Wednesday, 6 September 2017

सौंदर्यपूर्ण बांडगुळ (Tolypanthus lageniferus Tiegh)


संजय गांधी नॅशनल पार्कच्या जंगलात एका मोडून तुटून पडलेल्या हेदू(हळदू) च्या झाडावर एक विचित्र फुल उमलले होते. हे फुल हेदूचे नव्हते पण ते फांदीला चिकटूनच उगवले होते. त्यामुळे या विचित्र फुलाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्याच्या एकंदरीत रचनेवरून ते परजीवी वनस्पतीचे फुल असावे असेच वाटले. एका वनस्पतीतज्ज्ञाने त्याची ओळख सांगितली. त्याचे शास्त्रीय नाव आहे : Tolypanthus lageniferus Tiegh . ही वनस्पती बांडगुळ असून Loranthaceae कुळातील आहे. इंगजीमध्ये बांडगुळाला 'Mistletoe' असे म्हणतात. 
याचा आकार इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे की कुणी याला 'पेनस्टॅन्ड', तर कुणी 'पेला बांडगुळ' म्हणतात. रंग लालभडक का बरं असावा? या आणि इतर अनेक बांडगुळांबद्दल कुतूहलच वाटते.
या मी पाहिलेल्या बांडगुळाला पाने नव्हती. पण याच्या काही फोटोंमध्ये गुलाबी, लालसर पाने आहेत. 
श्रीकांत इंगळहळीकर यांनी आपल्या 'आसमंत' या पुस्तकात या परजीवी वनस्पतींबद्दल अतिशय छान माहिती सांगितली आहे. 
बांडगुळ या परजीवी वनस्पतींमध्ये काहींना मूळ नसतं, काहींना खोड नसतं तर काहींना पानं नसतात. त्यांनी नमूद केलेल्या काही परजीवी वनस्पती 'क्रिस्टोनिया', 'इजिनेशिया' अशा काही वनस्पतींबद्दल ते सांगतात. 'अमरवेल' नावाची सर्वत्र सापडणारी वेल परजीवी आहे. हिरव्या पिवळ्या नुसत्या धाग्यांचे हे जंजाळच असतं हे त्यांनी त्याचे अगदी बरोबर वर्णन केले आहे. ही वेल परजीवी आहे हे मात्र मला माहिती नव्हते. 

'लोरँथस' या कुळाबद्दल ते लिहितात 'या कुळातल्या परजीवी बांडगुळांचा आकार झुडुपासारखा, फांद्या जाड आणि फुलं आकर्षक रंगाची असतात. त्यांच्या बियांतील गोड, चिकट गर खारी, पक्षी, माकडे खातात, यातूनच त्या बांडगुळाचा प्रसार होतो. आंबा, ऐन यासाख्या मऊ सालीच्या झाडांवर बांडगुळं आश्रय घेतात.' 
त्यांनी असेही म्हटले आहे, की बांडगुळं आधारवृक्षाचं फारसं नुकसान करीत नाहीत. आपल्याकडे उगाचच बांडगुळांना उपेक्षित, हेटाळणीच्या नजरेने बघितलं जातं. खरंतर परदेशात या 'मिसलटो' ला खूप आदराचे स्थान आहे. नाताळच्या सजावटीत मिसलटो टांगण्याची प्रथा आहे. मिसलटोच्या खाली चुंबन घेणारे भाग्यवान असतात असंही मानलं जातं. लहानमुलांना दृष्ट लागू नये म्हणूनही मिसलटो वर टांगलं जातं. परदेशात बागेतल्या झाडावर मिसलटो असणं भाग्याचं मानलं जातं. आपणच करंट्यासारखं या सुंदर वनस्पतीकडे दुर्लक्ष केलं आहे. 




सुपली ( Clitoria annua )

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सप्टेंबरच्या सुरवातीला ही वनस्पती दिसली. तिचे फुल गोकर्णाच्या फुलासारखे होते, त्यामुळे ती गोकर्णाच्या प्रजातीतील असावी असे वाटले. तो अंदाज बरोबर होता. ही Fabaceae (Pea family) कुळातील आणि  Clitoria प्रजातीतील वनस्पती आहे. तिचे मराठी नाव आहे 'सुपली'. ही वनस्पती मुंबई आणि आजूबाजूच्या भागातच (प्रदेशनिष्ठ/Endemic) सापडते. शास्त्रीय नाव आहे 'Clitoria annua'(Clitoria annua J.Graham) तिचे आणखी एक शास्त्रीय नाव प्रचलित होते (Clitoria biflora), पानांच्या देठांच्या बगलेत फुले जोडीने येतात म्हणून biflora असे नाव पडले.

इंग्रजीमध्ये 'Bombay Bean' म्हणतात. ऑगस्ट ते ऑक्टोबर असा या वनस्पतीच्या फुलण्याचा मौसम आहे.

सुपलीचे फुल
 

सुपलीचे झाड आणि पाने

Tuesday, 5 September 2017

साळवण (Desmodium gangeticum)

अतिशय मोहक फुलांच्या तुऱ्याची ही वेल आहे 'साळवण'. मला ही वेल सर्वप्रथम दिसली ती संजय गांधी नॅशनल पार्कच्या शिलोंडा भागात.(ऑक्टोबर २०१६ ), त्या दरम्यान ही तिथे फुलली होती. तिला इंग्रजीमध्ये 'Sal Leaved Desmodium' हिंदीमध्ये 'ध्रुवा , 'दीर्घमूली', 'पीवरी' , 'सालपानी' , 'शालपर्णी' म्हणतात. मराठी मध्ये 'डाय', 'रानगांज्या', 'साळवण', 'सालपर्णी' , नेपाळीमध्ये 'बन गहत', 'सालीपरनी' आणि गुजरातीमध्ये 'સલવાન' अशी सुंदर नावं आहेत. संस्कृतमधूनच ही नावं आली असावीत. 'अंशुमती' , 'ध्रुवा' , 'दीर्घमूला', 'पीवरी' ,  'शालपर्णी' अशी हिची संस्कृतमध्ये नावं आहेत.
हिचे शास्त्रीय नाव Desmodium gangeticum असून ही Fabaceae (Pea family) कुळातील आहे.
तिच्या नाजूक फुलांचे सौन्दर्य वर्णावे?

शालपर्णी, साळवण

गोलगोंडा (Neuracanthus sphaerostachyus)

टारझन हिलच्या तळ्याच्या बाजूने तळ्याजवळच्या झुडुपात ही वनस्पती ऑगस्ट मध्ये सापडली होती. हिचे नाव आहे 'गोलगोंडा'. इंग्रजीत 'Pin Cushion Plant' म्हणतात.शास्त्रीय नाव आहे 'Neuracanthus sphaerostachyus'   ही Acanthaceae (Acanthus family) कुळातील वनस्पती आहे. sphaerostachyus  हे नाव तिच्या फुलाच्या वर्तुळाकृती (स्पाइरल) रचनेमूळे तिला मिळाले आहे. 
या वनस्पतीचे औषधी गुणधर्म बघितले पाहिजेत कारण फ्लॉवरऑफइंडिया या संकेतस्थळावर या वनस्पतीपासून प्राण्यांसाठी(बहुदा गुरांसाठी असावं) काढा करण्यात येतो असे नोंदवलेले आहे. 








टारझन हिलच्या तळ्याजवळील गोलगोंडा ऑगस्ट २०१७
संजय गांधी नॅशनल पार्क , शिलोंडा येथील गोलगोंडा( ऑक्टोबर २०१६)

चिमीन (Thunbergia fragrans)

ही अतिशय सुंदर पांढऱ्या फुलांची वेल मी शिलोंडा, बोरिवली नॅशनल पार्क इथे (१६ ऑक्टोबर २०१६ला )पाहिली होती. अशाच पानांची वेल मला टारझन हिलच्या जंगलात देखील दिसली होती. खरंतर ही जंगलात वाढणारी वेल आहे पण हिच्या सुंदर फुलांमुळे ही बागांमध्ये लावली जाते. इंग्रजीमध्ये हिला 'Sweet Clock-Vine, White Lady' असे म्हणतात. मराठीमध्ये 'चिमीन' असे म्हणतात. 
हिचे शास्त्रीय नाव : Thunbergia fragrans असून ही वेल Acanthaceae (Acanthus family) कुळातील आहे. 
Karl P. Thunberg या स्वीडिश प्रवासी वनस्पतिशास्त्रज्ञाला अभिवादन म्हणून Retz या एका दुसऱ्या वनस्पतिशास्त्रज्ञाने या वनस्पतीच्या प्रजातीला (genus ) ला ७१७६ मध्ये त्याचे नाव दिले.
Dr. Roxburgh यांनी या वेलीला नाव दिले, त्यांनी आपल्या 'Plants of the Coast of Coromandel' पुस्तकात म्हटलं आहे की या वेलीला ( फुलाला नाही) एक विशिष्ट असा सुगंध आहे, त्यामुळेच त्यांनी fragrans हे नाव दिले असावे. 
हिच्या फळांचा आकार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.
 
चिमीनचे फुल

चिमीनची पाने आणि फळं
 
 
 

पिवळीभोवरी ( Ipomoea obscura )

टारझन हिलच्या भागात ही वेल आणि हे सुंदर फिकट पिवळ्या रंगाचे फुल २१ जून २०१७ ला दिसलं होतं. हिला इंग्रजीत Obscure Morning Glory म्हणतात. Obscure असं का म्हणतात ते सांगणं अवघड आहे पण बहुदा हिच्या असाधारण रंगामुळेच हे नाव पडलं असावं. हिला हिंदीत 'पान बेल' , मराठीत पिलीभोवरी(पिवळीभोवरी), बोकाडी , पुंगळी म्हणतात. संस्कृतमध्ये 'लक्ष्मण' आणि 'वचगंधा' अशी हिची नावे आहेत. ही वेल Convolvulaceae (Morning glory family) कुळातील आहे. इतर Ipomoea प्रमाणेच जरी फुलाचा आकार असला तरी हा फुलाचा रंग तसा इतर Ipomoea च्या जातींपेक्षा  वेगळाच आहे. 


 Ipomoea obscura  , Convolvulaceae (Morning glory family)

कापुर भेंडी (Turraea villosa)

ऑगस्टच्या अखेरीस, कर्नाळ्याच्या किल्ल्याच्या मार्गाने जाताना मधेच एका छोट्याशा झाडाने माझे लक्ष वेधून घेतले. त्याला भोपळी मिरच्या आणि राय आवळा यांच्या जवळपास जाणाऱ्या आकाराची फळं लागली होती. ती फळं आकाराने अर्धा इंच होती आणि ना ती धड भोपळी मिरचीच्या आकाराची म्हणता येतील ना रायआवळ्याच्या आकाराची येतील अशी होती. 
तर शेवटी काहीतरी वेगळेच शोधताना या झाडाचे नाव सापडले. त्याच्या या फळावरूनच त्याची ओळख पटली. त्याचे मराठी नाव आहे 'कापूर भेंडी'. शास्त्रीय नाव आहे Turraea villosa. त्याची फुले अतिशय सुंदर आहेत. त्यामुळे आता त्याच्या फुलण्याच्या मोसमात त्याला भेट दिली पाहिजे. याचा फुलण्याचा मौसम जूनच्या अखेरीस, पावसाच्या आगमनाच्या सरींबरोबर (शेवटच्या पंधरवड्यात सुरु होतो).  


कापूरभेंडीची पानें आणि फळ