संजय गांधी नॅशनल पार्कच्या जंगलात एका मोडून तुटून पडलेल्या हेदू(हळदू) च्या झाडावर एक विचित्र फुल उमलले होते. हे फुल हेदूचे नव्हते पण ते फांदीला चिकटूनच उगवले होते. त्यामुळे या विचित्र फुलाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्याच्या एकंदरीत रचनेवरून ते परजीवी वनस्पतीचे फुल असावे असेच वाटले. एका वनस्पतीतज्ज्ञाने त्याची ओळख सांगितली. त्याचे शास्त्रीय नाव आहे : Tolypanthus lageniferus Tiegh . ही वनस्पती बांडगुळ असून Loranthaceae कुळातील आहे. इंगजीमध्ये बांडगुळाला 'Mistletoe' असे म्हणतात.
याचा आकार इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे की कुणी याला 'पेनस्टॅन्ड', तर कुणी 'पेला बांडगुळ' म्हणतात. रंग लालभडक का बरं असावा? या आणि इतर अनेक बांडगुळांबद्दल कुतूहलच वाटते.
या मी पाहिलेल्या बांडगुळाला पाने नव्हती. पण याच्या काही फोटोंमध्ये गुलाबी, लालसर पाने आहेत.
श्रीकांत इंगळहळीकर यांनी आपल्या 'आसमंत' या पुस्तकात या परजीवी वनस्पतींबद्दल अतिशय छान माहिती सांगितली आहे.
बांडगुळ या परजीवी वनस्पतींमध्ये काहींना मूळ नसतं, काहींना खोड नसतं तर काहींना पानं नसतात. त्यांनी नमूद केलेल्या काही परजीवी वनस्पती 'क्रिस्टोनिया', 'इजिनेशिया' अशा काही वनस्पतींबद्दल ते सांगतात. 'अमरवेल' नावाची सर्वत्र सापडणारी वेल परजीवी आहे. हिरव्या पिवळ्या नुसत्या धाग्यांचे हे जंजाळच असतं हे त्यांनी त्याचे अगदी बरोबर वर्णन केले आहे. ही वेल परजीवी आहे हे मात्र मला माहिती नव्हते.
'लोरँथस' या कुळाबद्दल ते लिहितात 'या कुळातल्या परजीवी बांडगुळांचा आकार झुडुपासारखा, फांद्या जाड आणि फुलं आकर्षक रंगाची असतात. त्यांच्या बियांतील गोड, चिकट गर खारी, पक्षी, माकडे खातात, यातूनच त्या बांडगुळाचा प्रसार होतो. आंबा, ऐन यासाख्या मऊ सालीच्या झाडांवर बांडगुळं आश्रय घेतात.'
त्यांनी असेही म्हटले आहे, की बांडगुळं आधारवृक्षाचं फारसं नुकसान करीत नाहीत. आपल्याकडे उगाचच बांडगुळांना उपेक्षित, हेटाळणीच्या नजरेने बघितलं जातं. खरंतर परदेशात या 'मिसलटो' ला खूप आदराचे स्थान आहे. नाताळच्या सजावटीत मिसलटो टांगण्याची प्रथा आहे. मिसलटोच्या खाली चुंबन घेणारे भाग्यवान असतात असंही मानलं जातं. लहानमुलांना दृष्ट लागू नये म्हणूनही मिसलटो वर टांगलं जातं. परदेशात बागेतल्या झाडावर मिसलटो असणं भाग्याचं मानलं जातं. आपणच करंट्यासारखं या सुंदर वनस्पतीकडे दुर्लक्ष केलं आहे.
No comments:
Post a Comment