Saturday 10 March 2018

जाणाऱ्या क्षणाला

इथे खुर्चीत बसून आहे  
श्वास चालला आहे
त्याबरोबर चालले आहेत
विचार
तू कित्येकदा आलास 
कित्येकदा गेलास
न सांगता
दुर्लक्ष करून
दुर्लक्षित होऊन,
दार उघडून तू  आला नाहीस
मी तुला ना पाणी विचारले ना चहा
उन्हातून आलास  का?
कि थंडीवाऱ्यातून , पावसातून
इथे बस, बोल
असे काहीच म्हटले नाही तुला
मागे अनेक वर्षांपूर्वी
मीच होते का तिथे
चहा पाणी विचारयला
ती मीच का आणखी कोण
आज आहे इथे
त्यावेळची आणि आताची मी
एकच का?
आणखी काही वर्षांनंतरही
तू येतच राहशील 
येशील,  जाशील
मीही कधीतरी विचार करेन
मी आज आहे तशी
तेव्हा मला मी दिसेन ?
तुला हात दाखवला तरी
तुझ्याकडून प्रतिसाद नाही
बोलणार कसं
तुला वेळच नाही
थांबवून काय करायचे
सांगायला काहीच नाही
पण तुला
एक विचारायचे आहे
शेवटच्या क्षणी
येशील, भेटशील
तेव्हाही तू जाशील ?
की कायमचा माझ्याबरोबर
राहशील ?


-८- मार्च-२०१८




No comments:

Post a Comment