Tuesday 31 May 2016

मरणओढ

'द तिबेटीयन बुक ऑफ लिविंग ऍण्ड डाइंग' वाचताना समांतर रेषेत माझ्या मनात विचार एकामागून एक येत चालले आहेत म्हणून तात्पुरते पुस्तक बंद करून मी फक्त येणारे विचारच इथे मांडत आहे. 'द तिबेटीयन बुक ऑफ लिविंग ऍण्ड डाइंग' हे सोग्याल रिंपोचे यांचे पुस्तक,  जे 'द तिबेटीन बुक ऑफ द डेड' वर आधारित आहे.  आणि सोग्याल रिंपोचे यांनी त्यात अनेक विचार, मुळ तिबेटी शिकवण, स्वानुभव आणि स्वतः केलेल्या अभ्यासातून मांडले आहेत. मृत्यू बद्धल विचार करणे म्हणजे बहुतांशी डिप्रेशनचे लक्षण मानले जाते (तसे ते अनेक अंशी खरेही आहे म्हणा, कुणीही सुखासुखी मृत्यूचा विचार केला नसेल, बहुतेक एकटा 'बुद्ध' सोडला तर ) पण सुखासुखी मृत्यूचा विचार करणे किंबहुना त्याहीपुढे जाऊन त्याची आस बाळगणे मूर्खपणाचे, डिप्रेशन चे, अतृप्तीचे लक्षण वाटले तरी असे ते नाही. कारण असा विचार करणे माणसाला जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोनही देऊ शकते. प्रत्येकाला जगण्याची ओढ वाटते, अगदी व्याधीने जर्जर माणसालाही. ९० वर्षांचा म्हाताराही मरणाची प्रतीक्षा करतो आहे असे म्हणतो, दिवसोंदिवस कण्हत 'देव उचल रे' म्हणतो , पण ते खरे नाही. त्याला खरोखरीच तसे वाटते का? पुरे झाले आयुष्य असे अनेकदा जरी वाटले तरी काहीतरी खोल आतून सुप्तपणे जगण्याचाच मोह वाढवतच असते. 

मग असे म्हणायचे का कि सर्वसामान्य माणसाला जगण्याची ओढ वाटते. बहुतेक. पण याला अपवादही आहेत.  ते अश्यांचे जे आपले आयुष्य संपवतात. जगताना तरी माणूस किती खरा जगतो? रडत, भेकत, आपल्या वाट्याला आलेल्या जीवनाला दोष देतच बहुतेकदा तो जगतो. आणि शेवटी कुढत कुढत मरतो, जगण्याचा सोस बाळगतो, अशी सगळीच माणसं (त्यात मीही आले) हि माणसे 'जिवंतपणी' 'जगली' म्हणायची का?. कि जे जगतात- जोपर्यंत जगावेसे वाटते आणि एका क्षणी भिरकावून देतात जगणे ते खरे जिवंत?.. त्यांच्यात कुठली ओढ असते?
म्हणजे जशी जगण्याची सुप्त ओढ तशी मरणाची सुप्त ओढही मनुष्यप्राण्यात असली पाहिजे.

जन्मलेल्या प्रत्येक माणसाला मरणाची ओढ किमान एकदा तरी वाटलीच असेल. नाही का? प्रत्येक विचारी माणसाला हे स्वतःशी मान्य करावे लागेल.

'जे गोष्टींचा विचार करतात त्यात असा एक तरी उरला असेल का कि ज्याच्या मनात आत्महत्त्येचा विचार आला नसेल'.  हे वाक्य मी म्हणत नाहीये. कावाबाता नावाच्या अत्यंत ग्रेट जपानी लेखकाने हे आधीच म्हणून ठेवले आहे. (आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याने स्वतः उतार वयात ,ज्या वयात सहसा मूर्खपणा करण्याचे वय निघून गेलेले असते आणि भावनावश होऊन अविचाराने वागण्याची धगही विझलेली असते त्या वयात स्वतःचे आयुष्य संपवले.)

शरीर नेहमी biological survival instincts मुळे माणसाला जगण्यासाठी प्रवृत्त करते. शरीर असण्यासाठी झगडते तर मन नसण्यासाठी, सुटण्यासाठी आकांत करत असते. या द्वंद्वात(duel मध्ये) माणूस भरडून निघतो.

चिं. त्र्यं. खानोलकरांवर लिहिलेल्या माधवी वैद्य यांच्या पुस्तकात त्यांनी खानोलकरांच्या विलक्षण मरणओढीवर लिहिले आहे. खानोलकरांचे एक स्नेही प्र. श्री. नेरुंरकर यांनी त्यांना एकदा विचारले 'मरणाच्या गोष्टी इतक्यातच कशाला?', खानोलकरांनी उत्तर दिले, 'तुमच्या कवी शेलेला मरण्याचे गूढ उकळून काढणारी ओढ लागली होती तशीच मलापण भयंकर मरणओढ लागून राहते. वाटतं हे सगळं नश्वर आहे, फसवं आहे, कुणी कुणाचं वृथा जगात नाही.'

चिं. त्र्यं. खानोलकरांचं बरचसं लेखन वाचलं तर त्यातही असण्य़ाची-नसण्याची , जगण्याची फरफट आहे, ज्यात मृत्यू क्षणोक्षणी डोकावतो. मी हा कवी शेले पूर्वी कधीही वाचला नाही. म्हणून त्याच्याबद्धल आणि त्याच्या कवितांबद्धल वाचलं. वयाच्या २९ व्या वर्षी त्याचा (Gulf of Spezia मध्ये) बुडून मृत्यू झाला. आणि आजतागायत त्याच्या मृत्यूचे खरे कारण कळले नाही, पण त्याच्या कवितांमध्ये शिशिरातील पानझाड, निष्पर्णता, फॉल ( सडणे आणि झडणे ), मृत्यू, अद्भुत(ghosts, phantoms and supernaturals) हे मुख्य विषय आहेत. (त्याच्या सगळ्या कविता खरंतर वाचायला हव्यात). पण त्याच्याबद्धलच्या एकंदरीत माहितीवरून कळते कि तो सतत आपल्या अस्तित्वाकडे प्रश्नार्थक नजरेनेच बघत असे. तो सतत आपल्या असाधारण, प्रखर भावनातून काहीतरी शोधत होता. त्याचे म्हणणे होते कि फक्त मृत्यूनेच तो खऱ्या अर्थाने अमर होईल आणि खऱ्या अर्थाने कवी असणे म्हणजे काय  हे त्याला केवळ मृत्यूच समजावू शकतो. या त्याच्या कल्पनांनी त्याला एवढे झपाटून टाकले होते कि त्याला phantoms, supernatural यांचे भास होत. एकदा तर त्याने स्वतःलाच बघितल्याचे आपल्या पत्नीला सांगितले आहे. त्याने स्वतःचीच आकृती त्याला विचारताना बघितली , त्या आकृतीने त्याला विचारले 'How long do you mean to be content? '(या प्रकारे स्वतःची दुसरी प्रतिमा बघण्याला Doppelgänger असे म्हणतात.)

महेश एलकुंचवार यांच्या मौनराग मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'जातस्य हि ध्रुवो मृत्युः ' या लेखात स्वतःच्या मरणओढीविषयी लिहिले आहे. त्यांच्या या अतिशय सुंदर लेखात ते लिहितात कि त्यांना या अखेरच्या घंटेची ओढ बालपणीच वाटू लागली होती. लहानपणीच्या अनुभवांनी त्यांच्या मनाची अवस्था 'आपण दुर्गुणांनी भरलेले पोते आहोत, आपण कोणाचे नाही, आपले कोणी नाही, आपण हट्टी, आळशी, ढ असे आपण कोणालाच नको तर आपण मरून जावे' अशी होती. त्यांना वाटणाऱ्या मरणओढीची साथ तिने जवळजवळ आयुष्यभर केली तरीही बदलत्या अनुभवांनी त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे देखील निकडीचे वाटू लागले, तेव्हा मृत्यूला 'जरा थांब, हे जरा समजावून घेऊन दे' असे म्हणावेसे वाटू लागले. आणि मृत्यूला मित्र मानत मानत आज ते सत्तरीच्या घरात आहेत. आयुष्याचा आणि आयुष्यातूनच निर्माण झालेल्या त्या विलक्षण मरणओढीचा त्यांनी चालवलेला पाठपुरावा चालूच आहे.

माझ्या पाहण्यात एका अत्यंत जवळच्या माणसाने सुद्धा भयंकर दारू पिऊन मृत्युची वाट पहिली पण मृत्यूला यायला उशीर झाला. आणि जेव्हा तो खरोखरच जवळ आला तेव्हा मात्र त्याला जगावेसे वाटले असावे. आणखी एका व्यक्तीला जेव्हा मृत्यूने घेरले तेव्हा जगावेसे वाटले. ती सतत दुख्खी, जगत मरणारी, आणि मरणाचीच जणू प्रतीक्षा करणारी. पण मृत्यूने दार ठोठावले आणि तिला जगण्याची इच्छा उत्पन्न झाली, नुसते जगणे नाही तर अगदी सगळे पूर्वग्रह, प्रत्येक गोष्टीला नाक मुरडणे सोडून देऊन बिनधास्त जगणे. (असे जगता येते का? हाही एक प्रश्नच आहे, कारण त्यासाठीही फार मोठी किंमत मोजावी लागते). कधी कुणाशी फारशी न बोलणारी, न भेटणारी ती व्यक्ती त्याक्षणी इतरांशी एकदम भेटायला, बोलायला आतुर होती. तिला मनसोक्त जगायचे होते. मी कधीही कटकट करणार नाही, जर मी यातून बाहेर पडले तर आयुष्य आनंदानेच जगेन असे तिने म्हटले होते. बरे वाटल्यावर ती असतील नसतील तेवढ्या सगळ्या लोकांना घरी बोलवणार होती. पण हा चान्स मृत्यूने तिला दिला नाही. मृत्यूच्या दाढेतून ती बाहेर पडू शकली नाही.

दस्तयेव्हस्कीच्या 'द इडियट' या कादंबरीत एक विलक्षण घटना वर्णन केली आहे. मरणावर. त्यात एका माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा अमलात आणण्याच्या पूर्वीची त्या माणसाची पाच मिनिटं वर्णन केली आहेत.
त्याच्याकडे फक्त आयुष्याची पाचच मिनिटे उरली होती. आश्चर्य म्हणजे त्याचा मृत्यूदंड माफ झाला. त्याची सुटका झाली पण त्याच्या त्या मनाची जगण्यापासून सुटका झाली नाही. आपल्या त्या शेवटच्या विलक्षण पाच मिनिटांबद्धल तो म्हणाला कि ती पाच मिनिटं त्याच्यासाठी अनंत काळासारखी वाटली. an enormous wealth of time. (आपण सगळेच बहुतेक 'टाईम' ची तुलना 'वेल्थ' शी एकदाच करू शकतो, जेव्हा मरण येऊन ठेपलं असेल तेव्हा). त्या शेवटच्या मिनिटांमध्ये त्याला अनेक आयुष्य जगत असल्याचा भास झाला एवढा कि शेवटचा क्षण जवळ आला आहे याचा विचार करण्याची त्याला गरज भासली नाही. त्याने त्या वेळेचे अनेक भाग केले. एक भाग(२ मिनिटे) त्याने आपल्या सोबत्यांना निरोप देण्यासाठी ठेवला. २ मिनिटे स्वतःसाठी, स्वतःच्या कारकिर्दीसाठी, स्वतःच्या आयुष्याबद्धल विचार करण्यासाठी ठेवली. शेवटचे एक मिनिट शेवटची नजर आजूबाजूला फिरवण्यासाठी. ज्या दोन मिनिटात त्याने स्वतःबद्धल विचार केला तेव्हा त्याला वाटले कि तो आत्ता आहे. काय आहे तो? एक विचारी अस्तित्व असलेला माणूस(a living, thinking man) आणि येणाऱ्या ३ मिनिटांनंतर तो काय असेल? कुठे असेल? कुणीही नसेल का? कि कुणीतरी असेल आणि असेल तर कुठे असेल , कसा असेल? शेवटच्या तीन मिनिटात त्याने या प्रश्नावर विचार करायचे ठरवले. समोरच्या चर्चचा निमुळता मनोरा सूर्यकिरणांनी चमकत होता. त्याला त्या चमकणाऱ्या प्रकाशापासून आपली नजर हटवता आली नाही. त्याच्या मनाने अशी कल्पना केली कि हा प्रकाश म्हणजे माझे नवे स्वरूप असेल. जे त्वरित घडणार होते त्याबद्धलची किळस आणि अनिश्चितता सहन करणे त्याच्यासाठी भयंकर होते. पण सगळ्यात भयंकर होता हा विचार कि 'जर मी आत्ता मेलो नाही आणि जगायला मिळाले, तर काय? केवढा अनंत वेळ मला मिळेल आणि तो वेळ माझा फक्त!' त्या अनंत वाटणाऱ्या वेळाबद्धल विचार करणे त्याला एवढे असह्य झाले कि शिक्षा देणाऱ्यानी आपल्याला त्वरित गोळी घालावी असे त्याला वाटू लागले.

तरीही जेव्हा त्याला जीवनदान मिळाले. त्यानंतर त्याने त्यानंतरच्या जगण्यात 'वेळ' (टाईम) 'वेल्थ' समजून वापरला का? तर नाही. त्याने आपल्याला बहाल झालेल्या या अमुल्य वेळाची दाद ठेवली का? तर नाही. त्याने मान्य केले कि जसे त्याने ठरवले त्याप्रमाणे तो करू शकला नाही , त्याने बराच वेळ, अगदी बराच वेळ वाया घालवला. म्हणजेच जगतानाहि तो अनेक क्षण मेलेल्यासारखाच जगला तेही जीवन परत मिळून सुद्धा. त्यातल्या अमूल्य अश्या प्रत्येक क्षणाची किंमत कळून सुद्धा. हीच खरी माणसाच्या असण्याची शोकांतिका.
असे अनेक क्षण, वाया गेलेले क्षण, कधीही परत न येणारे, त्यात आपण मृतच असतो एका अर्थाने. ते क्षण आपण जगलेले नसतात. येणाऱ्या क्षणाच्या हावेने आपण जगत असलेले कित्येक क्षण पायदळी तुडवत असतो. मरणाच्या अनाकलनीय ओढीनेच आपण तसे करत असतो का?  एक एक क्षण तुडवत, आपण अश्या कुठल्या गोष्टीच्या दिशेने वाटचाल करतो? ती दिशा आपल्याला चुंबकासारखी फक्त खेचत असते. तीच ती सूक्ष्म, सुप्त मरणओढ.

जी. एं. नी देखील सुप्तपणे मरणओढ सांभाळली असावी असे मला वाटते. त्यांच्या लेखनातून त्यांचा जेवढा प्रत्यय येतो तेवढाच त्यांना जी पुस्तके, जे लेखक आवडायचे त्यांच्यावरुनही येतो. सिल्विया प्लाथ नावाची त्यांची अत्यंत आवडती कवयत्री, आणि तिच्या कवितांएवढेच तिचे जीवन त्यांना विलक्षण वाटत असे.
सिल्विया प्लाथने वयाच्या ३१व्या वर्षी आयुष्य संपवले. त्या आधी विसाव्या वर्षापासून, मरणओढीने तिने असे प्रयत्न पूर्वीही केल्याचा पुरावा आहे. तिने आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे  'मृत्यू अतिशय सुंदर असला पाहिजे. मऊ, लाल-तपकिरी जमिनीच्या आत निशब्दता अनुभवत, माथ्यावर सळसळत असणाऱ्या  हिरव्या गवताची चाहूल ठेवत पडून राहणे. ना काल,  ना  उद्या. वेळेला माफी, जीवनाला माफी आणि फक्त शांती.'  

मरणओढीने पछाडलेल्या अश्या व्यक्तिमत्वांबद्धल जी.एं. ना स्वतः ला सुप्त ओढ होती. त्यांच्या आयुष्य भिरकावून देण्याचे त्यांना एकप्रकारचे आकर्षण होते म्हणा ना.

वात झाल्यासारखा पिसाट अवस्थेत स्वतःचाच कान कापून देणारा आणि उन्हाने डोके जळत असलेल्या अवस्थेत नितांत सुंदर चित्रं काढणारा विन्संट वॅन गॉग़, बँकेतील नोकरी सोडून ताहितीला जाऊन चित्र रंगवणारा आणि शेवटी उपाशी मेलेला गोगँ, हेमिंग्वे, कावाबाता, कोसलर अशा आत्मनाश करणाऱ्या अनेक लोकांची बाजू घेऊन  त्यानी अश्या मरणओढीबद्धल (त्यांच्या एका पत्रात) म्हटले आहे 'हि माणसे दुबळी असतात असे मला वाटत नाही, इतकेच नाही तर तसे कुणी म्हटले कि मला संताप येतो. तसे पहिले तर आपण सारेच लहानमोठ्या ज्वालामुखीवर बसलेले आहोत. जीवाशी जपलेली मुल्ये एका सैतान क्षणी नष्ट होतात , आणि मग आपणाला उघड्यावर, वाऱ्यावर पडल्यासारखे वाटते. परंतु सगळीच माणसे इतकी जिवंत राहतात असे मात्र नाही. अनेकदा आपल्या वाढलेल्या बुढाखाली आपले किरकोळ ज्वालामुखी गुदमरून जातात किंवा आपल्या देहाची केव्हाच मढी होऊन बसली आहेत ही  गोष्ट आपणाला कधी जाणवतच नाही'            इति जी. ए. 

अश्या मरणओढीने त्रस्त झालेल्या माणसांबद्धल आकर्षण वाटणारे जी. ए. आपल्या आयुष्यात देखील कुणाला आपल्या जाण्याची चाहूलही न देताच निघून गेले. त्यांनाही अशी मरणओढ होती का?

मला तरी हि सर्व माणसे जिवंत, खरी वाटतात. जगण्याशी इमान राखणारी. ती मूर्ख, डिप्रेस्ड होती असे मला वाटत नाही. हि माणसं तर ग्रेट होती पण मला तर वर्तमानपत्रात २ ओळीच्या बातमीतील आत्महत्या करणारा 'नोबडी' देखील मूर्ख वाटत नाही. हि सर्वच माणसं काहीतरी शोधत मात्र होती जरूर. या शोधात त्यांच्या वाट्याला आलेल्या भीषणतेने खचून न जाता त्या वणव्यातून आरपार गेली ती.
हि सुप्त मरणओढ कशी प्रकट होईल ते सांगणे अवघड आहे. पण एवढे मात्र खरे , ज्यांना तिची चाहूल लागते, ज्यांना तिचा ध्यास लागतो ती माणसे एका वेगळ्या अर्थाने जिवंत होतात. तळाशी गेलेल्या पाणबुड्याप्रमाणे त्यांच्या हाती जीवनात कधीही प्राप्त न होणारा मोती लागतही असेल. कुणास ठाऊक?  

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. मराठीत गेल्या शतकात एक कवी होऊन गेले,कवी गोविंद ( गोविंद त्र्यंबक दरेकर ) . नाशिकचे हे कवी वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच दोन्ही पाय लुळे पडून अपंग झाले.पुढे कधीतरी त्यांनी ती महाराष्ट्रात अजरामर झालेली कविता लिहीली.” सुंदर मी होणार,आता मरणाने जगणार,नव्या मनाचे,नव्या तनाचे पंख मला फुटणार”. या जन्मात न लाभलेल्या लौकिक गोष्टी,त्यामागची ठसठस,कायमची असोशी-सगळं काही पुढच्या जन्मात लाभेल या ओढीनेच कदाचित माणूस त्या मृत्युला “सुंदर” रुपात पाहतो.बाकी त्या उर्दू कवीने मरणा बाद्दल लिहूनच ठेवलंय नं “ लायी हयात आये,कज़ा ले चली चले न अपनी खुशी आये,न अपनी खुशी चले”

    ReplyDelete