Tuesday, 6 March 2018

पॉण्ड हेरॉनची तपश्चर्या

बोरिवली नॅशनल पार्कमधील छोट्याश्या नदीप्रवाहाशेजारी चित्र काढत बसले होते. सकाळचे आठ-सव्वा आठ वाजले असतील. समोरची गर्द झाडं, त्यांचं पाण्यातलं प्रतिबिंब आणि त्याने हिरवंगार झालेलं पाणी. झाडांच्या गच्च गर्दीमुळे सूर्यप्रकाशही छाया आणि प्रकाशाच्या पाठशिवणीच्या खेळासारखा. पाण्यात काही दगड होते. आणि त्या दगडांच्या मधोमध एक पॉण्ड हेरॉन पक्षी ध्यानस्थ चर्या करून उभा होता. दगडांचा रंग आणि त्याचा रंग किती एकसारखा. पॉण्ड हेरॉन म्हणजे इंडियन पॉण्ड हेरॉन, बगळयांच्या कुळातील एक छोटा पक्षी. मराठीत त्याला 'ढोकरी' असे म्हणतात. तो उडताना त्याचे फैलावले पंख शुभ्र पांढरे दिसले तरी बसल्यावर जेव्हा तो पंख मिटून घेतो तेव्हा त्याचा रंग फिकट बदामी,मातकट दिसायला लागतो. हे त्याचे वैशिष्ट्य. उडताना दिसणारा आणि बसलेला यात खुपच फरक असतो. बहुदा उडत नसताना आणि उभं राहून शिकार करीत असताना दिसणारं त्याचं हे रूप त्याला camouflage साठी कमी येत असावं. त्याच्या या मातकट रंगाच्या पेहराव्यामूळे तो दगडांत एक्दम एकरूप होऊन जातो. इतका एकरूप की दुरून बघताना आपण नजर बाजूला केली तर परत दगडात हुडकायला खूप वेळ लागेल. या पक्षाकडे किती एकाग्रता असू शकते याचाही मला त्याला पाहताना अंदाज आला. मी त्याला साधारण सव्वा -आठ दरम्यान पहिल्यांदा पाहिलं. पहिली पाच  मिनिटे तो ताठ उभा होता. मग मग हळूहळू एक पाय अत्यंत सावकाशपणे दुमडून, दहा मिनिटे त्या एकाच स्थतीमध्ये स्थिर राहिला. हे  ८.२० पासून ते ८.४० पर्यंत. त्यानंतर कितीतरी वेळ निघून गेला तरी त्याची अजिबात कसलीच हालचाल झाली नाही. नजर बाजूला गेली तर तो दिसणारच नाही म्हणून मी एकटक त्याच्याकडेच बघण्याचा प्रयत्न करत होते. आजूबाजूच्या पाण्यात मासे बेडक्या, टुपुक-टुपुक हालचाल करत होत्या. त्यांचे तरंग पाण्यावर उठत होते.पण याची काही हालचाल नव्हती. धूर्त, ढोंगी साधूसारखी खडकावर त्याची तपश्चर्या चालली होती. 

त्याच्या जवळूनच एक फूट पेक्षा कमी लांबीचा साप पाण्यात डोके वर काढून संथपणे चालला होता. तो पार या टोकापासून त्या टोकापर्यंत नजरेआड झाला तरी हा आपला तिथेच होता. थोड्या वेळाने त्याची मान फक्त उंचावली थोडीशी. प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूच्या एक झाडाच्या डहाळीवर एक खंड्या बसून अंग फडफडवत होता. आणि एकदम अचानक क्षणात झपकन पाण्यावर आला आणि काहीतरी पकडून घेऊनही गेला. पण हा आपला तसाच बसून. थोडीशी मान हलवून, पण पाय स्थिर.

माझे  कुतूहल आणखीनच वाढले. आता याला शिकार मिळेल का? पाणथळीच्या जागी आढळणाऱ्या प्रत्येक पक्ष्यांचे  शिकार पकडण्याचे तंत्र वेगवेगळे आहे. जसं छोटा पाणकावळा(little cormorant) पाण्यात बुडी मारून भक्ष्य शोधतो. ग्रे हेरॉन(राखी बगळा) संधीकाली, सूर्य मावळतीला गेला की शिकार करतो. तशी या पॉण्ड  हेरॉनची स्वतःची नेमकी पद्धत असली पाहिजे. त्यातूनही त्याच्या या पद्धतीतील जी एकाग्रता आणि एका जागी इतका वेळ निश्चल उभं राहायची चिकाटी आहे त्याची दाद दिली पाहिजे. खंड्या(किंगफिशर) तर तेवढ्या वेळात सूर मारून आपलं भक्ष्य घेऊनही गेला. इतक्या वेगवान पद्धतीने त्याने पाण्यावर झडप घातली की ते भक्ष्य जे काही होतं  ते क्षणभर थिजूनच गेलं  असावं. तसं या पॉण्ड हेरॉनचं नाही. इतका वेळ पाण्यात खोल बघून कसलं संशोधन करत होता कोण जाणे. शेवटी तब्बल वीस मिनिटांनी त्याने आपला पावित्रा बदलला आणि अचानक पंख उंचावून वर उडाला आणि दुसरीकडे निघून गेला. बहुदा ही जागा त्याला पसंत पडली नसावी. बराच वेळ झाला असल्याने मीही आपले बस्तान बांधले आणि निघाले.

हेरॉन वरची Theodore Roethke या कवीची ही कविता किती समर्पक आहे.


The Heron

The heron stands in water where the swamp
Has deepened to the blackness of a pool,
Or balances with one leg on a hump
Of marsh grass heaped above a musk-rat hole.

He walks the shallow with an antic grace.
The great feet break the ridges of the sand,
The long eye notes the minnow's hiding place.
His beak is quicker than a human hand.

Her jerks a frog across his bony lip,
Then points his heavy bill above the wood.
The wide wings flap but once to life him up.
A single ripple starts from where he stood.
 



No comments:

Post a Comment