१. पेरू
अंगावरचं पांघरूण खस्सकन ओढल्याचा भास झाला. बेनोळींचा रेडीओ 'ट्रिंग ट्राँग' करून बातम्या देत होता. या बेनोळीकाकांना सगळ्याच घरांना सामुदायिक रेडीओ ऐकवायचा असतो. त्यातही आईच्या रेडीओचे किरपण सूर मध्ये ऐकू येताहेत असे वाटायला लागते तोच आईने त्याच्यावर हाताचा जोरदार फटका मारत 'मेलो चालणाहा नाय' असे म्हटले. आणि माझ्याकडे वळून जणू मीच तो दुरुस्त करणार आहे अश्या अविर्भावात माझ्याकडे पाहू लागली. मी डोळे चोळत उठून बसले तशी मला पेरुच्या झाडाची आठवण झाली आणि अंथरूण सारून मी धावत बाहेर आले. अजून छान रंग घेऊन फिकट पिवळा झालेला पेरूचा दोडा पानाच्या खालून माझ्याकडे बघत होता. हायसं वाटून मी परतले. काही दिवसांपासून त्या पेरूच्या दोड्यावर माझा डोळा होता. तसा डोळा लावून आणखी कुणीतरी बसलय याचीही मला खात्री होती.बाजूची, ओटवणेकरांची अंजी हि माझ्याच वयाची. तिच्या आईची माझ्याबरोबर तिची प्रत्येक बाबतीत स्पर्धा लावून देण्याची कसली हौस होती कळत नसे. मी जास्वंदीचं झाड लावलं कि हिने कोरांटीचं लावलंच.मी रतन आबोली लावली तर हि गुलाबाचं लावणारच. असं चालूच. दोघांच्याही घरापुढे हि वाढलेली झाडं. पण हे आवारातलं पेरुचं झाड कुणाचंच नव्ह्तं. म्हणजे ते अगदी माझ्या जन्माच्या आधीपासून तिथे असावं. त्यावरचे पेरू कुणीही काढे. खरंतर ते पेरू चांगले मोठे व्हायच्या आतच पळवले जात. आणि दोडा तर दोडा पण दुसऱ्याला लाभू द्यायचा नाही हीच आम्हा सगळ्यांची शर्यत असे. आताचा पेरू खूप दिवस झाडावर होता. मी जाऊन जाऊन बघे, पण अद्याप तो झाडावरच असे. त्यामुळे माझे धास्तावलेले मन जरा शांत होत असे. आता सुट्टीचे दिवस असल्याने मी सकाळपासून त्या झाडाकडे टकत बसले. हि दुपार वैऱ्याची आहे हे मी स्वानुभवावरून जाणले. पण अंजीच्या घरात सामसूम होती. त्यामुळे मी थोडा वेळ पेरूचा नाद सोडून दिला आणि बसून गोष्टीचे पुस्तक वाचू लागले.
चांगली टळटळीत दुपार झाली असताना मात्र मला राहवेना. आई सुद्धा बुधवारचा बाजार म्हणून घर माझ्यावर आणि आजीवर सोपवून बाजारात गेली होती. हाच चांगला मौका आहे असे वाटून मी लागलीच काठी सरसावून अंगणात गेले. आजी पाठल्यादारी थंडाव्याला बसून तांदूळ वेचीत होती. तिला माझ्या कारनाम्यांचा काहीसुद्धा सुगावा लागला नव्हता. थोड्या उंचीवर असलेला तो पेरू मला हुलकावण्या देत पानांच्या मागे दडून बसला होता. काठीने थोडेसे झोडून पहिले पण तेवढ्या उंचीवर काठी पोचेना. मग थोडे दगड गोळा करून भिरकावले. पण काठीला दाद न देणारा तो दगडाला कसला ऐकतोय. पेरू ढिम्म हलायला तयार नव्हता. दोन चार सुक्या काटक्या आणि पाने मात्र पडली. मी उंच पाय करून मान ताणून काठीने पेरूच्या जवळची फांदी हलवणार तोच डोक्यात कल्पना आली. घरातले टेबल आणले तर, त्यावर चढून काहीतरी जमेल. हे आधी कसे सुचले नाही म्हणून स्वतःवर जळफळत मी मागे वळणार तोच हातातली काठीही सुटली. तिच्या वरच्या टोकाला असलेलले आकड्यासारखे पेर झाडाच्या फांदीत अडकून बसले होते. काठी तशीच लोंबकळत राहिली तर झालेच कल्याण. तितक्यात पाणंदीतून दोन्ही हातात भरगच्च पिशव्या घेऊन आई येताना दिसली. बहुतेक मागून येताना दिसणारे दोन ठिपके अंजी आणि तिची आई असतील कि काय? आता मात्र माझे धाबे दणाणले. आता पेरू नाही तर नाही निदान काठी तरी पाडायची म्हणजे काही झालेच नाही असे तरी दाखवता येईल.
एक मोठा दगड काठीवर जीवाच्या आकांताने भिरकावला आणि दूर पळाले. काठी टणाटण आवाज करत खाली पडली आणि त्याबरोबर पेरूही. क्षणाचाही विलंब न करता विजेसारखी धावून ती काठी मी फुलझाडांच्या गर्दीत फेकली आणि तो पेरू मुठीत धरून मी घरात धूम ठोकली. पाचच मिनिटात आईने दार वाजवले. दमून, घामाने डबडबून दोन पिशव्या घेऊन आई दारात उभी. 'काय ग, इथेच होतीस तर पाणंदीपर्यंत येऊन पिशव्या घ्यायला यायचं तरी, आळशी मामी कुठची!'. आई करवादली. 'अगं मी मागच्या अंगणात होते, मला कसं कळणार तू आलीस ते' मी उसनं अवसान आणून काहीबाही ठोकून दिले. आजी आपल्या नादात तांदूळ वेचत असल्याने तिला विचारले तरी ती काही बोलणार नाही असे मला वाटत होते. त्या भरगच्च पिशव्यात आणलेल्या गोष्टी मात्र आता मला खुणावत होत्या. बुधवारचा बाजार म्हणजे त्या दिवशी माझा भाजीवाल्याचा खेळ ठरलेला असे. मी पेरू दप्तरात लपवून ठेवला होता. आई आत गेल्यावर मी दोन्ही पिशव्यातले सामान काढायला सुरवात केली. मला आवडणारा बुधवारचा सर्वात आवडता खेळ म्हणजे हाच. साग्रसंगीत सगळ्या पिशव्या रिकाम्या करून बाजार मांडणे. आईने थोड्या वेळाने तिचा आवडता रेडीओ सुरु केला. मी सगळ्या भाज्या नीट मांडून ठेवल्या. जेवल्यानंतर नीता आणि मनालीला बोलावून भाजीबाजार खेळण्याचे मी योजले आणि त्याबरोबरच आई,आजी झोपल्याचा अंदाज घेऊन सुरी आणि मीठ पळवून त्या दोघांना पेरूची मेजवानी द्यायचेही पक्के केले. त्याप्रमाणे दारातूनच नीता आणि मनालीला दुपारी खेळायला येण्याचे फर्मान सोडून मी खुषीचा निश्वास सोडला. दुपारी ठरल्याप्रमाणे नीता आणि मनाली आल्या. त्यांना मनसोक्त भाजी विकल्यानंतर पेरूची मेजवानी घडवून आणण्यासाठी मी पेरू दप्तरातून काढला , आईचा डोळा लागला आहे याची खात्री करून आत जाऊन सुरी आणि मीठही घेऊन आले. आणि मधल्या दारातच बसून त्यांना माझा पराक्रम सांगतच होते तर मधेच त्या दोघी स्तब्ध, म्हणून त्यांच्याकडे पाहिले. त्या टकामका वर बघतायत. दोघींचे चेहरे भिजल्या मांजराचे. मागे वळून पहिले तर आई हाताच्या घड्या घालून उभी. आईचा धपाटा पाठीत पडायच्या आधीच 'आम्ही जातो ग' म्हणून दोघी पळाल्या सुद्धा. आईने काही धपाटा घातला नाही पण तिने पेरू उचलून दूर भिरकावून दिला. 'दुपार नाही तिपार नाही! आणि कशाला तो पेरू काढलास? ते आपलं झाड नाही, लोकांच्या वस्तू कशाला घ्यायच्या?' तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला.
'अगं, कुणाचंच नाहीये न ते झाड? आणि तूच ओततेस ना भाजी धुतलेलं पाणी त्याच्या मूळाशी?'
'ते काही नाही. कशाला तो हिरवा दोडा काढलास? सर्दीबीर्दी भरली म्हणजे? मी बाजारातून आणलेला चांगला पिकलेला पेरू, तो नको खायला'
अश्याप्रकारे माझी पेरू खाण्याची दुपारची मेजवानी पेरू तोंडी न लागताच फस्त झाली. आई हुशार आहे, तिला येतानाच झाडाखाली काटक्या आणि पानं दिसली असणार, त्यावरून तिला माझा उपद्व्याप कळला असणार, पण काही झाले तरी पेरू अंजीच्या स्वाधीन झाला नाही याचे मला बरे वाटले.
दोन दिवस तसेच गेले. अंजी काही आली नाही. ती बुधवारच्या बाजाराला नाही तर आपल्या मामांकडे पडतेवाडीला गेली होती. हे नंतर कळले, कारण दोनच दिवसांनी सकाळी नेहमीप्रमाणे मी आवारात आले तेव्हा पेरूच्या झाडाखाली पेरूचे दोडेच दोडे पडले होते आणि पानांचा ढिग. बहुदा यापुढे मला एकही पेरू काढता येऊ नये म्हणून अंजीने दोडेसुद्धा पाडून ठेवले होते.
२. दुर्गाई भवन
आम्ही
राहतो ते दुर्गाई भवन म्हणजे छोटंसं तीन बिऱ्हाडांचं कौलारू घर आहे.
आम्ही मध्ये राहतो. आमच्या एका बाजूला बेनोळी आणि दुसऱ्या बाजूला अंजी आणि
तिचं ओटवणेकर कुटुंब राहतं. बेनोळी बांधकाम विभागात काम करतात.
त्यांच्याकडे जाडी, काळी म्हशीसारखी फटफटी(मोटरसायकल) आहे. ते एकटेच
राहतात. त्यांचं पूर्ण कुटुंब कर्नाटकात असतं आणि हे मात्र कामानिमित्त इथे
राहतात. पण मे महिन्यात त्यांचं कुटुंब इकडे येतं त्यामुळे एरव्ही
त्यांच्या ओसरीबाहेर दिसणारा सिगारेटच्या थोटकांचा खच दिसायचा बंद होतो आणि
त्यांच्या घरात पोरांचा धागडधिंगा सुरु होतो. पोरे किती तर फक्त तीन.
पण दंगा एवढा कि अवघं दुर्गाई भवन दणाणून सोडतात. आत्ताही तसा चालू आहे.
त्यात त्यांचा रेडीओ कि टेप जे काही आहे आहे ते सदैव आमच्या आईच्या रेडीओशी
स्पर्धा करत असते. फक्त फरक एवढाच कि आमच्या आईचा रेडीओ हल्ली किरपण
आवाजात बोलतोय आणि मधून मधून खोकला झाल्याप्रमाणे खर्र खर्र करत असतो. आणि
त्यांचा रेडीओ घसा बसलेल्या पण तरीही कन्नड आवाजात चाल करून येत असलेल्या
सैनिकाप्रमाणे गाणी म्हणत असतो. आम्हाला त्या कन्नड गाण्यातलं काही कळंत
नसल्याने आम्ही त्याला 'यंडागुंडू' म्हणतो. आमच्या दादाने त्याला स्वतःची
शब्दसामुग्री जोडून (तो माझ्यापेक्षा दोन यत्ता पुढे असल्याने) 'यंडा गुंडू
ठंडा पानी बाजी पत्तडे' असे त्यांना नावही देऊन टाकले आहे. अर्थात हे
सर्व आम्हा मुलांपर्यंतच. आईबाबा, आजी हे यापासून नामानिराळे आहेत.
बेनोळीकाकांची मुलं पूर्ण दिवस घरात बसून काय करतात याचा सुगावा अद्याप
आम्हाला लागलेला नाही. पण ती मुलं एकंदरीतच इथे नवीन त्यामुळे बुजतात,
त्यातून त्यांना भाषाही येत नाही त्यामुळे ती तिघं तिघं घरातच खेळत असावीत
असं आई म्हणते. पण मला पक्कं ठाऊक आहे कि त्यांच्या घरातला भाड्याने आणलेला
तो टि.व्ही. हेच त्यामागचं कारण असावं. परवा मी मांजरेकर बाईंच्या घरी
नीताला बोलवायला गेले होते तर त्यांच्याकडे टि.व्ही.वर 'मिकीमाऊस' चा
कार्यक्रम लागलेला. तर ती टि.व्ही. समोरून हलता हलेना. मग मीही तिथेच बसले
ती येण्याची आणि कार्यक्रम संपण्याची वाट बघत पण हळूहळू तो कार्यक्रम संपूच
नये असं मला वाटायला लागलं. म्हणजे झालं असं कि काही वेळाने आईच तिथे आली
आणि मला हे कळलेच नाही कि ती आलीय. बाई(म्हणजे नीताची आई, यांना आम्ही बाईच
म्हणायचो कारण या आमच्या शाळेतल्या बाई होत्या)आईला घेऊन घरात आल्या. आणि
दोघी बोलतायत तरी माझं लक्ष नाही. शेवटी बाईनी टि.व्ही. च बंद केला व
नीताला हाताला धरून उठवलं तव्हा कुठे मला कळलं कि आईसुद्धा तिथे आली आहे मला
शोधायला. आणि संध्याकाळचे सात वाजलेत. तर मला तेव्हाच कळलं कि बेनोळी
काकांच्या घरून अधून मधून येणारा आवाज रेडीओचाच नसून टि.व्ही. चाही आहे.
आणि तो बघूनच ती मुलं घरातून बाहेर पडायचे नाव घेत नाहीत. घरातच ठाण मांडून
आहेत. एकदाच त्यांचा एक मुलगा बॉल घेऊन मागच्या दारी खेळायला आला म्हणे,
इति आजी. कारण आजीनेच ती गोष्ट आईला सांगितली. 'काय विचित्र पोरगो असा, मी
काढीत होतंय दोरीयेवरचो सुकत घातललो पोलको , माझो हात पोचूक नाय तसा
तेच्याकडे काठी उचलून, काठी हलवून म्हटलंय 'व्हैता जरा काढून दिशीत रे' तर
तो बॉल टाकून पळान गेलो. घाबरलो काय माका कोण जाणा'. पण बेनोळीकाका आणि
त्यांची बायकोमुलं आपापसातच गुंग असतात. आपण कर्नाटकातून महाराष्ट्रात आलोत
याचाही त्यांना पत्ता नसतो. पण त्यांचा कुणाला त्रास नाही.
पण
बाजूचे ओटवणेकर म्हणजे डोक्याला ताप आहेत असं आई अधूनमधून बाबांना म्हणत
असते. त्यांच्या मागच्या दारातून जाणाऱ्या गटाराचे पाणी तुंबले कि
ओटवणेकरबाईंच्या तोंडाचा पट्टा धीम्या आवाजात पण सातत्याने चालू राहतो. हे
तसे नेहमीच धूसफुसीचे कारण. त्यावर इथे घराचे मालक राहत नसल्याने आणि
जेव्हा मालक येतात तेव्हा ओटवणेकरबाईच पुढेपुढे करत असते. त्यामुळेच कि काय
ती स्वतःला इथली रखवालदार समजते. कोणी पेरू काढला, कोणी जांभळं काढली यावर
तिची तिरपी नजर कायमच असते. आई तर म्हणते ओटवणेकरीण सदैव टिरीटिरी करत
असते. मी शाळेत हुशार असल्याने आणि अंजी माझ्याच इयत्तेत असल्याने ती अधिकच
टिरीटिरी करते असेही तिचे म्हणणे.
माझेतर अंजीशी कधीच पटले नाही.
आम्ही जेव्हा नवीन या बिऱ्हाडात आलो तेव्हा अगदी सुरवातीला आई मला
त्यांच्याकडे खेळायला पाठवत असे. तर एकदा नेलपॉलिश लावते म्हणून तिने
माझ्या नखांना कसलातरी चिकट काळा पदार्थ लावलान. अंजी डोळे उघडझाप करणारी
बाहुली घेऊन खेळत असे आणि मला खेळायला कागदाच्या चिटोऱ्यानी भरलेली काचेची
बाटली देत असे. तेव्हा मी कधीतरी तिला म्हटले, मला पण बाहुली दे न खेळायला
एकदा तर म्हणाली कि ती बाहुलीची आई आहे आणि मी जेवण बनवून तिला द्यायचं. आणि सारखं हे बनव, ते बनव. नेहमी तेच जेवण बनवायचं काम.
नंतर मला कळले कि तिने मला गणपतीच्या पंगतीसाठी आमच्या वराडच्या घरी
रांधणारी भीमाकाकूच करून टाकलं होतं.
तसं ओटवणेकर कुटुंब
कुरबूरं असलं तरी आम्ही त्याचं फारसं काही वाटून घेत नाही. उन्हातान्हात
आरडाओरडा करीत झाडांवर चढणे, आंब्यांच्या पेट्याच्या होड्या आणि बंबाची
लाकडं व्हल्ली म्हणून वापरून समुद्रातील चाचेगिरी चा खेळ खेळणे, दिवाळीत
फटाक्यांचा कचरा घालणे, पावसात अंगणभर कागदाच्या होड्या सोडणे हे सर्व
आम्ही मनमुराद करतोच. आम्ही म्हणजे मी, दादा आणि विनू. आमच्या घराच्या
आसपास पाणंदीपर्यंत एक दोन घरे आहेत. पाणंदीनंतर अनेक घरे आहेत त्यातच भाऊ
वालावलकराचे घरही येते. या सर्व घरात आमची मित्रमंडळी म्हणजे किरण, कीर्ती,
मंदी, ठुक्रूल, गोडदी, नीता, मनाली, परेश राहतात. अंजीची आई थोडी कुजकट
असल्याने इतर बायकांशी तिचे फारसे पटत नाही आणि अंजी आईच्या वळणावर
गेल्याने तिचे आमच्याशी पटत नाही. तिला खेळत घेतलेच तर ती सदैव भांडणे
करते आणि तिचे भांडण तीन-चार घरांचे भांडण होते. म्हणून ती आमच्यात
खेळायला येत नाही. तशी तिची एक दातपडकी मैत्रीण अधून मधून तिच्या घरी येते.
बहुदा हि तिची पडतेवाडीची मामेबहीण असावी.
१३८० दुर्गाई भवन भाग २
१३८० दुर्गाई भवन भाग ३
सुंदरच ! Nostalgic हौऊन तुझं मालवण मधलं बालपण जणु पुन्हा जगते आहेस असं वाटलं.प्रकाश नारायण संतांच्या लिखाणाची आठवण झाली."पेरु" छानच. दोडा हा शब्द मालवणीतला दिसतोय,मला अपरिचितच.आणि कोकणातल्या भुताखेताच्या कथा तुझीही पाठ सोडत नाहीयेत वाटतं.त्या अनघड वयातली impressions किती पक्की असतात नाही :-)
ReplyDeleteहो. खरं आहे तुमचं म्हणणं. प्रकाश नारायण संत यांचे 'वनवास' मी वाचलं आहे. अतिशय छान आहे. त्यातल्या लंपनचं बालपण वाचून मलाही माझं बालपण आठवलं होतं. तुम्हाला माझं लेखन वाचून प्रकाश नारायण संत यांच्या लेखनाची आठवण झाली हे वाचून मला खूप प्रोत्साहित वाटलं. 'दोडा' हा मालवणीच शब्द आहे. एकदम लहान(पूर्ण वाढ न झालेल्या ) पेरूच्या फळाला 'दोडा' म्हणतात. 'दोडा' हा शब्द मालवणीत आणखीही काही कच्च्या फळांना वापरला जातो जसं कोकम/रातांबा(ज्यापासून आमसूल बनते ), त्याच्याही हिरव्या फळांना दोडा म्हणतात. मी 'दुर्गाई भवन' चे आणखीही काही भाग लिहित आहे. त्यातले बरचसं खऱ्या घटनांवर आधारीत आहे आणि काही काल्पनिकही. आणखी एक, तुम्हीही फार छान लिहिता. तुम्ही तुमच्या आवडत्या विषयावर म्हणजे संगीत(विशेषतः गाणी ) यावर का लिहित नाही? मला विश्वास आहे, कि तुम्ही फार छान लिहू शकाल आणि त्यामुळे आमच्यासारख्या जुन्या हिंदी गाण्यांबद्धल माहित नसलेल्या पिढीला बरीच मदत होईल. :)
ReplyDelete