Friday, 25 November 2016

मेला बुद्ध


आतंकवाद, दहशदवाद , घुसखोरी, युद्ध
आतील बाहेरील शत्रू
धडधडत्या तोफा बंदुकीच्या फैरी
सरकारी पेटीत बसून घरी जाणारे जवान
आणि बेवारस पुजले जाणारे वैरी

नंतर फक्त
विधानं, शक्यतो अविचारी विधानं
आणि जमल्यास विचार थोडा
संभाषणं भाषणं आरोळ्या आणि चारोळ्या
आरोप प्रत्यारोप आग्रह आंदोलनं
मेणबत्यांचं जळणं आणि विझणं / वितळणं
दगडफेक चिखलफेक जमावबंदी संचारबंदी
पाण्याचे फवारे अश्रुधुराचे ढग आणि अश्रू
लाठ्यांची बरसात, प्रसंगी गोळीबार
अत्याचार स्वैराचार भ्रष्टाचार
आयोग चौकशीचे, अहवाल आरोपपत्रं
आणि झालीच तर कुणाला तरी शिक्षा

या सर्वांचं मूळ
धर्म जात वर्ण प्रांत
देश पैसा प्रसिद्धी सत्ता
इत्यांदींचं खूळ
जरीही सर्वश्रुत
अश्वत्थाम्यासारखं अमर, अबाधित

कुणी प्राणी पक्षी पान फुल रान
कुठे हवा पाणी माती धोंडा
आणि माझं दगड मन
अंतःबाह्य आहे त्रस्त
नको झालाय परशु आणि राम
नको नानक महावीर ना खुदा ना ख्रिस्त

दुःखाचा या शेवट व्हावा म्हणून
वाटतं उजव्या कुशीवर शांतपणे झोपी जावं
विझता वात, विरून जातील धर्म आणि जात
न म्हणतील कोणी (बुद्ध बुद्ध) मेला बुद्ध
अधिक मागणं काही नाही

- विवेकानंद सामंत , पूणे , १३-१०-२०१६


तेरावं

बाबा गेले
तेरावं झालं
दुःखाचं जेवण
पचून गेलं

श्राद्धाला काढायची
आणि प्रसंगी यायची
ती आठवण नंतर
यायची आणि जायची

काळ गेला वेळ गेली
अनेक वर्ष आणि श्राद्ध लोटली
पोरं बाबा झाली
बाबा झाली

दबक्या पावलांनी पुन्हा एकदा
काळ आला, वेळही आली
डोळ्यादेखत पस्तिशीतली
पोर गेली

जिला काऊचा घास भरवला
त्याचा त्याला
परत दिला
शेवटी तो उसनाच !

तेरावा दिवस यायचा तो आला
पुन्हा तेच तीळ, सात दर्भ
आणि तोच
जेवणाचा प्रसंग

या वेळी मात्र दुःख
ताट भरून आलं होतं
तांब्या,भांडं, वाटी पेल्यात
अश्रूंचं तळं झालं होतं

मग कसासाच गिळला घास
दाटल्या गळ्यात अडकला
विद्युतदाहिनीचा जाळ
पुन्हा डोळ्यांपुढे भडकला

जाणवून सत्य वितळलं मन
आधी मरावा बाप
मग पोरं 
हेच बरं.

-विवेकानंद सामंत, पूणे , २०-१०-२०१६.

ऐसाही है मैं


जेवून झाल्यानंतरच मला खरी भूक लागते
मेलेली जीभ जिवंत होऊन नवी चव मागते
जेव्हा ती एका घोटासाठी प्रतिक्षा करेल, अखेर
तेव्हा कोरडी पडेल का ती ?

स्वेटरमधली त्वचा स्वतःच चाचपून पाहते
उबदार, गरम, जिवंतपण जाणवत राहते
जेव्हा ती एकटीच गोठत पडेल
तेव्हा तिथली थंडी सोसेल का तिला ?

पावलांकडे नजर जाते, मला उचलून धरलं आहे त्यांनी
कायमचं, कायमच
जेव्हा याच पावलांवर पहिल्यांदा उभं राहता आलं असेल
तेव्हा काय वाटलं असेल त्यांना

तळपायांतली आग त्यांनी
खूपदा सहन केली आहे
पण तो बेचिराख करणारा अग्नी
सहन होईल का त्यांना

समोरचे दृश्य वारंवार दिसते
झाडे, आकाश, पाणी, चिमण्या, सूर्य
जेव्हा डोळ्यांतील असंख्य अभ्र पुसून पसरेल पोकळी
तेव्हा तेच  आकाश, त्याच चिमण्या , तोच सूर्य दिसेल का त्यांना?

'ऐसाही है मैं' मीच मला म्हणते 'फार विचार करतेस'
एकदिवस, एकवेळी, त्या क्षणी,
विचार, पोटाची भूक, सर्व होतील मूक
पडेल स्वप्न शेवट, विसर पडेल आपसूक

पडेल तेव्हा पडेल
तूर्तास 
कटिंगचहा, गरम गोधडी, पायपीट, झाडं, आकाश, पाणी, चिमण्या आणि खूप काही 
लांबच लांब, मजेत चालला आहे प्रवास

Friday, 18 November 2016

अबोली, मोगरी

अबोली, मोगरी थँक्स तुम्हाला
मार्चच्या उकाड्यात
कुणाला तरी झालेलं असाध्य दुखणं
आणि मी, माझी डोकेदुखी घेऊन

बस! एक शब्द फुटत नाही
एक ओळ सुचत नाही
एक रेघ उमटत नाही
एक रंग खुलत नाही, नुसता अंधार

खूप गच्च आतून
कुठे गोठून गेले सर्व
त्याच विवंचनेत मी
वितळवायला पैलतडीचा सूर्य हवा

आणि इथे गॅलरीत खुशाल
नुसत्या उतू जातायत, रंगाने, गंधाने, आकाराने
हे फुलणं आतून खास
त्यांनी ठरवलंय तसं

कसं जमतं हे त्यांना
बस! जायचं या वाटेवरून
नसेल कुणीही, ना मिळेल काहीही
पण आपण जायचं याच वाटेवरून

कसं जमलं हे त्यांना ?
विचारलं ढीग, त्या सांगताहेत ढीग
पण कशाच कशाला, कुणाचं कुणाला
काहीच कळत नाहीए


-  कांदिवली, मुंबई , ४-फेब्रुवारी-२०१६



Monday, 14 November 2016

लेडीज डब्बा


सुटली आहे ट्रेन
लांबलचक,
तुडुंब,
दाटून आलं अक्षरशः

सुटला आहे त्यातला लेडीज डब्बाही
चपाती मेकर? सुपची रेसिपी
उद्धार, धक्का,
बुक्की

ए!,टिकली ले
इयरिंग्ज, नेलपॉलिश ले
'कळलं ना?'
अरे चलो अंदर?!!!

प्लॅटफ़ॉर्मवरचा कुत्रा सताड, बेफिकीर
आजुबाजुला किरकिर
त्यामागच्या बिळातून
ये-जा करणारे उंदीर

आणि घुसणारे
ए!
एवढंच असेल ना तर
फर्स्ट क्लास मधून जायचं

समोर बसलेली बाई
चिवड्याचं अख्खं पाकिट फस्त केलंन
हिला काय गरज बोकणे मारून खाण्याची
हि चार दिवस जेवली नाही तरी चालेल


सुसाट मग वेग घेतला
दूरच्या झोपडपट्टीतला कोंबडा
झरकन मागे पडला
लाल तुरा

मागे पडली चालणारीही
माणसं प्लॅटफॉर्मवरची
मग करू लुंगी डान्स वगैरे भेंड्या
सात्विक भजन आधी

लहान मुल डोकावणारे

पेंगणारे, शून्यात ढेपाळलेले
सुटकेची प्रतीक्षा करणारे
हॅन्डल्स हात धरलेले

काही वेगळे चेहरे
सुंदर, रंगसंगती असलेले
वाहतेय, धावतेय एकटी
लोंबकळण्याला प्राप्त झालीय गती

नेक्स्ट स्टेशन,अगला स्टेशन,पुढील स्टेशन कांदिवली
क्षणभर विसर कोण तू? आणि उतर
मग स्टेशन वरचा तिखट वडापाव
आणि घर.

-कांदिवली मुंबई , ८-१२-२०१३

Friday, 11 November 2016

अनटायटल्ड पोएम एक

सोसायटीच्या गेटपाशी जाताजाता कानावर पडलं
तिथला सिक्युरिटी कुत्र्याशी छान बोलत होता
मी तिथून जाताच तो  एकदम गप्प झाला
पण बहुतेक कुत्राही छान बसून त्याचे ऐकत होता

खिडकीतून बाहेर बघताना एक छोटा निळा पक्षी
तुफान वेगाने निळी रेष उठवत गेला
त्याचा निळा रंग अल्ट्रामरिन,सेलुरीअन की कोबाल्ट ब्लु?
हा रंग कुठला ?

पक्षी, झाडाचा बुंधा
चालणारे, पिशवी घेऊन बाबा
संध्याकाळचा चहा
डस्टबिनमधल्या कपच्या कपाच्या


चपाती चिवडणारे तोंड
दाढी करणारे तोंड
पाणीपुरी खाणारे तोंड
तरी नाचून नाचून खाणे निवडणे फक्त चिमणीलाच जमते

बुडण्याचा अनुभव
एकटं रमणं,
ज्या पेनला हात लावते ते नुसतं लिहायला कुरकुरणं

या सगळ्याची सांगड कशी घालायची?

~ ११ नोव्हेंबर २०१६

Tuesday, 8 November 2016

'दत्तू' ची व्हिस्की

मी जेव्हा हा एक विशिष्ट लेखक वाचते तेव्हा त्या लेखकाने बनवलेले रसायन मेंदूतल्या बारक्या नळ्यांत खोल उतरते आणि तिथे दडून बसलेल्या असंख्य कड्या तोडून,  शिडी लावून वरही चढते, सोबत अनेक आकृत्या घेऊन. म्हणून मी नाव त्याला दिले आहे 'दत्तूव्हिस्की'. अधून मधून ही दत्तूची व्हिस्की घ्यावीच लागते. 

तर अशीच 'दत्तू'ची व्हिस्की घेऊन बसले होते.  दत्तू'च्या  व्हिस्कीने खोल जाऊन बसलेली एक कडी शोधली  तेव्हा अचानक एक आकृती कडी तोडून, शिडी चढून वर आली.  हळूहळू चेहरा स्पष्ट होत गेला तेव्हा ओळखलं कि ते खुद्द माझे वडील होते. त्यांच्याबरोबर ते एक वातावरण घेऊन आले होते. विशिष्ट दर्प. दारूचा, औषधांचा, मलमूत्राचा, डेटॉलचा, कोंदट. तो दर्प नाकात शिरताच एक अनुभव मन व्यापू लागला. भयंकर तुरुंग म्हणजे ती हॉस्पिटलची खाट. त्या खाटेवर सतत पडून राहायचं आणि त्या खिळलेल्या अवस्थेत भेटायला येणाऱ्या लोकांकडे बघायचं. आपण खाटेवर झोपलेले असू आणि माणसं आपल्याकडे उभं राहून बघत आहेत तेव्हाची शरीराची पोझिशन आयुष्यातल्या आपल्या सगळ्या शरीराच्या पोझिशनमधली सर्वात कठीण पोझिशन. तो आपल्याला दिसणारा 'व्ह्यू' च भयंकर. आयुष्यात बघितलेल्या अनेक सुंदर सकाळी, अनेक संध्याकाळी, रमणीय देखावे आणि भयानक दृश्ये यांना पार  मागे टाकेल असा हा 'व्ह्यू'. तो 'व्ह्यू' बघतानाचा क्षण म्हणजे अफाट माळरान. एकटपणाचं. जेव्हा आम्ही बघे होतो खाटेच्या सभोवती तेव्हा तो 'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' अनुभवत होते माझे वडील.  त्यांना 'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू'  बघताना चाहूल लागली असेल का की आता आपण जाणार आहोत. आता काही दिवसच हा 'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' डोळ्यापुढे असणार आहे. काय विचार आले असतील त्यांच्या मनात?

आपण प्रवास करतो, कुठल्याश्या गावी जातो. तिथून परत येतो. पण हा जो राहती जागा सोडतानाचा, जगलेलं, भिनलेलं वातावरण सोडून जातानाचा सूक्ष्म बदल आहे तो किती खोल आहे? आपण सामानाची बांधाबांध करतो, जाण्याचेही मग वेध लागतात. राहतं घर, तिथला परिसर, आजूबाजूची माणसे, या सर्वांची झालेली सवय. या सगळ्याबद्धल एक अनामिक हुरहूर दाटून येते. हळवेपणा वाढतो. कुंडीतल्या झाडांवरची सुकलेली पानं जरी  वाऱ्याने खाली पडली तरी उदास वाटतं. जे वाटतं त्याची धार वाढत जाते. यावेळी आपण वेगळेच कुणीतरी बनतो. संध्याकाळी सूर्य बुडला की, कालच्या, परवाच्या, अनेक दिवसांपूर्वीची त्या परिसराची, तिथे घडलेल्या प्रसंगांची, क्षणांची  आठवण येते. हे क्षण कधी खरे घडलेले, कधी आपल्या विचारांमधले, कधी नुसतेच अनुभवलेले असतात. त्या क्षणात समोर घडलेला आसमंताचा खेळ, उडणारी पाखरं, कानांवर पडणारे काही आवाजही लक्षात राहिलेले असतात. मग आपण आठवतो तेव्हा ते आवाजही ऐकायला येतात. आपली मनःस्थिती आपण पुन्हा अनुभवतो. सगळ्या कालच्या आठवणी आज पुन्हा  आठवल्या की मन एका विचित्र स्थितीत पोहोचते. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबद्धल आपण नकळत, उगाचच खिन्न होतो. ते तसं वाटणं हा अनुभव म्हणजे 'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' चे ट्रेलर असेल का? जीवन अखेरच्या  'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' चे ट्रेलर आपल्याला वारंवार दाखवत असते बहुतेक. 

वडील आजारी असताना मी काहीच कामधाम नसल्यासारखी पूर्णवेळ हॉस्पिटलमधेच बसून असे, तिथले तेव्हाचे वातावरण मनात इतके ठासून  बसले आहे की एका आकृतीच्या वर येण्याने तेच वातावरण निर्माण होते आजूबाजूला, ज्या वातावरणात तेव्हा मी त्या बाकावर बसून होते.एकदा हॉस्पिटलच्या खिडकीतून बाहेर बघत असताना समोरच्या बिल्डिंगच्या खिडकीवरच्या विंडोपेनवर एक कबुतर पाय मुडपून बसले होते तेही वातावरणातून वर येते. मन त्या संपूर्ण वातावरणाच्या मॅनिफेस्टेशनने विषण्ण होते. हे जे काय वाटते ते शब्दांत सांगणे अवघड. जीवनाच्या अशा किती तऱ्हा आहेत आणि किती स्थिती ज्यात तुम्हाला काय आहे, काय होते, काय वाटते ते व्यक्तच करता येत नाही. 

तेव्हा गपचूप मी पुन्हा  'दत्तू' ची व्हिस्की घेते. आणखी थोडा वेळ जातो. वर येणाऱ्या आकृत्यांना  खाली दाबून मी  चांगल्या आठवणी काढून त्यांना कायमचं घालवण्याचा प्रयत्न करते. पण काही आठवणी जिवंत असेपर्यंत सगळ्या गच्च कड्यांआड बसूनच राहतील. मला ही दत्तूची व्हिस्की जमत नाही. जहाल आहे. घसा  जळजळतो. तेवढी माझी कपॅसिटीदेखील नाही. पण आपल्या हिरव्या-काळ्या सोनेरी बुचाच्या शिश्यातून  ती मला अधूनमधून खुणावतच राहते.