Monday 16 April 2018

असे वाटते

भर दुपारी, रखरखीत उन्हात, त्या माथा जाळून घेणाऱ्या शुष्क, हिरवळीचा अंश नसलेल्या डोंगराची वाट तुडवावी असे वाटते. कुठेतरी झळाळत्या पिवळ्या रंगाचे झाड उभे असते उन्हात, ते बघत बसावे असे वाटते. उन्हातील तो वाळवंटी तापलेला प्रदेश, त्या वाळूवर पावले उमटवावी असे वाटते.

डोळ्यांना काय दिसेल याचा भरवसा नाही. त्यादिवशी कोंबड्या दिसल्या उघड्यावरच्या चिकनविक्रेत्याकडे. छोट्या जाळीच्या लाकडी कपाटात बंद असलेल्या. रात्र फार झाली होती. दुकान (दुकान असं नव्हतंच) पण व्यवहार बंद करून तो विक्रेता त्या कपाटावर गोणपाट घालत होता. कुलूप त्याने लावलं असणारच. मनात आलं 'One more day! कोंबड्यांसाठी!'

बाटलीचे झाकण ज्या बाजूला फिरवून घट्ट केलं त्याच बाजूला फिरवून मी ते उघडण्याची अपेक्षा करत आहे. 

ते स्वप्न आणि त्या मातीच्या भिंती 
तो प्रदेश , त्यात चढाव. त्या चढवात एका बाजूला पाणी होतं. त्याबाजूने जाताना दिसलं की तिथे दोन साप आहेत आणि ते अंगावर धावून येतील की काय असं वाटलं. माझ्याबरोबर कुणी, मागे कुणी आणि बरेच मागे आणखी कोणकोण माणसं. किती नक्की आठवत नाही. बहुदा सहा असावीत. कोण होती तेही आठवत नाही. माझ्याबरोबर कोणतरी होतं एवढं मात्र नक्की. आम्ही दोघे साप अंगावर चाल करून येतील म्हणून पळ काढला. आमच्या मागचा माणूस दूरवर ओरडून सांगताना दिसला. तो मागवून येणाऱ्या माणसांना सांगू लागला 'साप आहेत इथे , साप दिसतील ,तेव्हा दिसले तर पळा ते अंगावर यायच्या आधी. आणि ते पाठलाग करू शकतात. तेव्हा ज्यास्त न बघता पळा फक्त. '

नंतर ती माणसे चढाव पार करून माझ्यापर्यंत पोहोचली. विशेषतः त्या मागच्या दोन माणसांनी सांगितले 'आम्ही बघितले त्या सापांना. डोकी वर काढून ते होते, पण त्यांनी काही केले नाही. आपल्या वाटेने ते निघून गेले. 

मग आम्ही सर्व मिळून एक मोठी मातीची भिंत चढलो. मी सर्वात पुढे, बाकीचे माझ्या मागून चढत होते. त्या मातीच्या भिंतीला कपाऱ्या होत्या. त्या धरून वर चढत होतो. अंधार होता. पण मेणबत्तीच्या प्रकाशाएवढे अंधुक दिसतही होते. ती भिंत नक्की काय आहे, तिचे स्वरूप नक्की काय आहे ते कळत नव्हते. एखाद्या किल्ल्याची भिंत, एखादी अशी भिंत जिच्या पलीकडे काय आहे किंवा काहीच नाही ?, एखाद्या घराची भिंत, नक्की कसली भिंत होती, तिची व्याप्ती किती होती, ती नक्की भिंतच आहे की आणखी काही हे काहीच कळायला मार्ग नव्हता. 
प्रकाश असता तर तिचं खरं  स्वरूप दिसलं असतं. पण मेणबत्तीसारख्या अंधुक प्रकाशात- जो फक्त आजूबाजूच्या अगदी छोट्या भागाला प्रकाशित करत होता त्यावरून फक्त एवढंच काय ते कळत होतं की ही मातीची एक सरळ उभीच्या उभी चढण आहे. भिंतीसारखी. एका एका मातीच्या खोबणीला, कपारीला धरून मी चढत होते, बाकीचे मागून वर येत होते. एके ठिकाणी कपार होती तिला मी धरलं  आणि वर चढणार तोच माझं डोकं सपाट पृष्ठभागाला टेकलं. तिथे आढवं छप्पर होतं. तिथे भिंत संपत होती. छप्पर डोक्याला टेकत होतं. 

पण तिथून आम्ही बाहेर पडलो मात्र. ते जे काही होतं त्यातून बाहेर पडता आलं. ते कसं, कुठे वाट होती, तिथून कसे बाहेर आलो कळत नाही पण बाहेर पडलो सगळे एवढं मात्र खरं.संपलं स्वप्न. 


अलीकडेच मी ऐकलं. एक ठासून अर्थ भरलेलं fully loaded वाक्य 'मी जीवनाबद्दल तसा फारसा उत्साही नाही' 

No comments:

Post a Comment