Wednesday 7 March 2018

कंदील

कंदील कुठेतरी आहे
खोरणात पडून
तो शोधायचा आहे
गंजलेल्या कडीकुलुपाचे करकरणारे दार उघडून

दार जुने झाले, उंबरा जुना झाला,
वासेही आता कोरम झालेत
घरासमोरचे झाडही दमले आहे उभे राहून
वर्षांनुवर्षे झाली आहेत
पुराणपुरुष पुरून

वाटचाल खूप झाली
परत आलो आहे इथे फिरून
आणि अवाक आहे मी
माझी वाट बघत उभं आहे अजून
हे घरही स्वतः उरून

दार उघडताच आत येईल
तिरीप प्रकाशाची
भिंती सावरून बसतील
विसरून भीती अंधाराची

खुंट्या क्षणभर सजीव होतील
लटकवून घेण्यासाठी
जमीनही शहारेल
ओळखीच्या वाटणाऱ्या स्पर्शाने

पण आत येताच प्रश्नचिन्ह दिसले
अरे हे घर आपलेच का? आपलेच, का ?
कोंडलेल्या हवेने मग गुदमरायला झाले
देवखोलीत मग थरथरत हात जोडले

देवाचे गाऱ्हाणे कानात घुमले
घराची डागडुजी आहे
छप्पर परतायचे आहे
साफसफाई आहे
जुने टाकून नवे आणायचे आहे

वर्षानुवर्षे कुणी आलं नाही इथे
मीच एक परतलो आहे
कंदील मात्र शोधायचा आहे
कारण त्याच्या सोबतीनेच
आता रात्र घालवायची आहे

 
७-मार्च-२०१८

No comments:

Post a Comment