Tuesday, 26 July 2016

खजुराहो अनुभव: चौसष्ट योगिनी : भाग ४

योगिनी मंदिरं आणि त्यांचे आश्रयदाते 

खजुराहो, मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश आणि चंदेल राजे
खजुराहो येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर चंदेल राजांनी बांधले. हे मंदिर नवव्या शतकातील असून आयताकृती आहे. ग्रॅनाईट दगडांपासून बनलेले हे मंदिर आता अत्यंत पडक्या अस्तित्वात आहे. या मंदिरातील फक्त तीन मूर्ती आज अस्तित्वात असून त्या मूर्ती मातृकांच्या आहेत. एक आहे महिषासुरमर्दिनी, दुसरी महेश्वरी आणि तिसरी ब्रह्माणी. चंदेल राजे दहाव्या शतकांपासून ते तेराव्या शतकापर्यंत मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशाचा काही भाग, यांवर राज्य करत होते. अत्यंत प्रभावशाली अश्या या राजांनीच खजुराहोची विलक्षण मंदिरं उभारली. या मंदिरांवरची कामशिल्पं आणि चौसष्ट योगिनींचे मंदिर हे दर्शवते की हे राजे शैव आणि शाक्त तांत्रिक उपासनांचे साधक होते. कीर्तिवर्मन या दहाव्या शतकातील राजच्या दरबारी असलेल्या कृष्णमिस्र याने लहिलेल्या 'प्रबोधचंद्रोदया' या नाटकात कपालिक संप्रदायाच्या साधकाचा जैन व्यक्तीला आपल्या उपासनेचे महत्व पटवून देणारा संवाद आहे. हे नाटक कपालिक या शैव तांत्रिक संप्रदायाच्या पार्श्वभूमीवर बेतले आहे. यावरून चंदेलांच्या काळात इथे शैव(कपालिक)-शाक्त(कौल) तांत्रिक साधना होत होत्या असे सिद्ध होते. आणि या उपसकांचे हे राज्यकर्ते आश्रयदाते होते. दहाव्या शतकापासून मध्य भारतात, अनेक परकीय मुस्लिम राजांच्या(गझनीचा मुहंमद इ.) स्वाऱ्या होते होत्या. आपले राज्य अबाधित राखण्यासाठी, साहजिकच इथल्या राजांनी योगिनी मंदिरांच्या उपसनेद्वारे आपले सैन्यबळ, साम्राज्यबळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले असावेत. 
चंदेल राजांनी खजुराहो बरोबरच जवळच्या प्रदेशात जवळपास आणखी आठ मंदिरे बांधली होती. आज त्यापैकी कुठलेच अस्तित्वात नाही. शाहदोल, बदोह, रिखियांन,लोखरी इ. ठिकाणची मंदिरे भग्नावस्थेत आहेत.  

भेडाघाट आणि कालचुरी राजे 
भेडाघाट, जबलपूर येथे असलेले योगिनींचे मंदिर अजूनही सुस्थितीत असून यातील एक्याऐंशी योगिनींच्या मूर्तीदेखील पडझड झालेल्या असूनही बऱ्यापैकी स्थितीत आहेत. हे मंदिर नवव्या शतकात त्रिपुरीच्या (त्रिपुरी म्हणजे आत्ताचे तेवर,जबलपूर) कलचुरी राजांनी बांधले. हे मंदिर नर्मदेच्या काठावर आहे. कलचुरी राजे शैव संप्रदायाचे उपासक होते. यांनींही या प्रांतातील आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी योगिनी मंदिर स्थापन केले असावे. तांत्रिक ग्रंथात एक्याऐंशी योगिनींची उपासना ही विशेषकरून राज्यसत्तांसाठी, त्यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी दिली गेली आहे.

मितौली, नारेसर आणि कच्छपघट राजे 
उत्तरप्रदेशातील मितौली हा ग्वाल्हेरच्या जवळचा भाग आणि नारेसर याठिकाणी चंदेल राजांचे मांडलिक कच्छपघट यांची सत्ता होती. यांनी नंतरच्या काळात चंदेलांचे मांडलिकत्व जुगारून देऊन, स्वतंत्र सत्ता म्हणून या प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यांनीच या भागांत मितौली आणि नारेसर इ.  ठिकाणी योगिनींच्या मंदिरांची स्थापना केली. नारेसर येथील मंदिर नवव्या शतकात तर मितौली येथील मंदिर दहाव्या शतकात बांधले गेले. यातले नारेसर येथील मंदिर आज भग्नावस्थेत आहे आणि त्यातल्या योगिनींची शिल्पे संग्रहालयात ठेवलेली आहेत. मितौली येथील मंदिर अजूनही बऱ्याच सुस्थितीत आहे. हे मंदिर कच्छपघट राजा देवपाल याने बांधले, या मंदिरावर असलेल्या अस्पष्ट अश्या शिलालेखावरून कळते की देवपाल आणि त्याची पत्नीने या मंदिराची उभारणी केली असावी. या शिलालेखात पुढे तेराव्या शतकाचाही उल्लेख आहे. ज्यात कछवाह या राजपूत राजाचे नाव आहे. ग्वाल्हेरचा परिसर त्या काळात राजपुतांच्या अधिपत्याखाली होता, त्यानंतरच्या काळात आलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये ग्वालेर आणि आजूबाजूचा परिसर मुस्लिमांच्या सत्तेखाली होता. तेराव्या शतकानंतर वाढत्या मुस्लिम सत्तांमूळे ही मंदिरं ओसाड पडली असावीत. 

हिरापूर आणि रानीपूर, ओरिसा 
ओरिसा येथील हिरापूर, भुवनेश्वर येथील मंदिर  नवव्या शतकात बांधले गेले. ओरिसामध्ये नवव्या-दहाव्या शतकात अनेक छोटेछोटे राजे राज्य करीत असल्याने हे मंदिर नक्की कुणी बांधले ते कळणे अवघड आहे. भूम-कारा, सोमवंशी, भांजा अश्या अनेक सत्ता तिथे होत्या. त्यापैकी भांजा हे शाक्त पूजक होते. हिरापूरचे मंदिर त्यांनी बांधले असण्याची शक्यता आहे. ओरिसाच्या आणि छत्तीसगढच्या सीमेजवळ असलेले, रानीपूर-झारियल येथील मंदिरही जवळपास याच काळात बांधले गेले असून  ते बहुदा सोमवंशी या राजांनी बांधले असावे कारण त्या काळात त्यांची सत्ता तिथे होती. हि दोन्ही मंदिरे बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहेत. आणि त्यातले हिरापूर येथील मंदिर सर्वात लहान योगिनी मंदिर आहे. हिरापूर आणि रानीपूर येथील दोन्ही मंदिरांत असलेल्या योगिनींमध्ये मातृका नाहीत. याचे कारण हे असावे की ओरिसात अन्य अनेक ठिकाणी मातृकांची वेगळी मंदिरं आहेत.हिरापूर येथील योगिनींचे मंदिर इतके गुप्त होते की भुवनेश्वरच्या जवळ पंधरा किलोमीटर अंतरावरच्या या मंदिराला प्रथम १९५३ मध्ये, केदारनाथ महापात्रा यांनी प्रकाशात आणले.

गुजरात, राजस्थान 
गुजरात आणि राजस्थान येथील राजपूत आणि अन्य राजांनी देखील योगिनी उपासनेसाठी मंदिरे स्थापन केली होती परंतु आज त्यातील एकही मंदिर अस्तित्वात नाही. राजस्थान आणि गुजरात मध्ये कागद आणि कापडावर योगिनी चक्र आणि योगिनींची लोककलाचित्रं मात्र अस्तित्वात आहेत. 

दक्षिण भारत 
आंध्रप्रदेशात योगिनी उपासना नवखी नसल्याची काही उदाहरणे त्यांच्या धार्मिक ग्रंथातून सापडतात. परंतु आंध्रप्रदेशात कुठलेही मंदिरचे पुरावे मात्र सापडले नाहीत. तामिळनाडू मधील कांचीपुरम येथे मंदिर नसले तरी योगिनींच्या मूर्ती मात्र सापडल्या आहेत. या चोल राजांच्या राजवटीतील आहेत. यावरून स्पष्ट होते की दक्षिण भारतातदेखील योगिनी उपासना आणि मंदिरे अस्तित्वात होती. 

आसाम, नेपाळ , काश्मीर, दिल्ली 
नेपाळ देशात आजतागायत मुख्यत्वे तांत्रिक उपासना होते, येथील सर्व महत्वाच्या तांत्रिक ग्रंथात योगिनी उपासना दिलेल्या आहेत. तरीही नेपाळ येथे एकही योगिनींचे मंदिर आढळत नाही. आसाम येथील कामख्या (Kamakhya) मंदिरातील दैनिक पूजेमध्ये योगिनींची नावं उद्धृत केली जातात. दिल्ली च्या बाह्यभागात असलेले योगिनीपुरा येथील मंदिर देखील योगिनींशी संबंधित आहे. काश्मीर हे सातव्या ते दहाव्या शतकापर्यंत शैव आणि शाक्त तांत्रिक उपासनेचे अत्यंत महत्वाचे केंद्र होते. येथील अभिनवगुप्त या नवव्या शतकातील पंडित तत्ववेत्याने  तांत्रिक साधनेवर अतिशय प्रगल्भ लेखन केले आहे. परंतु काश्मीरमधेही आता एकही योगिनींचे मंदिर अस्तित्वात नाही.
 

चौसष्ट योगिनींची शिल्पं प्रतिमा (Iconography )
 

अतिशय वेधक , गूढ , कल्पनारम्य आणि दैवी अशी ही योगिनींची शिल्पं आहेत. त्यांची शिल्पं विशेष आहेत कारण शिल्पकारांनी त्यांच्यापैकी काहींच्या निर्मितीसाठी  कलेतील रौद्र, बीभत्स, भयानकरसांचा अवलंब केला आहे.

योगिनींची उपासना असामान्य असल्याने त्यांचे रूपही असामान्य असले पाहिजे. तशीच हि शिल्पं आहेत. योगिनींचे मुख्य गुणविशेष त्यांच्या शिल्पात व्यक्त केले गेले आहेत.  योगिनींची नावं, त्यांचे विशेष हे सर्व या त्या ठिकाणच्या परंपरेने, तिथल्या ग्रामीण देवतांच्या प्रतिमांनी प्रभावित झालेले आहे. प्रत्येक योगिनीचे वाहन आहे. काही योगिनी वाहनरहितदेखील आहेत. काही योगिनी रूपे धारण करणाऱ्या आहेत. या शिल्पांमध्ये निरनिराळ्या प्राण्यांची मुखं त्यांनी धारण केली आहेत. योगिनींच्या साधनेत अवलंब होणाऱ्या मत्स्य, मांस, मद्य, मुद्रा(grain) या गोष्टींचा त्यांच्या शिल्पात थेट संदर्भ दिसत नसला तरी अनेक योगिनींच्या हातात कवटीचे भांडे(skull cup), मनुष्य मुंडके दिसते. काही शिल्पांत, त्यांच्या चर्येवरुन त्या मांस भक्षण करत असाव्यात असे वाटते. परंतु मैथुन या शिल्पांत कुठेही दिसत नाही. शवसाधना हा योगिनी उपासनेचा महत्वाचा भाग होता. त्याचे अनेक संदर्भ या शिल्पांत सापडतात. काही योगिनी शवाचा आसनासारखा उपयोग करतात. काही शिल्पांमध्ये योगिनींच्या आसनाजवळ सेवक, साधक शवासहित दिसतात.
योगिनींच्या मूर्ती उभ्या किंवा आसनस्थ किंवा नृत्य करणाऱ्या गतिशील पावित्र्यात आहेत. योगिनींच्या सर्व मूर्ती अलंकारांनी मढलेल्या आहेत. पैंजण, बाजूबंध, गळ्यातील कंठा, माळा, कमरबंध, केसातील आभूषणे, कानांतील डूल अश्या अनेक अलंकारांनी युक्त त्या आहेत. काही ठिकाणी अलंकार म्हणून सर्पाचे बाजूबंध, कामरबंधही त्यांनी परिधान केले आहेत. कानातील आभूषणे देखील सर्प, किंवा मानवी मुंडकी अशी भीषण देखील आहेत. त्यांच्या केशरचनाही अतिशय वैविध्य असलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही योगिनींचे केस (विशेषतः दक्षिण भारतातील)मोकळे सोडलेले, ऊर्ध्वकेशी(उभे असलेले)आहेत. काही योगिनी सुहास्यवदना आहेत, काही रौद्ररूप धारिणी तर काही भयरुपी आहेत. काहींच्या डोक्यामागे (दैवी वैशिष्ट्य दर्शविण्यासाठी) तेजोवलय (halo) आहे. यावरून असे वाटते की काही योगिनी मानुषी होत्या का?  काहींना दोन हात आहेत, पण अनेक योगिनींना दोन पेक्षा अधिक हात(चार, आठ, बारा इ.) आहेत. सर्वच योगिनींच्या शिल्पांच्या शरीराचा वरचा भाग अनावृत्त आहे.
या शिल्पप्रतिमांचे (iconography) सर्वात मोठे वैशिष्ट्य  म्हणजे योगिनींची विविध पशु मुखं आणि त्यांची वाहनं. यातली विविधता वाखाणण्यासारखी आहे. काही योगिनी वृक्षांवर राहणाऱ्या असल्या(ग्रंथातील संदर्भावरून) तरी वृक्षांचे संदर्भ शिल्पांत फारसे दिसत नाहीत.फक्त एकाच ठिकाणी एका गर्धभमुखी योगिनीचे वाहन वृक्ष आहे. आणि एकदोन ठिकाणी तिच्या मागे वृक्ष आहे पण हे फारच क्वचित दिसते. प्राणीपक्षीजगत मात्र शिल्पांत समृद्धतेने वापरले गेले आहे. अस्वल, ससा, सिंह, बिबळ्या वाघ, हत्ती, घोडा, मांजर, गाढव, सर्प, म्हैस(गाय/बैल), मेंढा, पक्षी,कोल्हा यांची मुखं धारण योगिनींनी धारण केली आहेत. या प्राण्यांबरोबरच विंचू, खेकडा, कासव, बेडूक, डुक्कर(रानडुक्कर), मासा, उंदीर, हंस, मोर, पोपट, कोंबडा, घुबड,  हरण(चितळ), एडका, इग्वाना (एक प्रकारचा सरडा) असे विविध प्राणी-पक्षी योगिनींचे वाहन झाले आहेत.
हिरापूर येथील योगिनी अत्यंत मोहक आणि अतिशय नेत्रसुखद आहेत. हि सर्व उभी शिल्पं आहेत. शिल्पाची कारागिरी अतिशय नाजूक आणि प्रमाणबद्ध आहे. या योगिनींच्या एक योगिनी स्वतःचे पैंजण नीट करत आहे. एक योगिनी शिकारी आहे हातातील धनुष्यबाण ताणून ती उभी आहे. एक योगिनी उंदरावरील दोन चक्रांवर तोल सांभाळत हातात डमरू घेऊन उभी आहे. या योगिनींच्या शिल्पात सौन्दर्यपूर्ण डौल आहे. येथील काही योगिनी पशुमुखी आहेत. अश्वमुखी, गर्धभमुखी योगिनी येथे आहेत. पशुमुखी असल्या तरी त्यांचे सौन्दर्य कुठेही कमी झालेले नाही.  एक योगिनी हातात कवटीचे भांडे घेऊन तोंडाला लावत आहे. हि सुराप्रिया असू शकते किंवा रुधिरपायनी, किंवा कपालिनी( हातातील कवटी म्हणजे शैव-कपालिकांचे भांडे) असू शकते. 

चामुंडा सदृश योगिनी आणि शिकार करणारी योगिनी
पोपट हे वाहन असलेली योगिनी आणि पैंजण ठीक करणारी योगिनी

चक्रावर तोल सांभाळणारी योगिनी आणि कोंबडा वाहन असलेली योगिनी (सर्व फोटो @ विकिपीडिया)
एक योगिनी चामुंडेच्या मूर्तीसारखी भयावह आहे. हि जी शिल्प-प्रतिमा आहे ती सर्वसाधारण देवीच्या अत्यंत रौद्र-भीषण रूपासाठी वापरली जाते. 'काली'/चामुंडा/चंडी' इत्यादी देवीची संहारी रूपे सौन्दर्य-विरक्त असतात. अत्यंत कृश, गाल बसलेले, बरगड्या बाहेर, ओघळलेले(sagging) वक्ष, वर आलेले मोठे डोळे असा काहीसा त्यांचा भयावह अविर्भाव असतो. येथील अनेक योगिनी त्यांच्या वाहनासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एक योगिनी तर हातात सूप (winnower) घेऊन आहे. या योगिनी मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाह्यभागावर रक्षक स्त्री मूर्ती आहेत. यांना काही पंडितांनी 'कात्यायनी' असे नाव दिले आहे. प्रवेशद्वारावर पुरुष द्वारपाल आहेत. 

रानीपूर झारियल येथील योगिनी (आणि भैरवमूर्तीही ) नृत्य करणाऱ्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या डोक्यामागे तेजोवलय नाही. यात वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं आहे मांजराचे मुख असलेल्या योगिनीचे. तिला बिदालीदेवी किंवा मार्जारी असे म्हणतात. आणखी एका योगिनीचे मुख चित्त्याचे आहे. तिच्या हातात शव आहे. अनेक ठिकाणी दर्शविलेल्या या शिल्पातील शवांच्या संदर्भावरून शवसाधना हे या योगिनींच्या उपासनेचे प्रमुख अंग होते असे दिसते. आता अस्तित्वात नसलेली एक योगिनी मूर्ती 'कनिंगहॅम' या पुरातत्ववेत्त्याने नोंदवून ठेवली आहे. जी सूर्याशी संबंधित होती. जिच्या हातात कमळ आणि पायाशी घोडे होते. अनेक मूर्ती कालांतराने मंदिरातून चोरल्या गेल्या. या सर्व मूर्ती वालुकाष्म दगडाच्या असल्याने शिल्पांचा दर्जा कालमानाने बराच ढासळला आहे. 

जिथपासून या योगिनींच्या शिल्पांचा, संकल्पनेची ओळख झाली त्या खजुराहो येथील मूर्ती मात्र काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. यातील फक्त तीन मूर्ती खजुराहोच्या संग्रहालयात आढळतात. त्या आहेत मातृकांच्या (सप्तमातृकांपैकी तीन). महिषासुरमर्दिनी, ब्राह्मणी आणि माहेश्वरी.

भेडाघाट येथील योगिनी मात्र बऱ्याच पडझड झालेल्या असल्या तरीही अजून बऱ्याच सुस्थितीत आहेत. या सर्व मूर्ती ओरिसा योगिनी मंदिरांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्या मागे तेजोवलय आहे, पायाशी सेवक, साधक आहेत. या मूर्ती नाजूक नाहीत तर शरीरसौष्ठवाने परिपूर्ण आहेत. या शिल्पांवर त्यांची नावे कोरलेली आहेत. इरुडी, सर्वोतोमुखी, इंद्रजाली , फणेंद्रि, अंतकारी अशी त्यांची नावं आहेत.

याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जी योगिनींची शिल्पं सापडली आहेत, ती रीखियान, शाहदोल, लोखारी, मितौली, दुधाई, हिंगलाजढ , बादोह आणि कांचीपुरम येथील आहेत. यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं आहेत. लोखारी येथील तर सर्व योगिनी या प्राण्यांची मुखे धारण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, सश्याचे मुख धारण केलेली योगिनी सासकनना, सर्पस्या ही योगिनी सर्पाचे मुख धारण केलेली. दुर्दैवाने यातील अनेक शिल्पं आज भग्नावस्थेत अस्तित्वात आहेत. सासकनना हि ससायोगिनी आता अखंडावस्थेत नाही, तिचे दोन भाग झाले आहेत. हि सर्व शिल्पे वेगवेगळ्या शिल्पकारांच्या कार्यशाळेतून निर्माण झाली आहेत. अशी ओरिसा मधील योगिनी शिल्पं ओरिसी शिल्पकलेचे नमुने वाटतात. मध्य आणि उत्तर प्रदेशातील शिल्पं तेथील शिल्पकलांच्या त्या काळातील परंपरेतून घडलेली वाटतात. याउलट दक्षिण भारतातील कांचीपुरम येथील शिल्पं 'चोल'(Chola) शिल्पकलेचे नमुने वाटतात. भारताचे हेच मोठे वैशिष्ट्य की एकाच संप्रदायातील एकाच उपासनेतही त्यांच्या मूर्तींमध्ये,नावांमध्ये  प्रांतानुसार कितीतरी विविधता आढळते.

योगिनींच्या शिल्पप्रतिमा देखील कल्पनारम्य, अनेक पैलूंनी युक्त आहेत. त्यांच्या हातांतील वस्तू त्यांच्या विशेषाच्या सूचक आहेत. उदाहरणार्थ सूप घेतलेली एक योगिनी हिरापूर येथे आहे. तशीच सूप आणि झाडू घेतलेली एक योगिनी कांचीपुरम येथे सापडलेल्या योगिनींत आहे. सूप आणि झाडू हे कृषी हंगामाचे (harvest) पीक येण्याचे प्रतीक आहे. मग ही योगिनी त्यासाठी(सुबत्ता, विपुलता, समृद्धी यासाठी) पुजली जात असण्याची शक्यता आहे. कांचीपुरम येथील एका योगिनीच्या हातात दंड(wand) आणि कमंडलू, पाण्याचे भांडे आहे. हि योगिनी रोगनिवारण करणारी आहे. नकारात्मक आणि सकारात्मक या ऊर्जांबरोबरच त्यांच्या शिल्पप्रतिमांतून या योगिनी बरेच काही व्यक्त करू पाहत आहेत.

लोखारी येथील ससाकनना योगिनी आणि कोल्हयाच्या मुखाची योगिनी (विद्या देहिजीया यांच्या पुस्तकातून)

Saturday, 23 July 2016

खजुराहो अनुभव: चौसष्ट योगिनी : भाग ३

योगिनींचे वर्तुळ

योगिनींच्या मंदिरांची रचना बहुतांशी वर्तुळाकार असते. क्वचित चौकोनीही असते. वरून बघितले तर वर्तुळाकार योगिनींचे चक्र आणि मध्यभागी असलेली भैरवाची मूर्ती ही रचना शिवलिंगासारखी  भासेल. परंतु याहीपेक्षा वर्तुळाकार रचनेची अनेक कारणे आहेत. वर्तुळ हे अत्यंत साधे पण प्रभावी चिन्ह आहे. ते पूर्णतेचे, प्रबोधतेचे (consciousness) प्रतीक आहे. वर्तुळ म्हणजे सर्व काही आणि वर्तुळ म्हणजे काहीच नाही. शून्यता. अनंतकाळ दर्शवणारे. वर्तुळाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कुठल्याही बिंदूवरून तुम्ही केंद्रापासून तेवढेच दूर असता. केंद्राकडे पोचण्याचा मार्ग वर्तुळाच्या कडेवरून सारखाच. वर्तुळ फिरते असले तर त्याचे बनते चक्र आणि त्यावरील गतिमान बिंदू पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतो. हे 'पुनरपि' असणे हेच वर्तुळाचे सामर्थ्य. 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं' असे चालू असलेले चक्र लहान लहान होत जात शेवटी केंद्रापर्यंत पोचले तर शून्यतेशी, वैश्विक स्पंदनाशी एकरूप होते.  शिव(भैरव) 'योगिनीं'ची मुख्य देवता. तीच सर्व विश्वचे मूळ त्यामुळे ती केंद्रस्थानी असते.तिच्यापर्यंत पोचता येते 'योगिनीं' द्वारे. 

योगिनींच्या वर्तुळाकार रचनेशी वर्तुळाच्या गुणधर्माचा असा संबंध आहे. हे योगिनींचे वर्तुळ एखाद्या पूर्ण फुललेल्या कमळपाकळ्यांसारखे वर्तुळाकार रचलेले आहे. केंद्राकडून फुटलेल्या पाकळ्या, आठ, सोळा, चोवीस, बत्तीस आणि शेवटी चौसष्ट होत गेल्या आहेत. प्रत्येक पाकळीवर योगिनी विराजमान आहे. त्या पाकळ्यावरून प्रवास करणारा साधक योगिनींकडून एकएक सिद्धी प्राप्त करत शेवटी केंद्रापर्यंत पोचतो. या 'सिद्धता' (attainment) मिळवण्याच्या उपासनेत वर्तुळापेक्षा शुद्ध आणि योग्य चिन्ह दुसरे कुठले असू शकते?

त्यामुळे योगिनींच्या मंदिरांचा आकार वर्तुळाकार आहे. याव्यतिरिक्त वर्तुळाकार मंदिरं फारशी सापडत नाहीत. प्राचीन स्थापत्यशास्त्राच्या ग्रंथात मंदिरांची वर्तुळाकार रचना नोंदली आहे. प्रत्यक्षात मात्र 'योगिनी' मंदिरं सोडली तर अश्या मंदिरांची रचना फारशी दिसत नाही.

तांत्रिक उपासनेत वर्तुळाला फार महत्व आहे. आणि उपासनेतील महत्वाच्या विधींसाठी वर्तुळाकार रचना महत्वाची ठरते. अशाप्रकारची उपासनेची अनेक योगिनी चक्रं तांत्रिक ग्रंथात दिली आहेत. प्रथम कागद, जमीन यांचा वापर करून अशी चक्र निर्माण केली जात आणि त्यांची Symbolic पद्धतीने उपासना केली जाई. नंतरच्या काळातच या चक्राकार रचनेवरून मंदिरं स्थापन करण्यात आली. 'योगिनी' मंदिरातील सर्व रचना, योगिनीच्या मूर्तींची विशेष जागा, मध्यभागाची मूर्ती हे सर्व तांत्रिक उपासनेच्या ग्रंथातून दर्शविलेल्या, नोंदलेल्या  विविध योगिनी चक्रांचेच आराखडे आहेत. अशी अनेक प्रकारची 'योगिनी' चक्रं या ग्रंथांतून अस्तित्वात आहेत. ज्या पद्धतीची उपासना, ज्या पद्धतीची सिद्धी प्राप्त करून घ्यायची त्या प्रकारच्या 'योगिनी चक्राचा' उपासनेसाठी अवलंब केला जाई.

तांत्रिक ग्रंथांमध्ये 'योगिनी' साधना प्रतीकरूपाने करण्याबद्धलही नोंद आहे. काही अतिशय प्रगल्भ ध्यानाच्या प्रकारात योगिनींची साधना शरीरातील स्थानांवरून होते. यातील आठ महत्वाच्या योगिनी देवतांचे स्थान शरीरातील महत्वाच्या चक्रांवर(मूलाधार,स्वाधिष्ठान,मणीपुर,अनाहत,विशुद्धि,आज्ञा,सहस्त्रार) असते. (कुंडलिनी इ. योगिक प्रकारांशी साम्य असले तरीही ही योगिनी साधना वेगळ्या प्रकारची असते. तरीही दोहोंमध्ये साम्य आहे)
तांत्रिक साधनेत चक्र, मंडळ आणि यंत्र याना महत्वाचे स्थान आहे. मंडळ म्हणजे देखील चक्रच. पण हे मंडळ चौकोनी देखील असू शकते. योगिनी आणि सप्त/अष्ट मातृका या वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरीही एकीपासून दुसरी बनली असावी किंवा दोन्हींत देवाणघेवाण असावी, त्यामुळे काही ठिकाणी 'योगिनीं' मध्ये मातृकांचा समावेश केला जातो. मातृकांचे मंडळ चौकोनी असते, बहुदा याच कारणासाठी खजुराहो आणि इतर काही ठिकाणची योगिनींची मंदिरे चौकोनी असावीत का? कारण खजुराहो येथील 'योगिनींच्या' मंदिरात एकही मूर्ती अस्तित्वात नसली तरी या मंदिरातल्याच असलेल्या (असे मान्य झालेल्या) तीन मूर्ती खजुराहोच्या संग्रहालयात आहेत आणि त्या मूर्ती मातृकांच्या आहेत. 'मंडळ' म्हणजेही एक प्रकारचे चक्रच. वास्तुशास्त्रात या 'मंडळा' ला फार महत्व आहे. वास्तूपुरुषमंडळ अजूनही वास्तूत निर्माण करून पुजले जाते. या मंडळाचे महत्व वास्तूचा (शरीर) आणि विश्वा(cosmos)शी संबध जोडण्यात आहे असे मानले जाते. 'यंत्र' हे देखील चक्र, मंडळं यांच्या आकृतीरूपाने तांत्रिक पद्धतीमध्ये महत्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा योगिनींच्या मंदिरांशी , त्यांच्या उपासनेशी थेट संबंध आहे. 

चौसष्ट ? एक्याऐंशी? बेचाळीस?

प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये संख्या आणि अंकशास्त्राला अतिशय महत्व आहे. आणि काही विशेष अंक शुभ मानले गेले आहेत. जसा आकडा चार आणि त्याचे गुणक आठ, बारा, चौवीस, चौसष्ठ, चौऱ्याऐंशी. आठ हा देखील शुभ. तर त्याचा वर्ग चौसष्ट तर अतिशुभ म्हणून चौसष्ट या आकड्याला धार्मिक संकल्पनांत महत्वाचे स्थान आहे. चौसष्ट कला/विद्या मानल्या जातातच. तांत्रिक उपासनांतही चौसष्ट आकड्याला महत्व आहे. त्यांच्या पंथात चौसष्ट मुख्य तंत्र आहेत. 'कौलार्नव'(Kularnava) या ग्रंथात दहाव्या प्रकरणात योगिनींची संख्या चौसष्ट दिली आहे. आठ कुलं आणि चौसष्ट योगिनी. 'कौलाज्ञाननिर्णय' या ग्रंथातही चौसष्ट योगिनींचा संदर्भ आहे. 'मतोत्तर' तंत्रात २ चौसष्ट योगिनींचे चक्रे दिले आहेत आणि एक एक्याऐंशी योगिनींचे चक्र दिले आहे.

 'अष्टाष्टक'(८ ग्रुप चे ८) हि देखील महत्वाची संख्या मानली जाते.नऊ हा आकडाही तसाच शुभ मानला जातो. नऊ मातृका आहेत. नवग्रह, नवदुर्गा यामुळे नऊ अंकालाही स्थान आहे. त्याचा वर्ग एक्याऐंशी हीदेखील काही ठिकाणच्या मंदिरातील योगिनींची संख्या आहे. बेचाळीस हा देखील तांत्रिक जगात महत्वाचा अंक आहे. 'भूतालीपी' हे योगिनींचे चक्र बेचाळीस योगिनींचे आहे. संस्कृतमधील बेचाळीस अक्षरांना तंत्रात महत्वाचे स्थान आहे. भूता(जिवंत), लिपी(अक्षरं). संस्कृतमधील अक्षरांना मातृका मानून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे कदाचित तांत्रिक उपासनेत त्यातल्या बेचाळीस अक्षरांना उपासनेत मातृकांच्या , योगिनींच्या रूपाने पुजले जात असावे.चौसष्ठ, एक्यांऐंशी , बेचाळीस या संख्या तांत्रिक ग्रंथातील तपशीलावरूनच आल्या आहेत. 

योगिनींचे अंतरंग

कौला पंथाच्या अनेक ग्रंथांमध्ये योगिनी आणि यक्षिणी यांच्यामधील संबंध दर्शविला आहे. 'यक्षिणी' ही संकल्पना 'योगिनी' पेक्षाही जुनी आहे.वृक्षांवर राहणाऱ्या, रक्षक, सुपीकता, सुबत्ता यांचे रूप म्हणजे यक्षिणी. बारहूत, सांची येथे 'यक्षिणीं'ची (वृक्षाला धरून, फांद्यांना धरून उभी असलेली) शिल्पे आहेत, ज्यांना शालभंजिका म्हणतात. कौलार्नव तंत्रातही योगिनी वृक्षावर स्थित असतात असे नोंदले आहे. हे वृक्ष कुलवृक्ष आहेत. यांना तोडणे, त्यांच्या खाली राहणे, त्यांची पाने तोडणे निषेधार्ह आहे. हा संबंध अप्रत्यक्ष असला तरी जैन ग्रंथात मात्र प्रत्यक्ष संदर्भ आढळतात. यक्षिणी सुद्धा योगिनींप्रमाणे 'सिद्धी' दायिनी आहेत. आणि त्यांचा योगिनींशी असलेला संदर्भ हे दर्शवतो कि योगिनी या संकल्पनेचे मूळ प्राचीन आहे. 

तांत्रिक ग्रंथांत, योगिनींची निर्मिती आठ महत्वाच्या देवतांपासून झाली आहे, असे नोंदले आहे. या आठ देवता आठ भैरवांच्या पत्नी आहेत. डाकिनी, राकीनी, लाकीनी, काकीनी, साकिनी, हाकिनी, याकिनी आणि कुसुमा अश्या या आठ देवता. याच देवता शरीराच्या चक्रांवर स्थित आहेत असेही अनेक ग्रंथातून दर्शविले आहे. चौसष्ट योगिनींची अनेक नावं उपलब्ध आहेत. परंतु कुठच्याही मंदिरात ही नावं सारखी नाहीत. अनेक ग्रंथातून दर्शवलेली नावंही सारखी नाहीत. 

योगिनींच्या साधनेमागे मूळ ध्येय मोक्ष, जीवनमुक्ती असले तरी त्यांची साधना ही अनेक प्रकारच्या शाररिक, भौतिक सिद्धी मिळवण्यासाठी होत होती. तांत्रिक ग्रंथांतून या सिद्धिंची चर्चा होते. खुद्ध शिवाने या सिद्धी बहाल केल्या आहेत असे या ग्रंथांतून सांगितले गेले आहे. या आठ सिद्धी पतंजलीच्या योगिक सूत्रात आणि राजा भोज याच्या स्थापत्यग्रंथातही दिल्या आहेत. या सिद्धी आहेत , 'अनिमा' म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म होता येणे, असे होऊन अतिसूक्ष्म अणूच्या अंतरंगात प्रवेश करून सर्व गोष्टींचे मूळरूप जाणणे शक्य होते. त्याचे आणि सर्वाठायीं असलेल्या ऊर्जास्रोताचे ज्ञान होते. 'महिमा' म्हणजे प्रचंड होणे , ज्यामुळे अनंतव्याप्तीचे आकलन होते. 'लघिमा' म्हणजे वजनरहित होणे. या सिद्धीने शरीरापासून मुक्त होऊन संचारी स्वरूप प्राप्त करता येते. 'गरिमा' म्हणजे अतिस्थूलता प्राप्त होणे. 'प्रकाम्या' म्हणजे अशी इच्छाशक्ती प्राप्त होणे ज्याच्या बळावर कुठलेही मन, कुणीही काबूत येऊ शकते. 'ईशित्व' म्हणजे शरीर आणि मन यावरचा ताबा, स्वतःच्या आणि इतरांच्याही (सर्व जीवसृष्टीच्या) , 'वशित्व' म्हणजे भौतिक गोष्टींवरचे प्रभुत्व, जसे पाऊस, अग्नी , पर्वत इ.  
'कामवसायिता' म्हणजे ज्याची कामना करावी ते प्राप्त करता येणे. या व्यतिरिक्त तांत्रिक ग्रंथात योगिनींच्या इतर अमानुषी सिद्धींबद्धलही बरेच विवेचन आहे. हे सर्व एखाद्या जादुई जगातील जादुई गोष्टींपेक्षा कमी नाही. नकारात्मक गोष्टींबरोबर सकारात्मक गोष्टींच्या सिद्धीही प्राप्त होतात. जसे 'कवित्व मनोहरम' हि सिद्धी श्रेष्ठ काव्यनिर्मिती करण्याची आहे.  

पारंपरिक हिंदू पुराणांतही योगिनींच्या अद्भुत शक्तींची नोंद घेतली गेली आहे. स्कंदपुराणांत योगिनींबद्धल असलेल्या तपशिलात  त्यांच्या अनेक सिद्धींबद्धल माहिती दिली आहे. काही तांत्रिक ग्रंथात कोणत्याही सिद्धींची चर्चा केलेली नाही परंतु सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती, रोगनिवारणशक्ती अशी या योगिनीच्या उपासनेची फळं दर्शविली आहेत. काही योगिनीचक्रांच्या उपासनेतून सामर्थ्य(विशेषतः राजकीय, शस्त्र, सैन्य सामर्थ्य ) प्राप्त होते असेही उल्लेख आहेत, हि योगिनी चक्र त्या काळच्या अनेक राजा, राज्यसत्तांकडून उपासिली जात असावीत. जश्या या योगिनी सिद्धी प्राप्त करून देतात तश्या त्या क्रोधीत होऊन शापतात असेही उल्लेख अनेक ठिकाणी आहेत. त्यांच्या या गूढतेमूळेच, त्यांच्यासभोवताली असलेल्या गुप्ततेमूळे, अमानुषी तत्वांमुळेच पारंपरिक धार्मिक संस्कृतीपासून त्या दूर राहिल्या असाव्यात. त्यांच्याशी जोडलेल्या गुप्त उपासना, त्यांची निर्जन मंदिरे, काही योगिनींचे भयकारी स्वरूप यामुळेच गावातील इतर जनांच्या मनात त्यांच्याविषयी भीती , आकर्षक गूढता निर्माण झाली असेल. 

योगिनींची साधनादेखील गुप्त, गूढतापूर्ण आणि जहाल स्वरूपाची असते. मद्य, मांस, रक्त यांनी परिपूर्ण अशी ही साधना असते, जीला अनुसरणे साध्यासुध्याचे काम नाही. त्याचा अवलंब करणारे या घोर उपासनेचे गुरुच आणि कठोर साधना करणारे साधकच या प्रकारची साधना करत असत. यामध्ये शवसाधना हाही एक भाग होता. अणि मैथुन हे देखील या साधनेचे महत्वाचे अंग होते. या साधना अतिघोरी, रक्तरंजित आणि भय उत्पन्न करणाऱ्या, असामान्य वाटल्या तरी एक मात्र आहे कि अश्या साधना, उपासना या आदिम जीवनाचे एक अंग आहे. हे नाकारून चालणार नाही कि समाज आता सुसंकृत झाला असला तरी धार्मिक कार्यात बळी (sacrifice) हे आजही अत्यंत महत्वाचे अंग आहे. त्याचे स्वरूप सौम्य झाले असेल परंतु आजही symbolic स्वरूपात sacrifice होत आहेत. योगिनींच्या साधनेत त्या मंदिरांत खरोखर कुठच्या प्रकारांचा अवलंब केला जात होता हे समजणे कठीण आहे. पण त्याचे स्वरूप कठोर, जहाल होते एवढे मात्र खरे. काही योगिनींची नावेच इतकी भयावह आहेत जशी मांसप्रिया, रुधिरापायीनी. योगिनींची काही रूपेही शव घेतलेली, मुंडक्यांच्या माळा घातलेली(मुंडधारीणी) आहेत. 

या सर्व गोष्टींवरून हे ध्यानात येते की अतिसौन्दर्यपूर्ण, गूढ आणि दैवी मूर्ती असलेल्या योगिनींशी एकप्रकारची नकारात्मक शक्तीही जोडलेली आहे. 

क्रमश:

Thursday, 21 July 2016

खजुराहो अनुभव: चौसष्ट योगिनी : भाग २

'योगिनी' या शब्दाचे अर्थ तर बघितले पण चौसष्ट योगिनींच्या मंदिरातील 'योगिनी' म्हणजे कोण? तर ही 'योगिनी' म्हणजे योगेश्वरी. एका अश्या संप्रदायातील 'साधकांची, योग्यांची ईश्वरी/देवता. 'योगिनी' ही खरंतर एक संकल्पना आहे. (पतंजलीच्या योगाशी या संकल्पनेचा थेट संबंध नाही). 'योगिनी' या संकल्पनेचा प्रवास प्राचीन काळापासून सुरू झाला. आणि ही संकल्पना उत्तरोत्तर बदलत गेली, तिचे स्वरूप विस्तृत झाले. तिच्यात बदल झाले. तर काय आहे ही संकल्पना?

याला एक सरळ उत्तर नाही. योगिनी ही शक्तीचे रूप आहे. योगिनी ही देवता आहे की सर्वोच्च सामर्थ्य असलेली अमानुषी शक्तींनी युक्त मानुषी स्त्रीचे रूप आहे हे नक्की सांगता येणार नाही. मध्ययुगीन भारतात, सातव्या-आठव्या शतकापासून शैव आणि शाक्त पंथ वाढीस लागले होते, त्यांचा प्रसार होत होता आणि त्याचबरोबर त्यांच्या उपासकांची संख्याही वाढत होती. शैव म्हणजे शिव-पुरुष तत्व. शाक्त म्हणजे शक्ती/पार्वती/माया/सृष्टी -स्त्री तत्व. या शैव आणि शाक्त उपासनेचे एक मुख्य अंग आहे तंत्र उपासना किंवा तांत्रिक उपासना. चौथ्या-पाचव्या शतकात तांत्रिक उपासनाचा उगम होऊन त्या वाढीस लागल्या. 
'योगिनी' या संकल्पनेचे मूळ 'स्त्री तत्वाचा  तांत्रिक उपासनेत सहभाग' यात होते.  पण या संकल्पनेचे मूळ धार्मिक, ग्रामीण, आदिम शक्ती, आदिम कल्पनांतही आहे.

'योगिनी' या संकल्पनेमागचा स्त्री-शक्तीचा, स्त्री तत्वाचा विचार आणि त्याचा उगम त्याआधीच्या प्राचीन काळापासून होत होता. प्राचीन काळापासून स्त्री तत्वाची वेगवेगळ्या पद्धतीने उपासना होत आहे. सर्वात प्राचीन आहे ती 'मातृदेवता'. संततीप्राप्तीसाठी ह्या संकल्पनेची पूजा होत असे. ही संकल्पना इतकी प्राचीन आहे की ती चार-पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधूसंस्कृती आणि जगातील अन्य ठिकाणीही सापडते. त्यानंतरच्या काळात मातृदेवतेची रूपे बदलली. ती फक्त मातृदेवता राहिली नाही तर रक्षण करणारी, क्रोधित होऊन रोगराई पसरवणारी आणि प्रसन्न होऊन रोगराईचे निवारण करणारी, अनेक शक्तींनी युक्त आणि त्या शक्ती उपासकांना बहाल करणारी अशी तिची अनेक रूपे तयार झाली. ही रूपे तयार होण्यामागे मानवी मनात खोल दडलेल्या भीती कारणीभूत आहेत. तसेच त्या भयापासून मुक्ती, इच्छा, आकांक्षापूर्ती, संरक्षण हि देखील महत्वाची कारणे आहेत. आर्य लोक वेदिक संस्कृतीमध्ये जसे त्यांना भय वाटणाऱ्या abstract शक्तींना देव मानत, जसे वरुण, आकाश, अग्नी, अरण्य.  तसेच स्थानिक लोकसंस्कृतीने आपल्या भयापासून मुक्त होण्यासाठी , सुरक्षित वाटण्यासाठी त्या भयाचे रूपांतर देवतांत केले, जेणेकरून त्यांच्या उपासनातून त्यांची कृपादृष्टी राहावी आणि कोणतीही इजा त्यांनी करू नये. याची किती उदाहरणे अजूनही सापडतात. 'मरीआई', 'देवी' या small pox आजाराशी संबंधित देवता. विंचू दंशापासून वाचवण्यासाठी  झालेली कोलारम्मा, small pox ची आणखी एक देवी:शीतलादेवी. तश्याचप्रकारे काही मातृदेवतांची रूपे बदलून त्यांचीही उपासना आपल्या मुलांच्या स्वास्थ्यासाठी, त्यांच्या उदंड आयुष्यासाठी होऊ लागल्या.

याचबरोबर धन देणाऱ्या, गुप्त शक्ती , सिद्धी, प्राप्त करून  देणाऱ्या, रक्षण करणाऱ्या वृक्षदेवता, यक्ष-यक्षिणी, डाकिनी, शाकिनी अश्या संकल्पनासुद्धा निर्मित होत होत्या. त्यांचे रूप, स्वरूप प्रांतवार, भाषावार बदलते होते.
या  बदलत्या देवतात मग शक्ती संपादन करणाऱ्या, सामर्थ्य आणि इच्छा-आकांशा बहाल करणाऱ्या देवतांची देखील निर्मिती झाली. प्रत्येक प्रांत, तेथील आचार-विचार, सांस्कृतिक जडणघडण, समजुती, प्रथा यावरून त्या त्या प्रांतातील लोकसंस्कृतीने आपापल्या परीने देवता अस्तिस्त्वात आणल्या. अजूनही सगळीकडे पाहिले तर, शिव, विष्णू, राम, कृष्ण या पुरुष तत्वाच्या देवतांपेक्षा स्त्री-तत्वाच्या देवता अधिक आढळतील आणि गावोगावी ही ग्रामदैवतं महत्वाच्या देवतांपेक्षा अधिक पुजली जातात. कोरजाई, केळबाई, जरीमरी, कमळजा, भराडी, शितळादेवी अशी किती नावं घ्यावीत. 'योगिनी' या देवतांच्या रूपाच्या उत्पत्तीमागे अश्याच देवता आहेत का ज्या एका विशिष्ठ गोष्टीसाठी पुजल्या जात होत्या आणि नंतर त्यांचे परिवर्तन या 'योगिनी' मध्ये झाले? जसे निराकार,निरपेक्ष भक्ती करणारे मन होते आणि त्याच्याकडून पुजल्या जाणाऱ्या देवता होत्या तसेच वश करणारे,अपेक्षापूर्ती करून घेणारेही मनच होते ज्याकडून पुजल्या जाणाऱ्या देवता क्रूर, अमानुषी सिद्धी असलेल्या, संहारी, भयकारी होत्या. सकारात्मक आणि नकारात्मक अश्या दोन्ही टोकापर्यंत 'योगिनी' संकल्पनेचा प्रवास झाला आहे.

आपल्या भयाचे, सामर्थ्य, सत्ता, धन आणि अनेक भौतिक सुखांचे, इच्छा, आकांक्षांचे रूप घेऊन 'योगिनी' अस्तित्वात आल्या. त्यांच्या निर्मितीमागच्या स्रोतापर्यंत, उगमापर्यंत अनेक जणांनी जाण्याचा प्रयत्न केला.

अनेक चाणाक्ष, विद्वान पंडितांनी ग्रंथच्या ग्रंथ उपसून काढले आहेत शोध घेण्यासाठी की 'योगिनी' संकल्पनेचे मूळ कशात आहे. त्यांना जावे लागले ते प्राचीन ग्रंथ, पुराणं, तांत्रिक ग्रंथांच्या प्रती या सर्वातून. त्याचबरोबर प्राचीन साहित्य (कथा, नाटकं, गोष्टी, काव्य ) यातूनही सखोल शोध घ्यावा लागला. आणि त्यांच्या हाती आलेले अनेक संदर्भ चक्रावून टाकणारे होते, कारण सुसंगती होतीही आणि नव्हतीही. उदाहरणादाखल एक अतिशय रंजक अश्या गोष्टींचा ग्रंथ आहे 'कथासरित्सागर'. हा ग्रंथ सोमदेव नावाच्या शैव पंथाच्या माणसाने ११ व्या शतकात लिहिला.('बृहत्कथा' नावाच्या अतिशय मोठ्या ग्रंथापासूनच हा बनला आहे) यात अनेक गोष्टी आहेत ज्यात 'योगिनी' सदृश स्त्रिया आहेत, त्यांचा उल्लेख चेटकिणी, यक्षिणी, अत्यंत सामर्थ्यशाली सिद्धी प्राप्त असलेल्या स्त्रिया, वृक्षदेवता असा आहे. यांचा उल्लेखही यात काही वेळेला 'योगिनी' म्हणून होतो. अश्या मानवी witches बरोबर काही देवतांचा उल्लेखही 'योगिनी' असा केला आहे. या प्रकारच्या देवता, शक्ती, स्त्रिया जैन आणि बुद्धिस्ट ग्रंथातही आढळतात. नंतरच्या काळात तर तांत्रिक बुद्धिझम ही जी बुद्धिझमची शाखा निर्माण झाली त्यातही 'योगिनी' संकल्पनेवर आधारित 'डाकिनी' नावाच्या देवता अस्तित्वात आल्या. 'जातककथा' या बौद्ध साहित्यातही योगिनी सदृश 'यक्षिणी'/'डाकिनी' आहेत. जैन संप्रदायातही त्यांच्या वाङ्मयात यक्षिणी आढळतात. या साहित्यात सापडणाऱ्या योगिनी सदृश देवता मंदिरातील तांत्रिक उपासनेच्या 'योगिनी' संकप्लनेशी कितपत संलग्न आहेत हे सांगणे तितके सोपे नाही. असेही असू शकते की त्या काळातील होणाऱ्या तांत्रिक उपासनांचे संदर्भ पकडून, त्यांचे रूपांतर काल्पनिक गोष्टीत केले असावे.

मनाचे जसे सात्विक रूप, तसेच राजसी, तामसी रूपही आहे. कुठे दयाभाव आहे तर कुठे संहारही आहे. मनाच्या कल्पकतेने निर्माण केलेल्या विश्वात अंतिम ज्ञान, मोक्ष,जीवनमुक्ती, eternal bliss किंवा जे काही ज्याचा सुप्त ध्यास मानवी मनाला असतो त्यावरूनच ते साधण्याचे अनेक मार्गही माणसाच्या मनाने कल्पिले. काही मार्ग सात्त्विकतेचे काही तामसी. त्यातूनच पारंपरिक (orthodox ) जे जे काही आहे त्याविरुद्ध जाऊन आपली वेगेळी वाट तांत्रिक उपासनेने तयार केली. त्याबद्धल अधिक बोलणे उचित नाही कारण माझे त्यातले ज्ञान अत्यल्प आहे. पण योगिनी हि संकल्पना मूळ अनेक स्रोतापासून, छोट्या झऱ्यांपासून ते झरे एकत्र होऊन , वाहणारी एक मोठी नदी झाली. तिचा उगम शोधणे तसे फारच खडतर आहे. आणि नक्की एक असा उगम तिचा नाही.

मूळ मातृदेवता या संकल्पनेपासून ते अनेक छोट्या सामर्थ्याच्या देवता, ग्रामदेवता, आदिशक्तीदेवता, शक्तीदायिनी, इच्छापूर्ती करणाऱ्या, संहार करणाऱ्या अश्या अनेक रूपांनी प्रवास करत 'शक्ती' रूपातील 'योगिनी' हि संकल्पना मंदिरातील 'योगिनी' च्या मूर्ती पर्यंत आली. योगिनी संकल्पनेचे मूळ खूप खोलवर गेले आहे आणि वाढणारा योगिनी वृक्ष अनेक शाखांतून, अनेक बीजातून अनेक पंथांतून आकार घेऊ लागला, पुढे पुढे बौद्ध तांत्रिक साधनेतही त्याचा सहभाग झाला. एवढेच काय वेदिक हिंदू धर्मातही त्याला स्थान मिळाले. अग्नीपुराण, कालिकापुराण आणि स्कंदपुराणात या योगिनींच्या उपासनेवर संदर्भ आहेत. ललितासहस्रनाम या देवीमाहात्म्यातही 'योगिनीं' चा समावेश आहे.

पण खजुराहो आणि इतर 'योगिनी' च्या मंदिरांबाबत बोलायचे झाल्यास त्यातल्या 'योगिनी' मुख्यत्वे तांत्रिक उपासनेच्याच भाग होत्या. आणि ग्रामीण देवतांपासून, ग्रामीण कल्ट पासून तांत्रिक उपासने पर्यंत त्यांची वाटचाल झाली होती. तांत्रिक उपासकांच्या पंथात कौला (कुल/कुळ) म्हणून जो उपपंथ आहे त्यासंबंधीच्या कल्ट्स मध्ये 'योगिनी उपासना' येते.  आणि ही मंदिरं  बांधण्यासाठी अनुदान देणारे राजे-राजसत्ता तांत्रिक उपासक होते. तांत्रिक उपासना ही वैदिक उपासनेपेक्षा अतिशय वेगळी आहे. पारंपरिक पद्धत असे  सांगते की अध्यात्मिक उन्नती संन्यासी, विरक्त भाव ठेवून होते. सर्व मोह, पाश यांचा अव्हेर करूनच माणूस परमपदाला पोहोचतो. तांत्रिक 'योगिनी' उपासना  याच्या अगदी उलट आहे. तंत्र आणि तांत्रिझम याबद्धल मी बोलायला असमर्थच आहे कारण तो खूप  मोठा विषय आहे आणि  त्याविषयी मला काहीही ज्ञान नाही. 'योगिनी' मंदिराच्या अनुषंगाने त्याचा संदर्भ टाळता येत  नाही कारण या 'योगिनी' मंदिराच्या मूळाशी तांत्रिक उपासनाच मुख्यत्वे आहे, त्यामुळे त्या विषयाच्या काठाकाठाने जावे लागेल. तांत्रिक उपासनेत जे काही पारंपरिक उपासनेत गुणग्राह्य, आणि महत्वाचे मानले जाते ते निषिद्ध मानून अंत्यंत वेगळ्या पद्धतीने शिव-शक्ती या दोन वैश्विक ताकदींची उपासना केली जाते. पारंपरिक उपासना जे निषिद्ध मानते त्यापैकी अनेक गोष्टींचा अवलंब तांत्रिक साधनेत होतो. उपासनेतल्या विधीत मत्स्य, मांस, मद्य, मुद्रा आणि मैथुन यांचा अवलंब होतो. उपासना ज्या शक्तींची होते त्या शक्तींचे स्वरूप रौद्र, संहारी असते. उपासना स्थळेही पारंपारिकरित्या निषिद्ध मानली गेलेली असतात. अनेक अद्भुत शक्ती, सिद्धी संपादन करून जीवनमुक्त होणे, transcendence , मोक्ष प्राप्त होणे हा या उपासनेचा मुख्य हेतू. कालांतराने यातील मोक्ष, मुक्ती हा भाग मागे पडून फक्त सिद्धी प्राप्त करणे हाही काही तंत्र उपासकांचा उद्देश बनला. 'योगिनी' ची उपासना हि देखील मुख्यत्वे अनेक शक्ती, सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठीच होत असे. परंतु तेवढेच त्यांचे महत्व नव्हते, त्यांचे मूळ उपसानेचे महत्व transcendence, जीवनमुक्तता हे होते. वैश्विक शक्तींशी एकरूप होण्याच्या त्या साधनं होत्या. त्यांच्या साधनेतून वैश्विकतेत  विलीन होणे हाच मूळ हेतू असावा. 

तांत्रिक उपासनेच्या पद्धती, विधी या गुह्य, गुप्त स्वरूपाच्या होत्या. तांत्रिक ग्रंथांमधील त्याचे संदर्भ, विधींचे स्पष्टीकरण, विवेचन हे गुप्त भाषेत आहे. या भाषेला 'संध्याभाषा' असे म्हणतात. उद्देश हाच की जो याचा साधक नाही त्याला या साधनांचा अर्थ कळू नये. 'योगिनीं'ची मंदिरं देखील निर्जन, गावकुसाबाहेरच्या ठिकाणी, मुख्यत्वे टेकडीवर बांधली गेली. खजुराहो मधील मंदिर मात्र बऱ्यापैकी मंदिरांच्या आसपास होते. (आता ते निर्जन, एका बाजूला वाटते, पण तसे ते त्या काळात नसावे कारण खजुराहो मध्ये ८५ मंदिरं होती. त्यामूळे येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर या समूहातच होते. ) याला कारण असे की खजुराहोची मंदिरं बांधणारे 'चंदेल' राजे हे स्वतः शैव -शाक्त तांत्रिक पंथाचे उपासक होते. भेडाघाट येथील मंदिर देखील अतिशय महत्वाच्या ठिकाणी, नर्मदेच्या घाटावरच आहे, हेही मंदिर 'कालचुरी' राजांनी बांधले होते. त्यामुळे असे म्हणता येऊ शकते की जिथे राजसत्ता तांत्रिक उपासक होती तिथले शहर तांत्रिक उपासना आणि उपासकांना आश्रय देणारे होते आणि त्या ठिकाणी ही मंदिरे उघडपणे धार्मिक कार्याचा भाग बनली होती.
 
नवव्या दहाव्या शतकात 'योगिनी' उपासना फक्त वैयक्तिक स्वरूपाचीच राहिली नाही आणि त्याला संप्रदायाचे स्वरूप आले. त्यात धार्मिक आणि राजकीय रंगही मिसळले गेले. राजे राजसत्ता मिळवण्यासाठी, सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी या उपासनांचे भोक्ते झाले. ज्या प्रकारची सिद्धी हवी, जे सामर्थ्य हवे, जी इच्छा पुरी व्हावी त्याला अनुसरून या देवता त्या त्या मंदिरात स्थापित झाल्या. मुळात या सिद्धी अश्या योग्याला विश्वशक्तीच्या जवळ नेण्यासाठी, एकरूप होण्यासाठी होत्या, परंतु या सिद्धी आपल्या सत्ता-सामर्थ्य वाढवण्यासाठी, आणि ऐहिक सुखांसाठी राजकीय पार्शवभूमीवर या उपासना exploit केल्या गेल्या असाव्यात.

अनेक तांत्रिक ग्रंथांमध्ये या योगिनींच्या साधनेबद्धल आणि त्याच्या वर्तुळाबद्धल माहिती आहे. त्यांच्या संख्येबद्धलही. शाक्त उपासना संप्रदायातील 'कौला'(कौला म्हणजे कुळ(clan) या उपसंप्रदायाचे ग्रंथ 'कौलार्णव' आणि 'कौलाज्ञाननिर्णय' योगिनींच्या उपासनेविषयी माहीत सांगतात. परंतु अश्या उपासना अतिशय गुह्य संध्याभाषेत असून फक्त गुरुद्वारेच त्याचे ज्ञान प्राप्त होतु शकते.

योगिनींचे वर्तुळ आणि त्याची उपासना हेही या मध्ययुगीन काळातील तांत्रिक उपासनेचे प्रमुख अंग बनले. हेही अत्यंत विशेषपूर्ण आहे की ठिकठिकाणच्या 'योगिनी' मंदिरातील योगिनी सारख्या रूपाच्या नाहीत. त्यांची संख्या सारखी नाही, त्यांची नावेही सारखी नाहीत. फक्त त्याचे एका ग्रुप मध्ये असणे महत्वाचे आहे. एक गट करून, एकजूट करून त्या राहतात. मग त्यांचे अस्तित्व सुटेसुटे आकळावे की एका गटामध्ये? त्या 'योगिनी' ना एकएकटे व्यक्तिमत्व आहे का? की त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे सार त्याच्या एकत्रित  असण्यात आहे? त्यांच्या शिल्पातून त्याच्याविषयी जाणावे तेवढे थोडेच आहे कुठेकुठे त्या सौम्य स्वरूपात दिसतात, कुठे रौद्र, कुठे भयानक तर कुठे बीभत्स स्वरूपातही दिसतात. ज्या गोष्टी पारंपरिक समाजाने repulsive, socially subversive ठरवल्या, त्यांचा पाठपुरावा या करतात. हि शिल्पंही अशीच. खजुराहोच्या इतर मंदिरात दिसणारी शिल्पे शांत, सात्विक, शृंगार रसातील आहेत. पण 'योगिनीं'च्या मंदिरातली  शिल्पे रौद्र , भयानक , बीभत्स रूपाचं दर्शन घडवतात. 

माझ्या मनात विचार येतो की आज जर खजुराहोच्या 'चौसष्ट योगिनीं'च्या मंदिरातील योगिनींची शिल्पे अस्तित्वात असती तर ती कशी असली असती? कुठे उडून गेल्या आहेत या योगिनी? का भव्य आभाळात संचार करण्यासाठी निघून गेल्या आहेत? कुणीही नसताना त्या परत आपल्या रिकाम्या खोरणात परतत असतील का?

क्रमश:

Wednesday, 20 July 2016

खजुराहो अनुभव: चौसष्ट योगिनी : भाग १

खजुराहो. मध्यप्रदेशातील अतिशय प्रसिद्ध ठिकाण. इथली इ. स. दहाव्या शतकातील मंदिरं बघण्यासाठी जगभरातून लोकं येतात. पंचवीसेक मंदिरं, त्यावरची अजोड शिल्पं आणि कलात्मकतेला आलेला पूर. या पुरात आपण वाहून जातो. शे-पाऊणशे फुटी मंदिरांकडे बघताना मुंगीसमान वाटायला लागते. शिल्पं तरी किती?  जिथे पाहावं तिथे शिल्पं. डोळे गुंग होतात, मती बधिर होते. काही म्हणून काही सुचत नाही. या पूर्णतेच्या अविष्काराने स्वतःची अपूर्णता अधिकच अंगावर यायला लागते. मग पळून जावेसे वाटायला लागते. या सौन्दर्याच्या जादूने आपण बंदिस्तही होतो आणि मुक्तही. डोळ्यांना सुखही वाटते आणि उदासीही. मन स्थिरही होते आणि अस्थिरही. या दोन टोकातील ताण घेऊन मंदिरंही उभी आहेत. सौन्दर्याचाही, परिपूर्णतेचाही त्रास होऊ शकतो कारण ते पेलण्याचे सामर्थ्य असावे लागते. खजुराहोमध्ये परिपूर्णतेचा साक्षात्कार आहे, तो पेलवत नाही. निसर्गाच्या अश्या अनेक साक्षात्कारपुढे आपण नमते घेतो. इथे तर तो मानवनिर्मित. मग काही बोलायलाच नको. 

मागच्या वर्षी मी खजुराहोची मंदिरं पहिली, तेव्हापासून त्याविषयी बरंच वाचण्याचा प्रयत्न केला. खजुराहोच्या मंदिरावर अनेक पुस्तकं आहेत, खूप लिहिलं गेलं आहे. तो सगळा गहिरा जलाशयच आहे. या जलाशयात थोडाफार विहार केला मग थोडं अधिक खोल पाण्यात उतरून या मंदिरांकडे बघावंसं वाटलं. म्हणून एक एक पायरी उतरू लागले. पण पायऱ्या जितक्या उतरत आहे तितक्या आणखी पायऱ्या दृश्यमान होत आहेत. बघू कुठपर्यंत उतरता येते ते. 

या प्रत्येक पायरीवर मला काही गवसतं का ते बघण्याचा प्रयत्न आहे. काही पायऱ्याही लांबलचक, उंच, काही शेवाळाने आच्छादलेल्या, काही अंधाऱ्या. अशीच एक पायरी आहे चौसष्ट योगिनींची.

खजुराहो येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर : ६४ रिकामी खोरणे (फोटो स्रोत: विकिपीडिया)
खजुराहो मधे असलेल्या भव्य मंदिरांपासून वेगळे असे एक मंदिर दूर उभे आहे. ते आहे चौसष्ट योगिनी मंदिर. 
एकटेच उभे असलेले हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा अतिशय वेगळे. त्याचे स्वरूप इतर मंदिरांसारखे नाही. एका विस्तृत चौकोनात, त्या चौकोनाच्या बाह्य रेषेने अनेक छोट्या छोट्या देव्हाऱ्या किंवा खोरणासारख्या दगडी रचना रांगेत, एकाला एक लागून आहेत. छोटी छोटी मंदिरेच. पण मुख्य चौकानाला वर शिखर, गोपुरेंच काय पण साधे छप्परही नाही. ही अशी विचित्र रचना का केली असावी? या विचित्रतेमुळेच या मंदिराने माझे लक्ष वेधून घेतले आणि त्याच्याबद्धल अधिक जाणून घ्यावेसे वाटू लागले. म्हणून त्याबद्धल वाचायला सुरवात केली. जसं जसं वाचत गेले तसं तसं दमछाक व्हायला लागली. एक निबिड अरण्यातून किंवा थांग नसलेल्या समुद्रात पडल्यासारखे वाटले. या मंदिरामागची भूमिका, इतिहास, प्राचीन 'कल्ट' (पंथ), पुराणिक संदर्भ, मध्ययुगीन संदर्भ, यातून मार्ग काढत काढत चाललेली वाट न संपणारी वाटत आहे. या चौसष्ट योगिनींनी मला पुरते झपाटून टाकले आहे हे मात्र खरे. 

कोण होत्या या चौसष्ट योगिनी? या मंदिरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या चौकटी देव्हाऱ्यात एकही मूर्ती आता नाही. कुठे गेल्या त्या सर्व? या मूर्ती कशा होत्या? आणि थोड्या थोडक्या नव्हे तब्ब्ल ६४.

योगिनी या शब्द संस्कृत 'योग' या शब्दापासून तयार झाला आहे. 'योग' या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.   म्हणजे एक होणं, एकत्र होणं. याबरोबरच संदर्भानुसार या शब्दाचे चाळीसेक वेगवेगळे अर्थ होतात. 'योग' या शब्दावरूनवरूनच 'योगीन' शब्द बनला आहे ज्याचेही अनेक अर्थ आहेत, जोडलेले असणे, बहाल असणे, जादुई शक्ती असणे, भक्त, साधक, ज्याला प्राप्ती झाली आहे असा, संन्यासी/संन्यासी स्त्री , जादूगार/जादूगारीण , मायाकार, मांत्रिक, इंद्रजालिक, 'योगा' ही तत्वज्ञानाची शाखा अनुसरणारा, चेटूक करणारा/करणारी, स्त्री साधक,शिव किंवा शक्ती (दुर्गा) यांचे गण/दास, योगी संप्रदायाची मुख्य(देवता).

या सर्व अर्थामधला नेमका या मंदिरातल्या योगिनींचा अर्थ कुठला? यासाठी आधी जाणून घेतले पाहिजे की हे मंदिर कश्या स्वरूपाचं होतं? इथे कशाप्रकारची साधना/पूजा होत होती, कोण होते हे लोक जे या प्रकारच्या मंदिरातील या देवतांचे उपासक होते? आणि या मंदिरातील आता अस्तित्वात नसलेल्या या मूर्तींचे स्वरूप नक्की काय होते? कुठे सापडतील या मूर्ती? खजुराहोमधील मंदिरात एकही मूर्ती अस्तित्वात नाही, या प्रकारची अन्य मंदिरं कुठे आहेत का?. तर अशी फार मोजकीच मंदिरं भारतात अस्तित्वात आहेत. त्यातली तीन चारच  चांगल्या अवस्थेत आहेत.

भेडाघाट, जबलपूर, मध्यप्रदेश येथील एक्याऐंशी योगिनींचे मंदिर (फोटो स्रोत: विकिपीडिया)

योगिनींची मंदिरं मुख्यत्वे उत्तर भारतात आहेत. दक्षिण, पश्चिम भारतात ती फारशी आढळत नाहीत. नवव्या आणि दहाव्या शतकांत या मंदिरांची बांधणी झाली होती. त्या काळात शाक्त संप्रदाय आणि त्याचे अनुसरण खूप वाढले होते. हे प्रमाण उत्तर भारतात जास्त होते कारण, शाक्त संप्रदाय हा उत्तरेकडे, काश्मीर इ. भागातच उगम पावला होता. साहजिकच जवळपास त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला.
तर ही योगिनींची मंदिरे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत, आता तिथे उपासना होत नाही. ती निर्जन, abandoned अवस्थेत आहेत. मध्यप्रदेशात खजुराहो, दुधाई, बादोह, शहाडोल, जबलपूरचा भेडाघाट, बारातसादेरी, हिंगलाजगढ येथे ही मंदिरं आहेत. ओरिसा मध्ये हिरापूर, रानीपूर-झारियल येथे दोन मंदिरं आहेत. उत्तरप्रदेश मध्ये मितौली, लोखारी, नारेसर,रीखीयान येथे अत्यंत पडक्या अवस्थेतील मंदिर अवशेष सापडतात. इथेतर मंदिर किंवा मंदिरांचे अवशेष तरी उपलब्ध आहेत, पण उज्जैन, अजमेर, भरूच, वाराणसी, दिल्ली ही सुद्धा पूर्वी योगिनींच्या मंदिरांची ठाणी होती. आता तिथे त्याचा काहीही मागमूस सापडत नाही.

मितौली, उत्तर प्रदेश येथील योगिनी मंदिर (फोटो स्रोत: विकिपीडिया)
ही मंदिरं अत्यंत वेगळ्या स्वरूपाची आहेत. छप्पर नसलेली (hypaethral), आकाशाभिमुख, दगडाची, वर्तुळाकार, एखाद्या ग्रीक कोलोझियम (Colosseum) ची आठवण करून देणारी. असा आकार भारतातील इतर हिंदू मंदिरात कुठेही आढळणार नाही. या वर्तुळाकार भिंतीत कप्पे, आणि त्या प्रत्येक कप्प्यात एक एक योगिनीची मूर्ती. योगिनींची संख्या फक्त चौसष्ठच नाही. काही मंदिरात त्या एक्याऐंशी आहेत, काहींत त्या बेचाळीस आहेत. आणि सर्व मंदिरांची रचनाही वर्तुळाकारच नाही, काहींची रचना चौकोनीदेखील आहे. या मंदिरांच्या मध्यभागी 'भैरवाची' मूर्ती असते. खरंतर ही मंदिराची वैशिष्ठयपूर्ण रचना (वर्तुळाकार दगडी गोल आणि मध्यभागी भैरवमूर्ती ) म्हणजे Top View ने बघितले तर शिवपिंडीचा(गोलाकार योनीपट्ट आणी मध्यभागी शिवलिंग) आकार नव्हे का? मग काही मंदिरे चौकोनी का? तर शिवपिंडीची चौकोनी रचना सुद्धा  अस्तित्वात आहे. मध्यप्रदेशातच भोजपूर येथील शिवमंदिरातील शंकराची पिंडी चौकोनी आहे. या मंदिरांच्या रचनेचा आणि शिवपिंडीच्या आकाराशी काही संबंध आहे का? योगिनींचा शैव आणि शाक्त पंथांशी घनिष्ठ संबंध आहे. भैरव हे तर शिवाचे रौद्र-संहारी रूप. मग या योगिनी संहाराच्या, रौद्रतेच्या आणि सामर्थ्याच्या भयकारी प्रतिमा आहेत का?

अतिशय वेगळ्या रचनेमूळे, आणि त्यातल्या अतिशय वेगळ्या योगिनींच्या मुर्तींमूळे अनेक अभ्यासकांचे याकडे लक्ष गेले. सर्वात प्रथम या योगिनींच्या मंदिरांचा अभ्यास केला 'विद्या देहेजिया' यांनी. १९८६ मध्ये त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, 'Yogini Cult And Temples: A Tantric Trandition'. या पुस्तकात त्यांनी सर्वप्रथम 'योगिनी' च्या कल्टबद्धल, या मंदिरांबद्धल, शिल्पांबद्धल विस्तृतपणे लिहिलं. त्यामुळे हे पुस्तक या संबंधीच्या अभ्यासातील 'अग्रगण्य' मानले जाते. त्यानंतर अनेक संशोधक, अभ्यासक, विद्वान यांनी या मंदिरांसंबंधी बरेच संशोधन, अभ्यास केला. अजूनही करत आहेत. कारण हा तसा न संपणारा विषय आहे.  त्यांनी पुस्तकरूपाने, प्रबंधरूपाने अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. या सर्वांचे वाचन म्हणजे एका अथांग समुद्रातील हिंदकळत जाणारा प्रवासच. बरं, प्रत्येकाने आपले तन, मन लावून आपल्या पद्धतीने, परीने या 'योगिनी मंदिरांच्या गूढाचे' संशोधन, अवलोकन , आकलन केले आहे. अनेक सिद्धांत मांडले आहेत, अनेक शक्यता दर्शविल्या आहेत. एवढे सगळे करून देखील 'योगिनीचे  गूढ' पूर्णपणे आकळले आहे असे नाहीच.

हिरापूर, ओरिसा येथील चौसष्ट योगिनींचे मंदिर (फोटो स्रोत:विकिपीडिया)
सर्वात कोड्यात टाकणाऱ्या आहेत या योगिनींच्या मूर्ती, त्यांची शिल्पं, त्यातून दिसणारी त्यांची विविध रूपं, त्यामागच्या प्रेरणा. त्यामागची गूढता. गुह्यता. कुठल्याही मंदिरात त्यांची रूपं सारखी नाहीत हे आणखी एक गूढ. विद्या देहीजिया जेव्हा योगिनींच्या मंदिराचा शोध घेण्यासाठी त्या काळात (ऐंशीच्या दशकात) भारतभर फिरल्या तेव्हा त्यांना दिसले की ही देवळे अशीच मुद्दाम पडक्या अवस्थेत सोडून दिलेली नाहीत, कालांतराने हा संप्रदाय/कल्ट आणि त्याची उपासना या मंदिरात होणे बंद झाले, आणि सामान्य लोकही या मंदिरापासून दूरच राहिले.  याला काही कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे 'भीती'. या मंदिरांबद्धल तिथले रहिवासी लोक मनात भय बाळगून आहेत. का बरे? असे काय आहे त्या मंदिरात? कुणी त्यांना ही भीती घातली आणि असे काय होत होते त्या मंदिरात ज्याची भीती वर्षानुवर्षे त्यांच्या मनावर पडून आहे?  माणसाचे मन किती विचित्र आहे, जे दिसत नाही, जे कळत नाही त्याबद्धल भीती वाटते त्याला. पण कितीही गूढ आणि वैचित्र्यपूर्ण असली ही मंदिरं आणि त्यातल्या मूर्ती, तरीही हे समजून घेतलेच पाहिजे की त्यांची निर्मिती मानवी मनानेच केली आहे. जसे सात्विक सौन्दर्य मानवी मनाने कल्पिले, योजले आणि अस्तित्वात आणले तसे बीभत्स, भयकारी सौन्दर्य ही कल्पणारे मानवी मनच आहे. त्यामुळे या मंदिराबद्धल जाणून घेण्यात फक्त तो कल्ट काय होता, उपासना काय होती? कोण त्याचे आचरण करत होते? एवढेच समजत नाही, या प्रश्नांच्या बरोबरच हेही समजते की मानवी मन आणि त्याच्या संकल्पना, विचार आणि जडणघडण कशी अनंत लीला घडवणारी आहे. हा 'चौसष्ट योगिनींचा' शोध नसून मानवी मनाच्या अश्या गूढगर्भाचा शोध आहे ज्यातून त्याचे खोल कप्पे उलघडू शकतात. थेट तळघरापर्यंत.


योगिनींबद्धल एक अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य हे की त्या खेचरी होत्या (उडू शकणाऱ्या), आभाळात मुक्त संचार करणाऱ्या. (आणि म्हणूनच त्यांची मंदिरं आकाशाकडे उघडलेली, बिनछपराची होती). पण योगिनींची भरारी ही खरी मानवी मनाची भरारी नव्हे का?

क्रमश: 

Tuesday, 19 July 2016

काफ्काशी संभाषण परत

रे काफ्का!, तुझं 'द ट्रायल' वाचलं काही महिन्यांपूर्वी. वाळवंटात फिरत आहे असं वाटलं. पाण्याचा टिपूस नाही. कडाक्याचं ऊन.  दूरवर फक्त एक पुसट रेषा. जमीन आणि आकाश यांना वेगळं करणारी. बाकी काही नाही. 
नुसता कंटाळा आला तुझं ते पुस्तक वाचून. काय शुष्क लिहितोस रे. आर्द्रतेचा मागमूस नाही. नुसता कोरडा ठणठणीत कसा तू असा? कसलाच ओलावा तुझ्या ठायी नाही. त्या तुज्या पानोपानी पसरलेल्या वाळवंटातून कंटाळून मी बाहेरच पडत होते, पडत होते काय, पळच काढत होते म्हण. तेव्हा शेवटी तडाखा दिसालासच ना? शेवटच्या पानात काय लिहून ठेवलं आहेस ते. त्याने पूर्ण वाळवंट परत एकदा तुडवावं असं वाटू लागलं, जीव गेला तरी बेहत्तर, तो जाणारच आहे वाळवंट तुडवताना हे माहीत असूनही मला वाळवंटात परतायचंय. 

शेवटच्या पानांनी मला ना दिसलेली 'ओयासिस' तू दाखवलीस. कुठे कुठे निवडुंग लावून ठेवलेस,  निवडुंगाची लाल फ़ुलं सुद्धा फुलली असावीत कुठे कुठे. उन्हाने काळवंडलेल्या, झापडं येणाऱ्या माझ्या म्लान डोळ्यांना कशी दिसायची ती? काय रे बाबा असं करतोस? आणि कशासाठी असं लिहितोस. तुझा प्रॉब्लेम तरी काय? पण तुला असं विचारणं अयोग्यच म्हणा. कारण तुला तर तुझं हे लेखन जाळून टाकायचं होतं. तशी सक्त ताकीद तू दिली होतीस तुझ्या मित्राला, मॅक्स ब्रॉडला. पण त्याने तुझं ऐकलं नाही. तू गेल्यानंतर, सरळ तुझी अर्धी-मुर्धी हस्तलिखितं त्याने प्रकाशित केली. तुझी ही 'ट्रायल' गोष्ट अपूर्णच. मला अपूर्ण गोष्टी अतिशय आवडतात. का कुणास ठाऊक त्या आपल्या वाटतात. पण तुझी गोष्ट अपूर्ण वाटत नाही खरंतर. ती 'मिसिंग' पानं न लिहून तू छानच जीव घेतला आहेस माझा. आता आयुष्यभर ती 'मिसिंग' पानं मी लिहू म्हणतोस ना? तेच म्हणणार तू रे!  मला माहीत आहे. आयुष्यभर तुझी ही गोष्ट आता काही पिच्छा सोडत नाही माझा. ती 'मिसिंग' पानं माझ्याच आयुष्याशी तर निगडित आहेत. 

हा जो 'के' आहे ना तुझ्या गोष्टीतला, 'जोसेफ के' , त्याला कळतंच नाही काय चाललंय ते आजूबाजूला. एका दिवशी अचानक तो सकाळी बिछान्यातून झोपेतून जागा होतो काय आणि त्याच्या घरी गार्ड्स येऊन त्याला अटक होते काय. कश्यासाठी हे त्याला सांगितलेच जात नाही. ते ज्यांना माहीत ते कोण हेही त्याला माहीत नाही. तुझ्या वाळवंटात मृगजळ भरपूर. मिराज रे! मिराज भरपूर!
'के' च्या हाती काही नाही. तो म्हणतो ठीक आहे. झालीय अटक तर जातो आता त्या प्रोसेस मधून. म्हणजे त्याने असे काही (गुन्हा, पाप) केले आहे का ज्यामुळे त्याचे मन त्याला सांगते 'तू गुन्हेगार आहेस', काहीही गुन्हा न करता ही अपराधी भावना येते कुठून? मग इतर निर्लज्ज लोक जसे उजळमाथ्याने फिरण्यासाठी धडपडत असतात तसं धडपडायचं. अपराधी, निरपराधी कोण ठरवतं? इतर की आपण स्वतःच. 

वावटळी आण मग. अगदी स्मोकी धुळीची वादळं आण, आणि सगळी धूळ डोळ्यात घाल, म्हणजे काय्येक  दिसता कामा नये. अरे काय ते एक एक प्रसंग, त्या वृद्ध मरणपंथीय वकिलाच्या घरचा, तो वकील, तो रुडी ब्लॉक , ती लेनी. कॅथेड्रल मधील तो प्रिस्ट आणि तो पेंटर टिटोरेली, त्याची ती गचाळ पेंटिंग्ज. भरपूर धूळ घाल डोळ्यात, काय्येक दिसू दे नको मला. नुसतं वाळवंटात हेलपाटवत ठेव. तुझे ते प्रिस्टचे संवाद, पेंटरचे संवाद मी शंभरवेळा वाचले तरी मला कळणार नाहीयेत आणि म्हणूनच ते मी परत परत वाचणार आहे. 

कधीकधी न कळलेलंच चांगलं. सुखी राहतो माणूस. कारण मला माहीत आहे मी जर ते पुस्तकात वाचले नाहीत तर मला ते खऱ्या आयुष्यात उमगतील. आणि उमगलेले पेलायला नको का? ते आपल्याच्याने जमणार नाही. त्यामुळेच मी वाचतच राहणार आहे, म्हणजे मग मला ते कधीच उमगणार नाही. 
तुला एकच सांगते, तू मागे तो तुझा कीटक घेऊन आला होतास ना, तेव्हा सांगितले होतेस ना? की विहिरीतली शेवाळं बाजूला करा मग लागलं हाताला तर एखादं कासवही गावेल, अरे तुला सांगते. तुझे शब्द खरे होता होता राहिले.

आमच्या घरी एक विहीर आहे. एकदम कडक उन्हाळ्याने ती सुकलीच जवळपास, तळाशी ५-६ बादल्या पाणी असावं. म्हणून तिचा गाळ उसपायला, माणसं बोलावली, आमच्यासकट ती माठच. सरळ उतरली खाली आणि गाळ उसपु  लागली बादली बादलीने. विहिरीबाहेर हा गाळ झाला. तू तिथे होतास का? तुझ्याने बघवला नसता तो माठपणा. असा माठपणा जिवंत माणसांनीच करायचा. तू जे सांगत होतास ते नव्हे हे. गाळ विहिरीच्या बाहेर. चिखलात बिचारे मासे तडफडताहेत. त्यांना वाचवलं कुणी? तर ज्यांची मनं अजून हिरवट शेवाळांनी हिरवीगार आहेत त्यांनी. तरीही एक मासा मात्र बंडखोर होता. त्याने वाचवणाऱ्याच्या हातातून उडी मारली आणि पडला चिखलात,  बहुदा त्याला जायचे होते खोल समुद्रात, तशी स्वप्नं बाळगूनच उडी घेतली त्याने पण पडला चिखलात. विहिरीतून वर दिसणारे अमर्याद आभाळच त्याला निळ्या समुद्रसाखे वाटले असेल, त्याला ही 'जलभूल' झाली असेल तर तो तरी काय करणार बिचारा. मेला आपल्या कर्माने, मेला अथांगाच्या ओढीने. इतर मात्र ढवळलेल्या गढूळलेल्या पाण्यात फसाफस श्वास घेत निश्वास टाकत जगले होते. त्यांनी आकाशाकडे बघण्याचेही टाळले असावे आणि त्या आकाशाला समुद्र मानून त्यात सूर मारण्याचा मूर्ख अट्टहासही दूर सारला असावा. विहिरीतील न  संपणारे वर्तुळ त्यांनी मान्य केले होते. त्यांना मुभा दिली तरी बाहेर जायचे नव्हते, ना जाणो चिखलात पडून जीव गेला तर, त्यापेक्षा हे परवडले. 

आणि हो! एक कासवही चिखलात रुतून बसलेले होते. त्यानेही विहिरीबाहेर येण्याचे योजले होते. म्हणून दडून बसले होते चिखलात. नंतर सगळे गेल्यावर हळूच पळून जायचे होते त्याला. दूर अथांग समुद्रात. त्या मेलेल्या  माशाशी संधान होते त्याचे, तो गडी कामास आला पण याने आपला पाय काढता घेतला नव्हता, खोल चिखलात छुप्या गनिमी काव्याने कासव बसून होते. पण आम्हा माठ माणसांनी त्याला उचलेले चिखलातून, काढले शोधून, यालाच म्हणतात अनुभव बरं का, अज्ञानाच्या प्रदेशात. आणि सरळ टाकून दिले परत विहिरीत. 
जेव्हा कासव परत पाण्यात गेलं तेव्हा मात्र मला कासव एकटं वाटलं. ते पुन्हा डोळे मिटून तळाशी जाऊन बसलंय. आता त्याची वर येण्याची इच्छा नाही. 
अरे काफ्का, इतका वेळ मीच बोलतेय, तू काहीच का बोलला नाहीस?
तेव्हा एकदम काफ्का चिडून म्हणाला 'मूढ आहेस. आणि माठही. तो 'जोसेफ के' म्हणजेच मेलेला मासा. आणि कासव म्हणजे ....... , जाऊ दे ! माश्या-कासवाची भेट कधी व्हायची नाही. तुम्ही सश्या-कासवाच्याच गोष्टी करा. लिहा , वाचा. माश्या-कासवाच्या गोष्टी तुमच्याने झेपायच्या नाहीत. 
चिडून लालेलाल होऊन काफ्का तरातरा निघून गेला.

मांजर अनुभव



१. 'आमचं नसलेलं' मांजर

मी पाचवी-सहावीत असताना आमच्याकडे एक मांजर होतं. त्याला नाव असं काहीच नव्हतं. 'मांजर' हेच नाव. महत्वाचं म्हणजे ते आमचं नव्हतं. आमच्या जवळ राहणाऱ्या एका शेजाऱ्यांचं ते मांजर होतं. अनेकदा त्याच्या मागे लागून मी त्याला आमच्या घरी आणण्याचा प्रयत्न केला, पण ते कधीही आलं नाही. पांढरं-शुभ्र, आणि अतिशय रागीट असं ते मांजर होतं. त्याच्याशी जास्त जवळीक केली तर ते डावली मारायलाही मागेपुढे बघायचं नाही. त्याच्याशी सलगी करणाऱ्या प्रत्यकाकडे तुच्छतेने बघत ते स्वतःच्या मनानेच इकडेतिकडे संचार करी, पण आमच्या घरात किंवा घराच्या आवारातही कधी चुकूनही त्याने पाऊल ठेवलं नव्हतं. पण एके दिवशी ते सकाळी आमच्या घरी आलं. त्याच्या आधल्या दिवशी माझ्या आजोबांची पुण्यतिथी होती. त्यांना जाऊन एक वर्ष झालं होतं. त्याबद्धल आईवडील गावी गेले होते. आम्ही त्या शेजाऱ्यांकडेच थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते सकाळी घरी आलं तेव्हा दार उघडताच कुठूनसे ते मांजरही आमच्याबरोबर घरात आलं. आम्हाला त्याच्या येण्याचे आश्चर्यच वाटलं, पण आलं असेल आमच्या मागून असं वाटून आम्ही त्याला घरात घेतलं, दूध घातलं, त्यानंतर ते आमच्या घरीच राहिलं, परत कधीही चुकूनसुद्धा त्या शेजाऱ्यांच्या घरी त्याने पाऊल ठेवलं नाही. यात मला काहीही गूढ सुचवायचं नाहीये, पण त्याचं  असं येऊन आमच्याचकडे राहणे अतिशय विचित्र होतं एवढे मात्र खरं. 

त्याच्या काही सवयी अतिशय कोड्यात टाकणाऱ्या होत्या. जसं त्याला जास्त जवळीक आवडत नसे, त्याला अंजारलं-गोंजारलं तर ते नख्या काढे आणि फाटकन डावली मारी. एक उंदीर, एक पाल त्याने घरात शिल्लक ठेवला नव्हता, आणि हे सगळं घरात बक्कळ खायला मिळत असताना. मी त्याच्याशी दोस्ती करण्याचा, त्याच्यामागून मागून  राहण्याचा खूप प्रयत्न करी पण ते बिलकुल दाद देत नसे, एखाद्या मालकासारखे ते शांतपणे बसून असे, आणि त्याची शांतता भंग करण्याचा, त्याच्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला तर हात फांजळलाच म्हणून समजा. त्याला एकच विलक्षण खोड होती, ते रोज सकाळी माझे वडील जिथे झोपत त्या कॉटवर उडी मारे, आणि झोपलेल्या वडिलांच्या पोटावर जाऊन बसे. त्यांच्या झोपेलेल्याच अवस्थेतच ते तसे पोटावर बसत असे, एरव्ही कधीही बाबांच्याच काय पण कुणाच्या अंगावर, मांडीवर कधीही ते बसलं नाही. बाबांनी झोपेत कुशीवर वळण्याचा प्रयत्न केला तरीही ते नखांनी कपड्याला धरून तसेच आपली जागा ना सोडता तिथेच राही. शेवटी बाबा  उठल्यावरच ते बाजूला होई, तोपर्यंत एखाद्या अढळ स्थानावर बसल्यासारखे ते तिथेच ठाण मांडून बसे. आणि रोज, न चुकता. यात जराही अतिशयोक्ती नाही, हे या मांजराचे मुलखावेगळे वागणे पूर्ण सत्य आहे. खाण्याबाबतीत अतिशय मिस्कील होते. दूध आणि मासे. तेही मोजकेच. जेवणासाठी 'म्याव म्याव' करून गोंधळ घालणे कधीही नाही. कुठल्याही गोष्टीत तोंड घालणेच काय पण समोर ठेवले तरी फक्त स्वतःसाठी  घातले असेल तरच खाईल. बहुदा आपल्याला खायला देणारच आहेत, त्यासाठी मागण्याची गरज नाही असा त्याचा पवित्र होता, त्याबाबतीत त्याचा राजेशाही ऐटच होता. गरीब मांजरसासारखे दुसरे खाताना मागेपुढे घोटाळणे नाही, विनवण्या नाहीत की अधाशी झडप घालणारा चोरटेपणा नाही. एक मात्र होते, त्याला बारीक शेव खूप आवडे. शेवाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीचा आवाज झाला की ते कान टवकारून बघे. पण पिशवी समोर ठेवली तरी स्वतःहून  फोडून त्यातला शेव त्याने कधीही खाल्ला नाही. घरात ते कधीही मारलेला सरडा, उंदीर आणत नसे, आणि कधीही घरात त्याच्याबद्धल स्वच्छतेला घेऊन कसलाच त्रास नव्हता. 

शेवटी त्याला कसलासा आजार झाला, त्याला व्हेटर्नरी डॉक्टरकडेही दाखवून आणले, त्या वेळी मी लहान असल्याने मला फारसे काही समजले नाही की नक्की काय झालं होतं, पण त्याला डॉक्टरकडे घेऊन मी आणि आई गेल्याचे मला आठवते. त्याला इंजेक्शनसुद्धा दिले होते. त्यानंतर अनेक दिवस ते आजारी होतं. आमच्या शाळा संपून सुट्या लागल्या होत्या. माझ्या मैत्रिणींबरोबर 'महाबली हनुमान' सिनेमा बघायला मी दुपारी जाणार होते. जवळच होते थेटर, तीन तासांचा सिनेमा. त्या दिवशी मांजर पडूनच होतं. मी जाऊन जाऊन त्याला बघितलं. अनेक दिवसांपासून ते अश्याच अवस्थेत होतं, फार काही खात नव्हतं. फक्त बाहेर जाऊन आपला कार्यभाग आटोपून येई. आईने त्याला बसण्यासाठी एक जुनं सूप( बांबूच्या पट्टयांनीं वळलेलं) दिलं होतं. त्या दिवशी दुपारी आई आणि मी बसून होतो, त्याला काही खायला घातलं तर ते खाईना. त्याने महत्प्रयासाने उठण्याचा प्रयत्न केला, पण ते उठू शकत नव्हतं. माझ्या तेव्हाच्या बालबुद्धीला तो प्रसंग तितका समजला नसेल पण आई आणि ते मांजर यांच्यात एक प्रगल्भ, अतिशय समंजस संवाद ना बोलताच चालला होता. मला माहीत नाही आईला त्याच्याकडून कसं समजलं पण तिला कळलं की त्याला आपला कार्यभाग आटोपण्यासाठी बाहेर जायचं होतं. जणू काही ते माणूसच आहे आणि मानवी बोल त्याला कळतील अश्या प्रकारे एखाद्या आपल्याच आजारी आप्त माणसाशी बोलावे त्याप्रमाणे आई त्याला म्हणाली 'काय नाय, हयसरच कर तू काय ता, काय्येक हरकत नाय.'  तेव्हा न जाऊन मांजराने थरथरतच तिथेच सुपात बसूनच लघवी केली. अगदी माणसासारखं त्या मांजराला असहाय अवस्थेत बाहेर जाऊन आपला कार्यभाग आटोपता आला नसेल म्हणून ते शरमलं असेल का? आईला मात्र तसे का वाटले, तिलाच माहीत. पण तिला इतके ठाऊक होते की मांजरालाही स्वतःची बुद्धी असते, स्वतःच्या शुद्धीत ते स्वतःहून कधीही घरात आपला कार्यभाग करणार नाही. तेव्हा आई आणि ते मांजर समजेच्या वेगळ्याच अदृश्य पातळीवर होती. 'आसांदे हा, काय्येक वाटान घेव नको तू.' असं काहीतरी त्यालाच सांगत आईने बाजूला फडका फिरवला. मग मला म्हणाली, तू जा सिनेमाला. मी तिला म्हटलं की मी जात नाही आता, त्याची तब्येत जास्तच बिघडलेली वाटतेय. तेव्हा आईने तरीही मला थोडेसे स्पष्टपणेच जायला सांगितले. मग मी सिनेमाला निघून गेले, संध्याकाळी घरी आले तेव्हा मांजर घरी नव्हते. त्याची टेबलाखालची सुपातील नेहमीची जागा रिकामी होती. मी निघून गेल्यावर काही क्षणातच त्याचे आयुष्य संपले. आईने त्याला त्या सुपातूनच नेऊन बाजूच्या माळरानात पुरले होते.

ते आमच्याकडे राहायला आले आणि ते आजारी पडून गेले हा फक्त एक वर्षांचाच काळ होता. जीवन कुठे संपवायचे याचा 'सिक्स सेन्स' मांजरांना असतो का?  कोण जाणे.


२. पिरट्याचे मांजर , १८ वर्षांचे

ही गोष्ट एका १८ वर्षाच्या मांजराची आई ने सांगितलेली. माझ्या मावशीच्या घरी हे मांजर होतं. हल्लीच त्याच्याबाबतीत एक अशी हकीगत मला आईने सांगितली. हे मांजर अतिशय म्हातारं होतं. जवळपास त्याचे शेवटचे दिवस जवळच आले होते. त्याच्या अंगावरची फर निघून गेली होती आणि ते अतिशय अशक्तही झालं होतं. घरात इथेतिथेच आपला कार्यभाग करून ठेवत होतं. त्यामुळे त्याचा रोजचा त्रास होत चालला होता. त्याच्या लहानपणीच त्याचा एक पाय अधू झाला होता त्यामुळे ते लंगडत लंगडत चाले. पण चांगलं धडधाकट होतं बाकी. मावशीकडे असलेल्या पिरट्या नावाच्या मुलाने त्याला सांभाळलं होतं म्हणून त्याला 'पिरट्याचा मांजार' असे म्हणत. आता म्हाताऱ्या अवस्थतेत घरातच जिथे तिथे कार्यभाग करण्यामुळे ते सतत ओरडा खात होतं. पण काहीही असलं तरी त्याची जगण्याची इच्छा राहिली असावी, याचा प्रत्यय घरातल्याना एकेदिवशी आला. घरात मासळी आणली होती आणि सर्वजण जेवायला बसणार तेव्हा ते कुठेसं माळ्यावर खोक्यात चढून बसलं होतं. तिथे ते कसं जाऊन बसलं हे मोठं कोडंच होतं पण त्याची उतरण्याची कमालच होती. त्याला खरं तर उतरता येईना, मग शेवटी अंदाज घेऊन त्याने वरून सरळ खाली उडी मारली, एकदम  भिरभिरलं,  घरातल्या सगळ्यांना वाटलं आता काही हे उठत नाही, पण तरीही त्याच्या अंगात शक्ती होती, सावरलं आणि जेवायच्या जागी आलं. मासे खाऊन तृप्त झालं आणि मगच तिथून बाजूला झालं. त्यानंतर एकादशीच्या दिवशी त्याने स्वयंपाक घरातच आपला कार्यभाग करून ठेवला, त्यामुळे वैतागून मावशी त्याला खूप ओरडली, म्हणाली 'आता परत असे केलेस तर शिल्लक ठेवणार नाही बघ तुला' तेव्हा ते जे रागाने गेलं ते मावशीचा मुलगा 'लवू' याचा गाडीच्या पुढच्या भागात जाऊन बसलं, (कारच्या पुढचा जो भाग असतो त्याच्या आतमध्ये थोडी मोकळी जागा असते तिथे, बऱ्याचदा मांजराची पिल्लं भीतीने तिथे लपून बसतात) तो जेव्हा गाडी घेऊन निघाला तेव्हाही त्याला समजलं नाही. त्याने गाडी आपल्या एक नातेवाईकाकडे नेली आणि तिथे बराच वेळ तो थांबला, तरी तिथेही मांजर बाहेर आलं नाही. नंतर तो जवळच्या बाजाराच्या गावी गेला. बाजारात गाडी जाताच काही लोकांना गाडीच्या खाली शेपटी दिसत होती म्हणून ते मागून हाक मारू लागले, पण त्याला काही ऐकू गेलं  नसावं, मासळी घ्यायची होती म्हणून त्याने गाडी मासळीबाजाराकडे नेली आणि तिथे उभी केली तर ते मांजर आपोआप बाहेर पडलं आणि मासळी बाजाराच्या दिशेने चालू लागलं. गृहत्याग त्याने स्वतःच केला का? मांजराची ओढ,घट्ट नातं जागेशी असतं, माणसांशी नाही. पण असा स्वतःहून गृहत्याग, क्षेत्रत्याग करून संन्यासासारखं मांजर मुक्कामी पोचलं. 

पक्षी जेव्हा अंतिम समय जवळ येतो तेव्हा एकटेच दूर निघून जातात. त्यांना स्वतःच्या अंताची चाहूल लागते आणि त्यासाठी एकटेच ते दूर रानात जातात. पण पक्षांप्रमाणे या मांजराने गृहत्याग करून अंतिम स्थान स्वतःच निवडलं असेल का?

३. मिस्टर फ्लफी

मिस्टर फ्लफी हा माझ्या भावाच्या सोसायटीतला भटका बोका. कुठेही असतो. काही हौशी पालक आपल्या लहान मुलांच्या आग्रहाने त्याला घरात घेतात. काही हौशी मार्जारप्रेमींमुळे त्याला 'कॅट फूड' आणि गुबगुबीत गादी पण मिळाली आहे, पण मिस्टर फ्लफीला आपले स्वातंत्र्य प्रिय आहे. तो बाहेर फिरणे, उंडगणे पसंत करतो. त्याचे मन मानेल तेव्हा सरळ लिफ्ट मधून प्रवास करतो. नाही ही अतिशयोक्ती नाही. त्याला काही लिफ्टचे बटण नाही दाबता येत. म्हणून तो लिफ्टकडे थांबतो. जे कुणी येईल त्याच्या पायात घोटाळतो. आणि त्यांनी बटण दाबून लिफ्टचे दार उघडले की आत जातो. मग जिथे लिफ्टचे दार उघडेल तिथे उतरतो. आणि तिथल्या दारावर 'म्याव म्याव' करतो. जर त्या घरात मार्जारप्रेमी असतील तर ते नक्कीच दार उघडतील या आशेने. बहुतेकदा त्याची ट्रिक लागू पडते. मग त्या घराचा पाहुणचार करून सोयी-सवडीने बाहेर पडतो. मग दुसरे घर, कंटाळा आला तर परत लिफ्टने बाहेर उंडगणे आहेच. सोसायटीत त्याचे इतरही काही प्रतिस्पर्धी आहेत, पण मिस्टर फ्लफीचे स्थान अढळ आहे. भटका असला, चार घरचं पाणी प्यायलेला असला तरी मिस्टर फ्लफीचा चेहरा एकदम निरागस आहे. आपल्या 'क्युटनेस फ्याक्टर' ने तो अनेकांना भुरळ घालतो. आणि त्यांनी हिरवा कंदील दिला की डुगूडुगू त्याच्या मागे धावत जातो. बसण्याच्या जागा पण ठरलेल्या. घरात आला तर सोफ्यावर, नरम गादीवर, उबदार रजईवर, असंच जे काही असेल तिथेच जाऊन बसणार. बाहेर पार्किंगमध्ये स्कुटर/बाईकच्या मऊ सीटवरच बसणार. पण त्याचे लिफ्टचे वेड मात्र सर्व सोसायटीश्रुत आहे. 

मिस्टर फ्लफी जर माणूस असता तर त्याला लिफ्टमनचा जॉब नक्कीच मिळाला असता. आणि जर तो जपान मध्ये असता तर एक मांजर म्हणूनच याच जन्मी त्याला लिफ्टमनचा जॉब मिळाला असता. इतके जपानी लोकं नावीन्यप्रेमी ('इन्नोव्हेटिव्ह') आहेत. जपानमध्ये एक 'टामा' नावाचे  मांजर 'स्टेशनमास्टर' आहे. हे भटकं मांजर होतं, त्या स्टेशनवर फिरायचं. जपानमधली लोकं जबरदस्त मार्जारप्रेमी. त्यामुळे त्यांनी या मांजरालाच स्टेशनमास्टर बनवून टाकलं. त्याबद्धल इथे छान माहिती आहे :  https://en.wikipedia.org/wiki/Tama_(cat)

अशाप्रकारच्या अजब गोष्टी जपानमधील अत्यंत 'झेनी'श आणि 'सामुराई'श आणि अतिशय वेगळी अस्थेटिकल जाण असलेले जगावेगळे जपानी लोकच करू जाणोत. 



४. टूथलेस

जेव्हा माझे वडील रिटायर झाले तेव्हा गावी, घर बांधण्यासाठी ते आणि आई तिथे एक वर्ष राहिले होते. त्या काळात घरात एक मांजर होतं. संपूर्ण काळं. हिरवे डोळे. चकाकती फर. अतिशय गुणी. अतिशय गरीब. दृश्य गुण समोरच दिसत पण गुणी, गरीब हे त्याचे गुण माझ्या वडिलांनी मला सांगितले. त्यांनी त्याचे खूपच निरीक्षण केले होते. हेही खरंतर शेजारच्या घरातलं मांजर. पण आईबाबा तिथे राहिल्यापासून ते त्याच्याकडेच राहू लागलं. माझे आई आणि बाबा दोघेही मांजरप्रेमी नाहीत. कधीही मांजराला हात लावला आहे त्याला पाळलं आहे असे नाही. पण त्यांना त्याची घृणाही नाही. मांजर या प्राण्यांबाबतीत ते अतिशय तठस्थ. त्यामुळेच बहुदा मांजराने त्यांना निवडले असावे. असे म्हणतात की मांजर स्वतःच 'तुम्हाला' निवडते. तुम्ही मांजर निवडू शकत नाही. त्याप्रमाणे हे काळे मांजर आमच्या त्या गावच्या घरी त्यांच्यासोबत राहू लागले. 

खरंतर संपूर्ण काळं मांजर अनेक लोकांना भीतीदायक वाटतं. पण मला ते अतिशय आवडतं, अतिशय सौन्दर्यपूर्ण वाटतं. कारण ते अतिशय agile असतं. काळ्या विजेसमान त्याचा संचार असतो. याला मीच 'टूथलेस' असं नाव ठेवलं कारण मध्यंतरी आलेल्या एका ऍनिमेशन चित्रपटात एका संपूर्ण काळ्या दात नसलेल्या ड्रॅगनचं नाव 'टूथलेस' होतं. या मांजराचा चेहरा थेट त्या ड्रॅगन सारखा दिसायचा म्हणून 'टूथलेस'. तसे त्याचे दात चांगलेच शाबूत होते. 

त्याची सर्वात महत्वाची खासियत जी माझ्या बाबानी मला सांगितली ती अशी की ते अतिशय प्रेमळ होतं. हा गुण मांजरांत फारसा आढळत नाही. त्याचं एक पिल्लू होतं जे आता बरंच मोठं झालं होतं तरीही काहीही खायला घातलं की 'टूथलेस' बाजूला राहून बघत राही. जोपर्यंत आणि जितकं त्या दुसऱ्या मांजराला(त्याच्याच  पिल्लाला) खायचं असे तोपर्यंत  ते स्वतः अन्नाला तोंड लावत नसे. त्याचं खाऊन झालं की मगच आपण ते जे उरलं ते खात असे.

वर्षभर माझे आईवडील तिथे राहत होते, तेव्हा ते त्यांच्याबरोबरच असायचं. माझे वडील वर्षभरानंतर तिथून परत आले आणि परत कधीही जाऊ शकले नाहीत. त्यांना बांधायचं होते ते घर मात्र पुरं झालं. नंतर जेव्हा जेव्हा आम्ही त्या नवीन घरात गेलो तेव्हा 'टूथलेस' काही क्षणातच तिथे हजार होई. आणि मग तिथून आम्ही जाईपर्यंत हालत नसे. जणू काही ते त्याचे स्वतःचे घर असल्यासारखे, ते येत असे. आम्ही आलो हे त्याला कसे कळत असे कोण जाणे कारण नवीन घर त्या शेजारच्या घरापासून दूर आहे. 

एक दोन वर्षांपूर्वी 'टूथलेस' म्हातारं होऊन मरून गेलं. आता त्याचं ते मोठं झालेलं पिल्लू मात्र त्याच्याप्रमाणेच आम्ही गेलो रे गेलो की घरात हजार होतं. 'टूथलेस' असताना देखील ते येई पण फक्त शुक्रवारीच. म्हणून त्याला एक विशेष नाव पडलं होतं.



५. शुक्रवार मांजर

हेच ते 'टूथलेस' चं मोठं झालेलं पिल्लू. त्याचं नाव 'शुक्रवार मांजर' , कारण ते 'टूथलेस' असताना फक्त शुक्रवारीच येई. हे मी स्वतः बघितलं आहे. एकदा मी गणपतीच्या दिवसात गावी (जेव्हा आईबाबा तिथे राहत होते त्याच वर्षी ) गेले होते. गणपतीचे दिवस होते, त्यामुळे मासे आणण्याचे काही चिन्ह नव्हते, तरीही बरोब्बर ११-१२च्या दरम्यान ते पांढरं-करडे मांजर हजर झालं आणि चुलीपाशी ठाण मांडून बसलं. तेव्हा मला कळलं की ते तसं दर शुक्रवारीच फक्त यायचं. कारण शुक्रवार हा गावच्या बाजाराचा दिवस, त्यादिवशी बाजारात भरपूर मासे यायचे आणि आमच्या घरीदेखील मासे असायचे. त्यामुळे दर शुक्रवारी येणारच. बरोबर शुक्रवार त्याला बरा कळायचा. वाट पाहायचं आणि मासे नसतील तर वाट बघून बघून निघून जायचं पण दर शुक्रवारी फेरी मात्र ठरलेली. 'टूथलेस' गेल्यानंतर मात्र आमच्या नवीन घरी जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा हे 'शुक्रवार मांजर' नवीन घरात हजर होतं. आणि मग कुठे फ्रीझवर, नाहीतर बाकड्यावर, बसून झोपून राहतं. हे ही मांजर आता जवळपास ७ -८ वर्षांचं असेल. आता दर शुक्रवारी त्याला येत येत नसेल पण ते आम्ही गेलो की कायमस्वरूप घरी स्वतःचं घर असल्यासारखं ठाण मांडून बसतं. जेव्हा आम्ही तिथून परत येतो तेव्हा त्याला अक्षरश: घरातून उचलून बाहेर ठेवावं लागतं.

Sunday, 10 July 2016

राहून गेले!

आपल्या जीवनात कित्येकदा असे क्षण येतात ज्याचा आनंद त्या वेळी त्या परिस्थितीत घेणे काही कारणामुळे शक्य होत नाही. मग जुने गेलेले ते क्षण आठवले की उरते मनात फक्त  हळहळ. अरे रे! हे अनुभवायला हवे होते, हे बघायला हवे होते, असे करायला हवे होते. अशा गोष्टी, असे क्षण आपल्या  हातातून  निसटून जातात. राहून जातात. मग कधीतरी त्याची आठवण काढून आपण म्हणतो. अरे! हे करायचे राहून गेले!
माणसाचं मन इतकं सहज बदलणारं, उनाड, सतत उंडारणारं असतं. आता या क्षणी वाटेल ते दुसऱ्याच क्षणी वाटेलच असं नाही. मनाला गतविश्वात रमायलाही आवडतं. आता ते दहा वर्ष मागे जाईल तर आत्ता पाच वर्ष तिथून पुढे येईल. हा बराचसा अनैच्छिक स्मृती (involuntary memory) चा खेळ आहे. आपण स्वस्थ बसलो असता, एकदम कुठल्यातरी संदर्भामूळे आपल्याला गतकाळातील असंबद्ध गोष्ट आठवते. आणि आपण पूर्णपणे विसंगत जगात हरवून जातो. मग अश्याही गोष्टी आठवतात ज्यांचा आपल्याला पूर्ण विसर पडलेला असतो. मनाच्या एका एका अदृश्य कप्प्यांतून त्या प्रकट होत जातात.

असाच अनुभव मला आज आला. मी जे पुस्तक वाचत होते त्यात असा काहीसा संदर्भ होता की एका झाडाच्या काही विशिष्ट फांद्याही biological variations दाखवू शकतात. एखाद्या वनस्पतीला फुटणारे धुमारे पूर्णपणे वेगळे वैशिष्टय घेऊन वाढू शकतात. जेव्हा मी  हे वाचत होते तेव्हा मला involuntary memory चा प्रत्यय आला. ही आठवण माझ्या वडिलांविषयी होती. रिटायर झाल्यानंतर एकदा ते माझ्याकडे दोन दिवस राहायला आले होते. तेव्हा सहजच गॅलरीजवळ गप्पा मारत असताना तिथल्या गुलाबाच्या झाडाविषयी मी त्यांना विचारले. ते स्वतः कृषीपदवीधर होतेच पण त्याहीपेक्षा त्यांचे त्या विषयातले स्वानुभवातून गोळा केलेले field knowledge अफाट होते.

माझ्याकडचे गुलाब मी विकत आणले होते. जेव्हा आणले तेव्हा त्याला एकदा गुलाबी फुल फुलले, तेवढेच. त्यानंतर मात्र ते सरसर वेलीप्रमाणे वाढतच गेले. फुले-बिले काहीच नाही. त्याबद्धलच मी बाबांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ते गुलाब कलम केलेले होते. जे खरे कलम होते, ज्यावर फुले फुलतात ती फांदी जगली नाही, आणि जे सरसर वाढत होते ते साधे रानगुलाब होते ज्याला क्वचितच  फुले येतात. मग त्यांनी मला थोडी 'ग्राफ्टिंग' (कलम कसे करायची) ची माहिती सांगितली आणि म्हणाले की मी तुला चांगलं गुलाबाचं कलम करून देतो. याबद्धल मला शंकाच नव्हती कारण लहानपणी त्यांना आंब्याची कलमं करताना मी बघितलं होतं. पावसाळ्यात त्यांच्या ओळखीचे लोक त्यांना आंब्याच्या बाठ्या आणून देत, त्या रुजवून रोपं तयार करून त्यावर हापूस किंवा तत्सम चांगल्या जातीचे कलम ते स्वतःच्या हाताने एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे कल्पकतेने करीत. आईलादेखील त्यांनी ते तंत्र शिकवले होते आणि तीदेखील या कामात त्यांना मदत करे. मग अशी पाच-पन्नास रोपे ते लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये अशीच वाटून टाकीत असत. फुलापानांविषयी, झाडांविषयी त्यांचे ज्ञान शिकाऊ नव्हते तर प्रत्यक्ष अनुभवातून, स्वतःच्या मेहनतीने संपादन केलेले होते. झाडे तर त्यांच्या आवडीची. एखाद्या नारळाच्या झाडाला नारळ का धरत नाहीत याचे अचूक कारण ते नुसतं त्या झाडाला बघून सांगू शकायचे आणि उपायही सुचवायचे, किंवा झाड बघून त्याला असणाऱ्या समस्यांचे निदानही करायचे. कितीतरी लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांना आपल्या शेतात-बागांत घेऊन जायचे. 

त्या दिवशी गॅलरीत जेव्हा ते माझ्याशी गुलाबाच्या कलमाबद्धल तासभर बोलत राहिले तेव्हा मला ते अतिशय वेगळेच वाटले. ते नेहमीचे माझे 'बाबा' नव्हते.  मी कोणीतरी शेतकरी किंवा एखादा त्यांच्या क्षेत्रातीलच शेतीतज्ञ, वनस्पतीतज्ञ असावा तसे ते माझ्याशी बोलत होते.त्याचा चेहरा उजळून गेला होता. गुलाबाचे कलम कसे करतात याची सुंदर कहाणीच ते मला सांगत होते आणि सांगताना त्यांच्या डोळ्यात विशेष चमक होती. त्यांनी सांगितलेल्या माहितीचे स्वरूप थोडक्यात असे होते जे मला आजही आठवत आहे, गुलाबाच्या कलमांसाठी विशिष्ट जातीच्या गुलाबांचे खुंट वापरतात. हे खुंट जितके चांगल्या जातीचे तितके गुलाबाचे कलम चांगले बनते. 'रोझा इंडिका ओडोराटा' असे खुंटासाठी वापरल्या जाणाऱ्या एका गुलाबाचे नावही त्यांनी सांगितले. या खुंटांपासून रोपे बनल्यानंतर, त्यावर कलम केले जाते. तेही एका विलक्षण पद्धतीने. या रोपाला नुकत्याच येऊ घातलेल्या फांदीला हुडकून तिथे खाच केली जाते. त्या खाचेतून खरंतर खुंटाच्या रोपाचे जीवन फांदीरूपाने वाढू शकले असते. पण त्या खाचेत पाहिजे त्या कलमी गुलाबाच्या तश्याच एका फांदीचा कोंभ लावला जातो. आणि त्याला सीलबंद केले जाते, त्या खाचेतून वाढण्यासाठी. आता त्या खाचेतून  यापुढे वाढणारा तो नवीन अनोळखी कोंभ, परकायेतून आलेला, त्यापासून बनणारी फांदी म्हणजेच पुढे जाऊन एक कलमी राजेशाही गुलाब म्हणून ओळखली जाणार असते. याला 'डोळा भरणे' असे म्हणतात. खुंटाच्या रोपावर पाहिजे त्या जातीच्या गुलाबाचा 'डोळा भरून' ते पुढे त्या जातीचे कलम म्हणून जगते. खुंट आपली सर्व शक्ती त्या कलमी गुलाबाच्या डोळ्यालाच देतो. स्वतःचे अस्तित्व विसरून. आणि हा नवीन, परकायी  डोळाच सर्व जग पाहतो. खुंटही त्या डोळ्यातूनच मग दृष्टीला प्राप्त होत असावा. स्वतःचे काटे सावरत तो खुंट नव्या डोळ्याला जगवतो, वाढवतो. स्वतःचे अस्तित्व विसरून, त्याचा त्याग करून दुसऱ्या परक्या जीवनाला स्वतःहून सामावून घेणे आणि त्याचा डोळा आपला मानून त्यातुनच सारे जीवन बघणे असा चमत्कार फक्त त्या वनस्पतींनीच काय तो करावा, माणसाला ते साधणार नाही. खरंच एवढ्याशा गुलाबाच्या झाडामागे केवढी कहाणी आहे. बाबा एवढं सांगूनच थांबले नाहीत तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी स्वतः रोप करून देतो असेही आश्वासन दिले. एवढं  उत्साही मी त्यांना त्या काळात क्वचितच पाहिले होते, कारण रिटायर होण्याच्या आधीचा बराच काळ ते ऑफिसचं बैठंकाम करीत, अनेक वर्षांपूर्वीच्या शहरातील बदलीमुळे शेतकऱ्यांशी त्यांचा व्यक्तिगत संबंध खूपच कमी झाला होता. प्रत्यक्ष भेट घेऊन सल्ला देणे बंदच झाले होते जवळजवळ. त्यांची जी खरी ऊर्जा होती ती मातीवर रुजणाऱ्या खऱ्याखुऱ्या झाडांत, पानाफुलांत होती, ती ऊर्जा, ती मनापासूनची आवड, ते ज्ञान अव्यक्तच राहू लागले होते, आणि बैठ्या कागदोपत्राच्या, द्वेष-चढाओढीच्या नोकरीत ते पार धूसर होऊन गेले होते. ते जेव्हा अश्याप्रकारे मला दिसले तेव्हा मला खूप खंतही वाटली. 

दुसऱ्या दिवशी काही कारणांनी गुलाबाचे कलम त्यांना काही करता आले नाही. ते पुन्हा येऊन कलम करतो, असे सांगून निघूनही गेले. आणि गुलाबाचे कलम काही झाले नाही. त्यांना ते कधीच करता आले नाही, कारण त्यानंतर एक वर्षातच अचानक ते कायमसाठीच निघून गेले.  आज १० जुलै,  त्यांचा वाढदिवस. या दिवशी मला ही गोष्ट  प्रकर्षाने जाणवली, गुलाबाचे कलम राहून गेले! आणि त्याचबरोबर त्यांना असलेले पानाफुलांचे, झाडांचे, त्यांना पोखरणाऱ्या कीटकांचे, अतिशय सखोल आणि स्वतः जमवलेले ज्ञान संचित करायचेही राहून गेले. मीही ते कधी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, माझ्याच कामात, व्यवसायात मी व्यस्त राहिले. त्यांना रिटायर झाल्यानंतर या स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांना व्हावा म्हणून काम करायचे होते, तेही राहून गेले! 

अश्या असंख्य गोष्टी राहून जातात. त्या  आपल्याशी निगडित असतात, किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींशी निगडित असतात. वेळ निघून गेली असेल तर मागवून त्याबद्धल आपल्याला खंत वाटत राहते. म्हणून एखादी गोष्ट आपल्याला करावीशी वाटत असेल, आणि शक्य असेल तर बस्स! ती तेव्हाच करून टाकावी.

Monday, 4 July 2016

निमिष मात्र मनचक्षुची त्रिविधा

१.
टेडी, डोरेमॉंन आणि मास्क
समोरच्या कचऱ्याच्या गाडीवर, जाता जाता दिसले,  
टेडी-डोरेमॉंन बसलेले , मुक्त झालेले
आता पावसापाण्यात-थंडीवाऱ्यात, शहरभर फिरतील.
उन्हातान्हात , मास्कबरोबर रमतगमत गाडीची साथ करतील.



२. 

My search begins when I close my eyes
The search is never ending taking me thousand miles

Thousand miles still more to cross
The journey so far, to and from places in my heart

There's this place never visited, that I search
I believe its present, without its existence

That's the place where I would like to be
A place so quiet like that alone tree

But the address is lost and the way unclear
Its far away but to my heart it still seems near

Small steps, long steps or no steps everyday
To see the glimpse of the darkest ray

Several milestones achieved and several undone
The traveler, the road and the destination is one 




३. 
 
I walk the lonely street 
contemplating ..... 
 to go where and whom to meet 


~ विवेकानंद सामंत.

'पोस्टाचं तिकिट' ते 'काजळरेघ'

हिल वुमेन १९३५
अमृता शेर गिल..हे नाव ऐकलं की मला तिचं एकच चित्र डोळ्यासमोर येतं, तेही कुठल्या आलिशान गॅलरीत बघितलेलं नव्हे तर पोस्टाच्या तिकिटावरचं विरलेलं , अनेकांचे हात लागून सुरकुत्या पडलेलं  फिकट, निळसट,ऑकर आणि सेपिया रंगाचे तरल असं चित्र  'हिल वूमेन'. अमृता शेर गिल या नावाशी पहिल्यांदा माझी ओळख कधी झाली हे आठवण्याचा प्रयत्न केला तर काळाचे अनेक धूसर पडदे बाजूला सारावे लागतील, ते थेट माझ्या आयुष्यातल्या तिसरी-चौथीतल्या शालेय काळापर्यंत. तो काळ असा होता जेव्हा चित्रांशी माझा दूरदूरचा सुद्धा संबंध नव्हता. आणि अमृता शेर गिल या नावाशी माझी ओळख होणं म्हणजे निव्वळ योगायोग होता. माझ्या चित्रविषयक जाणिवांशी त्याचा काडीचाही संबंध नव्हता. लहानपणापासून चित्रकलेत गती होती, पण चित्रकलाविषयक मार्गदर्शन सोडाच पण त्याचा आवाका, त्याचे महत्व याबद्धल मला पुसटशी जाणीवही नव्हती. अमृता शेर गिल हे नाव मात्र तेव्हापासून लक्षात राहिले ते फक्त एका पोस्टाच्या तिकिटावरून. तेव्हा मला पोस्टाची तिकिटे गोळा करायचा छंद होता. तिच्या 'हिल वुमेन' या चित्रावर पोस्टाचे तिकीट सत्तरच्या दशकात निघाले होते. ते माझ्या तिकिटांच्या संग्रहात होते. या छोट्याश्या तिकिटावरचे ते चित्र आणि अमृता शेर गिल, ही दोन्ही नावं कायमची लक्षात राहिली आणि माझ्यासाठी तर तिचे हे चित्र आणि तिचे नाव एकमेकात मिसळून गेले.

अमृता शेर गिल बद्धल अनेक वर्षांनंतर कलेशी पुन्हा हातमिळवणी केल्यानंतर नव्याने ओळख झाली. तिच्याबद्धलची उपलब्ध सर्व माहिती वाचली, लायब्ररीतील तिची काही चरित्रंही वाचली. तिची नव्याने होणारी ओळख पूर्णपणे झपाटून टाकणारी होती. त्याहूनही झपाटून टाकणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिची चित्रं.

अमृता शेर गिलचा जन्म १९१३ साली हंगेरीतल्या बुडापेस्टमध्ये झाला. तिची आई हंगेरियन आणि वडील भारतीय (शीखसंप्रदायाचे) होते. तिचे वडील अत्यंत विद्वान होते. ते कवी तर होतेच पण त्याबरोबरच संस्कृतचे आणि पर्शियन भाषेचे गाढे अभ्यासक होते. आई पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा अभ्यास असलेली अतिशय चांगली पियानो वादक आणि गायिका होती. अमृताला कलेचा वारसा दोन्हीकडून मिळाला. त्यातल्यात्यात आईकडून जास्त, कारण तिला कलेची ओळख, ओढ लावण्यामागे आईचा प्रथमपासून सहभाग होता. अमृताने उत्कृष्ट पियानोवादक व्हावे अशी तिची इच्छा होती. त्यामुळेच अमृताने लहानपणी संगीताचे आणि पियानोचे धडे घेतले. त्यात ती अतिशय निपुणही झाली. ती लहानपणी चित्रेही काढत असे. पण जेव्हा चित्र आणि संगीत या दोघांमधे निवड करण्याची वेळ आली तेव्हा मात्र तिने चित्र निवडले. ती स्वतःच म्हणते की 'मला दोन्हींबद्धल प्रेम आहे, पण जेव्हा मला समजले की मी दोन्ही डगरींवर पाय देऊन पुढे जाऊ शकत नाही, कुठल्यातरी एकातच मला माझं सगळं ओतून पुढे जावं लागेल तेव्हा मी चित्रकला निवडली'. असे असले तरीही अमृताने पियानोची साथ आयुष्यभर सोडली नाही. जेव्हा ती अतिशय उदास होई तेव्हा  तासंतास एकटीच पियानोचे सूर  छेडत बसून राही.

अमृता आणि तिची लहान बहीण इंदिरा या दोघांनाही त्यांच्या आईने संगीताचे शिक्षण दिले, पण आई विशेषतः अमृताबाबतीत जास्त महत्वाकांक्षी होती. अमृताच्या कलाविषयक गुणांची जाणीव आणि कदरही तिला पुरेपूर होती. जन्मापासून ११ वर्षांनंतर (पहिल्या महायुद्धाच्या काळात) अमृता आईवडिलांसमवेत भारतात आली, आणि शिमला येथील उच्चभ्रू हिल हाऊस मध्ये राहू लागली. तिथेच राहणाऱ्या इटालियन शिल्पकाराशी अमृताच्या आईचे संबंध जुळले. तिने त्याच्याकडून अमृताला कलेचे प्राथमिक धडे देण्याचाही प्रयत्न केला. काही काळानंतर जेव्हा तो शिल्पकार पॅरिस येथे निघून गेला तेव्हा अमृताच्या आईने मुलींना घेऊन पॅरिस गाठले, कारण असे की अमृता आणि इंदिराचे रीतसर केलेचे शिक्षण व्हावे.(प्रत्यक्षात मात्र ती शिल्पकाराच्या ओढीने आली होती) काही का असेना पण अमृताला इथे कलाविषयक शिक्षण घेता आले. तिच्या आईचे शिल्पकारावरचे प्रेम काही यशस्वी  झाले नाही परंतु अथक परिश्रम करून अमृताने चित्रकलेत नैपुण्य संपन्न केले. तो काळ Post-Impressionism, Cubism चा होता. पोस्ट इंप्रेशनिझम मागे पडून 'आंन्रि मातीस', 'पिकासो', 'ब्राख' यांचा 'मॉडर्न आर्ट' चा काळ येऊ घातला होता. हे चित्रकार आपल्या चित्रकलेच्या नानविध प्रयोगांनी पुढे येत होते. अमृताची या काळातील म्हणजे १९३० ते १९३३ या काळातील चित्र ही पाश्चात्य शैलीतील आहेत.
डाव्या बाजूची दोन चित्रं : व्यवसायिक मोडेल्सची आहेत. उजव्या बाजूचे चित्रं: बॉय  विथ ऍपल्स
हि चित्रं अभ्यासचित्रं असली तरी यातूनच तिच्या विशेष शैलीची, आणि तिच्या व्यक्तिमत्वाची छटा दिसते. तिचे व्यक्तिमत्व म्हणजे एकाचवेळी फुलपाखरासारखे बागडणारे बहिर्मुख  आणि अतिशय गहन,विचारमग्न अंतर्मुख असे दोन्हीही.
जोरकस रेषा , रंगांची घनता, विशेषतः योग्य तिथे उजळ रंगाचा वापर, पण चेहऱ्यावरचे भाव मात्र खोल काहीतरी शोध घेणारे, आत्ममग्न, उदासी, हे विशेष तिच्या या काळातील अभ्यासचित्रातही दिसतात. यामूळे तिची चित्र फक्त तिची वाटतात. ती या तिच्या सुरवातीच्या चित्रांमध्ये लाल रंगाचा अतिशय निर्भीड वापर करताना दिसते. व्यक्तिचित्रणात व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव जणूकाही तिच्या भावांचे प्रतिबिंब घेऊनच येतात. तिच्या व्यक्ती Melancholic आहेत. खोलवर पाहणाऱ्या, विचारात मग्न किंवा आत्ममग्न होऊन स्वतःतच बुडालेल्या. ती या चित्रांतून स्वतःलाच शोधात असल्यासारखी वाटते. काहीशी गोंधळली, काहीशी बेधडक, काहीशी आत्ममग्न, काहीशी अस्वस्थ. अमृता एकतर अतिशय बहिर्मुख होऊन जाई किंवा अतिशय अंतर्मुख. तिच्या या दोन टोकातील ताण बहुतेक तिलाच पेलवत नसे. त्यामुळेच तिची आंतरिक जडणघडण या असह्य ओढाताणीत Melancholy(उदासी) कडे झुकली असावी.
अमृता आपल्या आयुष्यात अत्यंत स्वछंद जगली. कशाचीही भीडभाड न ठेवता तिने आयुष्यात  मुक्तसंचार केला,  तिचे कामजीवनदेखील बरेचसे बंधन विरहित होते. तरीही त्याला स्वैराचार म्हणता येणार नाही याचे कारण तिची स्वतःची मानसिक जडणघडण, तिचे व्यक्तिमत्व होते. ती स्वछंदी होती पण स्वैर नव्हती, तिच्या जगण्याच्या शैलीतून, तिच्या लेखनातून, पत्रांतून याचा वारंवार प्रत्यय येतो. तरीही तिच्या या स्वछंदी जगण्याची किंमतही तिला मोजावी लागली.
तिचं एक चित्र आहे 'यंग गर्ल्स'. हे चित्र अतिशय भव्य पुरुषभर उंचीचे आहे. अतिशय Vibrant रंग आणि सुंदर रचना या चित्रात आहे. या चित्रामुळे अमृताला पॅरिसच्या प्रतिष्ठीत सॅलोन मध्ये स्वीकारलं गेलं होतं.

यंग गर्ल्स
या चित्रात दोन तरुणी नव्वद अंशाच्या कोनात एकमेकांसमोर बसल्या आहेत. त्यांच्यात जवळीकही आहे आणि दुरावाही आहे. त्या संवाद करत आहेत का? त्याच्यात कुठला बंध असेल याचाच विचार बघणारा करीत राहील. काळ्या केसांची तरुणी विचारमग्न होऊन दुसऱ्या तरुणीकडे पाहत आहे आणि पाहतानाही ती स्वतःच्या विचारात गढलेली वाटते. ह्या दोन्ही तरुणींमध्ये कसले विचित्र आकर्षण भरून राहिले आहे कोण जाणे? पाहणाऱ्याला मात्र ते जाणवत राहते. सोनेरी केसांची स्त्री कमरेपर्यंत नग्न आहे, पण तिचे नग्न शरीर तिच्या विपुल सोनेरी केसांनी झाकले आहे. या चित्रातले रंग विशेष सुंदर आहेत. जसं काळ्या केसांच्या तरुणीने लाल, हिरव्या रंगाचे चकाकते रेशमी वस्त्र परिधान केले आहे. तर सोनेरी केसांच्या तरुणीने निळे पांढरे उंची तलम वस्त्र परिधान केले आहे. ही रंगाची भिन्नता या चित्राला वेगळा उठाव देते. या काळातले दुसरे चित्र म्हणजे 'बॉय विथ ऍपल'. या चित्रात अमृताने सर्व अकॅडेमिक शैलीचे पाश तोडून अतिशय साध्या पद्धतीने हे चित्र चितारले आहे. आकार अतिशय सुलभ, सोपे करून फक्त चित्रातील  भावभावनेला महत्व दिले आहे. ही तिची निर्मिती स्वतंत्र वाटते आणि अशी काही चित्रं तिने पुढे काढली. हे चित्र तिच्या पुढच्या स्वतःच्या शैलीचा प्रारंभ करणारे चित्र असावं का? इथपासून तिची चित्रणपद्धती बदलत गेली.

तिच्या पॅरिसच्या मुक्त जीवनातील आणि एकंदरीत तिच्या युरोपच्या रहिवासाच्या काळातील चित्रे कौशल्य आणि चित्रकलाविषयक जाणिवांनी संपन्न होती. पण तिची स्वतःची अशी शैली, ज्याच्या ती शोधात होती, ती काही तिला अजून सापडली नव्हती. तिचा स्वतःचा शोध तिला स्वस्थ बसू देत नव्हता. तिने या काळात अनेक सेल्फ-पोर्ट्रेट्स देखील केली. आत्मचित्रणातून ती काय जणू इच्छित होती? स्वतःच्या परस्पर विसंगत स्वभावांची दोन टोकं ती आकळू पाहत होती. ही तिची चित्रं अतिशय प्रखर होऊन तिच्या अंतरंगावर  प्रकाश टाकतात. तिने केलेल्या अनेक सेल्फ-पोर्ट्रेट्समध्ये तिचे एक चित्र प्रत्यक्षात सेल्फ-पोर्ट्रेट नसले तरी मला ते तिचा अंतरंग ढवळून तिने काढले असावे असे वाटते, ते म्हणजे 'टू गर्ल्स'. (हे चित्रं जरी तिने फार नंतर निर्माण  केलं असलं तरी हे एक प्रकारचं आत्मचित्रच वाटतं) ह्या चित्रात ती स्वतःचा खूप खोल शोध घेत आहे असं जाणवत राहतं. अमृताचं आयुष्य म्हणजे एक कोडं, एक लिजंड होतं. तिचं व्यक्तिमत्वही जडजंजाळ. तिचा गूगल करून कुठचाही फोटो पहा, तुम्ही एक क्षण खिळून राहाल असं गूढ सौन्दर्य तिच्या चेहऱ्यात आहे. तिच्या सौन्दर्याने स्थिमित न झालेला माणूस विरळा. इतके अनुपम लावण्य लाभलेली स्त्री प्रत्यक्षात मात्र तिच्या आयुष्याच्या हिरव्या दिवसांत स्वतःला  अतिशय गलिच्छ, आतून किडून-सडून गेलेली समजत असे. तिच्या डोळ्यात लहानपणी तिरळेपणा होता ज्यामुळे ती स्वतःला कुरूप समजत असे. तिला कुठल्या सौन्दर्याचा ध्यास होता? सौन्दर्य म्हणजे नक्की काय याचा ती अखंड शोध घेत होती. हा शोध पुरा झाला नाही हे दुर्दैव. तिची काही सेल्फ-पोर्ट्रेट्स अर्धनग्न आहेत. वेगवेगळ्या बाजूनी काढलेली, खेळकर, गंभीर, शून्यात  बसलेली अशी बरीच , या सगळ्या चित्रातून स्वतःच्या कुठल्या अंतरंगाचा पाठपुरावा ती करत असावी? 'टू गर्ल्स' या चित्रातील काळी मुलगी आणि गोरी मुलगी ही अमृताच्या मनाचीच दोन रूपं आहेत असं मला वाटतं. एवढं प्रखर भावनेचं चित्रं तिचं दुसरं कुठलंच नसावं.

टू गर्ल्स (चित्रं कधी काढलं ते सांगणं कठीण आहे, तिने या चित्राची सुरवात तिने १९३८ मध्ये हंगेरी येथे केली(तिच्या हंगेरियन मावसभावाशी तिने लग्न केल्यानंतर काही काळ ती भारतातून हंगेरीत जाऊन राहिली होती , बहुदा १९३९ मधे पूर्ण केलं असावं )
१९३४ मध्ये ती भारतात आली. तिच्या वडिलांचा तिच्या भारतात येण्यावर विरोध होता. कारण तिच्या स्वछंद स्वभावामूळे तिला इथल्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण होईल असे त्यांना वाटत होते. (त्याचबरोबर तिच्या मुक्त वावरामुळे इतरत्र उडणाऱ्या वावड्या, घरातील लोकांची तिच्या मुक्त वागण्यामुळे कुचंबणा/नाचक्की होईल की काय असेही त्यांना वाटत होते. आणि यामुळे अमृता आपल्याच वडिलांच्या या विचारांनी खूप दुखावली गेली होती.) तरीही तिने हट्टाने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या  भारतात येण्याविषयी म्हणले आहे की 'भारतात येण्याविषयीची तीव्र ओढ वारंवार मला झपाटून टाकू लागली होती. काहीतरी विचित्रपणे मला सारखे जाणवत राहू लागले की चित्रकार म्हणून भारताची जमीन हीच माझं नशीब/नियती आहे'. या तीव्र इच्छेने ती भारतात  परतली. पाश्चात्य पोशाख सोडून अतिशय पारंपरिक पद्धतीने भारतीय साडी परिधान करू लागली. तिला भारतीय भूमीतील आपले अस्तित्व शोधायची ओढ लागली होती, त्यासाठी ती भारतभर फिरली. अजिंठा-एलोरा, दक्षिण भारतातील शिल्पं, मंदिरं, त्याच्या चित्र-शिल्प शैली याने ती अतिशय प्रभावित झाली. विशेषतः अजिंठ्याच्या चित्रातील रेषांनी तिला इतकं वेड लावलं की आपल्या चित्रांत तिने त्यापासून प्रेरणा घेऊन त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. भारतीय मिनीएचर शैलीचाही तिने अभ्यास केला. तिची या भारतातील आरंभीच्या काळातील चित्रं अजिंठ्याच्या शैलीचा, मिनिएचर शैलीचा विशेष प्रभाव दाखवतात. १९३५ ते ३७ या काळातीळ अनेक चित्रांपैकी काही आहेत, 'ब्रह्मचारीज' , 'हल्दी ग्राइन्डर्स' जी मला अतिशय वेगळी वाटतात कारण मला या चित्रात अमृताचं प्रतिबिंब दिसतं.
भारतीय ब्रम्हचारी १९३७
'ब्रह्मचारीज' या चित्रात प्रेक्षकांकडे पाठ करून बसलेला सर्वात छोटा मुलगा. तो मला अमृताचं प्रतिबिंब वाटतो. का बसला आहे तो पाठमोरा? बाकी सगळे बातचीत करत असताना त्याला कुणाशीही बोलायचं नाही. त्याला स्वतःतच मग्न होऊन राहायचं आहे. आता हे चित्र 'हल्दी ग्राइन्डर्स'चं. 

हल्दी ग्राइंडर्स १९३७
या चित्रातही ती छोटी मुलगी बघा. तिच्यात काहीतरी साठवलेले आहे. जे घट्ट पकडून ती हिरव्या झाडाला टेकून गपचूप बसली आहे, हळद पिसणाऱ्या बायकांशी ती बोलत नाही, स्वतःतच गढून ती गेली आहे. आणि मागची झाडाच्या खोबणीतील बाई, क्लांत, विचारमग्न, तिलाही कुणाशी काहीच संवाद करायचा नाही. हे चित्र म्हणजे एक दृश्य कविताच आहे.
पण मला सर्वात जवळचं वाटणारं तिचं एक अतिशय तरल असं चित्रं म्हणजे 'द ब्राइड'
द ब्राईड
या चित्राबद्धल स्वतःच अमृता लिहिते की तिने जेव्हा एक  भारतीय लग्न बघितलं  तेव्हा तिला सगळ्यात परिणामकारक वाटलं ते म्हणजे ब्राइडचं अस्तित्व. सगळीकडे गोंधळ-गडबड, वाद्यांचे आवाज, गर्दी, लग्न बहुतेक कुणा रईसाचे (हा रईस बहुदा थोराड दिसणारा) आणि एका बाजूला गप्प बसलेली अतिशय लहान अशी मुलगी, सुंदर, गोजिरवाणी, सजवलेली, तिच्या चेहऱ्यावर मात्र काळवंडलेले भाव, तिच्या मौनात मात्र खोल आर्तता, काहीच न बोलता डोळे खूप काही सांगून जाणारे. त्या 'ब्राईड'ने अमृताच्या मनावर एवढा परिणाम केला की तिने तिच्या चित्रांद्वारे या ब्राईडला अजरामर केले.
पाश्चात्य चित्रकारांमध्ये काही चित्रकारांचा तिच्यावर विशेष प्रभाव होता. चांगलं चित्रं म्हणजे काय हे जाणण्याची सिद्धी तिला प्राप्त होती. पॅरिसहून परत येताना तिथल्या एका चित्रसंग्रहालयातील एका चित्रापुढे ती अर्धा तास खिळून राहिली, ते चित्र होते व्हिन्सेंट व्हॅन गॉग चे 'चेअर' (खुर्ची)चे छोटेसे चित्र. पाऊल गोगँ या फ्रेंच चित्रकाराच्या विलक्षण जिवंत रंगांची तिच्यावर मोहिनी होती, कारण तिच्या चित्रांत त्याच्या Vibrant आणि त्याचबरोबर गडद अश्या रंगाच्या एकत्रित आविष्काराचे रूप दिसते. अश्या रंगाच्या रंगसंगतीने चित्राला उदासीची एक वेगळीच पातळी प्राप्त झाल्यासारखी वाटते. गडद burnt sienna, ऑकर, सेपिया, Indian Red यांचा वापर तिच्या चित्रात दिसतो.

तरीही एक प्रश्न मनात येतो की तिच्या चित्रात ती जे काही साध्य करण्याच्या प्रयत्नात होती ते तिला सापडले होते का? तिच्या बऱ्याचश्या चित्रातल्या व्यक्तींमध्ये काहीच संवाद (संवाद म्हणजे बडबड/तोंड उघडून बोलणे नव्हे) जाणवत नाही. परस्पर अदृश्य देवाणघेवाण वाटत नाही, त्या एकमेकांपासून तुटलेल्याच भासतात. अधांतरी वाटतात आणि फक्त चित्रातल्या मांडणीसाठी त्या एकत्रित केल्या आहेत असे का वाटत राहते? अमृताने भारतीय आणि पाश्चात्य शैलीत समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे पण भारतात मुरलेली अशी तिची चित्रं वाटत नाहीत. तिच्या आंतरिक ताणाचीच ती प्रतीकं आहेत का? एक अगम्य  अधांतरीपणा त्यांच्यात जाणवत राहतो.

मला व्यक्तिगतपणे 'दुभंगलेल्या' गोष्टींचे विचित्र आणि विलक्षण आकर्षण वाटत आले आहे. त्यांच्या असण्याबद्धल, त्यांच्या स्वतःच्या दुभंगलेपणात जगण्याच्या धडपडीचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे, आणि त्याचबरोबर त्याच्या दुभंगलेल्या अस्तित्वाबद्धल विलक्षण सहानुभूती, विदारकताही जाणवत आली आहे. म्हणूनच मला अमृता शेर गिल खूप जवळची वाटते. तिचं व्यक्तिमत्व दुभंगलेलं होतं, तिच्यातलं सर्जनशील स्वत्व आणि बाह्य गोष्टी यात तीव्र दरी होती. त्या दरीचे मोजमाप अमृताकडे नव्हते. चित्रकार म्हणून आणि विशेषतः एक स्त्री चित्रकार म्हणून ती अनेक गोष्टींशी झगडत होती आणि तिच्या सवेंदनशील वृत्ती मारही खात होत्या. स्त्री आणि चित्रकार या दोन अस्तिवात कुठचे तिचे खरे अशीही तिची अवस्था होत असे. स्वतःचाच शोध तिला अपुरा वाटत होता, त्यात तिला कोणाची भागीदारी नको होती, त्यामुळेच तिच्या घरच्यांचा रोष पत्करून तिने तिच्या बालपणीच्या मित्राशी म्हणजेच आपल्या मावसभावाशी लग्न केले, कारण तिच्यामते तोच फक्त तिला समजून घेऊ शकला असता. एकीकडे ती फार बहिर्मुख होती, पॅरिस मध्ये आणि भारतातही ती लोकांच्या गराड्यात अनेक मैत्री,शारीरिक संबध यांच्या जंजाळात फसत राहिली. पण दुसरीकडे त्या स्वतःशी, ना सापडलेल्या अस्तित्वाचा वेध घेत राहिली. तिच्या व्यक्तिमत्वातील दुभंगलेपणा मला आकर्षित करतो आणि त्रस्तही करतो. अमृता धडपडत होती आपल्या अस्तित्वाची मूळं शोधायला. तिला तिची क्षमता कमी पडत आहे असं वारंवार जाणवत होतं का? जाणवत असावं कारण बाहेरून खूप उत्साही वाटणारी ती अनेकदा उदासीने घिरून राही, मग पियानोचे सूर छेडत ती एकटीच बसून राही. अत्यंत स्वछंद जीवन आणि भौतिक जग यामधल्या दरीच्या बाजूच्या दोन डगरी. त्यावर पाय फाकवून दोन टोकांवर ती उभी होती. तिची आधीची चित्रं ज्या जोमाने तिने निर्माण केली होती त्याला आता उतरती कळा लागली होती.
आयुष्याच्या शेवटच्या काळात म्हणजे १९३८ ते १९४१ मध्ये ती आपल्या पतीबरोबर भारतात परतून आली आणि लाहोरमध्ये राहू लागली. पण शेवटी शेवटी तिची शक्ती, तिची ऊर्जा मालवत जाऊ लागली तेव्हा ती अतिशय अस्वस्थ होऊ लागली. हा भव्य पट पुरता न आकळला जाताच उधळला जाणार याची जाणीव तिला झाली होती. आयुष्याच्या शेवटी तिला आपल्या अंताची चाहूल लागली होती? कारण इथल्या रहिवासात तिने भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला, त्यातही 'मी वेळ वाया घालवू शकत नाही' असेही तिचे सारखे म्हणणे होते. की आपल्या सर्जनशील शक्तीच्या होणाऱ्या अंताची जाणीव झाली होती?.. तिच्या शेवटच्या दिवसातील तिने लिहिलेल्या पत्रांतून तिच्या मानसिक अवस्थेची कल्पना येते. ती आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रात लिहिते 'तू गेल्यापासून मी काहीच(काम) केले नाही. उदासीनता आणि सुस्ती, प्रयत्न करण्याचेही वाटणारे भय, असं वाटतं हे सगळं काहीच उपयोगाचं नाही.' दुसऱ्या एका पत्रात तिचा हाच निर्वाणीचा सूर लागला आहे. हे पत्र आयुष्याच्या अगदी शेवटी (जुलै/ऑगस्ट १९४१ मध्ये ) तिने आपल्या एका मैत्रिणीला लिहिले होते, त्यात ती म्हणते 'मी गेल्या चार महिन्यांपासून ना ब्रशला स्पर्श केला आहे ना कॅनवासच्याजवळ गेले आहे. मलाच माहीत नाही का ते. जेव्हा मी परत कामाची सुरवात करायला जाते तेव्हा कसलीतरी भीती माझा कब्जा घेते. मी कितीही समजण्याचा प्रयत्न केला तरी मला ते समजत नाही आहे. मला असं वाटतं की चित्रं काढण्याच्या सवयीपासून स्वतःची सुटका करून घेतली जाऊ शकते. चित्रं न काढताही राहता येऊ शकते.'
“I have passed through a nervous crisis and am still far from being over it. Feeling impotent, dissatisfied, irritable and unlike you, not even able to weep…”
 
शेवटच्या काळात तिला असेही वाटू लागले होते की तिची चित्रकला मृत होत आहे. त्याबद्धल, तिच्या अश्या वाटण्याबद्धल ती काहीही करू शकत नव्हती, त्यामुळे तिचा अस्वथपणा वाढत चालला होता. 
बहुतेक तिच्या चित्रांच्या सर्जनाचा झालेला अंत तिच्याने बघवला नसावा. ३ डिसेंबर १९४१ ला अत्यंत अल्प अश्या डिसेंट्रीने आजारी पडली. त्यानंतर तिची प्रकृती झपाट्याने खालावत जाऊन ५ डिसेंबर , रोजी तिचे अवघे २८ वर्षांचे आयुष्य संपून गेले. तिच्या शरीरात पसरलेल्या आधीच्या ऍबडॉमिनल इन्फेक्शन मूळेही असे झाले असावे. अत्यंत गूढपणे आणि अकल्पितपणे तिचा मृत्यू झाला. अचानक.  पण कदाचित असेही असेल का , ज्यामुळे ती जिवंत होती ती कलाच तिच्यातून मृत झाल्याचे तिला जाणवले असावे. तिचे असणे म्हणजे तिच्या कलेचे असणे होते. कला संपली, आणि त्याचबरोबर तीही. जेव्हा तिचा अंतिम समयी तिला फक्त रंगच दिसले असावेत, ज्या रंगांसाठी तिला  आयुष्यभर अतृप्त ओढ होती तेच तिच्या डोळ्यासमोर तरळले असावेत. हे तिचे शेवटचे अपूर्ण चित्रं.मला तरी ते पूर्ण वाटतं.


अमृता शेर गिलने तिच्या चित्रांद्वारे माझ्या डोळ्यांच्या कडांवर एक कायमची काजळरेघ रेखली आहे. आणि त्या चरचरीत काळ्याकुट्ट काजळरेघेला डोळ्यात सलवत मी तिच्या चित्रांना अनुभवते तेव्हा दिसतं डोळ्यात तरळत जाणारं तिचंच धूसर प्रतिमा-प्रतिबिंब.