Thursday 8 March 2018

उलमा आणि इतर पक्षी ज्यांना भेटायचे आहे जाण्यापूर्वी

बिक्रम ग्रेवाल या पक्षीअभ्यासकाचे काही लेख सप्टेंबर २०१७ पासून येत होते. त्या क्रमश: लेखमालेचे नाव होते 'Fifty birds to see before you die'. रविवारच्या 'Times Mirror'  या वृत्तपत्रात १७ सप्टेंबर पासून दर पंधरा दिवसांच्या अंतराने (fortnightly) हे लेख येत होते, त्यांची कात्रणे मी शक्य तेवढी मिळवून जमवली. 
या पन्नास च्या यादीत दिलेला एकही पक्षी मी बघितलेला नाही. हे पक्षी दुर्मिळ तरी आहेत, किंवा सहजासहजी नजरेस न पडणारे आहेत. आणि बहुतेक पक्षी दुर्गम भागातीलही आहेत. यांना भेटायचे असले तरी कसे भेटणार? निसर्गात एवढे काही बघण्यासारखे आहे, की एक एक बघायचे म्हटले तर शंभर जन्मही पुरे पडणार नाहीत. 
मग विचार केला या जन्मी या पन्नास पक्ष्यांना प्रत्यक्षात बघणे तर शक्य होईल न होईल, निदान त्यांना चित्रात, त्यांची माहिती शोधून, त्यांच्याबद्दल जाणून घेऊन तरी त्यांना भेटता येईल. बघूया कसे जमते ते. या लेखमालेच्या सुरवातीला विक्रम ग्रेवाल आपला अनुभव सांगतात. त्यांच्या सुमित सेन नावाच्या मित्राने अशा प्रकारचा एक सर्वे केला लोकांकडून जाणून घेण्यासाठी की त्यांना कुठचे पक्षी 'before you die' या category खाली बघायचे आहेत, तर लोकांनी दिलेल्या याद्या इतक्या भिन्न होत्या की त्यात एकमत होणे शक्यच नव्हते. बिक्रम ग्रेवालनी त्यांची यादी दिली आहे. माझी अशी यादी नाही, अनेक पक्षी मला बघावेसे वाटतात, पण 'before you die' या नावाखाली अजून तरी कोणीच नाही. 
बिक्रम ग्रेवाल  यांच्या यादीतील पक्षी मात्र विलक्षण आहेत. ज्या पक्ष्याने माझे एकदम लक्ष वेधून घेतले तो आहे 
उलमा. त्याच्यापासूनच सुरवात करत आहे. घुबड हा कुळातील पक्षी मला अतिशय आवडतात. गूढ, अगम्य, आणि सुंदर.. 

१. उलमा(Ulama) : Spot Bellied Eagle Owl (Bubo nipalensis):  हे एक मोठे शिकारी घुबड आहे. भारत आणि साऊथ ईस्ट एशिया (श्रीलंका, बोर्निओ) या ठिकाणी त्याचे वास्तव्य आहे. पण ते क्वचितच नजरेस पडते. पण त्याचा आवाज इतका भयावह आहे की श्रीलंकेतील लोकांनी त्याला सैतानपक्षी (Devil Bird) असे नाव दिले आहे. एखाद्या स्त्रीची किंवा लहान मुलाची भयंकर किंकाळी ऐकू यावी त्याप्रमाणे हे घुबड ओरडते, त्यामुळे जंगलाजवळ राहणारे लोक या आवाजाला फार घाबरत असत. या आवाजावरून शकुन-अपशकुनही पडले होते. खरोखरच काही पक्ष्यांबाबत असे सर्व का जोडले गेले आहे ते कळत नाही. पण शेवटी माणूस काय, पक्षी काय सर्व निर्सार्गाचा भाग, सर्व जोडलेले आहेत. कोण जाणे? या पक्ष्यांना अघटिताचे काही तीव्र ज्ञान कुठल्यातरी नैसर्गिक ऊर्जेने होतेही असेल, त्यामुळेच का त्यांना असा आवाज निसर्गाने दिला असेल. टिटवी हे आणखी एक असे उदाहरण. तर या उलमा घुबडाबद्दल एक आख्यायिका(Myth) श्रीलंकेत आहे. एका माणसाने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांच्याच लहान मुलाला मारून त्याचे जेवण बनवून (curry)  आपल्या पत्नीला खायला दिली. जेव्हा पत्नीला त्या अन्नात मुलाच्या बोटांचे तुकडे दिसले तेव्हा पत्नी सैरभैर होऊन जंगलात पळून गेली आणि तिने आत्महत्या केली. देवतांनी तिचे रूपांतर एक पक्ष्यात केले. हा पक्षी म्हणजेच उलमा घुबड. 
बिक्रम ग्रेवाल यांनीही या पक्ष्याच्या आवाजाबद्दल लिहिलं आहे  'Has a low deep, mournful hoot that carries for long distances and chilling the bones of those who hear it'
हा पक्षी दुर्मिळ नाही, मोठ्या संख्येने त्याचे वास्तव्य भारत आणि इतर आशियायी देशातील जंगलात त्याचे वास्तव्य आहे, पण तो नजरेस पडायला अतिशय कठीण आहे. घुबड कुळातील इतर पक्ष्यांप्रमाणेच तो निशाचर आहे आणि दिवसा दाट पानांत गुडूप होऊन तो बसलेला असतो. 

या पक्ष्याचे अतिशय अप्रतिम चित्र जोसेफ स्मित (Joseph Smit) या चित्रकाराने काढले आहे. ते विकिपीडिया वर उपलब्ध आहे. 
Spot Bellied Eagle Owl (Bubo nipalensis )  Courtesy:(Wikipedia N.A._Nazeer)






No comments:

Post a Comment