष्ट : यात स्त्री मुख्य पात्रं असते. तीच्यावर अन्याय करणारी कुणीतरी पात्रं असतात (बहुदा सासू, नवरा , चोर असे) त्यातून ती कसा मार्ग काढते, चातुर्यवान, धैर्यशाली कशी असते अश्या स्वरूपाची गोष्ट  असते. स्त्री च्या  गोष्टीतील समस्या घरगुती जाच, पतीकडून अस्वीकार, कुटुंबाला वाचवणे अश्या असतात. 
२) पुरुष-प्रधान गोष्ट: यात अनेक विषय, नीती, नियम, त्यांचे पालन, राजा आणि त्याचे सहायक, लढाई, राजकारण
३) घराबद्धलच्या/कुटुंबाबद्धलच्या गोष्टी: कौटुंबिक समस्या
नियती, मृत्यू, देव, राक्षस, भुतंखेतं, विदुषक( तेनाली रामा), चतुर माणसं(बिरबल, गोपाल भर) यांच्या गोष्टी: यात खूप विविधता असते.
४) प्राण्यांच्या गोष्टी  
५) गोष्टींबद्धलच्या गोष्टी

या गोष्टींचे प्रयोजन काय? तर मनोरंजन,बोध आहेच पण या कथांतून रिती,परंपराही  जपल्या जातात. पिढ्या, जाती, पंथ, धर्म, प्रांत यांची बंधने तोडून चांगले आहे ते घेऊन संवादहि साधला जातो. लोककथा त्या त्या भागाची मानसिकताही समजण्यास मदत करतात.
यातली सर्वात मनोरंजक आहे ती गोष्टींबद्धलची गोष्ट. या गोष्टींमध्ये गोष्टीबद्धल निवेदकाला काय वाटते तेही कळते. अशी एक गोष्ट आहे
Tell It to the Walls (भिंतींना सांगा) ह्या तामिळ गोष्टीत एका म्हतारीला आपली गोष्ट कुणालातरी सांगायची असते. म्हातारी घरच्या सुनां-मुलांच्या त्रासाबद्धल कुणाकडे बोलू शकत नाही, सगळ्या गोष्टी आपल्या आताच ठेवल्याने ती जाड व्हायला लागते. मुले-सुना मग आणखी चेष्टा करू लागतात. तेव्हा एक दिवस घरात कुणी नसताना ती घराबाहेर पडते. एका पडक्या घरात जाते. त्यांच्या प्रत्येक भिंतींना आपली कर्मकहाणी सांगते. तेव्हा एक एक भिंत कोसळून पडते आणि म्हातारीही बारीक बारीक होत जाते.

'न्हाव्याचे गुपित' या कथेतही राजाच्या गाढवासारख्या कानांची गोष्ट तो कुणाला सांगू शकत नाही , शेवटी ती तो एका झाडाला सांगतो. काही गोष्टींना स्वतःचे अस्तित्वदेखील आहे आणि त्यांना इच्छादेखील आहेत कि आपल्याला कुणाकडून सांगितले जावे. अशी एक गोष्ट आहे  'न सांगितलेल्या गोष्टी' जिच्यात गोष्टी एका 'गोंड' माणसाच्या पोटात असतात आणि आपल्याला सांगितले जावे म्हणून विनवणी करतात, तो  नकार देतो तेव्हा त्या बंदिस्त झाल्यामुळे रागावतात आणि पुढचे कथानक घडते. यातून काय सांगायचे आहे? तर हेच कि जर तुम्हाला एखादी गोष्ट माहित आहे तर ती स्वतःकडे बंधिस्त न ठेवता सांगितली पाहिजे.
'प्रेक्षकांच्या शोधतली गोष्ट' या कथेत निवेदक गोष्ट सांगण्यासाठी सगळीकडे फिरते, पण कुणाला गोष्ट ऐकायला वेळ नसतो. शेवटी ती गोष्ट पोटातील एक गर्भ ऐकतो.
'जेव्हा तुम्ही खरंच ऐकता तेव्हा काय होते' या कथेत 'रामायणाच्या गोष्टी' ऐकल्याने एका असंस्कृत माणसात काय फरक पडला हे दाखवून दिले आहे.


रामानुजन यांनी ३ हजार गोष्टींमधुन शंभरएक गोष्टी निवडून या पुस्तकात संकलित केल्या आहेत.हे पुस्तक ज्यांना गोष्टी वाचायला आवडतात त्यांना खूपच आनंद देऊन जाईल.
मला यातल्या काही गोष्टी खुप आवडल्या. उदाहरणार्थ
The Jasmine Prince (जास्मिन राजपुत्र) :हि तामिळ गोष्ट आहे. यात एक राजपुत्र असतो जो जेव्हा हसत असे
तेव्हा त्याच्या हास्याला मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध येत असे. याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी एकदा दुसऱ्या एका राजाने त्याला आपल्या दरबारात बोलावले आणि हसण्यास सांगितले. पण तो मुद्दाम कसं हसणार? त्याने सांगितले मी असं खोटं खोटं हसू शकत नाही, जेव्हा मला खरच हसू येईल तेव्हाच माझे हास्य मोगऱ्याच्या वासाने सुगंधित होईल. राजाला वाटले  कि हा खोटेच सांगतो आहे याच्या हास्याला काही सुगंध-बिगंध नाही. राजाने रागावून राजपुत्राला कोठडीत डांबले. त्या राजाच्या राणीचे एका पांगळ्याशी सूत जुळलेले असते, रात्रीच्या वेळी ती त्याला भेटायला जाई. आणि ती जिथे त्याला भेटायला जाई ते ठिकाण जास्मिन राजपुत्राच्या कोठडीजवळ होते. एकदा जेव्हा तिला उशीर झाला तेव्हा पांगळ्याने रागावून तिला भरपूर मार दिला. तरी ती त्याला आणलेली पक्वान्ने खाऊ घालू लागली, त्यामुळे पश्चात्ताप होवून त्या पांगळ्याने तिला विचारले कि तूला मी एवढं मारलं तरी तुला राग का आला नाही. त्यावर ती म्हणाली कि मला तर तुम्ही मला मारलत ते अतिशय आवडलं. मला १४ लोक (तिन्ही लोक ) बघितल्याचं समाधान मिळालं. त्यांचं संभाषण बाजूच्या व्हरांड्यातला एक धोबी ऐकत होता. त्याचं एक गाढव हरवलं होतं. ते राणीचे उद्गार ऐकून तो मोठ्याने म्हणाला 'हिला १४ लोक(तिन्ही लोक) दिसले आहेत तर हिला माझं गाढव नक्कीच दिसलं असणार. हे ऐकून जास्मिन राजपुत्र हसायला लागला आणि मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे पसरला. राजालाही जेव्हा हे कळले तेव्हा त्याने जास्मिन राजपुत्राला कोठडीतून मुक्त केले आणि आता त्याच्या हास्याबद्धल विचारले, राजपुत्राने जेव्हा खरी हकीगत सांगितली तेव्हा त्याने जास्मिन राजपुत्राला मुक्त करून भेटींसहित त्याच्या प्रांताकडे  रवाना केले आणि राणीला शिक्षा केली.

तेनाली रामा (विकटकवी)विदुषक कसा झाला?
तेनाली रामा हा विजयनगर च्या कृष्णदेवराय या राजाच्या दरबारात विकटकवी(विदुषक) म्हणून होता. त्याआधी तो विकटकवी बनला कसा ते ह्या गोष्टीत सांगितले आहे.
एकदा तेनाली राम लहान असताना काली मंदिरात जातो आणि देवीला सांगतो कि तू मला दर्शन दे. देवी समोर येते, तिचे अनेक तोंडांचे रूप पाहून तो घाबरण्याऐवजी हसायला लागतो. ती हसण्याचे कारण विचारते तेव्हा तो निर्भयपने उत्तर देतो. देवी रागावते पण नंतर त्यांचे धैर्य बघून प्रसन्न होते आणि म्हणते कि तू विकटकवी होशील. (विकटकवी हा palindrome आहे. वि-क-ट-क-वि ) पण प्रसन्न झाल्याने असेही म्हणते कि तू राजदरबारातला विकटकवी होशील.

आणखी अश्याच खूप गोष्टी या पुस्तकात आहेत, त्यासाठी पुस्तक मूळातून वाचायला पाहिजे.

Wednesday 27 April 2016

वेळापत्रक

त्या प्रचंड उंच खांब असलेल्या निर्मनुष्य स्टेशनमधून तू आणि मी, दोघे पायऱ्या चढून निघालो. पायऱ्या पार करताच तू तुझा मार्ग बदललास. तुझा मार्ग माझ्या मार्गाच्या उलट दिशेला होता. संध्याकाळी परत इथेच भेटायचे असे सांगून तू निघून गेलास. मीही माझा मार्ग पकडला. पूर्ण दिवस घालवण्यासाठीच होता. पण ओढ होती ती फक्त संध्याकाळची. जेव्हा तू मला भेटशील त्याची. वेळ असातसा घालवून मी संध्याकाळी स्टेशनच्या दाराशी परतले तव्हा तू तिथे नव्हतास. तू आत असशील म्हणून मी स्टेशनच्या आत पाऊल टाकले तेव्हा बाहेरून स्टेशन वाटणारे ते आत स्टेशनसारखे नव्हतेच. मी एक एक पाऊल पुढे पुढे टाकत राहिले. मातीची टवके पडलेली खडबडीत भिंतींची एकमागून एक अशी एका रांगेत घरे होती बहुतेक. मला हे ती सर्व पार केल्यानंतर कळले. कारण जेव्हा मी एका घराचा दरवाजा ओलांडून आत गेले तेव्हा खोल्याच खोल्या होत्या त्यांना असलेली दारं या सगळ्या खोल्यांना जोडणारी, एका रेषेत. त्यातली शेवटची खोली ओलांडली कि दुसऱ्या घराचे दार समोर. अशी हि ट्रेनच घरांची आणि त्यांच्या एकमेकाला डब्यांप्रमाणे जोडणाऱ्या खोल्यांची. ही घरं पार करताना मला हळूहळू जाणवू लागलं कि खोल्यांची पातळी सखल होत आहे. पुढे पुढे जात होते तसं समजू लागलं कि घरं उतरणीवर आहेत. त्यातून शेवटी पार झाले तेव्हा मला जीना दिसला. तो मात्र स्टेशनच्या जीन्यासारखा होता. नेहमीचा होता तरी आता त्याचं रूप बरंच पालटलं होतं.

तिथे गर्दी जमली होती. जीन्यावरच कडेला लोकांनी छोटे ठेले मांडले होते. त्या ठेल्यावर गरम शेगडीवरच्या धगधगीत तव्यात लालभडक मसाल्याचे कोथंबीरीच्या पानांनी लगडलेले मोठे पापलेट तळले जात होते. जिन्याच्या बाजूला आता त्याला लागुनच मोठा हौद होता. त्या हौदात माणसे कपडे काढून पटापट उड्या घेत होती. मी बघत होते. तेव्हाच तू आलास. मी तुझ्याशी आतापर्यंत पाहिलेला हा सगळा अतर्क्य बदल तुला सांगणार तर तू तर क्षणाचा विचारही न करता हौदात उडीच मारलीस अंगावरच्या कपड्यानिशी, आणि एकदम दिसेनासा झालास. तुला शोधायला मी जीना उतरू लागले तर लांब कुठेतरी तू मला पोहताना दिसलास. पण आता तो हौद, हौद राहिलाच नव्हता. एक खूप मोठा तलाव होता तो. तलाव कि नदी कि समुद्र? कोण जाणे. पण दूरवर फक्त पाणीच पाणी होते. हे मला नव्यानेच कळले. आणि समोरचे हे जे काही आहे त्याच्या काठावर तू परत येण्याची मी वाट बघू लागले. तू अखेर काठावर आलास, पण तुझ्याकडे पोहण्याचे कपडे कुठून आले? हे मला कळलं नाही. एवढ्यातच मला इतका वेळ न दिसलेली एक महिला वॉचमन दिसली. तिने लांब झगा घातला होता आणि दोन्ही हात पाठीमागे बांधून ती संथपणे काठाशी येऱ्याझाऱ्या मारत होती. काठावर येताच तू तिला त्या तलावाविषयी विचारलंस. मला तुमचे बोलणे दुरून ऐकायला आले नाही पण ती जरुर तुझ्याशी रुक्षपणे बोलली असावी. तू चेहऱ्यावर काही न दाखवता माझ्याजवळ आलास तेव्हा मी तुला विचारलं. काय बोलली ती बाई तुला? काही वाईट बोलली का?. तू म्हणालास 'मी खूपच खुश झालो होतो, तिला विचारलं कि नेहमी असतो का हा तलाव म्हणून. तर ती एकदमच उखडली माझ्यावर आणि म्हणाली 'तिकडे वेळापत्रक लावलय ते बघा'

तू काठावर येत होतास तेव्हाच मला एक गुलाबी फुग्याने बनलेलं फुग्याचच मांजर दिसलं होतं. आता त्याला नजरेआड करून मी तुमचा संवाद ऐकत होते आणि तूर्तास मांजर बाजूला ठेवून मी तुझ्याशी बोलले. पण बोलण्याच्या नादात मांजर कुठे जात आहे ते बघायचे राहून गेले. ते आठवल्याने मी पुन्हा त्याला शोधू लागले. मांजर जिकडे दिसले होते तिकडे बघू लागले. ते अदृश्य झाले कि काय असेच मला वाटले. बहुदा तेही पोहायला पाण्यात उतरले असावे.

आपण जीन्याच्या पायऱ्या चढू लागलो. आता गर्दीही थोडी ओसरली होती. पण पायऱ्या संपता संपत नव्हत्या. एका एका पायरीवर कडेकडेने खूप सामानही दिसत होते. एक ट्रंक, तांदुळाचे पिंप, कडीचे दोन डबे, काळं भिडं, पितळेचा मोठा टोप , दोन स्टीलच्या बादल्या, कळशी, आणि प्लास्टिकची मोठी नारिंगी रंगाची घागर हे सर्व दोन पायऱ्यांवर होतं ते त्या पायऱ्या ओलांडल्या तर आणखीन सामान पुढच्या पायऱ्यांवर दिसू लागलं. तांदळाच्या गवताने बांधलेल्या मुड्याच मुड्या एकमेकांवर रचून ठेवल्या होत्या. नंतरच्या पायऱ्यांवर एक लांब बाकडे, घडवंची व त्यात ठेवलेल्या चीनी मातीच्या दोन मोठ्या बरण्या. पुढे जिन्याच्या कठड्याला दुमडून रेलून ठेवलेली लोखंडी कॉट, मेणकापड, दोन जुन्या गोडदया होत्या. एक मातीची चूलही निखळून काढून ठेवलेली होती , पण अजूनही तिच्यात विस्तव होता, आणि भिंतींवरच्या खुंट्या तिच्यात सरपण म्हणून रोवून ठेवलेल्या होत्या. या सर्वातून मार्ग काढत गेलो तर पुढे रिकामा देव्हारा, एक मोठी आणि दोन लहान पितळेच्या समया, माटवी, साखळीचा लामण दिवा, मोठी गंध उजळण्याची साहाण, पितांबर आणि दोन जुनाट शालींमध्ये बांधलेले काहीतरी बहुदा पोथ्या असाव्यात. ते सर्व एवढे पायऱ्या व्यापून राहिले होते कि ते ओलांडून जाता येईना. कुणाचे होते हे सर्व सामान आणि असे हे  सामान उघड्यावर टाकून कोण गेले होते? आम्ही खुप आवाज दिले, खूप हाका मारल्या कि 'हे सामान कुणाचे आहे?'. पण काहीच उत्तर आले नाही. जीन्याच्या वर बहुदा कोणीही नसावे, अजून बऱ्याच पायऱ्या होत्या आणि त्यांवर काळोख होता. त्या नक्की किती उरल्यात याचा नीटसा अंदाज लावणे देखील कठीणच होते. म्हणून आम्ही तिथून परत खाली उतरू लागलो. आता खालच्या पायऱ्यादेखील लांबच लांब होणार कि काय अशी भीती वाटली. पण तसे काही झाले नव्हते, त्या पायऱ्या तेवढ्याच होत्या. थोड्या वेळाने पायऱ्या संपवून आम्ही किनाऱ्याला आलो. दूरवर एक गुलाबी टिपका नाचत होता. म्हणून तिकडे नजर केली हळूहळू तो ठिपका मोठा होऊ लागला. तेव्हा समजले हि हे तर मगाचचे गुलाबी फुग्याचे मांजर आहे. डूगुडूगु धावत ते आमच्याजवळच येत होते.

ते आले आणि एकदम बोलायला लागले 'मी शुक्रवार मांजर आहे, मी दर शुक्रवारीच इथे असते, कारण हे पाणी मोठे वस्ताद आहे, फक्त शुक्रवारीच त्यात मासे सापडतात', आम्ही दिग्मुढासारखे त्याच्या तोंडाकडेच बघायला लागलो. तेव्हा ते म्हणाले 'घाबरू नका, मी तुम्हाला काहीही इजा करणार नाहीये. मी एक साधंच मांजर आहे, जादुबिदू काही नाही. मी फक्त शुक्रवारीच बोलू शकते आणि कुणालाच आजपर्यंत हे माहित नाही कि मांजरे या पाण्याच्या जवळच्या किनाऱ्याजवळ फक्त शुक्रवारी मनुष्यावाणी बोलू शकतात. एरव्ही नाही.'
'तुला माहित आहे का ते जीन्यावरचं सामान कुणाचं आहे ते? ते एवढं अस्ताव्यस्त पडलेलं आहे कि ते ओलांडूनही जाता येत नाही.'

'नाही, मला त्या घराबद्धल काहीच माहित नाही.' असं म्हणून ते मांजर चालू लागले. 'अरे थांब असे म्हणून त्याच्या मागे गेलो तर ते जीन्यावर ट्णाट्ण उड्या मारीत काळोखात पसार झाले. पण जाता जाता त्याने म्हटलेल्या वाक्यातून 'घर' शब्द माझ्या कानात राहिला. 'त्याला कसं माहित कि हे सामान एका घरातलं होतं ते?'  तितक्यात मघाचची ती महिला वॉचमन जिन्याच्या पायथ्याशी परत आली होती. तिला मी विचारले 'अहो, हे सामान कुणाचं आहे? मघाशी इथे एक गुलाबी फुग्याचं मांजर होतं, तुम्ही पाहिलं का ते? आणि ते बोललंही आमच्याशी. तुम्हाला माहित आहे का ते कुठे गेलं ते? आणि इथेच असतं का ते?' त्यावर तिने आमच्या दोघांवर एक रुक्ष कटाक्ष टाकला आणि म्हणाली 'तिकडे वेळापत्रक लावलय ते बघा'. यावेळेला मात्र तिच्या रुक्षतेची दाद न देता मी म्हणाले 'तिकडे म्हणजे कुठे?'
'तिकडे' तिने बोट दाखवले. त्या दिशेने पहिले तर तो भाग जिन्याच्या खाली अंधारातून जात होता. 'इथून आत?'  तिथल्या अंधाराकडे साशंकतेने बघत मी विचारले.
'हो' मग आमच्याकडे थोडावेळ थांबून बघत तिने पहिल्यांदाच वेगळे काहीतरी म्हटले. 'पुढे लाईट आहेत, इथलाच गेलाय'
'आणि इथून बाहेर कसं पडायचं?' ती आणखीही काही बोलू शकते असा विश्वास बाळगून मी पुन्हा विचारलं.
'तिकडे वेळापत्रक लावलय तिथेच ते बघा' परत आपलं नेहमीचं निर्वाणीचं बोलून ती तिथून चालती झाली.
आम्ही त्या जीन्याखालच्या अंधारातून पुढे गेलो. बराच वेळानंतर हळू हळू मंद वास येऊ लागला. बकुळीच्या फुलांचा, सुरुंगीच्या फुलांचा आणि झाडांच्या जुनाट पानांचा देखील. अंधारात आजूबाजूला काहीच दिसत नव्हते. हळूहळू उजाडते तसं समोर काहीतरी अस्पष्ट दिसू लागलं ती एक पायवाट होती. कुठे जात होती आणि आजूबाजूला काय होतं ते अजून स्पष्ट होईना. त्या पायवाटेवरून आम्ही चालू लागलो. बाजूला एक डबकं होतं. त्याच्या कडेला एक मातकट पांढरे कपडे घातलेला अत्यंत कृश म्हातारा डबक्याकडे ध्यान लावून बसला होता.
आम्ही त्याच्या जवळ गेलो आणि त्याला हाक मारली. तसा तो आमची आधीपासून चाहूल असल्यासारखा आमच्याकडे पाहू लागला. आणि परत नजर समोर करून डबक्याकडे पाहू लागला. ते डबकं नसून जमिनीलगतची कठडा नसलेली विहीर होती, तुडुंब भरलेली. काळ्याशार पाण्याची. आजूबाजूचा परिसर झाडांनी वेढलेला होता. हे सर्व काय आहे आणि त्यातून कसे बाहेर पडायचे ते आम्हाला कळेना आता हा माणूसच काय ती मदत करेल असं ठरवून मी त्याला विचारले 'आजोबा, 'आम्ही चुकलो आहोत., आम्हाला …. '
वाक्य पुरे व्हायच्या आधीच तो म्हणाला 'हो ते खरेच. तुम्ही चुकला आहात'
मी म्हटलं 'ते वेळापत्रक कुठे आहे ते आम्हाला सांगाल काय?'
'हो, वेळापत्रक. त्या वॉचमनने आम्हाला सांगितलं कि वेळापत्रकाच्या जागी तुम्हाला इथुन कसं बाहेर पडायचं ते कळेल'
'ती असं स्पष्ट म्हणाली नसेल'
'अं…. हो, तुमचं बरोबर आहे, ती स्पष्ट असं काही म्हणालीच नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 'ते वेळापत्रक लावलाय तिथे ते बघा' असंच दिलं तिने.
'मला माहित आहे. मीही वेळापत्रकच शोधतोय. मलाही इथून बाहेर पडायचंय'
'तुम्ही इथे कधीपासून आलात? आणि तुम्हाला ते बोलणारं मांजर भेटलं होतं का? आणि जिन्यावर खूप पसरलेलं सामान तुम्ही सोडून आलात का'
'तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. यापुढे प्रश्न विचारायचे नाहीत. तर स्वतःचा प्रश्न स्वतः शोधून काढायचा आणि त्याचं उत्तर हि स्वतःच शोधून काढायचं. मगच वेळापत्रकापर्यंत पोचता येईल. पण लक्षात ठेवा.  प्रश्न आणि उत्तर फक्त तुमचंच असलं पाहिजे.'
'असा प्रश्न तर सोपा विचारून उत्तर लगेच…'
'हा-हा-हा थांबा, तुम्ही असा सोपा प्रश्न स्वतःला विचारा आणि उत्तर द्या बघू आत्ता'
'आत्ता?'
'हो आत्ताच्या आत्ता बघा, मनातल्या मनात पण चालेल '
'हम्म… तिने मनातल्या मनात स्वतःचे नाव स्वतःलाच विचारले आणि स्वतः स्वतःचेच नाव सांगितले'
'काही झालं ? काही झालं? असं वेळापत्रक दिसत नसतं सोपे प्रश्न आणि उत्तराने, त्याला प्रश्नहि मोठा हवा न सुटण्यासारखा आणि उत्तरहि त्याला शोभेसंच आणि स्वतःचंच शोधता आलं पाहिजे'
'असा प्रश्न कसा शोधू ?'
'आता हाच उपाय आहे. प्रश्न आणि उत्तराच्या जोड्या लावत बसा तुम्ही , माझ्यासारखेच'
'तुम्ही कधीपासून शोधत आहात प्रश्न आणि उत्तर?'
'मी लहान होतो तेव्हापासून'
'तेव्हापासून इथेच आहात?'
'हो, पण आता मला प्रश्न तर सापडला आहे, त्याचे उत्तर अजून सापडलं नाही. पण असे म्हणायला हरकत नाही कि मी अर्धा रस्ता पार केला आहे.'
'प्रश्न काय आहे तुमचा? मी तुम्हाला…'
'छे छे … मी म्हटलं ना, आपलं उत्तर आपणंच शोधलं पाहिजे म्हणून?… तुम्ही उत्तर देऊ नाही शकत… हा, पण तुम्हाला पाहिजे तर प्रश्न तुम्हाला सांगतो.
लहानपणीचा प्रसंग आहे माझ्या आयुष्यातला. घरी उंदीर खूप आमच्या. तेव्हा पिंजरा लावत उंदरासाठी.  मग उंदराच्या  पिंजऱ्यात…उंदीर बिचारा वाट बघत बंदिस्त. तिकडे आई कडकडीत गरम पाणी करून पातेल्याची धार त्याच्यावर ओतत असे. त्यावेळेला एक दोनदा मला चुकून किंवा कुतूहल वाटून मीच बघितलं कि काय किंवा माझं नशीब असल्याने ते दृश्य दिसलं. उंदीर चीss चीss चित्कार करून त्या गरम पाण्याने कडकडून भाजून मरून जायचा. तो पिंजऱ्यात किलकिल्या डोळ्यांनी बसलेला असायचा तेव्हा त्याच्या मरणासाठी जी त्याची शेवटची आंघोळ असेल, त्यासाठी पाणी तापवलं जात असे. आपल्यासोबत काय होणार हे त्या बिचाऱ्याला ठाऊक नसे. सर्वांना प्रेमाने वागवणारी, आपल्याला जर खरचटलं तर धावून येणारी प्रेमळ आई एवढं क्रूर काम कसं करू शकते?
' हाच माझा प्रश्न आहे'
'सोपं आहे, अहो ती तुमची आई आहे ती तुमच्याशी प्रेमळच असणार , उंदीर म्हणजे त्रासदायक. त्याला मारलेच पाहिजे ना?'
'मी म्हटलं ना? स्वतःचे उत्तर स्वतः शोधले पाहिजे, ते हे. अहो हे तुम्हाला वाटते, मला नाही वाटत तसे. मी मला खरं वाटेल, पटेल असं उत्तर मी शोधतो आहे. जसा प्रश्न माझा तसं उत्तरहि माझं स्वःतचं स्वतःला पटेल असंच असलं पाहिजे नाही का?, जाऊ दे तुम्हाला कळेलच ते काही काळाने, तुम्ही आता कामाला लागा'
'म्हणजे?'
'तुम्ही आपापला प्रश्न आणि त्याचं स्वतःचं स्वतःला पटेल असं उत्तर शोधा. आणि चलाखी काहीच करू शकत नाही हो यात, कारण जोपर्यंत ते प्रश्न आणि उत्तर एकमेकाला भेटणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला वेळापत्रक मिळणार नाही, स्वतःचा प्रश्न काय आणि त्याला स्वतःचे उत्तर काय हे शोधणेच आता तुमच्या हातात आहे.'

Monday 18 April 2016

तयारी

रक्तात शिरलाय कर्क
शरीरात नांदतोय नर्क
अश्यावेळी थोडे सेवेत गर्क
बाकीचे तर्क आणि वितर्क

लघवीचे भांडे
संडाससाठी भांडे
पिण्याच्या पाण्याचे भांडे

आसमंत सारा टाळण्या संसर्ग
धुवून पुसून लक्ख
वास्तव्य तेवढे टिकवून राही
घुबड एक जख्ख

गळलेले केस
मुळापासून कापलेले केस, खाजगी केस
फार थोडे उगवते केस

डोळ्यामध्ये रक्त
अंगात दुष्काळ
डोळ्यांभवती काळं
सभोवती काळ

वठलेले वक्ष
मृत्यूचेच भक्ष्य
इंद्रियाची आस
मरो ते इंद्रिय

सर्वांग भरून
राहिला कोण ताप
वेदना मोजण्या
उरले न माप

यंत्र मोजती श्वास
श्वास मोजती श्वास
तिला मात्र ध्यास
वापसीचा

नात्यातलं रक्त
रक्तातलं नातं
सरतेशेवटी
काहीच चालेना

आला तो दिवस
झाला बंद श्वास
उरला दिवस
तयारीचा

-विवेकानंद सामंत
पुणे , १८-४-२०१६


भांडण

भांडण आहे एक नाटक
त्याला दोन नट लागतात
कारण लागत नाही

एकटाच नट असेल तर
एखादा प्रेक्षक तरी लागतो
वेळकाळ लागत नाही

सेटवरच्या  काळ्य़ाकुट्ट भिंतींशी
आणि समोरचा अंधार बघत,
भांडता येत नाही

(नाटक संपल्यावर) उभारलेल्या
खोट्या जमिनीवर, गलितगात्र होवून
पडता येत नाही

सेट नाही, दुसरा नट नाही , प्रेक्षकही नाही
तरीही हे नाटक स्वतःचे स्वतःशीच रंगू शकते

पण त्यात धोका आहे
कधीही ते भंगू शकते

पण या प्रकारच्या नाटकात 
पीएच. डी मात्र अखेर मिळू शकते
मला मिळालीय

कशी ते सांगत नाही  कारण पेन संपलय
यु सी ऑल द पेन इज ओव्हर

माईची अखेर

उन्हाने तकतकलेल्या त्या एस. टी. मधून तीन डोकी बाहेर पडली. माई, वहिनी आणि यमी. यमी हि माई आणि वहिनीला सोबत म्हणून आलेली, आता पुरती कंटाळलेली. तिघंही उन्हाच्या तलखीने हैराण झाले होते. हातातल्या पिशव्या सांभाळत दोघीजणी झपझप चालू लागल्या, माई त्यांच्यामागे  तुरुतुरु चालत येत होती.  समोरच्या खोपटवजा हॉटेल मध्ये तिघीजणी शिरल्या आणि पिशव्या ठेवून बाकड्यावर ऐसपैस बसल्या. हॉटेलात शुकशुकाटच होता. दुपारच्या तीन वाजता गावातले कोण येतेय मरायला. हॉटेलमालकही कुठे दिसत नव्हता. थोडावेळ तिघी तश्याच बसून राहिल्या. बाहेरून कुणीतरी आवाज दिल्यासारखं केलं तसा एक इसम मागच्या बाजूने खोपटात आला.
"काय आहे गरम? भजी, वडा…"
"आसा".
"३ प्लेट  आणा".
तो लगेचच वळला आणि काळ्य़ाकुट्ट कढईबाजूच्या  उंच टेबलावर ठेवलेल्या परातीततले वडे प्लेट मध्ये काढू लागला, वहिनी पुन्हा त्याला म्हणाली
'आणि पिऊक पाणी देवा, कोल्ड्रिंक आसा?'
हॉटेलवाल्याने चटकन बाजूच्या खोक्यातून एक बाटली काढली व ती दाखवत म्हणाला
'ह्या असा'
'माझा वैगेरे नाही का त्याच्याकडे?' यमी ने वहिनीला विचारले. तेच ऐकून तो म्हणाला:
'नाय बाकीची संपलीहत. ह्याच गोपुरी मँगो म्हणान हा ताच रवलाहा, देव?'
'देवा, आणि थंड देवा'.
त्याने लेगच  आणून दिलेल्या प्लेटमधून वड्याचे तुकडे तोडून माई भरभर खाऊ लागली. मधेच म्हणाली, 'वडो गरम नाय'. तिच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. तिघेही गपचूप खात होते. पोटातले कावळे ओरडून केव्हाचे गपगार झाले होते. एस. टी. तून  येताना रस्त्यात, बरोबर जेवणाच्या वेळी एस. टी. वाल्याने रणरणीत उन्हात, एकही झाड आजूबाजूला नसलेल्या अत्यंत भंगार खानावळीसमोर  गाडी उभी केली होती. तिथले गलिच्छ वातावरण, उघड्यावरच असलेल्या बाकड्यावर बसून जेवणारे ड्राइव्हर बघून यमीने खाली उतरण्यास उत्सुकता दाखवली नव्हती. पण शेवटी भूक अनावर होवून खाली उतरून तिघांनी दोन मिसळपाव मागवून उभ्याउभ्याच खाल्ले, बाकड्यावर एवढी गर्दी होती कि जेमतेम माईला बसवता आले. मिसळपाव कसला, नुसते लाल तिखटमिठाचे फरसाण मारलेले पाणी होते ते. कसेबसे त्यांनी चार घास पोटात ढकलले. माई मात्र ते तिखट पाणी त्यात भिजलेल्या शेवासकट भुरके मारून खात होती.
आत्ताही भज्यांचे तुकडे माई एकामागोमाग एक खात होती. अजून एक बशी मागवावी का असा विचार यमी च्या मनात आला पण वहिनीकडे बघून ती गप्प बसली.

थंडगार गोपुरी मँगोने जीव थोडा शांत झाला होता. पैसे देऊन तिघं बाहेर पडली, हॉटेलसमोरच्या रस्त्यावर  एकही वाहन नव्हते. बराच वेळ थांबल्यावर हॉटेलवाला परत डोकावला.
'खय जावचा आसा तुमका?'
'भरडवाडीक'.
'रिक्षा भेटाची नाय तुमका या उनाच्या वेळेक'.
'हय तर आसतत मा ओ रिक्षा, मी गेल्लय हैसरसून कितीवेळा'
'आसतत, पण कालच बाजाराचो दिवस झालो आणि ह्यो उन्हाळो बघलास, कोणयेक येवचा नाय इतक्याचा '
'व्हया तर एक रिक्षावालो रवता मागच्या अवाटात, पण तो सांगीत ता भाडा देउचा लागताला'
वहिनी आणि यमी त्याच्या तोंडाकडे बघत राहिल्या. 
'रवांदे, आम्ही बघतव. मिळात हयसर.'
हॉटेलवाला काय समजायचं ते समजला आणि आत निघून गेला. थोडावेळ तिघं बाहेरच्या झाडाखालच्या बाकड्यावर बसले. एव्हाना चार वाजून गेले होते, उन्हं तिरपी होत होती.

रिक्षेसारखा आवाज आला म्हणून झटकन उठून यमी उभी राहिली, रिक्षा जवळ आली तसा तिने हात दाखवला.
'भरडवाडी?' मुंबईच्या सराईत रिक्षा प्रवाश्याप्रमाणे तिने विचारले.
रिक्षावाल्याने होकार भरला तशी माई टुण्णकन आत जाऊन बसली. यमीने सामानाच्या पिशव्या आणल्या. माई एका कडेला बसलेली पाहून ती माईला म्हणाली
'आजी तू मध्ये बस. मी कडेला बसते, सामानासकट तुला जमणार नाही तिथे.
'मदी कित्या, हयसर बसतय मी ?

'ओ! मदी बसा बघया, थय बसान काय पडाचा हा?, त्या बाजून गाडीये येतत. आमी काय मुद्दाम संगतव, म्हाताऱ्या माणसान जीव सांभाळूक होयो त कळणा नाय'.  वहिनीने रिक्षावाल्याकडे बघत निर्वाणीचा सूर लावला.

'काय्येक  पडाक होवचा नाय माका' माईने सुद्धा नापसंती दर्शवली, पण तरीही ती खाली उतरली. यमी आत सामान घेऊन बसली तशी थोड्या नाराजीनेच माई आत गेली.
रिक्षावाला  स्वतःशीच हसला. रिक्षा चालू केली आणि मागे उद्देशून म्हणाला
'आजी, घट बस हा, काय आसा म्हाताऱ्या माणसाक म्हातारा म्हटला कि राग येता'
'तर ओ काय, आमी  चांगल्यासाठी सांगतव ता दिसणाच नाय' वहिनीने दुजोरा दिला.'
'खैसून, मुंबैसून इलास?'
'नाय, पुण्यासून'.
'तरी म्हटला, मुंबैचे गाडीये आता खैचे?, 'पाठल्यादारकार बामनाथय काय ?'
'नाय आम्ही त्यांचे वारशी, हि माई, भाईं होते म्हायत आसत ?. आणि हि माझी मुलगी मुंबैक असता'
'मग पुण्याक कोण असता? बऱ्याच वर्षान इलास?'
'झाली दोन वर्षा येऊन, हि माई हैसरच रवा, हल्ली एकटेक ठेवचा बंद केला तिका. पुण्याक माझो मुलगो रवता.'

रिक्षा भरडवाडीच्या दिशेने धावू लागली. अर्ध्या तासाचे अंतर, पण वाहन नसल्याने एवढा उशीर झाला होता. सहाच्या दरम्यान जुनाट घरांचा झाडांमागे लपलेला समूह दृष्टीपथात येऊ लागला तसा रिक्षाचा वेग मंदावला. पाणंदितून बाहेर पडून शेताचा कोपरा लागला तशी कोपऱ्याच्या लगतच नव्या केलेल्या तांबड्या धुळीच्या रस्त्यावर रिक्षा थांबली. वहिनी पैसे द्यायला उतरली, यमीने दुसऱ्या बाजूने उतरून समान काढले. रिक्षा वळली आणि समान उचलून वहिनी आणि यमी चालू लागल्या तर माई कोपऱ्याच्या मेरेवरून तुरुतुरु चालत घराकडे पोचली सुद्धा होती आणि एव्हाना घराला वळसा घालून ती पलीकडे दिसेनाशी झाली होती. ती प्रेमाआतेच्या घराकडे गेली हे त्यांना सांगण्याची गरज नव्हती. 

पलीकडे आतेचं घर होतं. माई आता घरात दिवा लावण्याआधी तर परतण्याची चिन्ह दिसत नव्हती. पायऱ्या चढून व्हरांड्यातील दाराचे कुलूप उघडून दोघी मधल्या खोलीत आल्या. आत मधल्या खोलीच्या एका टोकाला असलेली देवखोली काळोखात बुडून गेली होती. भरून राहिलेल्या शांततेत भिंती गपगार उभ्या होत्या. लादी पायांना थंडगार लागत होती. हाताने चाचपून वहिनीने दिव्याचे बटण दाबले.
'लाईट गेलेत बहुतेक, किवा हा बल्ब गेला असेल'
यमीने बॅटरी काढली, बॅटरीच्या झोतात मधल्या खोलीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या जीन्याजवळच्या दाराचे कुलूप काढले, तिथलं बटण लावलं.
'आत्ताच हिला जायला हवं होतं का?'
'अगं, इथे लाईट सर्रास जातेच'
'नाही, लाईट नाही म्हणत आहे मी. हि माई, आता किर्र काळोखात कोण जाणार तिला बोलवायला?'
'असू दे ग , इतक्या दिवसानंतर आली आहे. आते म्हणजे मुलगीसारखीच मानलेली तिची. दुपारी चुलीवर भात शिजवून कुळस्वामीला नैवद्य दाखवला आणि आंब्याच्या झाडाच्या खोबणीत पानावर कावळ्याला भात ठेवला कि उरलेला भात माई आतेकडून आलेल्या  वाटीभर आमटी, कधी एखादा मासा, नाहीतर भाजी- भाकरीवर जेवायची, आतेच्या भाच्याच तर यायच्या एवढ्या मोठ्या घरात रात्रीच्या सोबतीला'
'मी नवीन आल्यासारखं काय सांगतेस, मला माहित आहे सगळं'

बराच वेळ निघून गेला. लाईट आणि माई दोन्हीही अजून आल्या नव्हत्या. खोराणातले जळमटलेले रॉकेलचे दिवे पुसून लावले गेले, सोबत आणलेल्या चार मेणबत्त्याही लावल्या गेल्या. वहिनीने चूल साफ करून भाताचं आधण ठेवलं आणि दुसऱ्या पातेल्यात पीठल्याची तयारी केली. यमीने घडवंची साफ करून आणलेलं समान पत्रांच्या डब्यात टाकलं. आड  केलेल्या दाराची करकर ऐकू आली. माई आणि आते मधल्या खोलीतून आत आल्या.
'ह्या घेवन इलय वहिनी, यमीक आवडतत मा माशे'
दुधाची किटली आणि आमटीचे पातेलं आतेने वहिनीसमोर ठेवलं आणि बाजूलाच उभी राहिली.
'काय गो यमी बरा मां?'
'होय ता इला आमका सोबत म्हनान, गुरवारी लघुरुद्र करतलव, साफसफाई करुक आधी इलव. शनिवारी निघतलव'
'माई रवतली मा'
वहिनीने डोळे बारीक केले आणि काहीच बोलली नाही. माई घडवंचीवरचा कापसाचा डबा घेऊन देवखोलीत पोहोचली तेव्हा तिने सुरुवात केली.
'कशी रवतली सांगा तुम्हीच, मागच्या खेपेक फोन इल्लो, कशीतरीच करता म्हणान, जिभ अर्धी भायर, शुद्ध नाय. अशी करी व्हती म्हणान विनय येवन घेऊन गेलो. डॉक्टर दाखवले तर सगळा नॉर्मल. आता मेंदूचो प्रोब्लेम हा तेका कधीपासून गोळीयो आसत. हि हयसर घेयच नाय. घोटीयेत घालून ठेवी पातळाच्या आणि इसरान जाय. मग असाच होताला मा'
'देखरेख करुक कोणतरी व्हया, तुम्ही गुराधोरा मागसून, खय बघतलास? बरा घेतलय म्हणान सांगुची तयारी, लक्षात काय रवणा नाय'
'होय ता खरा, आता पोरांची लग्ना पण झाली, मी एकटा, नायतरी खंयखंय बघतलय'.

माई दिवा लावून चुलीपाशी मांजराप्रमाणे येउन बसली. आते इकडच्या तिकडच्या गोष्टी करून निघून गेली.

'जुवेकारीण इली गे! वायच चा ठेवतं?'.
'थांबा हा जरा, इली तर बसात, काय घोड्यारसून इलीहा काय?'
माई बाहेर गेली.
हा बस गे बस. हि कोण इलिहा वांगडा? ओळखुक नाय. बस गे तू पण.
हि राण्यांची गे. ता तुमचा दुरमुऱ्याचा श्यात ज्यांका दिल्लास तेतुर्लीच.

जुवेकारीण आत वहिनीला हाक मारायला चुलीपाशी आली. वहिनीने एव्हाना चहा टाकला होता. समोर यमी खोबरे कातत होती.
'अरे, ह्या पण इल्लाहा'
'होय माका मदतीक'
जुवेकरणीसमोर वहिनीने चहा बटर ठेवला, ती तिथेच फतकल मारून बसली.
'काय माशे आणलास?'
'नाय गे , खैसून?'
मग जुवेकरीण यमीकडे बघून म्हणाली 'तुझे बाबा किती माशे आणीत गो हैसर इले काय, आणि मी आस्लाय काय माका जेऊक सांगीत. इतके माशे खाल्लय मी तुझे बाबा होते तेवा, आणि भज्याची एक पुडी आणीत पेशल माका मी कामाक असलय काय'
तिच्या डोळ्यात पटकन पाणी आले. ते चटकन पुसून ती चहात बटर बुडवून खाऊ लागली.
'व्हैते गादिये उन्हाक ठेवशीत गे?, आणि त्यो चादरी पण'
वहिनीने जुवेकरणीला सांगितले आणि तिच्या बरोबर आलेल्या त्या राणेबाईसाठी पण चहा घेऊन जायला सांगितले. कातण्याचे काम संपताच यमी बाहेर आली तेव्हा माईच्या त्या आजच उपटलेल्या गावातल्या अनोळखी बाईशी गप्पा एकदम रंगात आल्या होत्या, माईदेखील वेगळ्याच रंगात आली होती.
'मी… , मी केलाय ह्या सगळा, समाजलात मा, माजे वडील मोठे शिक्षणाचे इनिस्पेटर, त्यानी हेंका मार्गी लावल्यानी, मी हयसर रवलय म्हणान घर रवलहा ह्या, चंदनासारख्या झिजलय मी, गिरणीसारख्या फिरलंय'
'आता किती दिवस आसास?'
असे त्या बाईनी विचारल्यावर मग त्या बाईच्या अगदी हाताला हात लावून जुनी मैत्रीण असल्यासारखी तिला म्हणाली 'आता बघा, मी हयसरच रवतलय. अहो याच माझा घर. मीच सांभाळलय , समाजलात मा, गिरिणीसारख्या राबलय मी या घरासाठी हो. माझे वडील ! त्यांनी माका सांगल्यानी, देवाक सोडून जमाचा नाय, दिवो लागक होयो'
चंदनासारख्या. . . '

यमीने कानाडोळा केला तरी शब्द तिच्या कानावर पडतच होते. आत येऊन ती वहिनीला म्हणाली.
'आजीचं काय इथे येऊन डोकं फिरलंय काय?, तिला किती समजावलं तरी बडबड चालूच आहे'
'जाऊ दे, तू तुझं काम कर'. यमी मुकाट्याने बाजूला झाली. माईची वाक्यं कानावर पडतच होती.
थोड्या वेळाने वहिनीने रिकामे पातेले माईच्या समोर ठेवले.
'जावा जरा दुध घेवन येवा, यमी येतला तुमच्याबरोबर'
'आता?'
'होय, दुध संपाक इला, सकाळपास्ना इतके चा झाले ओ, काय करतले' वहिनी थोडी कातावूनच म्हणाली.
राणेबाईने सहानभूतीने बघितल्यासारखे केले. तिने बुड हलवले.
'बरा येतंय मी, बायोकडे जावचा आसा'.
जुवेकरीण उन्हात चादरी सुकवत बसली होती. तिला माहित होते कि आज आपल्याला इथे जेवण आहे. या घराचा आणि तिचा अलिखित करारच होता तो. जुवेकरीण आली आणि न जेवता गेली असे कधीही झाले नव्हते. तिला काही ना काही काम मिळायचे आणि जेवेपर्यंत तिची वर्णी लागायची.

रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा माईने टकळी सुरु केली.
'गे , मी काय म्हणतय?'
वहिनी आवराआवर करीत होती, यमी तिला मदत करत होती. वहिनीने यमीला तोंडावर बोट ठेऊन खुणावले.
'मी काय म्हणतय, मी करलकरणीक निरोप पाठवलाय उद्या येऊक.' वहिनीने तरीही लक्ष दिले नाही.
'प्रेमा कडसून तिका पाचशे रुपये पाठवलय जुवेकारणीच्या हातातसून'
आता मात्र यमीला राहवले नाही 'कशाला पण? कशाला पैसे दिलेस तू?'
'२ कुडू तांदूळ आणूक व्हये मा, लागतले, आणि माका किलोभर डाळ घेऊन देवा हा, ज्यास्त नको, देवाक आपला दाखवसाठी, आणि… '
'कश्यासाठी हे सगळं?' यमीला माई काय सांगणार हे माहित होतं, तिला फक्त ते माईच्या तोंडून ऐकायचं होतं.
'गो… ' आढेवेढे घेत , अंदाज घेत, आपल्याला काही माहित नाही कि हे लोक काय विचार करताहेत असा अविर्भाव करत माई  म्हणाली 'आता रवाक व्हया हैसर'
'कुणाला ?' यमीचा पारा चढला.
माई देखील वस्ताद होती. आपण त्या गावचेच नाही असे तोंड करून म्हणाली 'माका'
'आजी, बास हा बास ! , आता पुन्हा सुरु करू नको'
पण माईला गप्प राहायचे नव्हते. 'मी रवतालय, माका रवाचा असा'
यमी ताठ चेहऱ्याने आजीकडे आणि वहिनीकडे पाहू लागली. माईचे चालूच होते, डोळे मोठे करून हात वारे करत लहान मुलाला समजावतात तसे ती बोलू लागली.
'तुका नाय कळाचा,  घर बघूचा लागता, दिवो लगाक व्हयो, कुळस्वामी माझ्या  स्वप्नात येता'
'आणि तू लावणार ? तुला काय वाटतं सगळं तुझ्यामुळे चाललय इथे? तुला माहित तरी आहे कशी राहतेस इथे ती ? मागच्यावेळेला डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती.'
'कायतरी बोला नको. माका काय्य्क झाला नाय असा. उगाच तुमी बोलतास. तुमका बघवणा नाय मी हय रवलला. माझा मी आसय समर्थ'
'हो? समर्थ आहेस तू स्वतःची, पाच पैश्याची जबाबदारी नाही, आज वीस वर्ष तुझ्या गोळ्यांचे पैसे बाबा भरायचे. ओटवणेकरचं इतकी वर्ष बिल बाबा भरत. लाईट, घरपट्टी, सारा, दस्त सगळं, आणि तू समर्थ?'
'मी जातंय कसा आतेकडे, माका नाय बोलाचा'
'आजी, थांब , किती वेळा समजवायचं तुला? कुणी कुणी सांगायचं, तू ऐकणार नाहीस?'
'नाय,  माका काय्येक सांगू नका', माई उठली आणि दाराकडे गेली.
'अरे! तू ऐकणार नाहीस तर. बघ हा आजी, आता जर तू गेलीस तर मी बोलणार नाही कधीच तुझ्याशी, यापुढे एक शब्दहि'
'हा नको बोलू' 'माका काय ' काहीतरी पुटपुटत माई दरवाजा उघडून बाहेर गेली. तशीच चप्पल घालून अंधारात बाहेर पडली.
वहिनी म्हणाली 'ओ बॅटरी तरी घेवन जावा, जा ग घेऊन बॅटरी'
'काही नको देउस तिला आणि मी मुळीच जाणार नाही, जाऊ दे धडपडत तिला, मोठी समर्थ समजते स्वतःला '. यमी म्हणायच्या जवळ जवळ माई आतेच्या घरी पोचली सुद्धा होती. वहिनीने डोक्याला हात लावला.
'यमी, कशाला बोललीस तू तिला? ऐकून घ्यायचं काय बोलते ते. बोलेल तिकडे असेल, तिला इथे ठेवणार नाही आता हे तिलाही माहित आहे, उगाच जीव रमवते आपली काहीतरी वादाला कारण काढून '
'नाही आई, तुला कळत कसं नाही? तिला खरंच इथे राहायचं आहे'.
'ता म्हायत आसा, म्हणान काय झाला?'
'मग राहू दे इथे तिला, काय होईल ते होईल. तिला काळजी आहे? तिला आपण काळजी करतो त्याची किंमत आहे? तिला आपलं तेच खरं करायचं आहे'
'इथे तिला काही झालं तर लोक काय म्हणतील?, यांच्यानंतर बघितलं नाही म्हणतील'
'लोकं गेली खड्ड्यात'
'विनय मागच्या वेळी आला होता ना तेव्हा'
'ते माहित आहे मला, परत कशाला सांगतेस?
'नाही त्याआधी आला होता तेव्हा संध्याकाळच्यावेळी, तर माई आत चुलीकडे धडपडत होती. काय करत होती तर म्हणे चहा. तोंडाला सगळं काळं. पातळाला सगळीकडे काळं. विनयने दुसरं पातळ शोधण्यासाठी तिला विचारलं तर मुडीवरच्या टोपलीत ढीगभर पातळं अस्ताव्यस्त पडली होती. त्यातले एक काढले तर त्यातून ३-४ मांजरं झोपलेली ती बाहेर पडली. आता काय म्हणावं याला?'
तेवढ्यात दारावर हाक आली, आतेकडचा गडी आला होता, आजीची कायमचुर्ण आणि तेलाची बाटली न्यायला.

यमीला थोडे वाईट वाटले 'आजीचं काय हे नशीब. आणि एकंदरीत माणसाचंच? त्याला जिथे राहायचं आहे तिथे राहण्याचं देखील स्वातंत्र्य असू नये?'
आपण तिला उगाचच रागावलो याची तिला आता टोचणी लागून राहिली. रात्री बराच वेळ तिला झोप लागली नाही.

सकाळी वहिनीने देवखोलीची साफसफाई सुरु केली. यमी दुध तापवत होती, मनात आजीबद्धल विचार चालू होते. आजी काहीही केले तरी तेच वागणार. तिला मागच्याच महिन्यातली हकीगत आठवली , वहिनीने बाहेर चार फेऱ्या मारायला सांगितल्या म्हणून आजी बिल्डींगच्या खाली गेली, तर गेट बाहेरच्या दुकानात जाऊन
एक किलो शेव आणलन, त्या माणसांनी म्हातारीला बघितलं होतं का काय कुणास ठाऊक तिने काय सांगितलं पण त्यांनी उधारीवर एक किलो शेवाची पुडी दिली तशी घेऊन आली घरी, आणि शेवाचे पैसे द्यायला सांगितले.  वहिनीने विचारलंही तेव्हा म्हणाली, 'आता जावचा झाला नाय घराक, भरारा जातलय'
कोण इथे आणून सोडणार होतं तिला? कुणीच नाही. आपणच आपलं ठरवत बसायचं, मनातल्या मनात.  बिल्डींगमधल्या गोगटेबाईंना काहीबाही सांगितलंन, त्यांना दोन मुली, तर हिने त्यांना सांगितलं गावच्या महा राजांकडे जाण्याबद्धल, मुलगा होण्यासाठी. त्या बाई तावातावाने वहिनीला सांगायला आल्या होत्या. या सगळ्यामागे आजीची इच्छा, 'घराक जातलय भरारा' एवढीच. 'हयच रवतलय' एवढीच. तिचं काय चुकलं जर तिला असं वाटत असेल तर. आयुष्य इथे गेलं. तेव्हा भरल्या घरात आली असेल, मग एक एक करून घर खाली होताना तिने बघितलं असेल. आणि या घरात एकटं राहताना या भिंतीनीच सोबत केली असेल. आजोबा, बाबा, काका, स्वतःची ६ मुलं आणि कुटुंबातली ढीगभर अशे किती माणसं जाताना बघितली तिने पण हा ब्राम्हण आंबा, पारवाला पिंपळ,  तळीवरचा नागोबा, खोरणातला महाराजांचा फोटो हेच तिचे खरे साथी.
तिला राहायचं असेल तर तेवढंही तिला तिच्या शेवटच्या काळात मिळू नये?
ती विचारात असतानाच दार वाजलं, माई आत आली होती. तिचाच विचार करीत असली तरी यमीने आता मात्रं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. कालचा विसंवाद अजून जागाच होता. माईच चुलीपाशी आली. यमीच्या बाजूला बसली. ओंजळ यमीच्या पुढ्यात दाखवून म्हणाली 'फुला आणलय'. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा घाबरट  अपराधीपणा होता.  यमीचा राग विझून गेला,  ती थोडीशी वरमली.
'ठेव त्या घडवंचीवरच्या परडीत मग'
'नाय गो तुका दाखवूक आणलय'
यमीने क्षणभर त्या सुरकुतलेल्या, हडकुळया हातातल्या ताज्या टवटवीत फुलांकडे बघितले.
चहा घेशील यातला अर्धा?  कपबशी माईच्या पुढे सरकवत ती म्हणाली.
'काल माका एक स्वप्न पडला. या देवखोलीत मी उभ्या… '
'आजी नंतर सांग ग, मला आता पुजेचं समान काढायचं आहे सगळं, हा चहा घे आणि आंघोळीला जा बघू'
 असं म्हणून यमीने चुलीकडे चेहरा वळवला, चुलीचा धूर वाढला होता तिच्या डोळ्यातून पाणी येत होते, तिने  फुंकणीने राख बाजूला करून जाळ वाढवला.
वहिनी साफसफाई उरकून आली तशी, चहाची बशी  खाली ठेऊन माई म्हणाली 'गे मी काय म्हणतय, प्रेमा कट्ट्यार जातंला तेका एक किलो रवो आणूक सांगलय'
'कित्या? संध्याकाळी विनय येता तो आणतलो सगळा'
'गे लाडू करुक व्हये मा, हैसर रवतलय, तर कोण इलोगेलो तेका देउक नको?'
'लाडू केलास मा हय येवच्या आधी, ते आणालले आसत. आणखी नवो धंदो घालू नकात तुम्ही आता, हा! काय तरी आपला एकएक सांगीत रवतलास, आयकतव म्हणान.
'गे यमी घेवन जायत, तेच्ये मालक खातीत'
'काय तरी सांगा नकात हा येक येक'
वहिनी कळशी, बादली आणि राजू(दोर) घेऊन विहिरीला निघून गेली.    


संध्याकाळी विनय आला. त्याने आपल्या गाडीतून बरेच समान आणले होते, ते स्थिर-स्थावर करण्यात दिवस संपून गेला. दुसऱ्या दिवशीचा लघुरुद्रही पार पडला. काही मोजकी मंडळी जेवली, माईने त्यानाही आपण इथे कसे राहिलो, घर कसे सांभाळले, कुळस्वामीला कसा दिवा लावलाच लागतो नाहीतर तो स्वप्नात कसा येतो ह्याविषयी गजाली सांगितल्या, तिच्या न संपणाऱ्या गजालीनी पाहुण्यानी सुद्धा कंटाळून काढता पाय घेतला. प्रत्येक गजालीतले निर्वाणीचे वाक्य 'माका हयसर रावाकच व्हया, समजलात मा ' हेच होते. 'देवाक कोण बघतलो, देवाक बघूकच व्हया' हेहि. आता सगळीच शिंग फुटून मोठी झाल्याने तिने बहुतेक आपल्या देवालाच लहान करून टाकले होते.

रात्री निजानीज झाली तरी तिची झोपायची चिन्ह दिसेनात. सगळे दमून जाजमावर अंग टाकत होते तर हिच्या आपल्या एरझाऱ्या सुरु होत्या. शेवटी कंटाळून विनय मधल्या खोलीत आला, 'आजी झोपत  नाहिस, चल आता , लाईट बंद करतो मी ही '
तशी त्याच्या एकदम जवळ जावून त्याला विश्वासात घेतल्यासारखे करत ती म्हणाली
'माका बघ, कसातरी जाता'
'काय होतंय तुला आजी?'
'ताच समजना नाय, धडकी भरल्यासारखी वाटता. माका बघ इतको (चार आंगळं दाखवून) आल्याचो रस देशित?'
'थांब देतो, पण तू एका जाग्यावर बस शांत.'
'नाय मी प्रेमाथय जातंय, ता देयेत, असं म्हणून आजी दरवाज्याकडे गेली दरवाज्याची फारशी कधीही न लावली जाणारी एकदम वरची कडी आज कुणीतरी लावली होती, ती काही माईला काढायला जमणार नाही असं वाटून विनय घडवंचीवरचं आलं शोधायला गेला. ते घेऊन खलबत्ता शोधणार इतक्यात त्याला खुर्चीचा लादीवर खरखरण्याचा आवाज आला.
'आजी, अगं काय चाललय काय तुझं? तो एकदम ओरडला आणि धावतच दाराकडे आला. त्याच्या आवाजाने वहिनी, यमी सुद्धा उठून आले.
माई खुर्ची दाराला लावून कडी काढण्यासाठी वर चढली होती.
विनय ने धावत जावून तिला थांबवले. 'अगं हे काय करतेस तू, पडलीस म्हणजे?' तो अजूनही ओरड्ल्याच्या सुरात बोलत होता.
'नाय रे. प्रेमाकडे जातंय.'
'कशाला प्रेमा काय ऑपरेशन करणार आहे का डॉक्टर आहे, तिच्याकडे काय सोन्याचं आलं वाढून ठेवलय, गप बस इथे, नाटकं नको तुझी '
'नाय रे, तेका विचारतय,  माका कसातरीच जाताहा. महाराजांकडे जाउक व्हया. तेंका विचारतलय काय करू म्हणान'
'कशाचं काय करू?'
'रे, हैसर रवाचा.'
'काय ग हे तुझं'
'रे, काय म्हणजे काय?' आई सुद्धा रागाने थरथरायला लागली. 'माका हैसर रवाचा आसा. देवासाठी. तुका काय त्येचा, दुसऱ्या तिसऱ्यान आयकला असता माझा'
'दुसरा तिसरा असाता ना तर हि खुर्ची तुझ्या टाळक्यात घात्ली असती त्याने कळलं आजी, तुला काय वाटतं आम्हाला मजा वाटते तुला चार खोल्याच्या खुराड्यात डांबून ठेवयला, आम्ही काय वैरी आहोत काय ग तुझे?'
'तुमी देव बीव सोडलास असश्यात, मी सोडूक नाय, देवाक दिवो लागाक होयो, तर तो माका बरा ठेवतालो, सगळ्यांचा  बरा जाउक  व्हया तर देवाक बघुचाच लागतला , मी रवान हैसार रे, देवाची सेवा करूंक, कुळस्वामीन स्वप्नात येवन सांगल्यान समाजला मा'  भिजलेल्या मांजराला पकडले तर ते रागावून आवेशात येते त्याप्रमाणे तिने चेहरा केला.
हिच्याशी बोलून काही फायदा  नाही हे त्याला माहित होते पण त्याचाही पारा चढला होता. पण तो काही बोलणार इतक्यात आतून वहिनी आल्याचा रस घेऊन आली.
'ह्यो घेवा बघया आधी, आणि शांत रवा, काय्येक जाउक नाय हा तुमका, बसा आधी बघूया हैसर' तिने पेला यामिकडे दिला आणि माईला हाताला धरून खाली बसवले. माई केविलवाण्या नजरेने मात्र आलटून पालटून त्यांच्या सगळ्यांकडे बघत होती. यमीने खाली बसून पेला माईच्या हातात दिला.
'माका घेवन चलशीत रे , महाराजांकडे. विचारतलय त्येंका काय करू तां'.
'होय्य्य्य्य्य्य्य , एकदा म्हटलं ना मग घेऊन जाणार ! परत परत विचारायचं नाही ' . एकदम मोठ्याने विनय म्हणाला.
वहिनीने खुर्ची बाजूला ठेवली आणि म्हणाली 'आता काय ता उद्या बघुया, आता निजा सगळ्यांनी बघिया'
'चल विनय, जा जावन झोप'
विनय एक मिनिट थांबून खोल श्वास घेऊन मग आतल्या खोलीत गेला. माईला उठवून यमी अंथरुणावर घेऊन गेली. वहिनीने लाईट काढले.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विनय , यमीला एस. टी. स्टँडवर सोडायला गेला. संध्याकाळच्या  मलूल सूर्यप्रकाशात दोन्ही बाजूला असलेल्या गर्द झाडीच्या अरुंद रस्त्यावरून गाडी चालली होती, यमीच्या मनात मात्र विचारांनी केव्हाच अंधारून गेले होते. आपल्याच विचारात मग्न दोघेही गप्पच होते. चढणीच्या रस्त्याच्या कडेला एक म्हातारी काठी टेकीत चढाव चढत होती. कपडे विरलेले. डोक्यावर कांबळ्यासारखे काहीतरी त्यामुळे चेहराही दिसत नव्हता. यमीने तिच्याकडे स्पष्ट पाहण्याचा प्रयत्न केला पण गाडीच्या वेगामुळे चेहरा अधिकाधिक अंधुक होत गेला. पूर्ण रस्ताभर ती फक्त दोनचार दिवसातल्या घडलेल्या प्रसंगातच बुडून गेली होती. रानबांबूळीचा बोर्ड मागे पडला तसं तिला एकदम आठवले कि तिकीट असलेल्या नारिंगी फोल्डर घरीच राहिला. तिच्या डोक्याला एकदम झिणझिण्या आल्यासारख्या झाल्या. तिने बॅग़ ची चाळवाचाळव केली, त्यात कुठे तो फोल्डर दिसेना, मागे झुकून ती मागच्या सीटवर ठेवलेली मोठी बॅग़ घेण्याचा प्रयत्न करू लागली , विनय ने गाडीचा वेग मंदावत विचारले 'अरे काय झालं?' ती म्हणाली   'बहुतेक मी तिकिटाचा फोल्डर घरीच विसरले'. विनयने चटकन गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली, उतरून दोन्ही बॅग़ शोधल्या. तो फोल्डर कुठेच नव्हता, 'असं कशी विसरली असशील? बघ यातच असेल कुठेतरी' ,
'अरे नाही , तीन वेळा बघितलं' तिने बॅग़ मधले कपडे अस्ताव्यस्त फेकले पुन्हा कोंबले.
'थांब, टेन्शन घेऊ नको, वेळ आहे तसा, परत जाऊ. कट टू कट होइल, पण त्याला इलाज नाही'
गप्पपणे दोघे परत गाडीत बसले. गाडी वळवून परत घराच्या रस्त्याला धावू लागली.
यमी अस्वस्थपणे अजूनही बॅग़ शोधत होती, 'सगळा गोंधळ नुसता, एक गोष्ट धड का नाही होत माझ्याबाबतीत ? छे, मी उगाच आले, मी यायलाच नको होतं इथे, हि जागाच बेकार आहे, सगळ्यांना पाय मोडून नुसती गिळून टाकायला बसली आहे आ वासून, काळोखातला घराच्या वरचा तो हिरवा डोंगर, आता आ वासून बसलाय घर गिळायला, आणि आपल्या सगळ्यांनाच  गिळतोय तो एक एक करून , बघ तू, छे, इथे येताच कामा नये होतं, चूक झाली'
विनय गप्पच होता, आणि यमी अस्वस्थपणे पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी बॅग़ मधून काढत होती, परत आत टाकत होती.  गाडी वेगाने धावत होती. आता मगाचच्या चढणीजवळ गाडी आली, पण उलट बाजूने असल्याने आता चढावाऐवजी उतार होता, बारीक चांदण्यात आजूबाजूची झाडं आणि उतराचा रस्ता स्पष्ट दिसत होता.
यमी अजुनही मध्येच  पुढे बघत मध्येच मांडीवरच्या  बॅग़ मध्ये चाचपत शोधतच होती. अचानक बॅग़च्या खोल फाटक्या कप्प्यात काहीतरी हाताला लागले. 'अरे थांब, थांब बहुतेक आहे तो फोल्डर, थांब'. विनय ने गाडीचा वेग मंद केला गाडी उतराला लागण्यापूर्वीच त्याने ती थांबवली.
'हा बघ तो हरामखोर फोल्डर!' यमीने तो अडकलेल्या फाटक्या कप्प्यातून उचकटून काढला. 'चल वळव इथेच'
विनयने गाडी वळवली, वळवताना यमीचं लक्ष उतारात गेलं आणि तिच्या काळजात चर्र झालं. मगाचच्याच म्हातारीसारखं कोणी काठी टेकीत चढाव चढत होतं. 'अरे ती म्हातारी अजून इथेच कशी, ती बघ ?'
गाडी वळवताना विनयलाही  कुणीतरी चढाव चढत असल्याचे पुसटसे दिसले.
'गाडी वळवून एव्हाना पुन्हा रस्त्याला लागली होती. तो म्हणाला 'अगं काही नाही, कुणीतरी दुसरी असेल.  तिथे बाजूला घर असेल तिचं.'
'नाही तिथे एकही घर नाही आहे अरे'
यमीचा चेहरा रडवेला झाला, 'पण तिथेच कशी ती?'
'अगं तिथे म्हणजे तिथेच नाही आहेत घरं अगदी , बाजुचे  सातोशेचं भराड आहे ना तिथे घरं आहेत, त्यातलीच असेल ती , तुला काय ती 'वेगळी'  वाटली काय?',  यमीने चमकून त्याच्याकडे बघितले. विनय हसायला लागला.
'अग्गग्ग, गावातली  माणसं अशीच अंधारात रस्तावरून बिनधास्त चालत असतात इथे हे काय माहित नाही तुला'
'नाही मघाचचीच होती ती. आपल्या माई सारखी फिरतेय बहुतेक घर नसलेली', यमी एकदम घुसमटून रडायलाच लागली.
'हे बघ तू काहीतरी ना , वेड्यासारखं बोलू नकोस , तू कशाला काहीतरी टेन्शन घेतेस? . तू शांतपणे मुंबईला जा. मी समजावलय माईला. बरोब्बर करतो मी काय ते. हे बघ मला पण वाईट वाटतं ग, माईला इथेच राहायचंय त्याबद्धल आपण काही करू शकत नाही,  तिलाही माहित आहे ती इथे राहू शकत नाही ते, कळलं ना, मागे मला म्हणाली होती कि या घरातच संपू दे आपलं सगळं म्हणून, पण काय आहे ना, शेवटी प्राक्तन असतं, तिचंहि आहे आणि तिच्या देवाचं हि आहे. तू उगाच  विचार करून डोक्यात फुकटचा जाळ  घालून काही उपयोग नाही, असंच व्हायचं आहे आणि ते तसंच होणार. मी मी म्हणणारे सगळे गेले, इच्छा खूप असतात पण सगळ्याच पुऱ्या  होत नसतात, हे तुलाही माहित आहे'
'मग काय करणार आहेस तू?'
'तिला महाराजांकडे घेऊन जातो म्हणून आम्ही निघू उद्या, तिचं सगळं समान घेऊन, मग अर्ध्या रस्तात आलेलोच असू तिथून तिला सांगू , 'आता पुण्याला जाऊ, नंतर पुन्हा दोन महिन्याने येऊ', अशी तिची समजूत घालणार दुसरं काय?'
'आणि तिथून परत 'घराक जावया' असा हट्ट धरला तर तिने?'
'नाही धरायची, मी ओळखतो तिला.'
'पण ……… तूच सांग, तिला स्वतः आपलं वाटणाऱ्या जागी तिला राहण्याचं देखील स्वातंत्र्य असू नये?, तुला काहीच वाटत नाही याबद्धल ?'
'हमम ….  स्वातंत्र्य…. इच्छा … '
'किती दिवस राहिलेत तिचे , तिला शेवट जिथे राहायचंय तिथे राहायला मिळालं पाहिजे कि नाही?'
'आपण नाही ठरवू शकत ते, आपल्या हातात नाही ते  , आपलं घर कुठचं  हे आपल्याला कितीही वाटलं ते आपल्याला नाही ठरवता येत ते '

गाडी धावत होती. एस. स्टी. स्टँड जवळ येत होतं. घराचा रस्ता केव्हाच मागे पडला होता.

Saturday 16 April 2016

प्रश्न

मला पडले प्रश्न चार
नाहीत तसे कठीण फार

समुद्र मोठा कि मोठा सुर्य?
इवल्या त्या समुद्राचे कोण मोठे धैर्य!
सुर्य जळतो, पृथ्वी पाळतो
मावळतीला इवल्याश्या समुद्रात गळतो

माणूस वाईट कि वाईट गुण?
आईच्या पोटात असतात सगळेच भ्रूण 
कोणी काळा दगड कधी वाळीत पडतो
त्यातलाच कुणी एक कधी वाल्मिकी घडतो

तिसरा प्रश्न मी कोण?
कोणीही नाही

चौथा प्रश्न माझा मला
विचारायचा राहून गेला
कागदी होडीतून वाहून गेला
नावाडीपण बुडून मेला


-विवेकानंद सामंत
पवई, २००४ 


आधारवड

मी एक आधारवड आहे, मेंदूवर बांडगूळ जडले आहे
आणि फुप्फुसात कोळसा
जठरात अन्न कमी
आणि मानेभोवती कसलासा विळखा

यकृत सुजले आहे
पाऊस पिऊन पिऊन
ते म्हणतात दारू , दारू…
बहुतेक तीच असावी

मूत्रपिंडातही बिघाड आहे
हो, असू दे
मृत्युपिंड शिवताना
कावळा घेईल मानून

पारंब्यांवर भार आहे
कणा, खुबा, घोटा, यांचे दुखणे वेगळे काय सांगावे?
प्रत्येकावर ताजा शीळा घाव आहे
एकंदरीतच तोड फार आहे

मी खरंच आधारवड आहे
असे मनापासून मानणारे थोडेच आहेत
बाकीचे मी एक आजारी वड आहे
असेच मानतात

वर असेही म्हणतात
एके दिवशी उन्मळून पडेल
पण
झुकणार नाही रांडेचा

-विवेकानंद सामंत
१५-एप्रिल-२०१६, पुणे 


Thursday 14 April 2016

त्रिशंकू

तीन सांज
तसा रंग राखी

तसा अर्धनारीश्वर
तसा धोबीका कुत्ता

तसे क्षितीज 
तसे क्वांटम पार्टीकल

तसा मी त्रिशंकू
अधांतरी



---१४-एप्रिल-२०१६, मुंबई




मुंगी

मुंगी - तिला जायचंय इथून तिथे
मुंगी गेली चालत या वाटेवर
या वाटेवरून परतली,
गेली त्या वाटेवर

अशा अनेक वाटांवरून परतत
पुन्हा पुन्हा शोधत
पोहोचली अशा टोकावर जिथून
एकदम दिसेनाशी झाली

कि ती कुणाच्या पायाखाली सापडली
मी संपूर्ण ताडपत्री धुंडाळली
कुठे नाही दिसली
(असेल का तिला मिळाली मुक्ती? )

या विस्तीर्ण पसरलेल्या ताडपत्रीवरून
ती गेली असेल का हिरवळीवर
कि असेल उमटवून सपाट ठसा
कुणाच्या चपलाच्या सोलावर




----- २८-डिसेंबर-२०१५ , मुंबई 

चूल

नवी चूल मांडली आहे
लाल चिखल लिंपून
हळद माखलेल्या
नव्या नवरीसारखी
हळद उतरते न उतरते तोच
तिचा संसारही सुरु झाला आहे

कधी पातेलं, कधी तपेलं
कधी काळंकुट्ट मडकं फक्त
 कधी ताज्या दुधाचा, कढलेल्या तुपाचा
फोडणीचा, तळणाचा, जळण्याचा,
विझण्याचा, वास आहे, श्वास आहे

आधी नहाण्याचं पाणी,
मग पिण्याचं पाणी, मग भाताचं आधण,
मग भाकरीचा तवा,
कधी लाडूचा रवा

असंच आणि बरंच काही
येत आहे, जात आहे
चूल सोशिक मनाने
सारी ये जा पहात आहे

देवाचा भात, दुपारचं जेवण, अनेक चहा
रात्रीचं जेवण , पुन्हा देवाचा भात
अविरत चालू आहे
चूल मांडल्या दिवसापासून

उशीर फार झाला आहे

लहान मुलं झोपली आहेत
दोन मोठी माणसं झोपेचं सोंग
पांघरून आहेत


चूल जागी आहे ,
पाणी शिंपडून तिला विझवण्याची पद्धत नाही
निखारे धगधगत आहेत,
दिवसभर सोसलेले चटके आहेत

दिवसभराचा क्षीण आहे
निखाऱ्याची विझण्याची प्रवृत्ती आहे
क्षमण्याचा प्रयास आहे
दोन मोठी माणसे झोपली आहेत

निखारे पूर्णपणे विझले आहेत
फक्त  धग आहे
चुलीशेजारी गाभण मांजर विसावली आहे
जी सकाळच्या ताज्या दुधाची वाटेकरी आहे

पहाट झाली आहे
मंद प्रकाशात सावल्यांची चाहूल आहे
चुलींच्या जखमांवर मायेची फुंकर घालणारी
फुंकणी वाजू लागली आहे

निखारे फुलत आहेत
ज्वाळा उमलत आहेत
मांजरीची शेपूट
हालत आहे

- विवेकानंद सामंत
७-नोव्हेंबर-२०१४, पुणे












Wednesday 13 April 2016

कोणी अजगर, कोणी घणस

प्रसंग बाका आहे.
कोणी अजगर, कोणी घणस
कोणी तोंडाला येईल ते पुटपुटत आहे
आजीने कुळस्वामीला हात जोडले आहेत


जो कोणी घणस किंवा अजगर आहे
त्याने देवखोलीच्या मागच्या दारावर ठाण मांडले आहे
त्याचा आवाज आणि हालचाल शून्य आहे
असे पुटपुटण्याचा आवाज आहे

जो  कोणी घणस किंवा अजगर आहे
त्याने अप्पांच्या म्हशीचे वासरू गिळले आहे असे बोलले जात आहे
वासरू गिळले म्हणजे नक्की काय झाले असावे
असा मुलांच्या मनात विचार चालू आहे

आजीने या अगोदर सांगितलेल्या गोष्टींमध्ये
राक्षसाने माणूस आणि सावकाराने जमीन गिळल्याचे नमूद आहे
कोणाचे तरी वासरू गिळंकृत झाल्याची भीती आहे
आणि आपण कोणाचे वासरू नाही ना अशी शंका आहे


आजीने कुळस्वामी समोर हात जोडले आहेत
आजीच्या मते तो समंध/संबंध आहे
अनेकदा तिच्या स्वप्नात आला आहे
आजीला त्याने गिळले नाही या गोष्टीचा धीर आहे

आजी त्याला घाबरत नाही या गोष्टीचा दिलासा आहे
त्याने जावे अशी मनापासून इच्छा आहे

- विवेकानंद सामंत
७-नोव्हेंबर-२०१४, पुणे










Wednesday 6 April 2016

एका कोळीयाने

एका कोळीयाने हे पु.ल.देशपांडे यांचे पुस्तक वाचले. अर्नेस्ट हेमींगवे या अमेरिकन लेखकाच्या 'द ओल्ड मॅन ऍंड द सी' या पुस्तका चा मुक्त अनुवाद म्हणजे हे पुस्तक. मुळ पुस्तक अजून वाचनात आले नाही पण वाचायच्या लिस्ट मध्ये त्याचे नाव टाकले आहे. मुळ पुस्तकाचा हा जश्याचा तसा केलेला अनुवाद आहे. हे पुस्तक काढण्यासाठी पु.ल., त्यांच्या पत्नी आणी राज्याध्यक्ष यांनी खूप मेहनत घेतली. पुस्तकात चित्रे आहेत. त्यात गोष्टीतल्या प्रसंगांचे हुबेहूब चित्रण केले आहे. पु.लं चे लेखन मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक भाग दाखवून गेले. पु.ल. नि स्वतःच प्रस्थावनेत म्हटले आहे की मी जसंच्या तसं भाषांतर करायचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे केवळ इंग्रजी न वाचू शकणारे असे वाचक हे पुस्तक वाचून हेमींगवेचे लेखन अनुभवू शकतील. आणी खरंच तसे जाणवते की मुळ गाभा आणि लेखन शैली कुठेही कमी जास्त झाली नाही आहे. पु.ल. शैली चा लवलेशही नाही. एका लेखकाने दुसऱ्या लेखकाचा केलेला हा आदरच म्हणावा लागेल. हे एकदम ग्रेटच वाटलं मला पु.लं बदधल. गोष्ट आहे सांतियागो नावाच्या म्हाताऱ्या कोळ्याची.हा कोळी तब्बल पंचाऐंशी दिवस एकही मासा न पकडता राहतो. त्याच्या बरोबर येणाऱ्या छोट्या मुलाला त्याचे आई-वडील पाठवेनासे होतात. पण त्या मुलाला म्हाताऱ्याविषयी खूप प्रेम असते. तो वेळ पडेल तशी त्याची मदत करत असतो. पण तो म्हाताऱ्याबरोबर मासे मारायला जाऊ शकत नाही. म्हातारा एकटाच जातो खूप खोल समुद्रात. त्याला वाटत असते त्याप्रमाणे बऱ्याच कालावधीनंतर एक मोठा मासा त्याच्या गळाला लागतो. पण मासा मोठा बिलंदर असतो. तो बिलकुल बधत नाही, एक दोन दिवस अशी काही झुंज देतो कि त्याला तोंड देताना म्हाताऱ्याला नाकीनऊ येतात. म्हातारा एकटा आणी मासाही एकटा, पण दोघेही जबर कणखर. आयुष्याशी लढणे दोघांनाही तितकेच तोडीचे ठाऊक असते. पण माशावर शेवटी म्हातारा विजय मिळवतो. त्याला मारतो. मासा लढत असताना म्हाताऱ्याच्या होडीला फरफटत घेऊन जातो. दोन दिवस हा मासा म्हाताऱ्याचा एकटेपणाचा साथी, प्रतिस्पर्धी, म्हाताऱ्याच्या सहनशक्तीचा अंत पाहणारा कर्दनकाळ अस बरंच काही असतो. शेवटी त्याला मारल्यानंतर म्हातारा हळहळतो. पण 'तु मासा तसा मी मासेमार' हे सत्य तो स्वतःशी घोळवतो. हेही म्हणतो की 'तुही बहादुर आणी मीही पण मी मानवाचे गुण धारण केलेला अप्पलपोटया, कपटी. लुच्चेगीरी आणी कावा करुन तुला मारले. शेवटी नमवलेच. तु खरा बहादुर. लढलास शुरासारखा न कपट करता. मला इजा करण्याचे तुझ्या मनात नव्हते'. मासा खूपच मोठा म्हणजे अठरा फूट, म्हातारा त्याला होडीला बांधतो पण त्यानंतरच्या संकटात जे कमावले ते गमावून बसतो. नंतरच्या प्रवासात एकामागोमाग येणाऱ्या शार्क माश्यांशी तो परत झुंज देतो. शार्क मरतात पण या मोठ्या माशाचे लचके तोडूनच. मेलेल्या माश्याला वाचवण्यासाठी केलेली म्हतारयाची धडपड व्यर्थ. शेवटी जेव्हा म्हातारा आपल्या बंदरात पोहोचतो तेव्हा त्या मोठ्या माशाचा फक्त सांगाडा राहिलेला असतो. म्हणजे कशासाठी मारला मासा? त्याचे लचके आयते दुसरेच कुणीतरी तोडते पण तेही उरत नाही ना मासा उरत. उरतो फक्त म्हातारा आणि त्याचा कधीही न ढळणारा स्वतःबद्दलचा विश्वास. दमून म्हातारा झोपतो, आणी तो छोटा मुलगा मात्र मनाशी ठरवतो कि आता काही झाला तरी म्हाताऱ्या बरोबरच मासे मारायचे. ह्या गोष्टीत बरेच काही आहे. खूप तात्त्विक आणी अढळ सत्य आहेत. जितकी शोधावीत तितकी थोडी. पु.लं.च्या भाषांतरातील 'अरे माश्या', ही हाक आवडली. म्हाताऱ्याचे स्वगत आणी माशाशी बोलणे खूप काही देऊन जाते. पण खरं सांगायचे तर मनाला काही गोष्टी नाही पटल्या यातील. म्हणजे म्हाताऱ्याचे कर्तृत्व अफाट आहे पण असा माणूस माझ्यातरी बघण्यात नाही. म्हणजे अशी माणसं फक्त पुस्तकातच असतात का? कि अशी माणसं सर्वत्र आहेत? फक्त ती आपल्याला दिसत नाहीत. का नाही दिसत? एखादा गरीब शेतकरी, पावसाची आशा करतो. पाऊस येत नाही पंचाऐंशी दिवस काय महिनोंमहिने येत नाही. बैल नसले तर स्वतःच नांगर ओढणारा,घराला पोसणारा, अन्याय सहन करूनही उभा राहणारा तरीही दुष्काळाला, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणारा, असा असतोच ना मग त्याच्यात आणी या पुस्तकातल्या म्हाताऱ्यात तसा काही फरक नाही मग का हेमिंगवेला त्याची गोष्ट लिहावीशी वाटली? का आपल्याला अश्या गोष्टी वाचून आठवण करून दिली जाते अश्या माणसांची? याचे उत्तर मी पुर्णपणे नाही सांगू शकत पण उत्तराचे एक टोक मला मी थोड्याच वेळापूर्वी म्हटलेल्या वाक्यात आहे. 'पण असा माणूस माझ्यातरी बघण्यात नाही'. मला माणसांच्या प्रयत्नाची, त्यांच्या रोजच्या संघर्षाची एवढी सवय झाली आहे की त्यामुळे डोळे आणी मन झाकोळून गेले आहे. रस्तावर उन्हातान्हात शारीरिक परिश्रम करणारे मजूर,जीवनाचा गाढा एकट्याने ओढणारे आणी सर्वच प्रकारची ओढाताण सहन करणारे, लोकलच्या डब्यात खचाखच असलेले सर्वसामान्य हे लोक ग्रेटच पण आपल्याला त्यांचे हिरोइझम दिसत नाही आणी मान्य होत नाही.