Monday 8 January 2018

शेवटचे दोन जिवंत क्षण

हे आहेत
आत्महत्त्या करणाऱ्याच्या आयुष्यातील
शेवटचे दोन जिवंत क्षण 

ते दोन क्षणच बोलले शेवटी
त्या आत्महत्त्या करणाऱ्या माणसाशी
आम्हीच आहोत आता
फक्त दोनच उरलो आहोत
बोलायला तुझ्याशी

एक क्षण म्हणाला  : 'जमिनीला 'टच' व्हायला '
दुसरा क्षण मधेच बोलला 'जमिनीला 'टच' व्हायला
की जमिनीचा 'टच' सुटायला ?'
'गप्प बस' पाहिल्याने दुसऱ्याला दटावले
आपण आता दोनच उरलोय
मला बोलू दे  या माणसाशी 

तर हे बघ आत्महत्त्या करणाऱ्या माणसा
जमिनीला 'टच' व्हायला
फक्त दोन क्षणांचा अवधी आहे
वर आकाशात कुठेही खुंटी नाही
जिला आता तू धरू शकतोस

आणि तरंगूही शकत नाहीस
फार काळ या स्थितीत
या 'हँगिंग स्टेट' मध्ये गोठून गेला आहे
तुझा निर्णय

आता काय करणार?
थोड्याच वेळात सर्व संपणार
चूक झाली का ?
आणि जर झाली चूक
तरी काय करणार?

त्या चुकीचे
प्रायश्चित्त घ्यायला
तू तर नसणार
ही एकच गोष्ट अशी
जिला माफी आणि
प्रायश्चित्त नाही उरणार 

 - जानेवारी २०१८

No comments:

Post a Comment