Tuesday 15 March 2016

इटर्नल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड

आठवणी. माणसाच्या अस्तित्वाचा एक महत्वाचा भाग. माणूस आठवणींवर जगतो, त्यांना पुन्हा पुन्हा जागृत करून त्यात रममाण होतो.  पण सगळ्याच आठवणी सुखद नसतात. काही इतक्या क्लेशदायक असतात कि त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी माणूस आत्मनाशाकडेही वळू शकतो. मग अश्या या आठवणींचे काही करता येऊ शकते का? त्या नको असलेल्या आठवणी पुसून टाकता आल्या तर माणूस पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करू शकेल. पण स्वतःच्या आठवणी अश्या पुसणे म्हणजे आपल्या अस्तित्वाचाच एक अविभाज्य भाग पुसल्यासारखे आहे. कितीही म्हटले तरी आपल्या आठवणी आपल्या आयुष्याचे संचित आहे. मग ते कसेही असो माणसाला ते हवे असते. ते जर पुसले गेले तर तेवढीच तडफड होइल जेवढी त्या दुखःद आठवणींच्या स्मरणाने होइल. कारण आठवणी म्हणजे केवळ मेंदूत साठवलेली माहिती नव्हे, तर त्या आठवणींशी जोडलेल्या आपल्या सूक्ष्म भावनाही असतात. आपल्या असण्याचा, आपल्या अनुभवाचा त्या  एक प्रमुख भाग असतात. 

आठवणी जितक्या खोल तितका त्यांचा आपल्यावर आणि आपल्या अस्तित्वावरचा परिणामही खोल.   ज्याच्यावर आपले मन जडले आहे त्याच्या बाबतीतल्या दुखःद आठवणीचे तर विचारूनच नये. प्रेमभंग झालेल्या माणसाचे मन त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींच्या रूपाने त्याला सूक्ष्म, तरल संवेदनांची जाणीव करून देऊ शकते म्हणून त्याला त्या कितीही क्लेशकारक असल्या तरी हव्या असतात. अश्याच विषयावर आधारलेला हा चित्रपट :  'इटर्नल  सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड' आठवणींच्या  विविध छटानी गुंफलेली कथा दाखवतो.

एकमेकांपासून वेगळे झालेले दोघे प्रेमी. त्याचे नाव जोएल बॅरीश आणि तिचे नाव क्लीमेनटाईन  क्रुक्जेन्स्की.
'व्हॅलेंटाइन डे' च्या जवळपासचे दिवस असतात, जोएल ऑफिसला जात असताना स्टेशनवरून एकदम पळत जाऊन 'मॉन्टूक' ची ट्रेन पकडतो त्याचा मोनोलॉग चालू असतो. त्यात तो म्हणतो :
Random Thoughts, for Valentines day, 2004. The day’s a holiday invented by greeting card companies, to make people feel like crap. I ditched work today. Took a train out to Montauk. I don’t know why. I’m not an impulsive person. I guess I just woke up in a funk this morning. I have to get my car fixed.

मॉन्टूकच्या बीचवर एकटाच फिरत बसतो. त्याच्या छोट्या वहीत तो लिहित असतो आणि स्केच काढत असतो.
It’s goddamned freezing on this beach! Montauk in February. Brilliant, Joel. … Pages are ripped out, don’t remember doing that. It appears this is my first entry in two years. Sand is overrated. It’s just tiny little rocks. If only I could meet someone new. I guess my chances of that are somewhat diminished, seeing as I’m incapable of making eye contact with a woman I don’t know. Maybe I should get back together with Naomi. She was nice, nice is good. She loved me.

फिरता फिरता त्याला बीचवर एक मुलगी दिसते. तो तिला टाळतो. कॉफी शॉप मध्ये देखील ती मुलगी त्याला त्याच्याकडे बघताना दिसते. 
Why do I fall in love with every woman I see who shows me the least bit of attention?  

शेवटी मॉन्टूक वरून परत 'रॉकव्हिले सेंटर' ला जाताना ती मुलगी त्याच्याशी ओळख करते. ती 'क्लीमेनटाईन' असते. खरंतर दोघेही दोन वर्षांपूर्वी एकमेकांचे प्रेमी असतात. पण ते दोघेही हे विसरलेले असतात. कसे?

तर पुढचा चित्रपट या सर्वावर प्रकाश टाकतो.

दोन वर्षांपूर्वी, भेटलेले आणि प्रेमात पडलेले  हे दोघे. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असेलेले तरीही दोघे एकमेकांकडे आकर्षिले जातात. जोएल हा मितभाषी, लाजाळू असतो तर क्लीमेनटाईन मुक्त, स्पोण्टेनिअस स्वभावाची असते. नात्याच्या सुरवातीच्या सुखद दिवसांनंतर दोघांच्या टोकाच्या भिन्नतेमुळे खटके उडून नाते वारंवार कडवट होऊ लागते. शेवटी नाते तुटते आणि क्लीमेनटाईन जोएल पासून मुक्त होण्यासाठी आपल्या मेंदूतून जोएलच्या सर्व आठवणी इरेझ(पुसून टाकते ) करते. आता असे वास्तवात शक्य नाही पण हे सायन्स फिक्शन आहे. एका 'लाकुना' नावाच्या क्लिनिक मध्ये असे करता येत असते. (आणि अश्या कॉन्सेप्टवर आधारलेली हि कथा खूपच ओरिजिनल आहे). ती आपल्या जोएलशी संबंधित सगळ्या मेमरीज पुसून टाकते. 'लाकुना' अश्या आठवणी इरेज केलेल्या व्यक्तींच्या प्रेमीशी संबधित व्यक्तींना याबद्धल कळवत असते. जेणे करून त्या प्रेमीची आठवण तिला परत कधीच करून न देण्यात यावी. तसे एक पत्र जोएलच्या निकटच्या मित्राला येते. जोएल जेव्हा त्याला क्लीमेनटाईन ने कसे आपल्याशी संबंध तोडून टाकले आहेत, तिने कसा आपला फोनेही बदलला आहे, आणि ती आता ओळख नसल्यासाखी कसे वागत आहे, दुसऱ्या कुणाशी तिने संबंध जोडले आहेत हे  सांगत असतो तेव्हा तो मित्र त्याला ते पत्र दाखवतो.
ते पत्र वाचल्यावर रागाच्या भरात तोही 'लाकुना' मध्ये जाऊन क्लीमेनटाईन च्या आठवणी इरेज करतो.
पण असे करताना त्याला अत्यंत त्रास होतो. जेव्हा त्याला त्यांच्या सुखद आठवणी इरेज होताना दिसतात तेव्हा तो त्रस्त होतो. त्या आठवणी आणि क्लीमेनटाईनचे त्याच्या मनातील अस्तित्व तो इरेज होण्यापासून वाचवू पाहतो. कारण त्याचेही मन त्यात गुंतलेले असते, तो त्यांच्याही जगण्याचा, असण्याचा भाग असतो. चित्रपट हा या आठवणीतच गुंफलेला आहे. तो आठवणीतल्या क्लीमेनटाईनला तिचे अस्तिव त्याच्या आठवणीतून पुसले जाणार आहे याची जाणीव करून देतो आणि ते दोघे (आठवणीतच : म्हणजे जोएल च्या मेंदूतल्या विचारातच इकडून तिकडे पळताना, इरेज होण्यापासून वाचण्यासाठी जोएलच्या लहानपणीच्या मेमरीज मध्ये शिरकाव करताना दिसतात.
चित्रपटातील हि दृश्ये  बघणे आणि अनुभवणे खरच खूप वेगळे  आहे. जोएल च्या मेमरीचे नक्की काय होते. तो क्लीमेनटाईनची आठवण वाचवू शकतो का हे आपल्यालाला चित्रपटाच्या सुरवातीचा भाग आणि शेवटचा भाग यांचा संदर्भ जोडला तर कळते. तो तिच्या कुठच्याही मेमरीज वाचवू शकत नाही, शेवटची आठवण ज्यात जोएल च्या मेंदूतील क्लीमेनटाईन त्याला 'मॉन्टूक'येथे भेटायला सांगते तीही पुसली जाते.

पण दोघे पुन्हा भेटतात. 'मॉन्टूक' येथेच. म्हणजे आठवणी पुसल्या जाऊ शकतात पण त्या बरोबर अनुभवलेले इम्प्ल्सेस पुसले जाऊ शकत नाहीत. शेवटी मेमरी (आठवण) यापलीकडेही माणसाला अस्तित्व आहे, त्याचे अनुभव फक्त आठवणीपुरतेच मर्यादित नाहीत. जेव्हा त्यांना कळते कि दोघेही आधी भेटले होते आणि नाते तोडल्यानंतर दोघानीही  एकमेकाच्या आठवणी पुसून टाकल्या होत्या तेव्हा दोघेही साशंक होतात. पण तरीही दोघे पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतात.
चित्रपटात आणखी उपकथानकंही आहेत. जसे क्लीमेनटाईनचा नवीन मित्र (जो  'लाकुना' चाच सदस्य असतो),  'लाकुना' चा डॉक्टर आणि त्याचा सहकारी आणि सेक्रेटरी मेरी. तिचीही एक स्टोरी आहे ज्यामुळेच शेवटी ती सगळ्या  'लाकुना' मध्ये आठवणी इरेज करणाऱ्या लोकांना पत्र पाठवून त्यांना असे काही त्यांच्याबाबतीत झाल्याचे सांगते. त्यामुळेच जोएल आणि क्लीमेनटाईनला शेवटी आपल्या एकमेकांविषयीचा  भूतकाळ कळतो. 

हा चित्रपट त्याच्या अतिशय वेगळ्या पटकथेमुळे मनावर कायमचा ठसून जातो. मायकेल गॉण्ड्री नावाच्या फ्रेंच दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चार्ली कौफमन या अतिशय गुणी पटकथाकाराने या चित्रपटाची कथा लिहिली आहे. आठवणीवर आधारलेला हा चित्रपट आपल्यालाही अनेक आठवणी देऊन जातो ज्या दीर्घकाळ लक्षात राहतात. या चित्रपटाचे संगीत त्याच्या नॉस्टाल्जिक मूडला साजेसे आहे. विशेष  म्हणजे यात जुनी हिंदी गाणी पार्श्वभागात ऐकायला येतात. लताचे 'वादा ना तोड', रफीचे 'मेरा मन तेरा प्यासा ' अशी काही गाणी. 

यातली अनेक दृश्य गोठलेल्या आठवणीचा अनुभव देणारी आहेत. गोठ्लेल्या तलावाच्या पृष्ठभागावर जोएल आणि क्लीमेनटाईन पहुडलेले आणि त्यांच्या बाजूला तलावाच्या पृष्ठभागावर बर्फाचा तडा गेलेल्या पुसट रेषा गेलेल्या हे दृश्य अतिशय सुंदर आहे.


कडाक्याच्या थंडीतील निर्मनुष्य किनाऱ्यावर दोघेच एकमेकांपासून दूर एकमेकांकडे बघतात, ट्रेन मधील दोघांच्या संभाषणाचे दृश्य अशी किती दृश्य सांगावीत? पूर्ण चित्रपटच दृश्यात्मकतेचा अतिशय सुंदर अविष्कार आहे. 
जीम कॅरी आणि केट विन्स्लेट खूपच गुणी अभिनेते आहेत. विशेषतः केट विन्स्लेटने मुक्त क्लीमेनटाईन अतिशय परिपूर्णतेने साकारली आहे. तिचे रंगीत केस(जे तिच्या मूड प्रमाणे बदलतात) हेही  फारच विशेषतेने लक्षात राहतात. (ती त्या विचित्र रंगांच्या केसातही विलक्षण सुंदर दिसली आहे)

चित्रपटात नोस्टाल्जीयाने भारून टाकलेलं  मिलान्कोलीक वातावरण आहे. जे तुम्हाला ओढून घेऊन जातं. परत परत बघावा असा हा चित्रपट आहे.

No comments:

Post a Comment