Thursday 22 February 2018

मी एक दिवा

मी एक दिवा
साधासाच, पितळी
काजळीने माखलेला
काळजीतही आहे

कोणी विचारलं, पुसलं
वात, तेल घातलं आणि
पेटवलं तर पेटेन

नाहीतर रिकामा
नुसतीच
वाट बघत बसेन

जेव्हा पेटतो तेव्हा
वाटतं काहीतरी घडतंय
माझ्या हातून

म्हणून तापत राहतो
अंग पोळलं तरी
एकटाच शांत राहतो

पण एकटेपणा सहन होत नाही
म्हणून तेल, वात
यांच्याशी बोलतो

ते बोलत नाहीत
तेही जळतात, ताप होतो
मग मीही जळतो, त्यांना जाळतो

मग कधीतरी
सारे शांत झाल्यासारखे वाटते
पण जळूनसुद्धा काही केल्या
आम्ही संपतच नाही

त्या जळालेल्या देहावर
कुणीसुद्धा फुंकर घालत नाही
माझ्या हातात असतं तर
त्यांचं आणि स्वतःचं
पेटणं पेटवणं बंदच केलं असतं

नको वाटतं, अंधारही मग
बरा वाटतो
पण मग ,

एकट्याला थंडपणाही सोसत नाही
पुन्हा तापण्याची
खुमखुमी येते

पुन्हा त्या पुसणाऱ्याची , तेलाची , वातीची
काहीतरी घडण्याची
वाट बघत बसतो

-२२-फेब्रुवारी-२०१८

No comments:

Post a Comment