Sunday 15 April 2018

Antoine De Saint-Exupery आणि G.A.

Antoine De Saint-Exupery चे Wind, Sand and Stars हे पुस्तक जी.एंचे आवडते पुस्तक होते. प्रवासी, अनोळखी आणि खडतर वाटा भटकणाऱ्या आणि त्यात भरकटण्याऱ्या, विलक्षण अनुभव आलेल्या लेखक/ माणसांविषयी जी. एंना अतिशय आपुलकी होती. असे भटके, विक्षिप्त आयुष्य जगणारे लोक त्यांना आपले सुहृद वाटायचे. जी. ए. स्वतःच म्हणायचे कि ते armchair traveler आहेत. अशा पुस्तकातून त्यांना त्यांचे सहप्रवासीच भेटत असावेत.

Antoine De Antoine De Saint Exupery बद्दल थोडेसे. अवघे ४४ वर्षांचे त्याचे आयुष्य. १९०० साली lyon (लिओन) फ्रान्स येथे तो जन्मला. लहानपणापासून हवाई उड्डाणाबद्दल त्याला आकर्षण होते आणि १९१२ साली केलेल्या पहिल्या प्रवासाने त्याच्या या आवडीचे  रूपानंतर ध्येयात झाले. २१ वर्षाचा असताना त्याने फ्रान्स आर्मीत प्रवेश केला, तिथे मेकॅनिक म्हणून काम करत असला तरी वैमानिक बनण्याचे त्याचे स्वप्न त्याने तसेच जोपासून ठेवले होते. त्यामुळे खासगी  प्रशिक्षण घेऊन त्याने आर्मीकडून वैमानिकाचे प्रमाणपत्र मिळवले. १९२६ मध्ये त्याला लॅटिको एअर मध्ये वैमानिकाची नोकरी मिळाली. आणि त्याचा वैमानिक म्हणून प्रवास सुरु झाला. तो एक अत्यंत कुशल वैमानिक होता आणि एक चांगला लेखकही होता. Southern Mail हे त्याचे पहिले पुस्तक. त्याच्या वैमानिक मित्राचा Henri Guillaumet जेव्हा andies पर्वतात crash होऊन अपघात झाला, तेव्हा त्याला शोधून काढण्यासाठी आंत्वान(Antoin) स्वतः विमान घेऊन गेला आणि त्याने त्याला शोधून काढले. २९ डिसेंबर १९३५ साली त्याने एका स्पीड रेकॉर्ड साठी तो आणि त्याचा सहवैमानिक Paris-to-Saigon या प्रवासाला निघाले. दुसऱ्या दिवशी रात्री त्याचे विमान लिबियाच्या वाळवंटात अपघातात सापडले, crash झाले. चार दिवसशंभर सव्वाशे मैलांचा प्रवास त्याने आणि त्याच्या सहवैमानिकाने पाण्याशिवाय केला, तहानेने व्याकुळ होऊन सैरभैर मरणप्राय अवस्थेतही त्याने असीम आनंद, शांतता, जीवनाचे स्वरूप, निसर्गाचे आणि स्वतःच्या extreme स्थितीतील शरीराचे स्वरूप अनुभवले. हे सर्व अतिशय अव्यक्ताला भिडणारे होते, तरीही त्याने ते आपल्या Wind, Sand and Stars या पुस्तकात त्या अनुभवांना शब्दरूप दिले आहे. तिथेच त्याला Little prince (दुसऱ्या ग्रहावरचा लहान मुलगा ) या पुस्तकातल्या मुलाचे स्वरूप अनुभवायला मिळाले होते. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरु झाले आणि आंत्वानलाहि लढाईत सहभाग घ्यावा लागला. तो एक मानवतावादी होता, महायुद्धामुळे होणाऱ्या ऱ्हासाबद्दल त्याला अतिशय दुःख होत असे. त्या काळात एकदा विमान चालवत असताना mediterranean sea वरून उडताना कुठेतरी मध्ये तो विमानसह नाहीसा झाला. त्याच्या मृत्यूबद्दल काहीही कळू शकलेलं नाही.

जी. एंच्या सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात जी.ए त्याच्याविषयी आणि त्याच्या वाचलेल्या पुस्तकांविषयी सविस्तर बोलतात.
 
जी. एं. ची निवडक पत्रे: खंड १, पान १७-१८:  यात त्यांनी Saint Exupery बद्दल म्हटलं आहे. 
'Saint Exupery ची मात्र गोष्ट निराळी. Night Flight, The Little Prince ही त्याची पुस्तके मी एम.ए. ला असताना वाचली होती. Wind, Sand and Stars तर केव्हा वाचले, ते आजदेखील मला पूर्णपणे आठवते. त्यातील शैली, उत्कृष्ट वर्णने आणि विशेष म्हणजे ती दृष्टी यामुळे मी हरकून गेलो होतो. पुष्कळशी गावठी चित्रे पाहिल्यानंतर Rembrandt चे एक चित्र समोर येताच आपणांलाच एकदम गावठी वाटावे, तसे मला वाटले होते. आतपर्यंत मी चार-पाच पुस्तके वेड्याप्रमाणे गोळा केली होती. त्यांतील बहुतेक मी आता देऊन, विकून गळ्यात बांधून फुंकून टाकली. आता जागेची अडचण आहे, Retirement ची छाया तर दाट होऊ लागली आहे. पण थोड्या पुस्तकांत मी अद्यापही ते पुस्तक ठेवले आहे. त्या पुस्तकातील नितळ, रेखीव चित्रांनी भारल्यासारखे होते. एक दोन अनुभव तर mystical वाटतात. आज मला ज्यांचा पूर्णपणे हेवा वाटतो, त्यांपैकी तो एक लेखक. अगणित चांदण्यांचे आभाळ, सतत विस्तृत होणारे क्षितिज, त्यात एका (जुनाट) विमानाचे स्वतःचे स्वतंत्र जग, आणि त्या ठिकाणी दैनंदिन पार्थिव गोष्टींच्या वर राहणारे त्याचे मन. ज्यात तो पूर्ण रमून जाऊ शकला असला व्यवसाय, आणि या अमर्याद गोष्टीचे सान्निध्य. त्याला मृत्यू आला तोही वाळूत, चांदण्याखाली, वारा अनिर्बंध वाहत राहील अशाच ठिकाणी आणि तोदेखील पूर्ण उचित अशाच तऱ्हेने. भग्न झालेले विमान, खंडित शरीर, असले काही विद्रुप नाही. त्याचे शरीर तर सोडाच, त्याच्या विमानाचे अवशेषही वाळवंटात मिळाले नाहीत. कापराची ज्योत निरंजन जळाली. एखाद्या परक्या भाषेतील भावगीताची एकच ओळ सहज ऐकून विरून जावी, तसे त्याचे आयुष्य संपले. (म्हणजे तो सर्वमुक्त संत होता असे नाही. तो मोजक्या मित्रांत मिसळे; काही वेळा भांडत असे. देखण्या देहाविषयी तो अरसिक नव्हता. पण या साऱ्या गोष्टी म्हणजे गालिच्याच्या मागच्या बाजूचे धागे. खरे Design वरच्या बाजूला होते.) अत्यंत हावऱ्या माणसालाही यापेक्षा आयुष्यात काय जास्त हवे असणार?
आपणांला  ज्ञात असलेल्याही पलीकडील आणखी एक भीषण दरी, आणखी एक विक्राळ शिखर दाखवणाऱ्या Dostoevsky प्रमाणे मोठा लेखक नव्हे. तर पिवळा आणि निळा असे दोन खडे बसवलेल्या अंगठीसारख्या लेखक मनुष्याला किती जागेची गरज आहे? Saint Exupery ला आभाळ, अमर्याद पसरलेली वाळू हेदेखील अपुरे वाटले असते. ते (The Little Prince) मी नंतर वाचल्याने त्या वेळी त्या पुस्तकामुळे फारसा प्रभावित झालो नाही हे खरे. कुणास ठाऊक, पण आज मला ते त्या पुस्तकाइतकेच आवडेलही. '

(जी. एं. ची निवडक पत्रे: खंड १, पान १७-१८)
'The Little Prince ला एक प्रकारचा हळवा charm आहे. सेंटचा स्पर्श झाल्यावर थोडा ओलसर थंड सुगंध जाणवतो तसा. परंतु (क्षमा करा) त्या कथेत मला dramatic potentialities मात्र फारशा जाणवल्या नाहीत.'

No comments:

Post a Comment