Thursday 3 November 2016

उजाड माळरान, विखुरलेलं बरंच काही


एमिली ब्रॉन्टे
आज सकाळी घराशेजारच्या खारफुटीच्या जंगलाच्या दिशेने पक्षी बघायला बाहेर पडले होते. तिथे सकाळी लवकर गेलं तर खूप पक्षी दिसतात. सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडले आणि छोट्या रस्त्याला लागले. रस्त्यावर कितीतरी चिमण्या काहीतरी टिपण्यात व्यग्र होत्या. त्यांच्याकडे पाहून मन ताजेतवाने करत मी चालले होते. त्यांच्या मखमली पंखांचा सुखद स्पर्श मनाला जाणवत होता. तितक्यातच एका बाजूला माझी नजर गेली. एक कावळा आणि त्याच्या पायात पकडलेलं काहीतरी नजरेला पडलं. ते बघितलं आणि एकदम पोटात गोळा आला. ते पकडलेलं एक चिमणीचं गोजिरवाणं, बहुदा नुकतंच उडायला शिकलेलं पिल्लू होतं. मला काय करावं सुचेना, न राहून मी त्याच्या दिशेने कावळ्याला मारायला धावले. पण त्या क्षणी तो त्या पिल्लाला धरून उडून गेला. असहाय, एक क्षणात जे काही वाटलं त्याचं आकलन मला अजूनही झालेलं नाही. एकदम अंगातलं त्राण निघून गेल्यासारखं, दिग्मूढ वाटलं. वाटलं आता सरळ मागे फिरावं आणि कुठेतरी लपून बसावं. पक्षी बघणं नको, काही नको आता. पुरे झालं. तरीही पाय चालत राहिले, का ते माहित नाही. पुढे जाऊन खारफुटीच्या जंगलाजवळच्या कच्च्या रस्त्यावर उभं राहून दिसणारे पक्षी बघितले. अनेक पक्षी दिसले. येताना घराजवळच्या एका शेवग्याच्या झाडावर दोन अत्यंत देखणे हिरवेगार पोपटही बघितले.


दुपारी काहीतरी लिहावेसे वाटले, आणि डोळ्यांसमोर आलं एक पुस्तक 'वूदरिंग हाईट्स' आणि ते लिहिणारी मुलगी एमिली ब्रॉन्टे. एमिली ब्रॉन्टे सारखी मनात होतीच. अनेक वर्षांपूर्वी वाचलेली तिची ही कादंबरी. कधीपासून लिहावंसं वाटलं तिच्यावर आणि तिच्या पुस्तकावर,पण लिहिलं नाही कधीही. आज अचानक परत वाटलं प्रकर्षाने लिहावंसं.

'वूदरिंग हाईट्स' हि एमिली ब्रॉन्टेची पहिली आणि शेवटची कादंबरी. तीस वर्षाच्या अपुऱ्या आयुष्यात लिहिलेली. पण लेखिकेचे नाव अजरामर करून गेलेली अशी अप्रतिम साहित्यकृती. एमिली ब्रॉन्टेबद्धल सर्वप्रथम हेच वाटतं की एवढ्या कमी वयात नात्यांच्या गुंतागुंतीचा एवढा खोलवर पाठपुरावा तिने कसा काय केला. धगधगता निखारा मनात ठेऊन तिने लिहिलेले हे लिखाण म्हणजे आश्चर्याची गोष्टच वाटते. अतिशय उद्विग्न, तरल आणि त्याचबरोबर पराकोटीची त्रासदायक अशी नाती तिने या कादंबरीत रेखाटली आहेत. ही कादंबरी लिहिताना ती अठ्ठावीस वर्षांची होती. कादंबरी प्रथम 'एलिस बेल' या नावाखाली प्रसिद्ध झाली.  (तिने तिचे नाव प्रसिद्ध केले नाही) एमिलीच्या मृत्यूनंतर तिच्या बहिणीने शार्लट ब्रॉन्टेने त्या कादंबरीच्या  मॅन्यूस्क्रिप्टमध्ये काही बदल केले आणि १८५० साली दुसरी आवृत्ती म्हणून ती प्रकाशित केली.

सगळं लेखन नेहमी लक्षात राहतंच असं नाही. पण राहतो तो त्याच्या वाचनाने मिळालेला अनुभव. तशी काही लेखनं आपलं मन शांत करतात , प्रत्येक शब्दागणिक येणारी एक थंड, निरव वाऱ्याची झुळूक घेऊन येतात. शब्दांचे सामर्थ्य एवढे की क्षणार्धात आपण त्या लेखनात बुडून जातो. शब्दांच्या लाटांचा अथांग समुद्र. जसं दुर्गा भागवत, कावाबाता यांचं लेखन. तर जी.ए. कुलकर्णी यांचं लेखन गूढ काळोखात एखाद्या घुबडाने झर्रकन मान एकशेऐंशी अंशात वळवावी आणि भेदक नजरेने बघावं तसे.

आणि काही लेखन म्हणजे खदखदणारा लाव्हारस. त्याची धग असह्य होते. चटके बसतात. पुस्तक खाली ठेवावेसे वाटतं पण ठेववत नाही. शब्द नुसते जळत असतात. डोळ्यात निखाऱ्यांचे किटाळ उडत राहतात. असं  लेखन Eugene O'neill च्या Mourning becomes electra किंवा सिल्विया प्लाथच्या 'द बेल जार' सारखं .....  आणि एमिली ब्रॉन्टेच्या 'वूदरिंग हाईट्स'सारखं.   

'वूदरिंग हाईट्स' हे मूरलॅंड( म्हणजेच माळरानावरचं) एक फार्महाउस. पूर्ण कथानक या घराभोवती आणि 'टचक्रॉस ग्रॅंज' नावाच्या घराभोवती घडतं. संपूर्ण कथा हा एक वृतांत आहे. कुणीतरी  कहाणी सांगावी तसा. ही कहाणी सांगते नेली डीन नावाची, 'वुदरिंग हाइट्स' आणि 'टचक्रॉस ग्रॅंज' या दोन्ही घरांशी अतिशय जवळचा संबंध असलेली आणि तिथे घडलेल्या सर्व गोष्टीना साक्षीदार असलेली एक मेड. ही कहाणी घडून गेल्यानंतर जवळपास तीस वर्षांनी लॉकवुड नावाचा एक श्रीमंत माणूस 'टचक्रॉस ग्रॅंज' हे घर  निवांत सुट्टी घालवण्यासाठी भाड्याने विकत घेतो. 'टचक्रॉस ग्रॅंज' चा मालक असतो एक म्हातारा. त्याचं नाव असतं 'हेथक्लीफ'. हेथक्लीफ हा या कादंबरीच्या खदखदणाऱ्या लाव्ह्याचे उगमस्थानही आहे आणि अंतिमस्थानही. हा उगम कुठेही जात नाही. कुठेही त्याचे निर्वाण होत नाही. स्वतःमधेच विलीन होत तो खदखदत राहतो. त्या लाव्ह्याच्या  झळीची जाणीव परक्या लॉकवुडही होते. इथे काहीतरी गूढ आहे, विक्षिप्त माणसे आणि  सभ्य वाटणारा आणि तरीही माणूसघाणा, विक्षिप्त म्हातारा 'हेथक्लीफ', आ वासून बसलेले 'वूदरिंग हाईट्स' हे घर या सगळ्याने तो अचंबित होतो. 'टचक्रॉस ग्रॅंज' मध्ये राहिल्याने  'वूदरिंग हाईट्स' बद्धलचे त्याचे कुतूहल वाढत असते. 'वूदरिंग हाईट्स' मध्ये 'हेथक्लीफ' बरोबर राहणारी मितभाषी, पण त्रासलेली सुंदर तरुणी, जवळपासच वावरणारा, अतिफाटका, नोकर नसला तरी नोकराप्रमाणे दिसणारा तरुण या घरातल्या सदस्यांबद्धल लॉकवुडला कुतूहल वाटते. त्यातूनच एकदा घरभाड्याविषयी 'हेथक्लीफ'शी बोलणी करण्यासाठी तो 'वूदरिंग हाईट्स' मध्ये येतो त्यावेळी  अचानक झालेल्या बर्फाच्या वाधळामूळे त्याला तिथेच रात्र काढणे भाग होऊन बसते. पण 'हेथक्लीफ' किंवा इतर कुणीही त्याला तिथे राहण्याचा आग्रह सोडा पण साधा औपचारिकपणा म्हणून 'राहा' असे म्हणत नाहीत. शेवटी वाधळ थांबण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत  तेव्हा नाईलाजानेच 'हेथक्लीफ' त्याला राहण्याची परवानगी देतो. जिथे लॉकवुड राहतो त्या खोलीत त्याला झोप येत नाही, मग तो खोलीत इकडेतिकडे काहीतरी धुंडाळत बसतो, त्या जागी त्याला काही पुस्तकं आणि त्यावरची 'कॅथरीन' या नावाची ग्राफिटी सापडते. ही 'कॅथरीन' कोण हे त्याला समजत नाही. रात्री झोपेत त्याला एक स्त्री ('कॅथरीन') खिडकीतून आत शिरत असल्याचे दिसते, अथवा भास होतो आणि त्याच्या भीतीपूर्ण रुदनाने जागा होऊन  'हेथक्लीफ' धावत येतो. 'कॅथरीन' खिडकीतून आत आल्याचे सांगताच  'हेथक्लीफ' तिला वेड्यासारखा शोधतो आणि तिला परत येण्याच्या विनवण्या करतो.  लॉकवुडला स्वतःच्या खोलीत पाठवून तो स्वतः तिथे  'कॅथरीन'च्या येण्याची वाट बघत बसतो. हे गौडबंगाल काय आहे हे लॉकवुडला कळत नाही, तो जेव्हा दुसऱ्या दिवशी 'टचक्रॉस ग्रॅंज' ला परत येतो तेव्हा त्याबद्धल नेली डीनला विचारतो. मग नेली डीन त्याला जी कहाणी सांगते तीच ही कादंबरी.

ही कहाणी आहे 'हेथक्लीफ'च्या विलक्षण तीव्र अशा प्रेमभावनेची, तितक्याच विलक्षण तिटकाऱ्याची, रागाची, सुडाची, नात्यांच्या आणि त्या नात्यांत धुमसणाऱ्या आगीची. आजूबाजूला माळरान, तसेच माळरान आहे मनातही, जीवनातही, कुठेही सावलीचा टिपूस नसलेले. भावनांची विलक्षण तीव्रता आणि त्यामुळे होरपळून निघणारे प्रसंगी राख होणारे जीवन तिथे आहे. ही तीव्रता इतकी दाहक की 'हेथक्लीफ' त्यात जळून राख होतो. स्वतःवर झालेल्या अन्यायामुळे ठेचून निघाल्याने बनलेलं सुडाचं आणि द्वेषाचं अमानवी घुबड त्याच्या मानगुटीवर कायमचं असं ठाण मांडून बसतं की तो स्वतःच त्या घुबडाचा घुत्कार बनतो. सतत सूडाच्या आणि द्वेषाच्या भावनेने त्याच्यातला अतिसंवेदनशील माणूस केव्हाच मरून जातो पण त्या अतिसंवेदनशीलतेचे पडसाद त्याच्यावर पुनःप्रक्षेपित होत राहतात. त्यामुळे तो बनतो : बाहेरून विक्षिप्त, माणूसघाणा आणि आतून अतिशय हळवा,नाजूक, मोडून गेलेला. त्याचा अहं त्याला जगू देत नाही, पश्चातापालाही तूसभर उसंत न मिळावी असा स्वतःच्या आगीत तो शेवटपर्यंत होरपळत राहतो. शेवटी त्याची सुडाची आग त्याच्या म्हाताऱ्या शरीराबरोबर कमी व्हायला बघते पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. पश्चाताप झाला तरी तो व्यक्त करायला आणि माफी मागायला कुणीच उरू नये असलं त्याचं प्राक्तन. शेवटी त्या आगीत होरपळतच तो मृत्यूला समोरा जातो. खाणेपिणे सोडून देतो. आणि तीन-चार दिवसांनी 'कॅथरीन' च्या खोलीतच मृत्यू पावलेला आढळतो इतका त्याचा मृत्यू दुर्लक्षित ठरतो.

हेथक्लीफ हा एक अनाथ मुलगा. लहान असताना 'कॅथरीन'चे वडील त्याला आपल्या घरी आणतात. लहानपणापासून 'कॅथरीन'च्या वडिलांचे प्रेम त्याला मिळते. 'कॅथरीन' वर त्याचे अफाट प्रेम. 'कॅथरीन' चे ही त्याच्यावर. दोघेजण लहानपणापासूनचे सवंगडी. त्यामुळे 'कॅथरीन'च्या भावाचा त्याच्यावर रोष. पण 'हेथक्लीफ' शेवटी त्यांच्या घरात वाढलेला पण साधारणपणे घरातला नोकरवर्गाचाच सदस्य. लहानपणी जरी त्याला कॅथरीनच्या वडिलांचे प्रेम मिळते तरी मोठा झाल्यावर आणि विशेषतः त्यांच्या मृत्यूनंतर त्याला आपल्या हीनवर्गाची जाणीव करून दिली जाते. किंवा त्याला स्वतःलाच ती अधिकाधिक जाणवत, भेडसावत  राहते आणि त्याने तो त्रस्त होतो.  विशेषतः कॅथरीनच्या भावाकडून, जो त्याचा लहानपणापासून 'वडिलांच्या प्रेमातील अपात्र वाटेकरी' म्हणूनच अपमान करत असतो. जेव्हा हेथक्लीफला हे कळते की आपण जिच्यावर प्राणांपेक्षा अधिक प्रेम केले ती 'कॅथरीन' देखील लग्न करण्याचा निर्णय घेताना हेथक्लीफच्या हीनवर्गातील असण्याचा त्याचा उल्लेख करते तेव्हा तो उद्विग्न होतो आणि तिथून निघून कायमचा जातो. कॅथरीनला शेवटी मानमरातब,उच्चस्तर यांचा विचार करावा लागतोच. तरीही तिचं  हेथक्लीफवरचं  प्रेम जराही कमी झालेले नसतं. तिचं खरं प्रेम त्याच्यावरच असतं. पण ती 'टचक्रॉस ग्रॅंज' च्या श्रीमंत मुलाशी लग्न करून आपल्या अधिकाराचा उपयोग हेथक्लीफसाठीच करण्याच्या विचाराने श्रीमंत मुलाला होकार देते. हेथक्लीफ आपली दुविधा समजेल अशी तिला आशा असावी पण हेथक्लीफच्या जाण्याने तिच्याही आशेवर पाणी पडते, विश्वासाला तडा जातो आणि ती सैरभैर होते , आजारी पडते. कॅथरीनच्या लग्नानंतर सहा महिन्यांनी हेथक्लीफ परत येतो तो एक श्रीमंत उमराव बनून. पण तो पूर्वीचा हेथक्लीफ राहिलेला नसतो. तो फक्त सुडाने पेटलेला एक ज्वालामुखी झालेला असतो आणि त्याच्या आगीत कॅथरीनच काय पण कॅथरीनचं पूर्ण कुटुंब, टचक्रॉस ग्रॅंजचं पूर्ण कुटुंब, होरपळून निघतं. कॅथरीन, तिचा भाऊ, कॅथरीनचा नवरा, त्याची बहीण हे सर्वच त्या सूडाच्या आगीत नष्ट होतात. एवढेच नव्हे तर हेथक्लीफच्या द्वेषाच्या आणि सूडाच्या दुष्टचक्रातून पुढच्या पिढीचीही सुटका होत नाही. त्याची सूडबुद्धी त्याला कॅथरीनची मुलगी, कॅथरीनच्या भावाचा मुलगा इतकंच काय स्वतःचा (हेथक्लीफ सूडबुद्धीनेच कॅथरीनच्या नवऱ्याच्या बहिणीला फशी पासून तिच्याशी लग्न करून तिलाही उध्वस्त करतो, त्यातूनच जन्माला आलेला मुलगा) मुलगा यांनाही आपल्या आगीत ओढून घेते. शेवटी उरतात कॅथरीनची विधवा मुलगी आणि नोकर बनून राहिलेला 'वूदरिंग हाईट्स' चा खरा वारस, कॅथरीनच्या भावाचा मुलगा.

या सर्वांमध्ये जीवघेणी गोष्ट आहे ती एमिलीची कादंबरी लिहिण्याची पद्धत. एमिली किती अलौकिक प्रतिभा घेऊन आली होती याचा प्रत्यय या कादंबरीत येतो. इतक्या सूक्ष्म पद्धतीने तिने मांडलेली नात्यांची, मानवी - अमानवी भावनांची गुंतागुंत फक्त मोजक्या प्रतिभाशाली लेखकांना मांडता आली असेल.
ही कादंबरी जेव्हा पहिल्यांदा १८४७ मध्ये प्रकाशित झाली तेव्हा तिने वाचकांत एवढी खळबळ माजवली की अशी अनैतिक वागणारी, कसलीही भीडभाड न ठेवता वागणारी माणसं, सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करणारी ही कहाणी , आणि तेवढेच तप्त, अतिशय भयंकर असे संपूर्ण कहाणीचे कथन, कसं काय लिहिलं गेलं याबदल वाचक स्थिमित झाले. या कादंबरीत पदोपदी शब्दांची तीक्ष्ण धारेची पाती लखलखत राहतात. वाचताना वाटते की हे सर्व कसं लिहू शकलं कोणी? कसं लिहू शकतं?
एका समीक्षकाने तर म्हटलं आहे की ही कादंबरी लिहिताना, त्याचे कथानक, त्यातली पात्रे जगताना लेखकाने आत्महत्या कशी केली नाही? इतकं हे कथानक ज्वलंत आहे. माणसाच्या अंतरंगाची एवढी खोलवर जाण या कादंबरीत आहे की काहीवेळेला तिच्यातील प्रसंग, माणसांची वर्तनं, त्यांचे संभाषण, त्यांचे जीवन, हे सर्व ज्या पद्धतीने लिहिले आहे ते शब्दांचे जंजाळ आपल्या पायांना गुंतवत-गुंतवत आपल्याला खोल आतमध्ये ओढून घेते. शब्दांच्या सामर्थ्याने आणि एमिलीच्या लेखनाच्या विशिष्ट शैलीने डोळे दिपतात.

हि एकच कादंबरी लिहून एमिली ब्रॉन्टेने जगाचा निरोप घेतला. पण या एकाच कादंबरीने ती साहित्यविश्वात अजरामर झाली. ही विलक्षण कादंबरी लिहिणारी एमिली स्वतःही एका गुढापेक्षा कमी नव्हती. तिचं जीवन अत्यंत विरक्त, एकटं होतं. तिच्या मृत्यूनंतर विशेषतः या कादंबरीच्या प्रकाशनानंतर ती स्वतःच अनेक पुस्तकांचा विषय बनली, अनेकांनी तिच्या गूढ व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर आणि तिच्या भावंडांवर  'डिव्होशन' नावाचा एक चित्रपटही काढला गेला. अनेक डॉक्युमेंटरीज बनवल्या गेल्या. आजही तिची कादंबरी आपल्या अढळ स्थानापासून हललेली नाही. एमिली आणि तिची भावंडं यांचं खडतर जीवन आणि एमिलीच्या भावाची आणि त्यापाठोपाठ एमिलीचीही झालेली शोकांतिका सदैव गुढाने भरलेली राहतील. एमिली ही प्रतिभेचे देणे(की शाप?) लाभलेली एक अतिसंवेदनशील लेखक. जी. एं. ना एमिलीविषयी विलक्षण आदर होता, तिचा 'डिव्होशन' चित्रपट त्यांना अत्यंत व्याकुळ करून गेला होता. तिच्याविषयी आणि तिने व्यथित केलेल्या आयुष्याविषयी त्यांनी आपल्या अनेक पत्रांतून लिहिलं आहे. एमिली इंग्लंडमधील यॉर्कशायरच्या 'हॉवर्थ पार्सनेज' नावाच्या, एकाकी, गडद उदासीचे सावट असलेल्या एका छोट्याश्या खेडेगावात राहत असे. आई गेल्यानंतर ही लहान लहान असलेली भावंडंच एकमेकांचे आधार बनली होती. सहा भावंडातील फक्त तिघी बहिणी(एमिली, शार्लेट, ऍनी) आणि एक भाऊ एवढेच वाचले. एकमेकांना धरूनच ती मोठी झाली. त्यामुळे भावंडात घट्ट प्रेम होते. पण तसे असले तरी एमिली अबोल, एकाकीच राहिली. आपल्या दारुड्या आणि उदासीचा शिकार बनलेल्या भावाची ती पाठराखीण झाली. दुःखाचे सावट सदैव माथ्यावर असलेल्या एमिलीला जवळच्या मूरलॅंड्स या विस्तीर्ण पठारांवर शांती मिळत असे. ती दूरदूर आपल्या आवडत्या कुत्र्याला घेऊन या भयाण, एकाकी पठारांवर फिरत असे. तेच तिचे खरे साथी होते. या मूरलॅंड्सवर(माळरानावर) फिरतानाच तिला दूरच्या टेकाडावर एक घर दिसले आणि त्यातूनच या कादंबरीतील 'वूदरिंग हाईट्स' ची कल्पना तिला सुचली. एमिली एकाकी होती पण तिचे मन सवेंदनशील आणि प्रवाही होते, कल्पनारम्य (highly imaginative) होते. तिच्या प्रतिभेने तिने स्वतः जगलेल्या, अनुभवलेल्या आणि सहन केलेल्या अनेक परिस्थितींचे, तिच्या मनात चाललेल्या सूक्ष्म भावनांचे, संघर्षांचे मूर्त स्वरूप या कादंबरीत प्रकट केले. पण प्रश्न असा पडतो की 'हेथक्लीफ' हे जहाल /अमानवी वाटण्याइतपतच्या तीव्र भावनांनी वेढलेले, विलक्षण गुंतागुंतीचे आणि तरीही शेवटी  माणूसच  असलेले पात्र तिने कसे उभे केले, तिने तिच्या स्वतःच्या आयुष्यात हे पात्र कुठे बघितले, अनुभवले होते? यावर काही अभ्यासकांचे असेही म्हणणे आहे की 'हेथक्लीफ' हे एमिलीचे स्वतःचेच अंतरंग आहेत. ते तिचेच तिने उभे केलेले रूप आहे. नाहीतर एवढं तापदायक, ज्वलंत, धगधगीत हेथक्लीफचं आयुष्य ती कुठून आणू शकली असती? ते तिचंच passionate रूप आहे. दुर्दैवाने ज्या पद्धतीने 'हेथक्लीफ' चा अंत झाला आहे, काही तश्याच पद्धतीने एमिलीचाही अंत झाला. तिच्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या दफनविधीच्या वेळी तिला थंडी वाजू लागली. नंतर ताप भरला, त्याचे रूपांतर क्षयात झाले पण कुठचाही वैद्यकीय उपचार घेण्यास एमिलीने नकार दिला. शेवटी जेव्हा ती मृत्यूशैय्येवर असल्याचे तिला जाणवले तेव्हा ती म्हणाली 'आता डॉक्टरना भेटायला मी तयार आहे'.

एमिलीचे आयुष्य चटका लावणारे आहे आणि तशीच तिची हि ''वूदरिंग हाईट्स' ही चटका लावणारी आहे. तिची दोघांची धग वर्षानुवर्षे मनात जाणवत राहते.  

जी. ए कुलकर्णी हे एमिलीच्या लेखनाचे चाहते होतेच पण एमिलीची एक निस्सीम चाहती होती मराठी लेखिका तारा वनारसे. 'तीळा तीळा दार उघड' या पुस्तकात त्यांनी एमिलीला अर्पण केलेला 'हॉवर्थच्या परिसरात' हा लेख लिहिला आहे. त्या आपल्या आवडत्या लेखिकेसाठी, 'वूदरिंग हाईट्स' मधील अफाट पसरलेला मूरलॅंडचा एकांत अनुभवण्यासाठी हॉवर्थला गेल्या होत्या. जाताना हॉवर्थच्या जवळपास पोचताच तेथील बदलेल्या वातावरणाला बघून त्या उदास झाल्या. त्या लिहितात :' माझी अपेक्षा काही वेगळीच होती. हॉवर्थच्या इतकं जवळ आल्यानंतर तरी - पण माझ्या मनातला तो उत्तुंग, वैराण प्रदेश कुठे आहे? क्षितिजापर्यंत भिडणारी ती मूर्स - ते जांभळं हेदर - हॉवर्थच्या वाटेवर त्याचं ओझरतं तरी दर्शन व्हायला हवं होतं. त्याऐवजी हे नुसतंच घराचं आणि धुराचं कुरूप जंगल. ... 'एकतर कल्पनेला मोकाट सोडायचं आणि वर कल्पनेतल्या विश्वाचा प्रत्यक्षात पडताळा पाहण्याचा हव्यास बाळगायचा. विसावं शतक अर्धं उलटून गेलं आणि मी सव्वाशे वर्षांपूर्वीचं जग शोधू पाहतेय.'  पण पुढे गेल्यावर जशी शहराची गजबज संपून हॉवर्थचा खरा परिसर सुरु झाला तेव्हा त्यांना  चराचरात व्यापून राहिलेल्या एमिलीला भेटता आलं, अनुभवता आलं. तो अनुभव त्यांनी अतिशय तरलतेने या लेखात मांडला आहे. तारा वनारसे एमिलीच्या कविताही खऱ्या अर्थाने जगल्या होत्या. हॉवर्थच्या चर्चमधील एमिलीच्या मृत्युलेखाकडे बघून त्यांना एमिलीची कविता आठवते, त्या लिहितात , 'अवघ्या एकविसाव्या वर्षी एमिली हे लिहून गेली :

And If I pray, the only prayer
That moves my lips for me
Is - 'Leave the heart that now I bear
and give me liberty'

शरीराच्या बेड्या तिला असह्य झाल्या होत्या, त्या बंधनातून सुटण्याचा ध्यास तिला लागून राहिला होता. त्याच कवितेत ती पुढे म्हणते:

'Yes, as my swift days near their goal
'Tis all that I implore -
Through life and death , o chainless soul
with courage to endure

तारा वनारसे यांनी दिलेलं तिच्या कवितांचं आकलनही वाचण्यासारखं आहे: 'अगदी अबोल आणि एकाकी अशा या मुलीनं आपल्या आयुष्यात अशी काही निर्भेळ एकसंधता आणि निर्व्याज सचोटी राखली की ती एखाद्या अवलियालाही साधू नये. जीवनाशी तर राहूच देत पण मरणाशीही तडजोड करण्याचं तिनं नाकारलं. आयुष्याच्या शेवटी लिहिलेल्या कवितेत ती म्हणते :

No coward soul is mine
No trembler in the world's storm-troubled sphere
अंतःस्थ प्रचितीचा पीळ तिच्या शब्दांमागे आहे.
O God within my breast
Almighty ever present deity
Life that within me hast rest
As I undying life , have power in thee
...
There is not room for death
Nor atom that his might could render void
Since thou art Being and Breath
And what thou art may never be destroyed

'असं सांगतात की एमिली कित्येकदा आपलं लिहिण्याचं डेस्क घेऊन बाहेर बागेत जाई. एखाद्या झाडाच्या सावलीत बसून तासंतास लिहीत राहत असे. 'वूदरिंग हाईट्सचा बराचसा भाग तिने असा मोकळ्यावर लिहून काढला. हॉवर्थ पार्सनेजच्या आसपास असलेल्या कित्येक झाडावेलींचा उल्लेख तिच्या लेखनात येतो.'

तारा वनारसे यांचा हा लेख अतिशय सुंदर आहे आणि तो वाचून आपल्याही वाटतं की एकदा त्या विस्तीर्ण, अफाट पसरलेल्या 'मूर्स' च्या माळरानावर भटकावं. सोबतीला कुत्रा घेऊन  आणि हृदयात निखारे घेऊन एकट्याच फिरणाऱ्या त्या एकमेवाद्वितीय एमिलीला भेटावं. पण नकोच ते. सहन होईल की नाही सांगता यायचं नाही.

दुपारी हे लिहुन पूर्ण झालं. पण त्या रात्री बराच वेळ झोप आली नाही. सारखं ते सकाळचं दृश्य डोळ्यासमोर येत राहिलं. तो भयानक काळा कावळा आणि त्याच्या तावडीत सापडलेलं ते चिमणीचं पिल्लू. कावळ्याने त्या कोवळ्या जीवावर कशी निर्दय झडप घातली. पण निर्दय कोण? कठोर निर्विकार कोण? ते ठरवता येऊ शकत नव्हतं.  पण सतत तेच दिसत राहिलं , त्याबरोबर हृदय फाटून चिंधड्या होतंच राहिल्या. ती लख्तरं मी वेचत राहिले. झोप आलीच नाही आणि थोड्या वेळाने दुपारीच जिच्यावर लिहिलं ती एमिली समोर आली. एकदम लिंक लागली. एमिलीच नव्हे  का ती चिमणी? आणि कावळा म्हणजे तिला मिळालेलं आयुष्य. आणि जसं खऱ्या दृश्याला बघून असहाय वाटलं, अगदी तसंच असहाय वाटलं. काही क्षण. त्यानंतर जसं सकाळी ते खरंखुरं दृश्य बघून, काही क्षण असहाय वाटून , चिंधड्या झालेलं मन सावरत मी पुन्हा  खऱ्या आयुष्यात पुढे चालू लागले अगदी त्याचप्रमाणे मला झोप लागली. असहाय कोण? निर्दय कोण ? कठोर कोण? आणि निर्विकार कोण हे प्रश्न झोपेत विरून गेले. 

No comments:

Post a Comment