मी
जेव्हा हा एक विशिष्ट लेखक वाचते तेव्हा त्या लेखकाने बनवलेले रसायन
मेंदूतल्या बारक्या नळ्यांत खोल उतरते आणि तिथे दडून बसलेल्या असंख्य कड्या
तोडून, शिडी लावून वरही चढते, सोबत अनेक आकृत्या घेऊन. म्हणून मी नाव
त्याला दिले आहे 'दत्तूव्हिस्की'. अधून मधून ही दत्तूची व्हिस्की घ्यावीच
लागते.
तर
अशीच 'दत्तू'ची व्हिस्की घेऊन बसले होते. दत्तू'च्या व्हिस्कीने खोल
जाऊन बसलेली एक कडी शोधली तेव्हा अचानक एक आकृती कडी तोडून, शिडी चढून वर
आली. हळूहळू चेहरा स्पष्ट होत गेला तेव्हा ओळखलं कि ते खुद्द माझे वडील
होते. त्यांच्याबरोबर ते एक वातावरण घेऊन आले होते. विशिष्ट दर्प. दारूचा,
औषधांचा, मलमूत्राचा, डेटॉलचा, कोंदट. तो दर्प नाकात शिरताच एक अनुभव मन
व्यापू लागला. भयंकर तुरुंग म्हणजे ती हॉस्पिटलची खाट. त्या खाटेवर सतत
पडून राहायचं आणि त्या खिळलेल्या अवस्थेत भेटायला येणाऱ्या लोकांकडे
बघायचं. आपण खाटेवर झोपलेले असू आणि माणसं आपल्याकडे उभं राहून बघत आहेत
तेव्हाची शरीराची पोझिशन आयुष्यातल्या आपल्या सगळ्या शरीराच्या पोझिशनमधली
सर्वात कठीण पोझिशन. तो आपल्याला दिसणारा 'व्ह्यू' च भयंकर. आयुष्यात
बघितलेल्या अनेक सुंदर सकाळी, अनेक संध्याकाळी, रमणीय देखावे आणि भयानक
दृश्ये यांना पार मागे टाकेल असा हा 'व्ह्यू'. तो 'व्ह्यू' बघतानाचा
क्षण म्हणजे अफाट माळरान. एकटपणाचं. जेव्हा आम्ही बघे होतो खाटेच्या सभोवती
तेव्हा तो 'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' अनुभवत होते माझे वडील. त्यांना
'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' बघताना चाहूल लागली असेल का की आता आपण जाणार
आहोत. आता काही दिवसच हा 'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' डोळ्यापुढे असणार आहे. काय
विचार आले असतील त्यांच्या मनात?
आपण
प्रवास करतो, कुठल्याश्या गावी जातो. तिथून परत येतो. पण हा जो राहती जागा
सोडतानाचा, जगलेलं, भिनलेलं वातावरण सोडून जातानाचा सूक्ष्म बदल आहे तो
किती खोल आहे? आपण सामानाची बांधाबांध करतो, जाण्याचेही मग वेध लागतात.
राहतं घर, तिथला परिसर, आजूबाजूची माणसे, या सर्वांची झालेली सवय. या
सगळ्याबद्धल एक अनामिक हुरहूर दाटून येते. हळवेपणा वाढतो. कुंडीतल्या
झाडांवरची सुकलेली पानं जरी वाऱ्याने खाली पडली तरी उदास वाटतं. जे
वाटतं त्याची धार वाढत जाते. यावेळी आपण वेगळेच कुणीतरी बनतो. संध्याकाळी
सूर्य बुडला की, कालच्या, परवाच्या, अनेक दिवसांपूर्वीची त्या परिसराची,
तिथे घडलेल्या प्रसंगांची, क्षणांची आठवण येते. हे क्षण कधी खरे घडलेले,
कधी आपल्या विचारांमधले, कधी नुसतेच अनुभवलेले असतात. त्या क्षणात समोर
घडलेला आसमंताचा खेळ, उडणारी पाखरं, कानांवर पडणारे काही आवाजही लक्षात
राहिलेले असतात. मग आपण आठवतो तेव्हा ते आवाजही ऐकायला येतात. आपली
मनःस्थिती आपण पुन्हा अनुभवतो. सगळ्या कालच्या आठवणी आज पुन्हा आठवल्या की
मन एका विचित्र स्थितीत पोहोचते. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबद्धल आपण
नकळत, उगाचच खिन्न होतो. ते तसं वाटणं हा अनुभव म्हणजे
'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' चे ट्रेलर असेल का? जीवन अखेरच्या
'एक्सक्लुसिव्ह व्ह्यू' चे ट्रेलर आपल्याला वारंवार दाखवत असते बहुतेक.
वडील
आजारी असताना मी काहीच कामधाम नसल्यासारखी पूर्णवेळ हॉस्पिटलमधेच बसून
असे, तिथले तेव्हाचे वातावरण मनात इतके ठासून बसले आहे की एका आकृतीच्या
वर येण्याने तेच वातावरण निर्माण होते आजूबाजूला, ज्या वातावरणात तेव्हा मी
त्या बाकावर बसून होते.एकदा हॉस्पिटलच्या खिडकीतून बाहेर बघत असताना
समोरच्या बिल्डिंगच्या खिडकीवरच्या विंडोपेनवर एक कबुतर पाय मुडपून बसले
होते तेही वातावरणातून वर येते. मन त्या संपूर्ण वातावरणाच्या
मॅनिफेस्टेशनने विषण्ण होते. हे जे काय वाटते ते शब्दांत सांगणे अवघड.
जीवनाच्या अशा किती तऱ्हा आहेत आणि किती स्थिती ज्यात तुम्हाला काय आहे,
काय होते, काय वाटते ते व्यक्तच करता येत नाही.
तेव्हा गपचूप मी पुन्हा 'दत्तू' ची व्हिस्की घेते. आणखी थोडा वेळ जातो. वर येणाऱ्या आकृत्यांना
खाली दाबून मी चांगल्या आठवणी काढून त्यांना कायमचं घालवण्याचा प्रयत्न
करते. पण काही आठवणी जिवंत असेपर्यंत सगळ्या गच्च कड्यांआड बसूनच राहतील.
मला ही दत्तूची व्हिस्की जमत नाही. जहाल आहे. घसा जळजळतो. तेवढी माझी
कपॅसिटीदेखील नाही. पण आपल्या हिरव्या-काळ्या सोनेरी बुचाच्या शिश्यातून
ती मला अधूनमधून खुणावतच राहते.
No comments:
Post a Comment