Thursday 31 March 2016

वाचलेली दोन पुस्तके आणि विचारांचे उठलेले वाधळ

मागच्या काही दिवसात (४-५ दिवसात टु बी प्रीसाइज) मी सलग दोन पुस्तके वाचली. एक 'दस्तयेवस्की' ((Fyodor Dostoyevsky) चे 'इडीयट'. आणि दुसरे विल्यम फौकनर (William Faulkner) चे 'द साउंड ऍन्ड द फ्युरी'.
हि दोन्ही पुस्तके चांगली आहेत. पण मला दस्तयेवस्कीचे 'इडीयट' ज्यास्त परिणामकारक वाटले. का असे? तर त्याचाच मी विचार करत आहे.
या दोन्ही पुस्तकांवर  सविस्तर लिहायचा माझा विचार आहे. पण आता मला  या दोन्ही पुस्तकात कुठले ज्यास्त सरस आहे असा उगाचच विचारांचा खेळ करावासा वाटतो आहे. मला 'इडीयट' ज्यास्त आवडले. मी 'इडीयट' आधी वाचले आणि 'द साउंड ऍन्ड द फ्युरी' नंतर आणि 'द साउंड ऍन्ड द फ्युरी' वाचून खाली ठेवल्यावर असे एकदम सहजच माझ्या मनात आले कि 'इडीयट' या पेक्षा ज्यास्त खोल(profound) आहे. अर्थात हे सर्वस्वी माझे मत आहे. दोन्ही पुस्तकांच्या गुणवत्तेशी माझ्या मताचा काडीमात्र संबंध नाही.

पुस्तक वाचायला घेतले कि आपल्यापुढे एक बॉक्स तयार होतो. किंवा अद्भुतकथांमध्ये तो जादूचा गोल असतो ना, ज्यात मंत्र म्हणून बघितल्यावर कुठल्यातरी जागेत अमुक  माणसे काय करत आहेत ते स्पष्ट दिसायला लागते, तसा गोल तयार होतो. या गोलामध्ये पुस्तकातल्या कथेची सृष्टी असते, कथेतील पात्रे, त्यांच्या आजूबाजूचे वातावरण सर्वकाही ह्या गोलात अवतरते. तुम्ही ते गोलाच्या  बाहेरून बघत असता. (त्या 'डिव्हाइन मेकर' सारखे) हळूहळू त्या गोलात घडणाऱ्या खेळात तुम्ही सामील होता. त्यातल्या पात्रांची  सुख- दुखः तुम्ही अनुभवता आणि त्यांच्याशी सहानुभूती देखील वाटू लागते.

तर असे दोन गोल, हि दोन्ही पुस्तके वाचताना माझ्यासमोर तयार झाले. पण 'इडीयट' चा गोल खूपच खोलपर्यंत होता, तिथे माझी दृष्टीही पोचू शकली नाही. त्याचा तळ शोधताना आणी अर्ध्या खोलीवर पोचून वर येताना माझी पुरेपूर दमछाक झाली. 'इडीयट' चे वातावरणच तसे आहे. खूप खोल. आणि असे सारखे जाणवत राहते कि हे आपल्या अवाक्याचे नाही.  त्यातल्या पात्रांचे आयुष्य खूप जिवंत वाटते (गोलापुरते मर्यादित असले तरी). त्यातली सगळीच पात्रं अशी चितारलेली आहेत कि मला दस्तयेवस्कीची कमाल वाटायला लागली कारण अशी पात्रं चितारायला ती पात्रं म्हणजे तुम्ही 'स्वतः' असलं पाहिजे. तेव्हाच इतक्या खोल समजेने तुम्ही ती पात्रं लिहू शकता. दस्तयेवस्कीला नित्शे या विचारवंताने psychologist म्हटलं आहे. (नित्शे म्हणतो : दस्तयेवस्की हा एकमेव psychologist होता ज्याकडून मी काहीतरी शिकलो.) मला तर तो psychologist पेक्षाही आणखीन काही वाटतो. तो वाटतो एक विचारवंत आणि एक वेडा. हे पुस्तक त्याने वेड्य़ासारखेच लिहिलेय. त्याला काही फरक पडत नाही, तुम्ही त्याचे पानोपानी भरमसाठ शब्दांनी बनलेले हे गाठोडे वाचा अगर नका वाचू , तो कथा सांगत राहतो. या कथेत अनेक सूत्रे, अनेक पात्रं आणि त्यांचीही स्वतःची उपकथा. एक कथानक चालू आहे तर मध्ये दुसऱ्याच पात्राचे गाऱ्हाणे चालू होते. अनेक विषय, अनेक संकल्पना, अतिशय विक्षिप्त, passionate पण तरीही खरी वाटणारी पात्रे आणि त्यांची जगण्याची वैयक्तिक मुल्यं . पात्रांचे पानोपानी चाललेले एकांडे( जणूकाही ते पात्रं एकटंच बडबडतय, आजूबाजूला पन्नास माणसे असली तरी त्याचे एकट्याचेच आपले चालू आहे) अशी प्रचंड स्वगतं या पुस्तकात आहेत. आणि मला खात्री आहे कि या पात्रांच्या तोंडून दस्तयेवस्कीच बडबडत आहे. त्याला पडलेल्या अवाढव्य प्रश्नांची  उत्तरे शोधण्याचा तो प्रयत्न करत आहे. ते सर्व पात्रांनी जगलेले जीवन म्हणजे  त्याच्या जगलेल्या जीवनाचा, त्याला पडलेल्या प्रश्नांचा , त्याच्या विचारांचा कोळ आहे. कधीकधी तोही त्यात गुरफटलेला वाटतो. मग त्याची पात्रेही गुरफटून जातात. पानोपानी नुसते शब्दांचे गुऱ्हाळ (कि चऱ्हाट ?) चालते. पण तरही हे पुस्तक कुठेतरी खोल घेऊन जाते. हे पुस्तक , १० ते १५ पानाच्या वर मला काही सलग वाचता आले नाही. कारण तो जे काही लिहितो त्याने तो एकदम तळाशीच घेऊन जातो. मग पुस्तक बंद करून म्हणावेसे वाटते, थांब रे बाबा जरा , एवढ्या वेगाने खोल नेलेस तर गुदमरायला व्हायचे. तेव्हा जरा थांब.'  तर असं हे  'इडीयट' पुस्तक.
यातले प्रत्येक पात्रं( मग ते कितीही छोटं का असेना), तुमच्या लक्षात राहतं, कारण दस्तयेवस्कीच्या प्रत्येक पात्राला काहीना काही सांगायचं असतं. त्याच्या पात्रांबद्धल सहानुभूती वाटते, मग ते कुणीही का असेना (चांगलं  किंवा वाईट) याचे कारण म्हणजे खुद्द लेखकालाच त्यांच्याबद्धल तसे वाटते, तश्या आंतरिक घालमेलीनेच, कळकळीनेच त्याने ती लिहिली आहेत. त्याची पात्रं रंगवणे हि खास त्याची खासियत आहे. त्याचे वाईट वागणारे पात्र देखील  माणुसकीच्या पातळीवर उतरते, विक्षिप्त, त्रासदायक पात्रांतही माणूस असल्याचे पुरावे मिळतात तेव्हा लेखकाची या पात्रांबद्धलची समज किती खोल आहे याची जाणीव होते. कुठेही तंत्र वापरलेलं नाही, कारागिरी नाही, नुसता  शब्दांचा फापटपसारा. अस्ताव्यस्त डोंगर. पण असे असले तरीही हा डोंगर इतक्या खोल दरीचा आहे, कि ती खोली आपल्याला जाणवत राहते.

मला  'द साउंड ऍन्ड द फ्युरी' मध्ये ती खोली जाणवली नाही. अर्थात हेहि पुस्तक मला आवडले. आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेने व कथनाने हे पुस्तक खूपच वेगळे वाटले. पण तरीही  'इडीयट' एवढे ते परीणामकारक वाटले नाही. त्यातली काही पात्रे मनाला काहीच जाणवू देत नाहीत. एक कथा, त्यातली माणसे, त्यांचे आयुष्य, त्याच्या आयुष्यात घडणारे विदारक प्रसंग, हे सर्व असले तरी पण काही मोजकी पात्रं सोडली तर मला बाकीची पात्रं फारच पोकळ वाटली. कदाचित तेच या पुस्तकचे सांगणे असेल. कि जरी ती पोकळ वाटली तरी ती पोकळ नाहीत. दर वेळेला त्यांना सर्व अंगांनी (dimensions) ने दाखवण्याचा अट्टहास कश्यासाठी? असेल, तसेही असेल. या पुस्तकाविषयी मी सविस्तर लिहिणार आहे, कारण 'इडीयट' इतके खोल वाटले नसले तरीही या पुस्तकातील काही भाग मला अतिशय आवडला. अश्या प्रकारचे पुस्तक मी यापूर्वी कधी वाचलंच नव्हतं. आपण जेव्हा काहीही करत असतो तेव्हा आपल्या नकळत आपल्या डोक्यात विचार येतात, मग ते कालचे असू शकतात, २० वर्षांपूर्वीचे किवा एक आठवड्यापूर्वीचे, त्याला काही ताळमेळ नाही. कधी आपल्या डोक्यात सदैव चाललेल्या विचारांचे, आठवणीचे print काढता आले तर ते इतके असंबद्ध असेल कि आपल्याला ते वाचताच येणार नाही, पण जर असे gibberish content फार काळ print केले आणि वाचले तर त्यातून काहीतरी अर्थ, सुसंगती नक्कीच मिळेल , तर अश्याच काहीश्या धर्तीवर हे पुस्तक बेतले आहे. व्याकरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून, कुठलाही शब्द एकदम वाक्यात कुठेही टाकलेला. वाक्याला अंतच नाही (No Full-stop between the lines). पण असं जरी हे खूप वेगळं प्रेझेंनटेशन असलं तरी कुठेतरी त्यात  'इडीयट' ची खोली जाणवत नाही. यातली काही पात्रं वरवरची वाटतात, किंबहुना ती जे वागतात , त्यामागचा अर्थ लागत नाही, त्यांचे वागणेही खूप superficial वाटत राहते. 

खरंतर माझं असं तुलना करणं देखील चुकीचं आहे असं मला आता हे सर्व मी लिहित असताना वाटायला लागलं आहे. कारण दोन्ही पुस्तकं वगवेगळ्या प्रकारची आहेत आणि त्यांचे विषयही वेगळे आहेत. 'द साउंड ऍन्ड द फ्युरी' हे पुस्तक अनेक संकेतस्थळांवर 100 Best Books of 20th Century च्या  लिस्ट मध्ये समाविष्ट आहे. आणि लेखकाला नोबेल प्राईज मिळवण्यात देखील या पुस्तकाचा खूप मोठा वाटा होता. 

पण काहीही असले तरी या दोन लेखकांपैकी कुणाचे दुसरे पुस्तक मी आता वाचायला घेईन तर त्याचे उत्तर 'दस्तयेवस्की' चे असे आहे. 

 

No comments:

Post a Comment