Tuesday, 28 February 2017

वृक्षप्रकल्पातील पहिला हिरवा सोबती : कदंब

The best time to plant a tree? 
Twenty years ago.
The second best time? 
Today.
                                              - Chinese proverb


आमच्या गावच्या घराच्या आसपास बरीचशी जमीन आहे. या शेतजमिनीत पूर्वी भात पिकत असे. आता तिथे शेती करायला कुणी नाही. अशा या पडीक जमिनीला सोबत मिळावी आणि तिच्यात हिरवे सोबती उभे राहावेत, ज्यांच्या अंगाखांद्यावर पशू-पक्षी बागडावेत म्हणून हा एक छोटासा वृक्षाप्रकल्प हाती घेण्याचे योजले आहे. मूळ कल्पना माझा भाऊ विवेकानंद याची. जे वृक्ष लावण्याचे ठरवले आहे त्या वृक्षांची ओळख आणि त्यांच्याविषयी, त्यांच्यानिमित्ताने लिहिले गेलेले हे छोटेसे डायरीवजा लेखन. 
यातला पहिला वृक्ष आहे  'कदंब'.

 
कदंब वृक्षाविषयी पहिल्यांदा ओळख करून दिली दुर्गा भागवत यांनी. त्यांच्या 'पैस' पुस्तकामध्ये  त्या लिहितात
'कृष्ण आला आणि यमुनेच्या तीरावरचे कदंबही वेगळेच झाले. यमुनेच्या सुखाभावनेचे साक्षी हे हर्षोत्फुल कदंब झाले. कृष्ण  यमुना यांचे समान प्रतीक कदंबाचे झाड झाले. आता कदंब फारसे कुठे दिसत नाहीत, पण यमुनातीरी मात्र कदंबाची झाडे अजून तशीच इमानाने फुलताफळताहेत. मी मथुरेला गेले ते कदंब पाहण्यासाठीच. कृष्णाची कुंडले कदंबाचीच. याच झाडावर चढून त्याने कालिया डोहात उडी घेतली. कदंबावरच त्याने गोपींची वस्त्रे टांगून ठेवली. चीरहरणाचा तो कदंब अद्याप वृंदावनात आहे. पण आता यमुना त्याच्यापासून दूर सरली आहे. ते झाड रोडावत तसेच तग धरून उभे आहे. कदंबाची केशरीपिवळी फुले म्हणजे कृष्णाच्या आवडत्या पितांबराच्या रंगाची, त्याची नि राधेची आवडती. कदंबाची सावली गाईगुरांना प्रिय. तिथेच कृष्णाची बासरी निनादायची. '  

कदंब वृक्ष म्हणजे कृष्णाचा वृक्ष. कृष्णाचे बालपण यमुनातीरी याच वृक्षाच्या विशाल छायेत गेले. पोपटी-हिरवी मोठी पाने आणि गोल चेंडूसारखी बारीक पिवळसर-लाल, पांढऱ्या केसरांनी बनलेली फुले हे कदंबाचे वैशिष्ट्य.


वृक्षाच्या शाखाही आढव्यातिढव्या कश्याही वाढणाऱ्या नाहीत, तर सरळ बुंध्यावर एकाला एक समोरासमोर रचनाबद्ध शैलीत असतात. पानेही समोरासमोर दोन दोन असतात.कदंबाला 'नीव' असेही म्हणतात. या वृक्षाचे आणखी दोन प्रकार डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' या ग्रंथात दिले आहेत. ते आहेत 'हेदकदंब' आणि 'लघुकदंब'. लघुकदंब हा कदंब वृक्षापेक्षा थोडा लहान असतो. वि. म. आपटे यांनी लिहिले आहे की 'लघुकदंब' या वृक्षाला पावसाळ्यात फुले येतात. त्यामुळे मेघदूतात ज्या कदंब वृक्षाचा उल्लेख केला आहे तो लघुकदंब असावा. 
त्यांनी मेघदूतातील कदंब वृक्षावरच्या ओळीही आपल्या पुस्तकात दिल्या आहेत. 

नीचैराख्यं गिमधिवसेस्तत्रविश्रामहेतोः ।     
त्वत्संपर्कात् पुलकितमिव प्रौढपुष्पै कदंबैः।   मेघदूत १.२५ 

याचा अर्थ आहे, '(हे मेघा,) नीचैर्गिरीवर जरा थांब. तुझ्या येण्याने त्याला कदंबरूपी रोमांच येतील. 
कदंब वृक्षाला नक्की फुले केव्हा येतात हे एक मोठे गूढच आहे. माझ्या भावाच्या पुण्यातील घराच्या खाली तीन कदंबाची तरुण झाडे आहेत. त्यांना फेब्रुवारीच्या महिन्यात फुले आलेली मी पहिली आहेत. श्री. द. महाजन यांनी त्यांच्या 'आपले वृक्ष' पुस्तकात कदंब फुलण्याचा काळ 'जुलै-ऑगस्ट' दिला आहे. मग कदंबाची झाडं फुलतात तरी कधी?
  
कदंब वृक्षाचं शास्त्रीय नाव Neolamarckia Cadamba
Syn : Anthocephalus chinensis; Anthocephalms Cadamba म्हणजेच ऍन्थोफॅलस कदंबा किंवा ऍन्थोफॅलस चायनेन्सिस
कदंब वृक्षाचा भाऊ लघुकदंब म्हणजेच 'कळम' याचे शास्त्रीय नाव आहे 'मित्रागायना पार्व्हीफोलीया'.

दुर्गाबाईंनी कदंब वृक्षाची ओळख  तर करून दिली पण त्यांनी या झाडावर लिहिलेले 'कदंब' हे दुर्मिळ पुस्तक मात्र अजून वाचायला मिळाले नाही. या पुस्तकाच्या मी काही वर्षांपासून शोधात आहे. पहिला कदंब वृक्ष बघितला तो खजुराहोला. खजुराहोच्या मातंगेश्वर मंदिराजवळ उघड्यावरच एक मारुतीची मूर्ती आहे, त्याच्याबाजूला हा कदंब वृक्ष आहे. 

अज्ञेय (सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन) या हिंदी कवीने कदंब वृक्षावर अतिशय सुंदर कविता केल्या आहेत. 

टेर वंशी की
यमुना के पार
अपने-आप झुक आई
कदम की डार।
द्वार पर भर, गहर,
ठिठकी राधिका के नैन
झरे कँप कर
दो चमकते फूल।
फिर वही सूना अंधेरा
कदम सहमा
घुप कलिन्दी कूल!

अलस कालिंदी

अलस कालिन्दी--
कि काँपी
टेर वंशी की
नदी के पार।
कौन दूभर भार
अपने-आप
झुक आई कदम की डार
धरा पर बरबस झरे दो फूल।
द्वार थोड़ा हिले--
झरे, झपके राधिका के नैन
अलक्षित टूट कर
दो गिरे तारक बूँद।
फिर-- उसी बहती नदी का
वही सूना कूल!--
पार-- धीरज-भरी
फिर वह रही वंशी टेर!

भक्त कवी रसखान यांनी लिहिलं आहे 'जो खग हौं तौ बसेरौ करौं मिलि
                                                                कालिन्दी कूल कदंब की डारन।'


कदंब वृक्षाला अनेक नावं आहेत. त्यापैकी एक 'शिशुपालक' असे आहे. या वृक्षाचा वैद्यकीयरित्या  लहान मुलांच्या व्याधींवर उपयोग होतो. शततारका या नक्षत्राचा आराध्य वृक्ष कदंब आहे. 

कदंबावरचं पोस्टाचं तिकीट

Sunday, 26 February 2017

तांबट पक्षी

अतिशय सुंदर दिसणारा छोटासा हिरवागार तांबट पक्षी. मिश्या असलेली जाड चोच, पिवळसर गळा, छातीवर लाल पट्टा, डोक्यावर लाल टिळा, टपोरे, उदासीने भरलेले डोळे आणि टोक-टोक-टोक-टोक (पुक-पुक-पुक-पुक) असा मंद सूर आळवणारा. त्याच्या या आवाजावरून त्याला 'तांबट' असे  नाव पडले आहे. तसेच इंग्रजीमधील सामान्य नावही 'कॉपरस्मिथ बार्बेट' आहे. 'कॉपरस्मिथ' म्हणजे तांब्याची भांडी घडवणारा म्हणजेच मराठीत 'तांबट'.  हा तांबट हातोड्याने तांब्याच्या भांड्यावर घाव घालताना होणारा आवाज आणि या पक्ष्याचा टोक-टोक असा एकाच लयीतला आवाज सारखाच आहे. आता हे लेखन करतानाही मला दूरवर तांबटाचा आवाज ऐकू येत आहे. खरंतर या आवाजाचा उल्लेख काही जण टोक-टोक, तर काही टुक-टुक, काही पुक-पुक असा करतात. मला तो आवाज 'पुक-पुक-पुक' असा वाटतो म्हणून त्याच्या आवाजाचे वर्णन मी तरी इथे तसेच करणार आहे. 

'तांबट' या पक्ष्याची पहिली ओळख करून दिली मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका दुर्गा भागवत यांनी. त्यांच्या 'भावमुद्रा' या पुस्तकात ह्या पक्ष्याला त्यांच्या ओजस्वी शब्दांतून अवतरण्याचा मान मिळाला आहे. या पुस्तकातील त्यांच्या 'टोक...टोक...टोक' या लेखाची सुरवातच 'तांबट पक्ष्याने झाली आहे. लेखाचे नावच आहे 'टोक..टोक...टोक'.

त्या लिहितात

'आज हवा किती सुंदर झाली आहे.  वेडापिसा गार वारा उफाळून वाहतो आहे. ..... आधीच्या पावसाच्या सरीने टवटवी आलेली झाडे पिसें भरल्यासारखा पिंगा घालताहेत. आणि तांबट पक्ष्याचा 'टोक.. टोक... टोक' हा एकाच एक हट्टी आवाज खोलीभर घुमतो आहे. 'टोक..टोक..टोक' हा एकच अर्थ नसलेला ध्वनी साऱ्या अक्षरांबरोबर पिसाटासारखा घुमतो आहे. 'टोक टोक टोक' हा अमानवी दूरचा आवाज, पण तो आता तांबट पक्ष्याचाही राहिला नाही. खास तो तुझाच आवाज.'

हा लेख खरंतर तांबट पक्ष्यावर लिहिलेला नाही, ए. एम. टी. जॅक्सन या लेखकावर आहे. आपल्या 'बीस्टस अँड मेन इन इंडिया' या पुस्तकात त्याने तांबट पक्ष्याची  करून दिली आहे. तांबटाचा  टोक.. टोक..टोक.. आवाज बाहेर ऐकू येत असताना या पुस्तकाशी दुर्गाबाईंची गाठ पडली होती.

तांबटाचे शास्त्रीय नाव 'मेगालायमा हिमॅकेफाला' आहे. हा पक्षी साधारण सतरा सेमी लांबीचा,चिमणीपेक्षा थोडासा मोठा असतो. त्याच्या रंगामुळे हा झाडांच्या हिरव्यागार पानांतून सहसा दिसत नाही.
दुर्गाबाईंनी या पक्ष्याची ओळख करून दिली तरी तो प्रत्यक्षात पाहता आला नव्हता. आंतरजालावर त्याचे अनेक फोटो पाहिले. पण प्रत्यक्षात तो दिसला गेल्या डिसेम्बर महिन्याच्या शेवटी  मुंबईतल्या घराच्या अगदी जवळच्या झाडावर. दोन एकसारखे दिसणारे तांबट आसपास फिरत होते. थोडे निरखून बघितले असता कळले झाडाच्या खूप वरच्या बुंध्याना एक-दोन  नाण्याच्या आकाराएवढी भोकं पाडलेली होती, आणि त्यात तो निरखून पाहणी करत होता. तांबटाची ही घरटी, बहुदा त्याने स्वतः तयार केली होती किंवा पूर्वी कुठल्यातरी तांबटाने बनवली असावीत. तांबटाचा वावर असलेल्या झाडावर, बुंध्यांना अनेक भोके पाडलेली दिसतात. कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून तांबट आपले घरटे अनेक ठिकाणी पोखरून ठेवतो. तसेच घरट्याच्या लहान आकारामुळे सहजासहजी शत्रू पिल्लांपर्यंत पोहोचू शकत नाही.

डिसेंबर   अखेरीस या पक्ष्याची हालचाल जोरात सुरु होती. सतत 'पुक-पुक-पुक'चा एकसुरी आवाज सकाळ, दुपार चालू असे. या पक्ष्यात नर, मादी सारखेच दिसतात. पण सतत 'पुक-पुक-पुक' चा नाद करणारा झाडावर बसलेला तांबट दिसतो तेव्हा तो बहुदा नरच असतो. आपली त्या झाडावरची, त्या आसपासची जागा काबीज केल्याचे तो जणू या सततच्या आवाजाने बाकीच्या तांबट नरांना सांगत असतो. एकदा झाडावर असाच एक तांबट 'पुक-पुक-पुक' करत बसला होता. त्याने केलेल्या प्रत्येक नादात त्याचे पूर्ण शरीर कंप पावत होते. त्याचे पूर्ण शरीरच तो आवाज बनले होते. मधेमधे आपला आवाज थोडा संथ लयीत आणून तो इकडे तिकडे मान वळवून पाहत होता. बहुदा मादी दृष्टीपथात आहे का हे तो पडताळून पाहत होता. तेवढ्यात दुसऱ्या झाडावरून एक दुसरा तांबट या झाडावर आला. क्षणार्धात आधीच्या नराने आलेल्या तांबटावर हल्ला चढवला आणि त्याला पळवून लावले. त्यावरून समजले की तो त्याचा प्रतिस्पर्धी नर होता. 

नंतर अनेक दिवस तांबटाचे निरीक्षण करता आले. तो जानेवारी महिन्यातील काळ होता. आता काहीवेळेला चार-चार तांबट इकडून तिकडे झाडावर फिरताना दिसू लागले होते. जानेवारी ते जून हा तांबटाच्या विणीचा काळ आहे. जानेवारी दरम्यान तांबटाने आपला जोडीदार शोधलेला असतो. त्यामुळे त्यांच्या जोड्या झाडावर दिसू लागतात. बऱ्याचदा आपल्या जोडीदाराला नर तांबट फळाचा घास भरवतो. छोटी फळं, किंवा छोटे कीटक हे तांबटाचे मुख्य खाद्य आहे. काहीवेळेला तांबट तोंडात एखादे फळ घेऊन त्या फळासकटच अंगातून 'पुक-पुक-पुक'चा एकसुरी नाद काढत असे. शेवटी जोडीदार आला नाही तर ते फळ स्वतःच खात असे. तांबट घरटे खोदण्यासाठी आपल्या टणक चोचीचा वापर करतो. साधारण मऊ लाकडाच्या झाडावर तो आपले घरटे बनवतो. लाकूड पोखरून आत एक लांब नळी सारखा प्रवेशमार्ग तयार केला जातो, त्याच्या शेवटी थोडा मोठा भाग अंड्यांसाठी आणि नंतरच्या काळात पिल्लांना राहण्यासाठी तयार केला जातो. नर आणि मादी दोघेही पिल्लांचे संगोपन करतात. तांबटाच्या मिश्यांचा उपयोग पिल्लांना स्पर्श करण्यासाठी होतो. जशी पिल्ले मोठी होतात तशी ती घरट्याच्या तोंडाशी येऊन खाणे मागू लागतात. त्यांना फळांचा भरपूर आहार घेऊन नर आणि मादी दोघेही आपलटुनपालटुन घरट्याच्या तोंडाशी येतात आणि पिल्लांना घास भरवतात. कधीकधी घरट्यात प्रवेश करून तिथे साठलेला कचरा चोचीत धरून ते बाहेर येतात. तांबट पक्ष्यांच्या 'मोनोगॅमी' (एकपत्नीव्रत किंवा एकपतीव्रत) संबधी फारशी माहिती मला अजून तरी मिळाली नाही. पण निदान एका विणीच्या काळात तरी तांबट पक्षी एकाच जोडीदाराबरोबर राहतो.

या पक्ष्याच्या विविध जाती आहेत. त्यापैकी कॉपरस्मिथ बार्बेट मुंबईत सापडतो. या पक्ष्याला अनुसरून संस्कृत साहित्यात अनेक उल्लेख आहेत. त्यापैकी कॉपरस्मिथ बार्बेटच्या संदर्भात खालील ओळी आहेत.
मनुस्मुतीमधील उल्लेख
मणिमुक्ताप्रवालानि हृत्वा लोभेन मानवः |
विविधानि च रत्नानि जायते हेमकर्तृषु || १२.६||
हेमक (हैरण्यक: सोनार)

जीवंजीवकनादैश्र्व हेमकानां च नादितै: । वायुपुराण , ३६.४
यातील दोन्ही नावं हिंदी तंबायत (कॉपरस्मिथ) शी निगडित आहेत.  


प्रल्हाद जाधव यांनी तांबट या पक्ष्याचा केलेला आत्मशोध त्यांच्या 'तांबट' या पुस्तकात वाचला. अशी पुस्तकं मराठीत इतकी कमी का लिहिली जातात याचा खेद वाटला.त्यांच्या या पुस्तकात त्यांनी तांबट पक्ष्याचे दीर्घकाळ निरीक्षण केले आणि त्यांचे त्याच्याशी एक नातेच तयार झाले. पहिल्या पानावरच त्यांनी एक वाक्य लिहिलं आहे,

'खरं तर तांबटाचं आणि माझं नातं शब्दांपलीकडचं आहे'.

हे किती खरं आहे! एखाद्या पक्ष्याचं तुम्ही जितकं अधिक निरीक्षण कराल तेवढं तुमचं त्याच्याशी  अधिक गहिरं नातं बनत जातं. 

Monday, 30 January 2017

अनटायटल्ड पोएम नऊ

कशाला  जगायचं ?
कशाला मरायचं
याच्या मध्ये कुठे काही आहे का?

पण मधली अवस्था सापडत नाही
कधीही ती न सापडणे
या स्थितीला काय नाव द्यायचे ?
'आयुष्य' की 'दुर्भाग्य'?

आता या क्षणी आयुष्य काय आहे ते
असं सताड डोळ्यांनी, अवजड बाहूंनी
कवेत घेता येणार नाही मला
म्हणून अजूनही खूप दूर जायचंय मला

बघूया दुरून तरी काही दिसते का?
जीव गेला तरी चालेल पण त्या उंच
टोकावरच चढायचं आहे मला
तिथून काय दिसतं ते बघायचं आहे मला

मग ते टोक छाटून
त्याची दोन टोके करून
पुन्हा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नाही करणार प्रवास
नाही करून घेणार त्या दोन टोकांमध्ये स्वतःची ओढाताण
दोन टोकांमधील मध्य स्थिती गाठण्यासाठी
त्या एकाच अंतिम टोकावरूनच 
उडी मारेन

अनटायटल्ड पोएम आठ

आयुष्य खूप मोठंही आहे
आणि छोटंही आहे
ज्याचा जेवढा आवाका तेवढं
ते त्याच्या आवाक्यात आहे

जगणं, मरणं ज्याच्या हातात
आयुष्य बळ घेऊन त्याच्या पंखात
पंख किती मोठे, किती छोटे
यावर अवलंबून नाही काही
दृष्टी कुठेपर्यंत? तिथपर्यंत
आयुष्य पसरत राही

पंख पसरवत, आयुष्याला पसरवत
उंच, गोल गोल 
दूर दूर जो फिरत राही, 
नजर स्थिर ठेऊन
त्या लक्षावर, त्या भक्ष्यावर
तेव्हा कुणाचंतरी आयुष्य त्याच्या आवाक्यात येई

तितक्यात चपराक बसते

'आयुष्य', 'आयुष्य' काय करतोस?
एक डोळ्या? मोडक्या पाया आणि तुटक्या कण्या
तू जाणतोस? काय जाणतोस?
त्याचा आवाका खूप मोठा
पाय नाही, पंख नाही, आकाश नाही
आसमंत आणि दाही दिशा पडतील थिट्या

अनटायटल्ड पोएम सात

मी एक कोणी
नाही मी कोणीही
काय माझे इप्सित
जाणत नाही कधीही

मग का हा प्रवास
माझ्या माथी
जेव्हा सरावं हे ऊन तेव्हाच का
कोरड्या पडलेल्या घशाची प्रचिती?

कोण जाणे कधी
जीव थोडा थोडा संपेल
तेव्हा ही तहान
बुझलेली असेल?

आता आहेत बुझवयला
दारू, पाणी आणि बरंच काही
अखेरची तहान बुझवायला
कुणीच का असणार नाही?

या भीतीने मी तहान भागवते
असेल त्याच्यावर
आणि म्हणते भरवसा आहे मला
खूप आयुष्यावर

अनटायटल्ड पोएम सहा किंवा सात

त्या वाईन ग्लास मधून सांडलेल्या
लाल अर्काचे थेंब म्हणजे 
माझे मला दिसलेले रक्ताचे डाग
मग नाहीच म्हटलं मृत्यूला
मी काही येत नाही आत्ता

 कोण जाणे केव्हा कळेल सर्व काही
आता तरी काही त्याची शक्यता नाही
एकच शक्यता फक्त गळून जाण्याची
बुडून जाण्याची, विझून जाण्याची दिसते
पण बुडण्यापूर्वी, विझण्यापूर्वी तरी
अस्तित्व होते का काही?
 
असंच लिहीत बसावं क्षितीजाच्या अंतापर्यंत
ग्लास कधी न सरावा
सूर्य तसाच ताटकळत बसावा
चिमण्या होतील हवालदिल, मी का येत नाही?
पण नाही परतणार. त्याही वाट बघत
सूर्य डुबत नाही त्याची

सर्व असं स्टॅन्डस्टील होईल का कधी
श्वास न घेता विचार न करता बसून 
आयुष्य अनुभवू शकेन का मी कधी 
हे सर्व खूप छान आहे. खूप छान.
पण हे तू बनवलं आहेस, मी नाही.
यात कधीही बदल होऊ शकतो. हे माझं नाही.
त्यामुळे मला इथे भीतीच वाटते

उर्मिला पवार यांचं 'आयदान'


काही वर्षांपासुन हे पुस्तक वाचायचे मनात होते. शेवटी ते लायब्ररीतून आणून नुकतेच वाचून संपवले. या पुस्तकाविषयी काय लिहावे? खूप खरं-खुरं, अगदी मनाला भिडणारं, बेधडक, जराही आव न आणता केलेलं आत्मकथन. मराठीत 'मेम्वार' (Memoir) या साहित्य प्रकारात मोडणारे लेखन फार नाही. आत्मकथन म्हणजे आत्मचरित्र नव्हे. आत्मचरित्रात अनेकदा अनुभवांबद्धलचे रिफ्लेक्शन नसते. आपल्या अनुभवांना पुन्हा एकदा जगल्यासारखे ते लिहिले जात नाही कारण संपूर्ण जीवनाच्या पटात त्या विशिष्ट अनुभवाचे स्थान दिसेनासे होऊ शकते. या उलट Memoir मध्ये छोट्या कालखंडाबद्धलचे आयुष्य मांडले गेले असल्याने तिथे या अनुभवांचे विस्तृतपणे आकलन लेखकाला करता येते. अर्थात हे पूर्णतः माझं मत आहे. फार तुलना किंवा फरक करण्याएवढी मेम्वार किंवा autobiographies  मीही वाचल्या नाहीत. पण उर्मिला पवार यांचं हे छोटेखानी 'आयदान' मला खूप आवडलं. त्यात खूप मोकळेढाकळेपणा आहे, तो आवडला. 

जीवन अनंत आहे. अनंत! तुम्ही त्या जीवनाचा किती आणि कश्या प्रकारे अनुभव घेऊ शकता? 'अनंत' हा शब्दही जीवनाला पुरणारा नाही. अथांग, अमर्याद! काय वाट्टेल ते म्हणा पण तुम्ही जीवनाच्या अनंत रचना एका फुटकळ, अतिशय मर्यादित आणि अतिशय थोड्या काळाच्या आयुष्यात कधीही अनुभवू शकत नाही. मग ही जीवनाची रूपं तुम्हाला कशी दिसतील? जीवनाचा अवाका (अतिशय थोडा : वन झिलीएन्थ ड्रॉप इन ओशन) तुम्हाला थोडाफार का होईना कसा बघता येईल? हे फक्त पुस्तकंच करू शकतात. चांगली पुस्तकं. या पुस्तकाच्या कोलायडोस्कोपला डोळा लावावा. ते तुम्हाला जीवनाच्या अनंत स्थिती दाखवील. पण पुस्तकही तसं हवं, अनेक डायमेन्शन्सचं... , ज्यातून लेखकापेक्षा कितीतरी वरच्या पातळीवर असतो तो जीवनानुभव... आणि लेखक फक्त तिथे माध्यम असतो व्यक्त करणारा म्हणून फक्त. अशा लेखनातून लेखक दिसत नाही..तर  जीवनाचं रूप दिसतं. त्या लेखनाशी तुम्ही एकरूप होऊ शकता आणि असं लेखन तुम्हाला जीवनाची तुम्ही न बघितलेली रूपं दाखवू शकतं. असं लेखन करणं मुळीच सोपं नाही. भल्याभल्याना ते जमलेलं नाही. असं लेखन आणि अशी पुस्तकंच तुम्ही न जगलेल्या जीवनाचं दर्शन तुम्हाला देऊ शकतात. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' सारखी पुस्तकं. 

या पुस्तकाला अनेक डायमेंशन्स आहेत. म्हणूनच हे पुस्तक जीवनदर्शी आहे, केवळ दलित, स्त्रियांची दुःखं, अपरिमित गरिबी यांच्यावरचं नुसतं भाष्य नाही, अन्यायाविरुद्धचा तळतळाट नाही, सोसलेल्या दुःखाचा सोस नाही, फक्त शांत, mature narration आहे. मी स्वतः खेड्यात आयुष्याची पंधरा वर्षं वाढले. आम्हाला जातीयवाद इ. चा काही प्रश्न नव्हता, आणि बऱ्यापैकी सुखवस्तू कुटुंबात मी वाढले पण तरीही ग्रामीण जीवनाशी, आजच्या शहरातल्या रस्त्याकडेला ओघळलेल्या झोपडपट्ट्या, वस्त्यांतून दिसणारं एकदम डोळ्यात बोट घालणारं गरिबीचं विदारक दृश्य गावात कधी नजरेस पडणार नाही. पण ग्रामीण भागात एक प्रकारची जी गरिबी आहे. जे सुख-चैन-अभावी जीवन आहे, ते मी फार जवळून पाहिलं आहे. ते मला 'लागलं' ही आहे. त्यामुळे या पुस्तकातून काहीतरी अतिशय वेगळं, भयंकर विदारक काही वाचतेय असं मला वाटलं नाही. अर्थात लेखिकेने ते तसे 'सेनसेशनल', उगीचच सनसनाटी अजिबातच लिहिलेलं नाही. गरिबी आणि 'स्त्री' यांची दुःखं कुठल्याही समाजाला लागू आहेत. आणि सर्वात महत्वाचं या पुस्तकांचं हेच यश आहे की यातली बरंचसं जीवन आपणही पाहिलं, अनुभवलं आहे, ते आपणही जगलो आहोत असं पुस्तक वाचताना वाटतं. त्याचबरोबर आपण न अनुवभलेली पराकोटीची दुःखं, आयुष्याने लचके तोडून असहनीय केलेलं जीवनही आपण लेखिकेच्या बरोबर अनुभवतो. 'आयदान' ची सुरवात छोट्या छोट्या गोष्टींनी होते, हलक्याफुलक्या, काही नामुष्कीच्या, काही अतिशय , काही आनंदाच्या, समाधानाच्या , मजेशीर, या सर्वांचा पट शेवटी शेवटी इतका भेदक होत जातो की शेवटच्या पानांनंतर आपण उर्मिला पवार यांच्या मनातून जीवनाच्या खोल तळाशी दडलेल्या अनंत स्थिती पाहू लागतो नकळत. शेवटच्या पानांतील अनेक चळवळींबाबतची खंत, आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगांचा स्वीकार हे लेखिकेच्या या कथनातील अत्त्युच्च शिखर.
 Memoir मधील अनुभवकथनात 'सत्य'(Truth) ही गोष्ट पडताळून (proofs वैगेरेवरून) पाहण्याची नाही तर त्यातले सत्य तुम्हालाही भिडते , कुठेतरी खोल जाणवते ही यावर ते अवलंबून आहे. एक memoir किती सत्य असते हे त्याच्या वाचनाने तुम्हाला काय वाटले, त्या वाचनातून, वाचलेल्या शब्दांतून तुम्ही काय अनुभवले यातून तुमच्यापुरते ठरवता येऊ शकते. त्या दृष्टीने मला हे आत्मकथन अतिशय सखोल सत्याला भिडणारे वाटले. जातीयतेच्या संघर्षाला लेखिकेला लहानपणापासून तोंड द्यावे लागले आणि त्याबद्धलचे काही प्रसंग तिने लिहिले आहेत. पण कुठेही कटुता नाही. विखार नाही. दलित आणि त्यातून स्त्री म्हणजे अजूनही विदारक असा लिहिण्याचा थिम असला तरीही कुठेही रोष, शेरेबाजी नाही. जे ती जगली ते तिने खोलवर अनुभवले आणि त्यातून जे वर आले ते तिने मांडले जे अतिशय निर्मोह , अतिशय पारदर्शी जीवनाचे अंतरंग आहेत.. त्यामुळेच जातीयता, स्त्रीवाद, यांच्याबद्धल भाष्य असूनही हे पुस्तक त्यांच्या खूप पुढे जाते. त्याची पातळी अनुभवलेखनामध्ये खूप वरची ठरली आहे. महेश एलकुंचवार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की जर अनुभव घेणारा अनुभवापेक्षा स्वतःला मोठा समजू लागला तर ते अनुभवकथन (लेखन) फसते. असे लेखन universal होऊ शकत नाही कारण लेखक मध्ये 'मी' 'मी' करून लुडबुडत असल्याने तो अनुभव  वाचकाला कधीच घेता येत नाही. उर्मिला पवारांचं लेखन म्हणजे 'मी पहा कशी, एवढं सोसलं, एवढं भोगलं असं साळसूदपणे केलेलं लेखन तर नाहीच! पण त्याहीपुढे काही लोक जाणूनबुजून 'मी हे भोगलं पण मी हे सांगत नाही कारण माझ्यासाठी ते काही एवढं मोठं नाही' असा जो खोट्या humbleness चा आव आणतात, त्याचा लवलेशही त्यांच्या लेखनाला नाही.  

'आयदान' हा शब्द किती सुंदर आहे, आणि तेवढ्याच सुंदर असतात बांबूच्या पट्ट्यांनी विणलेल्या सुपल्या, रोवळ्या. त्यावरची वीण इतकी कलात्मक की पाहत राहावं. घट्ट, एकमेकात गुंतलेली, अतिशय सूक्ष्म छिद्र असलेली. लहानपणी या सुपल्या, रोवळ्या, डाळी (चटई), कणगी आमच्या गावच्या घरी बघितली आहेत. या पुस्तकावरच्या चित्रात स्त्रीचा चेहराच बांबूच्या पट्ट्यांनी  विणलेलं 'आयदान' झाला आहे. हे 'आयदान' म्हणजेच जीवन नव्हे का? लेखिकेच्या बाबतीतही तर हे 'आयदान' तिच्या आयुष्याचाच पोत आहे. पण हा पोत खरा सर्वांच्याच जीवनाचा नाही का? या जीवनाच्या एकमेकात गुंतलेल्या पट्ट्यांमधलं साम्य आपल्याला जेव्हा लेखिकेच्या लेखनात जाणवतं तेव्हा आपण या पुस्तकात हरवून जातो. त्यामुळे मला हे पुस्तक फक्त दलितवादी, स्त्रीवादी असं न वाटता जीवनवादी अधिक वाटतं. लेखिका पुस्तकाच्या शेवटच्या परिच्छेदात म्हणते 'माझ्या आयुष्याचं हे 'आयदान' त्याची वीण वाचणाऱ्याला काय देणार आहे? फार फार तर त्याला त्याच्या जगण्याची आठवण करून देईल, किंवा एखाद्याला ते फेकून द्यावंसंही वाटेल. पण इथल्या प्रत्येक व्यक्तीचं जगणं हे एक सामाजिक वास्तव आहे एवढ्या दृष्टीनं माझ्याही जगण्याकडे त्याने पाहावं ही अपेक्षा आहे'

त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा. ती नुसती मराठी नाही तर रत्नागिरी-चिपळूण कडची-, सिंधुदुर्गाची अश्या अनेक बोलीभाषांनी आंजारली गोंजारलेली ती भाषा आहे. अतिशय वेढून टाकणारा ऎसपैसपणा त्या भाषेत आहे. किती वेगवेगळे चपखल बसणारे ग्रामीण भाषेतील शब्द, बोलीभाषेतील शब्द, यांचा सढळ हस्ते या पुस्तकात वापर झाला आहे. माझे बालपण कोकणात (सिंधुदुर्ग येथे) येथे गेले. त्यामुळे मला हे सर्व लेखन वाचताना खूपच मजा आली. 

या पुस्तकाविषयीखूप वाटलं. असं वाटायला लावणारं हे पुस्तक. 

'आई' या शब्दामागच्या भावना जाणून घेण्यासाठी लेखिका आपल्या आईला विचारतात. त्यांची आई अशिक्षित (लोकार्थाने जग न पाहिलेली) . पण ती सांगते 'आई होनं म्हणजे सती जानं बाय सती... !!'  


आयुष्य कसंही येवो, ते निर्लेप मनानं स्वीकारण्याची हिंमत मात्र मला माझ्या जगण्यानं दिली आहे.