हा एक आगंतुक. कुठून आला कोण जाणे? पण खोलीतील फरशीवर पडला होता. इथे का आला? मी थोडावेळ त्याच्याकडे बघितले. त्याला सतत गती होती. सतत हालचाल करत होता. दोन्ही बाजूनी त्याला पाय असल्यासारखी त्याच्या केसांची रचना होती. ही म्हातारी नाही. पण केस म्हातारी सारखे. त्या दोन्ही बाजूंच्या केसांच्या रचनेमूळे हा रिळा/चक्रासारखा सारखा पुढे पुढे जातो. मी त्याला एका प्लस्टिकच्या पेटीत बंद करून ठेवले. पण मग मला वाटले मी त्याला तुरुंगात टाकले आहे. म्हणून मी त्याला पेटीतून बाहेर काढायचे आणि सोडून द्यायचे असे ठरवले आहे, पण जोपर्यंत त्याची ओळख पटत नाही तोपर्यंत त्याला पेटीत राहावे लागेल. त्याला कुठेतरी जायचे आहे. पण मग तो इथे का आला?
हा देखील फरशीवर पडला होता. मला वाटलं मेला आहे. कचरा काढणाऱ्या बाईने त्याचा मृतदेह केरसुणीने अत्यंत वाईट पद्धतीने कचऱ्यात ढकलला असता, असं वाटून मी त्याला उचललं तर त्याने पंखांची पुसट हालचाल केली, 'हा जिवंत आहे' म्हणून मी त्याला तळव्यावर ठेवलं, एका सेकंदात एक अतिसूक्ष्म मुंगी माझ्या तळव्यावर गोंधळल्यासारखी फिरू लागली. ती त्या फुलपाखरांच्या देहातून बाहेर आली होती. ती बहुतेक त्याचा देह पोखरत होती. पण अचानक वातावरणात, पृष्ठभागात झालेला बदल तिला जाणवला असावा. त्या फुलपाखराला मी अशा ठिकाणी ठेवायचे ठरवले, जिथे त्याच्यावर कुणाचा पाय पडणार नाही, कुणी त्याला कचऱ्यात ढकलून देणार नाही. दोन गोष्टी मनात तरळून गेल्या: अशा फुलपाखरांचे पंख पकडून त्यांना पुस्तकात दाबून मारून टाकणारी चेटकीण, आणि एकदा मला असाच एक पाखा (मोठ्या फुलपाखरासाठी मालवणी शब्द) धडपडत असताना सापडला होता, त्याला मी बाहेर सोडणार तोच माझ्या मांजराने एकदम माझ्या हातावर उडी मारून धरलं आणि मी त्याला रट्टे मार मार मारले तरी त्याने त्याला खाल्ले. मी मांजराला जोरदार रट्टे लगावले. 'मांजार ता पाखो धरतालाच ता, तेचो धर्म आसा तो'
तर हे आजचे फुलपाखरू मी परत त्याला हाताच्या तळव्यावरून दुसरीकडे ठेवणार तोच माझ्या बोटांचा स्पर्श होताच परत पंखांची क्षीण फडफड करू लागले. मग मी त्याला एका ठिकाणी ठेवले, आणि म्हटले 'You can die here without disturbance. Nobody will disturb you anymore.'
No comments:
Post a Comment