Wednesday, 23 August 2017

जुनं पुराण

या प्रवाहाजवळ मी बसले आहे
एका उपड्या होडीवर 
सोबतीला एक कुत्रा, एक पिंपळ, आणि अविरत सळसळ

या नदीला समुद्राची ओढ वाटते ?
की तिला त्याचे बंधन वाटते?
की स्वतः संपताना ती अशाच कुणाचा विचार करते?

समुद्राला,  (आणि या पिंपळालाही )
एका जागी राहून जेव्हा वैताग येतो 
तेव्हा त्याला कुठे जावेसे वाटते?

प्रवास करून होडी थकते, किनारी लागते, उपडी होते
उपड्या होडीत, फिरून आलेल्या सफरीतला
एकतरी थेंब शिल्लक असेल का?

कोलाहलात, संथ होता येते? 
मग ही  पानांची सळसळ,
आपल्यासहीत शांतता कशी घेऊन येते 

बाजूला पहुडलेला कुत्रा डोळे मिटून विचारमग्न आहे 
उपड्या होडीवर बसून
मी मात्र प्रवास करतच आहे

-'खूप जुनं काही'  ५-ऑगस्ट-२०१७  

No comments:

Post a Comment