Wednesday 25 May 2016

मालवणी म्हणी

मालवणी भाषा हि कोकणच्या प्रत्येक गोष्टीचा चपखल प्रत्यय देणारी आहे. कोकणची माती तांबडी भडक, जमीन उंचसखल, समुद्राची खारी हवा, आंबट कच्ची करवंदं आणि त्यांच्या झाळी ,सुपाऱ्यांची, माडाची(नारळाची) उंचच उंच झाडं, कोकमाची विरळ झाडं आणि त्याला लागणारे आंबट रातांबे, आंब्यांची झाडं, काटेरी फणस, झिंग आणणारे काजूचे रंगीत बोंडू(काजूचे फळ), गुबगुबीत जांभळं , झणझणीत तीरफळं, आंबट आटकं, सुरुंगीचे, बकुळीचे धुंद करणारे गजरे, अबोलीचे गच्च वळेसर, अंधारातल्या पाणंदी, वेताळाची देवळं, देवींचे उत्सव, दशावतारी नाटकं , भुतंखेतं आणि त्यांनी झपाटलेली झाडं आणि माळरानं, भगभगीत ऊन, मुसळधार पाऊस……  अश्या तिथल्या अतिशय विसंगत परिस्थितीसारखाच विसंगत कोकणी माणूस आणि त्याची खणखणीत, खरखरीत आणि तरीही गोडसर वाटणारी मालवणी भाषा. मालवणी भाषा कोकणाशी इतकी एकरूप आहे कि कसलेही वर्णन करताना, उपमा देताना , तिथल्या अनेक गोष्टींना भाषेत वापरले जाते. मालवणी भाषेला एक प्रकारचा फटकळ, तिरकस, तिखट  बाज असला तरीही तिला एक प्रकारचा आंबट, तुरट आणि गोड मिश्रित मधूरपणाही आहे. कोकणातल्या उंच सखल जमिनीसारखे या भाषेत चढउतार असल्याने, हेल काढून बोललेली हि भाषा ऐकत राहाविशी वाटते. कोकणी माणूस हुशार, पण दरिद्री, त्यामुळे थोडासा बेरकी, तिरसट, डांबिस असेच त्याचे दर्शन होते. तिरकस बोलणारा, चेष्टा करणारा असा तो आणि तशीच त्याची भाषा.
बोलण्याची लकब साधारणपणे दुसऱ्याला अगदी तुच्छ लेखण्याची नसेल पण चेष्टेखोर जरूर. पण असे असले तरीहि हि चेष्टा जिव्हारी लागणारी नाही,  कुठेही बोलण्यात विखार नाही. त्यामुळे ते बोलणे मजेशीर, विनोदी वाटते. मालवणी भाषेत काहीतरी गहन दुखःद क्वचितच वर्णन करता येईल. किंबहुना कुठल्याही प्रसंगातील गहनता,विदारकता काढून त्याला हलकंफुलकं करण्याचं कसब या भाषेत आहे , म्हणूनच मालवणी भाषेत कुणी भांडत असेल तर तेही विनोदी वाटेल. मालवणी म्हणी तर इतक्या मजेशीर कि अश्या इरसाल म्हणी मालवणी माणसाला कुठून सुचल्या याचेच आश्चर्य वाटत राहते. मी अस्सल मालवणी माणसांकडून स्वतः ऐकलेल्या आणि बोलण्यात वापरताना पाहिलेल्या म्हणी खास इथे देत आहे. यापासून माझा मालवणी म्हणींचा आणि मालवणीतील विलक्षण गोष्टी आणि शब्द यांचा शोध सुरु होतो. तो शोध मी करतच राहणार आहे. दरवेळेला कोकणात गेल्यावर मला नवीन काहीना काही सापडतच राहिले आहे आणि त्याचा पाठपुरावा करून मी त्याचे संकलन 'काजूला' वर करत राहणार आहे.

तर आत्तासाठी या काही म्हणी:

घोडा काय भाडा आणि जीन कपळाक
अर्थ: प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त आणि अनाठायी खर्च झाला आणि त्याचा उपयोग काहीच झाला नाही.

म्हणजे घोडं आणलं, त्याचं भाडंहि दिलं आणि आता त्या खर्चाने झळझळीत (कफल्लक) झाल्यावर काहीच नाही मिळालं, घोडं निघून गेलं (भाडयाने आणलेलंच ते )उरलं काय तर जीन(घोड्याचं) जे आता कपाळाला बांधून बसावं.

अगाच्या पगा आणि उतवाक ढेंगा
अर्थ:  काहीच्या काही बोलणे, उतावीळपणे असंबद्ध, अतिशयोक्त बोलणे.

आळश्याचा तीनठय (तीनथय)
अर्थ: आळशी माणूस कामचुकारपणा करण्यासाठी काहीतरी कारणं देत राहतो. आपण इथे तिथे काहीतरी कामात व्यस्त असल्याचा बहाणा करतो, त्यामुळे आळशी माणसाला  नेहमी एकाच वेळेला तीन ठिकाणी काहीतरी काम असणारच अश्या उपरोधिक अर्थाची हि म्हण आहे.


पादऱ्याक पावट्याचा निमित
अर्थ: काहीतरी शुल्लक निमित्त काढून नाराजी व्यक्त करणे.

 
मन सुवराती, डोळे पापी
अर्थ: म्हणजे नाटकी माणूस, जो काहीतरी खुसपट काढून वादंग करतो त्याला उद्देशून असे म्हटले जाते.   


रिकामो न्हावी, बायलेचे कुले ताशी
अर्थ: रिकामटेकड्या माणसाने केलेली कामे आणि त्याबद्धल असंतोष दाखवण्यासाठी असे म्हटले जाते.


आडजीभेन खाल्ल्यान पडजीभ बोंब मारुक लागली
अर्थ: जेवण किंवा कुठलाही पदार्थ अपुरा पडला कि त्याचे वर्णन करायला हि म्हण वापरतात.


बारा हात तवसा, तेरा हात बी
अर्थ: जे  वर्णन अतिशयोक्तीने केले जाते त्याची चेष्टा करण्यासाठी हि म्हण वापरली जाते.  

भूरकाटली भाबळीण देवळात मुतली
अर्थ:  उगीच उतावीळ होऊन खळबळ करणाऱ्या(कानात वारं भरल्यासारखं करणाऱ्या ) आणि त्यातून स्वतःचं हसं करून घेणाऱ्या व्यक्तीबद्धल हि म्हण वापरली जाते.


कुक्कुडश्याच्या बारश्याक
अर्थ:  दिलेल्या वेळेच्या कितीतरी आधीच येऊन टपकणारऱ्या माणसाला उद्देशून असे म्हटले जाते. 'कुक्कूडश्याच्या बारश्याक इलस काय?
कुक्कुडशा म्हणजे कुक्कुडकोंबा (रानकोंबडा किवा भारद्वाज असावा) जो सकाळी सकाळी आरवतो.  त्याच्या बारश्याला म्हणजे अगदी फाटफटीला(लवकर).


माका नाय तुका, घाल कुत्र्याक
अर्थ:  मला नाही मिळणार तर तुलाही मिळायचं नाही आणि या भांडणात शेवटी तिसऱ्यालाच ते मिळतं अश्या आशयाच्या प्रसंगी वापरली जाणारी म्हण. 
 
आगसली ती मागासली, मागसून इलली गुरवार रवली
अर्थ: 'कानामागून आली आणि तिखट झाली' या अर्थाची हि म्हण. म्हणजे पहिल्या बायकोला मुल नाही झालं आणि नंतर आलेली  गरोदर राहिली(गुरवार रवली) आणि तीच महत्वाची झाली.
 
आधी नाय मधी आणि शनवार कधी
अर्थ: एखाद्या गोष्टीच्या मध्ये तिसरेच काहीतरी घुसवून त्यालाच महत्व देणे(किंवा महत्व देण्यासाठी खटपट करणे).

करुक गेलय गणपती, झाला केडला
अर्थ: करायला गेलो गणपती आणि झाला मारुती या अर्थाची म्हण. म्हणजे करायला गेलो एक आणि झाले भलतेच. 'केडला' हा लाल तोंडाच्या लहान माकडासाठी वापरला जाणारा मालवणी शब्द आहे.


हाडाची काडा आणि बोच्याचा तूनतुना
अर्थ: अतिशय बारीक,प्रमाणापेक्षा ज्यास्त बारीक व्यक्तीला उद्देशून असे म्हटले जाते. 

आयत्यार कोयतो 
अर्थ: आयत्या गोष्टीला मिळवण्यासाठी चालणारी धडपड.

खेकट्याक मेकटा 
अर्थ: एकमेकाला पुरून उरणारी माणसं. जसा एक विशिष्ट स्वभावाचा माणूस तसं त्याला सरळ करणारा दुसराही तसाच माणूस म्हणजे खेकट्याक मेकटा.

गजालीन घोव खाल्लो 
अर्थ: एवढ्या गप्पा मारल्या कि वेळ निघून गेला आणि सगळी कामं राहून गेली.

माझो बाबा काय करी आसलला नाय करी
अर्थ: एखाद्या चांगल्या केलेल्या कामाचा बट्ट्याबोळ करणे. एखाद्या चांगल्या गोष्टीची नासदुस करणे.

भित्रो कोलो, कुल्यात शेपटी घातल्यान 
 अर्थ: अत्यंत भित्र्या माणसाला उद्देशून असे म्हटले जाते. 

बापाशीचो माल
अर्थ: हि खऱ्या अर्थाने म्हण नसली तरी म्हणीसारखीच वापरली जाते. एखाद्या गोष्टीवर कुणी अनाठायी अधिकार दाखवतं तेव्हा त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हि म्हण वापरली जाते.

डोळ्याआड मसणपाड
अर्थ: स्वतःच्या डोळ्याआड झालेल्या/केलेल्या गोष्टी मग त्या कितीही भयंकर का असेनात तरी चालू शकते.


तीरफळाचा ताँड उघडा 
अर्थ: सदानकदा बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्धल ही म्हण वापरतात.  



दिव्याक वात तोंडात हात
अर्थ: संध्याकाळ झाली कि लगेच जेवण जेवून मोकळे होणे. (सतत जेवणासाठी उतावीळ असणाऱ्या व्यक्तीसाठी हि म्हण वापरली जाते)

2 comments:

  1. मस्तच ! मालवणी भाषेचा लहेजा छान उतरलाय सगळ्या म्हणींमध्ये.एकंदरीतच म्हणी आणि वाक्प्रचारांचं जग मिस्कील असतं - जाता जाता नकळत टपल्या मारणारं.त्यातला भाषेचा आणि आशयाचा थेटपणा थक्क करणारा असतो.कधी किंचित शिवराळपणाकडेही झुकतोय की काय असं वाटतं पण या म्हणींचा उगम जेव्हां भाषेवर नागरपणाचे संस्कार झाले नव्हते त्या काळातला आहे हे लक्षात घेतलं की मग ते बोचत नाही.उदाहरणार्थ,आम्ही लहानपणी आजीकडे हट्ट केला एखाद्या गोष्टीचा की ती कृत:कोपाने म्हणायची "लाडकी नात देवळी हगे अन ढुंगण पुसायला आजी मागे".आता हगणं किंवा ढुंगण हे शब्द एरवीच्या संभाषणात वापरायला आपण किती बिचकतो पण म्हणीत असे शब्द सर्रास वापरले जायचे तेव्हां.दुर्दैवाने बोली भाषेला आपल्यात सामाऊन घेणारी ही म्हणींची दुनिया हळू-हळू लयाला जातेय.

    ReplyDelete
  2. मालवणी भाषा बऱ्यापैकी unparliamentary शब्दांनी भरलेली आहे. तिच्यात rawness खूपच आणि शिव्यांही भरपूर. पण हेही खरे कि खडबडीत, ओबडधोबड असलेल्या या भाषेत मजेशीर आणि चपखल प्रतिमांचा वापर भरपूर. शुद्ध (म्हणजे तिथेच कायम जगलेला) मालवणी माणूस तसा बेरकीच. त्यामुळे त्याची भाषा ही तशीच. मराठीत आपण बिचकत वापरणारे ,वापरायला सहसा न धजावणारे शब्द इथे रोजच्या बोलण्यात बिनधास्त वापरले जातात आणि त्यामागे काहीही (तसा उद्देश नसतो) उदा. बोलताना लोक एकमेकाला संबोधतानाही शिव्या वापरतात, अवयवांची नावं आणि त्याचा वापर करून चटकन काहीतरी वाक्य फरर्कन दुसऱ्याच्या तोंडावर भिरकावण्यात त्यांना काहीही वाटत नाही.

    ReplyDelete