Tuesday 12 September 2017

गुंजा (Abrus precatorius)


गुंजांच्या बियांचे विलोभनीय सौन्दर्य माहित नसलेला क्वचितच कुणी असेल. या सुंदर बियांना जन्म देणारी वनस्पती म्हणजे 'गुंज' म्हणजेच 'Abrus precatorius'. हे तिचे शास्त्रीय नाव.
तिच्या पानांच्या आकारावरून तिला abrus म्हणजे delicate (ग्रीक भाषेत या शब्दाचा अर्थ delicate/नाजूक असा होतो), precatorius हा शब्द लॅटिन भाषेतील precari म्हणजे (to pray; supplication; prayerful ) 'प्रार्थना करणारा , प्रार्थना सूचित करणारा'   असा होतो. 
याला पुरातन काळात 'मधुयष्टिका' , 'रक्तिका' अशी नावे होती. ही वनस्पती 'वेल' (climber) या स्वरूपात वाढते.
गुंजाच्या बिया विषारी असतात.  पण सुकलेली पाने मात्र खायच्या पानात स्वादिष्टपणा वाढवण्यासाठी त्यात चुरडून घातली जातात.



टर्झन हिल च्या भागात मी ही वेल पहिल्यांदा पाहिली ती फक्त बियांच्या स्वरूपात. मे महिन्यामध्ये फक्त सुकलेल्या, उकललेल्या शेंगात या मनमोहक बिया दिसत होत्या. वेल पूर्णपणे सुकून गेल्याने तिचा मागमूसही नव्हता.




मग पावसाळ्यात जून मध्ये ही वेल कोणती ते ओळखता आले. कोवळ्या हिरव्यागार रंगाची पाने घेऊन ही वेल छोट्या झाडांवर/झुडुपांवर दिसू लागली. तिची पाने pinnate पद्धतीची असतात. सप्टेंबरच्या दरम्यान तिला फुले येतात. फुलेही अतिशय सुंदर फिकट गुलाबी रंगाची असतात. मध्यभागी गडद गुलाबी रंगाच्या छटा असतात. यानंतर फुलांपासून शेंगा बनतात ज्यात लाल रंगाच्या आणि काळा ठिपका असणाऱ्या गुंजबिया असतात. 
गुंजा एकदा वाळल्या की वर्षानुवर्षे त्यांचे वजन बदलत नाही. म्हणून त्यांचा उपयोग आप्तमान (वजन) यासाठी मुख्यत्वे सोनार करीत असत. १९६ गुंजा=१ तोळा असे परिमाण असे. 

बिया अतिविषारी असल्या तरी गुंज वनस्पती औषधी आहे. डॉ. म. वि. आपटे यांच्या 'वनश्रीसृष्टी' ग्रंथात दिल्याप्रमाणे घश्याला सूज आली असता गुंजेचा पाला चघळून आराम वाटतो. गुंज बी उगाळून सुजेवर लावतात. गुंजेची बी पाण्यात टाकून उकळली असता तिचा विषारीपणा नाहीसा होतो. मुळाचा पाण्यात काढलेला अर्क खोकला कमी करण्यास मदत करतो. गुंजेची मुळे जेष्ठमध या औषधाची प्रतिनिधी मनाली गेली आहेत. 

No comments:

Post a Comment