Monday, 7 January 2019

भयानक तोंड

त्या भयानक तोंडाने आ वासला आणि मला गिळले.  मी सध्या त्या तोंडात बंद आहे. मला विरघळून टाकण्यासाठी त्यात पाचक रस सध्या पाझरत आहे. पण मी तसा विरघळणार नाही. हा माझा एक हात आणि दोन्ही पाय पाचक रसाने झडून बाजूला पडले आहेत. माझ्या शरीराला मोठी भगदाडे  पाचक रस पाडीत आहे. चेहरा विद्रुप झाला आहे पण मी तसा विरघळणार नाही. कारण माझ्या नजरेतील उष्णता अजून अबाधित आहे. तिने मी तो पाचक रस शोषत आहे. जितका मी शोषत आहे आहे तितक्या दुप्पट वेगाने तो निर्माण होत आहे. त्यामुळे इथून बाहेर पडताना फक्त डोके जरी शाबूत राहिले तरी मला त्याची तमा नाही.  फक्त दुसरा हात गमावला तर मात्र हे भयानक तोंड मला उघडता येणार नाही. आणि मरेपर्यंत मला या तोंडात बंदिस्त राहावे  लागेल. तसे  जर मला बंदिस्त राहावे  लागले  तर मी पुढचे  आयुष्य कसे घालावेन याबद्दल मी विचार करू इच्छित नाही. कारण तसे झालेच तर मला विचार करायला मरेपर्यंत वेळ आहे. वेळ कसा घालवायचा याचा विचार करतच आयुष्याचा बराच वेळ जाऊ शकतो. आणि जेव्हा वेळ कसा घालवायचा हे मला समजले तर त्या मार्गाचा अवलंब करून मी उर्वरित आयुष्य घालवू शकतो.

या तोंडात बसून मी फार सुखी नाही. कसा असेन? अत्यंत चिकट, उग्र, दुर्गंधी असलेलं हे तोंड आहे. याने आधी कितीजणांचा घास घेतला असेल. त्यातली काही माणसे नक्कीच अत्यंत कुजक्या अंतरंगाची असू शकतात. त्यांचीच दुर्गंधी या तोंडात पसरली असावी. मला दिसत असणाऱ्या काही पडलेल्या गोष्टींत या माणसांपैकीच काहींचे एक,दोन दात, हाडं असावीत. हि माणसे  खरोखरच महामूर्ख म्हटली पाहिजेत. या तोंडाला चावून, दात लावून, हाडांच्या शरीरी सामर्थ्याने नाही तर नजरेच्या उष्णतेनेच फक्त मारता येऊ शकते हे या मूढांना ठाऊक नाही. आयुष्यभर इतरांच्या जीवाचे लचके यांनी दातांनी तोडले, तर इथेही त्यांचा उपाय यशस्वी होईल असे या मूढांना वाटले असावे.

मी इथे बसून आहे, तेव्हा इतर कुणी इथे येऊ नये, कारण त्यांना माझ्याशी बोलण्याचा मोह होईल. पण बोलणे  म्हणजे शुद्रच. बोलून स्वतःचा वेळच फक्त काय तो जाऊ शकेल. हा पाचक द्रव अत्यंत चिकट असल्याने मला या माझ्या उरलेल्या हाताची हालचालही करता येत नाही आहे, त्यामुळे मी तो अगदी उंच उगारून हवेत ठेवला आहे. जेणेकरून त्याला पाचक द्रवाचा स्पर्श होऊ नये. तसे  आता माझ्या नजरेच्या उष्णतेपुढे पाचक द्रव थोडा मागे हटला आहे. माझ्यासाठी हे फार उत्साहाचे नाही. कारण जर मी असेच माझ्या डोळ्यांच्या प्रखर उष्णतेने पाचक रस शोषू लागलो आणि तो संपला नाही तर माझ्या नाकातून तो रक्त बनून स्त्रवू लागेल. रक्त फुकट जाणे आता माझ्यासाठी योग्य नाही. कारण इथून उठण्यासाठी लागणारी ऊर्जा मला रक्तच पुरवणार आहे.  अत्यंत परिश्रमाने मी स्वतःचे शरीर घडवले होते. त्या रक्तामासांच्या ऊर्जेचाच हे भयानक तोंड वापर करून आणि त्यामुळेच अधिक पाचक रस बनवून तो माझ्यावरच सोडत आहे. म्हणजे माझ्या मजबूत शरीरामुळेच अधिक पाचक रस बनायला मदतच होत आहे. म्हणजे मीच मला मारत आहे का? माझ्या सर्वनाशाला मीच कारणीभूत झालो आहे.

तोंड मी बंद ठेवले आहे पण विचार चालू आहेत. इथे आयुष्याच्या अंतापर्यंत मी बसू इच्छित नाही. कारण इथे काहीच नाही. काहीच नाही म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही. पण म्हणजे माझ्यासाठी काय असायला हवे आहे असे माझे म्हणणे आहे तेही मला ठाऊक नाही. असे म्हणणे प्रत्यकाचे असतेच. तसे म्हटल्याप्रमाणे काही असतेच असेही नाही. तरीही इथून बाहेर पडायलाच मला आवडेल.

पण एक आहे. इथे माझा कुणाशी संबंध येत नसल्याने माझ्या अस्तित्वाला इतरांपासून धोका नाही. इथे मी कुणीच नसलो तरीही चालेल. उद्या या पाचक रसाशी झटता, झटता माझे शरीर नष्ट झाले तरीही चालेल. इथे मला कुणाची हाक ऐकू येत नाही. कुणाची शिवी ऐकू येत नाही. इथे बरे  आहे असेही  मला क्षणभर वाटून गेले होते. पण फक्त क्षणभरच. एकच क्षण आपल्याला एक वाटते. मग दुसऱ्या क्षणी जे वाटते ते पहिल्या गोष्टीसारखे नसतेच. त्यामुळे वाटते इथे काय वाईट आहे? पण हि दृष्टी जशी आता मला या पाचक रसाशी लढण्यास मदत करत आहे तशी ती माझी शत्रूही झाली आहे. तिच्यामुळेच माझी परिस्थिती किती वाईट झाली आहे हे मला दिसत आहे. दोन्ही पाय आणि एक हात नाही. शरीरावर विवरं बनली आहेत. हे सर्व पाहून भयभीत होण्याऐवजी मी सुटण्यासाठी धडपड करत आहे.

पण हि फक्त  मनाची धडपड आहे शरीराची नाही. शरीराची धडपड केव्हाच थांबली आहे. ते एका अर्थाने बरेच आहे. कारण या जागेची एक युक्ती मला माझ्या गुरूने सांगितली होती. त्याने सांगितले होते की शरीर जेवढे अचल तेवढी इथून सुटका चटकन होऊ शकते. इथे आल्यापासून शरीराची जराही हालचाल मी केलेली नाही. तशी हालचाल केली तर या तोंडाच्या जबड्यात जेवढी हालचाल होईल तेवढ्या भिंती निर्माण होतात. या निर्माण होणाऱ्या असंख्य छोट्या भिंतींनी मला अजून वेढा घातलेला नाही.  या शरीराने स्वतःपासून एक हात आणि दोन्ही पाय झडून टाकून मग मला एका प्रकारे साथच दिली आहे.फक्त आता काहीच काळ राहिला असेल.  आणि तो किती काळ आहे याचे   मोजमाप करण्याचे काहीच  साधन नसल्याने मी काळाबाबतीत निश्चिन्त आहे. पण मनातील विचारांनी मात्र त्रस्त आहे. मी एक मूर्तीकार आहे. चांगल्या मूर्ती घडवल्या. त्यामुळे सुंदर शरीराची मला चांगली जाण आहे. आजवर ज्या मूर्ती मी घडवल्या त्या सगळ्याच अपूर्ण होत्या असे मला वाटते. त्या पूर्ण वाटल्या तरी त्या अपूर्णच राहिल्या. मग काही मी मुद्दामच अपूर्ण सोडून देऊ लागलो. एवढ्या मुर्त्या घडवल्या पण मला त्यांना बोलते करता आले नाही. मी त्यांच्याशी खूप बोललो पण त्या माझ्याशी एकदाही बोलल्या नाहीत. त्यातल्या एकीशी मी लग्नही केले. सतत संवाद साधण्यासाठी तिची आराधनाही केली, पण तिने तोंड कधीही उघडले नाही.
आता मात्र हे तोंड ज्यात मी बंद आहे ते तोंड तिचे असेल का असा मला संशय येतो. आणि म्हणूनच मी संभ्रमात आहे. कारण मी या तोंडातून बाहेर गेलो तर या तोंडाचा नाश करूनच ते मला करावे लागेल. म्हणजे माझ्या मला प्रिय असलेल्या आणि अत्यंत जपलेल्या मूर्तिचाच नाश मी कसा होऊ देऊ?. तिचे अस्तित्व नष्ट होणे म्हणजे माझे अस्तित्व नष्ट होणेच नाही का? तसे या तोंडाचे एक तंत्र आहे, इथे तुम्हाला भ्रम होतात. तसा भ्रम मलाही झाला आहे की हे माझ्या प्रिय व्यक्तीचे तोंड आहे आणि तिनेच गिळून माझा सर्वनाश केला आहे. पण तरीही मी आता विचार करतो की नाहीतरी ती माझी प्रिय मूर्ती माझ्याशी कधीही बोललीच नाही. तिचे प्रदर्शन मी कधी मांडले नाही. भलेभले मूर्त्यांचे चाहते तिला विकत घेऊन फुटकळ पैसे मला देऊ करून तिला माझ्यापासून हिरावून घेऊ शकले असते, पण मी तसे होऊ दिले नाही. तर आता ती मूर्ती जी माझ्यापासूनच बनली आहे, जीचे  अस्तित्व कुणालाच ठाऊक नाही तिचे अस्तित्व मी नष्ट केले तर कुणाला त्याचे काय असेल? मी तशी मूर्ती पुन्हा घडवू शकेन किंवा घडवू शकणारही नाही. पण मी तरी जिवंत राहीन. आणि अशीही शक्यता आहे की हे कुणा दुसऱ्याचेच तोंड असेल. मग ती मूर्तीही अबाधित राहील आणि मीही जगेन. पण यात एक गूढ आहे. जर मला इथून बाहेर पडता आलं नाही तर माझ्या मूर्तीशास्त्राच्या अभ्यासाचा , त्या शक्तीचा शोध माझ्याबरोबरच संपून जाईल. आजवरचे माझे चिंतन माझ्या मृत शरीराबरोबरच मृत होऊन विरघळून जाईल. ते कुणाला देऊन मी  माझा शोध अनंत काळापर्यंत चालू ठेऊ शकेन, आणि त्यासाठीच मला कसंही करून इथून बाहेर पडलंच पाहिजे. 

पण आता मला एका व्यक्तीच्या येण्याची आशा आहे. मी वाट बघत आहे. वाट बघून बराच काळ झाला आहे. वाट बघणं मी इथे आलो तेव्हापासून सुरु केलं होतं आणि अजूनही वाट बघतच आहे. त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं कि अशा एका वेळी जेव्हा तू संकटात असशील तेव्हा माझे स्मरण कर, तेव्हा मी तुला जी अट घातली होती ती जर तुला मान्य असेल तरच मी येईन. त्या व्यक्तीची अट अशी होती की जर तू तुझी मूर्तिविद्या सोडायला तयार असशील तरच मी तुला संकटातून सोडवीन. माझी मूर्तीविद्या पूर्णपणे नष्ट होईल. आता मूर्तिविद्या हेच माझे मानसिक अस्तित्व नव्हे का? मग ते नष्ट झाले तर हे शरीर घेऊन एखाद्या कस्पटासारखा वाऱ्याच्या दिशेने भरकटकत मी जगू तरी कसा? पण मीच राहिलो नाही तर ही विद्या तरी काय कामाची आहे? आता या वर्षांनुवर्षे खपून कमावलेल्या विद्येला गमावणे अत्यंत दुःखदायक असले तरी मी ती पुन्हा मिळवू शकेन. पण मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की कुठचीही विद्या पुन्हा मुळापासून शिकून, तीत पारंगत होऊन, तिचे उपयुक्तेत रूपांतर करण्याएवढे आयुष्यच मला आता उरलेलेच नाही. तर मग मी ते उरलेले आयुष्य या शरीराबरोबर विद्याहीनतेत कसे काढू? हि विद्या मला कुणालातरी बहाल करता आली  असती तर आणि पूर्वीही मी याचा विचार येऊनही अवलंब केला नव्हता. कारण विद्या हि इतरांसाठी केवळ मान मिळवण्याचे साधन आहे, तो मान म्हणजेच विद्या असे इतरांचे म्हणणे आहे जे मला पसंत नाही. म्हणून माझे मूर्तिशास्त्र आणि माझी विद्या मी कुणासमोर मांडलीच नाही. मी एक स्वयंपाकी म्हणून काम करीत होतो. कुणाला संशयही येऊ नये इतकी खबरदारी घेतल्यावर ते सहज शक्य होते. पण आता माझी सर्व आयुधे नष्ट होताना बघून मनाच्या ठिकऱ्या होत आहेत. हि विद्या नष्ट होऊ नये यासाठीच मला आता इथून बाहेर पडले पाहिजे. 

माझ्या शरीराची जेवढी झीज होत आहे, तेवढीच नजरेतील प्रकाशाची उष्णता वाढत आहे. त्या वाढत्या उष्णतेबरोबर माझ्या आजूबाजूचा तो कंटाळवाणा पाचक द्रवही हळूहळू कमी होत आहे. पण त्याचा ओढा आता माझ्या हाताकडे लागला आहे. त्यामुळे नाईलाजाने मला माझा हात हलवून हालचाल करायला लागली. हाताला वाचवण्यासाठी तसे करणे भाग पडले. त्यामुळे माझ्यापुढे आता एक भिंत निर्माण होऊन उभी राहिली आहे. ती एकच असली तरी तिला ओलांडायचे म्हणजे आता हालचाल अधिक होईल आणि त्या जितक्या हालचाली तितक्या अधिक भिंती माझ्यापुढे निर्माण होतील.  एक करू शकतो असे माझ्या गुरूने सुचवले होते. हा मार्ग त्याने स्वतः एकदाच आणि फक्त एकदाच अवलंबला होता. तो म्हणजे उलट्या बाजूने तोंडाच्या आत, घसा, अन्ननलिका, जठर, आतडी आणि गुदद्वार असा प्रवास करायचा. तो प्रवास महाकर्मकठीण आहे आणि त्यासाठी माझ्याकडे आहे त्यापेक्षा अधिक तीक्ष्ण ऊर्जा डोळ्यांत पाहिजे. पण या मार्गाने सुटका मिळाली नाही तर अंत निश्चित आहे. किंबहुना अंतच ठरवतो की सुटका मिळाली की नाही. कारण अंत होणार की नाही ते आधी कळते आणि सुटका नंतर. हा प्रवास जेवढा लांब आहे तेवढा बिकटही कारण तुम्ही आता स्वीकार केला आहे की शरणागती give up केला आहे काहीही असो पण तुम्ही तोंडाच्या बाहेर जाण्याऐवजी त्याच्या आत आत घुसत आहात या नियमावरून पाचकरसाचे लोटच्या लोट आता तुम्हाला घशातून अन्ननलिकेत घेऊन जातात. आणि जठरात तर लाव्हारसारखा अग्निमय रस तुम्हाला स्वतःत बुडवून टाकायला उसळत असतो. त्यातून जर बाहेर पडलात तर आतड्याच्या नागासारख्या विळख्यांतून अंधाऱ्या वाटेने जाताना डोळ्यातला सारा प्रकाश, सारी ऊर्जा विझून जाईल. तुम्ही पूर्ण आंधळेही होऊ शकता. आणि जेव्हा गुदद्वारातून बाहेर पडण्याचा क्षण येईल तेव्हा तुमची जगण्याची इच्छा ठार मेलेली असेल. आणि तुम्ही पुन्हा त्याच मार्गाने आत जाण्यासाठी धडपडू लागाल. पण तो मार्गही बंद झालेला असेल. एखाद्या तपस्व्यालाही पार करायला अशक्यप्राय वाटावा असा हा मार्ग आहे.

मला असे वाटते की सुटका होण्याची आशा का बाळगावी. नाहीतरी मी या तोंडात विरघळून गेलो तर माझ्या  मृत्यूने एका अर्थाने मी या तोंडाचाच एक भाग बनणार आहे. त्याच्या पाचकरसात विरघळून त्याचाच एक अंश बनून माझे अस्तित्व माझे राहिल का? आणि असे माझे अस्तित्व तरी किती काळ अबाधित राहणार आहे. एकदिवस मृत्यू येईलच. मग मृत्यूने जसे आपले अस्तित्व हिरावून घेतले ते आपल्याला मंजूर आहे तसे या तोंडाने आपले अस्तित्व हिरावून घेतले तर काय झाले? मृत्यू आणि या भयानक तोंडात असा कोणता फरक आहे?

ती व्यक्ती जर आली तर तिला आपण हा प्रश्न विचारू शकू. पण विद्या गमावून त्या व्यक्तीला बोलावणं मला फार कष्टाचं झालं आहे. त्यापेक्षा स्वतःच प्रयत्न करून इथून निघून जाणे, मग ते कुठच्याही मार्गाने का होईना मला केलेच पाहिजे. 

आता पुन्हा मला या पाचकरसावर थोडा का होईना विजय मिळवता आला आहे. आणि अजूनतरी माझा हात शाबूत आहे. माझी नजर अधिक प्रखर आणि तीव्र झाली आहे. असे मला वाटते. पण तोही माझा एक भ्रम असावा कारण इथे भ्रम होणे क्रमप्राप्तच आहे. माझी विद्या मला इतकी प्रिय असण्यामागे एक कारण आहे ते म्हणजे हि विद्या आजवर मला आणि फक्त मलाच प्राप्त होऊ शकली आहे. हाही भ्रम असावा असे वाटण्याचे काही कारण नाही कारण ती अशी एकमेव शक्ती आहे जी फक्त अशा गोष्टीनेच प्राप्त होऊ शकते जी मी केली आहे. 

या इथे खूप थंड पोकळी आहे. पण या थंडीचा अर्थ असाही होऊ शकतो की आता पाचकरसाचे स्रवणे आता कमी होत आहे. असंही असेल की माझ्या नजरेतील उष्णता आता कमी झाली आहे त्यामुळे थंड वाटत आहे. असेही असेल की हा पाचकरस आता बंद होत असेल कारण त्याचे माझ्याशी असलेले काम संपले आहे आणि म्हणजेच दुसरं कुणी इथे येणार असावे. 

सध्याच्या या थंडीने मला कुडकुडा येत आहे आणि या थंडीत माझ्याही डोळ्याची उर्जा, प्रखरता शिथिल होत आहे. बहुतेक या जागेची ही आणखी एक युक्ती असावी. माझ्याकडे जोपर्यंत विचार करण्याची शक्ती आहे तोपर्यंत मी माझ्या डोळ्याची प्रखरता जराही कमी होऊ देणार नाही. कारण आता मला माझे डोके वाचवायचे आहे कारण हे हात आता मूर्ती घडवू शकणार नाहीत पण हे डोके विद्या नक्कीच कुणालातरी देऊ शकेल. ज्यामुळे ती विद्या जिवंत राहील आणि मग मला माझ्या जीवाची पर्वा राहणार नाही. पण तोपर्यंत मला इथून सुटण्याची माझी धडपड सुरूच ठेवली पाहिजे. अजून निराशा आलेली नाही. ती आली तर बरेच होईल. ठार निराशा कधी येत नाही कारण ठार निराशेचा क्षण म्हणजे सुटकेचा क्षण.

Saturday, 15 December 2018

हत्ती आणि डास

एक होता हत्ती जो चाले अपनी चाल
आणि एका होता डास
जो फक्त आणि फक्त प्यायचा रक्त

हत्ती बुद्धीवादी, प्रथेनुसार शाळेत गेला
मास्तर म्हणाले, अरे गज्या SSS!!!
बुद्धी तुझे वज्र, सोंड नाही

पसार सोंड, घे केळं, दे मालकाला
तो नको म्हणालाच तर तू खा
पसर सोंड, घे रुपया, दे मालकाला
तो मालकालाच खाऊ दे, तुला नाही पचणार
वजन उचल, ठोक सलाम
राग आलाच तर, सोंडेने गार फवारा उडव
स्वतःच्या डोक्यावर आणि  शांती कर

डासाला शाळा नाही, शिक्षण नाही
जे काय शिकायचं ते आईच्या पोटातच शिकून बाहेर पडला,
अभिमन्यूसारखा. (मग करायचंय काय शिक्षण!)

अपनी चाल चालता चालता
सुशिक्षित हत्तीची प्रशिक्षित सोंड
सलाम, केळं, वजन, रुपया
आणि क्वचित पाण्याचा फवारा
असे नियम पाळून होती

डास अशिक्षित, सोंड अशिक्षित
तिला काय ठाऊक, मध निराळा, मद्य निराळे
ती घुसत होती फक्त आणि शोषित होती रक्त

पुढे काहीच कसे होत नाही?
अशी चिंता वाहणाऱ्या सज्जनांनी
हत्ती आणि डास यांची ठरवली कुस्ती
हेतू पवित्र, थोडीशी गंमत आणि
झालाच तर नफा

प्रसार माध्यमे प्रचाराला लागली
सट्टे लागले, मुलाखती रंगल्या
कुस्तीचा दिवस उजाडला

हत्तीकडे बुद्धी आणि शक्ती दोन्ही प्रचंड
वरून सट्टा तेजीत
डासाकडे फक्त सोंड, बाकी शून्य

डास शूद्र,  त्याला मारणे म्हणजे मरणं
त्याच्याकडून हरणे तर मरणाहून मरणं
मास्तरांकडे छडी
मालकाकडे अंकुश
आपल्याकडे काय? केळं !
हत्तीची सोंड गळून पडली

डास व्रतस्थ, त्याची सोंड म्हणजे
तपश्चर्या, संयम आणि संधी यांचे प्रतीक
जणू एक कोणी साधूच

बिनसोंडेचा हत्ती आणि डासाची सोंड रिंगणात
डास हत्तीच्या कानात घुसला
हत्तीने कान फडफडवला
तेवढाही मारा पुरेसा ठरला
डास खलास

झाला टाळ्यांचा गजर
हत्तीने ठोकला सलाम
मालकाने खाल्ला रुपया

पुढे हत्ती पण कणाकणाने मेला, रोज
कारण एक,
डास त्याच्या कानात
कसलेसे रक्तरंजित क्रांतीचे गीत (कसले गीत? कोणी लिहिले? कोणासाठी?)
गुणगुणला होता, का? कशासाठी?
त्याचा अर्थ काय? उपयोग काय?

कारण दोन,
डास चावला की काय
अशी भीती!

-विवेकानंद सामंत,
पूणे , २०१८

 

Monday, 21 May 2018

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १९:वारंग

शास्त्रीय नाव : Kydia calycina 
Malvaceae म्हणजेच Cotton family तील हे झाड आहे. 
याची पाने 'कापूस' च्या पानांसारखी असतात.

याची फुलं पांढरी असतात, पण काही दुर्मिळ variety मध्ये फुलांच्या पाकळ्यांवर लालसर छटा असतात. (splotched with scarlet at base). याची ताजी फुले किती काळ टिकतात? ते शोधले पाहिजे, पण याची वैशिष्ट्यपूर्ण फळे मात्र सूकूनही बराच काळ झाडावर राहतात. या सुकलेल्या फळांवरूनही हा 'वारंग' च आहे याची खात्री पटायला मदत होते. त्याची फळांच्या calyx च्या खाली लांब पाकळ्यांसारखे bracts असतात. हे bracts चार ते सहा असू शकतात. मी काही झाडांवर चार bracts चे फळ बघितले आहे आणि काही इतरांनी काढलेल्या फोटोत पाच bracts चे फळही पाहिले आहे. तुंगारेश्वर येथे याचे दोन वृक्ष मी पाहिले आहेत. 

ऑगस्टच्या शेवटापासून हे झाड फुलते ते ऑक्टोबर पर्यंत फुलण्याचा मौसम टिकतो, त्यानंतर नोव्हेंबर-  डिसेंबर मध्ये फळे  येतात, ही परीपक्व फळे अनेक महिने झाडावरच राहतात.

Thursday, 17 May 2018

आबोली, रान आबोली आणि भावंडं

आबोलीचा एक प्रकार रतन आबोली माझ्याकडे आहे. अतिशय सुंदररंगाला काय म्हणावे? आबोली रंगच म्हणावे, कारण आबोलीचा रंग तसा सांगतच येणार नाही. घरीदारी लावली जाते ते रतन आबोली आणि एक पिशी आबोली पण असते. आबोलीचं शास्त्रीय नाव : Crossandra infundibuliformis 

तर या आबोलीची इतर भावंडंही  आहेत. रानातील भावंडं.

Eranthemum  या कुळात काही आबोल्या आहेत.

Bracts white with green nerves........................
..........E. roseum (Vahl.) R. Br.
Bracts green, many nerved, white ciliate on margins...E. purpurascens Nees
Bracts green, few nerved, viscous hairy......................E. capens L. var. concanense (T. And. C. B. Cl.) Sant.


Ecbolium ligustrinum (Vahl) Vollesen/ धाकटा अडुळसा , एकबोली , रान आबोली 



Sunday, 13 May 2018

प्रेरणा


काही दिवसांपासून मला सारखं असं वाटत होतं की झाडांचा अभ्यास करून आपण काय करत आहोत? कशासाठी करायचा हा अभ्यास? याने काय मिळणार? कुठच्याही रूढार्थाने मी वनस्पती संशोधक नाही, botanist नाही की त्या विषयाची पदवी माझ्याकडे नाही. मग हा अभ्यास कशासाठी करायचा? असा प्रश्न मला पडला होता. मनाला एकप्रकारची खिन्नता आली होती.

काल रविवारी सकाळी मी दत्ताजी साळवी उद्यानात गेले होते, झाडांची, निसर्गाची मनापासून आवड असलेल्या माझ्या एका मैत्रिणीबरोबर.
दत्ताजी साळवी उद्यान अतिशय सुंदर आहे, छोटेसेच आहे पण ही नेहमीची बाग नाही , खूप लोकं आली आहेत, मुलं खेळताहेत, आवाज, वर्दळ सुरु आहे असे तिथे काही नाही, कारण तिथे लोकांसाठी, तशी जागाच नाही. जी जागा आहे ती फक्त आणि फक्त झाडांसाठी आहे. या उद्यानाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो स्वतः एक झाडांचा दर्दी चाहता आहे. त्याने  कुठून कुठून ही झाडं तिथे आणली आहेत. त्यामुळे या उद्यानाचे रूप इतर उद्यानांसारखे नाही. खूप वेगेळे आहे. दाटीवाटीने इतक्या  दुनियाभरच्या जातींची झाडं तिथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदताहेत. आणि त्यांच्या गर्द झाडीत छोटे मुनिया, दयाळ , नाचणसारखे पक्षी निर्भयपणे बागडत असतात. 'नाचण' या पक्ष्याचे तर तिथे घरच आहे. ती छान झाडं आणि त्यात आनंदाने बागडणारे समाधानी पक्षी पाहून खूप आनंद झाला.
या आनंदांत भर घालायला आणखी एक कायम लक्षात राहील अशा व्यक्तीची गाठ तिथे पडली.

तिथे एक गृहस्थ बराच वेळ झाडांना न्याहाळताना दिसत होते. बराच वेळ ते तिथे होते. आमचे आणखी एक वनस्पती सहाध्यायीही तिथे आले होते. ते ठाण्याचे असल्याने बऱ्याचदा या उद्यानात येतात त्यामुळे ते त्या गृहस्थांना ओळखत होते. हळूहळू आमच्याशीही ते गृहस्थ बोलू लागले. आणि खरंच काय वनस्पतीचं ज्ञान होतं त्यांना. प्रत्येक झाडाची फुल, पाकळी, त्याच्या पानांपासून ते खोडांपर्यंत सगळं इतक्या बारकाईने त्यांना माहित होतं की आश्चर्य वाटलं. यांचे नाव होते श्री. रानडे, जवळपासच ते कुठेतरी राहतात. रोज इथे येतात आणि तासनतास त्या फुलापानांमध्ये हरवून गेलेले असतात. त्यांना निसर्गाची मनापासून असलेली आवड त्यांच्या बोलण्यातून दिसत होती, म्हणाले 'आता माझं वय शहात्तर आहे, त्यामुळे मी आता 'येऊर' वगैरेच्या जंगलात भटकायला जात नाही, दूर भटकायला आता जमत नाही, म्हणून मी इथे येतो.

आणि खरंच इथे येऊन त्यांनी रोज निरक्षण करून झाडांबद्दलचे जे ज्ञान संपादन केले आहे त्याला तोड नाही. त्यांना त्या गार्डनमधील जवळपास सगळीच झाडे माहित होती. कुठच्या झाडाला कधी फुल येणार  तेही माहित होते. 'तुम्ही इतक्या दुरून आलात तर आता हे फुल बघूनच जा कारण ते परत दिसेल की नाही कोण जाणे' असे   आम्हाला सांगून त्यांनी जी झाडं दाखवायला सुरवात केली ती जवळपास अर्धा-पाऊण तास झाला तरी संपेना. खरंतर त्यांना घरी जायचे होते, पण त्यांचा उत्साह एवढा होता आणि आपल्याला स्वतःला फुलं बघून जितका आनंद झाला तो दुसऱ्यालाही द्यावा अशी त्यांची एवढी प्रबळ इच्छा होती, की एकामागोमाग एक त्यांनी अशी फुलं, पानं दाखवली की आम्ही थक्कच झालो. बरं त्यांना झाडांविषयी जी माहिती होती ती नुसती वरवरची माहिती नव्हती. अगदी त्या फुलाचा विशिष्ट गंध, त्याचा आकार, अर्धवट उमललेल्या फुलातील न दिसणारा भाग, पानांचे निरनिराळे पृष्ठभाग आणि त्यांचे जाणवणारे स्पर्श, पानं चुरडल्यावर येणारे विशिष्ट गंध यांचे त्यांना अपरिमित ज्ञान होते, प्रत्येक झाडाचे नाव त्यांना माहित होते. ते प्रत्येक झाडाला नावानेच नव्हे ते अंतरंगांने ओळखत होते. या सर्वामुळे फुलापानांइतकेच टवटवीत आणि प्रफुल्लित होते हे रानडेकाका.
त्यांच्यामुळे मलाही एकदम छान वाटू लागले, त्यांची ऊर्जा त्यांनी नकळत आम्हाला दिली होती.

तेव्हा मला जाणवले की आपण जो झाडांचा अभ्यास करत आहोत, तो निरपेक्ष मनाने केला तर कधीतरी अनेक वर्षांनी आपणही कुठल्यातरी बागेत, जंगलात फिरत असू, तेव्हा असेच कुणीतरी झाडांची आवड असणारे तिथे येतील, तेव्हा आपणही याच रानडेकाकांच्या उत्साहाने त्यांना चार निसर्गाचे सुंदर विभ्रम दाखवू शकू आणि आपली ऊर्जा तिथे असलेल्या एखाद्या खिन्न झालेल्या , 'आपण हे का करत आहोत? याचा काय उपयोग?' असा प्रश्न मनोमन विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीला देऊ शकू. हेच त्या वनस्पतींच्या, झाडांच्या अभ्यासाचे सार्थक असेल.

'काय करतो? का करतो? त्याने काय मिळेल?' याचा विचार न करता, ध्यासाने झपाटून एखादं कार्य करत राहिलं की भले त्यातून काही व्यावहारिक लाभ होईल न होईल, पण मनापासून जेव्हा ते काम केले जाईल तेव्हा आपल्याकडे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा नक्कीच आपण इतरांना देऊ शकू, किंबहुना आपण न देताच ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल.
इतके दिवस पडणारा प्रश्न 'काय या अभ्यास करण्याचा उपयोग?' या छोट्याशा अनुभवाने एकदम नाहीसा झाला. एखाद्या माणसालादेखील जे कार्य आपण करतो, जसे  आपण आहोत त्यातून छोटीशी का होईना प्रेरणा मिळाली तरी खूप झाले असे मला वाटले. रानडेकाकांना माहितही नाही की त्यांच्यामूळे मला खूप प्रेरणाही मिळाली आणि खूप छानही वाटले.

Wednesday, 9 May 2018

वृक्षप्रकल्पातील हिरवा सोबती १८: तेंदू कुटुंबातील भावंडं : लोहारी , तेंदू , टेम्भूर्णी

आतापर्यंत मी तेंदू/टेम्भूर्णी  कुटुंबातील (Diospyros genus मधील) तीन झाडं बघितली आहेत. यातल्या दोघांना मराठीत टेम्भूर्णी असंच नाव आहे. तिसऱ्याला 'लोहारी' असं नाव असल्याचं eflora india या ग्रुप वर कळलं. 
Diospyros malabarica -  टेम्भूर्णी
Diospyros melanoxylon  - Coromandel ebony - तेंदू / टेम्भूर्णी
Diospyros montana  - लोहारी

संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये Diospyros malabarica आणि Diospyros montana (शिलोंडा ट्रेल) ही झाडं आहेत. तुंगारेश्वर येथे Diospyros melanoxylon हे झाड मी पाहिले आहे. Diospyros montana हे झाड मी माथेरान येथे पाहिले आहे. 

लोहारी/Diospyros montana
'लोहारी' Diospyros montana हे झाड Ebenaceae या कुटुंबातील Persimmon family तील आहे. Persimmon म्हणजे या झाडांचे विशिष्ट प्रकारचे फळ. हे फळ टोमॅटोसारखे मोठे असून खाण्यालायक असते, त्याचे sepals वैशिष्ट्यपूर्ण असतात. हे झाड शुष्क, खडबडी दगडांनी युक्त अशा जमिनीत वाढते. साधारणपणे डोंगराळ टेकड्या हे त्याचे स्थान. हे झाड जर बऱ्यापैकी मोठे असेल तर त्याच्या खोडावरून ते चटकन ओळखता येते. त्याचे खोड सालपटे निघालेले असते आणि या तपकिरी सालपटांच्या खालचा खंडाचा भाग हिरवट असतो. 
हे झाड इतर Diospyros भावंडांप्रमाणेच dioecious आहे. म्हणजेच याची male आणि female फुले वेगळी असून ती वेगळ्या झाडांवर असतात. male आणि female झाडे जवळपास कुठेतरी असतात. फुलांचा रंग फिकट हिरवा असतो आणि ती एखाद्या रुंद सुरई सारखी असतात. या सुरईसारख्या खोलगट आकाराच्या टोकाला चार छोटे पाकळ्यांसारखे (पण पाकळ्या नव्हेत) भाग असतात. male फुलं झुबक्याने असतात आणि त्यांच्यात ८ stamens (पुंकेसर) च्या जोड्या असतात. female फुलं solitary असतात, आकाराने male फुलांपेक्षा मोठी असतात आणि त्यात ४ styles असतात. स्त्री फुलांत stamens अतिशय छोटे, staminoides च्या रूपात असतात. 
फळ गोलसर असून ३cm व्यासाचे असते. फळाला टोकदार शंकूच्या आकाराचे टोक असते. त्याचे calyx lobes रुंद पसरट झालेले असतात. पिकलेल्या फळाचा  रंग पिवळा होता आणि नंतर ते काळे पडते. 

मला हे झाड माथेरानच्या मंकी पॉईंटच्या शेवटच्या टोकावर दिसले. जोरदार वाऱ्याने ते नुसते हेलकावे खात होते. 


Diospyros melanoxylon  - Coromandel ebony - तेंदू


Diospyros malabarica -  टेम्भूर्णी