Wednesday, 7 June 2017

विंसन्ट व्हॅन गॉग


(विंसन्ट व्हॅन गॉग हा अठराव्या शतकात होऊन गेलेला एक डच चित्रकार होता. जगातील सर्वात नावाजलेला चित्रकार. त्याची चित्र म्हणजेच 'तो स्वतः' इतके त्याने स्वतःला चित्रात ओतले आहे. चित्र आणि तो एकच  झाला. पण त्याच्या आयुष्यात त्याच्याइतके क्वचितच कुणी भोगले असावे. प्रेम, आपुलकी, यश, पैसा यापैकी त्याला काहीच मिळाले नाही. कुठचेही भौतिक सुख त्याला मिळाले नाही. सतत तडफडत, धगधगत राहिला. त्याच्या मृत्यूनंतर आता तो सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक हवासा कलावंत मानला जातो पण त्याच्या जिवंतपणी तो प्रेम, आपुलकी, स्वीकार यासाठी आयुष्यभर तळमळला. लोकांनी त्याला नाकारले. त्याला वेडा ठरवले. तसा तो विलक्षण वेडा होताच पण म्हणतात ना 'There is a very thin line between genius and insanity.' शेवटी स्वतःच्या डोक्यात पिस्तूल झाडून त्याने आपले आयुष्य संपवले. त्याचे जीवन चटका लावणारे आहे. ही कविता त्याच्यावर लिहिली आहे. पण त्याच्या चित्रातले चैतन्य या कवितेत नाही. कारण त्याच्या चित्रात त्याने आपले सर्वस्व ओतले होते. तरीही एक प्रयत्न... )



एक क्षण होता येईल का
विंसन्ट व्हॅन गॉग
डोक्यावर सूर्याच्या ज्वाळा
मनात वैराण माळरान
घेऊन वाट तुडवता येईल का

होता येईल का ती सूर्यफुले
विंसन्टच्या चित्रातली
तो मरून गेला तरी
ती अजून टवटवीत आहेत

विंसन्टचा एकटेपणा
अनुभवता येईल का?
पण त्यासाठी
जवळ पिस्तूल हवं

-१८-मे -२०१७






No comments:

Post a Comment