Tuesday 3 May 2016

काफ्का आणि रियल लाइफ



काफ्का चं 'मेटामॉरफ़ॉसिस' दोन वर्षांपूर्वी वाचलं आणि सोडून दिलं. मेटामॉरफ़ॉसिस हि गोष्ट आहे एका  ग्रेगर साम्सा (झाम्झा) या तरुणाची. पूर्ण कुटुंबासाठी सेल्समन बनून राब राब राबणारा ग्रेगर साम्सा सततच्या फिरतीमुळे घरी सुद्धा फारसा असत नाही. तो पूर्ण कुटुंबासाठी पोटापाण्याचे साधन आहे. पण एके दिवशी मात्र दोन फिरत्यांच्या मध्ये  असलेल्या ब्रेक मध्ये तो घरी रात्री राहायला असतो. सकाळी जेव्हा त्याला जाग येते तेव्हा त्याला कळते की त्याचे एका कीटकात रुपांतर झालेले आहे. मग काय होते हे सांगणे अवघड आहे कारण ते इतके केवलाकार (abstract) आहे कि त्याचा अनुभव वाचक वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो.
सांगायचा मुद्दा हा कि मी 'मेटामॉरफ़ॉसिस' वाचलं आणि सोडून दिलं पण त्याने मला सोडलं नव्हतं. याचा प्रत्यय मला दोन वर्षानंतर आला. त्यावेळी मी पाठदुखीने अत्यंत त्रस्त होते. इतकं कि रोजची कामं देखील मला करता येईनात. हा त्रास काहीच कारण नसताना सुरु झाला होता त्यामुळे अधिकच भीती वाटू लागली कि नेमके कश्यामुळे असे होत आहे. त्यातच दुसऱ्या शहरात राहणाऱ्या एका जवळच्या व्यक्तीचं आजारपण चालू होतं. त्यासंबंधी फोनवर चौकशी करत असे. एकदा चौकशी करताना पाठही अत्यंत दुखत होती. फोनवर कळले कि त्या व्यक्तीची सुधारणा फारशी होत नाहीये. असा सूर आला कि 'शेवटी नशीब असतं , त्याला काय करणार? जे नशिबात असतं ते होणार'.  अचानक खूप भीती वाटली. त्रास ! जीवघेणा त्रास, यातना! आपण मलूल, आपल्या आजूबाजूचे त्याहीपेक्षा मलूल. नशीब ! न चुकवता येणारं, बंधिस्तपण, 'No सुटका' ! असहाय असहाय…. आणि तरही जगणं, दररोज कणाकणाने झीजणं. असं काही आपलं झालं तर आता ? पाठीच्या कण्यात झीणझीण्या आल्या. आपल्या पाठीला लकवा मारून आपला कणाही जमीनदोस्त झाला  तर! कायमस्वरूपी बेडरिडन होवून वर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे डोळे करून पडावं लागलं तर? बाकीचे सहानुभूती दाखवतील, काळजीने झुरतील, त्यांचा जीव कळवळेल आणि त्यांना पाहून आपलाही. मग सवयीचं होऊन जाईल त्यांनाही. मग 'काय करणार? शेवटी ज्याचं त्याचं नशीब' म्हणून पूर्वव्रत आपापल्या कामाला लागतील. मग वाट पाहतील. आपणही वाट  पाहू. कश्याची कोण जाणे? त्याक्षणी ठार एकटं वाटू लागलं, आणि जीव खासावीस झाला. त्या आतल्या काळोखाने आपल्या नांग्या करकचून माझ्याभोवती आवळल्या, मन सुटके साठी धडपडू लागलं, तेव्हाच काफ्का धावत आला डोळ्यासमोर आपला तो ग्रेगर साम्सारुपी कीटक घेऊन. त्याने मला क्षणार्धात घेरून टाकलं.

म्हणजे तुम्ही खासावीस झालात आणि कुठच्याही न सुटणाऱ्या प्रश्नाने त्रस्त झालात. काळाशार काळोख दिसू लागला आणि जर काफ्का वाचला असेल तर काफ्का येणारच मानगूट पकडायला. तसा तो आला आणि सरळ माझी मानगूट पकडली. मला एवढं खासावीस व्हायला झालं की काफ्क्याला गळामिठीच मारावीशी वाटू लागली. ये बाबा ये! तूच रे बाबा ओळखल्यास माणसाच्या काळोख्या जागा आणि इतक्या खोलवर तुला मला याक्षणी काय वाटत आहे ते कळतंय, तुला कळतेय माझी मला अगम्य अशी वाटणारी भीती. तू कसं काय लिहिलस रे अगदी आत्ता मला जे  वाटत आहे ते? अगदी तेच. तुला कशी कळली माझ्या मनाची फाटकी, चिंध्या झालेली अवस्था. डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं.  कसं लिहिलस हे? काय लिहिलस ते माहित नाही पण या क्षणाला अगदी हेच वाटतंय मला, जे तू 'मेटामॉरफ़ॉसिस' मधून सांगतोयस.

काफ्का एकदम बोलायलाच  लागला.
'तुला वाटतंय मी हेच सांगतोय. पण असं नाहीये. मी काही तुला वाटतंय ते नाहीये सांगत. मी शोधतोय खोल विहिरीत बुडालेलं माझंच स्वतःचं काहीतरी. आणि काय मिळेल ते बाहेर काढतोय त्या उद्योगात. पाणवेलींच्या तुटक्या फांद्या, दगडधोंडे,साचलेला गाळ, माती, शेवाळ, नाहीतर एखादा पाणसाप? त्यातलंच दिसलं तुला काहीतरी ओळखीचं एवढंच. पाणसाप दिसला का तुला? काय करू? माझ्या विहिरीत बरंच काही आहे, मीही काढतोय ते उपसून. पाणसाप मिळाला म्हणून घाबरू नकोस. माझ्या या विहिरीत कमळं नाहीत असं नाही (मलाच ती सापडली नाहीत)! पण खोलवर असावीत ती. तू शोध'

पण कसं काय लिहिलस रे हे माझ्या आत्ताच्या मनाच्या अवस्थेसारखं , मला तूच आठवलास एकदम तुझ्या त्या कीटकासहित.


'कसं ते सांगू नाही शकणार, ते कळायला तुला बरच चालावं लागेल अजून. पण का लिहिलं ते सांगू शकेन थोडं बहुत. आधी माणसाने लिहावेच का हाच तो प्रश्न. त्याचे उत्तर मी माझ्या परीने देणार आहे.
तर लिहावे का? कश्यासाठी? आणि कसं ? तर जेव्हा आपल्याला असह्य होईल तेव्हा ज्यामुळे असह्य वाटत आहे ते शोधावे, ते सापडणे तसे सोपे नाही. भल्याभल्यांना ते सापडत नाही, शोधत राहतात आयुष्यभर, कळलं?
मी काय उगाच लिहित होतो काय? जीव कासावीस झाला माझा, मेटामॉरफ़ॉसिस कशी लिहिली मी? पडलो होतो बेडरिडन होऊन आणि जीवाला कंटाळलो होतो त्यामूळे तळमळ होत होती. तेव्हा हे सुचलं आणि त्याने मला इतकं झपाटून टाकलं कि लिहिल्याशिवाय चैन पडेना.
संडासला कसं कडकडून लागतं तेव्हा धावता ना? तसं कडकडून लिहावंसं वाटलं तरच लिहावं. आणि लिहून फाडून टाकावं. जर फाडून टाकल्यावरही ते तुम्हाला लक्षात राहिलं असेल तरच परत लिहावं.'
बाकी आपली कहाणी तर काय कुणीही सांगू शकतो. अगदी गल्लीतल्या पाववाल्याची कहाणी देखील डोळ्यात आसवं आणेल. ते प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात असतेच. वरवर प्रत्येकाचे आयुष्य वेगेळे वाटते पण जर खोलवर गेलात तर तळ सारखाच असतो. हा तळ  जेव्हा दिसतो ना तेव्हाच तुम्ही दुसऱ्याशी खरा संवाद साधू शकता. आत्मकथा वगैरे ठीक आहे, वरवरून सगळ्या वेगळ्या वाटतात पण आत्मरुदन म्हणजे काय त्याचा विचार केलाय का कधी?, जेव्हा आत्मरुदन व्यक्त होईल तेव्हाच ते कुणालाही भिडेल. जसं तुला आता भिडलं तसं'

'मेटामॉरफ़ॉसिस' बद्धल आणखी थोडं सांग मला.
'नाही. ते तू तुझं बघ. जे सांगायचं ते मी त्यात सांगितलय.'


आता काय करतोयस तू? कुठे असतोस?
'मी इथेच आहे. काहीही करत नाही सध्या. पण माझा शोध चालूच आहे. मी भटकत असतो. मुंजाच ना मी! काय करणार? असतो कुठच्यातरी लायब्ररीत आणि मग तुझ्यासारखा कुणीतरी 'वाचणारा यडा' गावला कि त्याची मानगूट पकडतो. पण जेव्हा कुणी भेटत नाही तेव्हा लायब्रऱ्या धुंडाळतो. अशीच तुमची मराठी लायब्ररी धुंडाळली. बरं लिहिता कि तुम्ही लोकं पण एक जाणवलं तेच तेच लिहिता. म्हणजे गलिच्छ वस्ती, स्त्रियांवर अत्याचार, शिव्या, मारझोड, तुंबलेली गटारं, संडासातल्या लेंड्या इ. लेखन ठीक आहे, पण तेच तेच काय, अरे? म्हणजे तुझं झालं रडून आता माझं ऐक, हे कश्यासाठी? बरं हे वाचून काय मिळतं तर ज्यांना कसलीच झळ बसली नाही त्यांच्या तोंडवाटे 'चक चक', 'अरेरे' आणि ज्याने असं काही भोगलय त्यांच्याकडून 'ह्या! यात काय मोठ्ठे आहे, आम्ही हे रोज बघतो,  आमच्या घरात हेच चालते कि!' यापेक्षा काय मिळतं?
मी काही फक्त माझी पुस्तकं वाचतात त्यांना भेटतो असं नाही. मध्यंतरी असाच एका आयुष्याविषयी जाण असलेल्या व्यक्तीला भेटलो, त्याला तर माझे एकही पुस्तक माहित नव्हते. तो मला सांगत होता कि हल्लीच त्याने एक नाटक बघितले 'आत्मकथा' आणि त्याला ते  एकदम फडतूस वाटले. तो म्हणाला कि याच्यापेक्षा चांगला ड्रामा आमच्या घरात घडतो. मला पटलं त्याचं.

माझं हेच सांगणं आहे कि जरा स्वतःच्या खोल विहिरीत डोकावून तरी बघा कि जरा!  शेवाळ बाजूला करा आणि बेडक्यांना उड्या मारू देत जरा. खोल उतरा तेव्हा कुठे एखादी मासोळी हाती लागेल. हा! अगदी बुडून जाण्याचीही पर्वा नसेल तर मात्र तळाशी डोळे मिटून बसलेलं कासवही गावेल कदाचित.'
 
पण तू कसं काय ओळखलस आणि लिहिलंस मला जे वाटलं ते? आणि तेही १०० वर्षांपूर्वी?
'मी तुला ओळखत नाही. मी मला ओळखण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे. मी तुला एवढंच सांगतो कि माझ्या पुस्तकांतून मला शोधण्यापेक्षा त्यातून तू तुलाच शोध. तेव्हा कुठे माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. बघ जमतं का ते. मग मी पुन्हा येईन भेटायला आणि बोलायला.'

No comments:

Post a Comment